20 Dec 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - पीके

राइट नंबर...
----------------
 राजकुमार हिरानी आणि आमिर खान या दिग्दर्शक-अभिनेता जोडगोळीचा, ‘थ्री इडियट्स’ या सुपरडुपर हिट सिनेमानंतरचा पुढचा सिनेमा म्हणून ‘पीके’विषयी कमालीची उत्सुकता होती. या उत्सुकतेला न्याय देणारा आणि या जोडीकडून असलेल्या प्रचंड अपेक्षांना जागणारा हा सिनेमा आहे, हे सर्वप्रथम सांगायला हवं. त्याचबरोबर याच जोडीच्या आधीच्या स्वतंत्र सिनेमांएवढा किंवा अगदी हिरानींच्या मुन्नाभाईच्या सिक्वलएवढा हा सिनेमा ग्रेट नाही, हेही सांगायला हवं. अर्थात कुठलीही तुलना न करता स्वतंत्रपणे विचार केल्यास ‘पीके’ तरीही डिस्टिंग्शन मिळवतोच. याचं कारण राजकुमार हिरानी-अभिजात जोशी या लेखकद्वयाची विषयावर असलेली पकड, प्रसन्न हाताळणीची त्यांची क्षमता आणि आमिरसारखा भूमिकेला शंभर टक्के न्याय देण्यासाठी सदैव झटणारा अभिनेता... या ‘त्रिगुणी’च्या मदतीने ‘पीके’ आपल्याला निराश करत नाही. किंबहुना धर्मासारख्या आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असलेल्या जिव्हाळ्याच्या, श्रद्धेच्या विषयावर एक नवी दृष्टी (‘इनसाइट’) देतो. या सिनेमात मांडले गेलेले विचार नवे आहेत किंवा अगदी फार क्रांतिकारी आहेत असं नाही; पण ते सांगताना सिनेमाच्या माध्यमाच्या सर्व बलस्थानांचा अचूक केला गेलेला वापर आणि गोष्टीला असलेलं रंजनमूल्य या कसोट्या हिरानी-अभिजात अन् आमिर हे त्रिकुट यशस्वीपणे पेलतं. त्यामुळंच ‘पीके’चं नाणं चोख वाजतं. सिनेमातल्याच भाषेत सांगायचं, तर हा राँग नंबर न ठरता परफेक्ट, ‘राइट नंबर’ ठरतो!
राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी पहिल्या चित्रपटापासूनच अभ्यासपूर्ण पटकथा लिहिण्यात तरबेज आहेत, हे आपल्याला माहिती आहे. विषयाचा सखोल अभ्यास, गोष्टीचा आरंभ, मध्य व (उत्कंठापूर्ण) शेवट यांचा पक्का हिशेब, सर्वसामान्य प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून केलेली कथावस्तूची मांडणी, विविध प्रदेश-प्रांत यांना आपुलकी वाटेल अशा घटकांची चटकदार फोडणी, गीत-संगीतावर दिलेलं लक्ष आणि कलाकारांकडून खुबीनं काढून घेतलेली आपली पात्रं ही हिरानी-जोशी (व अर्थातच निर्माता विधू विनोद चोप्रा) या मंडळींची खासियत राहिली आहे. आपल्या भूमिकांबाबत भलताच काटेकोर असलेला आमिर त्यांना ‘थ्री इडियट्स’च्या वेळी भेटला आणि त्यांनी इतिहास घडविला. पुढचं पाऊल टाकताना या तिघांनीही ‘धर्म’ हा भलताच संवेदनशील विषय निवडला आहे. धर्मविषयक जाणिवा आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धा यात कालानुरूप होत गेलेले बदल आणि धर्माच्या नावाखाली राजरोस सुरू असलेली दुकानदारी आपण सर्वच जण रोज पाहत आहोत. धर्माला असलेलं परमपवित्र स्थान आणि त्याच वेळी गरजू लोकांची पिळवणूक करण्यासाठी या श्रद्धेचा होत असलेला गैरवापर आपल्या सभोवती रोज दिसतो आहे. यावर प्रच्छन्न टीका करण्यासाठी हिरानी-जोशी द्वयीनं मार्ग अवलंबिला आहे फँटसीचा. (‘ओह माय गॉड’सारख्या सिनेमांतून हा विषय पूर्वी यशस्वीपणे हाताळला गेला आहे, त्यामुळे हिरानींना पहिलेपणाचा मान नाही...) एका अर्थानं इथं फँटसी आवश्यकच होती, कारण या पृथ्वीतलावरच्या कुठल्याही माणसाला जात व धर्म चिकटलेली आहेच. त्यामुळं या सर्व बाबींवर तटस्थपणे टिप्पणी करायला दिग्दर्शकाला परग्रहावरूनच माणूस (किंवा जो कोणी प्राणी म्हणाल तो) आणावा लागणार, हे उघड होतं. तसा तो त्यांनी इथं आणलाच आहे. त्यामुळं हे ‘एलियन’ प्रकरण या सिनेमाचं मुख्य रहस्य नाहीच. ते सिनेमाच्या सुरुवातीलाच स्पष्ट होतं. मात्र, नंतरच्या मांडणीत आणि प्रसंगांच्या साखळीच्या गुंफणीत सिनेमाचं सगळं यश आहे... आणि अर्थात ‘पीके’ची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या अदाकारीतही!
एकदा ही सूत्रधाराची भूमिका आणि त्याची ओळख प्रस्थापित झाली, की पुढचा खेळ रचणं तसं हिरानी-जोशींना सोपं असतं. इथं त्यांनी या ‘पीके’ (आमिर) नामक सूत्रधाराचं अस्तित्व आपल्या नायिकेच्या - जगज्जननी उर्फ जग्गूच्या (अनुष्का शर्मा) - आयुष्याशी जोडलं आहे. बेल्जियममध्ये प्रेमभंग झालेली आपली नायिका आता दिल्लीत परतली आहे. गोष्ट अशी खुबीनं रचली आहे, की जग्गू आणि पीके यांची सातत्यानं भेट होत राहते. तिला ‘पीके’चं वेगळेपण त्वरित जाणवतं. तिच्या पेशामुळं त्याच्यात असलेली ‘स्टोरी’ही दिसते. त्यातून ‘पीके’च्या आत्तापर्यंतच्या अवताराची कथाही फ्लॅशबॅकसारखी उलगडत जाते आणि त्याच वेळी वर्तमानातली त्याची आणि तिची श्रद्धा व धर्माविषयीची अखंड शोधयात्राही सुरू राहते. हे सगळं करताना राजू हिरानी या सगळ्याला सटायरची आणि उपहासगर्भ विनोदाची फोडणी देत राहतात. त्यामुळं सिनेमा पूर्वार्धापर्यंत चांगलाच वेगवान होतो आणि पुढं काय होणार, याची उत्सुकता मनात निर्माण करतो. उत्तरार्धात दिग्दर्शक धर्माविषयीच्या तात्त्विक चर्चेला सुरुवात करण्यासाठी राँग नंबर आणि राइट नंबरची संकल्पना आणतो. (म्हणजे आपल्याला तयार करणारा भगवान हा खरा राइट नंबर आणि त्याच्या नावाखाली दुकानदारी करणारे देवाचे मॅनेजर म्हणजे राँग नंबर...) ही तशी बाळबोध कल्पना आहे आणि तिचं सिनेमात अतिसुलभीकरण केल्यानं सिनेमाचा एकूणच परिणाम उणावण्यात त्याची परिणती होते. सिनेमाच्या शेवटी एक लहानसा ट्विस्ट आणण्याची ट्रिक दिग्दर्शकानं याही ठिकाणी वापरली आहे. मात्र, तीही फार परिणामकारक नाही. असो. 
 आमिरचा अभिनय ही या सिनेमाची अर्थातच फारच जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या त्या प्रसिद्ध पोस्टरवरील दृश्यापासून ते शेवटच्या त्या सरप्राइज पॅकेज असलेल्या पाहुण्याबरोबर पुन्हा पृथ्वीतलावर येण्यापर्यंत आमिर प्रत्येक दृश्यात भाव खाऊन जातो. हा अभिनेता सदैव काही तरी नवं करण्याच्या शोधात असतो. एलियन म्हणून त्यानं सदैव चेहऱ्यावर दाखवलेला आश्चर्यमुग्ध भाव आणि नंतर भोजपुरी संवादाचा जपलेला अफलातून लहेजा यामुळं आमिर टाळ्या मिळवतोच. पण आता अशा शारीरिक लकबींतून वैविध्य दाखवणाऱ्या भूमिका हे त्याच्यासाठी कितपत आव्हान असेल, याची शंका आहे. त्याच्या आहे त्याच रूपात, पण व्यक्तिरेखेच्या खोल तळाशी बुडी मारून शोधलेलं भावदर्शन दाखवणारी भूमिका त्यानं आता करावी. अनुष्का शर्मा अप्रतिम. तिनं यात उभी केलेली ‘जग्गू’ म्हणजे सहजसुंदर अभिनयाचा एक उत्कृष्ट नमुनाच. बाकी हिरानींच्या टीममधील संजय दत्त, बमन इराणी, सौरभ शुक्ला या मंडळींची इथंही हजेरी आहे आणि त्यांनी आपापल्या भूमिका चांगल्याच केल्या आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या वाट्याला पाहुण्या कलाकाराचा रोल आहे आणि तो त्यानं व्यवस्थित केला आहे. (त्याला त्याचं बक्षीसही ‘ऑनस्क्रीन’ मिळालं आहे.)
हिरानींच्या या चित्रपटात त्रुटी अर्थातच आहेत. एक तर या सिनेमात अनावश्यक गाणी घुसवली आहेत. ‘भगवान है कहाँ रे तू...’ हे सोनू निगमनं गायलेलं ‘थीम साँग’सदृश गाणं वगळलं तर अन्य गाणी ही केवळ टाकायची म्हणून टाकली आहेत. शिवाय या सिनेमाची लांबीही त्यामुळं अनावश्यकपणे वाढली आहे. दुसरं म्हणजे या सिनेमावर हिंदू धर्मातील गैरप्रकारांवरच अधिक फोकस केल्याचा आरोप येण्याची दाट शक्यता आहे. त्यात या सिनेमात नायिकेवर प्रेम करणारा नायक पाकिस्तानी दाखवला आहे. हे करताना निर्मात्यांच्या डोळ्यांसमोर पाकिस्तानी मार्केट नसेल, असं मानणं म्हणजे फारच बाळबोध होईल. याशिवाय आमिरला भोजपुरी भाषाच बोलायला लावणं किंवा राजस्थान, दिल्लीचा बॅकड्रॉप वापरणं ही प्रत्येक गोष्ट तेथील प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून केल्यासारखी झाली आहे.
अर्थात असं असलं, तरी सिनेमा एकूण करमणूक करणारा झाला आहे, हे निश्चित. हिरानी आणि आमिर या मंडळींनी स्वतःचा ‘बार’ उंचावला आहे, ही गोष्ट मुळातच त्यांचं मोठेपण मान्य करणारी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अपेक्षाही अधिकच्या असतात. सचिन तेंडुलकरचं उदाहरण याबाबत चपखल ठरेल. त्यामुळं जे काही अपेक्षाभंगासारखं वाटतं आहे, तेही मुळात हा सिनेमा या दोघांचा असल्यामुळं वाटतं आहे, ही गोष्ट मान्य करायला हवी. 
 थोडक्यात, धर्मविषयक आपली संवेदनशील मतं जरा बाजूला ठेवून, जरा तटस्थपणे ही करमणूक अनुभवली, तर अधिकचं काही तरी पदरी पडेल. अन्यथा बाकी मसाला सिनेमे आहेतच...
---
निर्माते : विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी, सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शक : राजकुमार हिरानी
पटकथा-संवाद : राजकुमा हिरानी, अभिजात जोशी
सिनेमॅटोग्राफी : सी. के. मुरलीधरन
संगीत : शंतनू मोईत्रा, अजय-अतुल, अंकित तिवारी
गीते : स्वानंद किरकिरे, अमिताभ वर्मा, मनोज मुंतशिर
प्रमुख भूमिका : आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांतसिंह राजपूत, बमन इराणी, संजय दत्त, सौरभ शुक्ला, परीक्षित साहनी इ.
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, २० डिसेंबर २०१४)
----

No comments:

Post a Comment