27 Aug 2017

मटामधील लेख - खासगी आणि सार्वजनिक

खासगी आणि सार्वजनिक 
------------------------
आपण भारतीय लोक तसे बऱ्यापैकी सार्वजनिक आहोत. सार्वजनिक व्हायला, वागायला, बोलायला आपल्याला आवडते. आपली उत्सवप्रियता हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. जन्माला आल्यापासून हॉस्पिटलात सगळ्या नातेवाइकांचा लोंढा आपल्याला भेटायला येतो, तिथपासून ते परलोकीचा प्रवास सुरू होताना सगळे खांद्यावर नेतात तिथपर्यंत आपल्या जगण्यातला कुठलाच क्षण तसा खासगी नसतो. बारशापासून ते लग्नापर्यंत प्रत्येक कार्याला सगळा कुटुंबकबिला हजर पाहिजेच. लहान मूल असल्यापासून ते लग्न होऊन आपल्याला मूल झालं तरी आपल्याला सल्ले देणारे थोर लोक आपल्या आजूबाजूला कायम हजर असतातच. त्यातच आपण मध्यमवर्गीय लोक राहतो त्या चाळी, गावातली घरं, गल्ल्या, वाडे आणि अगदी शहरातल्या सोसायट्या यातल्या खासगीपणाविषयी काय बोलावे? शेजाऱ्याचा संसार आपलाच आहे, असं समजून त्याला प्रेमानं सल्ला देणारे शेजारी आपल्या इथं काही कमी नाहीत. 'आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून' ही आपली लाडकी वृत्ती... अन् कुठलंही गॉसिप ही तर आपली राष्ट्रीय आवड! त्यातल्या त्यात लग्नानंतर हनीमूनला सोबतीला चार नातेवाइक येत नाहीत, एवढाच काय तो दिलासा...
अशा या आपल्या अतिसार्वजनिक देशात सर्वोच्च न्यायालयानं नुकताच 'खासगीपणा (मराठीत प्रायव्हसी) हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे,' असा निकाल दिल्यानंतर तर आम्हास हसूच आवरेना. आम्ही आमचा खासगीपणा आम जनतेला केव्हाच आंदण दिलाय, हे कोण सांगणार यांना? गमतीचा भाग बाजूला ठेवला, तरी मुळात खासगीपणा ही तशी महाग चीज आहे. ती आमच्या इथं अनेकांना परवडतच नाही, हे दारूण वास्तव लक्षात घ्यायला हवं. 
एक काळ असा होता, की आपलं सगळंच जगणं सार्वजनिक होतं..! विशेषतः ज्यांचं लहानपण वाड्यातल्या दहा बाय दहाच्या खोलीत गेलंय अशा पिढीला हे अगदी पटेल... जिथं मुलग्यांना आंघोळीला सार्वजनिक नळ अन् मुलींना खोलीतली कोपऱ्यातली मोरी; जिथं सकाळी कोण किती वाजता 'मागे' जातो याची सर्वांना खबर, तिथं कसलं आलंय खासगी आयुष्य? आज कोणाकडं जेवायला काय बेत आहे, ते कोणाच्या घरी काय 'अडचण' आहे हे सगळंच सगळ्यांना ठाऊक असे. महानगरांतल्या चाळींत तर याहून भयानक परिस्थिती... पती-पत्नीला एकत्र यायचं तर घरातल्या सर्वांनी ठरवून बाहेर जेवायला किंवा फिरायला जायचं... आणि तासाभरात परत येऊन सगळ्यांनी एकाच अंथरूणावर पडायचं... घरातली तरुण बहीण ऋतुमती झाली, हे वाड्यातल्या काकवा-मावशांना आधी कळायचं आणि कित्येक वर्षांनी मग त्या बहिणीच्या धाकट्या भावाला! तीच गोष्ट भाऊरायाच्या वयात येण्याचीही! ते तर जणू सगळ्यांनी गृहीतच धरलेलं असायचं. सार्वजनिक बागांचे आडोसे आणि समुद्रकिनारे यांना अदृश्य भिंती बांधून, आमच्यातल्या कित्येक पिढ्यांनी आपलं पहिलंवहिलं चुंबन घेतलं! इराण्याच्या हॉटेलांतल्या खासगी रूमसाठी नंबर लागायचे. तिथं प्रेयसीला घेऊन अर्धा तास बसता आलं, तरी स्वर्गसुख अशी अवस्था होती. 
या सार्वजनिकपणाचे फायदे होते, तसे तोटेही होतेच. म्हणजे घरात कुणी आजारी पडलं, तर त्याला दवाखान्यात नेण्यापासून घरी डबे देण्यापर्यंत सगळी मदत शेजारीपाजारी करीत. कुणी गेलं, तर सगळं उत्तरकार्य हेच लोक पार पाडीत. हे नक्कीच फायदे होते. पण कुठल्याही व्यक्तिविशेषाला स्वतःचं असं काही मत किंवा खासगीपण नसे. एखादा मुलगा दहावी झाला, की त्यानं पुढं काय करायचं हे आधी तो सोडून त्याच्या घरातले सर्व आणि मग शेजारचे काका, पलीकडचे भाऊ आदी मंडळी ठरवीत. तीच गोष्ट मुलींचीही! ती जरा वयात येण्याचा अवकाश, शेजारपाजारची अदृश्य 'वधूवर सूचक मंडळं' अचानक कार्यान्वित होत आणि त्या मुलीची इच्छा काय, तिला पुढं शिकायचंय की नाही याचा कुठलाही विचार न करता, 'चांगलं स्थळ मिळतंय तर घे बाई पदरात पाडून,' म्हणत तिला बोहोल्यावर चढवलं जाई. अशी कित्येक वर्षं गेली. काळ बदलला. लोकांचं जगणं बदलू लागलं. पुढच्या पिढ्यांनी आपलं गाव, शहर, राज्य, देश सोडून दुसरीकडं जाण्याचं धैर्य दाखवलं (की कदाचित या अतिसार्वजनिकपणाला कंटाळून पहिली संधी मिळताच त्यांनी त्याचा त्याग केला?) आणि त्यांच्याकडं मग पैसा खेळू लागला. पैसा मिळाला, तशी त्यांच्याकडं ऐहिक सुखसाधनांची रेलचेल झाली. आता खासगीपणा परवडू शकेल, अशी स्थिती आली.
आता महानगरांतल्या सामाजिक स्थितीनं एकदम १८० अंशांचं वळण घेतलं. खासगीपणाचं महत्त्व सगळ्यांच्या हळूहळू ध्यानी येऊ लागलं. त्याचा पहिला फटका एकत्र कुटुंबव्यवस्थेला बसला. घरं वेगळी झाली. संसार फुटले. 'न्यूक्लिअर फॅमिली' जन्माला आली. पती-पत्नीला हक्काचा एकांत आणि 'खासगीपणा' मिळू लागला. खासगीपणाचा एक फायदा असा, की माणूस स्वतः विचार करायला लागतो. दुसऱ्याच्या डोक्यानं आयुष्य घालवायची सवय लागलेल्या एका पिढीला हा खासगीपणा काही मानवेना. मग त्यांची द्विधा अवस्था झाली. एकत्र कुटुंबपद्धती नष्ट झाल्याबद्दल सर्वाधिक गळे काढले ते याच पिढीनं. त्यांची पुढची पिढी (म्हणजे जे आत्ता साधारण चाळिशीत आहेत असे सगळे) मात्र लहानपणापासून या खासगीपणाचा फायदा घेतच वाढली. त्यामुळं या पिढीला खासगीपणाचं, स्वतःच्या आणि इतरांच्या 'स्पेस'चं महत्त्व चांगलंच कळत होतं. त्याच वेळी या काळापर्यंत एकत्र कुटुंबवाली सगळीच पिढी नष्टही झाली नव्हती. विशेषतः छोट्या गावांत, मध्यम शहरांत ती बऱ्यापैकी अस्तित्वात होती. त्यामुळं या पिढीनं या दोन्ही प्रकारांचा अनुभव घेतला. दोन्हीतल्या बरे-वाईट गोष्टी सोसल्या. त्यामुळं माझ्यासारख्याच्या पिढीला या दोन्ही गोष्टींतला समन्वय साधता येतो आणि त्याचा आनंद आहे. आम्ही काही प्रसंगी पुरते सार्वजनिक असतो आणि त्याच वेळी काही प्रसंगी अत्यंत खासगीही असतो. दुसऱ्याचंही आयुष्य असंच असू शकेल, याची आम्हाला कल्पना आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. 
पुढं काळ आणखी बदलला आणि ही पिढीही पालकांच्या भूमिकेत आली. त्यांची मुलं एकविसाव्या शतकात जन्मलेली आणि फारच आधुनिकोत्तर काळातली. तोपर्यंत या पिढीनं जागतिकीकरणाचे सर्व फायदे उपभोगून (अर्थात त्यासाठी भरपूर कष्टही उपसून) आपली जीवनशैली जवळपास जागतिक स्तरावर नेऊन ठेवली होती. नेमका हाच काळ होता दळणवळण तंत्रज्ञानातील क्रांतीचा. डेस्कटॉपवरील ई-मेलरूपी इंटरनेट वापरापासून सुरू झालेला हा प्रवास अवघ्या दहा-पंधरा वर्षांत स्मार्टफोनपर्यंत येऊन पोचला. जग लहान झालं... 'ग्लोबल व्हिलेज' झालं. सोशल मीडिया उपलब्ध झाला. गेल्या पाच-सात वर्षांत फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, मेसेंजर आदी साधनांमुळं तर माणसांना कथित सोशल नेटवर्किंगचं व्यसनच जडलं. नुकतं नुकतं खासगीपणाचं महत्त्व ओळखलेली आमची पिढी पुन्हा 'सार्वजनिक' होऊ लागली. यातली विसंगती अशी, की जिवंत माणसांबरोबरचे संवाद खुंटले आणि आभासी जगाशी आभासीच 'संवाद' सुरू झाला. हा संवाद एकतर्फी होता, आपल्याला हवा तसा होता. त्यामुळं त्याचं व्यसन सुटणं अवघड झालं. एकीकडं प्रचंड खासगीपणा जपताना दुसरीकडं या सोशल मीडियाच्या अटी व शर्ती (न पाहताच) मान्य करून, आपली सर्व खासगी माहिती सहज त्याच्याकडं सुपूर्द करून टाकली. आता 'गुगल' मला उठता-बसता सांगू लागलं, की तुझ्या ऑफिसची वेळ झाली; उठ. इकडून जा, तिकडे गर्दी आहे! काल त्या तमक्या रेस्टॉरंटला कॉफी प्यायलास! कशी वाटली सांग... आज हे दुसरं तसंच रेस्टॉरंट ट्राय करतोस का? परवा त्या ढमक्या कंपनीचा शर्ट घेतलास म्हणे. आम्ही सांगतो, आज या या मॉलमध्ये जा... तिथं 'सेल' लावलाय तुझ्यासाठी... आज ऑफिसला जाणार नाहीयेस का? मग तुझ्या घराजवळ हे मल्टिप्लेक्स आहे. तिथं साडेबाराचा शो बघतोस का? तुला दोन तिकिटं सवलतीत मिळतील बघ. ती अमुक तमुक तुझ्या पोस्टवर सारखी कमेंट करीत असते. तिला हे हे आवडतं... तिचा वाढदिवस जवळ आलाय. बघ, हे घेतोस का तिच्यासाठी? इव्हेंट क्रिएट करतोस का? की आम्ही करून देऊ? मागच्या वर्षी तू या वेळी पावसाळी ट्रेकला गेला होतास... यंदा नाही जात आहेस? हा हा ट्रेक आहे बघ या वीकएंडला... बघ जातोस का?....
एक ना दोन... अहो, आम्ही आमचं सगळं आयुष्यच या 'गुगल महाराजां'च्या हवाली करून टाकलंय. तिकडं अमेरिकेत बसून हे महाशय आमचा सगळा डेटा प्रोसेस करतात. आम्ही काय करतो, काय खातो, काय पितो, कुठं जातो, कुणाबरोबर जातो, किती वेळा जातो याचा सगळा हिशेब ठेवतात. दुसरीकडं आमच्या मायबाप सरकारनं त्या आधार कार्डावर आमच्या अंगठ्याचे ठसे घेऊन ठेवलेयत. त्या फुकटात सिमकार्ड वाटणाऱ्या कंपनीच्या मोहात अडकून आम्ही त्यांचं कार्डही घेतलंय. वर त्यांचं अॅप डाउनलोड केलंय. त्यांच्या सर्व अटी व शर्ती मान्य केल्या आहेत. फुकट इंटरनेट डेटा मिळविण्याच्या बदल्यात आम्ही आमचं आख्खं आयुष्यच त्यांच्या हवाली केलंय... 
आता सांगा, आम्ही पूर्वी अधिक खासगी होतो की आत्ता? काहीच कळत नाहीय...
पण म्हणूनच एक गोष्ट नक्की, खासगीपणा आणि आपली 'स्पेस' ही आपल्या या देशात आजही तशी फार महागाची गोष्ट आहे. 
---

(मटा, पुणे आवृत्तीत २७ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या संपादित लेखाचा मूळ तर्जुमा)
----

1 comment: