14 Apr 2015

पंजाब डायरी - भाग १

१. पंजाबकडं प्रस्थान...
------------------------------------------मी तसा फार फिरणाऱ्यातला नाही. म्हणजे हौस भरपूर आहे, पण फिरायला वेळ आणि पैसा दोन्ही माझ्याकडं नाही. पण कधी तरी या दोन्ही गोष्टी जमवून आम्ही ट्रिपा काढतोच. काश्मीर, कन्याकुमारी ही दोन्ही टोकं घडली... बाकीही तमिळनाडू, केरळ, ओरिसा, दिल्ली, गोवा, हैदराबाद असा काही भाग बघून झालाय. एक अपघाती परदेशवारीही घडली. पण आपल्या देशातली काही महत्त्वाची राज्यं माझी अजूनही पाह्यची राहिली आहेत. पंजाब हे आत्तापर्यंत त्यातलं एक प्रमुख राज्य होतं. पण नुकतंच तेही घडलं. घुमानचं साहित्य संमेलन हे त्याचं मुख्य निमित्त. त्याला जोडूनच पर्यटनही करण्याचा विचार इतर अनेकांप्रमाणं माझ्याही मनात बळावला. मागच्या वर्षी जुलैत हे संमेलन घोषित झालं, तेव्हा फारसं काही जावंसं वाटत नव्हतं. मात्र, मागच्या डिसेंबरमध्ये मित्रवर्य अभिजित पेंढारकरसह बोलताना हा विषय निघाला आणि आम्ही दोघांनीही जायचं फायनलच करून टाकलं. ‘सकाळ’मधले माझे माजी सहकारी अरविंद तेलकर एकदा आमच्या ‘मटा’च्या ऑफिसात आले असताना, हा विषय निघाला आणि त्यांनीही आमच्याबरोबर येण्याची तयारी दर्शविली. तेलकर यांना आम्ही प्रेमानं, लाडानं ‘मामू’ म्हणतो. मामूंचा फिरण्याचा उत्साह साठी ओलांडल्यानंतरही अचाट आहे. आणि महत्त्वाचं ते आमच्यासोबत मित्रासारखंच वागतात. आम्ही त्यांना वाट्टेल ते बोलतो, चिडवतो, कामाला लावतो; पण मामू संतांना लाज येईल एवढ्या शांतपणानं सगळं सहन करतात. शिवाय ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत. त्यामुळं आमचा तिय्या लगेच जमून गेला. मग आम्ही मसापमध्ये जाऊन तेथील प्रतिनिधी शुल्क प्रत्येकी १५०० रुपये भरून टाकलं. माधवीताईंना भेटलो. तिथंच माझी मावसबहीण गौरी (लग्नोत्तर स्नेहल दामले... ह. मु. सातारा) भेटली. ती तिथं सूत्रसंचालन करणार होती. माझी मावशी व काकाही येणार होते. एकूण भरपूर लोकं निघाली आहेत, हे कळलं. अर्थात संमेलनाच्या त्या खास रेल्वेनं जायचं नाही, असं आम्ही आधीच ठरवलं होतं. कारण आम्हाला एसी कोचच हवा होता. मग मुंबई (बांद्रा टर्मिनस) ते अमृतसर ही रोज धावणारी सुपरफास्ट पश्चिम एक्स्प्रेस आम्ही फायनल केली. आमच्याकडं (म्हणजे ब्रह्मे आणि पेंढारकर कुटुंबीय) ट्रिप ठरली, की ऑनलाइन बुकिंग वगैरे करण्याचं काम हर्षदाकडं (सौ. पेंढारकर) असतं. तिनं याही वेळी धडाक्यात आमची जाताना अन् येतानाची बुकिंग करून टाकली. शिवाय पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवासाचंही बुकिंग केलं. त्याच्या प्रिंट वगैरे व्यवस्थित काढून प्रत्येकाला एक कॉपी देण्याचं मेलवर किंवा व्हॉट्सअपवर पाठवण्याचं कामही तिनं उत्साहात केलं. लग्न झाल्यापासून आम्ही, म्हणजे मी व अभिजित आमच्या कुटुंबांना सोडून पहिल्यांदाच पुन्हा एकेकटे निघालो होतो. यापूर्वी आम्ही भरतपूरच्या केवलदेव घना राष्ट्रीय अभयारण्याची ट्रिप केली होती. त्यालाही बारा वर्षं होऊन गेली होती. मध्यंतरी ऑफिसनं पाठवलं म्हणून एकदा बेंगळुरू अन् एकदा उदयपूरचा एकट्यानं प्रवास घडला होता. पण आता एवढ्या दिवसांनी मुलं आणि बायकोला सोडून जायचं ऐन वेळी आमच्या अगदी जिवावर आलं. त्यात मुलांची परीक्षा चालू होती आणि बायकोवर हा भार टाकून आपण एकटेच मजा करायला निघालोय, या विचाराचा फारच अपराधगंड आला. पण आता दोर कापले होते. शिवाय मामूही केवळ आम्ही निघालोय म्हणून आमच्यासोबत निघाले होते. त्यांचा हिरमोड झाला असता. शेवटी पुन्हा आता असं एकेकटं जायचं नाही, असा वज्रनिर्धार (माझ्यापुरता) करून, आम्ही घुमानवारीला सज्ज झालो.
एक एप्रिलला सकाळची ‘डेक्कन क्वीन’ गाठून आम्ही मुंबईला जाणार होतो. तिथून सकाळी ११.३५ ला निघणारी पश्चिम एक्स्प्रेस आम्हाला गाठायची होती. पहाटे पाचचा गजर लावून झोपलो. चार वाजून ४० मिनिटांनी माझा मोबाइल वाजायला लागला, म्हणून धनश्रीनं मला उठवलं. माझे काका अ. ल. देशमुख यांचा फोन होता. एवढ्या पहाटे त्यांनी का फोन केला असेल, या शंकेनं मी त्यांना उलट फोन लावला. मुंबईवरून येणारी गाडी लेट आहे का, असं ते विचारत होते. अर्धवट झोपेत मला काहीच कळेना. मी त्यांना सांगितलं, की अहो, मी घरी आहे. मग कळलं, की संमेलनाची स्पेशल ट्रेन अजून आलेलीच नाहीये आणि ती लेट आहे. त्यांना गौरीनं असं सांगितलं होतं, की मी मुंबईवरून येणाऱ्या संमेलनाच्या स्पेशल ट्रेनमध्ये आहे. म्हणून त्यांनी मला फोन केला होता. शेवटी आम्ही स्टेशनवर गेलो तेव्हा कळलं, की ती विशेष रेल्वेगाडी अजूनही आलेली नाहीये. घुमानवारीचे सर्व वारकरी स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. अर्थात आमची ‘डेक्कन क्वीन’ वेळेत सुटली आणि आम्ही निघालो. नंतर या ट्रेनचे अपडेट्स (आणि तिला होणारा उशीर) पुढं घुमानला पोचेपर्यंत आमच्या कानावर येत राहिले. 
मला मुंबईला जायला नेहमीच आवडतं. दर वेळी नवनवे बदल होताना दिसतात. नवे अनुभव येतात. आम्ही दादरला उतरून पश्चिमेला केशवसुत पुलावर उतरलो. तिथून एका म्हातारबुवांची टॅक्सी केली. माझा मुंबईतला टॅक्सीचा अनुभव आत्तापर्यंत फारच चांगला होता. या वेळी पहिल्यांदा या म्हाताऱ्या टॅक्सी ड्रायव्हरनं ‘नष्टर’ लावली. ‘पुढं फार गर्दी आहे. माहीमला ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही लोकलनंच का नाही गेलात, आता तुम्हाला रेल्वे कशी मिळणार...’ आदी बडबड त्यानं सुरू केली. कुठून याच्या टॅक्सीत बसलो असं झालं. हे सगळे जादा पैसे उकळण्याचे धंदे होते, हे कळत होतं. शेवटी माहीमच्या (नसलेल्या) ट्रॅफिक जॅममधून पुढं गेल्यावर म्हाताऱ्याच्या टॅक्सीचा क्लचच तुटला. त्याची बडबड एकदम थांबली आणि तोंड बारीक झालं. मग आम्ही ‘हुश्श’ करून खाली उतरलो आणि ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ या न्यायानं एक रिक्षा केली. मुंबईत मी पहिल्यांदाच रिक्षात बसलो होतो. वांद्रे स्टेशनच्या आणि बेहरामपाड्याच्या दारातून जाताना ही मुंबईच आहे का, असा प्रश्न पडला. (या बकालपणाचं अखिल भारतीय दर्शन पुढं सात दिवस होणार होतं, याची ही झलक होती.) वांद्र्यात निवडणुकीचं वारं दिसलं. राणेंची पोस्टर वगैरे दिसली. बांद्रा टर्मिनसला मी प्रथमच येत होतो. तिथल्या कँटीनमध्ये आम्ही सँडविच खाल्लं. (यापेक्षा आमचा नीलही घरी चांगलं सँडविच करतो. असो.) तिथून सब-वेतून पलीकडच्या फलाटावर जाताना मुंबईच्या पोलिसमामानं मला अडवलं. घुमानच्या साहित्य संमेलनाला निघालोय, असं मी ठणकावून सांगितलं आणि वर पत्रकार असल्याचं सांगितलं. मग सहज सुटका झाली. (पण त्यानं मलाच का अडवलं, हे कळलं नाही. कदाचित बर्म्युड्यावर असल्यानं असेल.) आमची गाडी वेळेत सुटली. आमच्या थ्री-टिअर एसी डब्यात हुबळी-धारवाडकडची वैष्णव मंडळी होती. सगळा डबा त्यांनीच भरला होता. एकजात सगळे पुरुष धोतरावर आणि गंध-शेंडीवाले! नंतर त्यांच्याशी आमची चांगली दोस्ती झाली. ही मंडळी कुरुक्षेत्रावर निघाली होती. (पण आमच्याशी भांडली नाहीत.) यांनी कुठल्याही स्टेशनवर काहीही विकत घेतलं नाही. सगळं घरून आणलं होतं. आम्ही रेल्वेतलं खाणं घेऊन खायला लागलो, की दयार्द्र नजरेनं आमच्याकडं पाह्यचे. संध्याकाळीही सात वाजताच जेवून गुडूप झोपी जायचे. सकाळी मात्र लवकर उठून कन्नडमध्ये अखंड बडबड सुरू व्हायची. आम्हीही मामूंच्या लॅपटॉपवर ‘साउंड ऑफ म्युझिक’ लावून, ‘आयाम सिक्स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन’ हे त्यांना दाखवून दिलं. पुढं बडोद्याला गुजराती महिलांचं भजनी मंडळ डब्यात शिरलं आणि ‘आंतरभारती’ पूर्ण झाली. या महिलांनी आल्यापासून भजनं, गाण्याच्या भेंड्या सुरू करून आमचं भरपूर मनोरंजन केलं. 
रात्री रतलाम स्टेशनला गाडी बराच वेळ थांबली, तेव्हा आम्ही वरच्या जिन्यापर्यंत शतपावली करून आलो. फोटो काढले. (इथं आमच्या करिनाची आठवण येणं स्वाभाविक होतं.) दुसऱ्या दिवशी सकाळी बडोदावाल्या सगळ्या गोपी मथुरेत उतरल्या आणि आमचा टाइमपास संपला. आमच्या डब्यातल्या एका वयस्कर आजोबांनी मथुरेच्या स्टेशनवर उतरून, फलाटालाच वाकून नमस्कार केला. मला आधी काही कळलं नाही. मग एकदम डोक्यात प्रकाश पडला. मीही किसनरावांच्या जन्मभूमीला मनातल्या मनातच वंदन केलं आणि गाडीत येऊन बसलो. 
दिल्ली येऊ लागलं, की आजूबाजूंच्या गावांतल्या भिंती पाह्यच्या. आपला सगळा देश फक्त गुप्तरोगांनी त्रस्त आहे की काय, असं वाटावं. प्रत्येक भिंत विविध गुप्तरोगांचं वर्णन करून अमुक हकीम से मिलीए, तमुक डाक्टर से मिलीए हे असले मोठ्या चुन्यात रंगवलेले संदेश सुरू होतात. ‘निःसंतान मिलीए’ हे वेगळंच असतंच. आणि प्रत्येक रोगाचा वारही ठरलेला. पूर्वी एक ‘डा. शेख’ फेमस होता. अलीकडं तो दिसत नाही. (कदाचित पलीकडं गेला असावा.) शिवाय अशा भिंतींच्या पुढं लांबलचक आडवी पसरलेली गटारं आणि अलीकडं रेल्वेतून फेकलेला प्लास्टिक कचरा अन् पलीकडं सुखेनैव त्या गटारातून फिरणारी डुकरं हे नेपथ्य पाहिजेच. आम्ही एसी डब्यात होतो; अन्यथा या सर्वांच्या जोडीला येणारा तो सुवास (अहाहा!) मिळून पंचेद्रियांची तृप्ती झाल्याशिवाय राहत नाही.
दिल्लीपर्यंत मी पूर्वी अनेकदा आलो होतो. म्हणून दिल्लीनंतर नवा प्रदेश पाहण्याच्या हेतूनं दारात जाऊन उभा राहिलो. रेल्वेतून असा नवा प्रदेश न्याहाळणं हा माझा आवडता छंद आहे. मला नुसतंच डब्यात बर्थवर लोळणं किंवा सतत पुस्तक वाचणं आवडत नाही. डब्या-डब्यांतून फिरणं आणि दारात उभं राहणं हा प्रवासातला सर्वांत आनंददायक भाग असतो. थोड्याच वेळात पानिपत आलं. 
स्टेशनवरचं ‘पानिपत जंक्शन’ हे नाव वाचलं अन् थरारलो. बराच वेळ मन ‘ट्रान्स’मध्ये गेलं. उजव्या बाजूला बघत राहिलो. त्याच बाजूला होता कुठं तरी तो काला आम! अडीचशे वर्षांपूर्वी इथं सदाशिवरावभाऊ अन् विश्वासरावांनी गाजवलेला पराक्रम आठवला. आता तिथं गव्हाची शेती लांबवर पसरली होती. मराठ्यांच्या रक्ताचं शिंपण झालेली ती पावन भूमी आजही सुपीकच होती. टनावारी धान्य उपजत होती. मी खिडकीतूनच हात जोडले...
...भराभर स्टेशनं मागं पडत होती. कुरुक्षेत्र स्टेशनावर आमचा सगळा डबा रिकामा झाला. या मंडळींचं सामान उतरवायला आम्ही मदत केली. थोड्याच वेळात गाडी पंजाबच्या सुजलाम-सुफलाम भूमीत शिरणार होती... माझं मन ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधल्या त्या सरसोंच्या शेतात जाऊन पोचलं होतं... गाणं ओठी येत होतं - तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दिवाना सनम...
ओए मेरी पंजाब दी मिट्टी.... मैं आ रहा हूँ...

                                                                        (क्रमशः)

No comments:

Post a Comment