31 Aug 2017

'ऐसी अक्षरे'साठी लेख

वृत्तपत्र विद्यापीठ
---------------


पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवलं गेलेलं एक वाक्य कायमचं लक्षात राहिलंय. वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या मजकुराची एक व्याख्या 'घाईत लिहिलेलं साहित्य' (Liturature in hurry) अशी केलेली आहे. वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्यांना कायमच वेळेच्या मर्यादेत, घाईत काम करावं लागतं. या 'डेडलाइन'ची टांगती तलवार सदैव डोक्यावर असते. विशिष्ट वेळेत, विशिष्ट शब्दांत आणि विशिष्ट गरजा पूर्ण करणारा मजकूर हुकमी पद्धतीनं लिहिता यावा लागतो. पत्रकार होण्याची ती जणू पूर्वअटच असते. त्यामुळंच भाषेवर पकड असणाऱ्यांना, चांगली शब्दसंपदा असणाऱ्यांना आणि काळ-वेळ-संदर्भाचं अचूक भान असणाऱ्यांना वृत्तपत्रांच्या जगात मान असतो; मागणी असते. 
मी गेल्या वीस वर्षांपासून या व्यवसायात आहे. लिहिण्याची आवड हाच व्यवसाय झाला. असं होणं हे दोन गोष्टींसाठी फार भाग्याचं मानायला हवं. एक तर तुम्हाला तुमच्या या छंदासाठी पगार मिळतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं काम हे काम वाटत नाही. काम हे जेव्हा 'काम' वाटतं, तेव्हा त्या कामाचं ओझं वाटू लागतं. माझं सुदैवानं तसं झालं नाही; आणि अर्थात पत्रकारितेत कोणत्याही कामाचं ओझं वाटून चालत नाही. वेळप्रसंगी प्रूफरीडरपासून ते संपादकापर्यंतची सर्व कामं एकाच माणसाला करावी लागू शकतात, हेही एक कारण आहेच. माझ्या या दोन दशकांहून अधिक झालेल्या कारकिर्दीत पुष्कळ वेळा हे सगळं करावं लागलं आहे. 
सुदैवानं 'लोकसत्ता', मग 'सकाळ' आणि आता 'महाराष्ट्र टाइम्स' या महाराष्ट्रातल्या तिन्ही आघाडीच्या वृत्तपत्रांत काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. तर सांगायचा मुद्दा हा, की बहुतेक पत्रकारांना प्रूफरीडर ते संपादक ही सगळी कामं कधी ना कधी करावीच लागतात. पत्रकारांच्या कामकाजाचे प्रामुख्यानं दोन भाग पडतात. एक बातमीदारीचा, म्हणजे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन बातम्या आणण्याचा आणि दुसरा संपादनाचा, म्हणजे टेबलवर बसून बातमीवर संस्कार करण्याचा! मी दुसऱ्या कामात जास्त रमलो किंवा ते काम मला अधिक चांगलं जमत असावं म्हणून दिलं गेलं, असं म्हणता येईल. पण बातमीदारीही केलीच. प्रत्येक उपसंपादकाला उमेदवारीच्या काळात बातमीदारी करावीच लागते. मुळात वृत्तपत्रांत कामकाजाचा भाग म्हणून हे दोन वेगळे विभाग केलेले असतात. प्रत्यक्ष काम करताना एवढी कट्टर विभागणी नसते. उपसंपादक हाही बातमी आणू शकतोच. तर त्या पद्धतीनं मीही बातमीदारी केली. सुरुवातीला उमेदवारी म्हणून केली आणि नंतर आपल्या विशेष आवडीच्या, म्हणजे माझ्या बाबतीत, साहित्य व सिनेमा या दोन गोष्टींच्या संदर्भात आवर्जून बातमीदारी केली...
माझी सुरुवात नगरला 'लोकसत्ता'मधून मुद्रितशोधक म्हणून झाली असली, तरी पुण्यात एक सप्टेंबर १९९७ पासून मी 'सकाळ'मध्ये रुजू झालो तेव्हापासून खऱ्या अर्थानं माझी पत्रकारिता सुरू झाली असं म्हणता येईल. तिथं उपसंपादकीचे, बातमीदारीचे धडे गिरवता आले. अनेक दिग्गज पत्रकारांच्या अनुभवांचा आम्हाला फायदा मिळाला. त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. आम्ही चार-पाच जण ट्रेनी असताना आम्हाला राजीव साबडे सरांच्या ताब्यात देण्यात आलं. सहा महिन्यांत त्यांनी आमच्याकडून बातमीदारीचं, उपसंपादकीचं, ग्रंथालय शास्त्राचं आणि क्रीडा बातमीदारीचं तंत्र घोटून घेतलं. हा शिक्षणाचा काळ मोठा विलक्षण होता. अनेक नव्या गोष्टी प्रथमच माहिती झाल्या. अर्थात एक आहे. आपल्या स्वतःच्या बालसुलभ उत्साहाची, नवं शिकण्याच्या तयारीची आणि कुतूहलाची जोड त्याला पाहिजे. मी तेव्हा २१-२२ वर्षांचा तरुण होतो आणि या सगळ्या गोष्टी माझ्या अंगात होत्या. त्याचा पुढं फार उपयोग झाला. जन्मजात कुतूहल असल्याशिवाय पत्रकारितेत मजा नाही. मी 'सकाळ'मध्ये रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी ग्रंथालयात जाऊन माणूस चंद्रावर उतरला त्या दिवशीचा 'सकाळ'चा अंक मला दाखवा, अशी विचारणा केली होती. कारण ती बातमी तेव्हा कशी दिली होती, हे जाणून घेण्याची मला अत्यंत उत्सुकता होती. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव सर माझं हे कुतूहल पाहून अत्यंत खूश झाले आणि त्यांनी जुनी फाइल काढून मला केवळ ती बातमीच दाखविली असं नाही, तर त्या बातमीच्या वेळी तेव्हा घेतल्या गेलेल्या परिश्रमांचीही माहिती दिली. 'सकाळ'च्या परुळेकर शैलीनुसार 'माणूस चंद्रावर उतरला' एवढंच, पण थेट बातमी सांगणारं शीर्षक होतं. हे शीर्षक अत्यंत मोठ्या टायपात होतं, हे उघडच दिसत होतं. तेव्हा एवढ्या मोठ्या अक्षरांचा ब्लॉक नव्हता. तर तो मुद्दाम तयार करवून घेऊन मग हे शीर्षक वापरण्यात आलं होतं. माझ्या मते, ही विसाव्या शतकातील पहिल्या क्रमांकाची बातमी होती आणि तिची ट्रीटमेंट आपण पाहायलाच हवी होती.
कान व डोळे उघडे ठेवून वावरलं की बातम्या मिळतात, असं आम्हाला सांगितलं जायचं. नुसती बातमी मिळवून भागायचं नाही, तर त्यातील सर्व माहिती अचूक असेल, याची खातरजमा करावी लागायची. यासाठी संबंधित व्यक्तींना अनेकदा फोन करावे लागत किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटावं लागे. मी तेव्हा सायकलवर सर्व पुणे शहरात फिरून अनेकदा ही माहिती गोळा केली आहे. तेव्हा मोबाइल नुकतेच आले होते; पण सर्रास वापर नव्हता. माणसांना प्रत्यक्ष जाऊन भेटण्यावरच अधिक भर असायचा. यामुळं एक फायदा असा झाला, की पुण्यातल्या त्या काळातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांच्या निवासस्थानी वा कार्यालयांत भेटता आलं, बोलता आलं. बातमीदारीच्या निमित्तानं पोलिस आयुक्तालयापासून ते एनडीएच्या सुदान ब्लॉकपर्यंत आणि वेदशास्त्रोत्तेजक सभागृहापासून कासेवाडी झोपडपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी फिरावं लागायचं. स्वतः या सर्व ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा बातमीदारी केलीत, की मग उपसंपादक म्हणून काम करणं पुढं सोपं जातं. शहरातील महत्त्वाच्या संस्था, व्यक्तींची नावं तुम्हाला माहिती होतात. नावांच्या मागचे-पुढचे संदर्भ कळू लागतात. मार्केट यार्डमध्ये सकाळी जाऊन भाज्यांचे भाव आणणे हा ट्रेनी बातमीदारांच्या कामाचा एक अविभाज्य भाग असतो. अनेकांना हे काम कंटाळवाणं वाटतं. मी मात्र फार उत्साहानं मार्केट यार्डात जायचो. तिथं विलास भुजबळांना भेटायचो. ते सगळी माहिती सांगायचे. (मला वाटतं, अजूनही तेच ही सगळी माहिती देत असतात.) तत्कालीन पुणे विद्यापीठ, महापालिका, कँटोन्मेंट बोर्ड, रेल्वे स्टेशन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हाधिकारी कार्यालय, झेडपी, स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकं, मंडई, वेधशाळा, आकाशवाणी व दूरदर्शन, मराठा चेंबर, कॅम्प, भारत इतिहास संशोधन मंडळ, नव्या पेठेतील पत्रकार भवन आणि महत्त्वाचं म्हणजे वैकुंठ... ही बातम्या मिळण्याची तेव्हाची प्रमुख ठिकाणं होती. अजूनही हीच आहेत. काहींची नव्यानं फक्त भर पडली आहे.
'वैकुंठ'वरून आठवलं. या प्रशिक्षणाच्या काळात एक काम मी फार सातत्यानं केल्याचं माझ्या लक्षात आहे. एखादी मोठी व्यक्ती गेली, की तिचं अल्पचरित्र लिहायचं, हे ते काम! 'सकाळ'चं संदर्भ ग्रंथालय उत्कृष्ट आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीचं अल्पचरित्र लिहायचं झाल्यास ग्रंथालयातून त्या व्यक्तीचं पाकीट आणायचं. त्यात त्या व्यक्तीबद्दल छापून आलेली ओळ न् ओळ जतन करून ठेवलेली असायची. ज्यांचं अल्पचरित्र वृत्तपत्रं छापतात ती मुळातच मोठी माणसं असल्यानं त्यांच्याविषयीची भरपूर माहिती वृृृत्तपत्रांकडं असतेच. तेव्हा 'गुगल'पेक्षा ग्रंथालयांचा वापर करण्याची पद्धत होती. तर मी सहा महिन्यांच्या काळात अशी चार-पाच तरी मोठ्या व्यक्तींची चरित्रं लिहिली. 
त्यात गोनीदा, यशवंत दत्त, मालती पांडे, अनंतराव कुलकर्णी आदींचा समावेश होता. याशिवाय अनेक मोठ्या लोकांशी बोलण्याची, त्यांची मुलाखत घेण्याची वेळ येई. तेव्हा ग्रंथालयात जाऊन त्या व्यक्तीविषयीची सर्व माहिती वाचून मगच तिला भेटायला जायचं, अशी आम्हाला सक्त ताकीद होती. त्यामुळं अज्ञानातून हसं होण्याचे प्रसंग कधीच आले नाहीत. किंबहुना याला आपल्याविषयी नीट माहिती आहे, हे कळलं की ती समोरची व्यक्ती खुलून अधिक मोकळेपणाने बोलत असे. लिहिताना साधी-सोपी, सरळ वाक्यं लिहावीत, याचा संस्कार होता. (हा लेख वाचतानाही वाचकांना ते जाणवेल.) वाचकाला कुठलीही अडचण न येता, थेट माहिती कळली पाहिजे, ही शिकवण होती. बातमीच्या सुरुवातीला लिहिल्या जाणाऱ्या मजकुराला 'लीड' असं म्हणतात. हा 'लीड' तीस शब्दांहून अधिक मोठा असता कामा नये, असा दंडक होता. याशिवाय बातमीच्या सुरुवातीलाच संक्षिप्त रूपं न वापरणं (भाजप न म्हणता पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष असं पूर्ण लिहायचं), व्यक्तीचं पूर्ण नाव (म्हणजे सौ. टिळक असं न लिहिता, मुक्ता टिळक असं पूर्ण लिहायचं) लिहिणं, शक्यतो मराठीच आद्याक्षरं वापरणं (लोकप्रिय नावं - उदा. एस. एम. जोशी हे अर्थात अपवाद), इंग्रजी शब्दांचं अनेकवचन न लिहिणं (बसेस किंवा डॉक्टर्स न लिहिता चारशे बस किंवा शहरातले डॉक्टर असंच लिहायचं...) अशा कित्येक बारीक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्या. आजही लिखाणावर तोच संस्कार कायम आहे. आपला अंक विद्यापीठाचे कुलगुरूही वाचणार आहेत आणि स्टेशनवरचा हमालही वाचणार आहे; त्यामुळं दोघांनाही कळेल असं लिहा, असं आम्हाला सांगितलं जायचं. ते अगदी पटण्याजोगंच आहे.
पुण्यात पत्रकारिता करताना काही काही गोष्टी नीट लक्षात ठेवाव्या लागतात. इंग्रजीत ज्याला 'होली काऊ' म्हणतात, अशी बातम्यांची काही ठिकाणं वा घटना असतात. उदा. पुण्यातल्या गणपतींचं व विसर्जन मिरवणुकीचं वार्तांकन, दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यात येणाऱ्या दोन्ही पालख्या व त्यांचे मुक्काम... आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुद्द पुणे. या तिन्ही गोष्टींविषयी पुणेकर वाचक कमालीचा हळवा आणि संवेदनशील आहे. तेव्हा त्याला न दुखावता, या घटनांचं वार्तांकन करावं लागतं. त्यामुळं वाचकांच्या लक्षात आलं असेल, की या सर्व बाबतींत पुण्यातील वृत्तपत्रं (विशेषतः मराठी) एकमतानं, एकाच पद्धतीचं वृत्त देताना दिसतात. त्यात फार काही बदल करणं त्यांना शक्य झालेलं नाही. अगदी गेल्या तीन-चार वर्षांत मात्र थोडासा बदल होताना निश्चित दिसतो आहे. याखेरीज काही व्यक्ती, समाज व संस्थांविषयीही पुणेकर वाचक हळवे आहेत. विशेषतः पुण्याच्या अभिमानाची प्रतीकं मानल्या जाणाऱ्या व्यक्ती व संस्थांविषयी! त्यांची नावं इथं लिहिण्याची गरज नाही; आपल्यापैकी अनेकांनी ती सहज लक्षात येतील. 
या सर्व अनुभवाची शिदोरी घेऊन आपण पुण्याबाहेर किंवा परराज्यांत वा परदेशात वार्तांकन करायला जातो, तेव्हा निश्चितच मग आपल्यावर एक जास्तीची जबाबदारी येऊन पडते. सुदैवानं मला सुरुवातीपासून असं बाहेर जाऊन वार्तांकन करायची संधी मिळत गेली. एखादी सांस्कृतिक बातमी थोड्या ललित अंगानं, शैलीदार शब्दांनी नटवून लिहिण्याची मला आवड होती. थोडं फार जमत होतं तसं... मग तशा बातम्या लिहिणं ही तुमची जबाबदारीच होऊन जाते. या बातम्या तेव्हा मजकूर इटॅलिक करून वापरल्या जात. शिवाय अशा बातम्यांमध्ये वाक्यांनंतर पूर्णविराम न देता, तीन टिंबं (...) देण्याची पद्धत असे. मला अनेक सहकारी 'तीन टिंबांची बातमी लिहिणारा...' असं चिडवत असत. पण प्रत्येक बातमी अशी लिहायची नसते, हे मला अर्थातच कळत होतं. 
माझ्या या लिखाणामुळं असेल, लवकरच मला साहित्य संमेलनाचं वार्तांकन करायची संधी मिळाली. ऑफिसमधल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांसोबत मी (१९९९ मध्ये) बेळगाव साहित्य संमेलनाला गेलो. प्रवास करताना उघड्या डोळ्यांनी करायचा, नवा प्रदेश डोळ्यांत साठवून ठेवायचा, ही माझी पूर्वीपासूनची आवड. मग वार्तांकनाला बाहेर जायला लागलो, तेव्हा या आवडीचा फार उपयोग झाला. मला प्रवासात झोप येत नाही आणि फार लांबचा प्रवास नसेल तर दिवसाच प्रवास करणं मला आवडतं. त्यायोगे ज्या भागात मी प्रथमच चाललो असेन तो भाग नीट पाहता येतो. इंग्रजीत ज्याला 'Terrain' म्हणतात, तो भूभाग पाहण्यात मला फार रस असतो. हा भूभाग पाहिल्यानंतर त्या परिसराविषयी किती तरी गोष्टी न सांगताच समजतात. तिथली माणसंही समजायला लागतात. एखादा भाग डोंगराळ आहे, की सखल आहे, पठारावर आहे की समुद्रकिनारी आहे, समुद्रसपाटीपासून साधारणतः किती उंचीवर आहे, तिथं कोणकोणत्या वाहतुकीच्या सोयी आहेत, तिथलं हवापाणी कसं आहे या साऱ्या गोष्टी जाणून घेण्यात मला रस असतो. याचं कारण आपण तिथं जे काही वार्तांकन करायला चाललेलो असतो, ती घटना वा प्रसंग काही निर्वात पोकळीत घडत नसतात. या साऱ्या सभोवतालाचा त्यावर कळत-नकळत परिणाम होत असतो. त्यातून त्या भागात कधीच न गेलेल्या वाचकाला आपण त्या भागाचा 'आँखो देखा हाल' सांगू शकतो आणि त्यामुळं वार्तांकनाचं मूल्य निश्चितच वाढतं. बेळगावला गेल्या गेल्या लक्षात आलं ते तिथल्या हवेचं वेगळेपण. एवढी थंड, आल्हाददायक हवा ऐन एप्रिल महिन्यात तिथं जाणवत होती. मग त्याचा नकळत उल्लेख किंवा परिणाम त्या बातम्या लिहिण्यावर होऊ लागला. बेळगावात कायम धगधगणारा मराठी-कन्नड वाद, त्या पार्श्वभूमीवर य. दि. फडके संमेलनाध्यक्ष असणं, तिथल्या मराठी शाळा, संमेलनाच्या निमित्तानं गावातून मिळणारा प्रतिसाद या सगळ्या गोष्टी संमेलनाच्या वार्तांकनात आपसूक येत गेल्या. त्यामुळंच तिथल्या कुंद्यासारखंच हे वार्तांकनही चांगलं जमून गेलं. पुढं अनेक साहित्य संमेलनांना उपस्थित राहून वार्तांकन करण्याचा योग आला. बहुतेक ठिकाणी पहिल्या दिवशी त्या गावातून निघणाऱ्या ग्रंथदिंडीतच संमेलनाचा रागरंग समजून यायचा. याचं कारण ही दिंडी म्हणजे त्या गावानं संमेलनाला नेमका कसा प्रतिसाद दिलाय हे सांगणारी एक लिटमस टेस्टच असायची किंवा असते.  
नंतर लगेचच तमिळनाडूत विधानसभा निवडणुकीचं वार्तांकन करायला जाण्याचा योग आला. एवढ्या लांबच्या राज्यात असं वार्तांकन करायला जायची ही माझी पहिलीच वेळ होती. त्याही वेळी ग्रंथालयात जाऊन त्या राज्याचा भौगोलिक-सामाजिक अभ्यास करणं, गेल्या चार-पाच महिन्यांतील घडामोडींशी परिचय करून घेणं या गोष्टी केल्या. तमिळनाडूत भाषेचा प्रश्न येणार, हे माहिती होतं. ट्रेनमध्ये मला एक तमिळी कुटुंब भेटलं. त्यांच्याशी परिचय झाल्यानंतर त्या कुटुंबात असलेल्या दहावीतल्या एका मुलीकडून मी चार-पाच वाक्यं तमिळमध्ये लिहून घेतली आणि पाठ करून टाकली. 'नमस्कार, मी अमुकतमुक.. महाराष्ट्रातून निवडणुकीचं वार्तांकन करायला आलो आहे' इ. प्रकारची ती चार-पाच  वाक्यं होती. त्यातलं 'येनक्कं तमिल थेरियादं' (मला तमिळ येत नाही) एवढं एकच वाक्य आता लक्षात आहे. गंमत म्हणजे मी हे वाक्य तमिळमधून म्हणत असल्यानं तिकडं सगळे (उदा. रिक्षावाले) हसायचे आणि 'थेरियादं?' (येत नाही काय?) म्हणून माझीच फिरकी घ्यायचे. पण हा एक अनुभवच होता. मी गेलो होतो २००१ च्या ऐन रणरणत्या मे महिन्यात. माझं अंग तिकडं भाजून निघालं. मात्र नवा प्रदेश, नवे लोक, नवी भाषा यांचं आकर्षण जबरदस्त होतं. माझ्या पहिल्या बातमीत अर्थातच तापलेल्या चेन्नईचा उल्लेख होता. जयललिता यांचा वेदनियलम हा प्रासादवजा बंगलाही तेव्हाच पाहिला. त्यांच्या 'जया टीव्ही'च्या ऑफिसात गेलो. द्रमुकच्या ऑफिसात गेलो. मी तेव्हा २५-२६ वर्षांचा होतो. महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्राचा प्रतिनिधी एवढ्या लांब तमिळनाडूची विधानसभा कव्हर करायला आलाय, याचंच त्या लोकांना भारी आश्चर्य वाटायचं. त्यामुळं मदतही खूप मिळायची. स्थानिक पत्रकारांनी तर खूपच मदत केली. आमचे एन. सत्यमूर्ती नावाचे प्रतिनिधीही तिथं होते. त्यांनीही बऱ्याच टिप्स दिल्या. यामुळं तिथलं वातावरण बऱ्यापैकी टिपण्यात मी यशस्वी झालो, असं वाटतं. प्रत्येक ठिकाणी टिपिकल राजकीय बातम्या किंवा सभांच्या बातम्या देण्यापेक्षा वेगळं काही दिसतंय का हे पाहत गेलो. चेन्नईच्या एका उपनगरात करुणानिधींच्या भिंतीवरील चित्रासमोरच तेथील बायकांची सार्वजनिक नळावर पाण्यासाठी लांबच लांब रांग लागली होती. चेन्नईत तेव्हा पाण्याचा फारच प्रॉब्लेम होता. मी तो फोटो आणि तिथल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्याचीच बातमी करून पाठविली होती. रजनीकांत व एकूणच सिनेमांचं तिथल्या लोकांचं वेड, अत्यंत स्वस्त खाणं-पिणं आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचाही नकळत उल्लेख बातम्यांमध्ये येत असे.
मी तमिळनाडूतून परत आल्यावर सहाच महिन्यांत दिल्लीत संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला. या घटनेत १२-१३ पोलिस कर्मचारी व निमलष्करी दलाचे अधिकारी मरण पावले होते. या घटनेला २००२ मध्ये एक वर्ष पूर्ण होत असताना, या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांना मी भेटून यावं आणि त्याची एक स्टोरी करावी असं मला आमचे तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी सांगितलं. त्यानुसार नोव्हेंबर २००२ मध्ये मी दिल्ली, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांत जाऊन संबंधित जवान व कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना भेटून आलो. हा अतिशय विलक्षण आणि हृद्य अनुभव होता. किंबहुना ही माझी आत्तापर्यंत केलेली सर्वोत्तम असाइनमेंट होती, असं वाटतं. या वार्तांकनासाठी विविध ठिकाणी फिरावं लागलं. रिक्षा, बस, ट्रेन, सिक्स सीटर, ट्रॅक्टर, टू-व्हीलर आणि पायी अशा सर्व वाहतुकीच्या साधनांचा वापर करून मला त्या त्या ठिकाणी पोचावं लागलं. मात्र, या जवानांच्या घरी झालेलं स्वागत आणि त्यांनी व्यक्त केलेला जिव्हाळा मी कधीच विसरू शकत नाही. जगदीशकुमार यादव या शहीद अधिकाऱ्याचं कुटुंब राजस्थानातील 'नीम का थाना' इथं राहत होतं. मी दिल्लीवरून बसनं चार तासांचा प्रवास करून त्यांच्या घरी गेलो. जगदीशकुमार यांची तिशीतही नसलेली पत्नी, दोन छोटी मुलं आणि जगदीशकुमार यांचे आई-वडील तिथं राहत होते. त्या कुटुंबाला मी तिथं पोचल्याचं पाहून झालेला आनंद व आश्चर्य मी आजही विसरू शकत नाही. अत्यंत भावनिक असा तो क्षण होता. 'देश माझ्या मुलाला विसरला नाही,' हे त्यांच्या वडिलांचे उद्-गार होते. मला निघायला रात्र झाली, तर ते आजोबा मला तिथंच राहण्याचा आग्रह करीत होते. मी खूप निग्रहानं निघालो, तेव्हा जेवण केल्याशिवाय मात्र त्यांनी सोडलं नाही. हे असे क्षण कायमचे लक्षात राहणारे असतात. पत्रकारितेच्या रोजच्या धबगड्यात फार आत्मिक समाधान देणारे असतात. असे क्षण जगून लिहिलेली बातमी किंवा लेख वाचकांच्या हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही, असा माझा अनुभव आहे. 
अशा साहित्याला मग कुणी 'घाईत लिहिलेलं साहित्य' वा रद्दी म्हटलं, तरी माझ्या लेखी तो अजरामर असा दस्तावेज आहे.

---
(पूर्वप्रसिद्धी - ऐसी अक्षरे जून-जुलै १७ अंक)

27 Aug 2017

मटामधील लेख - खासगी आणि सार्वजनिक

खासगी आणि सार्वजनिक 
------------------------
आपण भारतीय लोक तसे बऱ्यापैकी सार्वजनिक आहोत. सार्वजनिक व्हायला, वागायला, बोलायला आपल्याला आवडते. आपली उत्सवप्रियता हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. जन्माला आल्यापासून हॉस्पिटलात सगळ्या नातेवाइकांचा लोंढा आपल्याला भेटायला येतो, तिथपासून ते परलोकीचा प्रवास सुरू होताना सगळे खांद्यावर नेतात तिथपर्यंत आपल्या जगण्यातला कुठलाच क्षण तसा खासगी नसतो. बारशापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक कार्याला सगळा कुटुंबकबिला हजर पाहिजेच. लहान मूल असल्यापासून ते लग्न होऊन आपल्याला मूल झालं तरी आपल्याला सल्ले देणारे थोर लोक आपल्या आजूबाजूला कायम हजर असतातच. त्यातच आपण मध्यमवर्गीय लोक राहतो त्या चाळी, गावातली घरं, गल्ल्या, वाडे आणि अगदी शहरातल्या सोसायट्या यातल्या खासगीपणाविषयी काय बोलावे? शेजाऱ्याचा संसार आपलाच आहे, असं समजून त्याला प्रेमानं सल्ला देणारे शेजारी आपल्या इथं काही कमी नाहीत. 'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' ही आपली लाडकी वृत्ती... अन् कुठलंही गॉसिप ही तर आपली राष्ट्रीय आवड! त्यातल्या त्यात लग्नानंतर हनीमूनला सोबतीला चार नातेवाइक येत नाहीत, एवढाच काय तो दिलासा...
अशा या आपल्या अतिसार्वजनिक देशात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच 'खासगीपणा (मराठीत प्रायव्हसी) हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे,' असा निकाल दिल्यानंतर तर आम्हास हसूच आवरेना. आम्ही आमचा खासगीपणा आम जनतेला केव्हाच आंदण दिलाय, हे कोण सांगणार यांना? गमतीचा भाग बाजूला ठेवला, तरी मुळात खासगीपणा ही तशी महाग चीज आहे. ती आमच्या इथं अनेकांना परवडतच नाही, हे दारूण वास्तव लक्षात घ्यायला हवं. 
एक काळ असा होता, की आपलं सगळंच जगणं सार्वजनिक होतं..! विशेषतः ज्यांचं लहानपण वाड्यातल्या दहा बाय दहाच्या खोलीत गेलंय अशा पिढीला हे अगदी पटेल... जिथं मुलग्यांना आंघोळीला सार्वजनिक नळ अन् मुलींना खोलीतली कोपऱ्यातली मोरी; जिथं सकाळी कोण किती वाजता 'मागे' जातो याची सर्वांना खबर, तिथं कसलं आलंय खासगी आयुष्य? आज कोणाकडं जेवायला काय बेत आहे, ते कोणाच्या घरी काय 'अडचण' आहे हे सगळंच सगळ्यांना ठाऊक असे. महानगरांतल्या चाळींत तर याहून भयानक परिस्थिती... पती-पत्नीला एकत्र यायचं तर घरातल्या सर्वांनी ठरवून बाहेर जेवायला किंवा फिरायला जायचं... आणि तासाभरात परत येऊन सगळ्यांनी एकाच अंथरूणावर पडायचं... घरातली तरुण बहीण ऋतुमती झाली, हे वाड्यातल्या काकवा-मावशांना आधी कळायचं आणि कित्येक वर्षांनी मग त्या बहिणीच्या धाकट्या भावाला! तीच गोष्ट भाऊरायाच्या वयात येण्याचीही! ते तर जणू सगळ्यांनी गृहीतच धरलेलं असायचं. सार्वजनिक बागांचे आडोसे आणि समुद्रकिनारे यांना अदृश्य भिंती बांधून, आमच्यातल्या कित्येक पिढ्यांनी आपलं पहिलंवहिलं चुंबन घेतलं! इराण्याच्या हॉटेलांतल्या खासगी रूमसाठी नंबर लागायचे. तिथं प्रेयसीला घेऊन अर्धा तास बसता आलं, तरी स्वर्गसुख अशी अवस्था होती. 
या सार्वजनिकपणाचे फायदे होते, तसे तोटेही होतेच. म्हणजे घरात कुणी आजारी पडलं, तर त्याला दवाखान्यात नेण्यापासून घरी डबे देण्यापर्यंत सगळी मदत शेजारीपाजारी करीत. कुणी गेलं, तर सगळं उत्तरकार्य हेच लोक पार पाडीत. हे नक्कीच फायदे होते. पण कुठल्याही व्यक्तिविशेषाला स्वतःचं असं काही मत किंवा खासगीपण नसे. एखादा मुलगा दहावी झाला, की त्यानं पुढं काय करायचं हे आधी तो सोडून त्याच्या घरातले सर्व आणि मग शेजारचे काका, पलीकडचे भाऊ आदी मंडळी ठरवीत. तीच गोष्ट मुलींचीही! ती जरा वयात येण्याचा अवकाश, शेजारपाजारची अदृश्य 'वधूवर सूचक मंडळं' अचानक कार्यान्वित होत आणि त्या मुलीची इच्छा काय, तिला पुढं शिकायचंय की नाही याचा कुठलाही विचार न करता, 'चांगलं स्थळ मिळतंय तर घे बाई पदरात पाडून,' म्हणत तिला बोहोल्यावर चढवलं जाई. अशी कित्येक वर्षं गेली. काळ बदलला. लोकांचं जगणं बदलू लागलं. पुढच्या पिढ्यांनी आपलं गाव, शहर, राज्य, देश सोडून दुसरीकडं जाण्याचं धैर्य दाखवलं (की कदाचित या अतिसार्वजनिकपणाला कंटाळून पहिली संधी मिळताच त्यांनी त्याचा त्याग केला?) आणि त्यांच्याकडं मग पैसा खेळू लागला. पैसा मिळाला, तशी त्यांच्याकडं ऐहिक सुखसाधनांची रेलचेल झाली. आता खासगीपणा परवडू शकेल, अशी स्थिती आली.
आता महानगरांतल्या सामाजिक स्थितीनं एकदम १८० अंशांचं वळण घेतलं. खासगीपणाचं महत्त्व सगळ्यांच्या हळूहळू ध्यानी येऊ लागलं. त्याचा पहिला फटका एकत्र कुटुंबव्यवस्थेला बसला. घरं वेगळी झाली. संसार फुटले. 'न्यूक्लिअर फॅमिली' जन्माला आली. पती-पत्नीला हक्काचा एकांत आणि 'खासगीपणा' मिळू लागला. खासगीपणाचा एक फायदा असा, की माणूस स्वतः विचार करायला लागतो. दुसऱ्याच्या डोक्यानं आयुष्य घालवायची सवय लागलेल्या एका पिढीला हा खासगीपणा काही मानवेना. मग त्यांची द्विधा अवस्था झाली. एकत्र कुटुंबपद्धती नष्ट झाल्याबद्दल सर्वाधिक गळे काढले ते याच पिढीनं. त्यांची पुढची पिढी (म्हणजे जे आत्ता साधारण चाळिशीत आहेत असे सगळे) मात्र लहानपणापासून या खासगीपणाचा फायदा घेतच वाढली. त्यामुळं या पिढीला खासगीपणाचं, स्वतःच्या आणि इतरांच्या 'स्पेस'चं महत्त्व चांगलंच कळत होतं. त्याच वेळी या काळापर्यंत एकत्र कुटुंबवाली सगळीच पिढी नष्टही झाली नव्हती. विशेषतः छोट्या गावांत, मध्यम शहरांत ती बऱ्यापैकी अस्तित्वात होती. त्यामुळं या पिढीनं या दोन्ही प्रकारांचा अनुभव घेतला. दोन्हीतल्या बरे-वाईट गोष्टी सोसल्या. त्यामुळं माझ्यासारख्याच्या पिढीला या दोन्ही गोष्टींतला समन्वय साधता येतो आणि त्याचा आनंद आहे. आम्ही काही प्रसंगी पुरते सार्वजनिक असतो आणि त्याच वेळी काही प्रसंगी अत्यंत खासगीही असतो. दुसऱ्याचंही आयुष्य असंच असू शकेल, याची आम्हाला कल्पना आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. 
पुढं काळ आणखी बदलला आणि ही पिढीही पालकांच्या भूमिकेत आली. त्यांची मुलं एकविसाव्या शतकात जन्मलेली आणि फारच आधुनिकोत्तर काळातली. तोपर्यंत या पिढीनं जागतिकीकरणाचे सर्व फायदे उपभोगून (अर्थात त्यासाठी भरपूर कष्टही उपसून) आपली जीवनशैली जवळपास जागतिक स्तरावर नेऊन ठेवली होती. नेमका हाच काळ होता दळणवळण तंत्रज्ञानातील क्रांतीचा. डेस्कटॉपवरील ई-मेलरूपी इंटरनेट वापरापासून सुरू झालेला हा प्रवास अवघ्या दहा-पंधरा वर्षांत स्मार्टफोनपर्यंत येऊन पोचला. जग लहान झालं... 'ग्लोबल व्हिलेज' झालं. सोशल मीडिया उपलब्ध झाला. गेल्या पाच-सात वर्षांत फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर आदी साधनांमुळं तर माणसांना कथित सोशल नेटवर्किंगचं व्यसनच जडलं. नुकतं नुकतं खासगीपणाचं महत्त्व ओळखलेली आमची पिढी पुन्हा 'सार्वजनिक' होऊ लागली. यातली विसंगती अशी, की जिवंत माणसांबरोबरचे संवाद खुंटले आणि आभासी जगाशी आभासीच 'संवाद' सुरू झाला. हा संवाद एकतर्फी होता, आपल्याला हवा तसा होता. त्यामुळं त्याचं व्यसन सुटणं अवघड झालं. एकीकडं प्रचंड खासगीपणा जपताना दुसरीकडं या सोशल मीडियाच्या अटी व शर्ती (न पाहताच) मान्य करून, आपली सर्व खासगी माहिती सहज त्याच्याकडं सुपूर्द करून टाकली. आता 'गुगल' मला उठता-बसता सांगू लागलं, की तुझ्या ऑफिसची वेळ झाली; उठ. इकडून जा, तिकडे गर्दी आहे! काल त्या तमक्या रेस्टॉरंटला कॉफी प्यायलास! कशी वाटली सांग... आज हे दुसरं तसंच रेस्टॉरंट ट्राय करतोस का? परवा त्या ढमक्या कंपनीचा शर्ट घेतलास म्हणे. आम्ही सांगतो, आज या या मॉलमध्ये जा... तिथं 'सेल' लावलाय तुझ्यासाठी... आज ऑफिसला जाणार नाहीयेस का? मग तुझ्या घराजवळ हे मल्टिप्लेक्स आहे. तिथं साडेबाराचा शो बघतोस का? तुला दोन तिकिटं सवलतीत मिळतील बघ. ती अमुक तमुक तुझ्या पोस्टवर सारखी कमेंट करीत असते. तिला हे हे आवडतं... तिचा वाढदिवस जवळ आलाय. बघ, हे घेतोस का तिच्यासाठी? इव्हेंट क्रिएट करतोस का? की आम्ही करून देऊ? मागच्या वर्षी तू या वेळी पावसाळी ट्रेकला गेला होतास... यंदा नाही जात आहेस? हा हा ट्रेक आहे बघ या वीकएंडला... बघ जातोस का?....
एक ना दोन... अहो, आम्ही आमचं सगळं आयुष्यच या 'गुगल महाराजां'च्या हवाली करून टाकलंय. तिकडं अमेरिकेत बसून हे महाशय आमचा सगळा डेटा प्रोसेस करतात. आम्ही काय करतो, काय खातो, काय पितो, कुठं जातो, कुणाबरोबर जातो, किती वेळा जातो याचा सगळा हिशेब ठेवतात. दुसरीकडं आमच्या मायबाप सरकारनं त्या आधार कार्डावर आमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन ठेवलेयत. त्या फुकटात सिमकार्ड वाटणाऱ्या कंपनीच्या मोहात अडकून आम्ही त्यांचं कार्डही घेतलंय. वर त्यांचं अॅप डाउनलोड केलंय. त्यांच्या सर्व अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. फुकट इंटरनेट डेटा मिळविण्याच्या बदल्यात आम्ही आमचं आख्खं आयुष्यच त्यांच्या हवाली केलंय... 
आता सांगा, आम्ही पूर्वी अधिक खासगी होतो की आत्ता? काहीच कळत नाहीय...
पण म्हणूनच एक गोष्ट नक्की, खासगीपणा आणि आपली 'स्पेस' ही आपल्या या देशात आजही तशी फार महागाची गोष्ट आहे. 
---

(मटा, पुणे आवृत्तीत २७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
----

17 Aug 2017

मला काहीच प्रॉब्लेम नाही - रिव्ह्यू

होय, मला प्रॉब्लेम आहे!
--------------------------

समीर विद्वांस या दिग्दर्शकाचं काम मला आवडतं. त्याचे 'डबलसीट' आणि 'वायझेड' हे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. त्याचा यंदा आलेला सिनेमा आहे 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' महानगरी तरुण दाम्पत्याचा उभा छेद घेणारा हा चित्रपट असून, तो त्यानं अत्यंत सहज-सोप्या, सुंदर रीतीनं हाताळला आहे. सुखासीन आयुष्यातूनही माणसाला हवं असलेलं सुख मिळतंच असं नाही; त्यासाठी पैशांव्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते, असा म्हटलं तर बाळबोध, म्हटलं तर आत्ताच्या काळाला अनुसरून अगदी योग्य असा संदेश हा सिनेमा आपल्याला देतो. सिनेमात काही त्रुटीही आहेत. पण त्यांच्याकडं थोडं दुर्लक्ष करून पाहता येईल, अशी ही कलाकृती आहे. प्रमुख जोडीचा उत्तम अभिनय, चांगलं संगीत, चांगली गाणी आणि जोडीला चांगलं चित्रिकरण यामुळं हा सिनेमा पाहणं सुखावह ठरतं.
केतकी (स्पृहा जोशी) आणि अजय (गश्मीर महाजनी) या जोडीची ही गोष्ट आहे. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलेलं हे जोडपं. लग्नानंतर सात वर्षांनी आपली गोष्ट सुरू होते. या काळात या दोघांना एक छान मुलगा झाला आहे. पण मुंबईतल्या अत्यंत बिझी लाइफस्टाइलमध्ये हे दोघे हरवून गेले आहेत. केतकीच्या शब्दांत सांगायचं, तर त्यांचं आयुष्य 'ऑटो पायलट' मोडवर टाकल्यासारखं सुरू आहे. तिला हे अजिबात मान्य नाही. मुलाच्या शाळेत मीटिंगला यायला अजयला वेळ नसणं, रोज उशिरा घरी येऊन मद्यपान करणं इथपासून सेक्स लाइफमधल्या कंटाळ्यापर्यंत केतकीला अनेक गोष्टींत प्रॉब्लेम आहेत. आपण उगाच एकमेकांसोबत राहतोय की काय, असंही तिला वाटत राहतं. तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच डॉमिनेटिंग आहे आणि ते तिलाही माहिती आहे. अजयला अनेकदा काही तरी बोलायचं असतं, पण तेही तो बोलू शकत नाही, हेही तिला माहिती आहे. त्याच्या या स्वभावामुळं त्यांच्यातला पेच आणखीनच वाढत चाललाय. दोघांच्याही एका जीवलग मित्राची मदत अजय घेऊ पाहतो. तेही केतकीला भयंकर खटकतं. आता या दोघांचं नातं तुटणार असं आपल्यालाही वाटत असतं... त्याच वेळी घराची बेल वाजते. अजयचे आई-वडील, भाऊ-वहिनी वगैरे नातेवाइक नागपूरवरून थेट त्याच्या घरात अचानक टपकतात. (ते असे कसे काय अचानक येतात, असा प्रश्न आपल्यालाही पडतो. पण त्याचं उत्तर नंतर मिळतं.) त्यांच्या येण्यामुळं घरातलं वादळ तात्पुरतं तरी शांत होतं. यानंतर अजयची आई (निर्मिती सावंत) आता केतकीच्या आई-वडिलांची माफी मागायला आपल्याला कोकणात त्यांच्या घरी जायचंय, असं जाहीर करते.
मध्यंतरानंतरचा सगळा चित्रपट मग अर्थातच कोकणात, केतकीच्या घरी घडतो. नागपूरचं कुटुंब कोकणात आल्यानंतर जे काही प्रादेशिक वाद-विसंवादाचे प्रसंग घडतात, तेच इथेही घडतात. त्यातून मग या दोघांच्या नात्याचं पुढं काय होतं, याची ही गोष्ट आहे.

समीर विद्वांसचे सिनेमे लखलखीत असतात. त्याची पात्रं आजच्या काळातली असतात, आजच्या पिढीची भाषा बोलतात, ती आपल्या आजूबाजूला सतत दिसत असतात... त्यामुळं समीरच्या सिनेमांविषयी मनात एक नकळत जिव्हाळा उत्पन्न होतो. त्यानं या सिनेमात रंगवलेल्या जोडप्याशी आजच्या काळातली अनेक जोडपी शंभर टक्के स्वतःला 'रिलेट' करू शकतील. किंबहुना ही आपलीच गोष्ट सांगितली जात आहे, असंही त्यांना वाटेल. या सिनेमात पूर्वार्धात त्यानं या दाम्पत्याच्या जगण्यातला ताण अत्यंत प्रभावीपणे दाखविला आहे. त्यासाठी त्यानं वापरलेलं नेपथ्य, चित्रचौकटी पाहण्यासारख्या आहेत. अप्पर वरळीसारख्या अपमार्केट भागातील टोलेजंग इमारतीत २३ व्या मजल्यावर त्यांचा भलामोठा फ्लॅट असणं, त्यात फ्लॅटमध्ये तीनच माणसं असणं (त्या फ्लॅटमधला दालीचा फोटो लक्षणीय!), याशिवाय हे दोघंही बोलत असताना त्या चौकटीत सतत पार्श्वभूमीवर दिसत राहणारी मुंबईची स्कायलाइन यातून 'गर्दीतले एकटे' अशी त्या दोघांची झालेली स्थिती दिग्दर्शक फार नेमकेपणानं दाखवतो. दोघांमधल्या स्वभावातला फरक, परिस्थितीवर दोघांचं वेगवेगळं रिअॅक्ट होणं हे स्पृहा आणि गश्मीरनं फार छान दाखवलंय. या दोघांमधले ताण-तणाव हल्लीच्या काळातली जवळपास सगळेच जोडपी सहन करीत असल्यानं ते समजून घेणं प्रेक्षकांना सोपं जात असावं. विशेषतः केतकीला या नात्याविषयी नक्की काय वाटतंय ते खूप महत्त्वाचं आहे. ते केतकी नीट सांगू शकते आहे आणि आपणही तिची भूमिका, तिचं मत समजून घेऊ शकतो, हे दिग्दर्शकाचं यश आहे. 
सिनेमा मध्यंतरानंतर एकदम कोकणातल्या केतकीच्या घरी शिफ्ट होतो. यामुळं सिनेमाचे रचनात्मकदृष्ट्या सरळसरळ दोन भाग पडतात. पहिल्या भागात दोनच पात्रांचा जास्तीत जास्त वावर आणि उत्तरार्धात पात्रांची गर्दीच गर्दी असं झाल्यानं हा उत्तरार्ध एकदम अंगावर येतो आणि पूर्वार्धाशी मिसळून न आल्यासारखा वाटतो. अर्थात दिग्दर्शक लवकरच सर्व गोष्टी सुविहितपणे घडवतो आणि सिनेमा पूर्ण विस्कळित होण्यापासून वाचतो. या भागात केतकी आणि अजयच्या जवळच्या नातेवाइकांच्या नात्यांतील ताणही दिग्दर्शक दाखवू इच्छितो. यात केतकीची विधवा आत्या आणि अजयचा मोठा भाऊ व वहिनी यांचे समांतर उपकथानक थोडक्यात येतं. केतकी आणि अजयचे आई-वडील मान-पानासकट सर्व काही विधी, शांत वगैरे रीतसर करू पाहतात, तेव्हा केतकीचा असल्या कर्मकांडांवर नसलेला विश्वास आणि घरच्यांचं ऐकायचं की केतकीचं या द्विधा अवस्थेत सापडलेला अजय यांचं वेगळंच द्वंद्व समोर येतं. यातही पाळीच्या प्रसंगावरून आणि आत्याला ओवाळण्यासाठी न बोलावण्यावरून केतकीची आणखी चिडचीड होते आणि अजयची गोची आणखी वाढते... अजयचे वडील आणि त्याच्या नात्याचाही एक धागा समोर येतो आणि अखेर अजय जेव्हा त्यांना सडेतोडपणे काही सुनावतो, तेव्हा केतकीलाही आपला नवरा असं बोलू शकतो, याची जाणीव होते...
अखेर नात्यांच्या या प्रॉब्लेमचा गुंता सकारात्मक नोटवरच सुटतो... मुळात आपल्यासमोर भरपूर प्रॉब्लेम असताना आपण 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असं सतत म्हणत, त्या प्रॉब्लेमपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याऐवजी केतकीसारखं त्या प्रॉब्लेमच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याचं अस्तित्व मान्य केलं, तर बरेच प्रॉब्लेम सहजी सुटण्यास मदत होते, असं काहीसं समीर विद्वांस आपल्याला या कलाकृतीच्या माध्यमातून सांगू पाहतो. त्यापैकी बरेचसे मुद्दे आपल्याला पटतात. कौस्तुभ सावरकर यांचे संवाद झक्कास जमलेले!
सिनेमात चार गाणी आहेत. ती चांगली जमली आहेत. ्याचं श्रेय संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज आणि गीतकार वैभव जोशी व गुरू ठाकूर यांचं. त्यातलं वैभव जोशींचं 'मौनातुनी ही वाट चालली पुढे पुढे' हे खास आहे. प्रसाद भेंडे यांची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. कोकणाचं दर्शन सुखद. मुख्य रोलमध्ये स्पृहा आणि गश्मीरनं चांगली कामं केलीयत. निर्मिती सावंत, सतीश आळेकर, मंगल केंकरे, सीमा देशमुख, विजय निकम, विनोद लव्हेकर यांनीही आपापली कामं चोख बजावली आहेत. त्यामुळं सिनेमा कुठंही कंटाळवाणा होत नाही. 

तेव्हा एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पाहायला हरकत नाही.
---
दर्जा - साडेतीन स्टार
---