5 Dec 2014

रीम ते रीळ...


मध्यरात्रीची वेळ... गावाकडचं जुनं घर. माडीवरच्या खोलीत मी एकटा बसलो आहे. वय वर्ष १०-११. हातात अरबी सुरस चमत्कारिक कथा हे जाडजूड पुस्तक. सगळीकडं भयावह शांतता. रातकिड्यांची किर्रर्र तेवढी ऐकू येते आहे. दूरवर कुठं तरी कुत्री जीव खाऊन भुंकत आहेत... पण तो आवाजही त्या शांततेच्या जाडजूड भिंतींतून फिल्टर केल्यासारखा चमत्कारिक हळूवारपणे कानावर येतो आहे. आता त्या आवाजात आणखीही कसलेसे आवाज मिसळताहेत वाटतं. आमच्या शाळेच्या बाजूनं लांबलचक रस्ता आहे. त्याच्या पलीकडं एक तळं आहे. हल्ली ते तळं पूर्ण आटलेलं असतं. त्या तळ्याचं रूपांतर जणू वाळवंटात झालं आहे. डोळ्यांना खुपणारा तीव्र असा मातकट, पिवळसर, तपकिरी वाळूचा उन्हाळी तप्त रंग सर्वत्र पसरला आहे. त्यावरून उंट चालले आहेत. शाळा पार करून ते सांडणीस्वार आमच्याच वाड्याकडं निघाले आहेत. हळूहळू त्यांनी वाड्याबाहेर पहारा बसवायला सुरुवात केली आहे. दुसऱ्या बाजूनं घोड्यांची टपटप ऐकू येते आहे... सर्वांत समोर त्यांचा सरदार आहे. उंचच उंच. दाढीवाला. मी पान उलटतो. आता माडीच्या जिन्यावर कुणाची तरी पावलं ऐकू येताहेत. मी हळूच तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओततो. त्या तसल्या शांततेत तो आवाजही सिक्स ट्रॅक डॉल्बीमधून थिएटरभर घुमावा तेवढा मोठ्यांदा कानांना ऐकू येतोय. बाहेरची पावलं थांबली आहेत बहुतेक. मी पुढच्या पानाच्या शेवटच्या ओळीवर आहे. सरदार जीव खाऊन ओरडतो - दरवाज्जा खोलो... मी प्राणभयानं पुस्तक फेकून गच्च मिटलेले डोळे उघडतो. आता छतावरची पांढरट ट्यूब हळूहळू दिसू लागते. दरवाजाला कडी असते. सर्वत्र तीच शांतता असते. मी माझ्या खऱ्या जगात परत येतो...सिनेमा संपतो!
... रीम ते रीळ या प्रवासाचा हा असा अनुभव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेला आहे. छापील पुस्तकांतल्या शब्दांमधली जादू आणि माणसाच्या मनाची कल्पनेच्या भराऱ्या घेण्याची क्षमता या अद्भुत मिश्रणातून तयार होणारं हे खास आपलं जग पडद्यावरच्या त्या रूपेरी-रंगीत जगापेक्षा काकणभर सरसच असतं. त्यामुळं पुस्तक लिहून ठेवण्याची कला जन्माला आली, त्याच वेळी या छापील शब्दांना कधी तरी वास्तवाचा आभास निर्माण करणाऱ्या जादुई खेळात आणून बसविण्याची कल्पना माणसाच्या डोक्यात आली असणार! छापील शब्दांचा जन्मही मुळात माणसाच्या मनात येणाऱ्या नानाविध कल्पना लिहून ठेवण्यासाठी आणि दुसऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठीच तर झाला! गोष्ट सांगणं आणि त्याचा सामूहिक आनंद लुटणं हा, माणसाच्या माणूस म्हणून होत असलेल्या उत्क्रांतीतला महत्त्वाचाच टप्पा म्हणावा लागेल. अगदी पहिल्यांदा माणसाला अग्नीचा किंवा दगडी हत्याराचा किंवा शेती करण्याचा शोध लागला, त्याइतकाच महत्त्वाचा... कारण माणसाच्या विकसित मेंदूचा तोही एक असामान्य आविष्कार होता. माणूस जेव्हा पहिल्यांदा बोलू लागला असेल आणि त्यानं पहिल्यांदा दुसऱ्या माणसाला समजेल असं काही तरी सांगितलं असेल, तीच पहिली गोष्ट असणार. त्यापुढील हजारो वर्षं मग माणसानं दुसऱ्या माणसांना गोष्ट सांगण्यात घालविली. त्यासाठी मग कधी त्यानं गुहेत चित्रं कोरली, तर कधी अजिंठा-वेरूळसारखी अप्रतिम लेणी खोदली.  
 चित्रकलेतून पुढं मग त्यानं गायन-वादन, नृत्यासारखे आणखी रसपूर्ण आविष्कार शोधून काढले आणि कधी तरी ही सगळी मौखिक परंपरा शब्दबद्धही केली. अगदी सुरुवातीला भुर्जपत्रावर लिहून ठेवण्यापासून ते छपाईतंत्राचा शोध लागेपर्यंत छापील गोष्टीचा प्रवास सुरू राहिला असेल. या सर्व काळात माणसाच्या इतिहासात नक्की काय काय होऊन गेलं, याची आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो. एक मात्र निश्चित म्हणता येईल, की गोष्ट सांगणं कायम राहिलं आणि ते सांगणं अधिकाधिक प्रभावी, उपयुक्त व्हावं यासाठी दर पिढीगणिक माणूस नवनवी तंत्रं, माध्यमं शोधत राहिला... त्यांचा विकास करीत गेला. वाल्मिकींचं रामायण, व्यासांचं महाभारत, भरत, भवभूती, कालिदास, भास यांच्या नाट्य-काव्यादी कलाकृती, चरक, सुश्रुत आदींचे वैद्यकीय ग्रंथ, वात्स्यायनाचा कामसूत्रासारखा ग्रंथ येथपासून ते तुलनेनं अलीकडच्या म्हणजे तेराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांपासून ते सतराव्या शतकातील संत तुकारामांपर्यंत संतपरंपरेतील साहित्य आपल्याला आजही उपलब्ध आहे ते माणसानं शोधलेल्या नवनव्या लेखन तंत्रांमुळंच. त्यामुळंच अभंग, भारूड, फटका, कीर्तन, प्रवचनांसारखी अनेक माध्यमं संतमंडळींकडून लाभली आणि तत्कालीन प्रजेचं बौद्धिक भरणपोषण झालं. या सर्व माध्यमांतून ही सर्व मंडळी एका अर्थानं गोष्टच सांगत होती. त्यांच्या सांगण्यात गोष्टीची सुरुवात, मध्य, शेवट ही सर्व मूळ तत्त्वं हजर होती. रंजनमूल्य अर्थातच होतं. वर्षानुवर्षं आधी मौखिक परंपरेनं आणि मग छापील शब्दांच्या माध्यमातून हजारो, लाखो गोष्टी पुढच्या पिढ्यांसाठी तयार होत गेल्या आणि त्यात दर पिढीगणिक नव्यानं भरच पडत राहिली. ही प्रक्रिया आजही अव्याहतपणे सुरू आहे.
युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनं केवळ त्या खंडाचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलला. माणसाच्या बौद्धिक क्षमतांना नवं अवकाश लाभलं आणि त्यातून लागलेल्या अनेकविध शोधांनी अवघ्या मनुष्यजातीचंच जगणं आमूलाग्र बदलून गेलं. तोपर्यंत एकमार्गी, बरंचसं सरळरेषी असलेलं मानवी जीवन कमालीच्या वैविध्यानं भरून आणि भारून गेलं. सतराव्या आणि अठराव्या शतकांत तर तंत्रज्ञानाचा धबधबाच कोसळू लागला आणि माणसाची नजर नित्यनेमानं नवनव्या क्षितिजांना हाकारू लागली. तंत्रज्ञानानं मानवी आयुष्य सुखकर तर केलंच; पण साध्या जगण्यापलीकडच्या अद्भुततेचा एक अनोखा प्रत्यय दिला. सुखाच्या निरंतर शोधात असलेला माणूस प्रत्यही नवनवे शोध लावत गेला आणि जगण्यातली व्यामिश्रता वाढली. कॅलिडोस्कोपमधून दिसणाऱ्या विविधरंगी आकार आणि रंगांसारखं आयुष्यही बहुरंगी, बहुढंगी झालं. सिनेमा नावाच्या नव्या तंत्रज्ञानाधारित कलेला याच क्रांतीनं जन्म दिला आणि हा शोध म्हणजे आणखीनच एक नवी क्रांती बनली. थोडक्यात, हे जग आणि माणसाचं जगणं पहिलं राहिलं नाही!
ल्युमिए बंधूंनी पॅरिसमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सरत्या काळात, म्हणजे १८९५ मध्ये जगातला पहिला सिनेमा दाखवला. (वास्तव जगातलं चित्रण दाखवण्याच्या हेतूनं या बंधूंनी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रेल्वेचं चित्रिकरण करून ते लोकांना दाखवलं होतं. अरायव्हल ऑफ द ट्रेन नावाची ही चित्रफीत पाहताना तेव्हा, जणू अंगावर चालून येणारी रेल्वे पाहून काही लोक म्हणे थिएटरमधून चक्क पळून गेले होते.) तेव्हापासून आतापर्यंत या कलेनं केलेला प्रवास केवळ थक्क करणारा आहे. भारतात हाच प्रयोग मुंबईत दाखविला गेला, तेव्हा मात्र लोक पळून वगैरे गेले नाहीत. याचं कारण आपल्याकडं गोष्ट सांगण्याची परंपरा अबाधित होती, हे आहे. पडद्यावर पुरुष बाईचं सोंग घेतो, खोटा खोटा राक्षस येतो हे सगळं आपल्या प्रेक्षकांना ठाऊक होतं. त्यामुळंच पडद्यावर दिसणारी ट्रेन अंगावर येणार नाही, हे मूलभूत ज्ञान आपल्या प्रेक्षकांना होतं. अशा प्रेक्षकांसमोर भारतातल्या सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवताना दादासाहेब फाळक्यांना राजा हरिश्चंद्र ही आपल्या प्रेक्षकांना वर्षानुवर्षं मौखिक परंपरेतून माहिती असलेली गोष्ट निवडावीशी वाटणं यातच सारं काही आलं. फाळके खरोखर हुशार! आपल्या प्रेक्षकांचं रंजन कशानं होईल याची नेमकी जाणीव त्यांना होती. एका अर्थानं पहिला सिनेमा बनतानाच मौखिक किंवा पुराण वाङ्मयाचं माध्यमांतर दादासाहेबांनी केलं होतं. त्यानंतर भारतात जोपर्यंत मूकपट बनत राहिले, तोपर्यंत पुराणातील लोकप्रिय कथांचं वर्चस्व कायम राहिलं. मूकपटात संवाद दाखवता येत नसल्यानं ही मर्यादाच पुराणकथांच्या निवडीमागची ताकद बनली. या कथा लोकांना आधीच माहिती असल्यानं मूकपटातून त्यांचं नाट्यरूप दाखवलं, तरी चालणार होतं. शिवाय पडद्यासमोर प्रत्यक्षात विविध वाद्यं घेऊन कलाकार बसलेले असतच. त्यामुळं पुराणकथांवर आधारित बहुतांश मूकपट प्रचंड लोकप्रिय झाले. तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळं या कथांमधली चमत्कारादी चित्ताकर्षक दृश्यं दाखवता येऊ लागली आणि गोष्टींमधल्या रंजनाला नवं परिमाण प्राप्त झालं.
त्यानंतर सिनेमा बोलू लागला, कालांतरानं रंगीत झाला. सिनेमाच्या तंत्रज्ञानात वर्षागणिक मोठ्या सुधारणा होत गेल्या. हे माध्यम अल्पावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोचलं. चौसष्ट कलांच्या जोडीला पासष्टावी कला म्हणून सिनेमाचं नाव घेतलं जाऊ लागलं. तंत्रज्ञानावर आधारित कला असंही तिचं वर्णन केलं जाऊ लागलं. सिनेमाचा आवाका मोठा होता. हजारो लोकांपर्यंत तो सहज पोचू शकत होता. याउलट एक कादंबरी (इथं एक मराठी कादंबरी असं गृहीत धरू या) किती लोकांपर्यंत पोचते? फार लोकप्रिय असलेल्या कादंबरीचं काल्पनिक उदाहरण घेऊ. ही कादंबरी अतिलोकप्रिय. तरीही तिच्या जास्तीत जास्त ४० आवृत्त्या. एक आवृत्ती एक हजाराची. अगदी तुफान खपाची म्हणून सोयीसाठी दोन हजारांची धरा. म्हणजे ८० हजार कॉपी. एक कॉपी अगदी भरपूर, म्हणजे शंभर लोकांनी वाचली असं धरलं, तरी ही संख्या ८० लाखांच्या वर जात नाही. राज्याची लोकसंख्या सध्या आहे ११ कोटी. त्यातले साक्षर सात कोटी आहेत असं धरलं तरी आणि त्यातल्या निम्म्या लोकांनाच पुस्तकं वाचायची आवड आहे असं धरलं तरी या साडेतीन कोटी लोकांपर्यंतदेखील ही 'सर्वाधिक लोकप्रिय' कादंबरी (अजूनही) संपूर्णपणे पोचलेली नाही, हे स्पष्ट होतं. अगदी या कादंबरीचं नाव किंवा तिच्याविषयी माहिती आहे, असे आणखी तब्बल ७० लाख लोक आहेत, असं गृहीत धरलं, तरी ही संख्या दीड कोटीच्या वर भरत नाही. याउलट अलीकडच्या काळात सर्वाधिक पाहिल्या गेल्या एका लोकप्रिय सिनेमाचं (पुन्हा काल्पनिकच) उदाहरण घेऊ. एका सिंगल स्क्रीन थिएटरची आसनक्षमता सरासरी पाचशे धरू. रोजचे चार हाउसफुल्ल खेळ धरले, तर दोन हजार लोक. सर्व शो काही हाउसफुल्ल नसतात. म्हणून आठवड्याला १४ ऐवजी दहा हजार लोकांनी शो पाहिले, असं लूजली गृहीत धरू. हा सिनेमा चार आठवडे चालला, असं समजू. म्हणजे एका थिएटरला तो ४० हजार लोकांनी पाहिला. हे झालं सिंगल स्क्रीनचं. मल्टिप्लेक्समध्येही सरासरी एवढ्याच लोकांनी पाहिला असं गृहीत धरलं, तरी ही संख्या होते ८० हजार. आता राज्यात (कमीत कमी) अगदी पाचशे थिएटर आहेत असं समजून चाललं, तरी चार आठवड्यांत हा सिनेमा चार कोटी लोक पाहतात, असं ही आकडेवारी सांगते. तेव्हा (सुमारे) चाळीस वर्षांत ४० आवृत्त्या निघणारी लोकप्रिय कादंबरी आणि (अवघ्या) चार आठवड्यांत बहुतांश हाउसफुल्ल चालणारा सिनेमा यांची ही तुलना बरंच काही सांगून जाते. शिवाय यात कादंबरीच्या बाजूनं झुकतं माप आणि सिनेमाच्या बाजूनं जास्तीत जास्त काटेकोर माप धरलं आहे. तरीही दोन्हीच्या व्याप्तीत केवढा फरक आहे, हे कळून येईल. स्वाभाविकच माध्यमांतर करण्याचे मोह होत राहणार हेही तेवढंच खरं आहे.
मराठी सिनेमांच्या बाबतीत अलीकडं सिंहासन किंवा उंबरठा ते आत्ताच्या नटरंग, जोगवा किंवा दुनियादारी या गाजलेल्या सिनेमांचं माध्यमांतर अर्थातच एक चांगलं किंवा यशस्वी माध्यमांतर होतं, असं म्हणता येईल. हे माध्यमांतर करावंसं संबंधित कलाकारांना-दिग्दर्शकांना का वाटलं असेल? आणि काय घडून आल्यावर हे माध्यमांतर यशस्वी झालं, असं आपल्याला म्हणता येईल?
 पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगता येईल, की एक तर मराठी सिनेमानं अलीकडच्या काळात टाकलेली कात आणि या सिनेमाचं बदललेलं स्वरूप, हे एक प्रमुख कारण. मल्टिप्लेक्स संस्कृतीच्या आगमनासोबतच एकूणच सिनेसृष्टीनं एक वेगळं वळण घेतलं. सिनेमाचं कार्पोरेटायझेशन झाल्यामुळं चांगला, धवल पैसा या धंद्यात गुंतवला जाण्याची शक्यता वाढली. त्याच वेळी आपल्या देशात आर्थिक उदारीकरणाची फळं अर्थव्यवस्थेला लगडली होती आणि या काळातच लहानाची मोठी झालेली गॅझेटप्रेमी पिढी सिनेमाच्या व्यवसायात आपली कला सादर करण्यास उत्सुक होऊ लागली होती. दुसरीकडं याच काळात एके काळी पुस्तकं म्हटल्यावर जीव ओवाळून टाकणारी पिढी हळूहळू लयाला चालली होती. मनोरंजनाची अनेक साधनं हाती आल्यानं जग मुठीत आलं; पण अक्षरांची मैत्री तुटली. पुस्तकं कोपऱ्यात पडली. पुस्तकांची दुकानंही उदासवाणी झाली. पण काळाचं चक्र फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येतं म्हणतात, तसं झालं. मराठी सिनेमाचंही असंच झालं. एके काळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा सिनेमा मधल्या काळात अगदीच गाळात रुतला होता. ही इंडस्ट्री बंद पडतेय की काय, अशी साधार भीती सर्व संबंधितांना वाटू लागली होती. पण एकविसाव्या शतकानं मराठी सिनेमात खरोखर नवा श्वास फुंकला. वेगवेगळे प्रयोग होऊ लागले. यातूनच मग साहित्यकृतींवर आधारित सिनेमे येऊ लागले. जब्बार पटेलांनी सिंहासन केल्यानंतर अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन्ही कादंबऱ्यांना; तसंच उंबरठा सिनेमा आल्यानंतर तो ज्या शांता निसळांच्या बेघर कादंबरीवर आधारित होता, तिला वाचकांची मागणी चांगलीच वाढली, असं सांगतात. अलीकडं सुजय डहाकेनं मिलिंद बोकिलांची शाळा पडद्यावर आणली होती. मुळात ही कादंबरी अतिशय लोकप्रिय होतीच आणि सुजयच्या सिनेमापूर्वी त्यावर एक मराठी नाटक व एक हिंदी सिनेमा अशा दोन कलाकृती येऊन गेल्या होत्या. तरीही या सिनेमानंतर पुन्हा शाळाची मागणी वाढलीच. त्यापूर्वी आनंद यादवांच्या नटरंग या कादंबरीवर आधारित रवी जाधवचा नटरंग आला आणि गाजला.  
 अतुल कुलकर्णीची अनोखी अदाकारी हे त्या सिनेमाचं वैशिष्ट्य. मूळ कादंबरी वाचणारे त्या कादंबरीपेक्षा सिनेमाला जास्त गुण देतात. आता असं का होतं? याचं एक कारण असं दिसतं, की साहित्यकृती वाचताना प्रेक्षकांना येणाऱ्या अनुभूतीपेक्षा निराळीच, पण आवडणारी अनुभूती सिनेमाची कलाकृती देऊन जाते. हे मुद्दाम केलं जातं किंवा जात नाही. पण ते होऊन जातं, एवढं खरं. मुंबई दिनांक आणि सिंहासन ही दोन पुस्तकं एकत्र करून जब्बार यांनी सिंहासन ही एकच कलाकृती पडद्यावर साकारली होती. तसंच उदाहरण आहे 'जोगवा'चं.  
राजन गवस यांच्या भंडारभोग आणि चौंडक या दोन कादंबऱ्यांवरून, तसंच चारुता सागर यांच्या दर्शन या कथेवरून संजय कृष्णाजी पाटील यांनी जोगवाची पटकथा लिहिली. यल्लम्मादेवीला सोडलेल्या जोगत्यांची ही कथा पडद्यावर अधिक प्रभावी होऊन आली आणि तो सिनेमा गाजला. उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे या नायक-नायिकेच्या जोडीचा दमदार अभिनय (उपेंद्रच्या जोगत्याला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!) याला कारणीभूत होता; तसंच (दिवंगत) राजीव पाटील या मराठीनं गमावलेल्या उमद्या दिग्दर्शकाची नजर आणि बंदिस्त पटकथेलाही त्याचं श्रेय निश्चितच जातं. राजन गवस किंवा चारुता सागर यांचं लिखाण कमी दर्जाचं होतं किंवा त्यांनी मांडलेली वेदना कमअस्सल होती का? मुळीच नाही. किंबहुना ती वाचून, आतून हलून जाणारे संजय कृष्णाजी किंवा राजीव यांना त्यावर सिनेमा करावासा वाटणं हेच त्या कलाकृतींचं निखालस यश आहे. मात्र, सिनेमा आला नसता, तर त्या कादंबऱ्या किती लोकांपर्यंत पोचल्या असत्या, हा वास्तववादी प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही. थोडक्यात, दोन्ही माध्यमांनी एकमेकांना पूरक भूमिका बजावली, तर दोघेही एकमेकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतील, हे निश्चित! ‘जोगवा’चे पटकथाकार संजय कृष्णाजी पाटील यांच्या मते, कादंबरीप्रमाणेच सिनेमा या माध्यमाला स्वतःची एक आंतरिक लय असते. ती बिघडू न देणे माध्यमांतर करताना महत्त्वाचे असते. एका कादंबरीतील नायक, दुसऱ्या कादंबरीतील नायिका आणि तिसऱ्या कथेतील जोगत्यांचा मेळा यांचा एकत्रित मेळ घालून त्यांनी ‘जोगवा’ची पटकथा लिहिली. शिवाय मूळ कादंबऱ्यांचा शेवट दुःखी होता, तो त्यांनी बदलून सुखान्त केला. माध्यमाच्या गरजेनुसार, पात्रंही कमी-जास्त करावी लागतात. ‘पांगिरा’ या विश्वास पाटील यांच्या गाजलेल्या कादंबरीवर याच नावाचा सिनेमा राजीव पाटील आणि संजय कृष्णाजी पाटील यांनी केला होता. त्या वेळीही त्यांना मूळ कादंबरीत शेकड्यानं असलेली पात्रांची संख्या ३६ वर आणावी लागली होती. कादंबरीची बलस्थानं आणि सिनेमा माध्यमाची बलस्थानं या दोन्हीचा विचार करूनच हे माध्यमांतर व्हायला हवं, असं त्यांचं आग्रही मत आहे. ते अगदी योग्यच आहे. आपल्याकडं अनेक चांगल्या कादंबऱ्या उपलब्ध आहेत. त्यांचं माध्यमांतर करताना संबंधित कलाकारांना साहित्याचीही चांगली जाण हवी, ही अपेक्षा गैर म्हणता येणार नाही.
यापूर्वीही अनेक दर्जाहीन मराठी सिनेमांचं परीक्षण करताना मी हा मुद्दा कित्येक वेळा मांडला होता, की आपल्याकडं एवढं चांगलं साहित्य उपलब्ध आहे, तर तुम्ही त्यावर का सिनेमे करीत नाही? सुदैवानं त्यानंतर काही वर्षांत आता चित्र बदलताना दिसतंय. पुस्तकांचा वाचक वेगळा आणि सिनेमाचा प्रेक्षक वेगळा. पण सिनेमा पाहून त्या प्रेक्षकाला संबंधित पुस्तक वाचावंसं वाटत असेल, तर त्याहून अधिक चांगलं काही असू शकत नाही. असा हा नवा वाचक पुस्तकविश्वाशी जोडला जाणं ही या प्रक्रियेतील सगळ्यांत चांगली गोष्ट आहे, यात शंकाच नाही.
तिसरं ताजं उदाहरण आहे ते दुनियादारीचं. सुहास शिरवळकरांची ही लोकप्रिय कादंबरी. तिच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. पण गेल्या वर्षी आलेल्या संजय जाधवच्या दुनियादारी सिनेमानंतर पुन्हा एकदा या कादंबरीला तुफान मागणी आली होती. तरुणाईच्या अंतरंगात शिरून त्यांच्या व्यथा-वेदना समजून घेण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न हा सुशिंच्या या कादंबरीचा आत्मा आहे. या तरुणांचं बाह्यरंग चटपटीत, आकर्षक, मोहमयी वाटत असेलही; पण प्रत्येकाच्या अंतरंगात कुठे तरी वेदनेची खोल कळ दडी मारून बसली आहे. एकान्तात विचार करताना ती उफाळून येते. कादंबरी हा कलाकृतीचा प्रकारही वैयक्तिकरीत्या आस्वादण्याचा असल्यामुळं कादंबरीतील पात्र आणि तिचा वाचक यांना हा अनुभव एकाच वेळी, एकात्म पद्धतीनं घेता येणं हे लिखित माध्यमाचं अत्यंत खास असं वैशिष्ट्य म्हणता येईल. याउलट सिनेमा हा सार्वत्रिक, जाहीर अनुभवण्याचा कलाप्रकार आहे. अगदी एकान्तात जरी सिनेमा बघितला, तरी तो समूहाला डोळ्यांसमोर ठेवूनच निर्माण केलेला असल्यानं, वैयक्तिकरीत्या पात्रांशी एकात्म पावण्याचा तितका तीव्रतम अनुभव तो देऊ शकत नाही. सुशिंच्या कादंबरीत श्रेयस हा नायक आहे आणि त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका विलक्षण दुःखद गोष्टीची पार्श्वभूमी संपूर्ण कथानकाला व्यापून उरते. शिवाय श्रेयससोबतच दिग्या, सुरेखा, शिरीन, मिनू मकवाना यांच्याही वैयक्तिक सुख-दुःखाचा व्यापक पट लेखकानं विणला आहे. पुस्तकात एम. के. या पात्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिनेमात हे सर्व जाणवत नाही. सिनेमात श्रेयसला मारलं आहे; जे मूळ कादंबरीत नाही. दिग्या हे पात्र सिनेमात खूपच मोठं झालं आहे. शिवाय साईनाथलाही कादंबरीत एका मर्यादेपलीकडं महत्त्व नाही. तेच सिनेमात तो फारच प्रभावशाली, किंबहुना मुख्य खलनायक झाला आहे. उलट एम. कें.चा प्रभाव घटला आहे. नायकाच्या वैयक्तिक दुःखाची किनार अगदीच पातळ झाली आहे. सिनेमा करताना बदल करावे लागतात, यात वादच नाही. मात्र, मूळ आशय किंवा त्या आशयाचं सांगणं आहे ते बदलता कामा नये. दुनियादारी सिनेमा पाहताना हा आत्माच कुठं तरी हरवल्यासारखा वाटतो. त्याचं बाह्य चकचकीत रूप कादंबरी न वाचलेल्यांना जास्त आकर्षित करून गेलं, असं दिसतं.  शिवाय दुनियादारीच्या यशानंतर लोकप्रिय मराठी सिनेमा तयार करण्याचा एक घातक ट्रेंड हल्ली रूढ होऊ पाहतो आहे. त्यात माध्यमांतर वगैरे तर सोडाच; पण सिनेमाला मुळात एक चांगली गोष्ट हवी, या मूळ तत्त्वालाच राख फासण्यात येणार, असं दिसतंय. असो. पण तो एक वेगळा विषय आहे. तूर्त चांगलं वाचणारे मराठी कलाकार मराठी सिनेमातून गोष्ट हद्दपार होऊ देणार नाहीत, या विश्वासावर आपण राहायचं.
एक मात्र नक्की. सर्व प्रकारच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणं, त्या कलाकृतीच्या आस्वादातून माध्यमांतराच्या शक्यता शोधणं आणि माध्यमांतरातून त्या कलाकृतीच्या जाणिवेपासून नेणिवेपर्यंतचा प्रवास घडणं ही सगळी समाजाच्या उन्नत अभिरुचीची लक्षणं आहेत. प्रत्येक कलाकृती प्रत्येक व्यक्तीशी स्वतंत्रपणे बोलत असते. या संवादवहनातून कलाकृतीच्या अर्थाच्या अब्जावधी शक्यता निर्माण होत असतात. हे अर्थ उलगडणं आणि एकमेकांना समजावून सांगणं ही किती सुंदर प्रक्रिया आहे...! ताकातून सहज नवनीत निघावं, तसंच हे! आपल्या जगण्यात हे मंथन अविरत घडत राहो.
---
(पूर्वप्रसिद्धी - मेहता ग्रंथजगत, दिवाळी अंक २०१४)
---

No comments:

Post a Comment