3 Mar 2018

जसपाल भट्टी विशेष

जमलेली 'भट्टी'
--------------
लहानपणी दूरदर्शन हे एकमेव चॅनेल दिसे. तेव्हा टीव्हीचं नावीन्य एवढं होतं, की अगदी सकाळी सहा वाजल्यापासून टीव्ही लावून ठेवण्यात येई. सकाळच्या वेळी असंच एकदा 'उल्टा पुल्टा' हा पाच मिनिटांचा विनोदी कार्यक्रम पाहण्यात आला. ती जसपाल भट्टींची पहिली भेट. मग रोजच हा कार्यक्रम पाहून मन प्रसन्न होऊ लागलं. सकाळी चेहऱ्यावर हास्याच्या रेषा उमटवण्याचं काम हा छोटा कार्यक्रम करीत असे. नंतर 'फ्लॉप शो' हा त्यांचा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू झाला आणि मी भट्टींचा फॅनच झालो. एवढा उत्तम विनोद, उपहास, उपरोध यांचा अचूक वापर करून निर्माण केलेला नर्मविनोद आणि मर्मभेदी आघात हे मिश्रण विलक्षण भावलं. तोवर पुलं, चिं. वि. जोशी, अत्रे यांचं बालवयातलं वाचन सुरू झालेलं असल्यानं दर्जेदार विनोद समजू लागला होता. भट्टींच्या विनोदाची जातकुळी अशीच होती. या माणसाचा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता.
पुढं या माणसाला आपण कधी भेटू आणि त्यांची आपली चांगली मैत्री होईल, असं तेव्हा कुणी सांगितलं असतं, तर मी मुळीच विश्वास ठेवला नसता. पण माझं भाग्य, की ही गोष्ट घडून आली. 
मी पुढं 'सकाळ'मध्ये रुजू झाल्यानंतर २००१ मध्ये सप्टेंबर महिन्यात तेव्हाचे संपादक अनंत दीक्षित यांनी मला बोलावून सांगितलं, की दिवाळी अंकासाठी जसपाल भट्टींची मुलाखत करायची आहे. तेव्हा तुम्ही त्यांची वेळ घ्या आणि ही मुलाखत घ्या. मला आनंद झाला. मी रीतसर भट्टींचा नंबर मिळविला आणि मुंबईला त्यांच्या ऑफिसला फोन लावला. टिटू की अशाच काहीशा नावाचे त्यांचे पीए होते. (हे पुढं चांगले ओळखीचे झाले होते.) त्यांनी 'भट्टीसाब अब चंडीगड गये है, दो दिन बाद फोन करो' असं सांगितलं. मग मी दोन दिवसांनी पुन्हा फोन केला. त्या वेळी पीएनं भट्टींनाच फोन दिला. आमचं बोलणं झालं. त्यांनी मुंबईला बोलावलं. मी ऑफिसचं काम म्हणून रीतसर ट्रेनचं बुकिंग वगैरे करून मुंबईला गेलो. लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एका फ्लॅटमध्ये भट्टींचं ऑफिस होतं आणि तिथंच राहण्याचीही सोय होती. मी मुलाखत घेतली. आता फार तपशील आठवत नाहीत. पण ते दिलखुलास बोलले. मग ती मुलाखत व्यवस्थित आमच्या दिवाळी अंकात छापून आली. ती सगळ्यांना आवडली. भट्टींनाही त्या मुलाखतीचा अंक ऑफिसकडून रीतसर गेला. त्यानंतर काही दिवस गेले. एके दिवशी भट्टींचा ऑफिसमध्ये फोन आला. (तेव्हा माझ्याकडं मोबाइल नव्हता.) ते काही कामानिमित्त पुण्यात आले होते आणि 'ब्लू डायमंड'मध्ये उतरले होते. त्यांनी मला तिथं भेटायला बोलावलं होतं. मी दुसऱ्या दिवशी तिथं एम-80 वर गेलो. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलो ते भट्टींमुळं. त्यांच्या खोलीत गेलो. तिथंच त्यांनी नाश्ता मागवला. भरपूर गप्पा झाल्या. मी त्यांना म्हटलं, की आता तुम्ही आमच्या ऑफिसला यायलाच पाहिजे. भट्टी हा राजामाणूस होता. ते लगेच तयार झाले. मी घरी परतलो. संध्याकाळी ते सांगितल्याप्रमाणे आले. मी गेटवर सांगून ठेवलं होतं. भट्टी आले आणि मी त्यांना आणायला खाली गेलो. त्यांना बघून अनेक लोक चकित झाले, तर अनेकांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. मी त्यांना संपादकांकडं घेऊन गेलो. मग मीटिंग रूममध्ये सगळ्यांबरोबर गप्पा झाल्या. भट्टींनी ‘सकाळ’ नावावरूनच एक-दोन विनोद करून सगळ्यांना हसवलं.
या मीटिंगचा परिणाम असा झाला, की भट्टी त्या वेळी 'भास्कर' दैनिकात 'उल्टा-पुल्टा' नावानं एक सदर चालवायचे, तर ते सदर 'सकाळ'मध्ये सुरू करायचं, असा निर्णय झाला. संपादकांनी त्या सदराची जबाबदारी माझ्याकडं सोपविली. भट्टी एकाच वेळी 'भास्कर'ला आणि आम्हाला फॅक्सवरून मजकूर पाठवणार होते. 'भास्कर' हे हिंदी दैनिक होतं, त्यामुळं त्यांचा काही प्रश्न नव्हता. पण आमच्याकडं तो हिंदी मजकूर जसाच्या तसा कसा छापणार? मग तो भाषांतरित करायची जबाबदारी माझ्यावर आली. कल्पना करा, एक तर भाषांतर अवघड, त्यात विनोदाचं भाषांतर किती अवघड! पण मला वाटतं, बहुतेक मी ती जबाबदारी नीट निभावली असावी. कारण एक वर्ष चालणाऱ्या या सदराला अजून एक वर्ष मुदतवाढ मिळाली. भट्टी नसले, की त्यांच्या पत्नी सविता भट्टी हा मजकूर पाठवीत आणि फोन करीत. त्यांच्या मालिकेमुळे मी त्यांनाही ओळखत होतोच. त्यांच्याशी काही वेळा गप्पा व्हायच्या. दर वेळी त्या न चुकता, 'ब्रह्मेजी, कभी चंडीगड आइयेगा हमारे घर' असं आमंत्रण न चुकता द्यायच्या. पुढं कालपरत्वे हे सदर बंद झालं आणि भट्टी दाम्पत्याशी असलेला संपर्क हळूहळू कमी झाला. माझं चंडीगडला जाणं झालंच नाही.
मात्र, त्यांच्या सदराचं दोन वर्षं भाषांतर केल्यानं असं विनोदी सदर आपणही लिहावं, असा किडा माझ्या मनात आला. पुढं २००७ च्या वर्ल्ड कपच्या वेळी मी रोज सलग ६० दिवस सदर चालवलं आणि ते संपल्याबरोबर 'कॉफीशॉप' हे सदर सुरू केलं याची बीजं भट्टींसोबत केलेल्या कामामध्ये होती.
पुढं २०१२ मध्ये भट्टी अचानक अपघातात गेले आणि मला धक्काच बसला. त्यातून सावरायला वेळ लागला. मी सविता भट्टींना चंडीगडच्या पत्त्यावर पत्र पाठवलं. त्यासाठी त्यांच्या मुंबई ऑफिसला फोन केला, तर तेच टिटू नावाचे पीए अजूनही होते. विशेष म्हणजे त्यांनी मला ओळखलंही...
सांत्वनपर पत्राला उत्तर देण्याची पद्धत नाही. म्हणून मला सविता भट्टींना माझं पत्र मिळालं की नाही, ते कळलं नाही. अर्थात त्यालाही आता पाच वर्षं होऊन गेली...
परवा अमोल उदगीरकरच्या पोस्टवर कमेंट करता करता पुन्हा जसपाल भट्टींची आठवण आली... तेव्हा काही जणांनी त्यांच्या व माझ्या मैत्रीवर लिहावं, असा आग्रह केला होता. सहज पाहायला गेलो, तर लक्षात आलं, की तीन मार्च हा भट्टींचा वाढदिवस...
....


आज तीन मार्च. माझा हा अत्यंत जिंदादिल, हुशार, संवेदनशील आणि अत्यंत दुर्मीळ अशी सुंदर विनोदबुद्धी असलेला लाडका ज्येष्ठ मित्र आज असता, तर ६३ वर्षांचा झाला असता...
पण 'असता' तरी का म्हणावं? जसपाल भट्टी अजूनही आपल्यात आहेतच... त्यांच्या विनोदाच्या जमलेल्या भट्टीप्रमाणेच सदैव हसवत हसवत डोळ्यांच्या कडा अलगद ओले करणारे...
आत्ताही ते तेच करताहेत...!
एकदम 'फ्लॉप' माणूस...!!
---

No comments:

Post a Comment