फार्फार वर्षांपूर्वी मी लहान-कम्-कुमार होतो,
तेव्हा गोविंदाचं एक गाणं फार फेमस होतं - ‘सरकाइलो खटिया... जाडा लगे...’
या गाण्यात नायिका नायकाला तो जाड असल्याबद्दल चिडवत असते, अशी आपली माझी
समजूत होती. (आठवीत हिंदी सोडल्याचा परिणाम!) पण ‘जाडा’ म्हणजे थंडी हे
कळल्यावर पुलंच्या शब्दांत सांगायचं, तर त्या भाषेच्या यथार्थ
शब्दयोजना-सामर्थ्यावर माझे एकदम प्रेम बसले.
हिवाळा आणि जाडेपणा यांचं काय अद्वैत आहे, ते
कळत नाही. पण तापमापकातल्या पाऱ्याची घसरण सुरू झाली, की इकडं ‘देहाची
तिजोरी’ प्रसरण पावायला लागलीच म्हणून समजा. पण बँकेतल्या लॉकरसारखं हे
वाढतं धन फार काही अभिमान बाळगावं असं नसतं. लहानपणी जी चरबी अंगावर चढली,
की बाळसं धरलं म्हणून कौतुक व्हायचं तीच चरबी मोठेपणी आपली आबाळच करते.
अतएव, हे वाढतं शारीरिक वजन कमी करण्याचे फंडे सुरू होतात. हल्ली तर
फेसबुक, व्हॉट्सअप किंवा हाइक आदी सामाजिक कार्यामुळं एक बोटं सोडली, तर
अन्य अवयवांच्या व्यायामाला वेळ मिळत नसल्यानं दुसऱ्या शॉर्टकट मार्गानं
काही होतंय का, याचा शोध सुरू होतो. एखाद्या आजाराची साथ यावी, तसंच हे
असतं. डेंगी किंवा स्वाइन फ्लू परवडले अशी ही ‘वेटलॉस’ची साथ असते.
पेपरांतून चकचकीत कागदांतून वजन कमी करण्याचे शंभर उपाय (आणि त्यांच्या
हजारोंच्या घरातल्या फिया) डोळ्यांसमोर नाचू लागतात. वास्तविक केवळ नुसती
एवढी फी देण्याच्या कल्पनेनं आपलं वजन निम्मं कमी होऊ शकतं. (पण ही आयडिया
अजून कुणी काढलेली नाही, तेव्हा तिचं पेटंट घेऊन ठेवावं हे बरं.)
डाएट नामक प्रकाराचं तर आता अजीर्ण झालंय. हे
खाऊ नको, ते खाऊ नको, हेच पी, ते ढोसू नको... वगैरे आदेश कानी यायला
लागतात. झणझणीत मिसळ-तर्री अन् वडापावला सोकावलेली आमची जठर, आतडं, प्लीहा,
यकृत आदी मंडळी पालेभाज्यांचं सूप किंवा कडधान्याचा सुकामेवा पाहून
कोमेजून जातात. त्यांच्याकडं बघवत नाही. पण काय करणार... चरबीचा इंडिकेटर
ट्वेंटी-२० सामन्यातल्या शेवटच्या षटकांत धावा वाढाव्यात तसा वाढत असतो.
हल्ली आहारशास्त्राची भरपूर पुस्तकं निघाली आहेत. मोठमोठ्या सेलिब्रिटींनी
आपापल्या कमरा ती पुस्तकं वाचून शून्यावर आणल्या, हे वाचून मला सुन्न
व्हायला झालं.
साइझ झिरोचं फॅड पुरुषांत नाही, हे केवढं बरं झालं, हा एकच
विचार माझ्या मनात त्यानंतर आला. आम्हाला कंबर ३६ वरून ३८ वर जाण्याऐवजी ३४
कडं नेण्याचं अल्पसं ध्येयही झेपत नाही! या वाढत्या घेरामुळं नाही नाही ते
ऐकून घेण्याची वेळ तेवढी आली. सामाजिक वर्तुळात माझ्या पोटाच्या
अर्धवर्तुळाचीच जास्त चर्चा... कधीही, कुणीही, केव्हाही भेटलं, की पोटाकडं
एक लूक देऊन ‘तब्येत सुधारलीय,’ असं जे कुचकटपणाच्या कमाल पातळीवर बोलतं
ना, ते ऐकून धरणी दुभंगून तिच्या त्या मोठ्ठ्या पोटात घेईल, तर बरं असं
वाटतं. अर्थात जाता जाता त्या लूकवाल्यालाही ‘पोटावर बोट ठेवायची गरज
नव्हती,’ हे सुनावल्याशिवाय मी राहणार नाही. ‘पाठीवर बोला, पण पोटावर बोलू
नका,’ असं एक ब्रीदवाक्य तातडीनं जाहीर वापरात आणलं पाहिजे. अहो, या
वाढत्या चरबीमुळं माझी झोप उडविली हितचिंतक-कम्-हितदुष्टांनी. कोलेस्टेरॉल,
लिपिड प्रोफाइल, बीएमआय, अँजायना, अँजिओग्राफी हे काय प्रकार आहेत, हे मला
आत्ताआत्तापर्यंत माहिती नव्हतं. रशियाच्या ‘केजीबी’ किंवा इस्रायलच्या
‘मोसाद’ या गुप्तचर संस्थेत टोपणनावानं काम करणारे हे अधिकारी आहेत, असं
कुणी मला सांगितलं असतं, तरी आपण ‘बाय हार्ट’ विश्वास ठेवला असता. पण त्या
अधिकाऱ्यांपेक्षा अधिक माणसं मारणारे हे आपल्याच शरीरात लपून बसलेले दुष्ट
गुप्तहेर आहेत, हे कळल्यावर माझी ‘धक धक’ वाढली. हार्टअटॅक येईल तेव्हा
येईल, पण तो येईल या भीतीनं वजन कमी व्हायला हरकत नव्हती. पण चिंताग्रस्त
होऊन, मी सुन्न की कायसा होऊन बसूनच राहिल्यानं वजन पुन्हा वाढलं.
हिवाळा हा मेदवृद्धी करणारा ऋतू आहे, असं
कुठल्याशा अरसिक गुरुजींनी कुठं तरी लिहून ठेवलं आहे. पण त्याहीपेक्षा तो
मोदवृद्धी करणारा ऋतू आहे माझ्यासाठी! या काळात पहाटेची साखरझोप जशी लागते
तशी ती अन्य ऋतूंत लागत नाही. या साखरझोपेनं मधुमेह होत नाही, हे सांगायला
नकोच. ही साखरझोप वसंत बापटांच्या शब्दांत सांगायचं, तर पहाटे पहाटे जे
साखरचुंबन देऊन जाते ना, बस्स, त्यासाठी आपल्याला हा ऋतू आवडतो! गोधड्यांवर
गोधड्या अंगावर घेऊन उन्हं चांगली वर येईपर्यंत झोपून राहण्यात जे सुख
आहे, ते पहाटे उठून फिरायला जाणाऱ्यांना कधीच कळणार नाही. मीही कधी काळी
बहकलो होतो आणि पहाटे उठून व्यायाम करण्यासाठी म्हणून पर्वतीवर वगैरे
जायचो. मात्र, पर्वती उतरून आल्यावर तुडुंब मिसळ खाऊन, दुपारी पुन्हा भरपेट
जेवून झोपण्याच्या सवयीमुळं वजन ‘जैसे थे’च राहिलं, तेव्हा कुठं मला
पर्वतीवर जाणाऱ्यांचं खरं प्रयोजन कळलं. वजन कमी करण्यासाठी जिम वगैरेचा
नाद तर मी कधीच केला नाही. ‘जिम पोरा जिम’ हे गाणं माझ्या आयुष्यात कधी
वाजलं नाही. ती एक राहून गेलेली गोष्ट आहे. मात्र, अनेक जण जिम करतात. अगदी
देवधर्म करावा तशा भक्तिभावानं जिम ‘करतात’. छान तब्येतही कमावतात.
(त्याहीपेक्षा छान पैसे गमावतात.) अन् नंतर येऊन सांगतात, काय राव, एवढी
जिम लावली, पण वजन पाहिजे तसं उतरलं नाही. तेव्हा भूतदयाळू नजरेनं
त्यांच्याकडं पाहण्याची दुर्मिळ संधी मला मिळते. आखाडा वगैरे गोष्टींना तर
मी कल्पनेतही हात लावला नाही. एक तर उघड्याबंब अंगानं केवळ लंगोट लावून
चार-चौघांत फिरणं मला जमणार नाही. शिवाय ती अंगाला माती लागते, तेही
आपल्याला नाही आवडत! आखाड्यापेक्षा आखाड आवडीचा. आखाडातले खाण्याचे
साटोऱ्या वगैरे पदार्थ मला प्रिय... म्हणून शड्डू ठोकले, पण शाब्दिक!
त्यातल्या त्यात सकाळी चालणे ही एक चांगली
क्रिया आहे. पण त्यासाठी सकाळी लवकर उठणं हे एक कटकटीचं उपकलम आहे. त्यावर
उपाय म्हणून मी आपण जेव्हा केव्हा उठू, त्यानंतर चालायचं असा निर्धार केला
आणि तो बऱ्यापैकी टिकवला. चालता चालता गावभरच्या गप्पा मारता येतात, रेडिओ
ऐकता येतो आणि आरजे मुलींची बडबड ऐकून दिवसभरात कुठलाही शाब्दिक आघात
पचवण्याची सहनशीलता अंगी येते. (ज्यांना लेडी बॉस आहे, त्यांनी हा उपाय
करून बघायला हरकत नाही.) केवळ ४०-४५ मिनिटं झपझप चालण्यानं आपलं वजन स्थिर
राहू शकतं, या विचारानं आता मला फारच हुरूप आला आहे. या आनंदापोटी रसमलाई,
बासुंदी अन् आम्रखंडाचं त्रिखंडी जेवण ओरपून आत्ता हे लिहीत बसलोय. नुसतं
लिहीतच बसणं मला केव्हाही पटलं नाही आणि जमलं नाही. त्यामुळं एवढं लिहिताना
बशीभर शेंगादाणे, वाटीभर डाळिंबाचे दाणे, हे उगाच आपले एवढेसे पावकिलो ओले
मटार, प्लेटभर मनुका, काजू, बदाम आणि सहज तोंडी टाकायला म्हणून अंजीरबर्फी
इतकंच घेतलं... एवढं तर लागतंच ना हो वाढत्या अंगाला... चला, हे आटपलं की
मिसळ पार्टी आहे अन् लगेच त्या प्रसिद्ध डायनिंग हॉलमध्ये जायचंय जेवायला!
अन् हो, संध्याकाळी आमच्या त्या फेमस समोसेवाल्याचा समोसा खाल्ल्याशिवाय
आपल्याला नाही बुवा चैन पडत... रात्री परत मस्त ओली पार्टी आहे, त्यामुळं
आज एकच समोसा खाणार... नक्की एकच. डाएट कॉन्शस आहे मी तसा!
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - संवाद पुरवणी - २३ नोव्हेंबर २०१४ )
----
----
सुंदर लेख श्रीपाद...! मनमुराद हसविणारा लेख आहे हा...!! आमच्या आनंदासाठी असेच लिहिते रहावे, हीच आग्रहाची विनंती...!!!
ReplyDeleteधन्यवाद महेश....
ReplyDelete