11 Apr 2018

हिचकी, बागी - २, रेड, ब्लॅकमेल

चार सिनेमे, चार नोट्स
----------------------------

१. हिचकी
----------------------

मुलांना जरूर दाखवा...
----------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. आजपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. तीन आठवड्यांपूर्वी आलेला ‘हिचकी’ आज पाहिला. अतिशय साधा, सरळ असा हा सुंदर सिनेमा आहे. राणी मुखर्जीनं साकारलेली यातली नैना माथूर या शिक्षिकेची भूमिका पाहण्यासारखी आहे. तिला ‘टोरेट सिंड्रोम’नं लहानपणापासून ग्रासलेलं असतं. ‘टोरेट सिंड्रोम’ म्हणजे एक प्रकारची उचकी. ही न थांबणारी उचकी आहे. या उचकीमुळं नायिकेला लहानपणापासून अतोनात शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. तिला शिक्षिकाच व्हायचं आहे, पण या त्रासामुळं तिला ती नोकरी मिळत नाही. अखेर तिच्याच शाळेत तिला काही काळापुरती नोकरी मिळते. तीही ‘राइट टु एज्युकेशन’मुळं त्या उच्चभ्रू शाळेत वाढविलेल्या ‘नववी फ’च्या वर्गावरची. (इथं ‘दहावी फ’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) ही झोपडपट्टीतली मुलं असतात. त्यांचा आणि नैनाचा सामना झाल्यावर पुढं काय होतं, नैनाची नोकरी टिकते का, या मुलांचं भवितव्य बदलतं का आदी सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी स्वाभाविक आहेत. त्यात नवं काही नाही. त्यामुळं अशा सिनेमात जे जे होईल, असं आपल्याला वाटतं ते घडतं आणि सिनेमा संपतो. पण या सिनेमाचं वेगळेपण आहे ते या साधेपणातच. अगदी एकरेषीय पद्धतीनं या सिनेमाचं कथानक पुढं सरकतं. पण तरीही ते कुठंही कंटाळवाणं वाटत नाही. याचं कारण दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रानं कुठलेही विचित्र प्रयोग करणं टाळून स्वीकारलेला ’कीप इट सिंपल’ हा मंत्र आणि राणी मुखर्जी. राणीनं यातली नैना फार समरसून साकारली आहे. तिचं हे मोठ्या पडद्यावरचं पुनरागमन सुखावणारं आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग जमून आले आहेत. सचिन व सुप्रियानं यात राणीच्या आई-वडिलांची भूमिका केली आहे. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शिव सुब्रह्मण्यम आणि नीरज कबी यांनी रंगविलेली काहीशी खलनायकी भूमिका याही गोष्टी जमून आल्या आहेत. सध्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आपल्या टीन-एज मुलांना तर आवर्जून दाखवा, असंच मी म्हणीन.

दर्जा - साडेतीन स्टार

(8.4.18)
----

२. बागी - २
--------------

अक्शी(न) मणोरंजण...
--------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. कालपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. काल ‘हिचकी’ पाहिला, तर आज दोन आठवड्यांपूर्वी आलेला ‘बागी -२’ पाहिला. एखाद्या उंटाला मानवी चेहरा लाभला असता, तर तो जसा दिसला असता, तशा तोंडाच्या, थोडक्यात, ‘उष्ट्रमुखी’ (हा शब्द प्रथम शिरीष कणेकरांच्या लेखनात मी वाचला. त्यांनी तो दिलीपकुमारसाठी वापरला होता. नंतर कुणी तरी युक्ता मुखीसाठी... तर ते असो.) अशा, पण नाव ‘टायगर’ असलेल्या जॅकीपुत्राचा सिनेमा मी कधी पाहीन, असं वाटलं नव्हतं. पण ‘सुट्टीत टाइमपास करणे’ या एकाच ध्येयानं सध्या माझा मुलगा आणि (त्याच्यामुळं) मी प्रेरित झालो आहोत. त्यामुळं हा ‘बागी’ पाह्यचा निर्णय झाला. आणि हा निर्णय किती योग्य होता, हे मला अडीच तासांनंतर नीटच कळून आलं. कुठलीही कलाकृती, कुठल्याही कारणानं तुम्हाला आनंद देत असेल, तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असेल, तर ती उत्तम कलाकृती मानायला हरकत नसते. ‘बागी- २’ या अॅक्शनपटानं मला तोच आनंद दिला. हा सिनेमा पाहताना मी मनमुराद हसलो. या चित्रपटानं किती तरी शास्त्रांना दिवसाढवळ्या थड लावला आहे. त्यातही भौतिकशास्त्रावर दिग्दर्शक अहमद खानचं प्रेम अधिक असावं. त्यामुळं गुरुत्वाकर्षण, बल, प्रतिबल, वस्तुमान, ऊर्जा आणि त्यांचे सिद्धान्त या सगळ्यांना त्यानं अक्षरश: एकाच ‘शॉट’मध्ये गोळ्या घालून ठार मारलं आहे. त्या दृष्टीनं यातला टायगरचा शेवटचा हेलिकॉप्टरमध्ये उडी मारण्याचा किंवा दोराला लटकून मशिनगन चालवण्याचा सीन पाहण्यासारखा आहे. (खरं तर कशाला पाहता?) यातले गंभीर सीन विनोदी वाटतात, तर विनोदी सीन हास्यास्पद... अॅक्शनदृश्यं सर्कशीसारखे वाटतात, तर कथित सस्पेन्स पुन्हा विनोदी... पण एक आहे. मनोरंजन करण्याचा वसा मात्र या सिनेमानं सोडलेला नाही. टायगर श्रॉफ हा वास्तविक काहीसा ठेंगणाच नट दिसतो. मात्र, यात त्याला ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकानं त्याचा शर्ट एवढा मोठा शिवला आहे, की त्यात दोन-पाच अमिताभ, तीन-चार स्टॅलन, एक-दोन अरनॉल्ड श्वार्झनेग्गर, पाच-सात धर्मेंद्र, आठ-दहा सनी देओल आणि पाच-पंधरा अजय देवगण सहज बसावेत. आणि दुर्दैव म्हणजे सलमानप्रमाणे शेवटच्या दृश्यात त्याचा हा भलामोठा शर्ट काढून त्याला अक्षरश: उघड्यावर आणला आहे. या टायगरची ड्वायलॉक डिलिव्हरी म्हणजे एक अचाट प्रकार आहे. तो शांत वगैरे असताना आपल्याला त्याचं एखादं वाक्य कदाचित नीट कळू शकतं. पण तो संतापून, किंंवा दु:खाने किंवा उद्वेगाने किंवा चिडून काही बोलू लागला, तर साधारणत: पन्नास चिंचुंद्र्यांच्या शेपटाला कर्कटक टोचल्यावर त्या जशा ओरडतील, तशा आवाजात या ‘टायगर’चा आवाज फुटतो. आणि तो ऐकून आपणही हसून हसून फुटतो.
बाकी सिनेमाबाबत न बोललेलंच बरं. मनोज वाजपेयी, रणदीप हुडा आदी दिग्गज मंडळींनाही वाया घालवलं आहे. दिशा पटणी नामक गुडिया बरी दिसते. पण ते तेवढंच. स्मिताच्या लेकराला (प्रतीक बब्बर) यात गर्दुल्ल्याची दुय्यम-तिय्यम भूमिका करताना पाहून वाईट वाटतं.
असो. बाकी कुठल्या का कारणानं होईना, आपलं मनोरंजन झालं, याच आनंदात आपण घरी परत येतो... हेच या चित्रपटाचं सर्वांत मोठं यश होय....
--
दर्जा - दोन स्टार

(9.4.18)
---

३. रेड
-------

छाप पडतेच...
--------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. परवापासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. परवा ‘हिचकी’ पाहिला, काल ‘बागी-२’ पाहिला, तर चार आठवड्यांपूर्वी आलेला ‘रेड’ आज पाहिला. अजय देवगण, इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेला, राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट १९८१ मध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. मला असे पीरियड ड्रामा पाह्यला नेहमीच आवडतात. नजीकचा भूतकाळ आणि त्यातले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल हा माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. ‘रेड’चं कथानक या साच्यात परफेक्ट बसणारं आहे. अमेय पटनाईक (अजय देवगण) या कर्तव्यदक्ष, इमानदार प्राप्तिकर उपायुक्ताची आणि त्यानं रामेश्वरसिंह (सौरभ शुक्ला) या स्थानिक बड्या राजकारण्याच्या आलिशान प्रासादवजा बंगल्यावर घातलेल्या छाप्याची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक आणि कथालेखक रितेश शहा दोघेही आपल्या प्रतिपाद्य विषयाशी प्रामाणिक राहिले आहेत. कथा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे त्यांनी त्या कथेवरच फोकस केला आहे आणि त्यामुळं चित्रपट पाहण्यातली उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. चित्रपटातले संवाद खटकेबाज आहेत. छाप्यादरम्यान उघड होणाऱ्या एकेक गोष्टी आणि त्यातून संबंधित माणसांचे बदलणारे पवित्रे दिग्दर्शकाने नेमके टिपले आहेत. उत्तर प्रदेशातल्या ‘बाहुबली’ राजकारण्यांची जीवनशैली आणि त्यांचा एकूणच व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून दिग्दर्शकानं स्वच्छ टिपला आहे. अजय देवगणनं यात साकारलेला अधिकारी ही त्याची हातखंडा भूमिका आहे. अजय आपल्या डोळ्यांतून अनेकदा व्यक्त होतो. संबंधित पात्राचं कन्व्हिक्शन त्याच्या देहबोलीतून प्रकट होत असतं. खालच्या आवाजातले त्याचे धारदार संवाद चित्रपटात अनेकदा दाद मिळवून जातात. सौरभ शुक्लानंही यातल्या ‘ताउजीं’ना न्याय दिला आहे. बघितल्याबरोबर डोक्यात सणक जावी, असा हा टिपिकल राजकारणी सौरभ शुक्लानं जबरदस्त साकारला आहे. सुटकेसाठी थेट दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटणारा आणि त्यांना सूचक धमकी देणारा हा बेडर ताऊजी म्हणजे सौरभ शुक्लाच्या कारकिर्दीतली एक महत्त्वाची भूमिका ठरावी. इलियाना डिक्रूझ साडीत छान दिसते. यात पतीच्या कर्तव्यदक्षतेविषयी मनातून अभिमान असणारी, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी त्याची पत्नी मालिनी तिनं व्यवस्थित साकारली आहे. याशिवाय यात लल्लन नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याची भूमिका अमित सियाल या अभिनेत्यानं चांगली केली आहे. अमित त्रिवेदीचं संगीतही श्रवणीय.
पटनाईकला या छाप्याची टिप कुणी तरी देत असतं. ते कोण असतं, हा या चित्रपटातला चिमुकला सस्पेन्स आहे. तो कायम ठेवणंच इष्ट. एकदा नक्कीच बघावा असा हा चित्रपट. तो पाहिल्यानंतर गेल्या ३७ वर्षांत देश काळ्या पैशांच्या साठवणुकीबाबत कुठून कुठं गेला आहे, याचीही एक झलक मिळते. थोडक्यात, ज्याची छाप आपल्यावर पडते, असा हा छाप्याबाबतचा सिनेमा पाहायलाच हवा.
दर्जा - साडेतीन स्टार

(10.4.18)
---

४. ब्लॅकमेल
---------------

लफडा नै करने का...!
-------------------------------
काही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. रविवारपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. त्या दिवशी ‘हिचकी’ पाहिला, सोमवारी ‘बागी-२’ पाहिला, काल ‘रेड’ पाहिला, तर आज याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘ब्लॅकमेल’ पाहिला. अभिनय देव दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं जात, सव्वादोन तास चांगला खिळवून ठेवतो. ‘दिल्ली बेली’एवढी नसली, तरी हा चित्रपट आणि त्यातली पात्रं पुरेशी अत्रंगी आहेत. 
आपल्या नायकाला त्याच्या बायकोनं फसवलं आहे. तिचं तिच्या जुन्या मित्रासोबत अफेअर आहे. ते लक्षात आल्यावर नायक तिच्या मित्राला ब्लॅकमेल करायचं ठरवतो. त्यातून ब्लॅकमेलिंगची मालिकाच सुरू होते. ज्याला ज्याला हे रहस्य कळलंय तो पैशांच्या बदल्यात ते रहस्य लपवायची तयारी दाखवतो. यात नायकाचा ऑफिसमधला एक मित्र आणि आणखी एक मुलगीही असते. त्यात मधेच या मुलीचा अपघाती मृत्यू की खून असं काही तरी होतं. मग त्यातून आणखी गुंतागुंत... अखेर सगळ्या संकटांतून पार पडत आपला नायक हा कॉम्प्लिकेटेड गेम जिंकतो...
या चित्रपटाची सगळी गंमत त्यात तयार होणाऱ्या सिच्युएशन्समध्ये आहे. त्या दृष्टीनं पटकथा जमली आहे. उत्तरार्धात काही वेळा किंचित कंटाळा येतो. मात्र, त्या मुलीच्या मृत्यूनंतर घटना वेग घेतात आणि शेवटही व्यवस्थित होतो. नायक ‘टॉयलेट पेपर’चा सेल्समन आहे. तरी ‘दिल्ली बेली’च्या मानानं टॉयलेट जोक कमी आहेत. अर्थात एक मात्रा वाढविली आहे. पुरुषाचे ‘एक हाताने करता येण्याजोगे’ सगळे विनोद अभिनयनं यात इरफानकडून करवून घेतले आहेत. (इथं ‘असे विनोद म्हणजे इरफानच्या डाव्या हातचा मळ...’ असं काही म्हणवत नाही. मळमळतं...) त्यातही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या बायकांचे फोटो समोर ठेवून हे चाललेलं असतं. असो.
अशा चित्रपटांत कलाकारांची कामं महत्त्वाची ठरतात. इथं मुख्य भूमिकेत इरफानला घेऊन दिग्दर्शकानं निम्मी बाजी मारली आहे. इरफाननं नेहमीप्रमाणे इथं देव कौशलच्या भूमिकेत कमाल केली आहे. अत्यंत थंड डोक्यानं तो सगळ्या गोष्टी कशा प्लॅन करतो आणि यशस्वी करतो, हे बघण्यासारखं आहे. कीर्ती कुलहारी, अरुणोदयसिंह, ओमी वैद्य यांनीही चांगली कामं केली आहेत. दिव्या दत्ता डॉली म्हणून शोभली नाही. तिच्या खुनाचा प्रसंगही किळसवाणा चित्रित केलाय. असो.
एकदा पाह्यला हरकत नाही.

दर्जा - तीन स्टार

(11.4.18)
----


No comments:

Post a Comment