29 Apr 2022

एसटी लेख

‘लालपरी’ नावाची कादंबरी
--------------------------------


आपल्या सगळ्यांच्या आठवणीतले पहिलेवहिले प्रवास जिच्यामधून केले ती एसटी! आपल्या सगळ्यांच्या स्मरणरंजनाचा एक हळवा आणि फार महत्त्वाचा भाग या एसटीनं आणि तिच्यातून केलेल्या प्रवासानं व्यापला आहे, यात वाद नाही. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ असं भारदस्त नाव असलेल्या, पण ‘एसटी’ याच सुटसुटीत आणि प्रेमाच्या नावानं सर्वांना परिचित असलेल्या या एसटीचा सुमारे सहा महिने चाललेला संप अखेर एप्रिलमध्ये संपला. या काळात रस्त्यावरून एसटी गाड्या धावत नव्हत्या, तेव्हा अगदी चुकल्याचुकल्यासारखं होत होतं. खरं तर गेल्या दहा-पंधरा वर्षांत मध्यमवर्गीयांनी स्वत:च्या चारचाकी गाड्या घेण्याइतपत ऐपत नक्कीच मिळविली. त्यामुळं माझ्यासकट या वर्गातले अनेक लोक आता एसटीनं प्रवास करतातच, असं नाही. मात्र, एसटी प्रवासाचा धागा आपल्या बहुतेकांच्या बालपणीच्या आठवणींशी घट्ट जोडला गेला आहे. त्यामुळं या काळात एसटीच्या आठवणी सतत येत राहिल्या. या एसटीविषयी लहानपणापासूनच मला अतिशय आपुलकी. याचं साधं कारण म्हणजे माझे वडील एसटीत नोकरीला होते. एवढंच काय, माझे आजोबाही एसटीतच होते. शिवाय त्यांचे चुलतभाऊ, त्यांची मुलं असे आणखी काही नातेवाइकही एसटीतच होते. त्यामुळं एसटीत भांडताना कुणी ‘एसटी काय तुझ्या बापाची आहे का?’ असं विचारलं, तर मी शांतपणे ‘हो’ असं म्हणू शकत असे. त्यानंतर भांडण संपतच असे.

माझे आजोबा शिरूर येथे डेपो मॅनेजर होते. त्यापूर्वी ते जामखेड येथे छोटी-मोठी कामं करत असत. त्यांना एक अशी नोकरी नव्हती. विम्याची एजंटगिरीही त्यांनी केली होती. एसटीची स्थापना होण्यापूर्वी आपल्याकडं गावोगावी खासगी बससेवा होत्या. त्यांना ‘सर्व्हिस मोटारी’ म्हणत. जामखेडला होशिंग मंडळी हे बडं प्रस्थ होतं. त्यांपैकी लक्ष्मण नारायण होशिंग यांची अशी खासगी बससेवा होती. ती जामखेड ते नगर अशी सेवा देत असे. (याच लक्ष्मणराव होशिंगांनी जामखेडच्या देशमुख मंडळींनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जनता हायस्कूलला जागा आणि तेव्हा, म्हणजे १९५१ मध्ये २० हजार रुपये देणगी दिली होती व तेव्हापासून आमची ही शाळा ‘ल. ना. होशिंग विद्यालय’ म्हणून ओळखली जाऊ लागली.) तर सांगायचा मुद्दा, आमचे आजोबा या होशिंगांच्या सर्व्हिस बससेवेत कामाला लागले. नंतर स्वातंत्र्यानंतर एक जून १९४८ रोजी जेव्हा एसटीची स्थापना झाली आणि पहिली एसटी बस नगर ते पुणे या मार्गावर धावली तेव्हा खासगी बससेवेतले कर्मचारीही एसटीत सामावून घेण्यात आले. अशा रीतीने आमचे आजोबा एसटीत दाखल झाले. त्यानंतर एकेक पायरी चढत ते निवृत्तीच्या वेळी शिरूर (घोडनदी) इथले डेपो मॅनेजर झाले. आजोबांचं नाव रामचंद्र होतं. त्यांना ‘रामभाऊ’ म्हणून ओळखायचे. आजोबा जगन्मित्र होते. बाळासाहेब भारदे, भा. द. खेर असे नगर जिल्ह्यातले तत्कालीन दिग्गज त्यांच्या मित्रमंडळात होते. आजोबा निवृत्त झाल्यानंतर जामखेडला आले. काही काळानंतर माझे वडीलही एसटीतच नोकरीला लागले. एसटी कर्मचाऱ्यांना पास मिळतो. त्या पासवर कुटुंबीयांना फुकट प्रवास करता येतो. अर्थात साध्या गाडीने! लहानपणी आम्ही एक तर मोठ्या आत्याकडं पुण्याला यायचो किंवा आजोळी लातूरला जायचो. दोन्ही ठिकाणी एकच तिकीट दर होता - २३ रुपये १० पैसे! (हे मी साधारण १९८२-८३ ते १९९० पर्यंतचं सांगतोय. माझ्या आठवणी साधारण १९८१ पासून, म्हणजे माझ्या वयाच्या पाच-सहाव्या वर्षापासून सुरू होतात. त्यापूर्वीचं मला फारसं आठवत नाही.) जामखेडहून नगरला नऊ रुपये दहा पैसे तिकीट होतं. नगर ते पुणे १४ रुपये. धाकट्या आत्याकडं साकरवाडीला (कोपरगाव तालुक्यातलं गाव) जाण्यासाठी आम्ही नगरला यायचो आणि तिथून दौंड-मनमाड पॅसेंजर पकडून कान्हेगाव स्टेशनला उतरायचो. या स्टेशनजवळ वारी नावाचं मोठं गाव होतं आणि पलीकडं आमच्या आत्याचं साकरवाडी. याव्यतिरिक्त नैमित्तिक लग्नकार्यादी कारणांसाठी इतर गावांना प्रवास व्हायचा.
पुण्याला जाण्यासाठी सकाळी सात वाजता जामखेड-पुणे अशी एक गाडी असे. तेव्हा बहुतेक गाड्यांना मागे दार असे. मात्र, या गाडीला पुढे दार होतं. याशिवाय जातेगाव-मुंबई अशी एक गाडी सकाळच्या वेळी असे. जामखेडचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्या नगर-जामखेड मार्गे जातात. त्यामुळं फार पूर्वीपासून पुण्याहून किंवा नगरहून जामखेडला जायला जवळपास २४ तास एसटी गाड्या उपलब्ध असायच्या. त्यामुळं रिझर्व्हेशन वगैरे भानगडीत आम्ही कधीच पडायचो नाही. त्यात वडील एसटीत असल्यानं डेपोतूनच गाडीत बसून येणं वगैरे माज असायचा. एसटी फलाटाला लागली, की एकच झुंबड करून गाडीत घुसणाऱ्या लोकांना आम्ही आधीच आत बसलेलो दिसलो, की धक्का बसायचा. त्यांच्या नजरेत ती असूया जाणवायची. आम्हाला काहीच फरक पडायचा नाही. पुढच्या आडव्या सीटवर गुडघ्यावर बसून, ड्रायव्हरच्या मागच्या जाळीतून समोर दिसणारा रस्ता पाहणं ही इतर अनेक मुलांसारखी माझीही आवड होती. आपली एसटी सर्वांत फास्ट पळते आणि आपला ड्रायव्हर सर्वांत भारी आहे, असं ठामपणे वाटायचं. जामखेड डेपोला सगळ्या गाड्या ‘टाटा’ मेकच्या असत. याउलट मराठवाड्यातल्या सगळ्या गाड्या ‘अशोक लेलँड’च्या असत आणि जरा भारदस्त दिसत. गाडीच्या समोरची जाळी कशी बसविली आहे, यावर माझ्या मते ती गाडी देखणी दिसते की नाही, हे अवलंबून असतं. त्या ‘लेलँड’च्या काही गाड्यांची समोरची काळी जाळी फारच अवाढव्य आणि जरा ओबडधोबड, मधे गॅप असलेली दिसायची. त्यामुळं ती एसटी बघितली, की नात्यातल्या काही दातांत फटी असलेल्या आत्याबाई, मावशा आठवायच्या. मी तर कित्येक गाड्यांना एकेका नातेवाइक बाईंचं नावही देऊन टाकलं होतं. ‘पुणे-गंगाखेड’ ही गाडी माझ्या मते, सर्वांत भारी होती. अतिशय स्वच्छ, देखणी आणि जोरात पळणारी अशी ही गाडी होती. आम्ही कायम जामखेड डेपोच्या गाडीनं प्रवास करत असल्यानं कधी कधी ही गंगाखेड गाडी आमच्या गाडीला मागं टाकून पुढं वेगात निघून जात असे. तेव्हा फक्त मला त्या गाडीचा राग येई. त्यातही हेवा जास्त वाटे. एखाद्या गाडीनं आपल्या गाडीला मागं टाकलं, म्हणजे त्या गाडीनं आपल्या गाडीला ‘डारलं’ असा एक (आता अनाकलनीय वाटणारा) शब्दप्रयोग आमच्या शाळासोबत्यांत प्रचलित होता. आमच्या शाळेच्या सहली जात. तेव्हा ‘प्रासंगिक करार’ करून एसटी गाड्याच आणल्या जात. या एसटीमधूनही आम्ही असाच पुढच्या सीटवर उलटे पाय ठेवून, गुडघ्यावर बसून प्रवास करत असू. जामखेड डेपोचे साळुंके ड्रायव्हर आमच्या मते जगात सर्वांत भारी ड्रायव्हर होते. त्यांनी गाडी जोरात दामटावी म्हणून आम्ही पोरं मागून ‘साळुंके ड्रायव्हर झिंदाबाद’ अशा घोषणा दात-ओठ खाऊन देत असू. आमच्या या आवेशामुळं साळुंके ड्रायव्हरनी खरोखर एखाद्या गाडीला ‘डारलं’, तर आम्हाला जग जिंकल्याचा आनंद होत असे. 
उन्हाळ्याच्या सुट्टीतला प्रवास हा एक स्वतंत्र अध्याय असे. एक तर या अत्यंत उकाड्याच्या सीझनमध्ये आपल्याकडं लग्नकार्यं का काढतात, कोण जाणे. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी ठेवलेली उन्हाळी सुट्टी आपण काही बदलली नाही. त्यामुळं रणरणत्या उन्हात मुलांना सुट्टी साजरी करावी लागते. पूर्वी खासगी वाहनं फारच कमी आणि जे खरोखर श्रीमंत होते त्यांच्याकडंच होती. एरवी सगळी जनता एसटीनं प्रवास करत असे. एशियाड (निमआराम) ही गाडीही १९८२ च्या आशियाई स्पर्धेनंतर आली. (अर्थात म्हणूनच त्या गाड्यांना ‘एशियाड’ हे नाव पडलं म्हणा!) त्या गाडीतून प्रवास करायला मिळणं हेही एक स्वप्न असे. एके काळी पुणे-दादर या मार्गावर या गाडीनं सम्राज्ञीसारखं राज्य केलं. आमच्याकडं काही या गाड्या फारशा येत नसत. आल्या तरी आमचा फुकटातला पास तिला चालत नसल्यानं आमची यात्रा साध्या गाडीतूनच व्हायची. कुठलीही गाडी असली, तरी प्रचंड गर्दीनं भरलेलं एसटी स्टँड, तिथले नानाविध आवाज, रसवंतिगृहांच्या घुंगरांचा आवाज, पार्सल टाकणाऱ्या हमालांच्या आरोळ्या, वडापावपासून ते आलेपाकापर्यंत नानाविध पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे आवाज, ‘चौकशी’ अशी खिडकी असलेल्या केबिनभोवती असलेला लोकांचा घोळका आणि त्यांची एकत्र चाललेली कलकल, ‘संकटकाळी बाहेर पडायचा मार्ग’ असं लिहिलेल्या मागच्या खिडकीतून पोरं घुसवणाऱ्यांची गर्दी, तिथला एकुलता एक बुकस्टॉल आणि तिथं ‘मायापुरी’पासून ते ‘स्टारडस्ट’पर्यंत आणि ‘श्री’पासून ‘लोकप्रभा’पर्यंत टांगलेली मासिकं-साप्ताहिकं, त्यावरचे बच्चन-मिथुन चक्रवर्ती-जॅकी श्रॉफ-अनिल कपूर किंवा श्रीदेवी-माधुरी-जूही चावला-संगीता बिजलानी-किमी काटकर यांचे मोठमोठे ब्लोअप (त्यातले गौतम राजाध्यक्षांनी काढलेले एकाच साच्याचे फोटो नंतर ओळखू यायला लागले...) असं ते एसटी स्टँडवरचं सगळं चैतन्यशील जग होतं. मुळात हे सगळं भिरभिरत्या, उत्सुक नजरेनी न्याहाळणारं एक निरागस मन आपल्या तेव्हाच्या निरागस लहानपणात होतं, म्हणून हे सगळं आजही तितकंच ताजंतवानं आणि मन एकदम आनंदित करून टाकणारं वाटतं.
पुढं आम्ही नगरला राहायला गेल्यावर एसटीचा नियमित प्रवास घडायला लागला. माझ्या आठवणीनुसार, मी आठवीत असताना पहिल्यांदा नगर ते जामखेड असा एसटीचा प्रवास एकट्याने केला. त्यानंतर पुढं अनेक प्रवास घडले. पुण्याला आल्यानंतर नगर-पुणे एसटी प्रवास सर्वाधिक घडला. पुढं पुढं तर झोपेतही कुठलं गाव आलं, कुठलं वळण आलं हे ओळखू शकायचो. अर्थात मला प्रवासात झोप फारशी लागत नाही. पण बरेचदा ‘सकाळ’मध्ये रात्रीची ड्युटी करून शिवाजीनगर स्टँडवर यायचो. ऑफिसमधले एक-दोन सहकारीही यायचेच. मग तिथं मिसळ-चहा वगैरे व्हायचा. तेव्हा पहाटे तीन वाजता पुणे-कन्नड गाडी असायची. मी कायम या गाडीनं नगरला यायचो. पहाटे साडेपाच वाजता ती नगरला यायची. मग तिथल्या स्टँडवर जरा वेळ वाट बघून सहा किंवा सव्वासहाला निघणाऱ्या सिटीबसनं मी घरी जायचो.

त्यापूर्वी म्हणजे १९९१-९२ च्या सुमारास एसटीनं ‘प्रेस्टिज सर्व्हिस’ नावाची एक गाडी काढली होती. गोविंदराव आदिक एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते, त्यांच्या कल्पनेतून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली होती. अशी एक ‘प्रेस्टिज’ एसटी नगर-पुणे मार्गावरही सुरू झाली. ही बस नॉनस्टॉप पुण्याला जायची. (अर्थात रांजणगावला ती शू-ब्रेकला पाच मिनिटं थांबायची...) सकाळी साडेसहा वाजता निघणाऱ्या या एसटीच्या ड्रायव्हर व कंडक्टरला पांढरा पोशाख असायचा. याही गाडीच्या ड्रायव्हरचं नाव साळुंके असंच होतं, तर वैकर आडनावाचे कंडक्टर होते. हीच दुक्कल अनेक दिवस या गाडीवर कायम असायची. मी तेव्हा पुण्याला डिप्लोमा इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला होता. नगर-पुणे अंतर फार नसल्यानं बहुतेक वीकएंडला मी नगरला यायचोच. मग सोमवारी सकाळी सहा-सव्वासहाला स्टँडवर पोचून या ‘प्रेस्टिज’ सेवेनं बरोबर सव्वानऊ किंवा ९.२० ला मी शिवाजीनगरला पोचायचो. ही गाडी कुठल्या वेळेला कुठे असेल याचं गणित आम्हा त्या गाडीनं नियमित प्रवास करणाऱ्यांना अगदी पाठ झालं होतं. आठ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी बरोबर रांजणगावला थांबायची. तिथून बरोबर ५० मिनिटांत ती येरवडा गाठायची, तर सव्वानऊ ते ९.२० ला शिवाजीनगर! तिथून मी पाच ते दहा मिनिटांत पीएमटीनं जीपीपी होस्टेलवर पोचायचो आणि कँटीनला वडापाव-चहा घेऊन आरामात दहाचं लेक्चर गाठायचो. तेव्हा नगर-पुणे रस्ता चौपदरीही नव्हता. पण साळुंके भन्नाट गाडी चालवायचे. ही गाडीही ‘प्रेस्टिज सेवा’ असल्यानं अगदी स्वच्छ असायची. सुरुवातीला वैकर कंडक्टर उदबत्ती वगैरे लावायचे. गाडीत स्पीकर होते आणि साळुंकेंच्या आवडीची हिंदी गाणी लागायची. पेपरही ठेवलेले असायचे. आणि हे सगळं साध्या बसच्या दरात... ‘एमएच १२ (मधल्या सीरीजचं अक्षर आता लक्षात नाही; बहुतेक ‘बी’ असावं...) ४००७’ असा त्या गाडीचा नंबर होता आणि तीवर पांढरा पट्टा मारलेला असायचा. गोविंदराव आदिकांचा कार्यकाळ संपला आणि ‘प्रेस्टिज सेवा’ही नंतर लवकरच संपुष्टात आली. (डिप्लोमाला असताना मी या प्रवासावर ‘नगर-पुणे नॉनस्टॉप’ या शीर्षकाचा एक दोन फुलस्केप पेपर भरून लेखही लिहिला होता. सगळे लेख जपून ठेवायची सवय असूनही हा लेख माझ्याकडून कुठं तरी गहाळ झाला. त्याचं आजही वाईट वाटतं. अन्यथा तो लेखही या लेखासोबत दिला असता. असो.)
पुढं नोकरी लागली आणि एकटा प्रवास करण्याची संधी आणि प्रसंग वाढले. एकदा तर माझ्याकडं एसटीचा पास असताना, केवळ नाशिक-मुंबई रस्ता बघायचा म्हणून मी पुणे ते मुंबई हा प्रवास नाशिकमार्गे केला होता. पुण्याहून नाशिकला गेलो. तिथल्या सीबीएसवर गेल्यावर मुंबईच्या गाड्या महामार्ग बसस्थानकावरून सुटतात, अशी माहिती समजली. मग रिक्षानं त्या स्टँडवर आलो. रात्री अकराच्या सुमारास शिर्डी-दादर अशी बस मिळाली. बसला गर्दी होती. पण पुढच्या आडव्या सीटवर बसून तो प्रवास केला. तेव्हा मी २१-२२ वर्षांचा असल्यानं लहान मुलांसारखं उलटं वळून, गुडघ्यावर बसून पुढचा रस्ता बघता येत नव्हता. पण मी मान वळवून वळवून तसाच सगळा रस्ता बघितला. इतर लोक झोपले होते म्हणून बरं. मात्र, आपण नवीन काही तरी बघतोय या आनंदात मान दुखायला लागली, याचं मला काहीच नव्हतं. मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास लखलखणारी भिवंडी बघितलेली आजही आठवते आहे. माझ्यासाठी हे सगळंच नवीन! टकामका बघतच बसलो. मुंबईला पहाटे पोचलो, पण तिथं मी करणार काय? मग लगेच पुण्याची एसटी पकडली आणि घरी आलो.
पुढं एकदा बहिणीचा एमपीएससीचा अर्ज नेऊन देण्याच्या निमित्ताने (पुन्हा पास होता म्हणून) एकटा नगरवरून मुंबईला गेलो. ती मुंबईला जाण्याची पहिलीच वेळ. त्यापूर्वी १९८९ मध्ये काका, चुलतबहीण व आजीसोबत वसईला आमच्या चुलतआजोबांकडं गेलो होतो. तोही प्रवास नीट लक्षात आहे. स्वारगेटवरून आम्ही ठाण्याला गेलो. (त्या एसटीवर ‘स्वारगेट-ठाणा’ असं लिहिलेलं मला अजून आठवतंय. इतकंच काय, ‘ठाणा काय; ठाणे असं नीट लिहायला काय होतं?’ असं म्हणून मी त्या पाटीला नाकही मुरडलं होतं.) पण तेव्हाही पुढच्या सीटवर उलटं बसून मी आयुष्यात पहिल्यांदा खंडाळ्याचा घाट असाच डोळे विस्फारून बघितला होता. ठाण्याला गेलो. तिथलं एसटी स्टँड बघून माझा साफ अपेक्षाभंग झाला. एक मोठी शेड होती आणि मधोमध कमानीतून एसटी गाड्या आत जात होत्या. वास्तविक मोठ्या शहरांमधले बसस्टँड आणखी मोठे व भव्य असतील, असं मला वाटत होतं. पण तिथली जागेची अडचण हा मुद्दा त्या वयात माझ्या अर्थातच लक्षात आला नाही. कोकणातल्या सगळ्या एसटी स्टँडची रचनाही कशी असते, हे मला तिथं गेल्यावर कळलं. प्रचंड पावसाच्या प्रदेशात असे बसस्टँड का बांधले असतील, हे समजायला फार अवघड नव्हतं. असो. तर मूळ मुद्दा मी एकटा पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो त्याचा... मी तेव्हा २१ वर्षांचा होतो आणि नगरवरून पुण्याला येऊन, गाडी बदलून मी मुंबईला गेलो होतो. सेंट्रल बसस्टँडवर उतरल्यावर मला माझगावच्या एमपीएससी भवनात जायचं होतं. (मी मुंबईच्या नकाशाचा अगदी बारकाईनं अभ्यास केला होता, तेव्हा मी सहज मुंबईत फिरू शकलो.) माझगावला गेलो. माझं काम केलं. लोकल आणि ‘बेस्ट’च्या बसमधून सगळी मुंबई फिरलो. दादरला शिवाजी मंदिरला येऊन ‘तो मी नव्हेच’चा प्रयोगही पाहिला आणि दादरवरूनच पुण्याची एसटी पकडून परत नगरला गेलो.
पुणे-मुंबई प्रवासाच्या कथाच मी जास्त ऐकल्या. आम्हाला तो प्रवास वारंवार करण्याचा योग तेव्हा फार आला नाही. खंडाळ्याचा घाट तेव्हा वारंवार जाम व्हायचा. सहा-सहा, सात-सात तास लागायचे मुंबईला पोचायला. जुना मुंबई-पुणे हायवे तेव्हा फॉर्मात होता. त्यामुळंच कामशेत, लोणावळा, खंडाळा, खोपोली या गावांना आणि तिथं मिळणाऱ्या वडापाव, भजी आदी जनरल खाद्यपदार्थांनाही दंतकथांचं माहात्म्य प्राप्त झालं होतं. नंतर एकविसाव्या शतकात एक्स्प्रेस-वे झाला आणि जुन्या हायवेची शानच गेली. त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक हॉटेलांचं, मोटेल्सचं, टपऱ्यांचं महत्त्व एकदमच कमी झालं. आता केवळ पन्नाशी-साठीत असलेल्या पिढीलाच त्या जुन्या प्रवासाच्या नेमक्या आठवणी असतील.
माझं आजोळ मराठवाड्यात असल्यानं सुरुवातीला म्हटलं तसं आधी लातूरला आणि नंतर औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड या गावी मामा नोकरीनिमित्त गेल्यानं तिकडं एसटीचा प्रवास व्हायचा. औरंगाबादचं बसस्थानक तेव्हा भव्य व सुंदर होतं. (अलीकडं ते पाहिलं तेव्हा त्याची रया गेल्यासारखी वाटली.) या भव्य बसस्थानकाच्या दोन्ही बाजूंना फलाट होते. वेरुळ-अजिंठ्यामुळं परदेशी प्रवासीही तिथं कायम दिसायचे. हे प्रवासीही आपल्यासोबतच साध्या बसनं प्रवास करायचे. कन्नडला जातानाच वेरूळ लागत असल्यानं आमच्या बसमध्ये कायम एक-दोन गोरे प्रवासी असायचेच. आम्ही कुतूहलानं त्यांच्याकडं (आणि ते आमच्याकडं) बघत असायचे. (यावरून एक आठवलं. जामखेडला डॉ. आरोळ्यांच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात जगभरातून लोक येत असत. तेव्हा जामखेडच्या बसस्टँडवर त्यातल्या त्यात इंग्रजी समजू शकणारे, बोलू शकणारे माझे वडीलच होते. त्यात वडिलांनाही या लोकांना मार्गदर्शन करायची हौस. मग ते या लोकांचे स्वयंघोषित ‘गाइड’ व्हायचे... असो.) जामखेडच्या जुन्या बसस्टँडबाबतच्या आठवणी अशा रँडमली येत जातात. ‘सामना’ या प्रसिद्ध मराठी चित्रपटाचं बरंचसं शूटिंग जामखेडला झालेलं आहे. याचं कारण निर्माते रामदास फुटाणे हेही जामखेडचेच! तर या सिनेमात अगदी सुरुवातीला एसटी बसचा एक प्रसंग आहे. त्यात मद्यपान केलेल्या डॉ. लागूंना कंडक्टर खाली उतरवतो आणि नंतर डॉ. लागू एका टपरीवजा हॉटेलात बसतात, असे दृश्य आहे. या दृश्यातले कंडक्टर म्हणजे माझ्या वडिलांचे तेव्हाचे बॉस श्री. वारे हे आहेत. यातलं हॉटेल म्हणजे तेव्हाच्या बसस्टँडसमोरचं हॉटेल. तिथं फडका मारणाऱ्या व नंतर लागूंना धक्का मारून हाकलणाऱ्या पोऱ्याचं काम नंदू पोळ यांनी केलं होतं. या जामखेडच्या जुन्या बसस्टँडसमोर एक टुरिंग टॉकीज होती. आम्ही कधी-मधी तिथं सिनेमा बघायचा जायचो. एसटी साहेबांची फॅमिली म्हणून आम्हाला तिथं स्पेशल ट्रीटमेंट असायची. अगदी मागं खास बाकं वगैरे टाकून आम्हाला तिथं बसवायचे. मला मात्र समोर जनतेसोबत वाळूत बसूनच सिनेमा बघायला आवडायचं, तो भाग वेगळा.
एसटीनं लातूरचा प्रवास हा बराच मोठा, म्हणजे पाच तासांचा असायचा. तेव्हा नाशिक-लातूर व लातूर-नाशिक या दोन्ही एसट्या जामखेडला क्रॉस व्हायच्या. जामखेड, पाटोदा, मांजरसुंबा, केज, नेकनूर, अंबाजोगाई व लातूर असे या बसचे थांबे असायचे. मांजरसुंब्याला दोन हायवे एकत्र येत असल्यानं तिथं गाड्या बराच वेळ थांबायच्या. जामखेड सोडलं, की मोह्याचा घाट लागतो. बालाघाट डोंगररांगांतला हा घाट ओलांडून वर आलं, की जामखेडची हद्द संपते व मराठवाड्याची हद्द सुरू होते. तो प्रदेश थोडा वेगळा भासायचा. माणसांचे पेहराव, त्यांची बोली बदलायची. अंबाजोगाई आणि लातूरमध्ये सायकलरिक्षा असायच्या. या सायकलरिक्षा इकडे (प. महाराष्ट्रात) कुठं बघायला मिळायच्या नाहीत. लातूरला शिवाजी पुतळ्याजवळ एसटी थांबायची. तिथं उतरून आम्ही आमच्या मामाच्या घरी सायकलरिक्षा करून जायचो. मला तेव्हाही ती रिक्षा ओढणाऱ्या माणसाकडे बघून कणव यायची. पुढं आम्ही त्या रिक्षा वापरणं बंद केलं आणि ‘ऑटो’तून जायला सुरुवात केली. (इकडे सायकलरिक्षा नसल्यानं आम्ही ऑटोरिक्षाला फक्त रिक्षाच म्हणायचो. आमचा मामा व तिकडचे लोक मात्र ‘ऑटो’तून आलात का, असं विचारायचे. तिकडं सायकलरिक्षा पण असल्यानं ते असं म्हणत असायचे हे नंतर लक्षात आलं.) 

पुलंची ‘म्हैस’ची कॅसेट लहानपणी ऐकून पाठ झाली होती. त्यातल्या एसटीची वर्णनं वाचून कोकणातून कधी एसटीनं प्रवास करता यावा, असं फार वाटायचं. लहानपणी वर उल्लेख केलेला एक वसईचा प्रवास सोडला, तर तो योग बराच नंतर आला. एकदा कोकणात गुहागर येथे एका मराठी चित्रपटाचं शूटिंग होतं. ते बघायला मित्र अभिजित पेंढारकर व मी स्वारगेटवरून गुहागरला गेलो होतो. कुंभार्ली घाटातून चिपळूण मार्गे गुहागरला पोचायला सात-आठ तास लागले. तो प्रवास मी कधीही विसरणार नाही. नंतर अलिबाग, रत्नागिरी अशा ठिकाणीही एसटीनं जाण्याचा योग आला. कोकणात एसटीला ‘जीवनवाहिनी’ का म्हणतात, हे तिथं प्रवास केल्यावरच कळतं. कोकण रेल्वे आत्ता झाली; त्यापूर्वी कोकणातल्या सर्व वाहतुकीचा भार कित्येक वर्षं एसटीच उचलत आली आहे. कोकणातल्या घाटांतून, घाट उतरल्यावर छोट्या वळणदार रस्त्यांतून, नारळी-पोफळीच्या बनांतून अगदी लहानशा गावापर्यंत जाणारी एसटी म्हणजे तिथल्या जनतेसाठी फार मोठा आधार आहे, यात वादच नाही.
सुमारे २५ वर्षांपूर्वी विदर्भात केलेल्या पहिल्या एसटी प्रवासाच्या आठवणी आहेत. सगळ्यांत पहिल्यांदा मी एसटीनं शेगावला गेलो होतो. आई व बहीण सोबत होत्या. (अर्थात पासवर!) औरंगाबादच्या पुढचा भाग मी तोवर पाहिलाच नव्हता. त्यामुळं मी मुद्दाम समोरचा रस्ता शक्य होईल तेव्हा पाहत होतो. बदलता भूप्रदेश लगेच लक्षात येतो आपल्याला! वेगळी झाडं दिसायला लागतात. अगदी दगडही वेगळ्या प्रकारचे दिसतात. सलग हिरवीगार शेती अशी कुठं दिसतच नव्हती. देऊळगावराजा वगैरे गावं मधे लागली. तिकडच्या लोकांचे पेहरावही थोडे वेगळे होते. भाषा तर वेगळी जाणवतच होती. मला हे सगळं बघताना मजा येत होती. या सगळ्यांत एक समान गोष्ट होती ती म्हणजे एसटी! ती सगळीकडं तशीच, लाल-पिवळ्या पट्ट्यांची होती. आपल्या सगळ्या राज्याला जोडणारा हा एक धागा आहे, असं वाटून गेलं. पुढं काही वर्षांनी माझा मित्र संतोष देशपांडे व मी, आम्हाला ‘सकाळ’मध्ये पहिला एलटीए मिळताच, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली फिरायला गेलो. डॉ. अभय बंगांचं ‘शोधग्राम’ व डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील ‘लोकबिरादरी प्रकल्प’ पाहण्याची फार इच्छा होती. आम्ही पुण्याहून नागपूरला खासगी गाडीनं गेलो. मात्र, नागपुरातून गडचिरोलीला एसटीनंच गेलो. ‘नागपूर-गडचिरोली’ अशी पाटी बघणं हेही आमच्यासाठी नवीनच होतं. (रत्नागिरी-औरंगाबाद, अलिबाग-औरंगाबाद, पंढरपूर-शेगाव अशा काही लाँग रूटच्या गाड्या पूर्वी बघितल्या होत्या.) तो प्रवासही सुंदर होता. हाही भूप्रदेश वेगळा होता. इथं घनदाट जंगल होतं. वस्ती तुरळक होती. आमची ती ट्रिप छानच झाली. येताना आम्ही कुठलंही रिझर्वेशन वगैरे केलं नव्हतं. ताडोबा अभयारण्य बघून आम्ही चंद्रपूरच्या बसस्टँडवर आलो. सकाळची वेळ होती. जी एसटी मिळेल ती पकडून पश्चिम दिशेला कूच करायचं असं आम्ही ठरवलं होतं. आम्हाला त्या दिवशी सकाळी राजुरा-परळी वैजनाथ अशी बस तिथं उभी असलेली दिसली. बाकी सर्व एसटी गाड्या आजूबाजूच्या छोट्या गावांना जाणाऱ्या होत्या. वास्तविक परळी पुण्याहून खूप दूर; पण तेव्हा आम्हाला ते ‘आपल्या बाजूचं’ वाटलं. (सापेक्षतावाद तो हाच... आपण कुठं उभे आहोत, यावरच बरंचसं अवलंबून असतं.) आम्ही लगेच त्या एसटीत चढलो हे सांगायला नकोच. यवतमाळ, पुसद, दारव्हा, हिंगोली अशी गावं बघत बघत आम्ही संध्याकाळी सात-साडेसातला परभणीला आलो. आम्ही परभणीचंच तिकीट काढलं होतं. तिथं उतरलो. आमचे ‘सकाळ’चे बातमीदार संतोष धारासूरकर यांना फोन केला. त्यांनी आम्हाला मस्त जेवायला घातलं. रात्री तिथूनच नांदेड-औरंगाबाद एसटी पकडली आणि औरंगाबादला रात्री दोन वाजता पोचलो. तिथं लगेच अमरावती-पुणे एसटी मिळाली. त्या एसटीनं पहाटे नगरला पोचलो आणि घरी गेलो. अशा रीतीनं सकाळी साडेनऊला चंद्रपुरात सुरू झालेला प्रवास जवळपास २०-२१ तासांनी नगरला संपला.
एसटी आहे या भरवशावर तेव्हा हे सगळे प्रवास केले. आईच्या कुशीच्या उबेत जेवढं सुरक्षित वाटतं, तेवढंच एसटीच्या सीटवर बसल्यावर सुरक्षित वाटतं. खासगी बसनं प्रवास करताना कायम मनात एक धाकधूक असते. एसटीत ती कधीही नसते. राज्यातल्या अनेक बायाबापड्या, पोरीबाळी तेव्हा एसटीनंच निर्धोक प्रवास करायच्या. कंडक्टरच्या भरवशावर लहान लहान मुलांनाही लोक दुसऱ्या गावाला पाठवायचे. अमुक तमुक उतरवून घ्यायला येणार आहे, त्याच्याकडं द्या, एवढा निरोप पुरेसा असायचा. एसटीनं आलेल्या घरच्या डब्यामुळं अनेकांचं शहरातलं एकाकी जगणं सुसह्य झालंय. फ्री पासमुळं अनेक मुलींची शिक्षणं झालीयत. 
म्हणूनच म्हटलं, लाल परी ही खरोखर कादंबरी आहे. प्रत्येक प्रवाशाची आपली आपली अशी खास कादंबरी! या कादंबरीची पानं कधीही जुनी होणार नाहीत की त्यावरची अक्षरं पुसली जाणार नाहीत - जोवर आपल्या हृदयाची आणि एसटीच्या इंजिनाची धडधड सुरू आहे तोपर्यंत!

---

1 Apr 2022

‘मी वसंतराव’विषयी...

कलंदराचे कैवल्यगान...
----------------------------


पं. वसंतराव देशपांडे यांना मराठी रसिक ओळखतात ते एक अवलिया, कलंदर शास्त्रीय गायक म्हणून! शास्त्रीय गायनासोबतच नाट्यसंगीतात, अभिनयातही त्यांनी नवे मानदंड प्रस्थापित केले. वसंतरावांच्या या यशामागे वसंत बाळकृष्ण देशपांडे नावाच्या एका सामान्य वाटणाऱ्या माणसाचा संघर्षपूर्ण इतिहास आहे, तो मात्र आपल्याला फारसा माहिती नसतो. काळ निघून जातो. अशी उत्तुंग माणसं देहानं आपल्यातून निघून जातात. मागे राहतो तो त्यांचा अद्वितीय वारसा... त्या वारशाकडं नवी पिढी थक्क होऊन पाहत असतानाच त्या व्यक्तीची संघर्षगाथा त्यांना पाहायला मिळाली तर? ‘मी वसंतराव’ हा निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट नेमकं हेच साधतो. मराठी रसिकांनी अतोनात प्रेम केलेल्या वसंतरावांचं ते ‘वसंतराव’ होण्यापूर्वीचं कष्टमय जीवन आपल्याला सविस्तर, संवेदनशीलतेनं आणि सहृदयतेनं उलगडून दाखवतो. हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपल्यासाठीही सोपा नसतो. एका हाडाच्या कलावंताची होणारी तडफड बघताना अनेकदा मनात कालवाकालव होते, कित्येकदा आवंढे गिळले जातात, अनेकदा अश्रू ओघळतात... अज्ञानाचा अंधार फार मोठा असतो. रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो. वसंतरावांच्या अनवट आणि अफाट गायकीसारखाच आपल्या मनात रुंजी घालतो आणि मनोमन त्या महान कलावंताला नमन करायला भाग पाडतो...
कलाकाराला आपल्यातल्या कलेची जाणीव होणं आणि त्यानंतर त्या लख्ख उजळलेल्या वाटेनं त्याचं ते बेभान होऊन दौडत निघणं हा प्रवास निपुणनं त्यातल्या सर्व नाट्यमय शक्यता लक्षात घेऊन अतिशय सुरेख आणि सुरेल चितारला आहे. एका अर्थानं वसंतराव हे बंडखोर कलावंत होते. मा. दीनानाथांच्या गायकीचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव असला, तरी ‘तू स्वत:ची वाट शोध, माझी नक्कल करू नकोस’ हा त्यांनीच केलेला उपदेश वसंतरावांनी आयुष्यभर पाळला. त्यातून त्यांची वेगळी अशी खास ‘देशपांडे घराण्या’ची गायकी जन्माला आली. असं गाणं ऐकण्याची तेव्हाच्या रसिकांना आणि संगीत समीक्षकांनाही सवय नव्हती. परंपरेनं आलेलं चौकटबद्ध गाणं हेच खरं गाणं असं त्यांचं ठाम मत होतं. त्यात वसंतरावांचं निम्मं आयुष्य कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलण्यात एखाद्या सर्वसामान्य गृहस्थाप्रमाणे गेलं. त्यांच्यातला वेगळा गायक हेरला तो त्यांचे जीवलग मित्र पु. ल. देशपांडे यांनी! मा. दीनानाथांपासून ते लाहोरमध्ये भेटलेल्या उस्तादांपर्यंत आणि बेगम अख्तर यांच्यापासून ते वसंतरावांच्या आई व मामांपर्यंत निवडक लोकांनीही त्यांच्यातला हा ‘वेगळा’ कलावंत ओळखला होता. मात्र, स्वत: वसंतरावांना आपल्यामधल्या या असामान्य गायकाची ओळख पटेपर्यंत बराच काळ गेला. त्यांचा हा सर्व संघर्ष पाहताना आपण अनेक बाबतींत लाक्षणिक अर्थानं या संघर्षाची तुलना आपल्या स्वत:च्या आयुष्याशी करू शकतो. अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतांची जाण नसते. कौटुंबिक, व्यावहारिक अडचणींचे डोंगर समोर उभे असतात. वाट सापडत नाही. जीवाची नुसती तडफड होते. कस्तुरीमृगाप्रमाणेच ही अवस्था असते. तो सुगंध आपल्याच नाभीत आहे, हे जसं कस्तुरीमृगाला ठाऊक नसतं, तद्वतच आपल्यातले असामान्य गुण आपल्याला अनेकदा कळत नाहीत. वसंतराव एका अर्थाने भाग्यवान, की त्यांना पुलंसारखा जीवलग मित्र लाभला. या चित्रपटातला हा मैत्रीचा ट्रॅक अनेक अर्थांनी खूप लोभस आणि सुंदर झाला आहे.
तब्बल तीन तासांचा हा सिनेमा तयार करताना निपुणनं वसंतरावांचा हा सर्व प्रवास अगदी तब्येतीत दाखवला आहे. अगदी लहानपणापासून विशिष्ट तऱ्हेनं वाट्याला आलेला संघर्ष, मानी आईसोबत नागपुरात एकटं राहणं, त्यानंतर मामामुळं थेट लाहोरला केलेली भटकंती आणि गाण्याचा शोध, नंतर पुण्यात आल्यावर ब्रिटिशकालीन मिलिटरी अकौंट्समध्ये केलेली नोकरी, लग्न-संसार, मुलं-बाळं, नंतर ‘नेफा’त झालेली बदली, तिकडे वेगळ्याच प्रांतात होणारी घुसमट, मग अख्तरीबाई आणि पुलंच्या प्रयत्नांनी पुन्हा पुण्यात येऊन पूर्णपणे गाणं करण्याचा निर्णय, पुण्यातल्या संगीत समीक्षकांशी उडालेला खटका, स्वतंत्र मैफली मिळण्याची मारामार अशा अडचणींतून वसंतरावांचं आयुष्य जात असतानाच मग ‘कट्यार काळजात घुसली’च्या रूपानं त्यांच्या कारकिर्दीला मिळालेली मोठी कलाटणी आणि त्यातून त्यांची उत्तुंग गायकी सर्व रसिकांसमोर प्रस्थापित होऊन त्यांना मिळालेली लोकमान्यता व राजमान्यता हा सर्व प्रवास निपुणनं अतिशय मेहनतीनं, बारीकसारीक गोष्टींच्या तपशिलाकडे लक्ष देऊन विलक्षण प्रत्ययकारक रंगविला आहे.
वसंतरावांवरील सिनेमा म्हटल्यावर वसंतरावांची मुख्य भूमिका त्यात कोण करणार, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आजोबांची गायकी आत्मसात केल्यानंतर वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे यानेच ही भूमिकाही करावी, असे दिग्दर्शकाला वाटले असल्यास नवल नाही. राहुलनेही या भूमिकेचे सोने केले आहे. एका अर्थाने त्याच्या रक्तातच ही भूमिका होती. अर्थात त्यामुळेच ती साकारणं अवघडही होतं. याचं कारण त्याला त्यासाठी आपल्यातून आजोबांना बाहेर काढून, समोरून त्यांच्याकडं बघावं लागलं असणार. कुठल्याही कलावंतासाठी यापेक्षा कठीण आव्हान दुसरं नसेल. वसंतरावांचं व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष बघितलेली अनेक मंडळी आजही हयात आहेत. वसंतरावांचे बरेचसे व्हिडिओही उपलब्ध आहेत. त्यांचं लोभस रूप, काहीसं सानुनासिक आणि वैदर्भीय हेलातलं बोलणं हे सगळं ज्ञात आहे. असं असताना परकायाप्रवेश करून ही भूमिका साकारणं, अगदी त्यांचा नातू असला तरी, फारच अवघड! मात्र, राहुलनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. मध्यमवयीन वसंतरावांची भूमिका त्यानं फारच उत्तम आणि तन्मयतेनं केली आहे. (अगदी लहान वसंताची भूमिका आरुष नंद व थोड्या मोठ्या वसंताची भूमिका गंधार जोशी यांनी केली आहे.) वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते चपखल बसल्या आहेत. या भूमिकेचा ठसका काही औरच आहे. एक करारी, स्वाभिमानी स्त्री ते ‘आम्हाला एक वेळ विसर, पण गाणं सोडू नकोस’ असं मुलाला सांगणारी आई हा सर्व प्रवास अनिता दाते यांनी फारच उत्तम सादर केला आहे. 

या सर्व सिनेमात अगदी छाप पाडून जातो तो पुलंची भूमिका साकारणारा पुष्कराज चिरपुटकर. वास्तविक अतुल परचुरेपासून ते सागर देशमुखपर्यंत अनेकांनी पडद्यावर पु. ल. साकारले आहेत. पण दर वेळी नवा कलाकार पु. लं.च्या भूमिकेत बघायचा म्हणजे आधी पोटात गोळाच येतो. पुष्कराजनं मात्र सुखद अपेक्षाभंग केला आहे. वसंतरावांच्या जीवनात पुलंसारख्या जीवलग दोस्ताचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळंच ही भूमिकाही बऱ्याच मोठ्या लांबीची आणि महत्त्वाची होती. पुलंचं व्यक्तिमत्त्व रेखाटताना ते क्वचित कॅरिकेचरकडं झुकतं की काय, अशी सारखी भीती वाटत राहते. मात्र, पुष्कराजनं तो तोल व्यवस्थित सांभाळला आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, मोठे लेखक पु. ल. देशपांडे यापेक्षा ‘वशाचा दोस्त भाई’ हा त्यातला रंग महत्त्वाचा होता आणि तो सूर नेमका पकडल्यानं पुष्कराज बाजी मारून गेलाय. वसंतरावांच्या आईचे व पुलंचे यातले चुरचुरीत संवाद अनेकदा हशा व टाळ्या मिळवतात व या सर्व सिनेमातला तो एक अतिशय सुखद रिलीफ आहे.
मा. दीनानाथांच्या छोट्याशा भूमिकेचे आव्हान अमेय वाघने समर्थपणे पेलले आहे. भूमिकेची लांबी कमी असली, तरी चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दीनानाथांचा आब राखून अमेयनं ही भूमिका वठविली आहे. इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शंकरराव सप्रे या वसंतरावांच्या गुरूंच्या भूमिकेत सारंग साठ्ये आणि वसंतरावांच्या मामाच्या भूमिकेत आलोक राजवाडे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. लाहोरमधील उस्तादांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, तर बेगम अख्तर यांच्या भूमिकेत दुर्गा जसराज यांनी जान आणली आहे. वसंतरावांच्या पत्नीची भूमिका कौमुदी वालोकर हिने चांगली केली आहे.
चित्रपटाचं संगीत राहुलचंच आहे. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे संगीताची मेजवानी आहे. तो तसा असणं स्वाभाविकच. दीनानाथांच्या गायकीपासून ते वसंतरावांच्या स्वतंत्र गायकीपर्यंत अनेकविध गायनप्रकार यात आले आहेत. चित्रपटात लहान-मोठी अशी तब्बल २२ गाणी असून, ती राहुलसह आनंद भाटे, पं. विजय कोपरकर, उस्ताद राशीद खाँ, श्रेया घोषाल, सौरभ काडगावकर, जिग्नेश वझे, ऊर्मिला धनगर, प्रियांका बर्वे, हिमानी कपूर आदी प्रसिद्ध गायकांनी गायिली आहेत. यातलं वैभव जोशींनी लिहिलेलं ‘ललना...’ हे गाणं आत्ताच सुपरहिट झालं आहे. या गाण्याचं टेकिंगही जमून आलं आहे. यात ‘कट्यार’चीही गाणी अर्थातच आहेत. याशिवाय ‘राम राम राम राम...’ ही श्रेया घोषाल व राहुल देशपांडेनं गायलेली अंगाईही अप्रतिम असून, बराच काळ डोक्यात रेंगाळते. 
‘पुनव रातीचा’ अशी एक लावणीही यात असून, ती ज्या प्रसंगात येते तो सर्व प्रसंग मुळातूनच पाहण्यासारखा आहे. या प्रसंगाच्या चपखल योजनेतून निपुणचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसतं. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक ‘म्युझिकल ट्रीट आहे’, यात वाद नाही.
वसंतरावांचा हा सर्व प्रवास १९८३ मधील पुण्यातील त्यांच्या एका मैफलीपासून सुरू होतो. तिथं झाकीरचं तबलावादन सुरू असताना वसंतरावांना भेटायला एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीशी संभाषण सुरू होतं आणि ‘फ्लॅशबॅक’मधून वसंतरावांचा सर्व प्रवास उलगडत जातो. ही व्यक्ती कोण, हेही प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणं इष्ट.
वसंतरावांसारखे दिग्गज कलावंत म्हणजे आपल्या समाजाची अमूल्य संपत्ती असते. ही संपत्ती जतन करायची असते. अशा व्यक्तिश्रेष्ठांच्या गोष्टी पुढील पिढीला सांगायच्या असतात. महाराष्ट्राचं सुदैव हे, की या समृद्ध भूमीत अशी अनेक व्यक्तिमत्त्वं जन्माला आली आणि त्यांच्या गोष्टी पुढल्या पिढीला सांगण्यासाठी निपुणसारखी ‘गोष्टीनिपुण’ पिढीही इथंच जन्माला आली.
या महाराष्ट्रभूमीत जन्म घेतल्याचं, मराठीसारखी मातृभाषा लाभल्याचं भाग्य मिरवावं अशा गोष्टींपैकी एक म्हणजे वसंतरावांचं गाणं... ते गाणाऱ्या कंठामागचा कठोर संघर्ष आणि त्यांची गाण्यावरची अविचल निष्ठा दाखविणारी ‘मी वसंतराव’सारखी कलाकृती म्हणून पाहायलाच हवी.

---

दर्जा - साडेचार स्टार

---