3 May 2015

परिक्रमा आकाशवाणीची... ४

परिक्रमा ९-१-२०१३
-----------------------रसिक श्रोते हो, नमस्कार...

संध्याकाळी निवांत, गावाबाहेर मोकळ्या आकाशाखाली आपण कधी बसलो, तर हळूहळू पडत जाणारा अंधार आणि आकाशात एकेक करून चमकू लागणारे तारे हे दृश्य अगदी खिळवून ठेवणारं असतं. अवकाशाच्या त्या अनंत पोकळीकडं पाहताना माणसाला कायमच आपल्या खुजेपणाची जाणीव होत असते. त्याच वेळी हे ब्रह्मांड कवेत घेण्याची एक जिद्दही त्याच्या मनात कुठं तरी रुजत असते. माणसानं विज्ञानाच्या मदतीनं आजवर अनेक शोध लावले. पण विश्वाच्या या अफाट पसाऱ्यात आपण एक अगदीच छोटासा बिंदू आहोत, ही जाणीव त्याला सतत होत असते. त्यातूनच आपल्यासारखं या विश्वात दुसरं कुणी आहे का, याचा शोध घेण्याची त्याची जिज्ञासा अहोरात्र जागी असते. या जिज्ञासेतून, अगदी बालसुलभ वाटेल अशा कुतूहलातूनच मोठमोठे वैज्ञानिक शोध लागले आहेत. यातूनच माणूस गेल्या शतकात चक्क चंद्रावर पोचला. आता त्याला वेध लागले आहेत ते मंगळाचे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेनं 'क्युरिऑसिटी' असं नेमकं नाव असलेलं एक यान मंगळावर पाठवलं आहे, हे आपल्याला माहिती आहेच. या क्युरिऑसिटीचं काम मंगळावर अव्याहत सुरू असून, वेगवेगळे फोटो हे यान पृथ्वीवर पाठवीत असतं. त्यातून अनेक रंजक आणि मंगळाविषयीचं कुतूहल वाढविणाऱ्या बातम्या हाती येत असतात. कालच्याच वृत्तपत्रांमध्ये अशी एक बातमी प्रसिद्ध झालीय. मंगळावर फुलाच्या आकारासारखी काही तरी वस्तू दिसल्याचं क्युरिऑसिटीनं पाठविलेल्या फोटोंमधून स्पष्ट झालंय. मंगळावर जीवसृष्टी असावी किंवा पूर्वी कधी तरी होऊन गेली असावी, असा अनेक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. त्याला पुष्टी देणारे अनेक पुरावेही मिळाले आहेत. या फुलानंदेखील अशीच आणखी एक आशा जागी केलीय. दगडासारख्या दिसणाऱ्या कठीण पृष्ठभागातून हे 'फूल'सदृश काही तरी वर येत असल्याचं दिसत असल्याचं या बातम्यांमध्ये म्हटलंय. या घटनेविषयी अमेरिकेत गेल्याच आठवड्यात एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सहभागी झालेल्या विज्ञानप्रेमींनी अनेक मतं मांडली. एका अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, कठीण पृष्ठभागातून फूल वर आलेलं दिसणं ही फूल उमलण्याची प्राथमिक अवस्था असू शकते. अर्थात सध्या तरी या वस्तूविषयी एवढीच माहिती उपलब्ध आहे. कारण ऑक्टोबर २०११ मध्ये या यानानं असाच एक फोटो पाठविला होता. मात्र, त्यात तो प्लास्टिकचा तुकडा असल्याचं दिसून आलं. या यानातूनच हा तुकडा पडला असावा, असं मानण्यास पूर्ण वाव आहे. असं असलं, तरी 'कुणी तरी आहे तिथं' नावाचं हे माणसाचं कुतूहल आहे ना, ते श्रोतेहो, कधीही कमी होणार नाही. कारण तेच तर आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे.

गाणं - शिफारस - रात्रीस खेळ चाले हा गूढ चांदण्यांचा (हा खेळ चांदण्यांचा)
(किंवा) या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करू या गगनाची (गौरी जोशी?)

रसिकहो, अंतराळातलं ते जगणं कदाचित रम्य असेलही... आपल्याला ठाऊक नाही. पण युद्धाच्या कथा या नेहमीच रम्य असतात, हे आपल्याला नक्कीच ठाऊक आहे. 'युद्धस्य कथा रम्या' असं सुभाषितच आहे. युद्ध मुळात होऊच नये, हे खरं असलं, तरी शत्रूच्या हल्ल्यासाठी कायम तय्यार असणं हेदेखील व्यावहारिक शहाणपण असतं. आपल्या विशाल अशा भारत देशात अनेक बाबतींत विभिन्नता असली, मतभेद असले, तरी काही गोष्टी आपण राष्ट्रीय अभिमानाच्या मानल्या आहेत आणि त्याबाबत सर्व देशवासीयांचं एकमत आहे. आपलं लष्कर ही आपल्या सर्वांच्याच अतिशय अभिमानाची बाब आहे. या लष्करानं पुण्यातील शेठ दगडूराम कटारिया हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त एक प्रदर्शन नुकतंच शाळेत भरवलं होतं. 'नो युअर आर्मी' असं नाव असलेल्या या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. लष्कराच्या दक्षिण विभागाचं मुख्यालय पुण्यात आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच. या मुख्यालयातील '२६, मराठा लाइट इन्फंट्री'नं हे प्रदर्शन सादर केलं होतं. लष्करातील जवान वापरत असलेली पिस्तुलं, रायफल, लाइट मशिनगन, रॉकेट लाँचर अशी अनेक शस्त्रं जवळून पाहण्याची, हाताळण्याची संधी विद्यार्थ्यांना या वेळी मिळाली. मशिनगनमध्ये किती गोळ्या असतात, एका मिनिटात आपण किती गोळ्या उडवू शकतो, या गनचं वजन किती असतं असे स्वाभाविक कुतूहलाचे प्रश्न विचारून मुलांनी प्रदर्शनाचा आनंद लुटला. श्रोतेहो, आपले जवान किती टोकाच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये आपलं संरक्षण करीत असतात, हे आपल्याला माहिती आहे. पण संगणकावर लुटूपुटूचे व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा मुलांना अशा शूर जवानांना थेट भेटण्याची संधी मिळाली आणि त्यांचं खडतर आयुष्य जाणून घेता आलं, तर त्या मुलांच्या मनातही पुढं देशासाठी अशी सेवा करण्याचं बीज रोवलं जाईल, यात शंकाच नाही. या प्रदर्शनाच्या निमित्तानं लष्करातील करिअरची माहिती देणारी पत्रकं देण्यात आली; तसंच त्याबाबतचे व्हिडिओही दाखवण्यात आले. देशासाठी प्राण देण्याची तयारी असणारी तरुण मुलांची फौज जर आपल्याकडं असेल, तर जगातील कोणतीच शक्ती आपल्याकडं वाकडा डोळा करून पाहू शकणार नाही, हे निश्चित.

गाणं - शिफारस - नन्हा मुन्हा राही हूँ देश का सिपाही हूँ (सन ऑफ इंडिया)


मंडळी, आपलं वजन हा आपल्यासाठी फारच संवेदनशील विषय असतो. विशेषतः स्त्रियांसाठी तर फारच. बदलत्या जीवनशैलीमुळं आहार-विहारात झालेला बदल आणि त्या अनुषंगानं येणारा लठ्ठपणा हा काळजीचा विषय असला, तरी सार्वजनिकरीत्या तो नेहमीच चेष्टेचा मुद्दा ठरतो. त्यामुळंच रोज डाएट, धावण्याचा व्यायाम, कॅलरी कॉन्शसनेस असं करीत करीत आपला मुक्काम कधी तरी वजनाच्या काट्यावर येतो. वाढताना किलो-किलोनं वाढणारं वजन कमी होताना मात्र ग्रॅम-ग्रॅमनं कमी होताना दिसतं. वजनाचं परिमाण असलेल्या त्या किलोग्रॅमचा आपल्याला काहीसा रागच येतो. तुझं वजन वाढलं म्हणजे कळेल, असा आपण कधी कधी त्या वजनकाट्याला शापही देतो. पण मंडळी, आता खरी बातमी सांगतो, ती ऐका. अहो, किलोग्रॅमचं वजन खरंच वाढलंय. आता ही वाढ एक दशांश मायक्रोग्रॅमची का असेना. पण किलोग्रॅम नावाच्या वजनाचंच वजन वाढलंय ही वस्तुस्थिती आहे. कालच्याच वृत्तपत्रात आलेली ही बातमी काय सांगते ते पाहा. पॅरिसच्या इंटरनॅशनल ब्यूरो ऑफ वेट्स अँड मेजर्स या संस्थेत ठेवण्यात आलेल्या किलोग्रॅमच्या मूळ प्रतिकृतीचं वजन वाढलं आहे. आणि हे वजन वाढण्याचं कारण आहे वातावरणातील प्रदूषण! ब्रिटनमधल्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीनं याबाबत एक अहवाल तयार केलाय. वस्तूचं वजन निर्धारित करण्यासाठी १८७५ मध्ये किलोग्रॅम या एककाची निर्मिती करण्यात आली, हे आपल्या सर्वांना माहितीय. तेव्हापासूनच जगभरात कुठल्याही वस्तूचं वजन करण्यासाठी हे एकक वापरलं जातं. पॅरिसमधील संस्थेत असलेल्या किलोग्रॅमच्या मूळ प्रतिकृतीला इंटरनॅशनल प्रोटोटाइप किलोग्रॅम - म्हणजेच आयपीएके - असं म्हणतात. आयपीके हे सिलिंडरच्या आकारातील प्लॅटिनम आणि इरिडियमचं संयुग आहे. या मूळ प्रतिकृतीच्या जशाच्या तशा ४० अधिकृत प्रतिकृती १८८४ मध्ये तयार करून, विविध देशांना पाठविण्यात आल्या होत्या. सध्या या मूळ प्रतिकृतीचं वजन वाढण्यामागं प्रदूषणामुळं त्यावर जमा झालेला हायड्रोकार्बनचा थर असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वाढीव हायड्रोकार्बनची चरबी काढून टाकून, किलोग्रॅमला मूळच्या आकारात 'फिट' करण्यासाठी एक्स-रे फोटोइलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करण्यात येणार आहे. या पद्धतीत ओझोन आणि अल्ट्राव्हायोलेट लाइटद्वारे प्रतिकृतीवर चढलेले हायड्रोकार्बन काढण्यात येणार आहेत. चला, किलोग्रॅमचं प्रतीक आपलं मूळ वजन परत मिळवीलसुद्धा... तोपर्यंत आपण आपल्या शरीरावर चढलेले चरबीचे कित्येक किलोग्रॅम घटविण्यासाठी धावायला सुरुवात करू या...

गाणं - शिफारस - हारी बाजी को जितना हमे आता है... (जो जिता वही सिकंदर)

श्रोतेहो, खरोखर, आपल्याला सिकंदरसारखं धावणं जमलं तर ठीक. नाही तर सध्या थंडीचा कडाका एवढा वाढला आहे, की अक्षरशः हाडं गोठून जावीत. विशेषतः उत्तर भारतात तर थंडीचा कडाका भयंकर वाढलाय. महाराष्ट्रात या काळात येणारी थंडी हीदेखील उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळेच असते. दिल्लीत दोन दिवसांपूर्वी १.९ अंश सेल्सिअस एवढं तापमान खाली आलं होतं. काश्मीर खोऱ्याचं तर विचारूच नका. द्रास, कारगिल या भागांत उणे २५ अंश सेल्सिअस एवढं तापमान खाली गेलंय. उत्तर प्रदेशात थंडीमुळं मरण पावलेल्यांची संख्या आता पावणेदोनशे एवढी झालीय. यात उघड्यावर झोपणाऱ्या, अंगावर पुरेसं वस्त्र नसलेल्या गोरगरीब जनतेचा प्रामुख्यानं समावेश आहे. श्रीनगरमधलं प्रसिद्ध दल सरोवरही गोठून गेलंय, तर महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्येही दवबिंदू गोठून त्याचा बर्फ झाल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर भारतात दाट धुक्याचा प्रादुर्भाव झाल्यानं विमानसेवेवरही विपरीत परिणाम झालाय. तेथून येणाऱ्या शीतलहरींमुळं महाराष्ट्राचाही बराच भाग गारठून गेलाय. विशेषतः मुंबईत, जिथं एरवी कायम उन्हाळा आणि पावसाळा हे दोनच ऋतू अनुभवण्यास मिळतात, तिथंही गुलाबी थंडी जाणवते आहे. मुंबईकरांनी आपापले स्वेटर्स, जर्किन्स अनेक दिवसांनी बाहेर काढले आहेत. श्रोतेहो, निसर्ग आपल्या वर्तणुकीत सर्वांना समान न्याय देतो. तो भेदभाव करीत नाही. त्यामुळं गरिबाला आणि श्रीमंताला सारखीच थंडी वाजत असते. फरक एवढाच असतो, की श्रीमंताकडं त्या थंडीवर मात करायची साधनं असतात आणि गरीब मात्र रस्त्यावर कुडकुडत कसाबसा जीव तगवत असतो. अशी कुणी गरीब माणसं तुम्हाला दिसली, तर त्यांना एखादी गोधडी, रजई पांघरायला द्या... आपण फार काही नाही, तर एवढं तरी करू शकतो. थंडीच्या प्रादुर्भावामुळं आपल्यातली माणुसकीही गोठून गेलेली नाही, हे दाखविण्याची आपल्याला संधी आहे. ऋतू येत असतात, जात असतात... माणुसकीची ही परिक्रमा मात्र आपल्यासोबत अखंड चालत असते... नाही का!

गाणं - शिफारस - देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी (सुधीर फडके)
---

No comments:

Post a Comment