16 Nov 2014

जडणघडणीचे दिवस...



मी कधी पत्रकार म्हणून काम करीन असं मला आयुष्यात वाटलं नव्हतं. पण आपल्या आयुष्यात आपण काय व्हायचं, हे फारच थोड्या लोकांना आधी ठरवता येतं. माझंही तसंच झालं. चांगला मेकॅनिकल इंजिनीअरचा डिप्लोमा थर्ड इयरला सोडून देऊन मी नगरमध्ये लोकसत्ता’त प्रूफरीडर म्हणून काम धरलं, तेव्हा ‘भिकेचे डोहाळे’ हा शब्द कुणी वापरला नसला, तरी अनेकांच्या चेहऱ्यावरचे भाव तेच होते. मला मात्र दुसरं काही येईल असं वाटत नव्हतं. पेपरमधलं काम मात्र फार चित्ताकर्षक वाटत होतं. मी केवळ प्रूफरीडर नव्हे, तर चांगला उपसंपादक होऊ शकतो, हे माझे तिथले गुरुजी सतीश कुलकर्णी यांनी हेरलं आणि मला पुण्याला पाठवलं.
पुण्यातल्या लोकसत्तातही मी प्रूफरीडिंग करत होतो, पण त्याच वेळेस सकाळ’मध्येही ट्रेनी जर्नालिस्ट म्हणून अर्ज पाठवला होता. जुलै १९९७ मध्ये आमची तिथं लेखी परीक्षा झाली. शेकडो लोक आले होते. अनेक वर्षांच्या कालखंडानंतर सकाळमध्ये भरती होत होती, असं कळलं. मी तर साधा पदवीधरही नव्हतो, ना माझ्याकडं पत्रकारितेचं काही औपचारिक शिक्षण होतं... पण महिनाभरानं मला चक्क मुलाखतीचा कॉल आला. तरीही माझी निवड होईल, अशी मला मुळीच शक्यता वाटत नव्हती. (स्वतःला ओव्हर अंडरएस्टिमेट करायची सवय तेव्हापासूनचीच!) तेव्हा सुरेशचंद्र पाध्ये, उत्तम कांबळे, राधाकृष्ण नार्वेकर आणि अनंत दीक्षित या चार ज्येष्ठांनी माझा पहिला इंटरव्ह्यू घेतला. पाध्ये सरांनी काही कौटुंबिक प्रश्न विचारले. कांबळे सरांनी मला सध्या शेतीचा कोणता हंगाम सुरू आहे, असं विचारलं. मी 'खरीप' असं (योग्य) उत्तर दिलं. दीक्षित सरांनी काही प्रश्न विचारले. नार्वेकरांनी एकही प्रश्न विचारला नाही.
मी नर्व्हस होऊन बाहेर बसलो होतो. तिथं मुलाखतीला आलेला एक जण बसला होता. तो मला म्हणाला, अरे, तू ब्रह्मे का? तू एवढा नर्व्हस का दिसतोयस? तुला शंभरपैकी ७६ मार्क आहेत लेखी परीक्षेत. तू पहिला आला आहेस. तेव्हा तुझं सिलेक्शन झाल्यात जमा आहे. माझंही सिलेक्शन होणार आहे. मला ७२ (की ७३) मार्क आहेत. इंटरव्ह्यू होण्याच्या आत सकाळमधील अंतर्गत यंत्रणेत शिरून आमचे मार्क काढून घेणाऱ्या त्या आत्मविश्वासू मित्राला मी नाव विचारलं. ‘मी संजय आवटे, तुझ्या शेजारच्याच करमाळ्याचा, केत्तूरचा, असं उत्तर त्यानं दिलं(मी जामखेडचा!) आवटेच्या दिलाशानंतरही मला विश्वास वाटत नव्हता; पण थोडा धीर आला इतकंच. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचे संपादक विजय कुवळेकर आणि मॅनेजर के. मो. भिडे या दोघांनी कुवळेकर साहेबांच्या केबिनमध्ये माझा इंटरव्ह्यू घेतला. मी लिहिलेला पेपर त्यांच्या हातात होता. मी कुठं राहतो, असं कुवळेकर साहेबांनी विचारलं. भाऊमहाराज बोळात,’ मी उत्तर दिलं. त्यावर ते भिडेंकडं पाहून हसले. का, ते मला नंतर कळलं. ते सुरुवातीला पुण्यात आले, तेव्हा तिथंच राहत होते म्हणे. मी पु. लं. वर त्यात काही तरी लिहिलं होतं. त्यात पु. लं.चा विनोद निर्विष असतो, असं मी लिहिलं होतं. निर्विष’ हा शब्द कुणाचा आहे, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. तो शब्द अर्थातच माझा नव्हता. मी वाचलाय कुठं तरी, असं काही तरी उत्तर मी दिलं आणि मुलाखत संपली. दुसऱ्या दिवशी मला एक सप्टेंबर रोजी हजर होण्याबाबतचा फोन आला. आवटेचं म्हणणं खरं ठरलं होतं. तो, मी, मंदार कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, सूरश्री चांडक आणि आणखी एक संजीव ओहो‍ळ नावाचा मुलगा असे आम्ही सहा जण सिलेक्ट झालो होतो. (हा संजीव नंतर आठवड्याभरातच, त्याची तहसीलदार म्हणून निवड झाल्यानं सोडून गेला. यापैकी सूरश्रीही लग्न होऊन नंतर दोन वर्षांत काम सोडून गेली. संजय साधारण आठ-दहा महिन्यांनी लगेचच सोलापूरला संचार’मध्ये वृत्तसंपादक म्हणून गेला. मी, मंदार आणि श्रीपाद २०१० पर्यंत सकाळमध्ये एकत्र राहिलो. नंतर मी आधी बाहेर पडलो आणि नंतर श्रीपाद... आम्ही दोघंही महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जॉइन झालो. मंदार कुलकर्णी अजूनही ‘सकाळमध्ये आमच्या बॅचचं प्रतिनिधित्व टिकवून आहे...) आम्हाला पहिल्याच दिवशी कुवळेकर साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून अनेक सूचना दिल्या. त्या एवढ्या कडक होत्या, की पुढं आपलं कसं होणार, असंच आम्हा सगळ्यांना वाटलं. पण कुवळेकर साहेबांसमोर एक शब्द बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती. ना आम्ही कुठल्या शंका विचारल्या, ना काही प्रश्न उपस्थित केले... माझ्या पगाराविषयी एक अडचण निर्माण झाली होती. ती मी पाध्ये सरांच्या कानावर घातली आणि ती त्यांनी तत्काळ दूर केली.
 ...तर आम्हा पाच ट्रेनी पोरांना सकाळचे तत्कालीन सहसंपादक राजीव साबडे यांच्या ताब्यात देण्यात आलं. साबडे सरांच्या हाताखाली आम्ही शिकत होतो. पत्रकारितेचे एकेक धडे गिरवत होतो. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नगर केंद्रात यापूर्वीच बी. .साठी प्रवेश घेतला होता. दर आठवड्याला रविवारी सकाळी नगरला क्लासेस असत. मला तेव्हा शनिवारी सुट्टी होती. शुक्रवारची नाइट संपवून मी नगरला घरी जात असे. शनिवारचा दिवस पूर्ण घरी आणि रविवारी सकाळी न्यू आर्टस कॉलेजमध्ये बी. . चे दोन-तीन क्लास करून सायंकाळी सहाला पुण्याला ऑफिसात पुन्हा नाइटसाठी येत असे. ट्रेनिंग पीरियडमध्ये आम्हाला एकेक आठवडा एकेका सेक्शनला काम करावं लागे. एक आठवडा रिपोर्टिंग, मग एक आठवडा डेस्क म्हणजे उपसंपादकी, मग एक आठवडा क्रीडा विभाग आणि लायब्ररी मिळून, तर चौथा आठवडा प्रांतिकला. हा प्रांतिक’ शब्द मला नवा नसला, तरी सकाळमध्ये तो प्रादेशिक बातम्यांचा विभाग अशा अर्थानं वापरत असल्याचं मी प्रथमच ऐकत होतो. ‘सकाळमध्ये संपादकीय विभागात काही टिपिकल शब्द वापरले जात, त्यातला हा एक. दुसरा एक म्हणजे वाढावा. एखाद्या मजकुराचा वाढावा काढणे म्हणजे पान १ वरून तो पुढे कुठल्या तरी पानावर कंटिन्यू करणे. अनेक वृत्तपत्रांत याला कंटिन्यूएशन देणे असंच म्हणतात. पण सकाळमध्ये मात्र ‘वाढावा काढणे’ हा खास मराठी शब्द वापरला जातो. बातमीदार’ हाही खास सकाळचा शब्द. आम्ही ‘लोकसत्ता’त वार्ताहर म्हणत असू. सकाळमध्ये बायलाइन देण्याची पद्धत तेव्हा उदा. ‘श्रीपाद ब्रह्मे यांजकडून’ अशी होती. अन्य वृत्तपत्रांत केवळ नाव असे. याशिवाय डेटलाइनमध्ये ‘ता.’ (तारीख) हा शब्दही केवळ सकाळमध्येच वापरला जात असे. प्रतिनिधी वगैरे असं नाव देण्याचीही पद्धत नव्हती. बायलाइन नसेल, तर थेट डेटलाइनने बातमी सुरू व्हायची. जाहिरात डमी किंवा नुसतंच डमी हाही शब्द नवा नसला, तरी डमी आली का रे, या आरोळीला किती महत्त्व आहे, ते संपादकीय विभागातच कळतं. डमी म्हणजे दुसऱ्या दिवशीचं वृत्तपत्र किती पानांचं आहे आणि त्यात प्रत्येक पानात किती जाहिराती असतील, याचा अंदाज देणारं शीट. या डमीनुसार संपादकीय विभागाला रोज आपल्या कामाचं नियोजन करावं लागतं. असो.
तर आमच्या ट्रेनिंगला सुरुवात झाली. साबडे सरांनी आम्हाला एक वही करायला सांगितली आणि प्रत्येक दिवशी काय काम केलं हे त्यात नोंदवून ठेवायला सांगितलं. मला डायरी लिहायला आवडायचंच. मग मी अगदी पहिल्या दिवसापासून या नियमाचं काटेकोर पालन करायला सुरुवात केली. ही वही आजही माझ्याकडं आहे. अधूनमधून ती काढून वाचणं हा माझ्या स्मरणरंजनाचा एक भाग झालाय
तेव्हा सकाळमध्ये डेस्कला विजय साळुंके, अशोक रानडे, मुकुंद मोघे, यमाजी मालकर, लक्ष्मण रत्नपारखे, अनिल पवार, नवनीत देशपांडे, गोपाळ जोशी, मुकुंद लेले, उदय हर्डीकर आदी मंडळी कामाला होती. अर्थमंथनला प्रभाकर खोले आणि चंद्रशेखर पटवर्धन होते. साबडे आणि वरुणराज भिडे सर दोघेही सहसंपादक होते आणि अग्रलेखाच्या पानाचं काम पाहायचे. रिपोर्टिंगला मल्हार अरणकल्ले, सुधीर भोंगळे, रमेश डोईफोडे, संतोष शेणई, श्रीधर लोणी, निसार शेख, आबिद शेख आदी मंडळी होती. अरणकल्ले मुख्य वार्ताहर होते तेव्हा. रविवारला स्वाती राजे, ऋता बावडेकर, वर्षा कुलकर्णी होत्या, तर स्वाती महाळंक, नयना निर्गुण, अस्मिता खोले, मीना संभू ‘प्रांतिक’ला होत्या. प्रल्हाद सावंत, शशिकांत भागवत, पराग करंदीकर हे क्रीडा विभागातील सहकारी होते, तर संदेश भंडारे, प्रल्हाद खरात, वल्लभ कुलकर्णी हे फोटोग्राफर होते. नंतर थोड्यात दिवसांत अनंत कुलकर्णी आणि गजेंद्र कळसकर त्यांना जॉइन झाले. या नावांवर नजर टाकली तरी लक्षात येईल, की आम्ही तसे नशीबवान होतो. या सर्वांसमवेत काम करून आमचा पत्रकारितेचा पाया खरोखर पक्का, मजबूत झाला
 एखाद्या मोठ्या व्यक्तीचं निधन झालं, की त्याचं अल्पचरित्र लिहायचं अशी वृत्तपत्रांत पद्धत आहे. मी ट्रेनी असताना अशी अनेक अल्पचरित्रं लिहिली. गो. नी. दांडेकर, यशवंत दत्त, मालती पांडे-बर्वे, ‘काँटिनेंटल’चे अनंतराव कुलकर्णी ही त्यातली काही. मार्च १९९८ मध्ये वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांचंही चरित्र मी लिहिलं. हर चुनौती से दो हाथ मैंने किए या नावानं ते प्रसिद्ध झालं. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्या, तेव्हाही त्यांचा प्रवास लिहिला. हा सर्व संकलित मजकूर असल्यानं त्यावर लिहिणाऱ्याचं नाव देण्याची पद्धत सकाळ’मध्ये नव्हती. मात्र, हे सर्व लेख आजही माझ्याकडं आहेत आणि ते आज वाचताना मी तेव्हा बऱ्यापैकी लिहीत होतो, असंच तटस्थपणे विचार करता वाटून जातं. गोनीदां’च्या वेळी थोडी गंमत झाली. नोव्हेंबर की डिसेंबर १९९७ मध्ये अप्पांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा मला अरणकल्लेंनी बोलावून सांगितलं, की त्यांचं चरित्र तयार कर. मी ते लगेच ग्रंथालयात जाऊन, संदर्भांची मदत घेऊन तयारही केलं. तेव्हाचे ग्रंथपाल सुरेश जाधव सर खूप उत्साही होते आणि ते आम्हाला कायम मार्गदर्शन करायचे. (सकाळमध्ये रुजू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मी ग्रंथालयात जाऊन, त्यांना माणूस चंद्रावर उतरला’ तेव्हाचा ‘सकाळ’चा अंक दाखवायची विनंती केली होती.) सुदैवानं अप्पांची प्रकृती ठीक झाली आणि मी लिहिलेला मजकूर वापरण्याची वेळ आली नाही. मी तेव्हा २२ वर्षांचा म्हणजे तसा लहानच होतो. त्यामुळं आपण खपून तयार केलेला २०-२२ पानांचा मजकूर वाया गेल्याचं पाहून मला मनातून वाईटच वाटलं. पुढं सहा महिन्यांनी एक जून १९९८ रोजी अप्पा निवर्तले आणि सकाळच्या ग्रंथालयात मीच तयार करून ठेवलेलं त्यांचं अल्पचरित्र अंकात वापरलं गेलं


जॉइन झाल्यानंतर पंधरा दिवसांतच मला संस्थेसाठी रक्त सांडावं लागलं आणि झुंजार(की पळपुटा?) पत्रकार हे बिरुद मीच माझ्यामागं लावून घेतलं. ते गणपतीचे दिवस होते आणि विसर्जन मिरवणुकीत मी आणि श्रीपाद कुलकर्णी सहभागी झालो होतो. आम्हाला असाइनमेंटच होती. पहाटे पाच वाजता लक्ष्मी रोड आणि बाजीराव रोड जिथं छेदतात, त्या लिंबराज महाराज चौकात अनिल भोसलेंच्या मंडळानं काही वादातून ठिय्या दिला. तेव्हा चंद्रकांत उघडे डीसीपी होते. त्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला. मी आणि श्रीपाद एकमेकांचा निरोप घेऊन तो नूमविकडं आणि मी शनिपाराकडं निघालो होतो. एसआरपीएफच्या लाठीचार्ज’मध्ये मी सापडलो. मला काय करावं ते न कळून मी जनतेसोबत पळत सुटलो आणि डावीकडं तुळशीबागेत घुसलो. सगळ्या परिसरात चपलांचा खच पडला होता. समोरून एक पोलिस आला आणि त्याच्या लाठीचा तडाखा मला बसला. तो वाचविण्यासाठी मी खाली वाकलो आणि डोक्यातच लाठी लागली मागून. मग मात्र मी कळवळलो आणि तसाच रूमवर गेलो. तिथं पाहिलं तर माझ्या डोक्यातून रक्त येत होतं. रूममेट्सनी काही हळद वगैरे लावून उपचार केले. मग मला बरं वाटलं आणि मी झोपलो ते थेट दुपारी एकला उठलो. आवरून आधी ऑफिसला गेलो. कारण बातम्या द्यायच्या होत्या. त्या चौकात पलीकडं उभ्या असलेल्या सकाळमधल्या सहकाऱ्यांनी मला पळताना पाहिलं होतं. त्यामुळं मला लागलं आहे ही बातमी आधीच पाध्ये साहेबांपर्यंतच पोचली होती. (तेव्हा मोबाइल निवडक लोकांकडंच होते.) मी ऑफिसात आल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. तातडीने डॉक्टरांना दाखवून यायला सांगितलं. एक तर ती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीची दुपार. त्या वेळी बाजीराव रोडवर काय माहौल असतो, याची आपल्याला कल्पना आहेच. तशा वातावरणात मी डॉक्टर शोधत निघालो. बिनीवालेंचा दवाखाना मागंच आहे. पण तो बहुतेक बंद होता. मग मी एक डॉ. सेठी म्हणून होते, त्यांना दाखवलं आणि पुन्हा पाध्ये साहेबांकडं येऊन, मी उपचार घेतल्याचं कळवलं. त्यांनी लगेच मला घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितलं. वास्तविक मला तेव्हा बरं वाटत होतं. पण पडत्या फळाची आज्ञा झेलून, मी माझी बातमी लिहिली आणि लगेच रूमवर रवाना झालो. या घटनेनंतर एक झालं. आम्हा सर्वांना तातडीनं ओळखपत्रं देण्यात आली.
 रिपोर्टिंगचा आठवडा मला आवडे. मी सायकलीवरूनच सगळीकडं जात असे. भारत इतिहास संशोधक मंडळ, शिवाजी मंदिर, वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, मंडई, पुणे मराठी ग्रंथालय, गरवारे सभागृह, पदमजी हॉल, बालगंधर्व, महापालिका, शनिवारवाडा, फरासखाना, फर्ग्युसनचं अॅम्फी थिएटर, विद्यापीठ, गुलटेकडी मार्केट यार्ड, कँटोन्मेंट, पोलिस कमिशनर ऑफिस, शिवाजीनगर, स्वारगेट बसस्टँड, लक्ष्मी रोड ही बातम्या गोळा करण्याची किंवा वार्तांकनाला जाण्याची ठिकाणं होती. (अजूनही तीच आहेत.) दिघीच्या एआयटीच्या पदवीप्रदान समारंभालाही गेलो. संजीवनी विद्यालयाच्या अमृतमहोत्सवानिमित्त पाचगणीलाही गेलो. तेव्हा प्रत्येक बीटच्या बातमीदारासोबत त्या त्या बीटवर जायचं असं आम्हाला सांगितलं होतं. गणपती आले होतेच. मी आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरून एक बातमी लिहिली. ‘अवघ्या शहरावर उत्सवाचा रंग...’ अशा शीर्षकानं ती पान ५ वर छापून आली, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. वास्तविक या बातम्यांवर आमचं नाव नसे. तरीही मी बातमीला चौकोन करून तो पेपर जपून ठेवत असे. गणपतीत आम्ही एकेक दिवस वाटून घेतला आणि तसं रिपोर्टिंग केलं. सकाळची गाडी बरोबर असे. ड्रायव्हर आणि एक फोटोग्राफर असे आम्ही तिघं जात असू. मी अण्णा खरातांसोबत घोरपडी, मुंढवा, कोंढवा, साडेसतरा नळी वगैरे नाही नाही त्या ठिकाणी जाऊन आलो. ही ठिकाणं मी माझ्या आयुष्यात पूर्वी कधी पाहिलीही नव्हती. पण ‘सकाळ’ची गाडी आल्याबरोबर त्या मंडळांकडून आम्हाला फारच मान मिळत असे. नारळ (पुण्यातल्या भाषेत सांगायचं तर श्रीफळ) तर हमखास मिळेच. आम्ही ऑफिसात पहाटे परत येत असू, तेव्हा जीपची मागची बाजू नारळांनी भरून गेलेली असे. मी रिपोर्टिंगला असतानाही ‘सकाळ’च्या या दबदब्याचा अनेकदा अनुभव येई. केवळ मी (म्हणजे ‘सकाळ’चा प्रतिनिधी म्हणून) अजून यायचो आहे, म्हणून पत्रकार परिषदा सुरू व्हायच्या थांबल्याचा अनुभव अनेक वेळेला घेतला आहे. अर्थात मी बहुतांश प्रसंगी वेळेतच जात असे, हा भाग सोडा. पण तिथं गेल्यावर हमखास जाणवे, की आयोजकांचं आपल्या येण्याकडं खास लक्ष आहे. (पुढं एकदा एका सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सची गंमत सांगतो. मी मागे आहे, हे त्या दिग्दर्शकाला माहिती नव्हतं. त्याचं विमान केव्हाच वर उडायला लागलं होतं. तो त्याच्या सहकाऱ्यांना माझं नाव घेऊन सांगत होता, की हा माणूस आपल्याला महत्त्वाचा आहे. याच्याकडं लक्ष द्या. शेवटी त्याच्या मित्रांनी त्याला ढोसून सांगितलं, की जरा थांब. तो आपल्या मागंच उभा आहे.) अर्थात, हे सगळं महत्त्व त्या संस्थेला आहे आणि आपण निमित्तमात्र प्रतिनिधी आहोत, याचं भान मी कधीही सोडलं नाही आणि कुठली हवा डोक्यात जाऊ दिली नाही. पण ही परिस्थिती आम्ही सगळे एंजॉय नक्कीच करायचो. अनेकदा प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा कुठलाही कार्यक्रम झाला, की बाहेर सर्व पत्रकारांचं कोंडाळं एकत्र जमायचं आणि लीड (बातमीचा गाभा, सुरुवात) काय काढायचा, यावर सामुदायिक चर्चा चालायची. विशेषतः ‘सकाळ’चा माणूस काय ‘लीड’ करणार आहे किंवा त्यानं काय लीड काढावं याकडं अनेकांचं लक्ष असायचं. शेवटी एखादा समान मुद्दा निघायचा आणि हेच लीड काढू या असं काही तरी ठरवून ती स्टँडिंग कमिटीची मीटिंग संपायची. (हे अजूनही चालू असतं.)
डेस्कवरचं कामही मी मनापासून करायचो. मला भाषांतर करायचं काम आव्हानात्मक वाटे. संदर्भ अडला, तर ग्रंथालय, शब्दाचा अर्थ कळला नाही तर ज्येष्ठ सहकाऱ्याला विचारणे किंवा डिक्शनरी, एखाद्या विविक्षित क्षेत्रातला पारिभाषिक शब्द असेल, तर त्यातील तज्ज्ञाला फोन लावून विचारणे या सगळ्या चांगल्या सवयी लागल्या, त्या डेस्कवर. काय वाट्टेल ते झालं, तरी चुकीची माहिती किंवा शब्द अंकात जाता कामा नये, यावर सर्वांचा कटाक्ष असायचा. कारण सकाळची वाचकसंख्या मोठी होती. शिवाय आम्हाला सांगितलं जायचं, की आपला अंक एकाच वेळी विद्यापीठाचे कुलगुरूही वाचणार आहेत, शहरात राहणारे मोठमोठे सेलिब्रिटीही वाचणार आहेत आणि त्याच वेळी मार्केट यार्डातला शेतकरीही वाचणार आहे. त्यामुळे या दोघांनाही कळेल अशाच भाषेत बातमी लिहिली गेली पाहिजे. हे कुणालाही पटण्यासारखं होतं. ‘सकाळ’च्या तिसऱ्या मजल्यावर समोरच स्टेशनवरचा एक हमाल ‘सकाळ’ वाचतो आहे, असा फोटो अनेक वर्षं होता. तो मला आवडायचा.
सकाळ’मध्ये एक जानेवारीला होणारा वर्धापनदिनाचा कार्यक्रम हाही एक सोहळा असायचा. शिकण्याचाच भाग असायचा. तिथं वेगवेगळ्या क्षेत्रांतले सेलिब्रिटी यायचे. (दिवंगत) बॅरिस्टर भास्करराव घोरपडे, अनिल अवचट, अण्णा हजारे या व्यक्तिमत्त्वांशी माझा परिचय झाला तो या सोहळ्यातच.
सुमारे वर्षभर आमचं हे ट्रेनिंग चाललं आणि नंतर सहा महिन्यांनी आम्ही परमनंट झालो. मग आम्हाला ठराविक विभाग कायमस्वरूपी काम करण्यासाठी मिळाले. मी मुख्य डेस्कवर आलो. त्यानंतरच्या दिवसांविषयी नंतर कधी तरी... पण जडणघडणीचं हे दीड वर्ष माझ्यासाठी तरी पुढील करिअरची पायाभरणी करणारं असंच होतं यात शंका नाही. मी या काळाविषयी आणि त्यात मला शिकवणाऱ्या सर्वांविषयी कृतज्ञ आहे!

-----
(पूर्वप्रसिद्धी - चपराक दिवाळी अंक 2014)
----

15 comments:

 1. U are the GrEaT.........................SiRjI..........

  ReplyDelete
 2. अप्रतिम मांडलयस तुझं मनोगत इथे . मोठ्या लोकांनी उमेदवारीच्या काळात सोसलेले ' टाकीचे घाव ' आणि ते ' आयुष्य घडवणारे अनुभव' वाचायला खरंच आवडत मला .
  १९९७ /९८ मध्ये इंजीनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना मी अप्पा बळवंत चौकातल्या आनंदाश्रम येथील वसतिगृहात रहात असे . संध्याकाळच्या वेळी जेवायला भाऊ महाराज बोळातील जहागीरदारांच्या घरगुती खानावळीत . जहागीरदार काकूंच्या हातचं जेवण म्हणजे निव्वळ अप्रतिम … पण त्या खानावळीचा खरा फायदा म्हणजे सांस्कृतिक, वैचारिक भूक भागविणारी.... वेगवेगळ्या विषयात जरा जास्तीच रुची असणारी गावाकडची समवयीन मित्रमंडळी मंडळी भेटली आणि त्यात ' श्रीपाद ब्रह्मे ' हे नाव नक्कीच डोक्यात फिट्ट बसलं … जरी आपला फारसा संपर्क नंतर आला नसला तरीही .
  असो . लिहित रहा … आम्ही वाचत राहू

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद अजित... जुन्या आठवणींना उजाळा...

   Delete
 3. मस्त आहे. वाचताना मजा आली

  ReplyDelete
 4. मस्त आहे. वाचताना मजा आली

  ReplyDelete
 5. तुझा पत्रकारितेचा प्रवास वाचताना छान वाटलं, नकळत सहप्रवासी झाल्या सारखा फील आला

  ReplyDelete
 6. पत्रकारितेतील प्रवास वाचताना खूप आनंद वाटला 1999 साली युवा सकाळ मध्ये मी बरंच लिखाण करीत होतो चित्रपटाचे मोठे शब्दकोडे देत होतो तसेच एक आठवड्याचे जम्बो शब्दकोडे देखील देत होतो .त्यावेळी संतोष देशपांडे यांच्याकडे माझे नियमित येणे होत असे. मंदार कुलकर्णी त्यांच्या शेजारीच बसत असत. पुढे 2012 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ तून जळणारे पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आणि नंतर मास्टर्स इन जर्नालिझम देखील पूर्ण केले.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद! जुन्या आठवणींना उजाळा! 👍

   Delete
 7. खूपच छान आढावा.तुमची लेखनशैली खरच खूप ओघवती आणि गुंतवून टाकणारी आहे. मस्तच लीहले आहे.

  ReplyDelete
 8. खूप मजा आली वाचताना! तुमचा पुढचा प्रवास, अनुभव, शिकण्याविषयी पण लिहा.आवडेल!

  ReplyDelete