28 Mar 2016

ढेपेवाडा

ढेपेवाडा
---------

ढेपेवाडा हे नाव मी पहिल्यांदा केव्हा वाचलं ते आठवत नाही. पण गुळवणी महाराज पथावरून (मेहेंदळे गॅरेज रोड) जात असताना ही पाटी मी वाचली असणार. नंतर गेल्या वर्षी मला अखिल भारतीय ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा युवा पुरस्कार मिळाला, तेव्हा त्या पुरस्कारासोबत ढेपेवाड्याचा एक कॉम्प्लिमेंटरी पासही मिळाला. पण तिथं जाण्याचा योग येत नव्हता. मध्यंतरी दिवाळीत माझा मित्र संतोष देशपांडे याच्या सांगण्यावरून मराठी बांधकाम व्यावसायिकांच्या गृहबंध या दिवाळी अंकासाठी गृहखरेदीवर एक छोटासा लेख लिहिला होता. त्या वेळी या मासिकाचे संपादक नितीन ढेपे असल्याचं कळलं होतं. हेच ढेपेवाड्याचे सर्वेसर्वा! नंतर ढेपे यांनी स्वतः मला फोन करून तो लेख आवडल्याचं आवर्जून सांगितलं होतं. फोन नंबरची देवाणघेवाण झाली. मग व्हॉट्सअपवरून क्वचित मेसेज वगैरे. ढेपेवाड्याचे काही प्रमोशनल मेसेजही त्यात असत. शेवटी २५ मार्चला आमच्या लग्नाच्या वाढदिवशी एक दिवस ढेपेवाडा पाहून यावं, असं धनश्रीनं आणि मी ठरवलं. लेकाची परीक्षा असल्यानं मुक्काम वगैरे न करता, फक्त डे टूर घ्यावी, असं ठरलं. त्यानुसार तीन आठवडे आधी ढेपेवाड्याच्या गुळवणी महाराज रस्त्यावरील ऑफिसात जाऊन रीतसर पैसे वगैरे भरून पावती घेतली. तेव्हाच पहिल्यांदा ढेपे यांची भेट झाली. सौ. ढेपेही भेटल्या. याच भेटीत त्यांनी हा वाडा बांधण्यामागचे त्यांचे विचार स्पष्ट केले होते. शहरांतून वाडा संस्कृती आता जवळपास हद्दपार झाली आहे. या वाड्यांबरोबरच तत्कालीन मराठी रीतीरिवाज, सण-समारंभ साजरे करण्याच्या पद्धती, एकत्र कुटुंब किंवा अन्य आप्तेष्टांच्या भेटी-गाठी हे सगळंच आता कमी कमी होत चाललंय. काळानुसार गोष्टी बदलणारच; त्याबद्दल खंत करण्याचं कारण नाही. कारण जे टिकण्यासारखं असतं, ते टिकतंच आणि जे जायला हवं ते आपोआप जातंच हा सृष्टीचा नियम आहे. पण किमान फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आपल्या पुढच्या पिढीला हा वाडा होता तरी कसा, याची एक झलक पाहायला मिळावी, या हेतूनं ढेपेवाडा उभारल्याचं नितीन ढेपे आवर्जून सांगतात. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, तिथं मांसाहार किंवा मद्यपान, धूम्रपान आदी गोष्टींना सक्त मनाई आहे. मध्यमवर्गीय मराठमोळ्या लोकांनी इथं कुटुंबांसह, ज्येष्ठांसह यावं आणि एकत्र चार क्षण आनंदात घालवावेत एवढी सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे. आम्हाला हे आवडलं. ढेपेवाडा पाहण्याची उत्सुकता वाढली...
शुक्रवारी म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी, अर्थात आमच्या लग्नाच्या तेराव्या वाढदिवशी सकाळी सव्वाआठला आम्ही आमच्या कारनं ढेपेवाड्याकडं निघालो. ढेपेवाडा गिरीवनच्या परिसरात आहे, हे माहिती होतं. पण पवनानगरच्या त्या रस्त्यानं कित्येकदा जाऊनही आम्ही गिरीवनकडं कधीच वळलो नव्हतो. पौड गावातून बसस्टँडच्या शेजारून जो रस्ता उजवीकडं पवनानगर, हाडशीकडं वळतो, तिकडं आम्ही वळलो. गिरीवनचा फाटा येण्यापूर्वीच मोबाइल वाजला. ढेपेवाड्यातून फोन होता. नऊला पाच कमी होते. आम्ही निघालोय ना आणि किती वेळात तिथं पोचणार हे विचारण्यासाठी ढेपेवाड्याच्या कर्मचाऱ्याचा तो फोन होता. दहाच मिनिटांत पोचतो, असं सांगून फोन ठेवला. ढेपेवाड्याच्या व्यावसायिकतेची पहिली सुखद चुणूक इथं मिळाली होती. गिरीवनच्या रस्त्यानं पहिल्यांदाच निघालो होतो. काही मराठी कलावंतांनी एकत्र येऊन इथं जागा घेतल्या आहेत आणि बंगले, रिसॉर्ट बांधले आहेत, असं ऐकलं होतं. ही सगळी खासगी मालमत्ता आहे आणि एका कंपनीतर्फे तिथली देखभाल पाहिली जाते, हेही तिथंच वाचलं. (कलाकारांची नावं फार दिसली नाहीत. येताना एका बंगलीवर दिलीप कोल्हटकर हे नाव जाता जाता दिसलं, तेवढंच! असो.) गिरीवनचा रस्ता फारच वाईट होता. डोंगरउतारावरच्या आणि खूप पावसाच्या या भागात डांबरी रस्ता व्यवस्थित राहणं तसं अवघड; पण पहिलं इम्प्रेशन वाईट होतंच. पौड गावात किंवा पुढं ढेपेवाड्याच्या पाट्या नसल्या, तरी गिरीवनात मात्र ठिकठिकाणी ढेपेवाडा कुठं आहे हे दर्शविणाऱ्या छोट्याशा का होईना, पण पाट्या लावलेल्या दिसल्या. चालत्या कारमधून ड्रायव्हरला सहज लोकेट होईल अशा पाटीचा साइझ किती असावा, हे एकदा निश्चित करायला हवं. मला या पाट्या दिसल्या, पण सगळ्यांनाच चटकन लोकेट होतील, अशा वाटल्या नाहीत. तर बऱ्याच पाट्या आणि बराच कच्चा रस्ता ओलांडून आम्ही पुढं गेलो. गिरीवन बरंच मोठं आणि पसरलेलं आहे हे जाणवलं. पवनानगरकडं जाणाऱ्या खालच्या रस्त्यावरून हा एवढा परिसर इथं असेल, याची मुळीच कल्पना येत नाही. एक छोटा डोंगर आणि मागे एक मोठा डोंगर यांच्या बेचक्यात हा परिसर वसवला आहे. गर्द झाडी, छोटे छोटे टुमदार बंगले, काही मोठ्या इमारती असा हा परिसर पाहताना मन प्रसन्न झालं. काही ठिकाणी तर कोकणात आल्याचा फील आला. आम्ही बरंच पुढं गेलो आणि आता गिरीवन संपेल असं वाटत असतानाच एकदाचा ढेपेवाडा आला. आमच्यापुढं एक मोठी बस होती. त्यामुळं ढेपेवाड्याचं प्रथम दर्शन असं घडलंच नाही. कार पार्क करून पुढं गेल्यावरच त्यांचं ते महाद्वार दिसलं आणि मागे बऱ्यापैकी मोठ्ठा असा वाडा... हे दर्शन सुखावणारं होतं. महाद्वारात नोंदणी वगैरे करून खाली तिरक्या रस्त्यानं उतरल्यावर ढेपेवाड्याच्या प्रशस्त अंगणात आम्ही आलो. तिथं समोर तुळशीवृंदावन होतं आणि पुष्कळशी फुलझाडं लावलेली होती. वाड्यात प्रवेश केल्यावर हिरवा झब्बा घातलेला एक हसतमुख तरुण आम्हाला सामोरा आला आणि त्यानं आमचं स्वागत केलं. (धैर्यशील कदम हे त्याचं नाव नंतर कळलं.) वाड्यात उजव्या बाजूला देवघर होतं आणि मुख्य दारातून प्रवेश केल्यावर तो चौक आला. वाडा अगदी टिपिकल मराठी वाड्यासारखा बांधलेला आहे. अविनाश सोवनी यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा उभारण्यात आल्याचं नंतर वाचनात आलं. तिथं सर्वत्र अत्यंत स्वच्छता होती, ही एकदम जाणवण्यासारखी गोष्ट होती. उजव्या बाजूला चपला काढून आम्हाला एका जिन्यानं खाली नेण्यात आलं. तिथं 'उदरभरण' हा विभाग होता. आम्ही तिथं ब्रेकफास्ट केला. पोहे, इडली-सांबार आदी नेहमीचाच. नंतर लगेच वाडा पाहायला सुरुवात केली. वाड्याचा प्रत्येक भाग अतिशय विचारपूर्वक केल्याचं जाणवत होतं.
नंतर खाली आणि वर राहायला असलेल्या खोल्यांना रागांची नावं दिली होती. (नांदेड सिटीसारखंच वाटलं.) आसावरी, मधुवंती इथंही होते. सगळीकडं भरपूर फोटो काढले. भिंतींवर चित्रं होती. दिवाणखानाही झकास होता. फोटो सेशन तिथंही झालंच. मुलांना खेळण्यासाठी भरपूर काय काय होतं. गुड फ्रायडेची सुट्टी असल्यानं गर्दी बऱ्यापैकी होती. आमच्या पुढं आलेल्या बसमधून महिलांचा एक ग्रुप आला होता. त्यांचा मस्त दंगा सुरू होता. आम्ही तिघंही भरपूर खेळलो. आधी बॅडमिंटन, मग क्रिकेट, नंतर विटीदांडू... नंतर मागच्या बाजूला एक मल्हार नावाचं कोकणी घर आहे. तिथं एरवी डे टूरला आलेल्या लोकांना विश्रांती घेता येते. आम्ही गेलो, तेव्हा त्या महिलांच्या ग्रुपनं जादा चार्जेस भरून हे घर बुक केल्याचं कळलं. मग आम्ही तिथं बाहेर बॅडमिंटन खेळत बसलो. तिथंच एक कोरडी विहीर व रहाट होता. शेजारी पायऱ्या उतरून गेल्यावर पुन्हा छोट्या बागेसारखा एरिया होता. तिथंही झोके होते. खेळून दमल्यावर एक वाजता भूक लागली. पुन्हा आम्ही 'उदरभरण'मध्ये. जेवण लावल्या लावल्या पहिला नंबर आमचाच. इथं चौरंग-पाटांचीही व्यवस्था होती. मग आम्ही तिथंच बसून जेवलो. ब्रेकफास्ट सर्वसामान्य असला, तरी हे जेवण मात्र चांगलं होतं. केशरी जिलेबी, पुरणपोळी-तूप, मसालेभात, मठ्ठा, कोथिंबीर वडी, फुलके, चवळीची उसळ, कोशिंबिरी, लोणचं, कुरडया असा सगळा मस्त बेत होता.

त्यामुळं जेवण दणकूनच झालं. नंतर सरळ वर दिवाणखान्यात जाऊन तिथल्या गादी-लोडांवर आडवे झालो. आमच्यामागोमाग इतरही पाहुणे आले आणि त्यांच्यातल्या ज्येष्ठांनीही तिथं ताणून दिली. अशा ठिकाणी एखाद्या लग्नघरात आल्यासारखं वाटत असतं. (सगळेच काही ओळखीचे नसतात, पण तरी सगळे आपलेच असतात, तो फील!) अर्थात थोड्याच वेळात तिथला माणूस आला आणि इथं झोपू नका, असं सगळ्यांना सांगून गेला. पण ते कोकण घर इतर लोकांना देऊन टाकल्यावर बाकीच्या लोकांनी कुठं बसायचं, हे त्यानं सांगितलं नाही. अर्थात त्याच्याकडं फार कुणी लक्ष न देता लोळायचं तेवढं लोळून घेतलंच. थोडा वेळ आराम करून आम्ही पुन्हा खाली आलो. खालचं स्वयंपाकघर, त्यातल्या जात्यापासून ते कंदिलापर्यंत सर्व जुन्या जतन करून ठेवलेल्या गोष्टी, अगदी भिंतीवरच्या जुन्या खुंटीपासून ते जुन्या पद्धतीच्या त्या काळ्या दिव्यांच्या बटणांपर्यंत सर्व गोष्टी इथं एकदम ऑथेंटिक वाटत होत्या. चौसोपी वाड्याचा चौक आणि शेजारच्या एका सोप्यावर असलेला झोपाळा व दिवाण हे बहुतेकांचं आकर्षण होतं. शेजारी एका खोलीत जुन्या पद्धतीच्या आरामखुर्च्या होत्या. तिथंही फोटो काढले. मग ओसरीवरचं देवघर पाहिलं. हे देवघर मुख्य दाराच्या बाहेर कसं, असा प्रश्न मात्र मला पडला. देवघर हे वाड्याच्या आतच असायला हवं ना! असो. बाहेर अंगणात फिरलो. तिथं अनेक वेगवेगळी फुलझाडं आणि आकर्षक फुलं होती. केळीचं झाड होतं व त्याला एक घडही लगडलेला होता. भरपूर फोटो झाले. तोपर्यंत चार वाजत आले होते. चार वाजता चहाचं बोलावणं आलं. पुन्हा 'उदरभरण'मध्ये जाऊन चहा घेतला. सोबत कांदाभजीही होती. पण दुपारचं जेवण एवढं झालं होतं, की चक्क त्या भज्यांचा मोहही पडला नाही. सव्वाचारला आम्ही बाहेर पडलो, ते ढेपेवाड्याच्या सुखद आठवणी मनात ठेवूनच.
आपल्या प्रियजनांसोबत एक दिवस घालवायला किंवा अगदी राहायलाही हे उत्तम ठिकाण आहे, यात शंकाच नाही. अर्थात तिथं आणखीही सुख-सुविधा करता येतील. विशेषतः ब्रेकफास्टमध्येही इडली-सांबारऐवजी आणखी काही मराठमोळे पदार्थ - जसं थालीपीठ, शेंगोळी, वरणफळं असं काही देता येईल का, याचा ढेपेंनी जरूर विचार करावा. वाड्याच्या आजूबाजूला अजून बसायला बाक आणि थोडी सावली केली तर त्याचाही उपयोग होईल. खर्चाच्या दृष्टीनं पाहिलं, तर डे टूर ओके आहे, पण मुक्काम किंचित महाग वाटू शकतो. पण तिथल्या आनंदापुढं काहींना कदाचित ही किंमतही फार वाटणार नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न! एकंदर पाच स्टारपैकी स्टार द्यायचे झाल्यास मी ढेपेवाड्याला साडेतीन स्टार देईन.
----

(अधिक माहितीसाठी www.dhepewada.com या साइटला भेट द्या.)

---

14 Mar 2016

विजय मल्ल्या लेख

'किंग ऑफ गुड होप'
-----------------

आद्य मद्यसम्राट, मद्याधिपती, मद्यराज, मद्यदेवता, 'सुक्काळीचा राजा' ('किंग ऑफ गुड टाइम'चं मराठमोळं भाषांतर) विजय मल्ल्या यांनी एक दिल्ली ते लंडन प्रवास केला काय आणि अनेकांचे फेसाळते पेले जणू रिते झाले. त्यांचे विमान अंतराळी झेप घेते जाहले आणि इकडे अनेकांचे विमान पुनश्च जमिनीवर उतरले. मल्ल्या भारतातल्या बँकांची देणी बुडवून पळाले म्हणे. हूं! यात काय विशेष!! वर्षानुवर्षे या देशात राहून, त्याला लुटून मग परदेशी जायचे ही फार जुनी परंपरा आहे इथली... मल्ल्या हे मद्यविक्रीच्या व्यवसायात असल्याने त्यांचे काम सोपे झाले एवढेच. लोकांना मद्याच्या अमलाखाली ठेवून, त्यांना आजूबाजूच्या दुःखी-कष्टी जगाचा विसर पाडायला लावणे हे फार पुण्याचे काम त्यांनी केले आहे, हे तरी मद्यपींनी विसरू नये. मद्यपी मंडळी तशी सरळ असतात. एक वेळ उपकारकर्त्याचे नाव ते विसरतील, पण त्याने केलेले उपकार नाही विसरणार... भारतात लोक पूर्वी मद्य पीत नसत, असं नाही. पण मद्यमल्ल्यांनी हे पेय घराघरांत नेले. लोकांचा संध्याकाळचा वेळ बरा जावा, यासाठी मल्ल्याभाऊंनी आपले सारे कसब पणाला लाविले. जगातील उत्तमोत्तम द्रावणे तयार केली. मद्याच्या कंपन्याच विकत घेतल्या... भारतातल्या साध्या-भोळ्या, गरीब जनतेनं आपल्या चिंता-दुःखं, वेदना सारं सारं काही विसरून संध्याकाळचे दोन क्षण दोन घोटांसोबत सुखात घालवावेत यासाठी भाऊंची केवढी तळमळ! 
भाऊंच्या कंपनीचं नावपण आपल्याला फार आवडतं - किंशफिशर! म्हणजे आपला खंड्या पक्षी हो! हा खंड्या ज्या चपळाईनं पाण्यात सूर मारून मासा टिपतो, त्याहून अधिक चपळाईनं या द्रावणाचे थेंब जिभेवर टेकताच मनुष्य अंतराळीची सैर करून येतो. त्यामुळं नाव अगदी सार्थ आहे. तर या द्रावणांचा खप वाढतच गेला. दिसामाशी कंपनी वाढत गेली. पैसा येत गेला. भाऊंना तर उसंतच नव्हती. 'टाक पैसे नि घे कंपनी' असं चाललं होतं. अर्थात भाऊंना फक्त दारू विकायची नव्हती. नाही तर मग गावातला गुत्तेवाला आणि भाऊंच्यात फरक तो काय राहिला! आपलं पेय प्राशून मंडळी अंतराळात विहरत असली, तरी त्याचं वेगळं तिकीट त्यांना पडत नव्हतं. क्वार्टरच्याच पैक्यात ती सैर होऊन जायची. पण भाऊंना तसलं अपेक्षित नव्हतं. मग त्यांनी खरीखुरी विमान कंपनी काढली. विमान बसल्यावर पण पुन्हा वेगळं आपलं स्वतःचं असं खास 'विमान' उडवायची सोय होतीच. भाऊंना 'कॅटल क्लास' कधीच मान्य नव्हता. जे काय उडायचं, ते हाय-फाय उडायचं असंच भाऊंचं धोरण होतं. त्यामुळं जनता भाऊंच्या विमानात बसायला तरसू लागली. भाऊंच्या विमानातल्या एअर होस्टेससुद्धा कशा अगदी, या आपल्या त्या ह्या होत्या! (आलं असेल लक्षात!) असं विमान आणि अशी कंपनी भारतात कधीच नव्हती, असं नाही नाही ते जाणकार लोक नको तेव्हा सांगू लागले. या कौतुकानं भाऊंचं स्वतःचं खासगी विमान पुनश्च अंतराळी लहरू लागलं. मद्य आणि विमान या दोन्ही गोष्टी माणसाला खूप उंच जातात; पण दोन्हींचा अंमल ओसरला, की जमिनीवर आदळणं हे क्रमप्राप्तच असतं. पण भाऊंना भौतिकशास्त्रातल्या नियमांत नव्हे, तर इतर अनेक भौतिक गोष्टींत रस होता. इथं मदिरेप्रमाणंच मदिराक्षी त्यांच्या कल्पक बुद्धीच्या मदतीला आली. एरवी क्यालेंडर ही गोष्ट आम्ही फार रुचीनं कधी पाहिली नव्हती. दुधाचे आणि पेपरांचे खाडे खरडण्याचा भिंतीवरचा चिठोरा यापलीकडे आम्ही त्यास कधी जास्त महत्त्व दिलेही नव्हते. पण भाऊंचे 'क्यालेंडर' अवतरले आणि आम्हास भयंकर लज्जा उत्पन्न जाहली. नव्हे, नव्हे, क्यालेंडर पाहून नव्हे; तर एवढे दिवस आपण डोळ्यांच्या खाचांचा नक्की काय उपयोग करीत होतो या विचारानं लज्जा आली! अहाहा, जानेवारी ते डिसेंबर असं बारामास बीचवर पसरलेलं ते सौंदर्य बघून भाऊंचे पाय धरावेसे वाटू लागले. कुडीरूपी होडीवर वस्त्ररूपी शिडं धारण करणाऱ्या त्या शिडशिडीत चारुगात्री पाहून आम्हास अन्य कुठल्याही नशेची गरज वाटेनाशी जाहली. त्यामुळं भाऊंच्या अन्य उत्पादनांचा खप किंचित घसरला, हे सत्य होय. पण जनसेवेपुढे असल्या क्षुद्र तोट्याची चिंता करतो कोण?
भाऊंनी मुळात पहिल्यापासूनच 'हे विश्वचि माझे घर' हेच ब्रीद अंगिकारलं होतं. त्यामुळं सेशेल्स ते सनसिटी आणि मिरामार ते मायामीपर्यंत जगभरातले नामचीन समुद्रकिनारे हीच त्यांची संचारांची प्रमुख ठिकाणे होती. एखादे यॉट घ्यावे, वारुणी-तरुणींचा ताफा घ्यावा आणि समुद्राच्या विशाल अंतःपुरात जाऊन अंमळ चिंतन करावे, ही भाऊंना जडलेली खोड होती. शिवाय कुठलाही आनंद एकट्यानं लुटला, तर त्यात काही मजा नसते. त्यामुळं भाऊंनी हा आनंद देशभरातल्या त्यांच्या व्यवसायबंधूंना वाटला. भाऊंवर प्रेम करणारी थोडी का माणसं आहेत आपल्या देशात? बिझनेसमन म्हणू नका, राजकारणी म्हणू नका, मोठमोठे आध्यात्मिक गुरू म्हणू नका की मीडियावाले म्हणू नका! भाऊंच्या यॉटवर सर्वधर्मसमभाव! शिवाय सोबत असलेल्या 'सत्संगा'मुळं आपण फारच वेगानं आध्यात्मिक आनंद लुटतो, याची बहुतेकांना खात्रीच असायची. 
 असे सगळे मज्जेमज्जेचे दिवस चालले होते. भाऊंची मद्ये पिऊन लोक बँकांमध्ये एफड्या करत होते आणि भाऊ त्याच बँकांकडून कर्ज घेऊन लोकांना निराळा आनंद देत होते. पण मध्येच या बँकांनी वसुलीचा तगादा सुरू केला. आता माणूस आहे. नसेल कर्ज फेडता आलं. बिघडलं कुठं? आणि पैसा काय हो, आज असतो आणि उद्या नाही. बँकांनी तर कर्जवसुली वगैरे मोहपाशात अडकावेच का? भाऊंचं नेमकं हेच म्हणणं होतं. कर्ज काढा आणि विसरून जा! एकदा भाऊंच्या ब्रँडची बाटली घेऊन बसलं, की तसंही सर्व काही विसरायला होतंच म्हणा. भाऊ स्वतः खूपच साधेभोळे आणि विसरभोळे. त्यांच्या या स्वभावाचा त्यांना अनेकदा फायदाच होई. पण काही दुष्ट लोकांना भाऊंचं सुख पाहावलं नाही. त्यांनी कोर्टकचेरी, वसुली, नोटिसा वगैरे अत्यंत कडवट भाषा सुरू केली. कोमल हृदयाच्या भाऊंना हे कसं सहन होईल? जिथं फुलं वेचली, तिथंच गोवऱ्या वेचायच्या? जिथं 'क्यालेंडर' फिरवलं तिथं भेळीचा कागद बघायचा? हा हन्त हन्त! पण काळ हा माणूसच दुष्ट! त्यानंच हे सगळं घडवून आणलं. बिचारे भाऊ! पकडलं विमान आणि गेले आपले दुसऱ्या देशात निघून... 
पण त्यावरून एवढं आकांडतांडव करायची गरजच काय आहे? भाऊ परत येणार... अहो, चांगल्या वख्ताचा हा राजा आहे. सध्या काळच वाईट आहे. त्यामुळं राजाचा रंक झालाय. पेला पार तळाला गेलाय. पण तो पुन्हा भरणारच. चांगला टाइम येणारच. अजून देशात किती तरी बँका आहेत. किती तरी पैसा आहे. किती तरी लोकांनी अजून भाऊंच्या कंपनीच्या मद्याची चवच चाखलेली नाही. नाही नाही! हे होणे नाही. भाऊ परतुनी येणारच. कारण आशा अमर असते. भाऊ 'किंग ऑफ गुड टाइम्स' असतील तर आम्ही 'किंग ऑफ गुड होप' आहोत...!! चिअर्स!!!
 -----------
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १३ मार्च २०१६)
---

5 Mar 2016

मनोजकुमारवरचा लेख

‘भारतकुमार’ 
-----------------


सत्तरच्या दशकात आपल्या देशभक्तिपर चित्रपटांद्वारे प्रेक्षकांना देशप्रेमाचे बाळबोध डोस देणारा अभिनेता म्हणजे मनोजकुमार. अर्थात हे सिनेमे बाळबोध असले, तरी मनोजकुमारचे प्रामाणिक प्रयत्न कमी लेखायचं कारण नाही. ‘उपकार’पासून (१९६७) ते ‘क्रांती’पर्यंत (१९८१) देशभक्तिपर सिनेमांमुळंच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या या अभिनेत्याला नंतर तर ‘भारतकुमार’ असंच टोपणनाव पडलं. मनोजकुमार काही पडेल हिरो नव्हता. माला सिन्हासोबत ‘हरियाली और रास्ता’ (१९६२), साधनासोबत ‘वह कौन थी?’ (१९६४), माला सिन्हासोबतच ‘हिमालय की गोद में’ (१९६५) आणि आशा पारेखसोबतचा ‘दो बदन’ (१९६६) अशा सुपरहिट सिनेमांचा तो हिरो होता.
तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी मनोजकुमारला त्यांच्या ‘जय जवान जय किसान’ या लोकप्रिय घोषणेवरून चित्रपट काढायला सांगितला. शास्त्रीजींची आज्ञा प्रमाण मानून मनोजकुमारने ‘उपकार’ काढला. हा मनोजकुमारचा दिग्दर्शक म्हणूनही पहिलाच प्रयत्न होता. यात त्याने एका शेतकऱ्याची आणि एका जवानाची भूमिकाही केली. ‘उपकार’ हिट झाला. मनोजकुमारला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळालं. या सिनेमातलं गाजलेलं ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे-मोती’ हे महेंद्र कपूर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गाणं (संगीत कल्याणजी आनंदजी) आजही २६ जानेवारी, १५ ऑगस्टला वाजवलं जातं. अर्थात मनोजकुमारच्या या देशप्रेमी चित्रपटांचा वा भूमिकांचा सिलसिला सुरू झाला तो त्याहीआधी, १९६५ मध्ये. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘शहीद’ याच शीर्षकाच्या सिनेमात मनोजकुमारनं नायकाची भूमिका साकारली होती.
‘उपकार’च्या यशानंतर मनोजकुमारनं ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाद्वारे पूर्व आणि पश्चिम जगांचा संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न केला होता. नंतर ‘बेइमान’साठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरच्या वर्षी त्याचा नंदासोबतचा ‘शोर’ आला. हा सिनेमा तेव्हा गाजला नसला, तरी कालांतरानं या सिनेमावर समीक्षक-रसिकांच्या पसंतीची मोहोर उमटली. ‘इक प्यार का नगमा है’ हे लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायिलेलं प्रसिद्ध युगुलगीत (संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल) याच चित्रपटातलं. 
 त्यानंतर ‘रोटी, कपडा और मकान’ (१९७४) या सामाजिक आशयाचा चित्रपटानं मनोजकुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं दुसरं फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळालं. अमिताभ, शशी कपूर आणि झीनत अमान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यानंतर मनोजकुमारची हेमामालिनीसोबत जोडी जमली. या दोघांचे संन्यासी (१९७५) आणि दसनंबरी (१९७६) हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर काही काळ मनोजकुमारच्या कारकि‍र्दीला ब्रेक बसला. अखेर १९८१ मध्ये मनोजकुमारला त्याचा आदर्श अभिनेता दिलीपकुमारला दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली ती ‘क्रांती’द्वारे. हाच सिनेमा त्याच्या कारकि‍र्दीतला खऱ्या अर्थाने अखेरचा मोठा हिट सिनेमा ठरला. एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्वातंत्र्यलढ्याची कथा सांगणारा हा सिनेमा आणि त्यातली गाणीही गाजली. यातही हेमामालिनी होती.
यानंतर मात्र मनोजकुमारची कारकीर्द उतरणीला लागली. त्याने १९८९ मध्ये क्लर्क नावाचा एक टुकार सिनेमा काढला होता. महंमद अली आणि झेबा बख्तियार या पाकिस्तानी नट-नट्यांना त्यानं या सिनेमातून भारतीय पडद्यावर आणलं होतं, हेच काय ते या सिनेमाचं वैशिष्ट्य. ‘मैदान-ए-जंग’ (१९९५) या सिनेमानंतर मनोजकुमारनं अभिनय क्षेत्रातून संन्यास घेतला. नंतर त्याने त्याचा मुलगा कुणाल गोस्वामी याच्यासाठी ‘जयहिंद’ नामक सिनेमा १९९९ मध्ये काढला. मात्र, तोही आपटला. त्याच वर्षी त्याला ‘फिल्मफेअर’नं जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवलं.
हरिकृष्ण गिरी गोस्वामी असं मूळ नाव असलेल्या या अभिनेत्याचा जन्म २४ जुलै १९३७ चा. सध्या पाकिस्तानात असलेलं अबोटाबाद (होय.. जिथं अमेरिकी सैन्यानं ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता, तेच!) हे तेव्हाच्या वायव्य सरहद्द प्रांतातलं, आणि आताच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातलं शहर हे त्याचं जन्मगाव. हरिकृष्ण दहा वर्षांचा असतानाच देशाची फाळणी झाली आणि गोस्वामी कुटुंबीय होतं नव्हतं ते सारं घेऊन दिल्लीमध्ये आलं. निर्वासितांसाठी असलेल्या कॅम्पमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी दिवस काढले. नंतर ते जुन्या राजेंद्रनगर भागात स्थायिक झाले. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर हरिकृष्ण गोस्वामीनं चित्रपटांत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंबईला आला. तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक स्वप्नाळू चेहऱ्यांचे तरुण नशीब आजमावण्यास मुंबई नामक मायापुरीत येत. त्या सगळ्यांचा आदर्श एक तर राज कपूर किंवा देव किंवा दिलीपकुमार असे. हरिकृष्ण गोस्वामीचा आदर्शही दिलीपकुमार हाच होता. मग दिलीपच्या शबनम (१९४९) या चित्रपटातील नावावरून त्यानं स्वतःचं बारसं ‘मनोजकुमार’ असं करून घेतलं. सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात फॅशन (१९५७) नामक एका सिनेमात मनोजकुमारला एक छोटी भूमिका मिळाली. पुढं ‘काँच की गुडिया’ (१९६०) या सिनेमात सइदा खान नामक नटीसमोर त्याला नायकाची भूमिका करण्याची संधी लाभली. अर्थात हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला, तेही कळलं नाही. नंतर ‘पिया मिलन की आस’ आणि ‘रेशमी रुमाल’ही आले आणि गेले. मनोजकुमारचं नशीब उघडलं ते १९६२ मध्ये आलेल्या विजय भट्ट दिग्दर्शित ‘हरियाली और रास्ता’मुळं. माला सिन्हा त्याची नायिका होती. हा सिनेमाची गाणी आजही हिट आहेत. त्यानंतर मनोजकुमारला मागं वळून पाहण्याची गरज पडली नाही. 
 ‘लग जा गले...’ (‘वह कौन थी?’) या सुपरहिट गाण्यात साधनासोबत असलेला हा भावूक डोळ्यांचा तरुण लोकांना आवडू लागला. पुढे कदाचित रोमँटिक हिरोच्या इमेजमध्ये तो अडकलाही असता. मात्र, १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाने मनोजकुमारचे भवितव्य कायमसाठी बदलले. याच युद्धानंतर शास्त्रीजींना त्याला ‘जय जवान...’वर चित्रपट करायला सांगितले होते. मनोजकुमारचा ‘उपकार’ आला, तेव्हा तो पाहायला दुर्दैवानं शास्त्रीजी हयात नव्हते. मात्र, या चित्रपटानं मनोजकुमारला खऱ्या अर्थानं ‘भारतकुमार’ करून टाकलं.
मनोजकुमारला आणखी एक ओळख मिळवून दिली ती ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटाने. साईभक्त असलेल्या मनोजकुमारनेच हा सिनेमा लिहिला होता आणि त्यात कामही केलं होतं. शिर्डीकरांनीही तेथील एक रस्त्याला मनोजकुमारचे नाव देऊन त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीय. 
एक हात चेहऱ्यावर ठेवून चेहरा अर्धवट झाकून घेण्याची त्याची अजब स्टाइल होती. त्याची खूप नक्कलही झाली. अगदी अलीकडं २००७ मध्ये आलेल्या ‘ओम शांती ओम’ या चित्रपटात शाहरुख खाननं मनोजकुमारची तशीच नक्कल करणारं एक पात्र दाखवलं होतं. त्यानंतर संतापून मनोजकुमारनं हे प्रकरण कोर्टात नेलं. मात्र, नंतर त्यात कोर्टाबाहेर तडजोड झाली आणि ते प्रकरण मिटलं.
त्यानंतर आता प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं ७९ वर्षांचा हा बुजुर्ग अभिनेता पुन्हा एकदा बातम्यांमध्ये झळकला आहे. त्याच्या अभिनयगुणांविषयी, त्याच्या देशप्रेमी सिनेमांच्या बाळबोधपणाविषयी चर्चा होत राहील; मतभिन्नताही असेल... पण मनोजकुमारचे प्रयत्न प्रामाणिक होते आणि हा अभिनेता कधीही गैरकारणांसाठी प्रसिद्धीस आला नाही, या बाबी एक माणूस म्हणून त्याचं मोठेपण सांगणाऱ्या आहेत, हे सर्वच जण मान्य करतील.
----

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, ६ मार्च २०१६)
----