‘प्रेमळ’ आठवणींचा गुलकंद...
----------------------------
‘व्हॅलेंटाइन डे’ हे शब्द उच्चारल्यावर अंगावर गोड शिरशिरी वगैरे येण्याच्या कुठल्याही क्वालिफाइड वयात आत्ता चाळिशीत असलेले किंवा चाळिशी ओलांडलेले आम्ही कुणीच नाही. पण तरीही चाळिशीतल्या आम्हा चोरांना आमचं वय जणू काही विशीतच ‘अजुनी रुतुनी आहे’ असं वाटत असतं. वास्तविक ज्या वयात हे ‘डे’ वगैरे साजरे करायचे त्याच वयात ते रीतीनुसार साजरे केले असते, तर पुढं असे पोकळ आठवणींचे दिवस घालायची वेळ आली नसती. तर ते असो. मात्र, दर वर्षी १४ फेब्रुवारी जवळ यायला लागला, की आमच्या आठवणींच्या डब्यातून दिवंगत प्रेम इ. भावनांचा गुलकंद बाहेर निघतोच निघतो. आता कुणी म्हणेल, की या आठवणी काय चाटायच्या आहेत? मात्र, वाढत्या वयानुसार, अशा आठवणींचा गुलकंद चघळला असता, सद्यस्थितीतील आपली दारूण अवस्था पाहून उफाळणारे पित्त किंचितसे शांत होते, असा अनुभव आहे.
आमच्या त्या वयातील दिवसांचे वर्णन काय करावे! अहाहा!! भारत व पाकिस्तान ही शत्रुराष्ट्रे बरी, अशी फाळणी मुलगे आणि मुली या दोन मूलभूत मानवी वर्गांत झाली होती. त्यातून शाळेचे वर्ग, तुकड्या वगैरे सामान्य वर्गवारी वेगळीच! मुलांनी मुलींशी किंवा मुलींनी मुलांशी बोलणे म्हणजे अबब! त्या त्या वयातल्या नैसर्गिक भावना रूढी-रिवाजांच्या कडी-कुलपांत अशी काही बंदिस्त करून टाकल्या होत्या, की आपल्याला जे काही वाटतंय, जे काही करावंसं वाटतंय ते म्हणजे एक महाभयंकर आजार आहे, अशीच समजूत घट्ट होत गेली. अशा रोगट वातावरणात वाढलेली आमची पिढी पुढं ना मुलींशी निखळ मैत्री करू शकली, ना त्यांच्या भावभावनांना नीट साद देऊ शकली... तीच गोष्ट मुलींचीही झाली असणार, यात शंका नाही. त्यामुळेच एक मुलगा आणि मुलगी चुकून एकमेकांशी बोलले, तरी त्यांची नावं शाळेच्या चतु:सीमांवरील भिंतीवर हृदयात बाण कोरून लिहिली जायची. इतकंच काय, शिक्षक व शिक्षिकांचीही जोडी लावून त्यांना याच बदामात बंदिस्त केलं जायचं. समान वयाचे मुलगा आणि मुलगी यांच्यात एक तर बहीण-भाऊ, नाही तर थेट नवरा-बायको एवढी दोनच नाती असू शकतात, असा सार्वत्रिक आणि दीर्घकालीन समज आमच्या पिढीच्या मनावर एखाद्या शिलालेखासारखा कोरून ठेवण्यात आला होता. याच्या अधले मधले कुठलेही नाते ‘लफडे’ या एकाच कॅटॅगरीत मोजले जायचे.
आमच्या वेळी पालक व शिक्षक या दोन्ही महान संस्थांचा एवढा जबरदस्त धाक होता, की त्यातून आमची पिढी अजूनही बाहेर आलेली नाही. मुला-मुलींना एकत्र शिक्षण देण्याची पद्धत होती; पण चुकून-माकून ते बोलले, तर काही तरी महाभयंकर अनर्थ होईल, असं वातावरण सभोवती होतं. आता विचार करता, त्यामागचा त्या पिढीचा काय हेतू असेल, हे उमगू शकतं. मात्र, तरीही एवढ्या कडेकोट बंदोबस्तात त्या नात्याला कुलपं ठोकायची गरज नव्हती.
जिथं बंधनं आली तिथं ती तोडण्याचीही ऊर्मी आलीच. त्यामुळं आमच्या पिढीतून काही अफलातून प्रेमवीर निपजले. रूपेरी पडद्यावरून आचरट चाळे करून, असल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांना मार्गदर्शन करायला गोविंदापासून ते मिथुनपर्यंत आणि नंतर सलमानपासून ते शाहरुखपर्यंत समस्त नटमंडळी हजर होतीच. त्यातून मग हाताच्या नसा कापून घेण्यापासून ते रक्तानं प्रेमपत्रं लिहिण्यापर्यंत बऱ्याच रक्तरंजित ‘व्हॅलेंटाइन डें’चं साक्षीदार आम्हाला व्हावं लागलं. शरीरात होणाऱ्या नैसर्गिक बदलांना कसं सामोरं जायचं, याचं कुठलंही मार्गदर्शन आमच्या पिढीतल्या मुलग्यांना कुणी केलं नाही. त्यामुळं ती ऊर्जा भलत्या मार्गानं बाहेर पडायची ती पडली. निकोप नात्याचं शिक्षण न मिळाल्यानं मग ओरबाडून घेण्याची सवय जन्माला आली. त्यातूनच रिंकू पाटीलपासून ते अमृता देशपांडेपर्यंत अनेक मुली हकनाक बळी गेल्या. आज विचार करताना वाटतं, की खरंच, गंमत म्हणून एखाद्या मुलीला गुलाब देण्याइतपत निकोप वातावरण आजूबाजूला असतं, तर काय झालं असतं? त्यातून वाईट नक्कीच काही झालं नसतं. विरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दल एवढ्या संवेदनशील वयात एक तर टोकाचं आकर्षण किंवा तिरस्कार या दोनच भावनांचं पोषण का झालं असावं? अर्धवट वयातही ‘अगर तू मेरी नही हो सकती तो किसी और की भी नहीं’ वगैरे विकृत विचार का जन्माला आले असावेत?
अस्मादिकांच्या बालमनावर एवढे ‘सुसंस्कार’ झाले होते, की लग्न होईपर्यंत कुठल्याही मुलीला काहीही ‘तसलं’ विचारायची किंवा बोलायची हिंमतच झाली नाही. मीच नव्हे, तर माझ्या संपूर्ण पिढीची जवळपास हीच कथा होती. अशा वातावरणात वाढल्यानंतर कुठला ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि कसला ‘रोझ डे’? त्यातून आमच्या वेळी संस्कृतीरक्षणाची उबळ नव्यानंच जन्माला आली होती. आधीच मनात भयाचे हजार सर्प वळवळत असताना, हा संस्कृतीरक्षणाचा अजगर कोण गळ्यात घालून घेणार? त्यामुळं आम्ही जे काही गुलाब दिले (वा घेतले) ते फक्त मनातल्या मनातच! तिथं मात्र असल्या कुठल्याही जुलमी संस्कारांची मर्यादा आड आली नाही. त्यामुळं तिथं केवळ एका गुलाबानं भागायचं नाही, तर आख्खी नर्सरीच मनात वस्तीला यायची.
आदल्या दिवसापासूनच मग ‘तिचे’ वेध लागायचे. हा ग्रहणाच्या आधी असतो, तसलाच काळ असायचा. ती येईल का, आली तर आपल्याला दिसेल का, भेटेल का, निदान स्माइल तरी देईल का, तिला दुसरा कोणी तर आज गुलाब देणार नाही ना अशा शंकांनी आमचं अल्लड मन पोखरायचं. स्वत: गुलाब देण्याची प्राज्ञा नव्हतीच. त्यामुळं तो विकत घेण्याचा खर्च तेवढा वाचत असे. त्या दिवशी धडधडत्या हृदयानं उगाच इकडून तिकडं शाळेत व नंतर कॉलेजात अस्मादिक हिंडत असत. ‘ती’ दिसली तरी धन्य वाटायचं. मनातल्या गुलाबाचा राजमार्ग व्हायचा आणि त्यावरून मन सुसाट दौडत कुठल्या कुठं हिंडून यायचं. तो दिवस तसाच संपून जायचा. मनातल्या मनातच सगळे आनंद मिळायचा तो काळ! त्यात हेही आलंच...
आयुष्यात कुणावर तरी मनसोक्त प्रेम करता यावं आणि ते प्रेम एवढं नि:स्वार्थी, त्यागमय वगैरे असावं असले विचारही डोक्यात येत नसत. मात्र, असं खरंच तेव्हा कुणी शिकवलं असतं तर? आमच्या सगळ्या पिढीचंच आयुष्य कदाचित वेगळंच झालं असतं. शहरी आणि ग्रामीण फरक म्हणावा तर दोन्हीकडच्या मुलग्यांना सारखेच अनुभव आल्याचं लक्षात येतं. तेव्हा प्रश्न हा नव्हताच. प्रश्न तेव्हाच्या पालक पिढीच्या मानसिकतेचा होता. सुदैवानं आजचे पालक तसे नाहीत. मुलांच्या मानसिकतेचा वगैरे हल्ली विचार केला जातो, ही चांगलीच गोष्ट आहे.
आमच्या पिढीचं तारुण्य ‘प्रेमबिम थेरं केलीत तर याद राखा’ अशा धमक्यांना तोंड देण्यातच सरलं. आता ‘जगाला प्रेम अर्पावे,’ या सानेगुरुजींच्या वचनाचा फारच आध्यात्मिक अर्थ आम्ही घेतो. पण त्या कोवळ्या वयाला जी एका प्रेमाच्या हाकेची गरज होती, ती कधीच पूर्ण होऊ शकली नाही. त्या कथित संस्कारांच्या, रुढी-परंपरांच्या अनाम बंधनानं आम्ही पार जखडून गेलो होतो. त्यामुळं मनात आलं, ते कधीच ओठावर येऊ शकलं नाही. दर वर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ आला, की आम्हाला आमचं व्यर्थ गेलेलं तारुण्य आठवतं आणि आठवणींचा गुलकंदही कडवट लागायला लागतो...
पण, अशा वेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आठवतात. ‘प्रेम कुणावरही करावं’ हे त्यांचे शब्द आठवतात. मग आम्ही नव्यानं गुलाब शोधायला बाहेर पडतो... दहा रुपये देऊन गुलाब आणतो. डझनाहून अधिक वर्षं आमचा संसार करीत असलेल्या अर्धांगाला तो गुलाब देतो. मग ऐन फेब्रुवारीतही वातावरण जरा हिरवं झालेलं जाणवतं...
----
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, संवाद पुरवणी; १० फेब्रुवारी २०१९)
----
👍
ReplyDeleteThank you
Deleteमनातली नर्सरी 😃
ReplyDelete