29 Aug 2021

फिरकीचा ठोंब्या - भाग ८

लेखकराव संमेलनात...
---------------------------


साहित्य संमेलनाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे आम्ही आधी उत्सुक, मग उत्साही, मग उल्हसित, मग उतावळे आणि शेवटी शेवटी उन्मनी होऊ लागलो. आमचे चित्त स्थिर नाहीसे बघून सौं.नी आठवडाभराची रजा टाकून आमच्या सभोवती स्वतःचाच पहारा ठेविला. मागल्याच्या मागल्या वेळी आम्ही असेच महिनाभर आधीच स्टेशनवर जाऊन 'घुमान घुमान' असं ओरडत अनवस्था प्रसंग ओढवून घेतला होता. तेव्हापासून आमचे इस हा एक मोठा घोरच लागून गेला आहे. तरी गेल्या वेळी 'पिंपरी पिंपरी' ओरडण्यानं फार नुकसान झालं नाही. फक्त बसस्टॉपवरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने आम्हास हात धरून निगडीच्या बसमध्ये बसवून दिलं होतं, एवढंच! पौड फाट्यास उतरून आम्ही वेळीच स्वगृही परतलो तो भाग निराळा. तर आमचे हे असे होते... संमेलन सुरू होण्याच्या आधी साधारण महिनाभर आमचे मनपाखरू सैरभैर होऊन जाते. यंदाही तेच झाले आहे. आमचे 'अचपळ मन' केव्हाच डोंबिवली नगरीत जाऊन पोचले आहे. उठता बसता मन 'डोंबोली डोंबोली' गात्ये आहे.... आमच्या मनकवड्या अर्धांगिनीनं 'डोंबलं तुमचं...' असं हिणवूनही झालं आहे. त्यावर 'डोंबलं नाही गं, डोंबोली तुमची म्हण...' असा एक अतिकरुण पीजेही करून झाला आहे. त्यावर धर्मपत्नीनं अन्य शस्त्रे हाती धरली आणि आम्ही डासाच्या चपळाईनं तिचा मार चुकवीत घराबाहेर पडलो. पण बाहेर पडतानाही रस्त्यावर त्या कमानी लागल्या आहेत, ग्रंथदिंडी निघाली आहे, त्यात साहित्यिक कमी आणि गावातले चमको कार्यकर्ते जास्त असे नेहमीचे चित्र दिसते आहे, संमेलनाध्यक्ष अवघडून बसले आहेत, फडके रोडवर या निमित्ताने गुढीपाडव्याचाच रिपीट शो सादर होत आहे, संमेलनस्थळी हजारो जणांची पायधूळ उठल्यानं वातावरण धुळकट झालेलं आहे, ग्रंथप्रदर्शनाच्या दिशेनं कोऱ्या पुस्तकांचा करकरीत वास हवेवरून आमच्या नासिकाग्रास गुदगुल्या करितो आहे... असलीच काहीबाही दृश्यं आम्हास दिसू लागली...
आम्ही गेली कित्येक वर्षं संमेलनाची वारी करतो आहोत... मात्र, दर वेळी संमेलन जवळ आलं, की अस्मादिकांस नॉस्टॅल्जिक व्हायला होतं. हा आपला घरचाच उत्सव आहे, असं वाटत राहतं. त्या संमेलनाच्या ठिकाणी खरं तर आम्हाला कोणी किंमत देत नाही. मात्र, तरीही तिथं आपलेपण वाटतं. उगाचच घरचं कार्य असल्याचा फील येतो. बाकी हा उत्सव मजेदारच असतो म्हणा. ज्यांनी तिथं यावंसं आपल्याला वाटतं, त्यांना काही ते आवडत नाही. आणि ज्यांचं तोंडही पाहण्याची इच्छा नसते असे लोक एलईडी स्क्रीनवर सगळीकडं अगदी मोठमोठ्या क्लोजअपमध्ये दिसत राहतात. पण ते काही असलं, तरी संमेलनाच्या नादानं आम्ही सारंच चुपचाप सहन करतो. खरं तर संमेलन जिथं भरेल तिथं जाऊन त्या गावची संस्कृती अनुभवावी, असं आम्हास वाटत असतं. एखाद्या जत्रेला जावं तसंच हे असतं. जत्रेतलं सगळं आकर्षण तिथल्या मज्जेच्या गोष्टींमध्येच तर असतं. पण संमेलनाला जायचं तर ते आपल्या मित्रांसोबत! एकट्यानं संमेलनाला जाणं हे एकट्यानं हनीमूनला जाण्याइतकंच खुळचटपणाचं आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. चार आपल्यासारखेच वाया गेलेले मित्र जमवावेत, गाडी काढावी आणि संमेलननगरीच्या दिशेनं कूच करावं, हा आता आमचा एक प्रघातच पडून गेल्यासारखा झाला आहे. वाटेत मनमौजेची ठिकाणं पाहावीत, हसत-खिदळत प्रवास करावा आणि इष्टस्थळी पोचून स्वर्गप्राप्तीचा आनंद घ्यावा, असा हा साहित्यप्रेमाचा मामला आहे.
संमेलनस्थळी आम्हास सर्वांत अधिक आकर्षण कशाचे वाटत असेल तर ते पुस्तकांच्या प्रदर्शनाचे. अस्मादिकही किंचित लेखकू असल्यानं अक्षरं लिहिणारे आणि त्याचं मोल जाणून ते छापणारे असे सगळेच आम्हास 'आपुल्या जातीचे' वाटतात. एरवी एवढे मोठे पुस्तकांचे स्टॉल एका ठिकाणी दिसणं कठीण. या गर्दीत घुसावं, आनंदात विहरावं, पाहिजे ती पुस्तकं बघावीत, हाताळावीत, वाचावीत, विकत घेऊन झोळीत टाकावीत आणि पुढला स्टॉल गाठावा यात आम्हास वेगळाच आनंद लाभतो. अशा या गर्दीत कुणी कवी भेटतात, कुणी लेखक भेटतात, कुणी प्रकाशक भेटतात. कवी प्रेमाचे असतील, तर तिथंच कविता ऐकवतात. आधी आम्ही, आमचे मित्र आणि कवी एवढेच उभे असतो. मग कवी कविता गाऊ लागतात... हळूहळू कोंडाळे मोठे होते. भोवती गर्दी जमते. लोक कवीला ओळखतात. खूश होऊन टाळ्या वाजवतात. कवीला कविता लिहिल्याचे समाधान, आम्हाला ती फुकटात ऐकता आल्याचे दुप्पट समाधान! असा हा राजीखुशीचा मामला असतो. कवी मस्त तंद्रीत मान डोलवत, झोळी सांभाळत निघून जातात. पुढच्या स्टॉलवर कुणी होतकरू लेखक भेटतात. नव्या कथांबाबत भरभरून बोलतात. आम्हीही होतकरूच असल्यानं त्याच्या 'हो'मध्ये 'हो' मिसळतो... होतकरू लेखकही समाधान पावतो. शेजारून जाणाऱ्या पोऱ्यास थांबवून कटिंग चहा पाजतो. होतकरू लेखकाकडं सुट्टे पैसे नसतात. आम्ही खिशातून पैसे काढून चहाचे पैसे देतो. होतकरू लेखक 'भेटू एकदा' हे अत्यंत पोचट वाक्य फेकत, ओशट हसत तिथून निघून जातो. आमची पुस्तकं पाहायची राहूनच जातात. पुढल्या पुस्तक गल्लीत प्रकाशकच भेटतात. वर्षानुवर्षं प्रकाशकांना भेटत असल्यानं आम्ही स्वतःच चहावाल्या पोरास हाक मारून प्रकाशकरावांना चहा पाजतो. प्रकाशकही शुगरचं कारण सांगत आधी नाही म्हणतात, पण मग हळूच अर्ध्यातला अर्धा कप चहा आमच्या चहात ओतत बाकीचा चहा भुर्रकन पिऊन टाकतात. मग 'अरे, ही संमेलनाची गडबड संपली, की निवांत पुण्यात भेट... तुझ्या पुस्तकाचं नक्की करून टाकू,' हे - गेली चार संमेलनं नित्यनियमानं ऐकवत असलेलं वाक्यच पाचव्यांदा आम्हास ऐकवतात आणि त्यांच्या स्टॉलवर उभ्या असलेल्या 'सुबक ठेंगणी'कडं मोर्चा वळवतात. या नवोदित लेखिका.... यांना आम्ही चांगलेच ओळखून आहो. लेखिका नवोदित असल्या, तरी चतुर आहेत. पापण्यांची पिटपिट पिटपिट न करताही चार प्रकाशक पर्समध्ये ठेवून आहेत. आत्ताच त्यांनी पलीकडच्या मंडपात 'विशुद्ध साहित्य व्यवहारातील स्त्रीवादाची बीजे' या की असल्याच काहीशा विषयावर जोरदार भाषण ठोकलंय. गेल्या वर्षी त्या कवयित्री म्हणून आल्या होत्या. यंदा लेखिका झाल्या आहेत. पुढल्या वर्षी समीक्षिका होतील आणि दोन-तीन वर्षांत कदाचित अध्यक्षाही होतील... त्या विदुषीला लांबूनच हात जोडून आम्ही दालनातून सटकतो...
ग्रंथदालनाच्या बाहेर एक मीडियावाला दादा हातात त्याचं ते बाजरीच्या कणसासारखं बोंडूक घेऊन एका महनीय प्रकाशकांची मुलाखत घेताना दिसतो. यंदा ग्रंथविक्री कशी कमी आहे, याची दर वर्षीचीच टेप त्यांनी लावली आहे. वास्तविक गेल्याच महिन्यात यांच्या चौथ्या दालनाचं आमच्या गावात उद्-घाटन झालंय. पण 'ग्रंथविक्रीतून आपल्याला पैसे मिळतात' हे जाहीरपणे सांगितल्यास बाकीचे प्रकाशक आपल्याला बहिष्कृत करतील, असं त्यांना वाटत असावं. तिथं काही वेळ ती करमणूक ऐकली आणि पुढं निघालो. एकूणच अशी मनमज्जेची बरीच ठिकाणं या परिसरात बघायला व ऐकायला मिळतात. पुढं मनोरंजनाची खाण म्हणावी असा कार्यक्रम सुरू होता. नवोदित कवींचा हा कट्टा. या कट्ट्याच्या भोवती तुडुंब गर्दी दिसतेय. या कट्ट्यात भाग घेणारे सगळे कवीच प्रेक्षक म्हणून उपस्थित असतात. सहज त्या गर्दीत घुसून डोकावून पाहिलं, तर फेसबुकवर स्त्रीवादी कवितांचा पाणलोट काढणाऱ्या भगिनी साक्षात समोर... फेसबुकवरच्या प्रोफाइल पिक्चरांचा आमचा दांडगा अभ्यास असल्यानं ५० मीटर अंतरावरूनही आम्ही त्यांना शार्पच ओळखले. स्त्री-पुरुष आदिम नात्याविषयी त्या काही भाष्य करू पाहत होत्या. त्या चिवट नात्यातल्या काही नाजूक प्रसंगांची वळकटी ताईंनी तिथं जवळपास संपूर्ण उलगडून दाखविली. त्यातल्या काही शब्दांच्या उच्चारणाचीही आम्हाला भीती वाटते, त्यामुळं ते इथं लिहिणं तर दूरच. पण बाईंच्या तीव्र भावनांनी त्या वीस-तीस ओळींमध्ये त्यांना त्रास देणाऱ्या नराचं किंवा नराधमाचं एवढं रक्त काढलं होतं, की आम्हाला त्या कल्पनेनंच गरगरायला लागलं. आम्ही मनातल्या मनात कवितेला डिसलाइक करून पुढं निघालो. बाईंना पुढल्या वर्षी साहित्य अकादमी किंवा गेला बाजार राज्य शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार लाभल्याशिवाय राहत नाही, हे आम्ही मनातल्या वहीची खूण दुमडून नोंदवून ठेवलं. (आम्ही कुडमुडे लेखकराव असल्यामुळं दुसऱ्याला काहीही सन्मान वा पुरस्कार मिळाला, तर इकडं अशक्य पोटदुखी सुरू होते, हे नम्रपणे नमूद केलेलं बरं!)
आता मुख्य मंडपात जाण्याशिवाय उपाय नव्हता. तिथं ही गर्दी होती. आत पाहिलं तर सगळीकडं कार्यकर्ते दिसत होते. भगव्या, निळ्या, हिरव्या इ. रंगांची 'वादळं' म्हणे घोंघावत होती. पाऊल टाकायला जागा नव्हती. शेजारच्या चार माणसांच्या डोक्यातून, कानांतून, बगलांतून जे काही समोर मोठ्या स्क्रीनवर दिसत होतं, ते पाहू लागलो. राज्याचे भाग्यविधाते असे मोठे नेते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री, अर्धं मंत्रिमंडळ, राज्याचं केंद्रात प्रतिनिधित्व करणारे दोन वजनदार, एक मध्यम आणि एक हलके केंद्रीय मंत्री आदी विराजमान होते. भाग्यविधाते सांगत होते, की साहित्यिकांनी राजकारण करू नये. एकोप्यानं, न भांडता राहावं... वादग्रस्त काही लिहू नये, जुनी मढी उकरू नयेत, स्वतःचे पुतळे उभारू नयेत, उभारले तर कधी तरी ते गटारात जातील याची खात्री बाळगावी, काहीही लिहिण्यापूर्वी शक्यतो आमच्याकडूनच तपासून नेलं तर बरं इ. इ.
साहेब अजून खूप काय काय सुंदर विचारधन उधळत होते... छानच वाटलं ते ऐकून. पण समोरच्यांच्या घामाचा वास असह्य व्हायला लागला, तसं आम्ही डोकं बाहेर काढलं. जरा मंडपापासून दूर कोपऱ्यात गेलो. तिथं गार वार वाहत होतं. तिथं फारशी गर्दी नव्हती. बरं वाटलं. पलीकडं एक गॉगलवाले गृहस्थ इयरफोनवर काही तरी ऐकत होते... माणूस कुठं तरी पाहिल्यासारखा वाटला. एकदम आठवलं, अरेच्चा, हे तर संमेलनाध्यक्षांसारखेच दिसताहेत. आम्ही मग जरा धाडस करून त्यांच्या जवळ जाऊन हे सांगितलं... तर ते म्हणाले, कुठं बोलू नका. तो मीच आहे. संमेलनाध्यक्ष! हे ऐकून आम्ही तीन ताड उडालो. म्हणालो, अहो, मग तिकडं कोण आहे व्यासपीठावर? तर त्यावर ते म्हणाले, 'खुर्च्या कमी पडल्या मंत्र्यांना. मग मीच म्हटलं, अहो, तुमचं चालू द्या. मी आहेच की तीन दिवस. तसाही आत्ता माझा आवडता कार्यक्रम असतो रेडिओवर. तो ऐकायला आलोय बाहेर....'
आम्ही म्हटलं, कोणता कार्यक्रम? तर त्यावर ते भले गृहस्थ म्हणाले, 'मन की बात'!

----

(पूर्वप्रसिद्धी : साहित्यसूची, फेब्रुवारी २०१७)

---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment