12 Aug 2016

वायझेड - रिव्ह्यू

'निरामय' जगण्याची 'वायझेड' गोष्ट
-----------------------------------------
समीर विद्वांस दिग्दर्शित आणि क्षितिज पटवर्धन लिखित 'वायझेड' हा नवा मराठी चित्रपट म्हणजे, सिनेमातल्याच टर्म्सचा वापर करून सांगायचं, तर 'निरामय' जगण्याची एक 'वायझेड' गोष्ट आहे. लहानाचं मोठं होत जाताना हातातून वाळूसारख्या निसटलेल्या क्षणांची ही गोष्ट आहे. आपल्यातल्या लहान मुलाची आणि अकाली पोक्त झालेल्या वास्तव जगण्यातल्या आपली झालेली 'वायझेड' अवस्था सांगणारी ही गोष्ट आहे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या नातेसंबंधांची आणि त्याकडे निकोप दृष्टीनं पाहता येण्याची ही 'निरामय' गोष्ट आहे. थोडक्यात, चुकवू नये असाच हा सिनेमा आहे.
समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या दोघांचंही आधीचं काम, मग ते नाटकांतलं असो किंवा सिनेमांतलं, आश्वासक आहे. या दोघाही 'भावां'चा विषय 'खोल' असल्याची साक्ष पटवणारं आहे. अशा वेळी मग पुढच्या कलाकृतीकडून जाणकार प्रेक्षकाच्या अपेक्षा वाढतात. समीर आणि क्षितिज दोघंही या अपेक्षांच्या कसोटीला उतरले आहेत, असं म्हणता येईल. 'वायझेड'मधून त्यांनी अशीच हसता हसता अंतर्मुख करायला लावणारी झक्कास गोष्ट सांगितली आहे.
गोष्टीचा नायक गजानन कुलकर्णी (सागर देशमुख) हा वाईमधला ३३ वर्षांचा प्राध्यापक. नाकासमोर चालणारा, काहीसा गबाळा किंवा वेंधळा असा. अजून त्याचं लग्न झालेलं नाही किंवा त्याच्या आयुष्यात अद्याप कुणी स्त्रीही आलेली नाही. अशा या गजानन उर्फ 'अबब'ला अचानक सहा महिन्यांसाठी पुण्याला जावं लागतं. पुण्याला मावशीकडं जाऊन राहिलेल्या गजाननचं सगळं विश्वच पुण्यात आल्यावर बदलून जातं. वाईतल्या सुरक्षित, छोट्याशा जगातून तो एका महानगरात येऊन पुरता बावरतो. इथं त्याला कॉलेजमध्ये शिकणारा श्यामकुमार पारिजातक उर्फ 'बत्तीस' (अक्षय टांकसाळे) भेटतो. साध्याभोळ्या गजाननला जगण्यासाठी आवश्यक असा 'वायझेड' अटिट्यूड तो शिकवतो. पुढं त्याच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक तीन स्त्रिया येतात. या तिघी जणींमुळं आपल्या नायकात जो काही बदल होतो त्याचा गमतीदार प्रवास सांगणारी ही गोष्ट आहे.
समीर आणि क्षितिजच्या या सिनेमाची भट्टी जमून येण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचं पेपरवर्क उत्तम असतं आणि हे सिनेमा पाहताना जाणवतं. दुसरं म्हणजे क्षितिजचे तडतडीत संवाद.... हे संवाद प्रेक्षकाला सिनेमाच्या गोष्टीत आत खेचून घेतात. तिसरं म्हणजे कास्टिंग. प्रमुख आणि लहान भूमिकांसाठीही अगदी परफेक्ट कास्टिंग असेल, तर गोष्ट रंगायला वेळ लागत नाही. हल्ली साधारण सिनेमे दोन ते सव्वादोन तासांचे असतात. हा सिनेमा अडीच तासांचा आहे. पण बोअर होण्यासारखे क्षण फार क्वचित येतात. सिनेमाचा पहिला भाग गजाननचा वाई ते पुणे हा प्रवास आणि त्याचा वेंधळेपणा दाखवण्यात खर्ची पडला आहे. पण हा सर्व प्रवास निश्चित कुठे तरी एक दिशा धरून सुरू आहे हेही जाणवत राहतं. पहिल्या भागात 'बत्तीस'च्या व्यक्तिरेखेला जरा जास्त फुटेज दिलं गेलं आहे. ते किंवा 'ओ काका'सारखं गाणं अनावश्यक वाटतं. पण व्यापक ऑडियन्स डोळ्यांसमोर ठेवून हे केलं असणार. अर्थात त्यामुळं मूळ कथाप्रवाहात फार अडथळे येत नाहीत. 'बत्तीस'चा आगाऊपणा हा नायकाला उपकारक ठरणार असल्यानं आपण खपवून घेतो. अन्यथा अशी पात्रं प्रेक्षकांच्या डोक्यात जाण्याची शक्यता असते. इथं ती धूसर सीमारेषा दिग्दर्शकानं व्यवस्थित पाळली आहे, हे समीर विद्वांस यांचं कौशल्य!
क्षितिजची पटकथा घट्ट असतेच, पण ती कायमच कंटेंपररीही असते. हा लेखक आजच्या तरुणाईची भाषा बोलतो, आजच्या तरुणाईच्या संवेदना मांडतो. आजच्या गुंतागुंतीच्या जगण्यातले व्यामिश्र ताणेबाणे नेमके उकलून दाखवतो. जुन्या, म्हणजे मोबाइलपूर्व काळाशी जोडणारा एक धागाही त्यानं जपून ठेवला आहे, हे जाणवतं. हे सगळं आज पस्तीस-चाळिशीत असलेल्या प्रेक्षकाला जोडणारं आहे. त्याला सुखावणारं आहे. या काळाचा कनेक्ट नसलेला प्रेक्षक कदाचित या गोष्टीमधल्या 'बिटवीन द लाइन्स' वाचू शकणार नाही. त्यामुळंच 'वायझेड' हा कदाचित सर्व प्रेक्षकांसाठी नाही. असलीच तर ही एकच त्रुटी त्यात दिसते.
बाकी आधी म्हटल्याप्रमाणं सिनेमाचं कास्टिंग उत्तम. सागर देशमुख आणि अक्षय टांकसाळे हे दोघंही (माझ्या माहितीनुसार) प्रथमच सिनेमाच्या पडद्यावर झळकले असावेत. दोघेही नाटकातले कलाकार. मात्र, सिनेमाच्या माध्यमात त्यांना चपखलपणे बसवण्याची किमया दिग्दर्शकाची. मूळचे नाटकवाले असल्यानं सागर आणि अक्षय यांना अभिनय, संवादफेक, देहबोली यांची उत्तम जाण आहे आणि सिनेमात ते जाणवतं. मराठी सिनेमा हा बऱ्याच वेळा 'बोलपट'च असतो आणि नाटकातील अभिनेत्यांच्या ते पथ्यावर पडतं, हेही आहेच. याशिवाय सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे या सिनेमाच्या नायिका. (तिसरी मुक्ता बर्वे, पण ती जवळपास पाहुण्या भूमिकेत असल्यासारखी शेवटच्या अर्ध्या तासात येते.) सईला सोज्वळ भूमिकेत दाखवून दिग्दर्शकानं फारच धारिष्ट्य दाखवलंय. गमतीचा भाग सोडला, तर सईनं ही भूमिका छानच केली आहे. तिनं अशा नॉनग्लॅमरस भूमिका यापूर्वीही (उदा. अनुमती) केल्या आहेतच. पर्ण पेठे ही सध्याच्या नव्या नायिकांपैकी आश्वासक चेहरा आहे. ती आजच्या काळातली तरुणी आहे आणि कॉन्फिडंट व अट्यिट्यूड असलेल्या पिढीची प्रतिनिधी आहे. सिनेमातली तिची भूमिकाही अशाच व्यक्तिरेखेची आहे आणि त्यामुळं तिनं ती फारच सहजी साकारली आहे. मुक्ता बर्वे अगदी थोड्या काळासाठीही आपल्या अस्तित्वानं पडदा उजळवून टाकते. यातही ती लांबीनं थोड्या, पण महत्त्वाच्या भूमिकेत आहे आणि ती पडद्यावर आल्यापासून सिनेमाचाही पोत बदलतो.
यातली गाणीही धमाल आहेत. 'ओ काका' हे गाणं एरवी नुसतं ऐकायला धम्मालच आहे आणि ते हिट झालंही आहे. 'प्रियकरा' हे केतकी माटेगावकर व स्वप्नील बांदोडकरनं गायलेलं संस्कृत गाणं 'अबब' आहे. ते पडद्यावर सागर आणि पर्ण यांनी फारच रोमँटिक सादर केलं आहे. हे गाणं या सिनेमाचा एक 'यूएसपी' ठरणार, असं वाटतं. 'अरे कृष्णा, अरे कान्हा'पासून 'मीचि मज व्यालो' या संत तुकारामांच्या रचनेपर्यंत सर्व गाण्यांची निवड आणि वापर समीर व क्षितिज यांची कल्पकता दाखवणारा आहे.
हवा, खवा आणि धुव्वा यांची मजा अनुभवायची असेल, तर 'वायझेड' होऊन हा सिनेमा पाहण्याला पर्याय नाही.

---
दर्जा - चार स्टार
---

No comments:

Post a Comment