2 May 2015

दादांचा ब्लॉग (जत्रा)

शू...! बोलायचं नाही...!
---------------------------


मंडळी, नमस्कार. मला त्या ठिकाणी ब्लॉग लिहिण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आधी मला ब्लॉक वाटलं. मुंबईत फ्लॅटला ब्लॉक म्हणतात आणि या पदार्थाशी माझा जवळचा संबंध आहे, हे सांगायला नकोच. लहानपणी ब... बाबाचा किंवा फ... फुलाचा म्हणण्याऐवजी मी ब... ब्लॉकचा आणि फ... फ्लॅटचा शिकलो. इंग्रजी अक्षरं अनेक बावळट मुलं त्या ठिकाणी एबीसीडी वगैरे अशी शिकतात, पण मी टीडीआर, एफएसआय अशा योग्य त्या क्रमानंच ती शिकलो. त्यासंबंधानं माझी शालेय प्रगती उत्तमच होती, असं म्हटल्यास त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, असं मला वाटतं. पण इथं त्या ब्लॉकचा संबंध नसून, ब्लॉग म्हणजे कम्प्युटरवर लिहायचा लेख आहे, हे कळल्यावर माझं अवसान त्या ठिकाणी गेलंच. पण मी हार जाणाऱ्यातला माणूस नाय. मी लगेच एक ब्लॉगवाला माणूस हायर केला आणि त्याला माझा ब्लॉग लिहायला त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे तो फक्त टेक्निकल बघणार.... बाकी हे सगळे विचार माझेच आहेत आणि त्या ठिकाणी माझंच नाव असणार आहे, हे नक्की. (एरवी अनेक ठिकाणी माझं नाव नसतं, पण त्या गोष्टी माझ्या असतात. पण इथं उलटं घडलेलं आहे.) असो.

-----

मला वाटतं, पहिल्या ब्लॉगची सुरुवात माझी त्या ठिकाणी जडणघडण कशी झाली, माझं बालपण कसं गेलं, इथपासून करावी. लहानपणापासूनच मी जरा हाच. म्हणजे उनाड नाही, पण जरासा टग्या. आता त्या ठिकाणी हा शब्द मला चिकटलाच आहे, तेव्हा मी तो गौरवार्थी घेतो. टग्या असणं म्हणजे काही वाईट नाही. अन्याय सहन करायचा नाही, अशी आमच्या मातीची त्या ठिकाणी शिकवण आहे. लहानपणी इयत्ता दुसरीत मला एका मुलाचा बेंच आवडला. तेव्हा मी तो त्याला मला देऊन टाकायला सांगितलं. त्यानं ऐकलं नाही. तेव्हा त्याला चार दणके घालून मला तो बेंच माझ्या नावावर करून घेणं भागच पडलं त्या ठिकाणी. आता याला कुणी टगेगिरी म्हणत असतील, तर म्हणोत. मी हुशार असल्यानं तो नवा बेंच मी माझ्या मित्राच्या नावानं करून घेतला. म्हणजे कर्कटकनं मित्रानं आपलं नाव कोरलं. एपी अशी अक्षरं कोरली. म्हणजे आनंद पुसेगावकर. लोकांना वाटायचं, की माझंच नाव आहे. तेव्हापासून मला त्या ठिकाणी सगळे घाबरायला लागले. वास्तविक मी खूप खेळकर वृत्तीचा माणूस आहे. माझं या मातीवर प्रेम आहे. तिच्यात लोळावं, खेळावं, बागडावं असं मला फार वाटतं. पण लोक माझं हे प्रेम वाईट अर्थानं घेतात. त्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही. माझ्या शिस्तीकडं कुणी पाहत नाही. लहानपणापासूनच मला स्वच्छता आवडते. माझ्या बेंचवर कुणीही कचरा केलेला मला चालत नसे. तेव्हा माझ्या बेंचवर मी एकटाच बसत असे. माझ्या पेन्शिलींना टोकं काढल्यावर होणारा कचरा दुसऱ्याच्या बेंचवर टाकायचं काम माझे काही निष्ठावान समर्थक तेव्हापासून करत आलेले आहेत. (आपल्या पेन्शिलीला टोक नसलं, तरी दुसऱ्याच्या पेन्शिलीला काढून द्यावं, हे धोरणी धोरण त्यांनी तेव्हापासून जपलं आहे. पुढं माझ्या या मित्रांना मी टेंडरांचा खाऊ देऊन लहानपणीच्या मदतीची त्या ठिकाणी परतफेड केलेली आहे.)

----

शाळेत थोडा मोठा झाल्यावर तर माझ्या शिस्तीचा दरारा फारच वाढू लागला. लोक तंबाखू, मावा, गुटखा खातात, हे मला फार घाण वाटतं. तोंडात त्या ठिकाणी ती घाण ठेवून म्हसाडासारखं चघळत बसावं का, तुम्हीच सांगा. काय पद्धत आहे ही? आमचा एक मास्तर होता बरं का. बरा होता एरवी शिकवायला. वृत्तीनं तर धार्मिक होता, माळकरी होता. पण तोंडात सदैव गायछाप. कायम त्या ठिकाणी बार भरलेला. मग आम्ही काय करावं? तेव्हा शम्मी कपूर एकदम फेमस होता. एके दिवशी मास्तर वर्गात येताच, सगळ्यांनी बार बार देखो, हजार बार देखो हे त्याचं गाणं म्हणायला सुरुवात केली. मास्तर लटके-झटके देत पळालाच. पुन्हा काय त्यानं वर्गात तोबरा भरला नाही. या वेळेपर्यंत मुलांनी मला दादा म्हणायला सुरुवात केली होती. मी दादा असल्यानं वर्गात थोडीफार दादागिरी करणारच ना! तुम्हीच सांगा...
मला दुसऱ्या एका गोष्टीची चीड होती ती म्हणजे पोरींची छेड काढणाऱ्या पोरांची. म्हणजे मला काय मुली आवडत नव्हत्या असं नाही. पण बारीक बारीक खोड्या काढून पळून जाणाऱ्या पोरांची त्या ठिकाणी मला चीड होती. पोरींचा नाद करावा तर मर्दासारखा करावा. त्या स्वतःहून आपल्याकडं आल्या पाहिजेत, या गोष्टीवर त्या ठिकाणी माझा कटाक्ष होता. याच गोष्टीमुळं मला त्या दुसऱ्या बारचीही चीड होती. पण ती गोष्ट नंतर येणार आहे.
लहानपणीच माझ्या शिस्तप्रिय अन् टग्या वृत्तीची पंचक्रोशीत वाहव्वा सुरू झाली होती. आमचे काका म्हणजे एकदम रत्नपारखी माणूस. आता माझ्यासारखं रत्न घरातच गावल्यावर काका काय सोडतात होय... त्यांनी मला त्यांच्या तालमीत घुमवायला सुरुवात केली. एकाच वेळी राजकारणाच्या आणि कुस्तीच्या आखाड्यात शड्डू ठोकू लागलो. पण आखाड्यात माती अंगाला चिकटू लागल्यानं आणि मला त्या ठिकाणी स्वच्छतेची आवड असल्यानं मी लवकरच तो आखाडा सोडला आणि राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतली. काकांची पावर तेव्हा फुल्ल ऑन होती. त्यांच्यापुढं बाकीचे सगळे डीम लाइट वाटायचे. तेव्हा राजकारणात पुढं जायचं असंल, तर काकांच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे, याच्यासंबंधानं त्या ठिकाणी मनात खूणगाठ बांधली. मग राजकारणातल्या बारीक-सारीक डाव-प्रतिडावांच्या संबंधानं आपलीही भूमिका ठरू लागली. कुठं निकाल घेतला पायजेलाय, कुठं दुरुस्ती करायला पायजेलाय हे सगळं त्या ठिकाणी शिकण्याची वृत्ती बनली.

---

काकांनी आधी दिल्लीला पाठवलं खासदार म्हणून... पण तिथं काय आपलं मन रमलं नाही. सुदैवानं काकाच दोन वर्षांत परतले आणि मी सुटलो. नंतर मी पूर्णपणे राज्यात लक्ष घातलं. मीच काकांचा वारसदार असं लोकं बोलू लागले. माझी कार्यशैली, शिस्त आणि एखादं काम होणार नसेल, तर त्या माणसाला तोंडावर तसं सांगण्याची पद्धत याचा त्या ठिकाणी सर्वत्र बोलबाला झाला. राज्यात आमचा जोडसंसार असल्यानं मला सुरुवातीला फार त्रास झाला. तोंडात बार असताना शिंक आल्यावर माणसाची जशी अवघडलेली अवस्था होते, तशी माझी (बारची सवय नसतानाही) कित्येकदा झाली. मग मी आमच्याच पार्टीच्या मंत्र्यांवर डाफरू लागलो. आता इथं त्या दुसऱ्या बारचा विषय सांगतो. हॉटेलांत पोरी नाचवणं मला त्या ठिकाणी कधीच आवडलं नाही. संतांच्या महाराष्ट्रात हे प्रकार चालणं म्हणजे फार वाईट. बाया नाचवायच्या तर प्रायव्हेटमधी. कधी नाचली, कुठं नाचली, कशी नाचली कुणाला कळता कामा नये. अशा गोष्टी बोभाटा न करता त्या ठिकाणी करायच्या असतात. त्याच्यातच खरी मजा असते. मला विचारा ना! पण जाहीर हॉटेलांत पोरी नाचवायच्या आणि वर त्यांच्यावर नोटा उधळायच्या हे मला बघवत नव्हतं. महाराष्ट्रात आतापर्यंत उधळल्या गेलेल्या या नोटा जपून ठेवल्या असत्या, तर आणखी किती तरी लाख एकर जमीन खरेदी करता आली असती. पण भूखंडाचं हे शास्त्र या बारवाल्या मुखंडांच्या लक्षातच येत नाही. शेवटी मी पुन्हा आमच्या मंत्र्यांना कामाला लावलं आणि या बारांचा बार त्या ठिकाणी पार उखडून काढला.

----

राज्यात अखेर उपमुख्यमंत्री म्हणून काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली. मात्र, या पदाला काहीही अर्थ नाही, हे मला ठाऊक आहे. केवळ नावाचं मोठेपण. पण मी हटलो नाही. इथंही शिस्तीनं कामाला लागलो. माझ्या करिअरचा ग्राफ वरवर जात होता आणि मी पुढच्या वेळेला त्या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री होणार, यात काहीच शंका उरली नाही. पण नियतीच्या मनात दुसरंच काय तरी असतं. याच वेळेला राज्यात दुष्काळ पडला आणि माझ्या अकलेचाही त्या ठिकाणी पूर्ण दुष्काळच पडला. एका जाहीर कार्यक्रमात जीभ घसरली आणि धरणात ती विविक्षित क्रिया करून धरण भरू का, असा रोकडा सवाल मी हसत हसत टाकला. उपस्थित मंडळीही जोरदार हसली आणि सर्वांनी माझ्या विनोदबुद्धीला दाद दिली. पण महाराष्ट्राला विनोदाचं वावडं आहे, हे मला माहिती नव्हतं. हा व्हिडिओ सगळीकडं फिरू लागला आणि मला दे माय धरणी (की धरण) ठाय, असं झालं. घाबरून पुन्हा त्या क्रियेला जावं लागलं. त्यानं धरण तर भरलं नाहीच. पण त्या क्रियेच्या संबंधानं शरीरातली साखर बाहेर जाऊन मला मात्र इकडं कापरं भरलं. मला आहे डायबेटिस... उगाच त्या क्रियेच्या संबंधानं त्या ठिकाणी बोलून गेलो, असं झालं. राज्यात सर्वत्र माझी छीःथू होऊ लागली. घरची मंडळीही मला चिडवू लागली. एका नालायक पत्रकारानं तर मी त्याला फोन करू नये, म्हणून स्वतःची रिंगटोन 'पी लूं' या गाण्याची ठेवली. त्या गाण्यात एक तर 'पी' आहे आणि 'लू'सुद्धा... ते ऐकूनसुद्धा मला घाबरून बाथरूम आठवते. ते गाणं मी आमच्या घरात पूर्ण बॅन केलं आहे. एकदम बंद! पण रात्री-बेरात्री कधी तरी कोरडंठाक पडलेलं एखादं धरण स्वप्नात दिसतं आणि त्या ठिकाणी मी एकटाच उभा राहून जोर लावतो आहे, पण धरण काही भरत नाही आणि धरणाच्या भिंतीवर उभे असलेले राज्यातले सगळे लोक, विशेषतः विरोधक, पत्रकार वगैरे माझ्याकडं पाहून खदाखदा हसताहेत असलं काही तरी दिसतं. मला दरदरून घाम फुटतो आणि मी जागा होतो... तेव्हा खरंच लागलेली असते. मग मी मोकळा होऊन येतो आणि पुन्हा गादीवर पडतो... धरण आणि ती क्रिया यांच्यासंबंधानं माझ्या आयुष्यात आता हे जे अद्वैत निर्माण झालेलं आहे त्या ठिकाणी, ते केवळ अलौकिक आहे...
चला, राज्यात दुष्काळाची चिन्हे दिसताहेत आणि मलाही घाईची लागलेली आहे... तेव्हा निघतो. पण शू...शू... हे शूक्रेट - आपलं, शिक्रेट - आहे हं आपलं... कुणी कुठं बोलायचं नाही त्या ठिकाणी...!
---
(पूर्वप्रसिद्धी - जत्रा नियतकालिक, पुणे)
(बहुधा जुलै २०१४)
----

No comments:

Post a Comment