4 Jan 2015

लोकमान्य - एक युगपुरुष



टिळकपर्वाचा मर्मभेदी वेध
------------------------------



लोकमान्य - एक युगपुरुषहा ओम राऊत दिग्दर्शित नवा मराठी सिनेमा पाहताना अंगात एक वेगळंच स्फुरण चढतं. देशप्रेमाची प्रखर भावना मनात प्रज्वलित होते आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचं आपल्याला दिवसेंदिवस होत असलेलं विस्मरण पाहून मन खिन्नही होतं. लोकमान्य टिळक या नावाची जादू त्यांच्या मृत्यूनंतर शंभर वर्षांनंतरही कायम आहे, हे पाहून कुठं तरी बरंही वाटतं. त्याच वेळी सिनेमा पाहून जर एवढी चेतना येते, तर प्रत्यक्ष टिळकांना पाहून-ऐकून काय झालं असतं, असं वाटून जातं. एवढे लोक त्यांच्या मागं का गेले असावेत, याचंही उत्तर चटकन मिळून जातं.
लोकमान्यांवर २०१५ मध्ये सिनेमा तयार करताना ओम राऊतच्या मनात काय उद्देश असावा, हे सुरुवातीच्या नाना पाटेकरांच्या निवेदनातच स्पष्ट होतं. टिळक दिवसेंदिवस संदर्भहीन होत चालले आहेत की काय, असा प्रश्न दिग्दर्शकाला पडला असावा. त्यात काही तथ्य नाही, असंही नाही. मात्र, तुलनेनं अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या अशा लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वावर सिनेमा काढणं ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. टिळकांच्या आवाजाचं रेकॉर्डिंग सापडलं, या अगदी अलीकडच्या घटनेचा संदर्भ घेऊन ओमनं लोकमान्यांची ही कथा पुन्हा अगदी भक्तिभावानं पडद्यावर आणली आहे. अर्थात असं करताना त्यानं एक फार चांगली गोष्ट केली आहे. त्यानं केवळ टिळकांची गाथा मांडलेली नाही, तर आजच्या काळातील एक व्यक्तिरेखेची मांडणी करून दोन्ही काळांचा संदर्भ जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आजच्या मराठी सिनेमाचा प्रेक्षक लक्षात घेऊन केलेली ही मांडणी हुकमी तर आहेच, पण ती लोकमान्यांची गाथा अधिक प्रभावीपणे ठसविण्यात मदत करते.
लोकमान्य टिळकांची प्रखर राष्ट्रभक्ती, स्वराज्यप्राप्तीसाठी त्यांनी स्वीकारलेला जहाल मार्ग, सामाजिक सुधारणेच्या आधी स्वातंत्र्य मिळविण्याचा त्यांचा दुर्दम्य आग्रह, इतरांवर प्रभाव टाकणारं अत्यंत ओजस्वी व्यक्तिमत्त्व, समाजातील सर्व थरांतील लोकांना बरोबर घेऊन जाण्याची अंगभूत वृत्ती, देशभरातील स्वातंत्र्यलढ्याचं त्यांच्याकडं चालत आलेलं नेतृत्व या सगळ्या गुणांचं दर्शन सव्वादोन-अडीच तासांच्या सिनेमात तेवढ्याच ताकदीनं घडवणं हे सोपं आव्हान नव्हतं. पण ओम राऊतनं प्रथम पदार्पणाचा सिनेमा असूनही ते आव्हान यशस्वीपणे पेललं आहे, हे सांगावंसं वाटतं.
लोकमान्य टिळकांच्या कर्तृत्वाचा काळ आता शंभरहून अधिक वर्षं जुना. नाही म्हटलं तरी आत्ताच्या पिढीला तो फारसा ज्ञात नाही. शाळेत किंवा कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या धड्यांतूनच थोडे फार टिळक माहिती. त्यातल्या त्यात ती शेंगांच्या टरफलाची गोष्ट, किंवा कॉलेजमध्ये असताना व्यायामासाठी त्यांनी दिलेलं एक पूर्ण वर्ष, केसरीतील त्यांचे गाजलेले अग्रलेख, पुण्यातील प्लेगची साथ, रँडच्या हत्येचं प्रकरण, मंडालेतील तुरुंगवास आणि तिथं त्यांनी लिहिलेलं गीतारहस्य एवढ्या मोजक्याच गोष्टी सर्वांना माहिती. अशा स्थितीत टिळकांचं संपूर्ण जीवन केवळ एक बायोएपिक म्हणून मांडणं कदाचित आत्ताच्या प्रेक्षकांसाठी कंटाळवाणं झालं असतं. मात्र, दिग्दर्शकाने टिळकांची ही कथा आजच्या काळातील पत्रकार मकरंद याच्या जगण्याशी जोडून काळाचा दुवा बेमालूमपणे सांधला आहे. त्यामुळं सिनेमात एका फ्रेममध्ये शंभर वर्षांपूर्वीचा काळ, तर पुढच्याच फ्रेममध्ये आजच्या काळातील मकरंदचं वृत्तपत्राचं ऑफिस किंवा एखादा मॉल वगैरे असं दृश्य दिसतं. पटकथेची अशी रचना आणि त्यामुळं हवे तेव्हा दोन्ही काळांत भ्रमंती करण्याचं स्वातंत्र्य यात या सिनेमाचं निम्मं यश सामावलेलं आहे. या रचनेमुळं आपण प्रेक्षकही मकरंदच्याच नजरेतून टिळकांकडं पाहू लागतो आणि एका अर्थानं दिग्दर्शकाला ज्या परिघातून किंवा परिप्रेक्ष्यातून टिळक दाखवायचे आहेत, तेवढ्याच मर्यादेत ते आपण पाहत राहतो. यामुळं टिळकांचं नायकत्व, लोकमान्यत्व अधिक ठसण्यात मदत होते. आपण एक फार मोठी व्यक्ती पाहत आहोत, ही धारणा आधीच प्रेक्षकांची तयार झालेली असते. त्यामुळं टिळकांची व्यक्तिरेखा लार्जर दॅन लाइफ होण्यास पोषक वातावरण निर्माण होतं. अशा महान व्यक्तित्वांवरील बायोएपिक दाखवताना त्या मोठ्या माणसांचं माणूस असणंही दाखवावं, असं अपेक्षित असतं. टिळकांच्या गाथेत असे एक-दोन प्रसंग आहेत, मात्र ते संख्येनं फार नाहीत. त्यामुळं त्या बाजूनं विचार करता हे सिनेमाचं थिटेपण वाटतं. याशिवाय टिळकांच्या काळातील अन्य जी महान व्यक्तिमत्त्वं होती, उदा. विवेकानंद किंवा महात्मा गांधी... यांचं या सिनेमातलं दर्शन बेतास बात ठरलं आहे. पण ही काही फार मोठी त्रुटी आहे अशातला भाग नाही. सिनेमा पाहण्याच्या ओघात हे फार जाणवतही नाही. टिळकांचं मोठेपण सदैव ठसत राहतं. टिळक प्रत्यक्षात कसे बोलत होते, हे आपल्याला माहिती नाही. मात्र, सिनेमात दिग्दर्शकानं त्यांना काहीशी वरची पट्टी दिली आहे. टिळक व्यक्ती म्हणून सिंहासारखे होते आणि त्यांचे अग्रलेख सिंहगर्जनेसारखेच असत, याचा अर्थ त्यांनी प्रत्यक्षात बोलतानाही शिरा ताणूनच बोलावं असं काही नाही. पण या सिनेमात थोडं ते तसं झाल्याचं जाणवतं. 

टिळक-आगरकर यांची मैत्री सिनेमाच्या पूर्वार्धात चांगली आलीय. मात्र, मध्येच आगरकरांचा धागा तुटलाय. कधी कधी मकरंद आणि त्याची होणारी पत्नी समीरा यांची गोष्ट काहीशी लांबते. अर्थात हेही प्रसंग फार नाहीत. सिनेमाचा एकूण जो परिणाम आहे, तो पुष्कळ सकारात्मकच आहे.
सुबोध भावेनं ‘बालगंधर्व’नंतर पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका साकारली आहे आणि त्यानं टिळकांच्या या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे, यात शंकाच नाही. देहबोली, नजर, आवाजाचे चढ-उतार यातून त्यानं लोकमान्यांसारखी असाधारण व्यक्तिरेखा ताकदीनं उभी केली आहे. चिन्मय मांडलेकरनंही मकरंदच्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत. लोकमान्यांच्या गाथेला हवा असलेला काँट्रास्ट मकरंदच्या पात्रानं अन् एकूण त्या पर्यावरणानं चांगला उपलब्ध करून दिलाय. प्रिया बापटच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली आहे.
सिनेमाची वेषभूषा आणि कला-दिग्दर्शन अव्वल दर्जाचं. फक्त एक गोष्ट खटकते. टिळकांच्या वाड्याला ‘केसरीवाडा’ असं नाव त्या काळात नव्हतं. तेव्हा तो गायकवाड वाडा म्हणूनच ओळखला जायचा. सिनेमात मात्र वाड्यावर ‘केसरीवाडा’ अशी पाटी दिसते. ही ढोबळ चूक टाळायला हवी होती. असो.
अर्थात, टिळकांवरचा असा भव्य चित्रपट काढण्याचं आव्हान पेलणारे ओम राऊत व निर्मात्या नीना राऊत दोघंही अभिनंदनास पात्र आहेत, यात शंका नाही. हा सिनेमा सर्वांनी एकदा तरी नक्की पाहावाच.
--
दर्जा - साडेतीन
---

2 comments: