ते फक्त क्रिकेट नव्हतं...
----------------------------
शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर सर्व वृत्तपत्रांत
वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आणि बातम्या पाहिल्यानंतर
वर्ल्ड कपचा ज्वर माझ्या अंगात चढू लागला. नाही तर तोपर्यंत यंदा वर्ल्ड कप
आहे की नाही असंच वाटत होतं. काही तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं.
टीव्ही लावला. एचडी स्पोर्टस चॅनेल सुरू केलं. हे चॅनेलवाले हुशार आहेत.
त्यांना माझं दुखणं नेमकं कळलं बहुतेक. टीव्हीवर ‘बॅटल रोयाल’ नावाचा
कार्यक्रम सुरू होता. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर
प्रतिस्पर्ध्यांमधल्या वर्ल्ड कपमधल्या लढती त्यात क्षणचित्रांच्या रूपानं
दाखवत होते. १९९२ पासूनचे ते सामने पाहत पाहत मी टीव्हीलाच खिळून राहिलो.
आता अंगात पूर्ण ज्वर भिनला होता. भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये
झालेल्या सर्व लढती आपण जिंकल्या आहेत आणि या सामन्यांचं वारंवार प्रक्षेपण
करणं या चॅनेलवाल्यांना किती आवश्यक आहे वगैरे मला सगळं कळत होतं. आजच्या,
रविवारच्या भारत वि. पाकिस्तान या महामुकाबल्याची पूर्वतयारी म्हणून हे
सगळं मार्केटिंग गिमिक चाललं आहे, हेही मेंदू ओरडून सांगत होता. पण मनाला
ते मान्य नव्हतं... ते केव्हाच भूतकाळात पोचलं होतं. कारण माझ्यासाठी,
आमच्या पिढीसाठी हे वन-डे क्रिकेट फक्त क्रिकेट नव्हतं... त्यापेक्षा काही
तरी होतं. अधिक जिवंत, अधिक संवेदनशील, अधिक रसरशीत असं ते काही तरी
होतं... क्रिकेटचा आणि आमचा असा संबंध होता. म्हणून तर मग त्या
क्षणचित्रांमधले सगळे रोमांचक प्रसंग डोळ्यांसमोर काल घडल्यासारखे भरभर उभे
राहत गेले.
मग त्या मियाँदादच्या माकडउड्या असोत, बंगळूरमध्ये प्रसादनं
चिडक्या आमीर सोहेलची काढलेली ऑफस्टंपची दांडी असो... सचिननं थर्डमॅनच्या
डोक्यावरून भिरकावून दिलेला शोएब अख्तर असो, की मागच्या वर्ल्ड कपच्या वेळी
मोहालीत मिळवलेला पाचवा सफाईदार विजय असो... सगळी दृश्यं डोळ्यांसमोर उभी
राहिली... या प्रत्येक सामन्यात सचिन नावाचा एक थोर माणूस कसा हिरिरीनं
सहभागी होत होता ते दिसू लागलं... त्याचं प्रत्येक दृश्य डोळे ओले करू
लागलं... कारण खरंच ते माझ्यासाठी, माझ्या पिढीसाठी फक्त क्रिकेट नव्हतं.
आमच्या चिमुकल्या, मध्यमवर्गीय, सामान्य आयुष्यात कसल्याकसल्या
आशा-आकांक्षांची ठिणगी पेटवणारं ते काही तरी भन्नाट स्पिरीट होतं...
माझा जन्म १९७५ चा. म्हणजेच वर्ल्ड कपचा आणि
माझा जन्म एकाच वर्षातला. मला पहिले तिन्ही वर्ल्ड कप आठवत नाहीत. पहिले
दोन न आठवणं स्वाभाविक आहे. पण १९८१-८२ च्या काही घटना (उदा. आशियाई
स्पर्धा) लख्ख आठवत असूनही १९८३ चा वर्ल्ड कप मला अजिबात आठवत नाही. तेव्हा
मी काय करत होतो देव जाणे. पण वयाच्या आठव्या वर्षातला हा कप मला मुळीच
आठवत नाही, हे फार मोठं शल्य आजही वाटतं हे खरं. तेव्हा टीव्ही घरात
नव्हता; पण पेपर तर येत होता. तरीही काहीच लक्षात नाही. पण नंतर लगेच
ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप स्पर्धा आठवते. ही
स्पर्धाही आपण जिंकली. तीही फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. रवी शास्त्रीला
मिळालेली ऑडी आणि त्यानं मैदानातून त्या गाडीतून मारलेली फेरी मात्र लख्ख
लक्षात आहे. मग शारजातील ती चेतन शर्मानं घालवलेली ऐतिहासिक मॅच.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कायमचा न्यूनगंड देणारी. त्यानंतर पुढचा वर्ल्ड
कप १९८७ मध्ये भारतातच भरला. रिलायन्स वर्ल्ड कप नाव होतं त्याचं. आमचा
हिरो गावसकरचा हा शेवटचा वर्ल्ड कप. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये ६० ओव्हरमध्ये
नाबाद ३६ धावांचा कुख्यात विक्रम करणाऱ्या सुनीलनं नागपुरात न्यूझीलंडची
पिसं काढून चेंडूला एका धावेपेक्षा जास्त (तेव्हाच्या मानानं खूपच
चांगल्या) अशा सरासरीनं शतक (त्याचं पहिलं आणि वन-डेमधलं एकमेव) ठोकलेलं
अजूनही लक्षात आहे. आणि याच स्पर्धेत तिकडं कराचीत तेव्हाच्या दुबळ्या
श्रीलंकेला झोडपून काढत, आमचा दुसरा हिरो व्हिव रिचर्डसनं कुटलेल्या १८९
धावा आणि वेस्ट इंडिजनं उभारलेला ३६० धावांचा डोंगरही चांगलाच लक्षात आहे.
तेव्हा २२५-२५० धावा झाल्या तरी खूप चांगला स्कोअर झाला, असं मानण्याच्या
काळात ३६० ही फारच मोठी धावसंख्या होती. त्याच स्पर्धेत मग मुंबईतला तो
कुप्रसिद्ध उपान्त्य सामना. दिलीप वेंगसरकर त्या सामन्यात खेळू शकला
नव्हता. त्यानं आदल्या दिवशी बांगडा खाल्ल्यानं त्याचं पोट बिघडलं होतं
म्हणे. सनीही घरच्या मैदानावर लवकर बाद झाला. नंतर गूच आणि गॅटिंगनं
शास्त्री आणि मनिंदरच्या डावऱ्या फिरकीवर स्वीपमागून स्वीप मारून भारताला
स्पर्धेतून पार झाडून टाकलं. (त्यानंतर झाडूचा एवढा सफाईदार उपयोग केवळ
आत्ता दिल्लीच्या निवडणुकीतच पाहायला मिळाला. असो.) तेव्हाच्या त्या
कृष्णधवल आठवणींत वानखेडेवर बॉलबॉयचं काम करणारा सचिन नावाचा पोरगा
कुणाच्याही लक्षात राहणं शक्यच नव्हतं. त्या स्पर्धेत भारताचं स्वप्न
सेमी-फायनलमध्येच भंगलं आणि इडन गार्डन्सवर ॲलन बोर्डरच्या ऑस्ट्रेलिया
संघाच्या रूपानं क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळाला.
नंतर १९९२ चा वर्ल्ड कप पहिल्यांदाच
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झाला. आमच्या आणि देशाच्या जगण्यात बदल होत
होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचं अल्पमतातलं सरकार सत्तेवर आलं
होतं आणि नरसिंह रावांनी देशाची धुरा हाती घेतली होती. आमच्या ओठांवर
मिशीची लव फुटत होती आणि तिकडं सचिनही अठराव्या वर्षी आपला पहिला-वहिला
वर्ल्ड कप खेळायला सिद्ध होत होता. देशाचं आकाश अन् अवकाश खुलं होत होतं
अन् रुपर्ट मरडॉकच्या 'स्टार'च्या रूपानं परदेशी चॅनेलनं भारतात पाय टाकला
होता. गावसकरच्या जोडीला हेन्री ब्लोफेल्ड, बॉयकॉट, टोनी ग्रेग प्रभृतींची
कॉमेंटरी (आणि हेन्रीच्या त्या प्रसिद्ध इयरिंग्जवाल्या कमेंट्स) ऐकायला
मिळू लागली होती. पहाटे चार वाजता आमच्या पॉलिटेक्निकमधल्या होस्टेलमधल्या
मुलांसह पुणे युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमध्ये जाऊन पाहिलेल्या त्या मॅचेस
अजून आठवतात. श्रीकांत, कपिल यांसारख्या मागच्या पिढीच्या धुरंधरांसह सचिन,
कांबळी ही नवी पिढी खांद्याला खांदा लावून या स्पर्धेत खेळत होती. रंगीत
टेलिव्हिजन, स्टारसारखं आकर्षक चॅनेल आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील सुसज्ज
स्टेडियममधलं भन्नाट वातावरण यामुळं हा वर्ल्ड कप पाहता पाहता कसल्याशा
आकांक्षांची ज्योत नकळत आमच्याही मनात पेटली. जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे
शब्द कानांवरून जात होते, पण नेमकं काय घडतंय ते आकळत नव्हतं.
पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय ही आपली त्या स्पर्धेतील एकमेव कमाई. पण
त्या सामन्यात पाचव्या नंबरवर येऊन नाबाद ५४ धावांची चिवट खेळी करणाऱ्या
सचिननं कपिलसारख्या महान, पण तेव्हा अस्ताला निघालेल्या खेळाडूसह केलेली
जोरदार भागीदारी खूपच प्रतीकात्मक वाटते आता पाहताना... कपिलच्या पिढीला
क्रिकेटमध्ये फारच संघर्ष करावा लागला. पण तरीही त्यानं जिद्दीनं भारताला
पहिलावहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये मिळवून दिलाच. या झुंजार पिढीनं १९९२
मध्ये सचिनसारख्या पुढच्या - अधिक आक्रमक, सामर्थ्यवान आणि जिगरबाज -
पिढीकडं भारताच्या क्रिकेटचं बॅटन सोपवलं आहे, असंच वाटत होतं तो १९९२ चा
भारत-पाक सामना पाहताना!
मग नंतर सचिनचं करिअर आणि जागतिकीकरणाच्या
बाजारात उतरलेल्या भारताचा विकास एकाच गतीनं होऊ लागले. त्याविषयी अनेकदा
अनेक माध्यमांतून लिहून आलं आहे. मी याच जोडीला आमच्या पिढीच्या विकास अन्
आकांक्षांचाही आलेखही मांडीन. सचिनचं शारजातलं डेझर्ट स्टॉर्म, भारतानं
वाजपेयींच्या समर्थ नेतृत्वाखाली घेतलेल्या पाच अणुचाचण्या आणि
आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या नोकरीत काही तरी छान करून दाखवण्याच्या
जिद्दीनं कामाला लागलेले अस्मादिक... हे सगळं एकाच काळात घडत होतं. यातला
‘मी’ हा खरोखर प्रातिनिधिक आहे. माझ्या पिढीतल्या सर्वांच्याच बाबतीत हे
छान काही तरी घडत होतं. भारतात मोबाइल युग अवतरलं होतं. ते बाल्यावस्थेत
असलं, तरी काही तरी क्रांतिकारक घडू पाहतं आहे, याची चाहूल लागली होती.
तिकडं बंगळूरमध्ये अजय जडेजा वकार युनूसचं वस्त्रहरण करीत होता आणि इकडं
आमच्याही मुठी काही तरी करून दाखवण्याच्या इर्षेनं वळत होत्या. (हाच जडेजा
आणि अजहर पुढं मॅच-फिक्सिंगमध्ये सापडले, तेव्हा मैत्रिणीसोबत हार्टब्रेक
झाल्यानं काय होईल, एवढं दुःख आम्हाला झालं होतं आणि 'यू टू ब्रूट्स?' हा आमचा
या नतद्रष्टांना खडा सवाल होता.)
इंग्लंडमध्ये १९९९ मध्ये झालेल्या वर्ल्ड
कपमध्ये भारताची कामगिरी सुमार झाली असली, तरी कारगिल युद्धाच्या
पार्श्वभूमीवर मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारतानं पाकिस्तानला सलग
तिसऱ्यांदा (वर्ल्ड कपमध्ये) हरवून देशवासीयांना चांगला दिलासा दिला होता.
सचिनच्या वडिलांचं याच वर्ल्ड कपच्या काळात अकाली निधन झालं होतं आणि
त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून लगेच परत इंग्लंडमध्ये जाऊन
सचिननं केनियाविरुद्ध शतक ठोकून त्यांना आदरांजली वाहिली होती. तेव्हा
भावनोत्कट होऊन आकाशाकडं पाहणाऱ्या सचिनची प्रतिमा मनात रुतून राहिलीय.
त्यानंतर केलेल्या प्रत्येक शतकाच्या वेळी सचिननं अशाच पद्धतीनं वर पाहून
वडिलांचं स्मरण केलं आहे. याच काळात वायटूके समस्येमुळं भारतात डॉट कॉम
कंपन्यांचं पेव फुटलं आणि भारतीय कम्प्युटर इंजिनीअरची महती सारं जग गाऊ
लागलं. पुढं हा फुगा फुटला तरी हजारो कॉल सेंटर उभी राहिली आणि मोबाइलच्या
जोडीला मल्टिप्लेक्स आणि मॉल नावाच्या साम्राज्यानं हा देश पादाक्रांत
केला. सचिन हा आता मास्टर ब्लास्टर झाला होता आणि ब्लॅक अँड व्हाइट
स्क्रीनचे का होईना, पण मोबाइल जवळपास शहरात तरी प्रत्येकाकडं दिसू लागले
होते.
याच काळात अजहरुद्दीनला संघाबाहेर जावं लागलं
आणि सौरभ गांगुलीकडं कर्णधारपदाची धुरा आली. सचिनसह सौरभ, राहुल आणि अनिल
कुंबळे या चौघांनीही पुढं भारतीय क्रिकेटवर आणि सर्व क्रिकेटप्रेमींच्या
मनावर अधिराज्य केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकत्यातील त्या ऐतिहासिक कसोटीत
या नव्या टीम इंडियाचा जन्म झाला. नंतर २००२ मध्ये नॅटवेस्ट कपमध्ये
युवराज अन् कैफ जोडीनं इंग्लंडला हरवल्यानंतर लॉर्डसच्या त्या ऐतिहासिक
सभ्य गॅलरीत शर्ट काढून चेव आल्यागत सेलिब्रेशन करणारा गांगुली या नव्या
इंडियाच्या जबर आत्मविश्वासाचंच प्रतिनिधित्व करीत होता. याचंच प्रतिबिंब
पडलं पुढच्याच वर्षी आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये.
सचिनसाठी ही
स्पर्धा संस्मरणीय ठरली. विशेषतः पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी
एक्स्प्रेसला मैदानाबाहेर भिरकावून देत त्यानं ७५ चेंडूंत फटकावलेल्या ९८
धावा कुठला क्रिकेट चाहता विसरेल? अंतिम फेरीत आपण ऑस्ट्रेलियाकडून हरलो,
तरी उपविजेतेपद मिळवून एकंदर चांगलीच कामगिरी केली होती. त्याच काळात
‘इंडिया शायनिंग’चे पोवाडे गायले जाऊ लागले होते. मोबाइल रंगीत झाले होते
अन् मल्टिप्लेक्स, मॉल संस्कृतीनं महानगरांत चांगलंच मूळ धरलं होतं.
सिलिकॉन व्हॅलीतील सॉफ्टवेअर कंपन्यांत भारतीय तरुण इंजिनिअर्सची संख्या
दिवसेंदिवस वाढत होती आणि मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागला होता.
परदेश प्रवास किंवा देशांतर्गत विमान प्रवास आता हा वर्ग सहज करू लागला
होता. स्थानिक पर्यटन कंपन्यांची कार्यालयं गजबजू लागली होती आणि महानगरांत
दुचाकीएवढ्या सहजतेनं आता आमची पिढी चारचाकी गाड्या उडवू लागली होती.
सन २००४ च्या लोकसभा निवडणुकांत मात्र या
शायनिंगवरचा वर्ख गळून गेला आणि भाजप आघाडीचा पराभव झाला. जागतिकीकरणाची
लाट भारतात आणण्यात मोलाचा वाटा असलेले डॉ. मनमोहनसिंग देशाचे पंतप्रधान
झाले. तिकडं सौरभ गांगुलीच्या संघानं परदेशी कसोटी विजयांचं प्रमाण
लक्षणीयरीत्या वाढवलं होतं. आपण पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या
देशांना त्यांच्या देशांत जाऊन हरवलं होतं. २००६ मध्ये सचिनला टेनिस एल्बो
झाला आणि त्यांचं क्रिकेट संपुष्टात येतं की काय, अशी भीती वाटू लागली.
त्याच वेळी रांचीतला एक मानेपर्यंत केस रुळणारा रांगडा तरुण विकेटकीपरच्या
रूपानं भारतीय संघात दाखल झाला. महेंद्रसिंह धोनी त्याचं नाव.
पाकिस्तानविरुद्ध जोरदार शतक ठोकून त्यानं आपल्या आगमनाची द्वाही फिरवली.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय
संघाच्या वेस्ट इंडिजमधल्या २००७ च्या वर्ल्ड कपमधल्या कामगिरीचं ‘भयानक’ या
एकाच शब्दात वर्णन करता येईल. बाद फेरीतच मार खाऊन भारतीय संघ परतला आणि
सचिनचं वर्ल्ड कपचं स्वप्न अधुरंच राहतं की काय अशी भीती वाटू लागली.
त्यातच २००७ मधली आर्थिक आघाडीवरील सगळी कामगिरी २००८-०९ मध्ये ढासळू
लागली. अमेरिकेत ‘सबप्राइम’चं संकट ओढवलं. लेहमन ब्रदर्स कंपनी बुडाली आणि
जग मंदीच्या खाईत कोसळलं. भारतीय अर्थव्यवस्था मात्र बचतीच्या आधारावर
भक्कम उभी होती. तिकडं भारतीय संघाला डोकं वर काढण्यासाठी महेंद्रसिंह
धोनीच्या रूपात नवा ‘डॅशिंग’ कर्णधार गवसला. हा एकविसाव्या शतकातील
भारतीयांचा प्रतिनिधी होता. तुलनेनं महानगरांपेक्षा लहान शहरांतून आला
होता. भारतातल्या हजारो लहान गावांतील तरुणांच्या आकाक्षांचं प्रतीक
धोनीमध्ये गवसलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २००७ मध्ये
टी-२० मध्ये विजेतेपद पटकावलं. दुसऱ्याच वर्षी म्हणजे २००८ मध्ये
बीसीसीआयला आयपीएल नावाची कामधेनू गवसली. मोबाइलमध्ये स्मार्टफोन नामक
प्रकार याच सुमारास दाखल झाला होता. आता मोबाइलमध्येच इंटरनेट मिळू लागलं
होतं. तंत्रज्ञानासोबत होणारे हे बदल डोळे विस्फारणारे होते. धोनीच्या
संघात आता कोहली, रैना, रवींद्र जडेजा, अश्विन असे नवे खेळाडू महत्त्वाची
भूमिका बजावू लागले होते. गांगुली, द्रविड यांना सक्तीचा संन्यास घेणं भाग
पडलं होतं. या सर्व वेगवान बदलांत अभेद्य खडकासारखा अविचल उभा होता तो फक्त
सचिन...
मग २०११ चा वर्ल्ड कप भारतातच व्हायचा होता आणि
अंतिम सामना मुंबईत. यापेक्षा चांगलं नेपथ्य शोधूनही सापडलं नसतं.
ठरवल्याप्रमाणे क्लिनिकल परफेक्ट कामगिरी बजावत धोनीच्या संघानं विजेतेपद
मिळवलं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सचिनला खांद्यावर घेऊन मिरवणारा कोहली
अन् रैना पाहून १९९२ ते २०११ हे १९ वर्षांचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटत
होतं. तेव्हा कपिलनं सचिनकडं दिलेलं बॅटन सचिन जणू विराटकडं देत होता.
माझ्या मध्यमवर्गीय पिढीसाठीही करिअरमधले
महत्त्वाचे टप्पे आले होते किंवा पार तरी झाले होते. अशा विजयानंतर किंवा
करिअरमधल्या विशिष्ट टप्प्यावरील अचीव्हमेंटनंतर येणारं एक शैथिल्य सध्या
सगळ्या वातावरणात भरून राहिल्यासारखं दिसतं आहे. शिवाय आता जागतिक
क्रिकेटच्या मंचावरून सचिन नावाच्या दैवतानं एक्झिट घेतली आहे. सचिनमुळं
क्रिकेट हा सर्व भारतीयांचा कौटुंबिक सोहळा बनला होता. तो आता पुन्हा
हळूहळू फक्त मुलांच्या आवडीचा खेळ व्हायला लागला आहे. पण काळाचं चक्र सतत
चालूच असतं. क्रिकेटच्या रूपानं आपल्या आशा-आकांक्षांचं प्रतिनिधित्व
करणारा कुणी तरी नवा देव अवतार घेईलच. तोपर्यंत आम्ही हा खेळ पाहत राहूच...
नव्या आशेनं...
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १५ फेब्रुवारी २०१५ - संपादित)
------
No comments:
Post a Comment