1 Apr 2022

‘मी वसंतराव’विषयी...

कलंदराचे कैवल्यगान...
----------------------------


पं. वसंतराव देशपांडे यांना मराठी रसिक ओळखतात ते एक अवलिया, कलंदर शास्त्रीय गायक म्हणून! शास्त्रीय गायनासोबतच नाट्यसंगीतात, अभिनयातही त्यांनी नवे मानदंड प्रस्थापित केले. वसंतरावांच्या या यशामागे वसंत बाळकृष्ण देशपांडे नावाच्या एका सामान्य वाटणाऱ्या माणसाचा संघर्षपूर्ण इतिहास आहे, तो मात्र आपल्याला फारसा माहिती नसतो. काळ निघून जातो. अशी उत्तुंग माणसं देहानं आपल्यातून निघून जातात. मागे राहतो तो त्यांचा अद्वितीय वारसा... त्या वारशाकडं नवी पिढी थक्क होऊन पाहत असतानाच त्या व्यक्तीची संघर्षगाथा त्यांना पाहायला मिळाली तर? ‘मी वसंतराव’ हा निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट नेमकं हेच साधतो. मराठी रसिकांनी अतोनात प्रेम केलेल्या वसंतरावांचं ते ‘वसंतराव’ होण्यापूर्वीचं कष्टमय जीवन आपल्याला सविस्तर, संवेदनशीलतेनं आणि सहृदयतेनं उलगडून दाखवतो. हा प्रवास प्रेक्षक म्हणून आपल्यासाठीही सोपा नसतो. एका हाडाच्या कलावंताची होणारी तडफड बघताना अनेकदा मनात कालवाकालव होते, कित्येकदा आवंढे गिळले जातात, अनेकदा अश्रू ओघळतात... अज्ञानाचा अंधार फार मोठा असतो. रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो. वसंतरावांच्या अनवट आणि अफाट गायकीसारखाच आपल्या मनात रुंजी घालतो आणि मनोमन त्या महान कलावंताला नमन करायला भाग पाडतो...
कलाकाराला आपल्यातल्या कलेची जाणीव होणं आणि त्यानंतर त्या लख्ख उजळलेल्या वाटेनं त्याचं ते बेभान होऊन दौडत निघणं हा प्रवास निपुणनं त्यातल्या सर्व नाट्यमय शक्यता लक्षात घेऊन अतिशय सुरेख आणि सुरेल चितारला आहे. एका अर्थानं वसंतराव हे बंडखोर कलावंत होते. मा. दीनानाथांच्या गायकीचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव असला, तरी ‘तू स्वत:ची वाट शोध, माझी नक्कल करू नकोस’ हा त्यांनीच केलेला उपदेश वसंतरावांनी आयुष्यभर पाळला. त्यातून त्यांची वेगळी अशी खास ‘देशपांडे घराण्या’ची गायकी जन्माला आली. असं गाणं ऐकण्याची तेव्हाच्या रसिकांना आणि संगीत समीक्षकांनाही सवय नव्हती. परंपरेनं आलेलं चौकटबद्ध गाणं हेच खरं गाणं असं त्यांचं ठाम मत होतं. त्यात वसंतरावांचं निम्मं आयुष्य कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पेलण्यात एखाद्या सर्वसामान्य गृहस्थाप्रमाणे गेलं. त्यांच्यातला वेगळा गायक हेरला तो त्यांचे जीवलग मित्र पु. ल. देशपांडे यांनी! मा. दीनानाथांपासून ते लाहोरमध्ये भेटलेल्या उस्तादांपर्यंत आणि बेगम अख्तर यांच्यापासून ते वसंतरावांच्या आई व मामांपर्यंत निवडक लोकांनीही त्यांच्यातला हा ‘वेगळा’ कलावंत ओळखला होता. मात्र, स्वत: वसंतरावांना आपल्यामधल्या या असामान्य गायकाची ओळख पटेपर्यंत बराच काळ गेला. त्यांचा हा सर्व संघर्ष पाहताना आपण अनेक बाबतींत लाक्षणिक अर्थानं या संघर्षाची तुलना आपल्या स्वत:च्या आयुष्याशी करू शकतो. अनेकदा आपल्याला आपल्या क्षमतांची जाण नसते. कौटुंबिक, व्यावहारिक अडचणींचे डोंगर समोर उभे असतात. वाट सापडत नाही. जीवाची नुसती तडफड होते. कस्तुरीमृगाप्रमाणेच ही अवस्था असते. तो सुगंध आपल्याच नाभीत आहे, हे जसं कस्तुरीमृगाला ठाऊक नसतं, तद्वतच आपल्यातले असामान्य गुण आपल्याला अनेकदा कळत नाहीत. वसंतराव एका अर्थाने भाग्यवान, की त्यांना पुलंसारखा जीवलग मित्र लाभला. या चित्रपटातला हा मैत्रीचा ट्रॅक अनेक अर्थांनी खूप लोभस आणि सुंदर झाला आहे.
तब्बल तीन तासांचा हा सिनेमा तयार करताना निपुणनं वसंतरावांचा हा सर्व प्रवास अगदी तब्येतीत दाखवला आहे. अगदी लहानपणापासून विशिष्ट तऱ्हेनं वाट्याला आलेला संघर्ष, मानी आईसोबत नागपुरात एकटं राहणं, त्यानंतर मामामुळं थेट लाहोरला केलेली भटकंती आणि गाण्याचा शोध, नंतर पुण्यात आल्यावर ब्रिटिशकालीन मिलिटरी अकौंट्समध्ये केलेली नोकरी, लग्न-संसार, मुलं-बाळं, नंतर ‘नेफा’त झालेली बदली, तिकडे वेगळ्याच प्रांतात होणारी घुसमट, मग अख्तरीबाई आणि पुलंच्या प्रयत्नांनी पुन्हा पुण्यात येऊन पूर्णपणे गाणं करण्याचा निर्णय, पुण्यातल्या संगीत समीक्षकांशी उडालेला खटका, स्वतंत्र मैफली मिळण्याची मारामार अशा अडचणींतून वसंतरावांचं आयुष्य जात असतानाच मग ‘कट्यार काळजात घुसली’च्या रूपानं त्यांच्या कारकिर्दीला मिळालेली मोठी कलाटणी आणि त्यातून त्यांची उत्तुंग गायकी सर्व रसिकांसमोर प्रस्थापित होऊन त्यांना मिळालेली लोकमान्यता व राजमान्यता हा सर्व प्रवास निपुणनं अतिशय मेहनतीनं, बारीकसारीक गोष्टींच्या तपशिलाकडे लक्ष देऊन विलक्षण प्रत्ययकारक रंगविला आहे.
वसंतरावांवरील सिनेमा म्हटल्यावर वसंतरावांची मुख्य भूमिका त्यात कोण करणार, हा महत्त्वाचा प्रश्न होता. आजोबांची गायकी आत्मसात केल्यानंतर वसंतरावांचा नातू राहुल देशपांडे यानेच ही भूमिकाही करावी, असे दिग्दर्शकाला वाटले असल्यास नवल नाही. राहुलनेही या भूमिकेचे सोने केले आहे. एका अर्थाने त्याच्या रक्तातच ही भूमिका होती. अर्थात त्यामुळेच ती साकारणं अवघडही होतं. याचं कारण त्याला त्यासाठी आपल्यातून आजोबांना बाहेर काढून, समोरून त्यांच्याकडं बघावं लागलं असणार. कुठल्याही कलावंतासाठी यापेक्षा कठीण आव्हान दुसरं नसेल. वसंतरावांचं व्यक्तिमत्त्व प्रत्यक्ष बघितलेली अनेक मंडळी आजही हयात आहेत. वसंतरावांचे बरेचसे व्हिडिओही उपलब्ध आहेत. त्यांचं लोभस रूप, काहीसं सानुनासिक आणि वैदर्भीय हेलातलं बोलणं हे सगळं ज्ञात आहे. असं असताना परकायाप्रवेश करून ही भूमिका साकारणं, अगदी त्यांचा नातू असला तरी, फारच अवघड! मात्र, राहुलनं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. मध्यमवयीन वसंतरावांची भूमिका त्यानं फारच उत्तम आणि तन्मयतेनं केली आहे. (अगदी लहान वसंताची भूमिका आरुष नंद व थोड्या मोठ्या वसंताची भूमिका गंधार जोशी यांनी केली आहे.) वसंतरावांच्या आईच्या भूमिकेत अनिता दाते चपखल बसल्या आहेत. या भूमिकेचा ठसका काही औरच आहे. एक करारी, स्वाभिमानी स्त्री ते ‘आम्हाला एक वेळ विसर, पण गाणं सोडू नकोस’ असं मुलाला सांगणारी आई हा सर्व प्रवास अनिता दाते यांनी फारच उत्तम सादर केला आहे. 

या सर्व सिनेमात अगदी छाप पाडून जातो तो पुलंची भूमिका साकारणारा पुष्कराज चिरपुटकर. वास्तविक अतुल परचुरेपासून ते सागर देशमुखपर्यंत अनेकांनी पडद्यावर पु. ल. साकारले आहेत. पण दर वेळी नवा कलाकार पु. लं.च्या भूमिकेत बघायचा म्हणजे आधी पोटात गोळाच येतो. पुष्कराजनं मात्र सुखद अपेक्षाभंग केला आहे. वसंतरावांच्या जीवनात पुलंसारख्या जीवलग दोस्ताचं स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळंच ही भूमिकाही बऱ्याच मोठ्या लांबीची आणि महत्त्वाची होती. पुलंचं व्यक्तिमत्त्व रेखाटताना ते क्वचित कॅरिकेचरकडं झुकतं की काय, अशी सारखी भीती वाटत राहते. मात्र, पुष्कराजनं तो तोल व्यवस्थित सांभाळला आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व, मोठे लेखक पु. ल. देशपांडे यापेक्षा ‘वशाचा दोस्त भाई’ हा त्यातला रंग महत्त्वाचा होता आणि तो सूर नेमका पकडल्यानं पुष्कराज बाजी मारून गेलाय. वसंतरावांच्या आईचे व पुलंचे यातले चुरचुरीत संवाद अनेकदा हशा व टाळ्या मिळवतात व या सर्व सिनेमातला तो एक अतिशय सुखद रिलीफ आहे.
मा. दीनानाथांच्या छोट्याशा भूमिकेचे आव्हान अमेय वाघने समर्थपणे पेलले आहे. भूमिकेची लांबी कमी असली, तरी चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीने ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दीनानाथांचा आब राखून अमेयनं ही भूमिका वठविली आहे. इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये शंकरराव सप्रे या वसंतरावांच्या गुरूंच्या भूमिकेत सारंग साठ्ये आणि वसंतरावांच्या मामाच्या भूमिकेत आलोक राजवाडे यांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. लाहोरमधील उस्तादांच्या भूमिकेत कुमुद मिश्रा, तर बेगम अख्तर यांच्या भूमिकेत दुर्गा जसराज यांनी जान आणली आहे. वसंतरावांच्या पत्नीची भूमिका कौमुदी वालोकर हिने चांगली केली आहे.
चित्रपटाचं संगीत राहुलचंच आहे. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे संगीताची मेजवानी आहे. तो तसा असणं स्वाभाविकच. दीनानाथांच्या गायकीपासून ते वसंतरावांच्या स्वतंत्र गायकीपर्यंत अनेकविध गायनप्रकार यात आले आहेत. चित्रपटात लहान-मोठी अशी तब्बल २२ गाणी असून, ती राहुलसह आनंद भाटे, पं. विजय कोपरकर, उस्ताद राशीद खाँ, श्रेया घोषाल, सौरभ काडगावकर, जिग्नेश वझे, ऊर्मिला धनगर, प्रियांका बर्वे, हिमानी कपूर आदी प्रसिद्ध गायकांनी गायिली आहेत. यातलं वैभव जोशींनी लिहिलेलं ‘ललना...’ हे गाणं आत्ताच सुपरहिट झालं आहे. या गाण्याचं टेकिंगही जमून आलं आहे. यात ‘कट्यार’चीही गाणी अर्थातच आहेत. याशिवाय ‘राम राम राम राम...’ ही श्रेया घोषाल व राहुल देशपांडेनं गायलेली अंगाईही अप्रतिम असून, बराच काळ डोक्यात रेंगाळते. 
‘पुनव रातीचा’ अशी एक लावणीही यात असून, ती ज्या प्रसंगात येते तो सर्व प्रसंग मुळातूनच पाहण्यासारखा आहे. या प्रसंगाच्या चपखल योजनेतून निपुणचं दिग्दर्शकीय कौशल्य दिसतं. हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक ‘म्युझिकल ट्रीट आहे’, यात वाद नाही.
वसंतरावांचा हा सर्व प्रवास १९८३ मधील पुण्यातील त्यांच्या एका मैफलीपासून सुरू होतो. तिथं झाकीरचं तबलावादन सुरू असताना वसंतरावांना भेटायला एक व्यक्ती येते. त्या व्यक्तीशी संभाषण सुरू होतं आणि ‘फ्लॅशबॅक’मधून वसंतरावांचा सर्व प्रवास उलगडत जातो. ही व्यक्ती कोण, हेही प्रत्यक्ष पडद्यावरच पाहणं इष्ट.
वसंतरावांसारखे दिग्गज कलावंत म्हणजे आपल्या समाजाची अमूल्य संपत्ती असते. ही संपत्ती जतन करायची असते. अशा व्यक्तिश्रेष्ठांच्या गोष्टी पुढील पिढीला सांगायच्या असतात. महाराष्ट्राचं सुदैव हे, की या समृद्ध भूमीत अशी अनेक व्यक्तिमत्त्वं जन्माला आली आणि त्यांच्या गोष्टी पुढल्या पिढीला सांगण्यासाठी निपुणसारखी ‘गोष्टीनिपुण’ पिढीही इथंच जन्माला आली.
या महाराष्ट्रभूमीत जन्म घेतल्याचं, मराठीसारखी मातृभाषा लाभल्याचं भाग्य मिरवावं अशा गोष्टींपैकी एक म्हणजे वसंतरावांचं गाणं... ते गाणाऱ्या कंठामागचा कठोर संघर्ष आणि त्यांची गाण्यावरची अविचल निष्ठा दाखविणारी ‘मी वसंतराव’सारखी कलाकृती म्हणून पाहायलाच हवी.

---

दर्जा - साडेचार स्टार

---

17 comments:

 1. चित्रपट बघण्यासाठी उत्सुक होतोच, आता आपल्या परीक्षणाने उत्सुकता अधिक वाढली.
  असे ताकदीचे चित्रपट निघाल्यानेच आजच्या पिढीला वसंतराव देशपांडे, काशिनाथ घाणेकर यांच्यासारख्या अस्सल हिऱ्यांची माहिती मिळाली.

  ReplyDelete
  Replies
  1. अतिशय योग्य परीक्षण ..अगदी आमच्याच मनातल्या प्रतिक्रिया सविस्तरपणे व सुंदर शब्दात तुम्ही मांडल्यात असं वाटलं वाचताना ..चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इतकी कमालीची उत्सुकता होती की लगेचच दुसऱ्या दिवशीची तिकिटे आधीच काढून ठेवली होती..गाणी , अभिनय सगळ्यांचीच मस्तच, संपू नये असं वाटायला लावणारी ही जादुई मैफल होती ...हा चित्रपट पुन्हा पण पाहायला नक्की आवडेल ...छानच लिहिलंय तुम्ही ..बऱ्याच जणांना पाठवला तुमचा हा लेख ,.खूप धन्यवाद👌👌👌💐👍🙏🙏🙏

   Delete
  2. मन:पूर्वक धन्यवाद वीणाजी! 😊🙏

   Delete
 2. सुरेख ओळख अजरामर व्यक्तिमत्वाची आणि ते पडद्यावर साकार करणाऱ्या सर्वांची 👌

  ReplyDelete
 3. चित्रपट पाहायचा हे ठरलेलंच आहे पण तुमच्या परिक्षण/ रसग्रहणाचीही तेव्हढीच उत्सुकता होती..🎶🎵🎼🙏💙💛🙏

  ReplyDelete
 4. छान लिहिले आहे आपण। बघतोच आता हा चित्रपट

  ReplyDelete
  Replies
  1. नक्की बघा... मन:पूर्वक धन्यवाद!!

   Delete
 5. खूप छान समीक्षा...

  ReplyDelete
  Replies
  1. मनापासून धन्यवाद... कृपया आपले नाव लिहा...

   Delete
 6. Superb write up!!.. was anyways going to watch it, but now waiting to watch it all the more after reading this. Waiting for the release in our country

  ReplyDelete