1 May 2015

टाइमपास - २ रिव्ह्यू

मला वेड लागले...
---------------------



कुठलाही चित्रपट पाहताना, चांगला टाइमपास झाला पाहिजे, अर्थात वेळ कसा गेला ते कळलं नाही पाहिजे, अशी आपली साधी अपेक्षा असते. मात्र, 'टाइमपास (२)' असंच नाव असलेला चित्रपट पाहताना मात्र ते होत नाही, हा दैवदुर्विलास आहे. (किंवा आपल्या कर्माची फळं आहेत. काहीही म्हणा!) 'टाइमपास'सारखा चित्रपट पाहताना उच्च बौद्धिक दर्जाचा आनंद मिळावा, अशी अपेक्षा कुणीच करणार नाही. मीही केली नव्हती. पण किमान पहिल्या भागासारखं सुसह्य असं काही तरी असेल, हीही अपेक्षा दिग्दर्शक रवी जाधव पूर्ण करू शकलेले नाहीत. अशा चित्रपटांत हुकमी संवाद, खिळवून ठेवणारी प्रसंगमालिका, उत्स्फूर्त अभिनय आणि जोडीला चांगलं संगीत अशी भेळ जमावी लागते. टाइमपास - १ मध्ये ती जमली होती. 'दगडू परब नावाच्या मुलाचं प्राजक्ता लेले नावाच्या मुलगीवर प्रेम जडणं' या वाक्यातच पुरेसं नाट्य भरलेलं होतं. रवी जाधवनं आपल्या हुकमी विनोदी शैलीत ते खेळकर पद्धतीनं मांडलं होतं. 'नया है वह'सारखे गाजलेले संवाद, 'ही पोरी साजूक तुपातली'सारखं हिट गाणं आणि अनेक विनोदी प्रसंग यामुळं तो 'टाइमपास' रंगला होता. टीनएज वयातलं निरागस, पण हुरहुर लावणारं प्रेम (पपी लव्ह) हा त्याचा यूएसपी होता. याचा 'सिक्वल' काढताना दिग्दर्शकानं ही दोन्ही मुलं स्वाभाविकच आता मोठी झालेली दाखवली आहेत. पण मोठी म्हणजे एवढी की नायक आता तीस वर्षांचा झाला आहे. नायिकाही अर्थातच मोठी झाली आहे. इथंच सगळं गाडं फसलं आहे. कारण आता त्यांच्या प्रेमातली ती निरागस, हुरहुरती भावनाच लोप पावली आहे. आता जे काही प्रेम असेल, ते त्यांच्या दृष्टीनं कितीही पवित्र, सखोल वगैरे असलं, तरी प्रेक्षकांना आता ते व्यावहारिक, कॅल्क्युलेटेड प्रेमच वाटणार. तसं ते वाटू नये, यासाठी दिग्दर्शकानं तशी कथा घ्यायला हवी होती किंवा मग एकदम टपोरी फिल्म तरी करायला हवी होती. इथं मोठा झालेला दगडू अजूनही तसाच आहे, असं दिग्दर्शकाचं म्हणणं असलं, तरी प्रत्यक्षात तो संपूर्ण सिनेमाभर आपला मूळ स्वभाव बाजूला ठेवून, भावी सासऱ्यांना पटवण्यासाठी उच्चभ्रू असल्याचं नाटक करीत राहतो. इथंही दिग्दर्शक फसला आहे. कारण मूळ चित्रपटातल्या दगडूच्या आहे त्या रूपावरच प्रेक्षक फिदा होते. त्याचं ते तसं रॉ असणं हीच तर गंमत होती. 'टाइमपास २'मध्ये दिग्दर्शकानं त्याला सभ्यपणाची नाटकं करायला लावून का होईना, पण ती गंमतच घालवली आहे.
रवी जाधवच्या सिनेमात पटकथा ही कधीही फार भक्कम बाजू नव्हती. मात्र, उत्तम अभिनय, अचूक टायमिंग, कडक संवाद आणि वेगवान प्रसंगमालिका यामुळं त्याच्या पटकथेतले दोष झाकले जायचे. इथं मात्र, वरील बाजूही या कृत्रिम आवरणामुळं लंगड्या ठरल्यानं पटकथा उघडी पडली आहे. या सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत, की ते का आहेत, असा प्रश्न पडावा. उदा. दगडू आणि त्याचे मित्र गावाकडं जातात तेव्हा दशावतारी नाटकात कामं करायचं सोंग करतात. हा प्रसंग मूळ कथानकात अजिबात मिसळून येत नाही. तसंच उत्तरार्धात एकदा प्राजक्ता तंबोरा घेऊन, 'काटा रुते कुणाला...' म्हणत असते, तेव्हा तिचे बाबा माधवराव हळवे होऊन तिच्या खोलीत येतात आणि तेही हे गाणं गुणगुणू लागतात व नंतर दोघंही रडू लागतात. स्वतंत्रपणे पाहिलं, तर प्रिया बापट आणि वैभव मांगले यांनी हा सीन चांगला केला आहे, वादच नाही. पण चित्रपटाच्या प्रकृतीशी तो मुळीच सुसंगत नाही. अगदीच ठिगळ लावल्यासारखा हा प्रसंग येतो आणि अशा प्रसंगाची अपेक्षा नसल्यानं प्रेक्षागृहात शेवटी हशाच पिकतो. मुंबईत माधवराव दगडूला घेऊन प्राजक्ताच्या स्टुडिओत जातात, तो प्रसंग आणि नंतर एकदा तिथं दगडू हाणामारी करतो तो प्रसंग हे तर ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटात शोभतील असे प्रसंग यात का घेतले आहेत, ते केवळ दिग्दर्शकच जाणे. अशी अनेक उदाहरणं आहेत.
या चित्रपटात पुरेसा मसाला आलेला नाहीय किंवा भेळ जमत नाहीये याची खात्री असल्यानंच की काय, जुन्या चित्रपटाच्या पुण्याईवर दिग्दर्शक अवलंबून राहिला आहे. त्यामुळं यातही लहानपणीचे दगडू आणि प्राजक्ता वारंवार डोकावत राहतात. त्या चित्रपटातील 'फुलपाखरू' किंवा 'मला वेड लागले' यासारख्या गाण्यांची हमिंग यात वापरून दिग्दर्शक आत्ताच्या कथेत जान ओतण्याचा प्रयत्न करतो. अगदी 'नया है वह'चा प्रसंग जसाच्या तसा (पण इथं देवळात) घ्यायचा मोहही दिग्दर्शकाला आवरलेला नाही. पण त्या चित्रपटातील उत्स्फूर्तता यात वाईट रीतीनं लोप पावली आहे, हे नक्की. त्यातली गाणीही चांगली होती. यातलं एकही गाणं लक्षात राहत नाही.

या चित्रपटात एकच रीलिफ आहे आणि तो म्हणजे वैभव मांगले. वैभवनं माधवराव लेलेंच्या भूमिकात कमाल केली आहे. त्याचे संवाद, देहबोली आणि मुद्राभिनय यातून वैभवनं माधवराव पूर्वीपेक्षा टेचात उभे केले आहेत. मुलीच्या प्रेमात हळवा झालेला, पण वरकरणी कठोर फणसासारखा असा बाप वैभव मांगलेनं माधवरावांच्या रूपात जोरदार साकारला आहे, यात शंका नाही. प्रियदर्शन जाधवनं मोठ्या दगडूची भूमिका स्टाइलबाज करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पण उत्स्फूर्तता हा या नटाचा सर्वांत मोठा गुणविशेष आणि नेमकं त्यालाच दिग्दर्शकानं इथं बरेचदा अंडरप्ले करायला लावून त्याची माती केली आहे. प्रिया बापट प्राजू म्हणून शोभून दिसली असली, तरी ती कुठे तरी हरवल्यासारखी वाटली या चित्रपटात. बाकी भाऊ कदम नेहमीच्याच टेचात. त्याचंच एक या चित्रपटातलं फर्मास आणि मला आवडलेलं वाक्य सांगून थांबतो... कारण तेच या सिनेमाचं सार आहे... भाऊ दगडूला म्हणतो - 'व्हिस्की आणि ताक एकमेकांत मिसळू नये. दोन्हींची चव जाते...'

यापुढं काहीच सांगायला नको...!!

दर्जा - दोन स्टार
(यातला एक वैभव मांगलेचा...)
----

No comments:

Post a Comment