1 Dec 2014

भोपाळ... अंधारपर्वाची तिशी

भोपाळ गॅसगळती दुर्घटना म्हटलं, की आजही अंगावर सरसरून काटा येतो... याचं कारण एका लहान बालकाची कवटी आणि डोळ्यांच्या जागी दोन काळी भोकं असलेला तो प्रसिद्ध फोटो! या फोटोत त्या सगळ्या अंधारपर्वाची वेदना दाटली आहे. येत्या तीन डिसेंबरला या दुर्घटनेला तीस वर्षं पूर्ण होतील. ही आतापर्यंतची जगातील सर्वांत भयानक औद्योगिक दुर्घटना मानली जाते. यात अधिकृतपणे ३७८७, तर अनधिकृत आकड्यानुसार, आठ ते दहा हजार निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर जागीच मरण पावणाऱ्यांची संख्या तीन हजारच्या घरात होती, तर पुढील पंधरा दिवसांत आणखी सुमारे आठ हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर आत्तापर्यंत आणखी आठ हजार लोकांना या गॅसमुळं झालेल्या विविध विकारांमुळं प्राणाला मुकावं लागलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, तेव्हा पाच लाख ५८ हजार १२५ लोक या वायुगळतीने बाधित झाले. त्यापैकी ३८,४७८ जणांना कायमस्वरूपी किरकोळ व्यंग निर्माण झालं, तर सुमारे ३९०० जणांना कायमस्वरूपी गंभीर व्यंग शरीरात निर्माण झालं.
दोन आणि तीन डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री भोपाळ शहराजवळ असलेल्या युनियन कार्बाइड या कीटकनाशकं बनविणाऱ्या अमेरिकी कंपनीतून ही गॅसगळती झाली. कंपनीतील ई- ६१० क्रमांकाच्या आता कुप्रसिद्ध झालेल्या त्या टँकमधून तब्बल ३० टन एवढा मिथाइल आयसोसायनेट हा विषारी वायू बाहेर पडला. या टँकमध्ये एकूण ४२ टन वायू होता. जमिनीखाली असलेल्या या टँकमध्ये पाणी शिरलं आणि त्यातून वेगवेगळ्या रासायनिक क्रिया घडून, भोपाळवर विषारी वायूच्या रूपानं जणू काळानं झडप घातली. या भयावह दुर्घटनेनंतर भोपाळवर काही दिवस फक्त मृत्यूचं राज्य होतं. यात अनेक लहान मुलं, स्त्रिया यांना तडफडून मरावं लागलं. जीव जगावा म्हणून जी हवा श्वासातून आत घ्यायची, तीच साक्षात मृत्यू बनून लोकांच्या फुफ्फुसात शिरत होती आणि किड्या-मुंग्यांसारखे प्राण जात होते. भोपाळच्या आसमंतात या वायूच्या रूपानं काळ थैमान घालत होता. हा वायू जड असल्यानं तो जमिनीलगत राहिला होता. त्यामुळं लहान मुलं, कमी उंचीची माणसं यांच्या पोटात तो अधिक तीव्रतेनं गेला. त्यांचेच बळी सर्वाधिक गेले. सगळंच सुन्न करणारं... हतबल करून सोडणारं...!
कशी घडली दुर्घटना?
 युनियन कार्बाइड इंडिया लि. हा भोपाळमधला एक महत्त्वाचा प्रकल्प होता. तो १९६९ मध्ये सुरू झाला. अमेरिकी मल्टिनॅशनल कंपनीची ही भारतातील उपकंपनी. भोपाळमध्ये ‘सेविन’ (कार्बरिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाइल आयसोसायनेट व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) वायूरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकी, तसेच भारतीय कंपनीला होती. या एमआयसीचं रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो साठविला जात असे. अशा तीन टाक्या जमिनीखाली होत्या. त्यापैकी एका टाकीमधून द्रवरूपातील एमआयसीचं गॅसमध्ये रूपांतर झालं. त्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर १९८४ च्या रात्री कंपनीत पाण्याच्या टाक्यांची साफसफाई हाती घेण्यात आली. त्या वेळी पुरेशी काळजी घेतली न गेल्यानं हे पाणी जमिनीखालच्या ‘एमआयसी’च्या टाकीत शिरलं. तिथून मग गळती सुरू झाली.
या गळतीनंतर अत्यंत प्राणघातक अशा एमआयसी आणि अन्य वायूंचा एक ढगच तयार झाला आणि कंपनीतून हा ढग आग्नेय दिशेनं नेमका भोपाळ शहराच्या दिशेने झेपावू लागला. या ढगात एमआयसीव्यतिरिक्त फॉस्जेन, हायड्रोजन सायनाइड, कार्बन मोनोक्साइड, हायड्रोजन क्लोराइड, नायट्रोजनचे ऑक्साइड्स, मोनोमेथिल अमीन आणि कार्बन डायऑक्साइड आदी विषारी किंवा हानीकारक वायू होते. या ‘ढगा’त कुठले वायू तयार झाले, याबाबत युनियन कार्बाइडने अधिकृतरीत्या कुठलीही माहिती आजतगायत दिलेली नाही.
भोपाळमध्ये हाहाकार
भोपा‍ळ शहरातील पोलिसांच्या नाइट पेट्रोलिंग युनिटनं जवळच्या पोलिस कंट्रोल रूमला रात्री १.२५ च्या सुमारास पहिल्यांदा बातमी कळविली, की कसलासा वायू पसरला आहे आणि लोक घाबरून पळत आहेत. वायुगळती युनियन कार्बाइड कंपनीतून होत असल्याचा संदेशही पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी युनियन कार्बाइडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु त्यांना एकही जबाबदार अधिकारी सापडेना. रात्री दोनच्या सुमारास कंट्रोल रूममधील फोन सतत खणखणू लागले. तेव्हा पोलिस केवळ एवढीच माहिती देऊ शकत होते की, विषारी वायूची गळती झाली आहे आणि पाण्याचा वापर केल्यास होणारा त्रास कमी होऊ शकेल. मात्र, हा वायू इतका विषारी असल्याची कल्पना यंत्रणेलाच नसल्यामुळे केवळ लोकांमधली भीती दूर करणं आणि पळणाऱ्यांची सुरक्षितता - एवढीच बाब प्रामुख्याने त्या रात्री विचारात घेतली जात होती. तीन डिसेंबरची सकाळ उजाडली. सकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत या घटनेची तीव्रता सर्वांच्याच लक्षात आली. विषारी वायूनं घातलेलं थैमान सर्वांना दिसू येऊ लागलं. मृतदेह भोपाळ मेडिकल कॉलेजच्या आवारात पोस्टमॉर्टेमसाठी येऊ लागले. पुढं कित्येक दिवस हा जीवन-मृत्यूचा खेळ सुरू राहिला.
भयानक दुष्परिणाम
गॅसगळती दुर्घटनेनंतर हा प्रकल्प केंद्र सरकारकडून बाहेरच्यांसाठी तातडीनं बंद करण्यात आला. त्यात युनियन कार्बाइड कंपनीलाही प्रवेश नव्हता. त्यानंतरही केंद्राकडून या दुर्घटनेविषयी कुठलीही ठोस कारणमीमांसा जारी न झाल्यानं गोंधळ आणखीनच वाढला. सुरुवातीला या दुर्घटनेच्या कारणांमागचा तपास केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्यामार्फत करण्यात आला. युनियन कार्बाइडनंही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक, तसेच अन्य वैद्यकीय उपकरणं व साहित्य यांचा पुरवठा करून स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत केली. याशिवाय कंपनीनं एक तांत्रिक समिती स्थापन करून गॅसगळतीचं कारण शोधण्यास सुरुवात केली.
मात्र, या दुर्घटनेची व्याप्ती एवढी मोठी होती, की वैद्यकीय पथके अपुरी पडली. अशा प्रकारच्या विषारी वायुगळतीवर उपचार करण्यासाठी तेव्हा आपल्याकडं कुठलीही सुसज्ज यंत्रणा नव्हती. 
 अनेक मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी थोड्या कालावधीत, परिसरातील सर्व झाडं नष्ट झाली. सुमारे दोन हजारहून अधिक जनावरांचे मृतदेह पुरावे लागले. सुमारे एक लाख ७० हजार लोकांवर तात्पुरत्या दवाखान्यांत व सरकारी हॉस्पिटलांत उपचार करण्यात आले. लवकरच अन्नधान्याचाही तुटवडा भासू लागला. १६ डिसेंबर रोजी टँक क्र. ६११ व ६१९ मोकळे करण्यात आले आणि त्यातील एमआयसी गॅस वापरून काही काळ पुन्हा प्लँट सुरू करण्यात आला. हा गॅस संपविण्यासाठी असं करण्यात आलं आणि त्यामुळं भोपाळवासीयांनी पुन्हा एकदा घाबरून शहर सोडलं.
केंद्र सरकारनं ‘भोपाळ गॅस लीक डिझास्टर ॲक्ट’ नावाचा कायदा संमत केला. त्यामुळं सरकारला या दुर्घटनेतील सर्व पीडितांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार मिळाला. काही काळानं हवा, पाणी, भाजीपाला आणि अन्नधान्य सुरक्षित असल्याचा निर्वाळा देण्यात आला. मात्र, मासे खाऊ नयेत अशीही सूचना करण्यात आली. कंपनीनंही रिलीफ फंडासारखी मदत देऊ केली, मात्र केंद्र सरकारनं ती फेटाळून लावली.
या वायुगळतीनंतर १६ डिसेंबरपासून ‘ऑपरेशन फेथ’ हाती घेण्यात आलं. या प्रक्रियेदरम्यान कंपनीच्या आजूबाजूला सर्वत्र पाणी टाकण्यात येत होते. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरांमधूनही सतत पाण्याचा शिडकावा कंपनीवर होत राहिला. २२ डिसेंबरच्या संध्याकाळी ‘ऑपरेशन फेथ’ संपलं.
माणुसकी संपली...
 या दुर्घटनेनंतर युनियन कार्बाइडचे तत्कालीन सीईओ वॉरन अँडरसन तातडीनं भारतात आले. त्यांना तातडीनं स्थानबद्ध ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना तातडीने, २४ तासांच्या आत भारत सोडण्यास सांगण्यात आलं. या वेळी अमेरिकेकडून भारत सरकारवर अँडरसन यांना सोडण्यासाठी मोठा दबाव आला आणि त्यापुढं झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांनी अँडरसन यांना जाऊ दिलं, असा आरोप केला जातो. या आरोपांतील तथ्य किंवा सत्यता कधीच समोर येणार नाही. मात्र, त्यानंतर अँडरसन मरेपर्यंत कधीही भारतात आले नाहीत. पुढं जनमताच्या दबावाखाली आणि कोर्टाच्या रेट्यामुळं अँडरसन यांच्यावर १९९१ मध्ये मनुष्यवधाचा खटला भरण्यात आला. अँडरसन यांना एक फेब्रुवारी १९९२ रोजी भोपाळमधील कोर्टानं मनुष्यवधाच्या खटल्यात हजर न झाल्यानं फरारी घोषित केलं. कोर्टानं अँडरसन यांच्या अमेरिकेकडून प्रत्यार्पणासाठी भारतीय सरकारकडे आदेश जारी करण्यात आला. मात्र, त्यात पुढं काहीही झालं नाही. याच वर्षी २९ सप्टेंबरला अँडरसन अमेरिकेत मरण पावले आणि एक दुष्टपर्व संपलं. ही बातमी समजताच, भोपाळमधील लोकांनी अँडरसनचा फोटो लावून, रांगा लावून त्यावर थुंकून आपला संताप व्यक्त केला.
भारत सरकारनं १९८५ मध्ये अमेरिकी कोर्टात युनियन कार्बाइडविरुद्ध ३.३ अब्ज डॉलर भरपाईचा दावा लावला. पुढं त्या कोर्टानं हा खटला भारतात वर्ग केला. शेवटी १९८९ मध्ये भारत सरकार आणि युनियन कार्बाइड यांच्यात कोर्टाबाहेर समझोता झाला आणि भारत सरकारनं अवघ्या ४७ कोटी डॉलर भरपाईवर समाधान मानलं. या भरपाईचंही अंशतः वाटप झालं आणि नाराज पीडितांनी पुन्हा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं. त्यावर अनेक दिवस सुनावणी होत राहिली. अखेर आत्ता, म्हणजे सात जून २०१० रोजी युनियन कार्बाइडचे तत्कालीन अध्यक्ष केशुब महिंद्र यांच्यासह आठही आरोपी दोषी असल्याचा निकाल कोर्टानं दिला.
तीस वर्षं उलटून गेली, तरी भोपाळवासीयांचा संघर्ष सुरूच आहे. माणसाचा जीव आपल्याला जोपर्यंत सर्वांत महत्त्वाचा वाटत नाही, तोपर्यंत अनेक ‘भोपाळ’ घडण्याची टांगती तलवार आपल्या देशावर आहेच. बहुराष्ट्रीय कंपन्या भारतासारख्या विकसनशील देशाचं कशा पद्धतीनं शोषण करू शकतात आणि एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र त्यापुढं कसं हतबल ठरतं, याचं ‘भोपाळ’ हे लाजीरवाणं उदाहरण आहे. त्याच्या कटू स्मृतींनी पुन्हा एकदा या लज्जास्पद भावनेवरची खपली काढली आहे.
----
(काही मजकूर विकीपिडियावरून साभार)
---

No comments:

Post a Comment