6 Feb 2015

शमिताभ रिव्ह्यू

स्पीचलेस...
--------------

अमिताभ बच्चन आणि धनुष यांचा नवा सिनेमा 'शमिताभ' पाहिल्यानंतर 'स्पीचलेस...' अशी एकच प्रतिक्रिया मनात येते. वयाच्या बहात्तराव्या वर्षी एवढ्या प्रचंड ऊर्जेनं काम करणारा अमिताभ पाहून आपण केवळ थक्क होतो. या महान अभिनेत्याविषयी आपल्या मनात असलेला आदर आणखीनच वाढतो. त्याच्या जोडीला तोडीस तोड काम करणारा धनुष आणि कमलाहासनची कन्या अक्षरा हिचं पदार्पणातील सुंदर काम आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पटकथेवर चांगली मेहनत घेऊन सिनेमा दिग्दर्शित करणारा या सिनेमाचा दिग्दर्शक आर. बाल्की यामुळं 'शमिताभ' पाहणं हा खरोखर एक अभिरुचिसंपन्न अनुभव ठरतो.
धनुषमधला 'श' (खरं तर 'ष' हवा ना) आणि अमिताभमधली सगळीच अक्षरं (कदाचित सुरुवातीचा 'अ' धनुषमधल्या षमध्ये मिसळून यांचा 'श' झाला असावा...) मिळून 'शमिताभ' हे नाव तयार करण्यापासून या सिनेमातल्या वैचित्र्याची सुरुवात होते. या नावाला सिनेमाच्या कहाणीत अर्थातच महत्त्वाचं स्थान आहे. अमिताभच्या खर्जातल्या आवाजाचा या सिनेमात केलेला वापर, किंबहुना या सिनेमातील एक पात्र म्हणून या आवाजाचा झालेला वापर हा खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही आगळी संकल्पनाच 'शमिताभ'ला बऱ्याच उंचीवर घेऊन जाते. पारंपरिक नायक-नायिका आणि खलनायक अशा टिपिकल साच्यातून हिंदी सिनेमा आता बाहेर पडला आहे आणि अनेक 'आउट ऑफ बॉक्स' विचार करणारी कथानकं हिंदी सिनेमातून येत आहेत, याचं 'शमिताभ' हे आणखी एक उदाहरण. अमिताभ आणि धनुष या दोन्ही प्रमुख कलाकारांनी अत्यंत इंटेन्सिटीनं साकारलेल्या भूमिका 'शमिताभ'चा प्रभाव वाढवतात.
दानिश (धनुष) या हिंदी सिनेमात हिरो होण्याची धडपड करणाऱ्या इगतपुरीतल्या मराठी मुलाची ही गोष्ट आहे. भारतात रोज हजारो तरुण सिनेमात हिरो होण्यासाठी मुंबईत दाखल होत असतात. दानिशही त्यातलाच एक. पण त्याचं वेगळेपण असं, की तो लहानपणापासून मुका आहे. त्याला बोलता येत नसलं, तरी अभिनयात मात्र तो अव्वल आहे. मुंबईत संघर्ष करता करता त्याला अक्षरा (अक्षरा हसन) ही असिस्टंट डायरेक्टर भेटते. ती त्याला समजून घेते. तिचे वडील डॉक्टर असतात. योगायोगानं त्यांना फिनलंडमध्ये माणसाला दुसऱ्याचा आवाज देता येणाऱ्या प्रयोगाविषयी माहिती कळते. आपल्या नायकाला ते फिनलंडमध्ये घेऊन जातात आणि तो प्रयोग यशस्वीही होतो. मात्र, त्याला आवाज कुणाचा द्यायचा हे कळत नसतं. अशातच त्यांना एक दिवस एका स्मशानभूमीत भणंग अवस्थेत दारू पिऊन पडलेला एक म्हातारा दिसतो. त्याचा खर्जातला अफलातून आवाज ऐकून ते चकित होतात. अनेक मिनतवाऱ्या करून ते त्या म्हाताऱ्याला, म्हणजेच अमिताभ सिन्हांना (अमिताभ) दानिशला आवाज देण्यासाठी राजी करतात. विशेष म्हणजे दानिशला लगेच एक सिनेमा मिळतो. त्यासाठी त्याला शमिताभ हे नवं नाव देण्यात येतं. हा सिनेमा सुपरहिट होतो आणि दानिश रातोरात सुपरस्टार होतो. पुढं अशा काही घटना घडत जातात, की दानिश आणि अमिताभ सिन्हांमधले खटके उडू लागतात. दोघांचेही इगो दुखावतात. दानिशला आवाज देण्यासाठी म्हातारा नकार देतो. त्याच वेळी त्याचा नवा सिनेमा येऊ घातलेला असतो. मधल्या काळात एक पत्रकार दानिशच्या खऱ्या आयुष्याची माहिती काढतो आणि त्याला हा मूळचा मुका माणूस असल्याचं लक्षात येतं. पुढं काय होतं, ते पडद्यावरच पाहायला हवं.
शमिताभ सिनेमा करताना दिग्दर्शक बाल्कीनं अमिताभ आणि धनुष या दोन्ही कलाकारांच्या सामर्थ्याचा खुबीनं उपयोग केला आहे. संपूर्ण सिनेमात धनुषला एकही संवाद (अर्थात स्वतःच्या आवाजातला) नाही. त्याचंही डबिंग अर्थातच अमिताभनं केलं आहे. त्या अर्थानं अमिताभनं डबल रोल केला आहे. एकूणच अमिताभच्या सर्व क्षमतांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न बाल्कीनं यातून केला आहे.
एके काळी सिनेमाजगतात हिरो व्हायला आलेल्या, पण आता नैराश्यग्रस्त मद्यपी झालेल्या सत्तरीतल्या या म्हाताऱ्याची भूमिका अमिताभनं अशा काही तडफेनं केली आहे, की सिनेमा संपल्यावर त्याला उठून उभं राहून मानवंदना द्यावीशी वाटते. त्याचा तो खास खर्जातला आवाज त्यानं या संपूर्ण सिनेमात अशा काही हुकमतीनं वापरला आहे, की तो आवाज म्हणजे एक स्वतंत्र पात्र बनूनच आपल्यासमोर येतो. या सिनेमाच्या जवळपास प्रत्येक फ्रेमवर या महानायकाची स्पष्ट छाप पडलेली आहे. अमिताभनं वयाच्या ७२ व्या वर्षी साकारलेली ही भूमिका त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरावी. अमिताभ हे काय रसायन आहे, हे त्यानं इंजेक्शन देताना त्याला वाटणाऱ्या भीतीतून जो आरडाओरडा केलाय त्यातून पाहायला मिळतं. त्याच्या तरुण वयातल्या काही भूमिकांची आठवण यावी अशी डोळ्यांतली मिश्कील चमक, अत्यंत बोलका चेहरा आणि याही सिनेमात अत्यंत उत्साहानं गायलेलं एक गाणं अशा सर्व गोष्टींतून हा महानायक आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडायला लावतो.
धनुषही अप्रतिम. रांझणा या सिनेमातूनच त्याच्या अष्टपैलू अभिनयक्षमतेची प्रचिती आली होती. याही सिनेमात हा कलाकार भाव खाऊन जातो. धनुषचं सर्व शरीरच बोलतं. या सिनेमात त्याला मुक्याची भूमिका करायला मिळाली आहे आणि त्यानं नेहमीच्या सहजतेनं ती झोकात साकारली आहे. मुंबईतल्या कूल एडीची भूमिका अक्षरानं सुंदर केली आहे. या सिनेमात अनेक फिल्मी योगायोग आहेत. अर्थात ते घडविल्याशिवाय सिनेमाच उभा राहू शकला नसता. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करून हा सिनेमा एंजॉय करावा. सिनेमाचा शेवट दुःखान्त आहे. हेही बाल्कीच्या कथेचं वेगळेपण. पण या अनपेक्षित शेवटामुळं संपूर्ण सिनेमाचा प्रभाव आणखी वाढतो. इलयाराजांचं संगीतही झकास. यातलं एक टॉयलेट साँगही सिनेमाप्रमाणंच वैशिष्ट्यपूर्ण.
तेव्हा अमिताभच्या चाहत्यांनी तर नव्हेच, पण सर्वसाधारण प्रेक्षकांनीही चुकवू नये असाच हा आगळावेगळा सिनेमा आहे.
---------
निर्माते : सुनील लुल्ला, अभिषेक बच्चन, गौरी शिंदे इ.
दिग्दर्शक : आर. बाल्की
संगीत : इलयाराजा
प्रमुख भूमिका : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन
दर्जा : *** १/२
----------------

No comments:

Post a Comment