28 Jul 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ६

साहित्यिक सर्जिकल अट्याक...
--------------------------------------

साहित्याशी आपली जन्माची गाठ बांधली गेली आहे, याची खूणगाठ आम्ही बालवयातच बांधून ठेवली आहे. लहानपणी फटाक्यांच्या खोक्यापेक्षा आम्हाला दिवाळी अंकांतल्या चौकटी आणि खिडक्या आवडू लागल्या होत्या, तेव्हाच घरच्यांनीही 'ठोंब्याचे अवलक्षण' ओळखले होते. कालांतराने आम्ही वयात इ. आल्यानंतर फटाक्यांतल्या लवंगी आणि ॲटमबॉम्बपेक्षा दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर झळकणाऱ्या 'लवंगी' आणि 'आयटेमबॉम्ब'मधली आमची रुची जगजाहीर झाली होती. दिवाळी अंकांचे आणि आमचे असे प्रेम जडले ते तेव्हापासून... मग काही चोरट्या-किरट्या आठवणी... अर्थात् काही अंक चोरून वाचण्यात जी मजा असायची ती आता खुलेपणाने गोष्टी करूनही नाही मिळत! तर ते असो. दिवाळी अंकांच्या वाचनातील 'मौज' पूर्वीच ओळखल्यामुळं आम्ही पुढं लेखकू होणार, यात 'नवल' नव्हते. आपणच साहित्यसृष्टीतले 'हंस', असा एक आमचा समज होता. पण भल्याभल्यांनी 'आवाज' टाकल्यानं आमच्या भवितव्याचं 'अक्षर' स्पष्टच दिसून आलं होतं. त्या वाटेवर अनेक 'मेनका', 'मोहिनी' असल्या, तरी फुकाची 'चपराक' खायला लागेल, म्हणून आम्हीच आमचं साहित्यविषयक ज्ञान गुंडाळून ठेवलं होतं. कितीही 'साधना' केली, अगदी 'सत्याग्रही' झालो, तरी साहित्य क्षेत्रातील यशाचे 'ऋतुरंग' दिसतीलच, याची शाश्वती नव्हती. इथं शेवटी लोकांची इच्छा, 'लोकसत्ता' महत्त्वाची; उगाच 'लोकमत' आपल्या मागे आहे, असा खोटा समज करून समाधानाचा 'दीपोत्सव' साजरा करण्यात काहीच मतलब नव्हता. 'कालनिर्णय' अगदी स्पष्ट होता. आमचं लेखक म्हणून भवितव्य अगदी धूसर दिसू लागलं होतं. 'ग्रहांकित' मंडळींनीही पाठ फिरविली होती. आता फार ताणण्यात अर्थ नव्हता...
शेवटी आम्ही निर्णय घेतला. साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा... काट्यानं काटा काढायचा. लेखक म्हणून यशस्वी व्हायचं असेल, तर आधी दिवाळी अंकांतच लेख लिहून प्रसिद्ध व्हायचं. मग आपोआपच लोक आपल्याला मोठा लेखक म्हणू लागतील. आम्ही 'फास्टर फेणे' नसतानाही आनंदानं 'ट्टॉक' केलं. काही लोकप्रिय लेखकांचा अदमास घेतला. काही ठरावीक अंकांत तेच तेच लेखक वर्षानुवर्षं एकाच साच्यातून लेखरूपी पीठ पाडत होते, असं लक्षात आलं. हे अंक फार नामवंत होते, प्रख्यात होते. तिथं आमच्यासारख्यांना प्रवेश मिळणं अशक्यच होतं. 'साभार परत'चं सौजन्यही हल्ली कुणी दाखवत नाही, हे गुपित आमच्या एका कविमित्रानं आमच्याबरोबर एका 'कवि'स्थळी रात्रीच्या उत्तरकाळात, जमिनीपासून अदमासे दहा हजार फुटांवरून त्याचं फ्लाइट उडत असताना शेअरलं होतं. तेव्हा आम्ही त्या नामवंत अंकांचा नाद सोडला. 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' असं त्या नतद्रष्ट मित्रानं आम्हाला तिथल्या तिथं ऐकवल्यावर त्याचं बिल न भरण्याचा बाणेदारपणा दाखवून आम्ही कोल्ह्याइतकाच धूर्तपणा दाखवून डाव साधला होता. तर ते असो.
एकाच वेळी पन्नास दिवाळी अंकांत लेख लिहायचा महासंकल्प आम्ही ऐन एप्रिलच्या उकाड्यात, एका संकष्टीचा उपास सोडताना, म्हैसूरपाकाचा तुकडा मोडताना मनातल्या मनात सोडून टाकला. दिवाळीला अजून सहा महिने होते. एका महिन्यात आठ ते नऊ लेख पाडावे लागणार होते. आमच्या बेनसन-जानसन टाइप कंपनीत अगदी सरकारी नोकरीएवढा नव्हता, तरी पुष्कळच आराम होता. त्यामुळं त्या आघाडीवरून काही धोका नव्हता. रोजच्या रोज तिथं हजेरी लावणं एवढाच काय तो कटकटीचा भाग होता; पण तेवढा नाइलाज होता. तर या दिवाळी अंक लेख मोहिमेत आम्हास आमच्या परममित्राची फार मदत झाली. (हा कवी नव्हे. हा एलआयशीवाला...) त्यानं त्याच्या लायब्ररीतून गेल्या वर्षीच्या पन्नासेक दिवाळी अंकांचा गठ्ठा आमच्यासमोर आणून आदळला. या बदल्यात त्याला एकदा तीर्थप्राशनास न्यावयाचे, हे परवडण्याजोगे होते. (बाकी हा मित्र त्या आमिषापायी हिमालयसुद्धा उचलून आणू शकतो. वर 'बर्फाची कायमची सोय झाली,' हेही ऐकवायला कमी करणार नाही. तर ते असोच.) तर ते अंक बघून आमचे डोळे लकाकू लागले. विशेषतः ज्योतिषविषयक, पाककृतीविषयक आणि सिनेमाविषयक विशेषांक बघून तर हर्षवायू व्हायला बाकी राहिला. आम्ही तसे हातखंडा लेखक आहोत. सांगाल त्या विषयावर आणि सांगाल तितक्या शब्दांत लेख लिहून देणं हा आमच्या डाव्या हातच्या बोटांचा खेळ आहे. (पूर्वी डाव्या हातचा मळ म्हणत असत; पण आता कळफलक असल्यानं डाव्या हातची 'कळ' म्हणायचा पाहिजे खरं तर... तर पुन्हा असो.) त्यामुळं या अशा विशेषांकात आपण सहज पंधरा-वीस लेख उडवू, असं एक विलक्षण स्फुरण आम्हास चढलं. आमचे बाहू अचानक फुरफुरू लागले. समोरचं कुरकुऱ्यांचं पाकीट फोडून आम्ही संगणकावर 'एंटर' मारला आणि आमचा साहित्ययाग सुरू जाहला...
बसल्या बैठकीला आम्ही एक पाककृतीविषयक लेख लिहून काढला. पाककृतीविषयक लेख लिहायला आपल्याला स्वतःला स्वयंपाक करता यावा लागतो, हा अज्ञ लोकांचा भ्रम आहे. आमच्यासारखे साहित्यिक असे भ्रम बाळगू लागले, तर लिहावे कसे? हे म्हणजे नदीवर लेख लिहायचा असेल, तर पोहायला येणे आवश्यक आहे, असे म्हणण्यासारखेच वेडपटपणाचे होय. हल्ली भटकंतीला गेलं, की कुठं ना कुठं तरी एक लोकप्रिय खाद्यपदार्थांचा स्पॉट असतोच असतो. आमच्या पायाला अगदी भिंगरी लागलेली नसली, तरी आम्हीही बऱ्यापैकी फिरतो. तेव्हा चार खादाडीची ठिकाणं ठाऊक आहेत. तेथील अनुभवांची जंत्री गोळा केली, तर सुमारे सोळा ठिकाणं निघाली. मग एका लेखात चार ठिकाणं घालून चार लेख तयार केले आणि चार दिवाळी अंकांच्या मेल आयडीवर टिच्चून सेंड करून टाकले. चार लेख तयार करताना एक टेम्प्लेटच तयार करून घेतलं. असले लेख लिहिताना रिपोर्ताज पद्धती उपयोगाला पडते. त्या खाद्याच्या स्पॉटवर पोचेपर्यंतचं प्रवासवर्णन करीत राहायचं. तिथंच निम्मा लेख भरतो. उदा. 'कार्तिकाचे दिवस. थंडी मी म्हणत होती. भल्या पहाटे बाइक काढून तीन मित्र निघालो. पुण्यातून बाहेर पडताना वेळ कमी लागला, पण झोंबता वारा अंगाशी खेळू लागल्यानं जठराग्नी भडकला. उत्तर दिशेला निघालेला हा हायवे आपल्याला सह्याद्रीच्या कुशीची सैर घडवतो. डाव्या बाजूला भगीरथगडाचे सुळके दिसू लागले होते. सोनटाक्यांचं पाणी दूरूनही लकाकताना दिसत होतं. त्याच वेळी भय्याच्या मिसळीच्या आठवणीनं तोंडाला पाणी सुटत होतं...' अशी एक प्रस्तावना लिहून टाकायची. दुसऱ्या लेखाच्या वेळी कार्तिकाच्या जागी अश्विन, बाइकच्या जागी कार, तीनच्या जागी दोन मित्र, उत्तरेच्या ऐवजी दक्षिणेचा हायवे, 'डाव्या'ऐवजी उजव्या, भगीरथगडाऐवजी भरतगड, भय्याच्या जागी अप्पा आणि मिसळीच्या जागी कांदाभजी टाकून द्यायची... हाय काय अन् नाय काय!
थोडक्यात काय, साहित्यिक सर्जिकल अट्याक करायचा, हे नुस्तं 'खळ्ळं खट्याक' करण्याइतकं सोपं काम नाही. त्याला फार दांडगा उत्साह, अफाट पूर्वतयारी आणि कॉपीचा (म्हणजे मजकुराचा) अचाट सराव लागतो. रात्री-बेरात्री मजकूर टंकताना कॉफी ढोसून रात्री काढण्याचाही सराव आवश्यक असतो. बसल्या बैठकीला चार ते पाच मध्यम आकाराचे लेख उडवण्याचा आम्हाला आता अगदी सराव झाला आहे. पाककृतीविषयक दिवाळी अंकांचा अभ्यास केला असता, असे लक्षात आले, की या अंकांमध्ये येणाऱ्या मजकुराचाही एक साचा झाला आहे. उकडीच्या मोदकाप्रमाणे या साच्यातूनही अनेक लेख बाहेर काढता येतात. अगदी वर दिलेल्या नमुन्यासारखे! पाककृतीविषयीचे आमचे लेख फारच चविष्ट झाले आहेत, असं आमचं मत झालं. नमुन्यादाखल एक लेख कुटुंबाला वाचायला दिला असता, झरझर नजर फिरवून तिनं तो आमच्याकडं पुन्हा भिरकावला. 'हा लेख गेल्या वर्षीच वाचलाय,' या तिच्या टिप्पणीनं तर आम्हाला उकळत्या काहिलीत फेकल्यासारखं झालं. यापुढं आपलं दिवाळी अंकाचं साहित्य हे गोपनीय ठेवायचं आणि अंकात छापल्यानंतरच ते लोकांना वाचायला द्यायचं ही खूणगाठ मनात बांधून ठेवली. (अंकात छापून आल्यानंतरही काही लेख अंकासकट गोपनीय राहतात, हा भाग वेगळा!) आपल्या साहित्यसेवेची आणि लेखांची कदर आज ना उद्या कुटुंबाला, मग आमच्या सोसायटीला, मग समाजाला आणि मग समस्त देशाला होईल, या आशेवर आम्ही तगून आहोत. आशा बाकी भारी चिवट!
पाककृतीवरच्या लेखांचा फडशा पाडल्यानंतर आम्ही ज्योतिषविषयक लेखनाकडं वळलो. वास्तविक आम्हाला आमचा भूतकाळ फारसा लक्षात राहत नाही, वर्तमानाविषयी तर आम्ही कायमच दुग्ध्यात पडलेलो असतो, तर भविष्याविषयी काय सांगणार वा लिहिणार, डोंबलं! पण दिवाळी अंक साहित्ययाग सुरू झालेला असल्यानं त्यात केवळ आमच्या प्रतिभेचीच नव्हे, तर अशा तर्कदुष्ट, विवेकी इ. प्रश्नांचीही समिधा पडत होती, हे आमच्या लक्षात आलं. मग फार विचार न करता, आम्ही ज्योतिषविषयक लेखन करायला सुरुवात केली. वास्तविक, पेपरांत उपसंपादकी करीत असताना रोजचं बारा राशींचं भवितव्य ठरवण्याचा अनुभव पाठीशी होता. मात्र, आम्ही थेट ज्योतिषाविषयी लेखच लिहू, हा होरा काही कुणीही वर्तवलेला नव्हता, हे खरं. आम्ही 'चालू' वर्तमानकाळ या कॅटॅगरीतले इसम असल्यानं (फक्त 'चालू'ला अवतरण टाकलंय का? ते 'वर्तमानकाळ'पर्यंत आहे हो!) लेखन करतानाही कधी भविष्यकालवाचक क्रियापदं हातून लिहिली जात नाहीत. त्यामुळं सुरुवातीला गडबड उडाली. पुढच्या वर्षीचं, अर्थात २०१७ सालचं भविष्य लिहितानाही 'होईल'ऐवजी 'झाले आहे' असंच लिहिलं जाऊ लागलं, तेव्हा आम्ही 'छोटा सा ब्रेक' घेतला. डोळे बंद करून स्वतःचं भविष्य डोळ्यांसमोर आणलं. फार काही आशादायक दिसेना, तसा आणखी त्रास व्हायला लागला. तेव्हा पाककृतीप्रमाणेच बसल्या बैठकीत याही चार-पाच लेखांचा फन्ना उडवायचा, असा वज्र की कायसा म्हणतात, तो निर्धार करून आम्ही कळ दाबली. भविष्यविषयक लेखन करणे फार सोपे आहे, असे आमच्या लक्षात आले. पहिली रास घेतली. आपल्या परिचयातली त्या राशीची व्यक्ती समोर आणली. त्या व्यक्तीचं पुढल्या वर्षात काय व्हायला पाहिजे, याचा एक आराखडा मनातल्या मनात तयार केला आणि सरळ 'एंटर' मारला. पण प्रत्येकाचं भविष्य फारच निगेटिव्ह यायला लागलं. तेव्हा आम्ही चतुर भविष्यवेत्त्याप्रमाणे, पण... परंतु... किंतु आदी शब्दांचा भडीमार करून सर्व ग्रहांना नीट शिस्तीत उभं केलं आणि सगळ्या राशींना खूश करून टाकलं. आमच्या राशीतही आम्हाला सहा महिन्यांनी मोठी धनराशी दिसू लागली. पण आम्ही मराठी दिवाळी अंकांत लिहीत असल्याचं वास्तव लक्षात आल्यानं आमची राशी आम्ही राईची करून टाकली.
बघता बघता आम्ही सात-आठ खादडीचे, तर आठ-दहा ज्योतिषविषयक लेख लिहून हातावेगळे केले. पटापटा मेल करून टाकले. आणखी दहा लेख आम्ही विनोदी ढंगाचे लिहिले होते. (आमच्या त्या नतद्रष्ट मित्राने आमच्या आधीच्या १८-२० लेखांची जिम्माही याच कॅटॅगरीत करून टाकली.) हो, विनोदी लिहिण्याचा आम्हास भारी छंद! रामप्रहरी उठावे आणि दोन्ही हातांच्या बोटांनी स्वअंगास गुदगुल्या करून खुदुखुदू हसत राहावे, हा आमचा प्रातःकालीचा व्यायाम होय. त्यानंतर आम्ही हा हा म्हणता (किंवा करता) दहा-बारा विनोदी लेख हसत हसत बडवतो. आमचे विनोदी लेख वाचताना आम्हासच भारी हसू येत्ये. कित्येकदा तर कम्प्युटरसमोरची खुर्ची ढकलून आम्ही जमिनीवर गडाबडा लोळलो आहोत. या दर्जाचा विनोद सांप्रतकाळी मराठीत मिळणं कठीण; पण त्याची किंमत किती जणांस आहे? तर ते असोच. 
नंतर नंतर तर आम्हाला दिवाळी अंकाचे लेख लिहिण्याचे व्यसनच जडले. कुठली फाइल उघडतो आहोत, किती मजकूर बडवतो आहोत, कुठं एंटर मारतोय, कुठं डिलीट मारतोय, कुठं सेव्ह करतोय... कश्शाकश्शाचे भान उरले नाही. बोटे अखंड कळफलकावर नाचत राहिली. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी...' असं म्हणून नामदेवमहाराज 'नामा'निराळे झाले असले, तरी आम्ही ते ब्रीद सोडलेले नाही. 'नाच की-बोर्डाचे टंकी, अक्षरदीप लावू अंकी' हेच ते आमचे ब्रीद...
तर लेख लिहून झाले. टिच्चुक्कन मेल केले... मेल्या मेलबॉक्सनं चक्क ढेकरही दिला... आता आमची खरी कसोटी सुरू जाहली होती... पन्नासएक अंकांत कुठं काय लिहिलं, हे लक्षात राहिना, म्हणून त्याची एक यादीच खिशात घेऊन फिरू लागलो... आता प्रतीक्षा होती ती आधी संपादकांच्या आणि मग वाचकांच्या प्रतिसादाची...
आणि मंडळी, इथे पूर्वरंग संपलेला आहे... उत्तररंग पुढील अंकी...


----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, डिसेंबर २०१६)

---

पुढील भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

---

2 comments: