3 May 2015

परिक्रमा आकाशवाणीची... २

परिक्रमा १०-१२-२०१२
-------------------------


दोन-अडीच वर्षांपूर्वी पुणे आकाशवाणीवरचे निर्माते प्रदीप हलसगीकर यांनी परिक्रमा हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू केला होता. पुण्यातले आम्ही काही पत्रकार त्यासाठी लेखन करीत होतो आणि आकाशवाणीवरचे आमचे मित्र सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ आदी मंडळी ते सादर करीत. आज सहज ते लिखाण सापडलं. आकाशवाणीसाठी मी प्रथमच अशा पद्धतीचं लेखन केलं होतं. मी असे चार भाग लिहिले... त्यातला हा पहिला... (अॅक्चुअली जो आधी पोस्ट केलाय तो दुसरा भाग आहे... दोन्हीची उलटापालट झालीय... असो... आता ब्लॉगवरच्या क्रमानं हा दुसरा...)
---------------------


मंडळी नमस्कार,

डिसेंबरातले हे दिवस म्हणजे एकदम कूल... सर्वार्थानं. म्हणजे एक नेहमीच्या थंड अशा अर्थाने आणि दुसरा अर्थ हल्ली तरुणाई ज्या आवडीच्या गोष्टींना कूल असं म्हणते ना, तशा अर्थाने पण... ठंडी हवाएँ, लहरा के आए... असं गुणगुणायला लावणाऱ्या गुलाबी थंडीचे हे दिवस. अशा हवेत चित्तवृत्ती फुलून आल्या नाहीत, तरच नवल. आणि या छानशा हवेच्या जोडीला एकापेक्षा एक सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असं सध्या पुण्यातलं वातावरण आहे. हां, आता थंडी जरा लपाछपी खेळते आहे. त्यामुळं काही दिवस थंडी, तर काही दिवस चक्क उकाडा असंही वेगळंच वातावरण सध्या अनुभवायला येत आहे. पण हवामान लहरी असलं, तरी पुण्यातल्या सांस्कृतिक मेजवान्यांचं वेळापत्रक अगदी पक्कं असतं, बरं का! या काळात पुण्याच्या परिसरातले किंवा महाराष्ट्रातलेच नव्हे, तर जगभरातले रसिक, वेगवेगळ्या देशांतले पर्यटक पाहुणे म्हणून पुण्यात येत असतात. येथे या काळात सादर होणाऱ्या काव्य-शास्त्र-विनोदाच्या मैफलींना हजेरी लावत असतात. एवढं काय काय सुरू असतं या काळात, की आपल्याला दिवसाचे २४ तास कमी वाटतील... अनेक जण खास या दिवसांची वाटच पाहत असतात. त्यातून मित्रमंडळी ठरवून सुट्ट्या टाकतात, एकत्र येऊन मस्तपैकी सगळे कार्यक्रम एन्जॉय करतात. पुण्यातली प्रेक्षागृहं, नाट्यगृहं, कलादालनं कशी कलासक्त मंडळींनी ओसंडून वाहत असतात. चहा किंवा कॉफीच्या वाफाळत्या कपासोबत त्या त्या कार्यक्रमांविषयी गरमागरम चर्चा सुरू असते, वाद झडत असतात, तर कुठं कौतुकाचा वर्षाव सुरू असतो... तर अशी आपल्या हिवाळ्याची हवा आणि त्यात हा सांस्कृतिक मेवा... रसिकांना तरी आणखी कुठला आनंद हवा...

गाणं - शिफारस - ठंडी हवाएँ, लहरा के आए...

रसिक हो, पुण्यात सध्या सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांपैकी एक आहे ख्यातनाम जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांच्या चित्रपटांचा महोत्सव. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या थिएटरमध्ये रविवारी या महोत्सवाचं उद्-घाटन झालं. राशोमन हा कुरोसावा यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट. महोत्सवाच्या उद्-घाटनप्रसंगी हाच चित्रपट दाखविण्यात आला. १९५० मध्ये आलेल्या, कृष्णधवल आणि केवळ दीड तासाच्या या सिनेमानं तेव्हा सिनेमाचं विश्व हलवून टाकलं होतं.
राशोमन आपल्याला एका खुनाची कथा सांगतो. म्हणजे जंगलात एक खून झालेला असतो आणि त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले चार जण ती घटना चार प्रकारांनी वर्णन करून सांगतात. सत्य म्हणजे नेमकं काय असतं, आपण जे बघतो ते तरी सत्य असतं का, सत्याचं वर्णन करून सांगता येतं का अशा अगदी मूलभूत गोष्टींवर हा सिनेमा चर्चा करतो.
हाय अँड लो हादेखील असाच वेगळा सिनेमा. एका उद्योगपतीच्या मुलाचं अपहरण होतं. त्याला परत आणण्यासाठी तो स्वतःकडचे सगळेच्या सगळे पैसे खंडणी म्हणून द्यायला तयार होतो. मात्र, नंतर कळतं, की त्याच्या मुलाऐवजी त्याच्या ड्रायव्हरच्या मुलाचं अपहरण झालंय. आता त्याच्या नीतिमत्तेची खरी कसोटी असते....
श्रोते हो, कुरोसावा यांचे सगळेच सिनेमे तत्कालीन समाजाच्या आणि माणसांच्या अशा अगदी तळाच्या मुद्द्यांना हात घालणारे होते. कथा सांगण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. पारंपरिक चौकटींना धक्का देण्याचं त्यांचं खास तंत्र होतं. तेव्हा जागतिक सिनेमाचं नेतृत्व ज्यांच्याकडं आपोआप चालत आलं, अशा मोजक्या दिग्दर्शकांमध्ये कुरोसावा हे एक होते. आपले सत्यजित राय हेही अशा दिग्दर्शकांमध्ये होते. कुरोसावा आणि राय यांना एकमेकांविषयी नितांत आदर होता. अशा या दिग्दर्शकाचे गाजलेले सिनेमे येत्या गुरुवारपर्यंत संग्रहालयात पाहता येणार आहेत. रोज दुपारी दीड, साडेतीन आणि साडेपाच वाजता त्यांचे शो होणार आहेत. आपल्या कामातूनच बोलणारा हा थोर दिग्दर्शक अनुभवावा, असाच...

गाणं - शिफारस - ना मैं धर्मी ना ही अधर्मी... (मीरा सूर कबिरा)

खरंच, थोर लोक आपल्या कामातूनच बोलत असतात. किंबहुना ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ नाटककार गिरीश कार्नाड... हो, कार्नाडच. गिरीशजी आपलं आडनाव कार्नाड असं योग्य पद्धतीनं उच्चारलं जावं, यासाठी आग्रही असतात... तर गिरीश कार्नाड यांनी काल पुण्यात झालेल्या तन्वीर सन्मान सोहळ्यातही थोडंसं कमी बोलून कदाचित हेच सूचित केलं असावं.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि दीपा लागू त्यांच्या दिवंगत मुलाच्या - तन्वीरच्या - स्मरणार्थ दर वर्षी एका ज्येष्ठ आणि एका उगवत्या रंगधर्मीला हा सन्मान देत असतात. काल तन्वीर सन्मान गिरीश कार्नाड यांना, तर नाट्यधर्मी पुरस्कार प्रदीप वैद्य यांना देण्यात आला. पुण्यातल्या नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या सोहळ्याला हजर होती. गेल्या काही वर्षांपासून दिला जात असलेला हा सन्मान म्हणजे आता नाट्य क्षेत्रातला एक अतिशय बहुमानाचा, पण काहीसा घरगुती स्नेहाचा, असा एक कौटुंबिक सोहळाच झाला आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्नाड यांच्याविषयीची एक फिल्म दाखविण्यात आली. ती पाहिल्यामुळं प्रत्यक्ष भाषणात कार्नाड यांनी फार अधिक काही बोलणं टाळलं. मात्र, त्या फिल्मच्या शेवटी त्यांनी सांगितलेला एक अनुभव फार बोलका होता. ते म्हणाले, की मी जेव्हा आईच्या पोटात होतो, तेव्हा दोन महिने झाले असताना आई हे मूल नको म्हणून दवाखान्यात गेली होती. मात्र, तेव्हा मधुमालती गुणे म्हणून डॉक्टर होत्या, त्या त्या दिवशी दवाखान्यात आल्याच नाहीत. त्यामुळं माझी आई परत आली आणि नंतर तिचा विचार बदलला. तेव्हा मी सर्वप्रथम गुणे डॉक्टरांचे आभार मानतो. त्यांच्यामुळंच खरं तर मी आज आहे. नंतर माझ्या आईनं जेव्हा मला हा किस्सा सांगितला, तेव्हा मी स्तिमित झालो. जगण्यातली व्यामिश्रता काय प्रकारची असू शकते, आपलं अस्तित्व नक्की कशामुळं आणि का आहे, हे तेव्हा मला कळलं.
श्रोते हो, कार्नाड यांच्या भाषणातून किंवा त्यांच्या मुलाखतीत दर वेळी असं काही ना काही आपल्याला नक्कीच गवसत असतं. आपल्या जगण्याच्या परिक्रमेमध्ये येणारी अशी वळणं पुढच्या खडतर वाटचालीला उमेदच देत असतात...

गाणं - शिफारस - तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे (सुधीर फडके)
किंवा जीवना तू तसा मी असा (अरुण दाते)
---------

No comments:

Post a Comment