18 Jan 2015

लेखक ‘मरतो’ तेव्हा...‘लेखक पेरुमल मुरुगन मरण पावला आहे. तो काही देव नाही, त्यामुळं पुन्हा अवतार वगैरे घेणार नाही. त्याचा पुनर्जन्मावरही विश्वास नाही. आता यापुढं तो पी. मुरुगन नावाचा सामान्य शिक्षक म्हणून जगेल...’ ही फेसबुक पोस्ट आहे तमिळनाडूतील वादग्रस्त लेखक पेरुमल मुरुगन यांची. गेल्या पंधरवड्यात तमिळनाडूतल्या साहित्य विश्वात खळबळ उडवून देणाऱ्या लहानशा घटनेची परिणती अशा रीतीनं एका लेखकाच्या ‘मृत्यू’त झाली. आजच्या अत्याधुनिक वेगवान संदेशांच्या जमान्यातही ही बातमी देशभर पसरायला आठ-दहा दिवस लागले. पण बातमी समजली अन् कुठं तरी आत तुटल्यासारखं झालं. शेवटी हा ‘माझिया जातीचा’ माणूस होता. लिहिणाऱ्या प्रत्येक माणसानं सूतक धरावं, असं काही तरी घडलं होतं. आपल्या स्वतंत्र देशात अनेक अपमृत्यू रोज घडतच असतात. त्यात या लेखकाची भर. त्याचं एवढं काय जीवाला लावून घ्यायचं? त्यांनी लिहिलेली एक ओळही आपण वाचलेली नाही. पण तरीही पोटात खड्डा पडला, डोळे ओलावले अन् डोकं सुन्न झालं. मुरुगन जात्यात आहेत आणि आपण सुपात, हीच भावना त्यामागं प्रबळपणे होती. उद्यापासून तुम्हाला आमच्या परवानगीशिवाय श्वास घेता येणार नाही, असा फतवाही कुणी काढेल, ही भीती होती. उद्या मला माझ्या मनासारखं लिहिता येईल की नाही, असं या देशात लिहिणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटावं एवढा हा मृत्यू धक्कादायक होता; आहे.

काय कारण होतं मुरुगन यांच्या या अकाली मरणामागं? खरं तर फार वेगळं, अपवादात्मक कारण होतं असं नाही. तुम्ही धर्माचा, आपल्या संस्कृतीचा अपमान केला आहे; आमच्या भावना दुखावल्या आहेत, असं त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं म्हणणं होतं. संत तुकाराम महाराजांपासून ते सलमान रश्दीपर्यंत प्रत्येक कवीच्या, लेखकाच्या प्राक्तनात हे भोग आलेच होते. मुरुगन हेही त्याला अपवाद ठरले नाहीत. तमिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यातील तिरुचेंगोडू या गावचे रहिवासी असलेले मुरुगन पेशानं प्राध्यापक आहेत. चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘मधोरुबागन’ (अर्धनारीश्वर) या नावाची एक कादंबरी लिहिली. तेव्हा तमिळनाडूतील समीक्षकांनी खरं तर या कादंबरीचं चांगलं स्वागत केलं होतं. पण नुकताच या कादंबरीचा ‘वन पार्ट वुमन’ या नावाचा अनुवाद प्रसिद्ध झाला आणि सगळं बिघडलं. तमिळनाडूच्या पश्चिम भागात प्रबळ असलेल्या वेल्लाळ गौंडूर या जातीतील काही जणांनी ही कादंबरी त्या जातीचा आणि एकूण हिंदू धर्माचा अपमान करणारी आहे, असा प्रचार सुरू केला आणि मुरुगन अडचणीत सापडले. मुरुगन यांचा अपराध मोठाच होता. स्त्री-पुरुष संबंधांतील रूढ रीती-रिवाजांना फाटे देणाऱ्या आणि अब्रह्मण्यम या सदरात मोडणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या या कादंबरीत होत्या. मुळात हा अर्धनारीश्वर म्हणजे मुरुगन यांच्याच गावाचा देव. स्वतः मुरुगनही वेल्लाळ गौंडूर याच जातीचे. पण या जातीत काही वर्षांपूर्वी रूढ असलेल्या एका विलक्षण परंपरेचा उल्लेख त्यांनी आपल्या कादंबरीत केला आणि सगळा गोंधळ झाला. ही परंपरा होती काहीशी नियोग विधीची. ज्या जोडप्याला अपत्यप्राप्ती होत नसे, अशी जोडपी अर्धनारीश्वराच्या यात्रेत चालणाऱ्या एका उत्सवात येत. तिथं अशी स्त्री आपल्या आवडीच्या पुरुषासोबत संग करू शके आणि त्यातून ‘देवानं दिलेलं मूल’ जन्माला घालू शकत असे. या रूढीच्या पार्श्वभूमीवर मुरुगन यांनी आपल्या कादंबरीत एका विनापत्य जोडप्याची कहाणी रंगवली. अशा रूढी-परंपरा आपल्याकडं पूर्वीच्या काळी सर्रास प्रचलित होत्या. तेव्हाच्या समाजानं कदाचित नाइलाजानं, कदाचित सोय म्हणून त्या स्वीकारल्या असतील. तेव्हाही हा सर्व प्रकार ‘झाकली मूठ’ या न्यायानंच चालत असणार. अशा पद्धती समाजात रुढ होण्यामागं असलेल्या दाहक वास्तवाचा, स्त्रीविषयीचा भेदभावाचा कानोसा घेण्याची प्रेरणा लेखक म्हणून मुरुगन यांना झाली, यात चूक काहीच नव्हती. चूक एकच होती, की त्यांना स्त्री-पुरुष संबंधांविषयी आपल्या समाजानं वर्षानुवर्षं जोपासलेल्या दांभिकतेचा अंदाज आला नाही. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांविषयी या समाजाचे प्रचलित नीतिनियम आणि बंधनं (आणि ते तोडणाऱ्यांच्या शिक्षा) एवढे स्पष्ट आहेत, की त्याला छेद देणारं कुणी काहीही लिहिलं-बोललं तर ते ब्रह्महत्येचंच पातक मानलं जातं. मुरुगन यांची ही मोठीच चूक झाली. ही कादंबरी लिहून त्यांनी कुठल्या विनापत्य स्त्रीची वेदना मांडली, याला फारशी किंमत नसून, तिनं कुठल्याशा रात्री पतीखेरीजच्या अन्य पुरुषासोबत शय्यासोबत केली यालाच सर्वाधिक महत्त्व आहे, हे त्यांच्या लक्षात कसं आलं नाही? काय वाट्टेल ते झालं, तरी लेखकानं आपल्या गावाचा, आपल्या देवाचा, आपल्या जातीचा आणि आपल्या धर्माचा अपमान करायचा नसतो. (खरं तर धार्मिक संवेदनशील मुद्द्यांची एक यादीच सरकारनं जाहीर करायला हवी. त्यातील वर्ज्य मुद्द्यांवर लिहिणाऱ्यांना मग सार्वजनिक चौकात फटक्यांसारखी शिक्षाही पुनरुज्जीवित करायला हवी.) तमिळनाडूत हेच झालं. आता ई. व्ही. पेरियार रामस्वामींसारख्या मूर्तिभंजक, आधुनिक द्राविडी अस्मितेच्या जनकाच्या भूमीत लेखकाला दिवसाढवळ्या मरण पत्करावं लागतं, याचंही आश्चर्य वाटायला नको खरं तर. आपल्याकडं महाराष्ट्रात पुरोगामित्वाच्या वारशाचा सात-बारा पिढीजात आपल्याच पिताश्रींच्या नावावर आहे, अशा थाटात काही राजकीय पक्ष वावरत असतात. तमिळनाडूत करुणानिधींचा द्रमुक हा असाच एक पुरोगामी पक्ष. तोही या प्रकरणात मूग गिळून गप्प बसला. वास्तविक स्वतः करुणानिधी हे (सिनेमाचे का होईना, पण) मूळ लेखक. पण त्यांनी डोळ्यांवर राजकीय फायद्याचा जाडजूड गॉगल चढविला असल्यानं; आणि तसंही वयाच्या नव्वदीत त्यांना आपण एके काळी लिहीत वगैरे होतो याचं विस्मरण होणं शक्य असल्यानं त्यांच्या पक्षाकडून काही झालं नाही. दुसरीकडं जयललिता यांच्या अण्णा द्रमुकनंही सोयिस्कर मौन बाळगलं आहे. तेव्हा नमक्कल जिल्ह्यातील गौंडूर जातीच्या लोकांना आणि तेथील स्थानिक हिंदू संघटनांना पेरुमल यांच्या विरोधात रान उठवायला मोकळीकच मिळाली. गेल्या २७ डिसेंबर रोजी सुरू झालेलं हे आंदोलन एवढं तीव्र झालं, की १३ जानेवारीला नामक्कल जिल्हा प्रशासनानं एक बैठक बोलावली. तिथं हजर होण्याचं समन्स मिळालेल्या मुरुगनना, या बैठकीत सर्वांची सपशेल लेखी माफी मागावी लागली. या पुस्तकाच्या न खपलेल्या प्रतीही यापुढं विकणार नाही, असं त्यांना कबूल करावं लागलं. शिवाय त्या प्रतींचा खर्च प्रकाशकाला भरून देण्याचंही मान्य करावं लागलं. मुरुगन एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गेल्या १७ वर्षांपासून त्यांची पुस्तकं प्रकाशित करीत असलेल्या सर्व प्रकाशकांना आपली आधीची पुस्तकंही यापुढं विकू नका, असं सांगितलं आहे. त्यांना त्याची भरपाई देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वाचकांनी त्यांच्या घरी असलेल्या आपल्या पुस्तकांच्या प्रती जाळून नष्ट कराव्यात; त्यांनाही आपण भरपाई देऊ, असं आवाहन मुरुगन यांनी केलं आहे. या सर्वच प्रकारामुळं मुरुगन किती अस्वस्थ, किती व्यथित झाले आहेत याची कल्पना येऊ शकेल.

मुरुगन नावाचा लेखक अकाली मेला, याची ही गोष्ट. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्टही आपल्याकडं ‘अटी लागू’ याच नियमाखाली मिळते, हेच अधोरेखित करणारी ही गोष्ट. पुढं काय वाढून ठेवलं आहे, याची सगळ्याच लेखकूंना कडक जाणीव करून देणारी. आपल्याला भयकंपित करणारी! लेखक गेल्याचं दुःख तर आहेच, पण लेखकांचा काळ कसा सोकावला आहे, याची वेदना जास्त आहे. एखाद्या देशात जेव्हा लेखकाला अशी ‘आत्महत्या’ करावीशी वाटते, तेव्हा त्या देशाच्या ललाटी भविष्यात काय लिहिलेलं असतं, हे इथं लिहायला नकोच!
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १८ जानेवारी २०१५)
-----

No comments:

Post a Comment