1 Sept 2022

पत्रकारितेतील २५ वर्षे - लेख

पत्रकारितेची पंचविशी...
---------------------


आज १ सप्टेंबर २०२२. बरोबर २५ वर्षांपूर्वी, म्हणजे १ सप्टेंबर १९९७ रोजी मी पुण्यात ‘सकाळ’मध्ये प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून रुजू झालो. आज पत्रकारितेतील कारकिर्दीला २५ वर्षं पूर्ण होत आहेत. खरं तर त्याही आधी म्हणजे नोव्हेंबर १९९४ मध्ये मी पहिल्यांदा ‘लोकसत्ता’त मुद्रितशोधक म्हणून रुजू झालो होतो. त्या अर्थाने या व्यवसायात येऊन आता जवळपास २८ वर्षं होतील. मात्र, उपसंपादक म्हणून आणि कायम कर्मचारी म्हणून रुजू झालो ते ‘सकाळ’मध्येच. त्यानंतर जवळपास १३ वर्षं २ महिने मी सलग तिथंच काम केलं. नंतर ऑक्टोबर २०१० मध्ये मी ‘सकाळ’चा राजीनामा दिला आणि १५ नोव्हेंबर २०१० रोजी पुण्यात नव्याने आवृत्ती सुरू करणाऱ्या ‘मटा’त रुजू झालो. ३१ ऑक्टोबर २०१० ते १४ नोव्हेंबर २०१० हे पंधरा दिवस मी कुठेच काम करत नव्हतो. हा छोटासा काळ सोडला तर गेली २५ वर्षं मी सतत वृत्तपत्रांच्या कचेरीत संपादकीय विभागात काम करतो आहे. प्रशिक्षणार्थी पत्रकार, मग उपसंपादक, मग कायम उपसंपादक, मग वरिष्ठ उपसंपादक, मग मुख्य उपसंपादक अशा पायऱ्या मी ‘सकाळ’मध्ये चढत गेलो. नंतर ‘मटा’त याच पदावर रुजू झालो. इथं मुख्य उपसंपादक, सहायक वृत्तसंपादक, उपवृत्तसंपादक आणि आता वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहे. (वृत्तपत्रांच्या कार्यालयांत पदांची संख्या फार नसते. त्यामुळे इथली सीनिऑरिटी ‘किती वर्षं काम करत आहात?’ यावरच जास्त मोजली जाते.)
गेली २५ वर्षं या पेशात असल्यानं या काळात पुण्यात, महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात घडलेल्या बहुतांश घटनांचा साक्षीदार मला होता आलं. या घटनांची बातमी कशी होते आणि आपण ती वाचकांपर्यंत कशी बिनचूक आणि नेमकी पोचवायची असते, हे मला या काळात शिकायला मिळालं. ‘सकाळ’मध्ये माझ्यासोबत संजय आवटे, मंदार कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, सूरश्री चांडक आणि संजीव ओहोळ हे सहकारी रुजू झाले होते. आदल्याच दिवशी लेडी डायनाचं अपघाती निधन झालं होतं आणि त्या दिवशी याच बातमीची सगळीकडं चर्चा होती.
तेव्हा इंद्रकुमार गुजराल आपले पंतप्रधान होते. राज्यात मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. पुढील सगळा काळ वेगवान राजकीय घडामोडींचा होता. नंतर केंद्रात वाजपेयी पर्व सुरू झालं. सोनिया गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं. भारतानं पोखरणमध्ये अणुचाचण्या केल्या, नंतर कारगिल युद्ध झालं. शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राज्यात युतीची सत्ता जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं. एकविसाव्या शतकाचं सगळीकडं जल्लोषात स्वागत झालं. ‘वायटूके’ हा शब्द तेव्हाचा परवलीचा शब्द झाला होता. जागतिकीकरणाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी देशात बरंच काही बदलत होतं. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील ट्विन टॉवर्स पडले. भुजमध्ये जोरदार भूकंप झाला, त्यात हजारो माणसं मृत्युमुखी पडली. कोठेवाडी सामूहिक बलात्कार प्रकरणानं महाराष्ट्र हादरून गेला. मांढरदेवी दुर्घटना घडली. मोठी त्सुनामी आली. ‘शायनिंग इंडिया’चा प्रचार उलटला आणि देशातून भाजपची सत्ता गेली. काँग्रेस आणि सहकारी पक्षांची सत्ता आली. अमेरिकबरोबर अणुकरार झाला. मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. अमेरिकेनं लादेनचा खात्मा केला. भारतानं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. दिल्लीत अण्णांचं आंदोलन झालं. दिल्लीतच ‘निर्भया’ प्रकरण घडलं. देशात २०१४ मध्ये पुन्हा सत्तापरिवर्तन घडलं आणि मोदींचं सरकार आलं. राज्यातही भाजप-सेना युतीची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. सर्वत्र स्मार्टफोनचा बोलबाला सुरू झाला. व्हॉट्सअपसारखी संदेश यंत्रणा अधिक लोकप्रिय ठरू लागली. आर्कुटपाठोपाठ फेसबुकवर असणं ही ‘इन थिंग’ मानली जाऊ लागली. एक ते दीड जीबी क्षमता असलेल्या मोबाइल फोनपासून एक टीबी क्षमतेच्या फोनपर्यंत आणि पाच मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापासून १०८ मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापर्यंत तंत्रज्ञानाची अफाट प्रगती झाली. २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. पुढच्याच वर्षी जीएसटी लागू झाला. २०१९ मध्ये माध्यमांचे सर्व अंदाज धुळीला मिळवीत मोदींनी अधिक ताकदीने पुन्हा सत्ता मिळविली. राम मंदिराचा विषय मार्गी लागला. काश्मीरबाबतचं कलम ३७० रद्द झालं. डिसेंबर २०१९ पासून जगाला करोना नामक महाभयानक विषाणूनं ग्रासलं. पुढची दोन वर्षं जगासोबत भारतानंही या महासाथीला हिमतीनं तोंड दिलं.

मंदार व मी जर्नालिझमच्या दिल्ली दौऱ्यात...
हा सर्व प्रवास वृत्तपत्रांच्या कार्यालयांतून पाहणं हा अतिशय समृद्ध करणारा अनुभव होता. विजय कुवळेकर, अनंत दीक्षित, यमाजी मालकर, सुरेशचंद्र पाध्ये, नवनीत देशपांडे या संपादकांच्या हाताखाली ‘सकाळ’मध्ये; तर अशोक पानवलकर, पराग करंदीकर आणि श्रीधर लोणी या संपादकांच्या हाताखाली ‘मटा’मध्ये काम करायला मिळालं. या सर्वच संपादकांनी मला खूप काही शिकवलं. वैयक्तिक उत्कर्षाच्या अनेक संधी दिल्या. ‘सकाळ’मध्ये राजीव साबडे सरांनी आम्हाला सुरुवातीला प्रशिक्षित केलं. वरुणराज भिडे, मल्हार अरणकल्ले, विजय साळुंके, अशोक रानडे, लक्ष्मण रत्नपारखे, रमेश डोईफोडे, अनिल पवार, प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, मुकुंद मोघे, चंद्रशेखर पटवर्धन, मुकुंद लेले, उदय हर्डीकर, वर्षा कुलकर्णी, स्वाती महाळंक, स्वाती राजे, नयना निर्गुण, मीना शेटे-संभू, गोपाळ जोशी, सुहास यादव, दत्ता जोशी, संजय डोंगरे, अरविंद तेलकर हे सर्व ज्येष्ठ सहकारी होते. बातमीदारांत डॉ. सुधीर भोंगळे, संतोष शेणई, निसार शेख, आबिद शेख, सुरेश ठाकोर, उद्धव भडसाळकर आदी दिग्गज मंडळी होती. सुरेशचंद्र पाध्ये सरांनी अनेक अर्थांनी अडचणीच्या काळात खूप मदत केली. अभिजित पेंढारकर, सिद्धार्थ खांडेकर, दीनदयाळ वैद्य, योगेश कुटे, मंगेश कुलकर्णी, मंगेश कोळपकर, सुभाष खुटवड, प्रसाद इनामदार हे सर्व मित्र माझ्यानंतर ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. अभिजित व मंदारशी विशेष मैत्र जमलं. अभिजितनं आणि मी ‘मुक्तपीठ’, ‘कलारंजन’ या पुरवण्या एकत्र पाहिल्या. अतिशय धमाल असा काळ होता तो! कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही, असे संस्कार आमच्यावर झाले होते. त्यामुळंच ‘आता माझी ड्युटी संपली’ किंवा ‘आज माझी सुट्टी आहे,’ ही कारणं सांगणं तिथं अजिबात संभवत नसे. आपण २४ तास इथं सेवेला बांधलो गेलो आहोत, अशी वृत्ती अंगी बाणली होती. आम्ही १९९९ मध्ये मराठवाडा आवृत्ती सुरू केली, तेव्हा त्या टीममध्ये मी होतो. अंगी वेगळंच स्फुरण चढलं होतं तेव्हा! मालकर सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. मोठ्या जिद्दीनं आम्ही तेव्हा मराठवाड्यात ‘सकाळ’ रुजवला. तेव्हा तिथल्या अनेक बातमीदारांशी ओळखी झाल्या, त्या आजही कायम आहेत. ‘सकाळ’मध्ये ‘झलक’ हे सांस्कृतिक कार्यक्रमांची दैनंदिनी सांगणारं सदर माझ्याकडं अगदी सुरुवातीला आलं. त्यानिमित्तानं पुण्यातल्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जणांशी मैत्री झाली, ती आजतागायत कायम आहे. तेरा वर्षांनंतर ‘सकाळ’ सोडून ‘मटा’त रुजू होण्याचा निर्णय तसा अवघड होता. मात्र, ‘मटा’चं आणि टाइम्स ग्रुपचं आकर्षण होतं. शिवाय ‘सकाळ’मधले बरेच सहकारी ‘मटा’त येतच होते. त्यामुळं अखेर ‘मटा’त येण्याचा निर्णय घेतला आणि गेली १२ वर्षं इथं कार्यरत आहे. इथंही सुरुवातीला पराग करंदीकर आणि नंतर श्रीधर लोणी (आणि मुंबईवरून अशोक पानवलकर सर) यांचं कायम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं, मिळतं आहे. मी ‘सकाळ’मध्ये साडेतीन वर्षं सलग दर रविवारी ‘कॉफीशॉप’ हे सदर लिहिलं. नंतर ‘मटा’त रुजू झाल्यानंतर इथं ‘टी-टाइम’ हे सदर सलग चार वर्षं रविवारी लिहिलं. या दोन्ही सदरांतील निवडक लेखांची नंतर पुस्तकं झाली. याशिवाय दोन्ही वृत्तपत्रांत हिंदी-मराठी (व एक इंग्रजी) चित्रपटांची एकूण ३०७ परीक्षणं लिहिली. अखेर २०१४ च्या अखेरीस या कामातून (स्वेच्छेनं) अंग काढून घेतलं.
‘पुणे मटा’चा पहिला अंक प्रेसला जातानाचा क्षण...

‘मटा’त अगदी सुरुवातीला प्रिंटिंग मुंबईतच व्हायचं. तेव्हा ९.४५ ची डेडलाइन असायची. त्यामुळं रोज फार धावपळ व्हायची. कुठलीही बातमी चुकू नये किंवा आपला अंक प्रिंटिंगला गेल्यावर जगात फार काही महत्त्वाचं घडू नये, असं वाटायचं. सुदैवानं एखादा अपवाद वगळल्यास तसे प्रसंग फार घडले नाहीत. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर आणि अगदी अलीकडे लता मंगेशकर यांच्या निधनानंतर ‘टीम मटा’नं मोठ्या मेहनतीनं खास अंक काढले होते. याशिवाय ‘मटामैफल’सारखा साहित्यविषयक उपक्रम ‘मटा’नं पुण्यात सुरू केला आणि त्याला पुणेकरांनी फारच जोरदार प्रतिसाद दिला. याशिवाय ‘मटा हेल्पलाइन’पासून ते ‘श्रावणक्वीन’पर्यंत आणि अगदी अलीकडे शनिवारवाड्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मध्यरात्री ध्वजारोहण करण्यापर्यंतच्या सर्व उपक्रमांना पुणेकरांनी कायमच पाठिंबा दिला आहे. वाचकांच्या पत्रव्यवहाराचं ‘बहुतांची अंतरे’ हे सदर मी ‘मटा’त अगदी गेल्या वर्षापर्यंत, म्हणजे सलग दहा वर्षं सांभाळलं. यानिमित्त अनेक वाचकांशी जोडला गेलो, हा आनंद काही वेगळाच!
या काळात ‘सकाळ’तर्फे २००१ मध्ये तमिळनाडू विधानसभेची, तर २००४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी ओडिशामधील निवडणूक कव्हर करण्याची संधी मला मिळाली. पुढं २००७ मध्ये थायलंडचा एक छोटा दौराही करायला मिळाला. ‘मटा’तर्फे बंगळूर, उदयपूर येथील काही कार्यक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली. मात्र, २००२ मध्ये मला संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या पोलिसांच्या आप्तांशी भेटून एक मोठी स्टोरी करण्याची जी संधी मिळाली, ती आत्तापर्यंतची माझी सर्वाधिक अविस्मरणीय असाइनमेंट आहे.
मी या क्षेत्रात अपघाताने आलो. खरं तर ठरवून यायला हवं होतं. असं असलं तरी आतापर्यंतची ही अडीच दशकांची वाटचाल मला बरंच समाधान आणि खूप काही शिकवून जाणारी ठरली आहे. शिकण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. माझ्या काही मर्यादा आहेत आणि त्याचीही मला नीट कल्पना आहे. हल्ली आठ-दहा वर्षं पत्रकारितेत काढली, की अनेक जण ‘ज्येष्ठ पत्रकार’ होतात. मला पंचवीस वर्षांनंतरही केवळ अनुभवाच्या आधारावर ज्येष्ठ म्हणवून घ्यायचा आपला अधिकार नाही, असं मनापासून वाटतं.
हा टप्पा सिंहावलोकन करण्यासाठी नक्कीच योग्य आहे. त्यामुळं जे काही मनात आलं ते (नेहमीप्रमाणे एकटाकी) लिहून काढलं आहे. असो. तटस्थपणे कुणी या वाटचालीचं मूल्यमापन केल्यास त्याला ही काही फार ग्रेट कामगिरी वाटणार नाहीही कदाचित; मात्र जे काही काम केलं, ते प्रामाणिकपणाने आणि या व्यवसायाची नीतिमूल्यं कायम जपून, एवढं नक्कीच म्हणू शकतो. ही कमाईदेखील मला महत्त्वाची वाटते.

----

(नोंद : सर्वांत वरील छायाचित्र ‘सकाळ’मधील माझा सहकारी गजेंद्र कळसकर यानं बालेवाडी स्टेडियमच्या समोर १९९८ मध्ये काढलेलं आहे.)

---

जडणघडणीचे दिवस - हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अविस्मरणीय असाइनमेंट - लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

दीक्षितसाहेब - हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

----

10 comments:

 1. पत्रकारितेतील 2004 पूर्वीचा तो काळ फारच सुखद अनुभव देणारा होता. याचं सिंहावलोकन तुझ्या या लेखामुळं करता आलं. धन्यवाद.

  ReplyDelete
 2. छानच... अभिनंदन आणि पुढील कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

  ReplyDelete
 3. व्यवसायातील अडीच दशकांचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वीपणे व आनंदाने गाठल्याबद्दल तुमचे मन:पूर्वक अभिनंदन...असेच पुढील अनेक दशके पत्रकारिकेत भरीव योगदान देत महत्वाची शिखरे गाठालं याबद्दल खात्री आहेच व त्यासाठी खूप शुभेच्छा ..थोडक्या शब्दात २५वर्षांचा आढावा घेत , अनेक महत्वाच्या घडामोडींचा उल्लेख करीत आमच्याही अनेक गतमृतीना उजाळा दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद 👏👍👌🌹.

  ReplyDelete
  Replies
  1. मन:पूर्वक धन्यवाद, वीणाजी... ❤️

   Delete
 4. तुमच्या करिअरचा आढावा घेताना वाचकांच्या आठवणींनाही उजाळा मिळाला! स्वतःचं इतकं योग्य परीक्षण करणाऱ्या आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!..⚘️⚘️

  ReplyDelete
  Replies
  1. मन:पूर्वक धन्यवाद, मनीषा ❤️

   Delete
 5. छान. अभिनंदन आणि शुभेच्छा!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. कृपया आपले नाव लिहा...

   Delete