29 Aug 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ७

डोंबिवली फास्ट
--------------------

तब्बल ५० दिवाळी अंकांत लेख पाडून पाडून आमचा गरीब, लेखकू जीव अगदी शिणून गेला होता. हलवायाला बुंदीच्या लाडवांचा ढीग पाहूनही त्याविषयी किंचितही आसक्ती वाटत नाही, तीच स्थिती आमची झाली होती. हे सगळे अंक पाहण्याचेसुद्धा कष्ट झाले नाहीत. अशा अगदी गलितगात्र, म्लान स्थितीत आम्ही बसलो असतानाच सुखद वाऱ्याची झुळूक यावी तशी ती खबर टीव्हीच्या पडद्यावर झळकली - 'आगामी साहित्य संमेलन डोंबिवलीत भरणार... 'अहाहा! वाहव्वा, वाहव्वा! कुस्तीचा फड लागल्यावर पहिलवानाला आणि तमाशाचा फड लागल्यावर 'बाइल'वानाला जो आनंद होईल, त्याच दर्जाचा आनंद आमच्या ठोंब्या मनाला झाला. पण हे सार्वजनिकरीत्या सांगणं बरं दिसत नाही, म्हणून आम्ही नेहमी आमच्या संमेलन दौऱ्याला पंढरीच्या वारीची उपमा देतो. 'बारी'ची 'वारी' झाली, की आमच्या लुच्च्या-लुब्र्या मनाला आध्यात्मिक आनंद होतो. तर सांगायचा मुद्दा असा, की एक (कसा का असेना) लेखकू असल्यानं आम्ही डोंबिवलीला जाणार हे आता निश्चित झालं आहे... डोंबिवली म्हटलं, की आम्हाला 'डोंबिवली फास्ट' हा सिनेमाच आठवतो. त्यातला तो माधव आपटे नावाचा संत्रस्त नायक आठवतो. हातात बॅट घेऊन त्यानं गावभर घातलेला धिंगाणा आठवतो. गेल्या अकरा वर्षांत आमच्या आजूबाजूच्या जगात भलताच फरक पडला आहे. विशेषतः सोशल मीडिया आल्यापासून तर आम्ही गप्पगार झालो आहोत. आमचा जो काही उद्रेक व्हायचा तो एक तर फेसबुकीच्या पोस्टवर नाही तर व्हॉट्सअपच्या फॉरवर्डवर होतो. (निशिकांत कामतलाही आज 'डोंबिवली फास्ट' काढायचा झाला असता, तर माधव आपटे फेसबुक अन् व्हॉट्सअपवर सगळी चिडचिड व्यक्त करतो, असं दाखवावं लागलं असतं आणि सिनेमाचं नाव कदाचित 'डोंबिवली पोस्ट' असं ठेवावं लागलं असतं. तर ते एक असो.)
डोंबिवली अजून एका कारणासाठी आम्हाला ठाऊक आहे. डोंबिवलीचे डास ख्यातनाम आहेत म्हणे. आम्ही कधी अनुभव घेतला नाही; पण मराठी सारस्वताचं बरंचसं रक्त याच नगरीतून शोषलं गेल्याच्या शोषितांच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. याचं नेमकं कारण शोधू गेलं असता, असं दिसून आलं, की मराठी साहित्यिकांना संध्याकाळच्या वेळी भोकाभोकांच्या बनियनवर आपल्या दीड बाय अडीच फुटाच्या ग्यालरीत (याला स्थानिक भाषेत गच्ची हा अधिक नेमका शब्द आहे...) बसून 'प्रतिभासाधन' करण्याची घाणेरडी सवय आहे. (तरी इथं 'बसून' या शब्दाला 'कोट' घातलेला नाही. तो घातला असता, तर डास चावले नसते, पण कोटीक्रम पूर्ण झाला असता. तर ते असोच.) आता नेमकी हीच वेळ डासांच्याही रुधिरशोषणाची असल्यानं मराठी साहित्यिकांच्या बनियनच्या भोकाभोकांमधून साहित्यनिर्मितीच्या सर्व केंद्रांवर डास संप्रदायाकडून तीव्र दहशतवादी हल्ले चढवण्यात येतात. खरं तर ही बाब खचितच शोचनीय आहे. पण डोंबवलीचे साहित्यिकही गच्चीत बसणं सोडत नाहीत आणि डोंबवलीचे डासही त्याच साहित्यिकांचं रक्त शोषून मोठे झालेले असल्यानं त्यांनी माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा डोंबिवलीचं हे एक पुरातनकालीन सत्य होय. ते आताही कायम आहे की नाही, याची कल्पना नाही. पण डोंबवलीच्या महापालिकेनं तेथील डास नष्ट केले असतील, तर तिनं त्या शहराचा सांस्कृतिक ऐवजच नष्ट केलाय, असं म्हणायला हरकत नाही.
डोंबिवली म्हटलं आम्हाला आणखी आठवते ती 'शाळा' ही बोकिलांची कादंबरी. या कादंबरीतलं गाव म्हणजे चाळीस वर्षांपूर्वीचं डोंबवली गावच! तेव्हा इंग्लंडात गेलं, की आमची साहित्यिक माणसं जसं शेक्सपिअरचं घर शोधायला धाव घेतात, तद्वत आम्हीही डोंबिवलीत गेलो, की म्हात्रेशेठच्या 'चाली' आणि शिरोडकरचं घर शोधणार आहोत. आणि हो, ते गणपतीचं मंदिर पाहण्याचीही आम्हाला एक चावट उत्सुकता लागून राहिली आहे. आमची साहित्यिक यत्ता 'नववी' हीच असल्यानं ते योग्यही ठरेल...
आणखी डोंबिवली म्हटलं, की आम्हाला आठवते ती तिथली गुढीपाडव्याची 'शोभायात्रा'. मराठी नववर्षाला निघणाऱ्या मिरवणुकीला 'शोभायात्रा' हा नवा शब्द बहाल करून मायमराठीची सेवा केल्याबद्दल डोंबिवलीच्या अभिनंदनाचा विशेष ठराव या संमेलनात मंजूर झाला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी आम्ही करीत आहोत. डोंबवलीतल्या फडके रोडवर भगवे फेटे घालून, नथबिथ घालून, नववाऱ्या नेसून सर्व मराठी पेपरांत झळकणाऱ्या डोंबवलीच्या सुंदरी तिथल्या संमेलनातही दीपप्रज्वलन वा सत्कार प्रसंगी स्टेजवर मिरवताना दिसतील, अशी आमची आपली एक 'छोटी सी आशा' आहे. बाकी या 'शोभायात्रा' शब्दावरून मुंबई आणि पुण्याच्या मराठी पेपरांत भांडणं लागली होती हो एके काळी... 'शोभा होणे' याचा अर्थ कळतो का, असा कुचकट, पेठीय सवाल पुण्यातल्या वृत्तपत्रांतले मोठमोठे लोक करताना ऐकलं होतं. पण डोंबवलीकरांना त्याची फिकीर नव्हती. त्यांनी तो शब्दही सोडला नाही आणि ती यात्राही सोडली नाही. मराठमोळ्या मिरवणुकीला एक हिंदी शब्द लाभला, यातच आम्हीही आनंद मानून टाकला. बाकी डोंबिवली म्हटल्यावर आणखी काय आठवणार? हां, ते एक शं. ना. नवरे नावाचे लेखक इथंच राहायचे म्हणे. बरं लिहायचे असं ऐकतो. असतील असेच कुठले तरी मध्यमवर्गीय, पापभिरू लेखक! असं 'आनंदाचं झाड' आता उगवत नाही, असं कुणीसं म्हणालं. लोक काय, कशासाठीही गळे काढतात... जाऊ द्या... आपण आपलं डोंबवली पुराण सोडू नये...
...तर अशा ऐतिहासिक गावी जायचं म्हटल्यावर आमच्या मनाला काव्यमय आनंद झाला. संमेलनाध्यक्षपदी कुणी डॉ. काळे निवडून आले म्हणे. 'मतपत्रिकेमाजी काळे-दवणे, काय निवडावे निवडणारे?' असला काही प्रश्न मतदारांना पडलेला दिसत नाही. मराठी भाषा जणू मृत्युशय्येवर पहुडली असून, तिला अनास्थेचे डास चावून दुरवस्थेचा डेंगी झाला असावा, असं मतदारांना वाटलं की काय, कोण जाणे! आणि रोगी आजारी म्हटल्यावर उपचाराला डॉक्टर हवेतच. म्हणून काळे डॉक्टरांना पाचारण केलेलं दिसतंय. शिवाय 'अक्षयकुमार' या नावाची जादू महिला मतदारांवर पडलीच नसेल, असं काही ठामपणे म्हणता येत नाही. अर्थात अध्यक्ष कुणी का होईना! आपल्याला काय करायचं आहे! आपली 'साहित्यिक सैर' व्यवस्थित झाली म्हणजे झालं. सवाई गंधर्व महोत्सवात नाही का, समोर कोण गातंय यापेक्षा आपण ते कुणाबरोबर ऐकतो आहोत, यालाच अधिक महत्त्व असतं! तसंच आहे हे... सव्वीस जानेवारीच्या परेडमध्ये राष्ट्रपतींना आणि सिनेमाच्या प्रीमिअरमध्ये दिग्दर्शकाला जेवढं महत्त्व असतं, त्याहून अधिक महत्त्व संमेलनाध्यक्षाला असतं, असं वाटत नाही. थोडक्यात, डोंबिवलीच्या 'शोभायात्रे'त संमेलनाध्यक्ष म्हणजे फक्त रेशमी जरीची साडी नेसवलेली गुढी फक्त! आता या यात्रेत 'मज्जा' गुढीला येते की सहभागी नगरजनांना, तुम्हीच सांगा! अशा या ऐतिहासिक, मराठमोळ्या सारस्वतनगरीत जावयाचे म्हणजे आमच्यासारख्या ठोंब्या लेखकांना केवढे प्रयास पडतात, हे काय सांगावयाचे! एक तर एरवीच मराठी लेखकाकडं नोटांचा अभाव... त्यात नोटाबंदी आल्यानंतरचे प्रसंग काय सांगायचे! 'झाकली मूठ सव्वा हजाराची' ठेवायची झालं... (म्हणीपुरतेही 'लाख' नसतात हो आमच्याकडं!) तरी आमची 'ही' पुष्कळ व्यवहारी आहे. आपला नवरा लेखक, म्हणजे त्याच्या खिशात छदाम नसणार, हे तीस ठाऊक असते. त्यामुळंच आमच्या मुदपाकखान्यातली पितळी भांडी अशा वेळी ब्यांक म्हणून उपयुक्त ठरतात. अशाच एका 'ब्यांके'तले सव्वाशे रुपये हिनं परवा काढून मजकडे दिले. त्यातून भाजी आणायची होती. मात्र, आम्ही चतुर लेखक असल्यानं भाजीचे पैसे वाचवून बसनं साहित्याच्या हेडक्वार्टरी गेलो. टिळक रस्त्यावरच्या त्या महन्मंगल वास्तूत पाऊल टाकताना, छाती भरून येते. (आम्ही ज्या बसनं उतरतो, ती पुढं जाताना हमखास काळाकुट्ट धूर सोडते, त्यामुळं छातीबरोबरच डोळे, कान इ. पंचेंद्रियेही भरून येतात. तर तेही असोच.) मुद्दा असा, की तूर्त साहित्याचे हेडक्वार्टर संत्रानगरीत गेल्यामुळं आम्हास इथं फक्त केळी मिळणार, हे आधीच ठाऊक होते. तरीही कुठे काही सेटिंग होते का हे पाहण्याची खोड काही जात नाही. आम्हाला किमान एक परिसंवाद मिळणं गरजेचं होतं. तसं झाल्यासच 'डोंबिवली फास्ट (आणि फुकट)' ही फिलिम सत्यात उतरणार होती. 'परिसंवाद' या शब्दावर एक अत्यंत जुना आणि पचपचीत पीजे करून आम्ही कार्याध्यक्षांना हसवण्याचा प्रयत्न केला. पण हा माणूस मुलखाचा सभ्य आणि सरळ हो! (सध्याच्या संमेलनाध्यक्षांच्या सहवासात राहूनही हे टिकवणं म्हणजे खायचं काम नव्हे. पण असो, असो, असोच...) तर कार्याध्यक्षांकडं लग्गा लावूनही काही होत नाही, म्हटल्यावर आम्ही निराश होत्साते हेडक्वार्टरीच्या पायऱ्या उतरलो. परिसंवाद नाही तर नाही, किमान एक सूत्रसंचालन, किंवा गेला बाजार एक कविकट्टा मिळाला असता, तरी आमचे भागले असते. ठोंब्याची अपेक्षा फार नसते. इतर लेखकांसारखी आम्हास इतर काही प्रतिभाप्रेरके लागत नाहीत. म्हणजे मिळाली तर नको असतात, असे नाही; पण त्याचा सोस नसतो. वेळ पडल्यास (आणि ती बहुतेकदा पडतेच...) आम्ही दीड केळ्याच्या शिकरणावर दीड हजार शब्दांचा लेख पाडू शकतो. त्यामुळं आमचा सौदा वास्तविक यजमान मंडळींना स्वस्तात पडतो. पण त्यांना ते कळकट शबनमवाले आणि दाढीवाले अनेकोनेक कवीच आवडतात, याला काय म्हणावे! आमचे रूपडे म्हणाल, तर काही राजबिंडे नव्हे, पण 'कवडा' म्हणावे इतके भिकारही नव्हे. आम्ही रोज दाढी-बिढी करतो. कदाचित हीच गोष्ट आमच्या विरोधात जात असावी. यापुढं फेब्रुवारीपर्यंत दाढी राखून पाहावे. नाही तरी सुट्ट्यांच्या वांध्यामुळे कटिंग करणे ही गोष्ट 'कटकटी'चीच झाली आहे. तोपर्यंत कवीचं खपडं रूपडं आलं तर बरंच आहे. यावरून मंडळी, तुमच्या लक्षात एक आलं असेल. संमेलनास फुकटात जाण्यासाठी आम्ही कितीही वेळ खर्च करू शकतो. कारण तो आमच्याकडं भरपूर आहे. आणि टाइम इज मनी... त्यामुळं 'मनी'ही विपुल आहे...! आता तो काळा आहे की पांढरा हे माहिती नाही. कदाचित आम्ही काळ्यावर पांढरे करणारे लेखकू असल्यानं दोन्ही असावा! झाकली मूठ सव्वा हजाराची... आणि झाकली डोंबिवली सव्वा लाखाची! हाय काय अन् नाय काय!! चला, 'डोंबिवली फास्ट' आली... पटकन घुसा...

 ---

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, जानेवारी २०१७)

---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

1 comment:

  1. व्वा...खूप छान नेहमीप्रमाणेच खुसखुशीत लेख..वाचायला खूप मजा आली😀 👏👌👍🌹

    ReplyDelete