30 Jan 2015

बर्डमॅन (A) रिव्ह्यू

असा नट असतो राजा...
---------------------------

कॅमेरासमोर उभं राहण्याची किंवा रंगभूमीवर वावरण्याची नशा फक्त नटमंडळीच जाणू शकतात. ही नशा आयुष्यभर उतरत नाही. ही नशा परकायाप्रवेशाची असते, तशीच ती त्यातून मिळणाऱ्या अफाट प्रसिद्धी अन् पैशाचीही असते. अर्थात कधी तरी या सर्व गोष्टींचा अटळ शेवट असतोच. आता आपण पूर्वीसारखे सुपरहिरो राहिलो नाही, ही भावना पचवणं अनेक नटांना जड जातं. त्यातून मग नशेच्या किंवा अमली पदार्थांच्या किंवा तत्सम कुठल्याही व्यसनाच्या आधीन होऊन त्यांचा करुण अंत होतो. असं असलं, तरी या नटांची कलाकार म्हणून जी एक अंगभूत मस्ती असते, रग असते ती औरच असते. ती काही केल्या मरत नाही. याच वास्तवाचा अद्भुत प्रत्यय देणारा सिनेमा म्हणून अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू या दिग्दर्शकाच्या ‘बर्डमॅन’ या नव्या कलाकृतीकडं पाहावं लागेल. बर्डमॅन अन् रीगन थॉमसनची भूमिका साकारणाऱ्या मायकेल कीटनची जबरदस्त अदाकारी (पडद्यावर अन् प्रत्यक्षातही) ‘असा नट असतो राजा...’ असे कौतुकोद्गार काढायला लावणारी ठरली आहे.


नव्वदच्या दशकात बर्डमॅन या सुपरहिरोची भूमिका करून तीन सुपरहिट सिनेमे देणारा रीगन आजच्या जमान्यात काहीसा आउटडेटेड झाला आहे. पण तो रेमंड कार्व्हरच्या ‘व्हॉट वुई टॉक अबाउट व्हेन वुई टॉक अबाउट लव्ह’ या गाजलेल्या कादंबरीचं नाट्यरूपांतर ब्रॉडवे थिएटरच्या रंगमंचावर आणून कलाजीवनात आणि एकूणच प्रसिद्धीच्या झोतात कमबॅक करण्याच्या विचारात आहे. वैयक्तिक आयुष्यातही गेल्या वीस वर्षांत त्याची कमाई ही गमावण्याकडंच जास्त आहे. पत्नीशी घटस्फोट झाला आहे आणि अमली पदार्थांच्या आहारी केलेली सॅम ही टीनएजर मुलगी त्याला, तो आजच्या काळाशी कसा सुसंगत नाही यावर त्याला खडे बोल सुनावते आहे. अशा स्थितीत या नाटकाच्या रिहर्सल सुरू आहेत. रंगीत तालमीचा प्रयोगही होऊ घातलाय. या नाटकात एक प्रमुख भूमिका करायला मिळावी, म्हणून तो एका नटाच्या डोक्यावर लाइट पडून तो जखमी होईल, अशी व्यवस्था करतो. एवढे होऊनही ती भूमिका त्याला मिळत नाहीच. सध्या रंगभूमीवर चलती असलेल्या माइक या नटाला पाचारण करण्यात येतं. त्याची मैत्रीण लेस्ली हेदेखील प्रथमच ब्रॉडवेवर काम करते आहे आणि तिच्यामुळंच माइक या नाटकात आला आहे. तो आल्यापासून रीगनचा त्याच्याशी खटका उडतो. माइक रीगनला अजिबात आदर देत नाही, उलट मी रंगभूमीचा राजा आहे आणि तू एका सामान्य मसालापटाचा एके काळचा नायक अशी त्याची खिल्ली उडवतो. रीगनची अस्वस्थता आणि नैराश्य वाढत असते. त्यातून त्यानंच एके काळी गाजवलेला बर्डमॅन त्याच्या कानात येऊन त्याला त्याच्या वैभवशाली भूतकाळाची हरघडी आठवण करून देत असतो आणि त्यातून त्याचं नैराश्य आणखी वाढवत असतो. त्यातून त्याची मुलगी आणि माइक जवळ आल्याचं तो पाहतो. माइक आणि लेस्लीसोबत त्याचा एक प्रवेश असतो आणि त्यात शेवटची रीगनचं पात्र स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या करीत असतं. एकूण तीनदा हा प्रवेश होतो. तिन्ही वेळेस प्रचंड गोंधळ होतात. प्रत्येक वेळी हा प्रवेश येण्यापूर्वी रीगनची अस्वस्थता टोकाला जात असते. तिसऱ्या वेळी रीगन खरोखरचं पिस्तूल घेऊन रंगमंचावर अवतरतो. नंतर काय होतं, हे प्रत्यक्ष पडद्यावरच पाहायला हवं.
मेक्सिकन दिग्दर्शक अलेजांद्रोनं अत्यंत कलात्मक रीतीनं हा विषय हाताळला आहे. नट नावाचं रसायन काय असतं, याचा पुरेपूर प्रत्यय त्याची ही कलाकृती आपल्याला देते. अत्यंत मनस्वी, स्वप्रतिमेच्या प्रेमात असलेले, हळवे, तेवढेच संतापी, क्षणात मूड बदलणारे असे कलावंत आपल्याला ठाऊक आहेत. आपले दिवस संपले आहेत, हे वास्तव स्वीकारू न शकणारे अनेक कलाकार आपण पाहतो. कीटननं साकारलेला रीगन अशाच मनोवृत्तीच्या कलाकारांचं प्रतिनिधित्व करतो. मात्र, अखेर त्याला त्याचा प्रेयस अन् श्रेयस कसं गवसतं, याची ही कथा आहे. रीगनच्या वैभवशाली पूर्वायुष्याचं प्रतीक म्हणून इथं बर्डमॅन हा सुपरहिरो योजण्यात दिग्दर्शकाचं कसब दिसतं. हा सुपरहिरो आपल्या नायकाच्या आयुष्यात काय बदल घडवून आणू शकतो, हे शेवटच्या एका दृश्यात रीगन हवेत उडून, टाइम्स स्क्वेअरची चक्कर मारतो त्यात दिग्दर्शकानं फार कल्पकपणे दाखवलं आहे. 

 याच टाइम्स स्क्वेअरमध्ये त्याला काही कारणामुळं अंगात फक्त अंडरवियर असताना धावावं लागतं, हे दृश्यही जमलं आहे. खरं सांगायचं तर या दोन्ही दृश्यांत रीगनची सगळी कहाणी आली आहे. या ब्रॉडवेवरच्या नाटकांचं भवितव्य जिच्या हाती असतं, अशा एका समीक्षिकेशी रीगनची झालेली शाब्दिक चकमक हाही या सिनेमाचा एक उत्कर्षबिंदू म्हणावा लागेल. अनेक दृश्यं स्पेशल इफेक्ट्सनं जोडून दिग्दर्शकानं जणू हा वन शॉट चित्रित केलेला सिनेमा आहे, असा निर्माण केलेला भासही पाहण्यासारखा!

मायकेल कीटननं बर्डमॅनची भूमिका अप्रतिमच केली आहे. करिअर संपलेल्या नटाचे सर्व भोग त्यानं आपल्या देहबोलीतून उभे केले आहेत. त्याला माइकच्या भूमिकेतील एडवर्ड नॉर्टन, सॅमच्या भूमिकेतील एमा स्टोन, लेस्लीच्या भूमिकेतील नाओमी वॅट्स यांनी चोख साथ दिली आहे.
या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारांमध्ये नऊ नामांकनं मिळाली आहेत. ती का, याचं उत्तर बर्डमॅन पाहूनच मिळतं. तेव्हा चुकवू नये असा हा चित्रपट आहे.



---
निर्माते : रिजन्सी एंटरप्रायजेस, वर्ल्डव्ह्यू एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : अलेजांद्रो गोंझालेझ इनारिटू
प्रमुख भूमिका : मायकेल कीटन, एडवर्ड नॉर्टन, एमा स्टोन, आंद्रेया राइसबरो, एमी रायन, झॅक गॅलिफियानाकिस, नाओमी वॅट्स
कालावधी : दोन तास दोन मिनिटे
दर्जा - ****
---

No comments:

Post a Comment