3 Feb 2015

जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...



वहिदा रेहमान म्हणजे मूर्तिमंत भारतीय सौंदर्य. या वहिदाचं माझ्या आयुष्यातलं आगमन टीव्हीच्या छोट्या पडद्यातूनच झालं. म्हणजे तेव्हा 'चित्रहार' किंवा 'छायागीत'मध्ये 'भँवरा बडा नादान' किंवा 'चौदहवी का चाँद' वगैरे गाणी लागायची, तेव्हाच पाह्यलं असणार. माझं वय १२ असताना आमच्या घरी पहिल्यांदा टीव्ही आला. स्वाभाविकच तेव्हाच्या माझ्या 'फेवरिट लिस्ट'मध्ये वहिदा नव्हती. ती जागा निर्विवादपणे मधुबालानं व्यापली होती. मधुबाला ते माधुरी दीक्षित अशी रेंज मी चार वर्षांतच गाठली. पण वहिदाचं सौंदर्य समजायला चाळिशी यावी लागली. 

वहिदा रेहमान हे गुरुदत्तचं फाइंड. हैदराबादवरून तिला मुंबईला कसं आणलं याची सुरस कथा अबरार अल्वींनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. ती मुळातूनच वाचायला हवी. वहिदाला स्वतःच्या बलस्थानांचं नेमकं भान होतं. ती एक उत्तम अभिनेत्री आणि नर्तिका होतीच (म्हणजे आहे);  पण त्याच जोडीला अत्यंत चोखंदळ भूमिका करून तिनं भारतीय पडद्यावर आपलं जे वेगळेपण निर्माण केलं ते तिच्या बुद्धिमत्तेची झलक दाखवणारं आहे. 'प्यासा'मधील गुलाबो असो, 'रेश्मा और शेरा'मधली रेश्मा असो, 'खामोशी'मधली राधा असो किंवा अर्थातच 'गाइड'मधली तिची अजरामर रोझी असो... आपल्या मूर्तिमंत भारतीय सौंदर्यानं तिनं सर्वत्र आपली छाप उमटवली. अत्यंत बोलके व पाणीदार डोळे आणि तेवढाच सर्व भाव व्यक्त करणारा चेहरा हे वहिदाचं वैशिष्ट्य. नृत्यनिपुण तर ती होतीच. म्हणूनच तर अगदी अलीकडं आलेल्या 'दिल्ली- 6'मध्ये 'ससुराल गेंदा फूल' या गाण्यावर तिला नव्या अभिनेत्रींसोबत थिरकावंसं वाटलं.
'भंवरा बडा नादान है' या गाण्यातली चंचलता, 'चौदहवी का चांद'मधली अप्रतिम निरागसता, 'उपरवाला जान कर अंजान है' या गाण्यातले तिचे ते 'आपण नाही बाबा, हा वरच्या देवाला गाणं म्हणतोय' असं सांगणारे खट्याळ भाव, 'ये श्याम कुछ अजीब है' या गाण्यात, नदीतलं पाणी चेहऱ्यावर आल्याक्षणी झर्रकन बदलणारा चेहरा आणि जुन्या आठवणींनी दाटून येणारा 'दर्द' निमिषार्धात चेहऱ्यावर दाखवणारे तिचे ते डोळे, 'पान खाए सैंया हमारो...' म्हणतानाची तिची चुलबुली अदा, देवसोबत 'आज फिर जीने की तमन्ना है' म्हणताना बिनधास्त रस्त्यावर फेकून दिलेला तो मटका... विश्वजितसारख्या 'अभिनेत्या'सोबत 'ये नयन डरे डरे...' गाण्यात दाखवलेलं परिणितेचं साक्षात रूप... वहिदाच्या एकेका विभ्रमावर जीव ओवाळून टाकावासा वाटतो.
'पिया तोसे नैना लागे' गाण्यात नाकापेक्षा किंचित जडच अशी ती मोठ्ठी नथ आणि लालभडक साडी नेसून तिनं उभी केलेली मराठी स्त्री अजूनही नजरेसमोरून हटत नाही. अंगप्रदर्शन तर सोडाच, पण कधी उघडा दंडही न दाखवणाऱ्या या अभिनेत्रीनं साठ अन् सत्तरच्या दशकात तमाम भारतीय पुरुषांच्या मनात अढळ स्थान का मिळवलं होतं, ते तिचे तेव्हाचे सिनेमे पाहिलं तरच थोडंफार कळू शकेल. मध्यमवर्गीय पुरुषांच्या फाटक्या बनियनसारख्या आयुष्यात सिनेमा नट्यांच्या रूपानं असंख्य झुळुका येत असतात. पण वहिदासारखी 'वाइफ मटेरियल' एखादीच. त्यामुळंच वपुंना 'मीच तुमची वहिदा'सारखी (नावाबाबत चु. भू. दे. घे.) कथा लिहावीशी वाटते. पुलंच्या पाळीव प्राणीमध्येसुद्धा फोटो दाखवणाऱ्यांच्या कथेत 'इश्श...! वहिदा रेहमान' येते. 
गुरुदत्तसारख्या द्रष्ट्या दिग्दर्शकानं तिला सर्वप्रथम अखिल भारतीय स्तरावर पेश केल्यानं असेल, व्ही. के. मूर्तींसारख्या अभिजात सिनेमॅटोग्राफरच्या नजरेचा लाभ झाल्यानं असेल, पण वहिदा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फारच वेगळी ठसत होती. (अशीच दुसरी अभिनेत्री होती नूतन.) वहिदाच्या सौंदर्यात, हिंदीतला शब्द वापरायचा तर, एक 'सादगी' होती. 'गर्ल नेक्स्ट डोअर' अशी तिची प्रतिमा सहज तयार होऊ शकत होती. सावळेपणातलं तिचं अद्भुत सौंदर्य ब्लॅक अँड व्हाइट पडद्यावर आणखीनच खुलून दिसलं. तेव्हाच्या प्रेक्षकांसाठी वहिदा नक्की कोण होती अन् काय होती? साठच्या दशकात भारतात सर्वच क्षेत्रांत एक स्वप्नाळूपण होतं. नेहरूंचा करिष्मा अजून टिकून होता, राज कपूर आणि बी. आर. चोप्रांसारखे दिग्दर्शक त्यांच्या प्रभावाखाली डावीकडं झुकलेल्या समाजवादी विचारसरणीचा प्रसार करणारे सिनेमे बनवत होते, भाक्रा-नानगलसारखी धरणं बांधली जात होती आणि सिनेमात सत्यजित रेंपासून गुरुदत्तपर्यंत अनेक जण आगळेवेगळे प्रयोग करीत होते. कोलकाता, मुंबईसारखी शहरं आपला आब व रुबाब टिकवून होती. त्यांचं बकाल महानगरांत रूपांतर झालं नव्हतं. किंबहुना देशाची एकमेव स्वप्ननगरी, मायानगरी मुंबापुरीच होती. संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अजून धगधगायचं होतं. या काळात म्हणजे १९५४ मध्ये वहिदा मुंबईत आली. या स्वप्नाळू दशकाचा चेहरा म्हणून अनेक पुरुषांचं नाव घेता येईल. किंबहुना नेहरूंपासून राज कपूरपर्यंत अनेकांचं घेतलंही जातं. मात्र, या नवभारताचा तरुण, सोज्वळ आणि सात्त्विक सौंदर्य ल्यायलेला स्त्री-चेहरा कुणाचा असेल तर तो वहिदाचाच होता. (अर्थात इथंही तिच्या जोडीला नूतनचं नाव घ्यावंच लागेल.) तमाम भारतीय पुरुषांना आकर्षित करून घेणाऱ्या या सौंदर्याचं विश्लेषण आत्तापर्यंत अनेक जणांनी केलंय. पण मला वाटतं, तिच्यात जे अंगभूत सौंदर्य होतं, त्याचा उल्लेख फार कमी जणांनी केला आहे. वहिदा अत्यंत आत्मविश्वासू आणि आत्मभान असलेली अभिनेत्री होती. एक स्त्री म्हणून तिला आपल्या ताकदीचं योग्य ते भान होतं. तिचा आत्मसन्मान तिनं कायम जपला. म्हणूनच तर तिला सिनेमा क्षेत्रात नट्यांना कराव्या लागणाऱ्या तडजोडी कधी कराव्या लागल्या नाहीत. अंगप्रदर्शन न करताही मादक दिसता येतं, हे तिनं केवळ बोलक्या डोळ्यांनी करून दाखवलं. वहिदाचं चित्रपटसृष्टीला काही योगदान असेल तर ते हे आहे. तिच्यामुळं काही भारतीय पुरुष तरी तेव्हा कदाचित स्त्रीचा सन्मान करायला शिकले असतील. मूर्तिमंत भारतीय स्त्रीचं प्रतीक असलेल्या या महान अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म १९३८ चा. त्यामुळं ती आता ७७ वर्षांची झाली. पण वयाचे हिशेब वहिदासारख्या अजरामर सौंदर्याला लागू होत नाहीत. त्यामुळंच ती या वयातही आपली 'ग्रेस' राखून आहे. अर्थात तिला शुभेच्छा देताना आजही डोळ्यांसमोर तरळतोय तो 'चौदहवी का चाँद'मधला तिचा अप्रतिम निरागस गोड चेहरा... त्याला पाहून शायर उगाच नाही म्हणत - चौदहवी का चाँद हो या आफताब हो... जो भी हो तुम, खुदा की कसम, लाजवाब हो...



-------------------------------------------------------

13 comments:

  1. श्रीपादजी, अतिशय योग्य आणि मार्मिक. तुम्ही नूतनचही नाव घेतलत. आदर वाढला तुमच्या बद्दलचा. तिचा चेहेरा म्हणजे साक्षात कालीडोस्कोप! बंदिनी मधल 'मेरा गोरा रंग' आठवा. क्या बात है.

    ReplyDelete
  2. वहीदा रेहमान यांना त्यांच्या वाढ दिवशी दिलेली सर्वात 'अमूल्य आणि अप्रतिम' अस सुंदर भेट म्हणजे हा लेख... अफलातून

    ReplyDelete
  3. लेख वाचता वाचता डोळ्यांसमोर झटकन 'पिया तोसे नैना लागे रे' हे वहिदाचे अप्रतिम गाणेे तरळू लागले. छान लिहिलाय लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. मन:पूर्वक धन्यवाद, संपादक महोदय!

      Delete
  4. सुंदर लेख!
    वहिदाच्या आठवणी जुन्या काळात घेऊन गेल्या!
    वाईफ मटेरियल परफेकट!!!!!!

    ReplyDelete
  5. काही मंदिरे आपल्याला आकर्षित करतात ते त्यांच्या कलात्मक सौंदर्यासाठी ! तर काही मंदिरे ...त्या मंदिरातील मुर्तीच्या कलात्मकतेमुळे आपल्या श्रद्धांना साद घालणारी व त्यापुढे आपोआप नतमस्तक होणारी असतात. वहिदा मला दुसऱ्या प्रकारात येणारी वाटली.

    ReplyDelete