26 Jul 2016

रिव्ह्यू - & जरा हट के

शहाण्या, समजूतदार मुलींची गोष्ट
--------------------------------------

मुली मुलांपेक्षा शहाण्या अन् समजूतदार असतात. किती तरी जास्त! हे मी सांगायची गरज नाही. सगळ्यांनाच ते माहिती आहे. पण खरोखर '& जरा हट के' हा नवा मराठी चित्रपट पाहताना या वाक्याचा पुनःपुन्हा प्रत्यय येत राहतो, म्हणून ते पुन्हा सांगावंसं वाटतं इतकंच.
स्त्रीच्या मनाचा थांग कुणाला लागला आहे! त्याचा शोध घेणं म्हणजे महासागराचा तळ मोजणं किंवा आकाशाची व्याप्ती मोजणं. आपण फक्त कल्पनाच करू शकतो. म्हणून तर कित्येक साहित्यिकांना, कवींना, नाटककारांना या स्त्रीमनाची सदैव भुरळ पडलेली असते. आपल्या आयुष्यात किती तरी स्त्रिया येतात. वेगवेगळ्या नात्यांनी येतात. वेगवेगळ्या रूपांत येतात. या सगळ्यांच्या वागण्याची, रीतीची सांगड घालण्याचा प्रयत्न बिचारे पुरुष सदैव करीत राहतात. अन् बहुतेक जण शेवटी तिला शरण जाऊन मोकळे होतात. काही जण मात्र अनोख्या पद्धतीनं स्त्रीचा शोध घेत राहतात.
प्रकाश कुंटे हा नवा दिग्दर्शक दुसऱ्या वर्गात जाणार, असं दिसतंय. 'कॉफी अन् बरंच काही' या त्याच्या पहिल्या चित्रपटातच त्यानं याची चुणूक दाखवली होती. प्रेमासारखा नेहमीचाच विषय; पण कॉफीसारखी भलतीच तरतरीत, पण तरीही तरल अशी मांडणी त्यानं त्या कलाकृतीत करून दाखविली होती. याचं कारण या दिग्दर्शकाला सिनेमा या माध्यमाचं नेमकं भान आहे. प्रेक्षकांच्या जाणिवेची जाण आहे. त्यामुळंच अनेकदा नेणिवेच्या पातळीवरूनच तो काही गोष्टी सांगत राहतो. एखाद्या अभिजात साहित्यकृतीचं वाचन करताना, दोन वाक्यांमधले विराम वाचताना जो अपरिमित आनंद होतो आणि आपल्याला काही तरी गवसल्याचं अलौकिक समाधान लाभतं, तोच आनंद अन् तेच समाधान या दिग्दर्शकाच्या कलाकृती पाहताना लाभतं.
'& जरा हट के' अशा 'हट के'च शीर्षकाच्या कलाकृतीतून प्रकाश कुंटे आपल्याला दोन मुलींची गोष्ट सांगतात. यातली एक मुलगी वयानं मोठी आणि दुसरी तिची मुलगी, अर्थातच अल्लड वयातली. या दोघींच्याही आयुष्यात काही तरी घडतंय आणि दोघींचंही जैव नातं असल्यानं ते दोघींवरही सारखाच परिणाम करू पाहतंय. यातली थोरली मीरा (मृणाल) हिच्या आयुष्यात घटस्फोटानंतर एक पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यात राहणारी उच्चशिक्षित, प्रोफेसर असलेली मीरा तिच्या पद्धतीनं परिस्थितीला तोंड देतेय. तिची सतरा वर्षांची मुलगी आस्था (शिवानी) मुंबईत तिच्या मावशीकडं (सोनाली खरे) राहतेय. मीराला अचानक तिचा जुना मित्र आकाश (इंद्रनील) भेटतो. काही कालावधीनंतर मीरा आकाशशी लग्न करण्याचा निर्णय घेते. हा निर्णय ती मुलीला कळवते. पण अल्लड, नवथर तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आस्थाला यावर कसं रिअॅक्ट व्हावं हे कळत नाही. आईनं सदैव खूश राहावं असं तिला वाटत असतं, पण तिचा तिच्या बाबांशी असलेला कनेक्ट कायमच असतो. अशा वेळी इंद्रनीलचा मुलगा निशांत (सिद्धार्थ) यानं आस्थाशी बोलावं असं आकाश व मीरा ठरवतात. मुंबईत दोघंही भेटतात. निशांत आणि त्याच्या बाबांचं नातं मित्रांसारखं असतं. शिवाय निशांत आस्थापेक्षा थोडा मोठा असतो. त्यामुळं तो ही परिस्थिती जास्त चांगली समजावून घेऊ शकतो.
कालांतरानं आस्था आणि निशांत पुण्यात येतात. मीरा आणि आकाश एकाच घरात राहत असतात. तिथं या चौघांच्या एकत्र राहण्यातून पुढची गोष्ट उलगडत जाते. गोष्टीत पुढं अर्थातच एक ट्विस्ट येतो. तो स्वाभाविकच आहे. फारसा धक्का देणारा नाही. पण दिग्दर्शकालाही ते अभिप्रेत नसावं. त्या धक्क्यानंतर गोष्टीतली पात्रं, विशेषतः या दोन मुली कशा रिअॅक्ट होतात, हेच त्याला सांगायचं आहे. आणि ते सांगणं अर्थातच त्या पात्रांप्रमाणेच शहाणं, समजूतदार आहे. या दिग्दर्शकाला गोष्टीत अनेक  रिकाम्या, सूचक जागा ठेवून प्रेक्षकांनी त्या भराव्यात, असं अपेक्षित असावंसं दिसतं. पण त्यामुळं प्रेक्षकही गोष्टीत गुंतून राहतो आणि योग्य जागा भरल्या गेल्या, की कोडं सुटल्याचा आनंद होत राहतो.
एखाद्या निवांत हिलस्टेशनवर जाऊन, ब्रिटिशकालीन बंगल्यात बसून, बाहेरचा पाऊस पाहत आणि हातात थोरला कॉफीचा मग घेऊन घुटक्या-घुटक्यानं एखादी क्लासिक कादंबरी वाचावी ना, तसा फील हा सिनेमा आपल्याला देतो. यातल्या पात्रांचं पर्यावरण उच्चभ्रू शहरी प्रेक्षकांच्या जगण्याशी मिळतं-जुळतं आहे. त्यामुळं असा प्रेक्षकवर्गच या गोष्टीशी रिलेट करू शकतो. यातली पात्रं उच्चशिक्षित, विचारी आहेत. आपण आयुष्यात काय करतोय याचं त्यांना नेमकं भान आहे. त्यांना नात्यांची, त्यातल्या ताण्या-बाण्यांचीही जाण आहे. प्रियजनांना न दुखवता, हळुवारपणे गोष्टी करण्याकडं त्यांचा कल आहे. हे फारच आदर्शवादी जग असलं, तरी ते प्रेक्षक म्हणून तुम्हाला खुणावणारं, हवंहवंसं वाटणारं आहे.
दिग्दर्शकानं यातल्या प्रमुख दोन मुलींसोबत इतरही स्त्री-पात्रं दाखविली आहेत. त्यात सोनाली खरेनं साकारलेली मीराची बहीण नलू आहे, स्पृहा जोशीनं भूमिका केलेली गीता आपटे ही आस्थाची मैत्रीण आहे, सुहास जोशींनी साकारलेली मीराची आई आहे, अमृता देशपांडेनं उभी केलेली निशांतची मैत्रीण आहे. या सगळ्या स्त्रिया थोड्याफार प्रमाणात दिसत राहतात. एक-दोन प्रसंगांतच त्यांचं संपूर्ण कॅरेक्टर उभं करण्याचं दिग्दर्शकाचं कसब वाखाणण्यासारखं आहे. उदा. सुहास जोशींनी साकारलेली मीराची आई अवघ्या दोन-तीन प्रसंगांतच दिसते. पण ही आजी किती 'कूल' आणि कसली गोड आहे, हे प्रेक्षकांपर्यंत विनासायास पोचतं. अर्थात यात सुहास जोशींचाही मोठा वाटा आहेच. मीराच्या भावानं अजितनं - तिच्याशी फोनवरून वैतागून बोलणं असो, की आस्था आणि आकाश यांचं रात्रीच्या वेळी अंगणात बसून तारे निरखणं असो, अशा अनेक प्रसंगांतून दिग्दर्शक थेट न सांगता बरंच काही सांगून जातो आणि ते सगळं आपल्यापर्यंत पोचतंच.
ही प्रामुख्यानं आस्था आणि मीराची गोष्ट असली, तरी निशांत आणि आकाश या व्यक्तिरेखाही त्यांच्या आयुष्यात, पर्यायानं या गोष्टीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचीही कॅरेक्टर्स पुरेपूर उभी राहतील, याची नीट काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. चित्रपटात अनेक प्रसंगांत वसंतरावांची नाट्यपदं किंवा शास्त्रीय संगीत पार्श्वभूमीवर मंदपणे वाजताना ऐकू येतं. आपल्या पात्रांच्या जीवनशैलीशी जुळणारा हा सूर प्रेक्षकांनाही त्यात जोडून घेतो. पात्रांसभोवतीचं असं नेमकं पर्यावरण प्रेक्षकांना पात्रांची जवळून ओळख करून द्यायला उपयुक्त असतं. संपूर्ण सिनेमात दिग्दर्शकानं हे भान पाळलेलं आहे. त्यामुळंच यातला एकही प्रसंग अवाजवी किंवा ओढून-ताणून आणलाय, असं वाटत नाही.
मृणालनं यात साकारलेली मीरा पाहण्यासारखी आहे. यात तिनं प्रगल्भ अभिनयाचा परिपाठच घालून दिला आहे. ही भूमिका तिच्या वयाला साजेशी आहे. यात ती दिसलीय पण खूप छान! नवोदित शिवानी रांगोळेनं आस्था खूपच समजुतीनं उभी केली आहे. पहिलाच सिनेमा असूनही तिचा वावर गोड आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. इंद्रनील सेनगुप्ता या बंगाली अभिनेत्यानं यात आकाशचं पात्र उभं केलं आहे. त्यांनीही मृणालसोबत परिपक्व व प्रगल्भ अभिनय केला आहे. सरप्राइज पॅकेज आहे तो मात्र सिद्धार्थ मेनन. यातला निशांत त्यानं एवढ्या बारकाईनं आणि इंटेन्सली सादर केला आहे, की बस्स! दिवसेंदिवस हा अभिनेता अधिकाधिक मॅच्युअर होताना दिसतोय, ही आनंदाची गोष्ट आहे.
चित्रपटाच्या शेवटी आपल्या दोन्ही मुली एक निर्णय घेतात. तो निर्णय त्यांच्या दृष्टीनं 'जरा हट के'च असतो. कारण या मुली असतातच शहाण्या आणि समजूतदार... नात्यांना सांभाळून घेणाऱ्या आणि ते करताना दर वेळी नवं नातं निर्माण करणाऱ्या! या नात्यांना नाव नाही, गाव नाही. असतो तो फक्त समजूतदारपणाचा मंद, हळवा सूर!
चुकवू नका.
---
दर्जा - साडेतीन स्टार
---

3 comments: