15 May 2015

बॉम्बे वेल्वेट - रिव्ह्यू

उसवलेली मखमल...
-------------------------
अनुराग कश्यप या नावावर भाळून सिनेमाला जाणं थांबवावं का? तसं नको करायला... कारण हा नव्या पिढीतला एक हुशार, प्रयोगशील दिग्दर्शक आहे. त्याचा बॉम्बे वेल्वेट हा नवा हिंदी चित्रपट हाही एक प्रयोगच आहे. मात्र, प्रेक्षकांच्या दृष्टीनं हा फसलेला प्रयोग आहे. उत्कृष्ट बांधणीची, घट्ट विणीची, मऊसूत मखमल मिळण्याऐवजी आपल्याला या मखमलीचे उसवलेले धागे पाहायला मिळतात. तिची ऊब जाणवण्याऐवजी ती मधूनमधून चांगलीच टोचते. मूळ मखमल चांगली असणार, पण आपल्या विणकरानं तिला चांगल्या पटकथेचं अस्तर न लावल्यानं तिच्या शिलाईचे धागे अस्ताव्यस्त लोंबलेले दिसतात. आणि एकदा का मखमल टोचू लागली, की मग ती मखमल कसली? ती तर जाडीभरडी गोधडीच!
बॉम्बे वेल्वेटचं बाह्यरूप एकदम देखणं आहे. मस्त. शो-रूमच्या बाहेरून पैठणी कशी दिसते ना, अगदी तस्सं! किंबहुना कला दिग्दर्शनाचे पुरस्कारही या चित्रपटाला मिळतील. अनुरागनं यात उभी केलेली साठ व सत्तरच्या दशकातली मुंबई मस्तच आहे. त्या काळातल्या महानगरी होऊ पाहत असलेल्या, ब्रिटिश छाप शहराचं सौंदर्य अनुरागनं नेमकं दर्शवलं आहे. तेव्हाच्या मोटारगाड्या, बंदरं, रस्ते, बड्या लोकांचे दिवाणखाने, खलबतखाने, उंची क्लब, तिथं चालणारं जॅझ नृत्य, गाणी हे सगळं त्यानं ज्या तपशिलानं दाखवलं आहे त्याबद्दल त्याला फुल मार्क्स. पण नेपथ्य चांगलं असलं, तरी ते नेपथ्यच. ते शेवटी पार्श्वभूमीलाच असणार. पृष्ठभूमीवर काय दिसतं हे महत्त्वाचं. इथं पृष्ठभूमीवर आहे जॉनी बलराज (रणबीर कपूर - जबरदस्त) या फाळणीनंतर पाकिस्तानातून मुंबईत आलेल्या भणंग तरुणाची गोष्ट. महानगरी होऊ घातलेल्या या शहरात, मोक्याच्या जागेवर टॉवर्स उभे करून, मुंबईचं मॅनहटन रचण्याचं राजकारण करणाऱ्या बड्या लोकांत आधी प्यादं आणि नंतर वजीर बनून वावरत असलेल्या, आणि शेवटी तर राजाच होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जॉनी बलराजची ही गोष्ट. त्याच्या रखरखीत आयुष्यातलं एकच वेल्वेट आहे, ती म्हणजे रोझी (अनुष्का शर्मा - सुपर्ब) ही गोव्यातील पळून आलेली तरुणी. कैझाद खंबाटा (करण जोहर - एक नंबर) हा बडा उद्योगपती-कम-राजकारणी, मेयर मेहता (सिद्धार्थ बसू) आणि जिमी मिस्त्री या पत्रकाराचं काम करणारा कलाकार यांच्या राजकारणात जॉनी बलराज कसा अडकत जातो आणि नंतर तोच सगळ्यांवर कशी बाजू उलटवतो, याची ही गोष्ट. पण अनुराग ही गोष्ट तशी सरधोपटपणे सांगत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध बराचसा पात्रं एस्टॅब्लिश करण्यातच खर्च होतो. बराच वेळ काय चाललं आहे, याचा मेळ लागत नाही. गोष्टीची सुसंगतता मध्यंतरापर्यंत लक्षात येते. पण तोवर कथेतली स्टीम गेल्याचा फील येतो. जॉनी बलराज आणि कैझादच्या चाली-प्रतिचालींमध्ये उत्तरार्ध रंगतो. हा भाग काहीसा वेगवान आणि सुसह्य आहे. पण बराचसा प्रेडिक्टेबल आणि नेहमीच्या हिंदी सिनेमा पठडीतलाच आहे. तो अनुराग कश्यपचा सिनेमा वाटत नाही आणि हेच त्याचं सर्वांत मोठं अपयश आहे.
हा चित्रपट तयार होताना बराच मोठा म्हणजे साडेतीन-चार तासांचा झाला होता म्हणे. मग तो भयंकर एडिट करून अडीच तासांचा करण्यात आल्याचं कळतं. हे जर खरं असेल, तर मग ती जी काही हानी झालेली आहे, ती पडद्यावर जाणवतेच. आणि असं झालं नसेल, तर मग पटकथेतच भरपूर ढिसाळपणा झाला आहे, हे तरी खरं आहे. चित्रपटात एकात एक बरेच ट्रॅक आहेत. जॉनी बलराज आणि त्याच्या जिम्मन नावाच्या मित्राचा एक ट्रॅक आहे. केके मेनननं साकारलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा एक ट्रॅक आहे. विवान शाहनं साकारलेल्या टोनीचा एक ट्रॅक आहे. रोझीच्या गोव्यातल्या रहिवासाचा एक छोटा ट्रॅक आहे. एरवी अनुरागच्या सिनेमात हे सर्व प्रवाह बेमालूमपणे एकमेकांत मिसळून जातात. पण या सिनेमात हे सर्व आपल्याला तुटक तुटक असल्याचं जाणवतं. वीण घट्ट नसल्याचा हा परिणाम आहे आणि त्यामुळं उसवलेले हे धागे सारखे टोचत राहतात. सिनेमात रोझी क्लब सिंगर दाखवली आहे. तिच्या गाण्यांचेही प्रसंग असेच. सुरुवातीला ती गात असताना काही तरी नाट्य आहे. पण नंतर तर  गाण्यांचा अतिरेक झाला आहे. रविना टंडनचाही असंच एक गाणं गातानाचा छोटा रोल आहे. तोही मूळ कथानकात मिसळून आल्यासारखा वाटत नाही. असो.
एवढं असलं, तरी एक प्रयोग म्हणून बॉम्बे वेल्वेट एकदा पाहायला हरकत नाही. करण जोहरनं यातला कैझाद झक्कास साकारला आहे. एकदा तो रणबीर कपूरच्या इंग्लिश बोलण्याला घराबाहेर येऊन मनसोक्त हसून जातो तो, आणि नंतर तो रणबीरला रोझीमध्ये असं काय होतं जे माझ्यात नव्हतं, असं विचारतो तो हे दोन्ही प्रसंग हसवून जातात. अनुष्का शर्मानं रोझी मेहनतीनं साकारली आहे. तिच्या लूकवर दिग्दर्शकानं बरीच मेहनत घेतलेली दिसते आणि अनुष्काही या भूमिकेला जागली आहे. रणबीर कपूरनं जॉनी बलराजच्या भूमिकेत जीव ओतला आहे. वास्तविक अशा भूमिकांत त्याला पाहायची आपल्याला सवय नाही. पण त्यानंही त्याचा लूक आणि एकूण भूमिका यावर बरंच काम केल्याचं जाणवतं.
तेव्हा उसवलेली, पण मूळची मुलायम असावी अशी शंका येणारी ही मखमल एकदा स्पर्शून पाहायला हरकत नाही. नाही पाहिली तर काही बिघडणार नाही. साठच्या दशकातली मुंबई दाखवणारे मूळ हिंदी सिनेमे डीव्हीडीवर पाहणे हा जास्त किफायतशीर सौदा ठरू शकेल.

दर्जा - तीन स्टार
---

No comments:

Post a Comment