17 Aug 2017

मला काहीच प्रॉब्लेम नाही - रिव्ह्यू

होय, मला प्रॉब्लेम आहे!
--------------------------

समीर विद्वांस या दिग्दर्शकाचं काम मला आवडतं. त्याचे 'डबलसीट' आणि 'वायझेड' हे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. त्याचा यंदा आलेला सिनेमा आहे 'मला काहीच प्रॉब्लेम नाही!' महानगरी तरुण दाम्पत्याचा उभा छेद घेणारा हा चित्रपट असून, तो त्यानं अत्यंत सहज-सोप्या, सुंदर रीतीनं हाताळला आहे. सुखासीन आयुष्यातूनही माणसाला हवं असलेलं सुख मिळतंच असं नाही; त्यासाठी पैशांव्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते, असा म्हटलं तर बाळबोध, म्हटलं तर आत्ताच्या काळाला अनुसरून अगदी योग्य असा संदेश हा सिनेमा आपल्याला देतो. सिनेमात काही त्रुटीही आहेत. पण त्यांच्याकडं थोडं दुर्लक्ष करून पाहता येईल, अशी ही कलाकृती आहे. प्रमुख जोडीचा उत्तम अभिनय, चांगलं संगीत, चांगली गाणी आणि जोडीला चांगलं चित्रिकरण यामुळं हा सिनेमा पाहणं सुखावह ठरतं.
केतकी (स्पृहा जोशी) आणि अजय (गश्मीर महाजनी) या जोडीची ही गोष्ट आहे. घरच्यांचा विरोध पत्करून लग्न केलेलं हे जोडपं. लग्नानंतर सात वर्षांनी आपली गोष्ट सुरू होते. या काळात या दोघांना एक छान मुलगा झाला आहे. पण मुंबईतल्या अत्यंत बिझी लाइफस्टाइलमध्ये हे दोघे हरवून गेले आहेत. केतकीच्या शब्दांत सांगायचं, तर त्यांचं आयुष्य 'ऑटो पायलट' मोडवर टाकल्यासारखं सुरू आहे. तिला हे अजिबात मान्य नाही. मुलाच्या शाळेत मीटिंगला यायला अजयला वेळ नसणं, रोज उशिरा घरी येऊन मद्यपान करणं इथपासून सेक्स लाइफमधल्या कंटाळ्यापर्यंत केतकीला अनेक गोष्टींत प्रॉब्लेम आहेत. आपण उगाच एकमेकांसोबत राहतोय की काय, असंही तिला वाटत राहतं. तिचा स्वभाव सुरुवातीपासूनच डॉमिनेटिंग आहे आणि ते तिलाही माहिती आहे. अजयला अनेकदा काही तरी बोलायचं असतं, पण तेही तो बोलू शकत नाही, हेही तिला माहिती आहे. त्याच्या या स्वभावामुळं त्यांच्यातला पेच आणखीनच वाढत चाललाय. दोघांच्याही एका जीवलग मित्राची मदत अजय घेऊ पाहतो. तेही केतकीला भयंकर खटकतं. आता या दोघांचं नातं तुटणार असं आपल्यालाही वाटत असतं... त्याच वेळी घराची बेल वाजते. अजयचे आई-वडील, भाऊ-वहिनी वगैरे नातेवाइक नागपूरवरून थेट त्याच्या घरात अचानक टपकतात. (ते असे कसे काय अचानक येतात, असा प्रश्न आपल्यालाही पडतो. पण त्याचं उत्तर नंतर मिळतं.) त्यांच्या येण्यामुळं घरातलं वादळ तात्पुरतं तरी शांत होतं. यानंतर अजयची आई (निर्मिती सावंत) आता केतकीच्या आई-वडिलांची माफी मागायला आपल्याला कोकणात त्यांच्या घरी जायचंय, असं जाहीर करते.
मध्यंतरानंतरचा सगळा चित्रपट मग अर्थातच कोकणात, केतकीच्या घरी घडतो. नागपूरचं कुटुंब कोकणात आल्यानंतर जे काही प्रादेशिक वाद-विसंवादाचे प्रसंग घडतात, तेच इथेही घडतात. त्यातून मग या दोघांच्या नात्याचं पुढं काय होतं, याची ही गोष्ट आहे.

समीर विद्वांसचे सिनेमे लखलखीत असतात. त्याची पात्रं आजच्या काळातली असतात, आजच्या पिढीची भाषा बोलतात, ती आपल्या आजूबाजूला सतत दिसत असतात... त्यामुळं समीरच्या सिनेमांविषयी मनात एक नकळत जिव्हाळा उत्पन्न होतो. त्यानं या सिनेमात रंगवलेल्या जोडप्याशी आजच्या काळातली अनेक जोडपी शंभर टक्के स्वतःला 'रिलेट' करू शकतील. किंबहुना ही आपलीच गोष्ट सांगितली जात आहे, असंही त्यांना वाटेल. या सिनेमात पूर्वार्धात त्यानं या दाम्पत्याच्या जगण्यातला ताण अत्यंत प्रभावीपणे दाखविला आहे. त्यासाठी त्यानं वापरलेलं नेपथ्य, चित्रचौकटी पाहण्यासारख्या आहेत. अप्पर वरळीसारख्या अपमार्केट भागातील टोलेजंग इमारतीत २३ व्या मजल्यावर त्यांचा भलामोठा फ्लॅट असणं, त्यात फ्लॅटमध्ये तीनच माणसं असणं (त्या फ्लॅटमधला दालीचा फोटो लक्षणीय!), याशिवाय हे दोघंही बोलत असताना त्या चौकटीत सतत पार्श्वभूमीवर दिसत राहणारी मुंबईची स्कायलाइन यातून 'गर्दीतले एकटे' अशी त्या दोघांची झालेली स्थिती दिग्दर्शक फार नेमकेपणानं दाखवतो. दोघांमधल्या स्वभावातला फरक, परिस्थितीवर दोघांचं वेगवेगळं रिअॅक्ट होणं हे स्पृहा आणि गश्मीरनं फार छान दाखवलंय. या दोघांमधले ताण-तणाव हल्लीच्या काळातली जवळपास सगळेच जोडपी सहन करीत असल्यानं ते समजून घेणं प्रेक्षकांना सोपं जात असावं. विशेषतः केतकीला या नात्याविषयी नक्की काय वाटतंय ते खूप महत्त्वाचं आहे. ते केतकी नीट सांगू शकते आहे आणि आपणही तिची भूमिका, तिचं मत समजून घेऊ शकतो, हे दिग्दर्शकाचं यश आहे. 
सिनेमा मध्यंतरानंतर एकदम कोकणातल्या केतकीच्या घरी शिफ्ट होतो. यामुळं सिनेमाचे रचनात्मकदृष्ट्या सरळसरळ दोन भाग पडतात. पहिल्या भागात दोनच पात्रांचा जास्तीत जास्त वावर आणि उत्तरार्धात पात्रांची गर्दीच गर्दी असं झाल्यानं हा उत्तरार्ध एकदम अंगावर येतो आणि पूर्वार्धाशी मिसळून न आल्यासारखा वाटतो. अर्थात दिग्दर्शक लवकरच सर्व गोष्टी सुविहितपणे घडवतो आणि सिनेमा पूर्ण विस्कळित होण्यापासून वाचतो. या भागात केतकी आणि अजयच्या जवळच्या नातेवाइकांच्या नात्यांतील ताणही दिग्दर्शक दाखवू इच्छितो. यात केतकीची विधवा आत्या आणि अजयचा मोठा भाऊ व वहिनी यांचे समांतर उपकथानक थोडक्यात येतं. केतकी आणि अजयचे आई-वडील मान-पानासकट सर्व काही विधी, शांत वगैरे रीतसर करू पाहतात, तेव्हा केतकीचा असल्या कर्मकांडांवर नसलेला विश्वास आणि घरच्यांचं ऐकायचं की केतकीचं या द्विधा अवस्थेत सापडलेला अजय यांचं वेगळंच द्वंद्व समोर येतं. यातही पाळीच्या प्रसंगावरून आणि आत्याला ओवाळण्यासाठी न बोलावण्यावरून केतकीची आणखी चिडचीड होते आणि अजयची गोची आणखी वाढते... अजयचे वडील आणि त्याच्या नात्याचाही एक धागा समोर येतो आणि अखेर अजय जेव्हा त्यांना सडेतोडपणे काही सुनावतो, तेव्हा केतकीलाही आपला नवरा असं बोलू शकतो, याची जाणीव होते...
अखेर नात्यांच्या या प्रॉब्लेमचा गुंता सकारात्मक नोटवरच सुटतो... मुळात आपल्यासमोर भरपूर प्रॉब्लेम असताना आपण 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' असं सतत म्हणत, त्या प्रॉब्लेमपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याऐवजी केतकीसारखं त्या प्रॉब्लेमच्या डोळ्याला डोळा भिडवून त्याचं अस्तित्व मान्य केलं, तर बरेच प्रॉब्लेम सहजी सुटण्यास मदत होते, असं काहीसं समीर विद्वांस आपल्याला या कलाकृतीच्या माध्यमातून सांगू पाहतो. त्यापैकी बरेचसे मुद्दे आपल्याला पटतात. कौस्तुभ सावरकर यांचे संवाद झक्कास जमलेले!
सिनेमात चार गाणी आहेत. ती चांगली जमली आहेत. ्याचं श्रेय संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज आणि गीतकार वैभव जोशी व गुरू ठाकूर यांचं. त्यातलं वैभव जोशींचं 'मौनातुनी ही वाट चालली पुढे पुढे' हे खास आहे. प्रसाद भेंडे यांची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे. कोकणाचं दर्शन सुखद. मुख्य रोलमध्ये स्पृहा आणि गश्मीरनं चांगली कामं केलीयत. निर्मिती सावंत, सतीश आळेकर, मंगल केंकरे, सीमा देशमुख, विजय निकम, विनोद लव्हेकर यांनीही आपापली कामं चोख बजावली आहेत. त्यामुळं सिनेमा कुठंही कंटाळवाणा होत नाही. 

तेव्हा एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पाहायला हरकत नाही.
---
दर्जा - साडेतीन स्टार
---

No comments:

Post a Comment