30 Apr 2015

परिक्रमा आकाशवाणीची... १

दोन-अडीच वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवरचे निर्माते प्रदीप हलसगीकर यांनी परिक्रमा हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू केला होता. पुण्यातले आम्ही काही पत्रकार त्यासाठी लेखन करीत होतो आणि आकाशवाणीवरचे आमचे मित्र सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ आदी मंडळी ते सादर करीत. आज सहज ते लिखाण सापडलं. आकाशवाणीसाठी मी प्रथमच अशा पद्धतीचं लेखन केलं होतं. मी असे चार भाग लिहिले... त्यातला हा पहिला...
-------परिक्रमा ११-१२-१२
--------------------

रसिक श्रोते हो, नमस्कार...

डिसेंबरचा दुसरा आठवडा म्हटलं, की पुण्यासह जगभरातील संगीत रसिकांना एकाच गोष्टीची आठवण होते... ती म्हणजे सवाई गंधर्व संगीत महोत्सव. ख्यातनाम गायक, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरुजींच्या - म्हणजे रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्या - स्मरणार्थ पुण्यात हा महोत्सव सुरू केला. देशभरातील अनेक नामवंत गायक-गायिकांनी, वादक कलाकारांनी, नृत्य कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावलीय. खुद्द पंडित भीमसेन जोशी यांच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्यामुळं बहुतेक बड्या कलाकारांना या महोत्सवाला येणं हा फार मोठा बहुमान वाटतो. यंदा या महोत्सवाचं हीरकमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळंच आयोजकांनी यंदा हा संगीत सोहळा भव्य प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. एरवी चार दिवस चालणारा हा महोत्सव या वर्षी सहा दिवस चालणार आहे आणि तो आज सुरू होतोय. आता म्हणजे आणखी तीन-साडेतीन तासांनी रमणबागेच्या मैदानातील भव्य शामियान्यात सनईचे सूर निनादतील आणि तिथं जमलेल्या जगभरातील संगीत रसिकांसाठी आणखी एक सुरेल पर्वाचा आरंभ होईल. या महोत्सवाचे सर्वेसर्वा होते पंडितजी. मात्र, दोन वर्षांपूर्वी अण्णांचं निधन झालं आणि सर्वांनाच एक पोरकेपणाची भावना जाणवू लागली. अण्णांच्या अनुपस्थितीतही संयोजकांनी गेल्या वर्षी हा महोत्सव तेवढ्याच ताकदीनं, उत्साहानं साजरा केला आणि सवाईच्या चाहत्यांनीही त्यांना चांगलाच प्रतिसाद दिला. गेल्या वर्षीच या महोत्सवाच्या नावात पंडितजींचं नाव समाविष्ट करण्यात आलं. आता हा महोत्सव सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव म्हणून ओळखला जातो. अर्थात पंडितजींच्या तासन् तास चाललेल्या मैफली ऐकलेल्या श्रोत्यांना त्यांची उणीव भासतेच. वर्षानुवर्षं चाललेल्या या महोत्सवामुळं काही परंपरा पुण्यात तयार झाल्या आहेत. सवाईत गायला मिळणं हा जसा प्रत्येक कलाकाराला आपला सन्मान वाटतो, तसंच सवाई गंधर्व ऐकायला जाणं हेही एका अर्थानं स्टेटस सिम्बॉलच मानलं जातं. तिथलं ते खास वातावरण अनुभवावं असंच असतं. शाली पांघरून, कानटोप्या घालून, कॉफीचे थर्मास, एवढंच नव्हे, तर उशा-चटया, रजयांसह अंथरूण-पांघरूणांचा जामानिमा घेऊन घेणारी संगीतवेडी माणसं, गायकाच्या समोरच्या जागेवर कोंडाळं करून बसणारी आणि नेमक्या जागी दाद देणारी, फर्माईशी करणारी तरुण, पण जाणकार मंडळी, मंडपाच्या सभोवती लागलेल्या स्टॉलमधून आवडत्या गायकांच्या सीडी खरेदी करणारे हौशी रसिक, मागच्या बाजूला असलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गरमागरम वडापाव खातानाच त्या वडापावाच्या चवीला आणि जोडीला गायकाच्या एखाद्या चांगल्या तानेला एकाच वेळी व्वा म्हणून दाद देणारे अस्सल पुणेकर रसिक प्रेक्षक... असा तो सगळा खास सवाई टच असलेला माहौल असतो. म्हणूनच तर वर्षानुवर्षं पंढरीला जाणाऱ्या भाविकांच्या निष्ठेनं सवाईचीही वारी करणारे शेकडो रसिक आहेत. आपल्या विठोबाला म्हणजेच भीमण्णांना आठवत आठवत ते यंदाही ही स्वरांची पालखी खांद्यावरून वाहत नेतील, यात शंकाच नाही...

गाणं - शिफारस - माझे माहेर पंढरी... किंवा पंडितजींचे कोणतेही...
https://www.youtube.com/watch?v=vmFqQseBtxk

मंडळी, शब्देविण संवादु साधण्याचं काम स्वर करीत असले, तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना रोजच्या दैनंदिन संवादासाठी लागतात ते शब्दच. या शब्दांतूनच बनते ती भाषा. शब्दांची ही अनिवार ओढ अनेकांना पुस्तकांकडं खेचत घेऊन जाते. पुण्यात हल्ली बाराही महिने कुठं ना कुठं पुस्तकांची प्रदर्शनं चालू असतात. या प्रदर्शनांमध्ये सहज जरी डोकावलं, तरी लक्षात येतं, की पुस्तकांना अजूनही चांगली मागणी आहे. आवडीनं वाचन करणारी भरपूर माणसं आहेत. बालगंधर्व रंगमंदिरात नुकत्याच पार पडलेल्या भाषा महोत्सवानंही शब्दांतून साधल्या जाणाऱ्या संवादाची गरज अधोरेखित केली. तिथं रंगलेल्या गोष्टीच्या स्पर्धेवरूनही ही बाब स्पष्ट होईल. असेच एक गोष्ट सांगणारे, थोर कथाकार म्हणजे जी. ए. कुलकर्णी. रसिकहो, जी.एं.चं नाव घेतलं, की आपल्यासमोर येतात त्या त्यांच्या काहीशा अनवट, वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या गूढरम्य गोष्टी. शब्दांची ताकद जाणणारा हा कथाकार होता. त्यामुळं अतिशय वेगळ्या शैलीतल्या, नादमधुर शब्दांची लय त्यांच्या कथांच्या ओळीओळींमध्ये जाणवते. या वरवर गूढरम्य वाटणाऱ्या कथांमध्ये अंतर्बाह्य निर्मळ असा माणुसकीचा एक आदिम झरा खळाळताना आपल्याला दिसतो. अशा या जी.एं.च्या नावे दिला जाणारा प्रिय जी. ए. पुरस्कार यंदा ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना काल पुण्यात प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना एलकुंचवार यांनी तथाकथित आत्मचरित्रांवर टीका केली. काही लेखक घटना, ऐकीव माहिती, आठवणी लिहितात आणि त्याला आत्मचरित्र म्हणतात. स्वतःला सोलून काढणे माहितीच नसते. त्यामुळं आत्मचरित्र  लिहिणं अशक्यच आहे. अर्थात जी. ए. त्याला अपवाद आहेत. कारण त्यांचं संपूर्ण लेखन हेच त्यांचं आत्मचरित्र आहे, असं सडेतोड प्रतिपादन एलकुंचवार यांनी या वेळी केलं. प्रामाणिकपणे जगणाऱ्या लेखकालाच प्रश्न पडू शकतात. बेइमान लेखकाला प्रश्न पडणारच नाहीत. घटना आणि सत्य यातील फरक लेखक समजून घेत नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखविली.
यंदा या पुरस्काराचं पाचवं वर्ष होतं. या वर्षापासून हा पुरस्कार थांबविण्यात येत असल्याचं जी. एं.च्या भगिनी नंदा पैठणकर यांनी जाहीर केलं. असं असलं, तरी जी. एं.च्या साहित्याविषयीचे उपक्रम यापुढंही सुरूच राहतील, अशा शब्दांत त्यांनी जी. ए. प्रेमींना दिलासाही दिलाय...

गाणं - शिफारस - ना मैं धर्मी ना ही अधर्मी (मीरा सूर कबिरा)
https://www.youtube.com/watch?v=VQpHE6xDEoA

रसिक हो, करायला गेलो एक आणि झालं भलतंच असा अनुभव आपल्याला जगण्यात हरघडी येत असतो. दर वेळी मनासारखं झालं, तर ते आयुष्य कसलं? अहो, आपल्यासारख्या सामान्यांचं एक वेळ ठीक आहे. पण शास्त्रज्ञांसारख्या बुद्धिमान माणसांच्या बाबतीतही असं घडलं तर! त्यातून वेगळं का होईना, काही तरी संशोधनच तयार होतं, बरं का! आज वृत्तपत्रात आलेली एक गमतीशीर बातमी अशीच आहे. ऑस्ट्रेलियातील शेती संशोधकांनी केलेला एक प्रयोग फसला आणि त्यातून चक्क नारळाच्या चवीचं अननस तयार झालं. दहा वर्षांहून अधिक काळ संशोधक पीक उत्पादनातील बदलाबाबत एक संशोधन करीत होते. त्यातून झालेली ही शब्दशः फलनिष्पत्ती... या नव्या फळाचं नाव पायना कोलाडा पाइनॅपल असं नाव देण्यात आलंय. क्वीन्सलँडच्या डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरचे ज्येष्ठ संशोधक गार्थ सानेस्की यांनी सांगितलं, की ज्या वेळी आम्ही अननसाच्या पैदाशीचा कार्यक्रम हाती घेतला, तेव्हा ते नारळाच्या चवीचं होईल, असा विचार आमच्या स्वप्नातही आला नव्हता. येथील मागणीनुसार अधिक गोड आणि नवा स्वाद असलेली जात विकसित करण्याची जबाबदारी आमच्यावर होती. आमचा प्रयोग फसला असला, तरी त्यातून तयार झालेलं नारळाच्या चवीचं अननस भन्नाटच आहे. त्याची चव जगातील अन्य अननसांपेक्षा अधिक गोड असून, आम्लाची तीव्रताही कमी आहे. त्याचा ज्यूसही अर्थात अफलातून स्वादाचा आहे...
तेव्हा रसिक हो, आपण एखादं काम एका वेगळ्या हेतूनं सुरू करतो आणि त्याचा शेवट भलताच होतो, असं कधीकधी होऊ शकतं. पण त्यासाठी सतत काही तरी क्रिएटिव्ह करत राहणं, नवनिर्मितीचा ध्यास कधीही न सोडणं अतिशय आवश्यक आहे, नाही का!

गाणं - शिफारस - जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना...
https://www.youtube.com/watch?v=Lv_WZGl0TkE

श्रोते हो, करायला गेले एक आणि झालं भलतंच असा अनुभव दर वेळी सुखद असतोच असं नाही. आता आपल्या क्रिकेट संघाचंच पाहा ना... फिरकीच्या जाळ्यात प्रतिस्पर्धी संघाला अडकवायला गेले आणि स्वतःच त्यात सापडले. मायभूमीत इंग्लंडविरुद्ध जवळपास तीस वर्षांनी मालिका गमावण्याची नामुष्की येऊन ठेपलेल्या या संघावर आता चहूबाजूंनी टीकेचा वर्षाव होतोय. १९८३ चा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील दोन प्रमुख खेळाडू मोहिंदर अमरनाथ आणि दिलीप वेंगसरकर यांनीही या संघावर पुण्यात काल झालेल्या एका कार्यक्रमात जोरदार टीका केली. कर्णधाराला काढून टाकावं इथपासून ते कसोटी आणि वन-डेसाठी वेगवेगळे कर्णधार असावेत, उपकर्णधारपद असूच नये, सचिननं निवृत्तीबाबत लवकर काय ते ठरवावं आदी वेगवेगळ्या सूचनांचा भडीमार त्यांनी केला. विजेतेपदाला खूप धनी असतात आणि पराभवाला फक्त एक धोनीच असतो, हेच खरं. अवघ्या पावणेदोन वर्षांपूर्वी वर्ल्ड कप उंचावणाऱ्या धोनीच्या नशिबाचे फासे उलटे पडताहेत, असं स्पष्ट दिसतंय. आता नागपूर कसोटी जिंकून किमान मालिका बरोबरीत सोडवण्याची एकमेव संधी आपल्या संघाला उपलब्ध आहे. ती संधी ते साधतील आणि विजयी होतील, अशी आशा करायला काय हरकत आहे? आपल्या कसोटी संघाच्या मालिकेची परिक्रमा विजयानं संपावी, अशी त्यांना शुभेच्छा देऊ या आणि आपली आजची परिक्रमाही इथंच थांबवू या... नमस्कार...

गाणं - तुमरे बिन हमरा कोनो नाही... (लगान)
https://www.youtube.com/watch?v=8oWElXB3XQU

---------

No comments:

Post a Comment