2 Oct 2022

‘सहेला रे’विषयी...

घट्ट विणीची ‘गोधडी’
-------------------------

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘सहेला रे’ हा नवा मराठी चित्रपट म्हणजे, सह्याद्रीच्या कड्यावर उभे राहिल्यानंतर येणाऱ्या थंडगार झुळकीसारखा एक प्रसन्न अनुभव आहे. ‘मानवी नातेसंबंधांविषयी भाष्य करणारा आणखी एक मराठी चित्रपट’ किंवा ‘एका महिलेचं दिग्दर्शन असलेला आणखी एक स्त्री-प्रधान चित्रपट’ एवढ्यावरच किंवा या धर्तीवर या चित्रपटाचं वर्णन करणं योग्य ठरणार नाही. कलावंत म्हणून असलेल्या प्रगल्भ विचारांतून आलेल्या कल्पनेचा हा एक सहज-स्वाभाविक आविष्कार आहेच; शिवाय ‘टिपिकल’ वाटू शकणाऱ्या गोष्टीतून ही कलाकृती शेवटी एक वेगळा विचार मांडते आणि तो सौम्य, पण ठामपणे सांगते हेही महत्त्वाचं!
एकविसाव्या शतकातल्या आधुनिकोत्तर जगण्याच्या वेगानं भोवंडलेल्या मनांना आपल्या प्रत्येक कृतीचं या ना त्या प्रकारे समर्थन करावं लागतं. हे समर्थन कधी आत्मक्लेशातून येतं, तर कधी न्यूनगंडातून! आपल्या चुकलेल्या गोष्टींना नैतिकतेचा मुलामा देणं आपल्याला फार आवश्यक वाटत असतं. समाजानं घालून दिलेल्या, आखून दिलेल्या चौकटींपलीकडचा कोणताही विचार सहजी पटत नाही, समजावून घेता नाही. असा विचार मनात येणं हे जवळपास प्रत्यक्ष व्यभिचाराइतकंच भयंकर मानलं जातं. स्त्री आणि पुरुष या दोघांनाही या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. मात्र, त्यातही स्त्रीला अधिक. याची कारणं आपल्या सध्याच्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत आहेत, हे निराळं सांगायला नको. अशा परिस्थितीत स्त्री-पुरुष नात्याकडं बघण्याचा एका वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट आपल्याला देतो.
लग्न झाल्यानंतर २० वर्षांनी आपल्या नात्यात पूर्वीचा ‘तो’ किंवा ‘ती’ परत आली तर... या थीमवर कदाचित अनेक कादंबऱ्या, नाटकं, चित्रपट आले असतील. अशा वेळी ‘सहेला रे...’ सुरुवातीला त्याच वळणावर जाताना बघून, ‘अरे, हाही त्यातलाच दिसतोय की... पुढं काय होणार हे सांगू शकतो आपण’ असं आपल्याला वाटायला लागतं. मात्र, मृणालमधल्या दिग्दर्शिकेनं या कथानकाचा लगाम अगदी पक्का धरून ठेवला आहे. या गोष्टीतून आपल्याला नक्की काय सांगायचं आहे, याचं पक्कं भान तिला आहे. त्यामुळं ही गोष्ट जिथं पोचायची तिथवर व्यवस्थित पोचते. एकही धागा उसवत नाही, की एकही टाका चुकीचा बसत नाही. जे सांगायचं आहे, त्याची वीण घट्ट असल्यानं ते तर व्यवस्थित आपल्यापर्यंत पोचतंच; शिवाय जे थेट संवादांतून बोललं जात नाही तेही आपल्यापर्यंत पोचतं. याचं श्रेय दिग्दर्शिकेसोबतच अभिनेत्यांनाही! 
लग्न असो वा अन्य कुठल्याही कारणांनी, स्त्रीचं जगणं अपेक्षांच्या ओझ्यानं कायमच दबलेलं असतं. सगळ्यांचं सगळं करता करता तिला स्वत:साठी कधी वेळ काढायला मिळेलच आणि तिच्या मनात कधी काळी वसत असलेल्या स्वप्नांची पूर्ती करायला मिळेलच याची कुठलीही खातरी नाही. इथली नायिकाही अशाच पेचात पडलेली आहे. वरवर पाहता सगळं चांगलं आहे, सुखाचं आहे, क्वचित हेवा वाटावं असंही आहे. मात्र, हे सगळं जगणं एका बाजूला आणि लग्नापूर्वीची स्वप्नाळू ती एका बाजूला... एवढा काळाचा लंबक दोन टोकांना गेला आहे. अशा वेळी स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड आणि दुसरीकडं या सगळ्या धडपडीची कुठे दखलही नसणं या द्विधेत सापडलेली नायिका अखेर त्यातून कशी बाहेर पडते आणि आपल्या स्वकर्तृत्वाची ‘गोधडी’ कशी विणते, हे पडद्यावरच पाहणं इष्ट! 
यात शमाच्या मुख्य भूमिकेत स्वत: दिग्दर्शक - म्हणजे मृणाल - असल्यानं गोष्टी सोप्या झाल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून आपल्याला शमाच्या व्यक्तिरेखेकडून नक्की काय हवंय, हे मृणालला नीट माहिती आहे. गोष्टीचं वर सांगितलेलं स्वरूप बघता, त्यात निसरड्या वाटांची सर्वार्थाने शक्यता बरीच होती. पण दोन्ही अर्थांनी ही तारेवरची कसरत दिग्दर्शिका व अभिनेत्री मृणालने व्यवस्थित केली आहे. 
यात नायिकेच्या आयुष्यात पुन्हा आलेल्या ‘त्या’ची - अर्थात निरंजन काणेची - भूमिका सुमीत राघवनने केली आहे. या भूमिकेसाठी त्याचं कास्टिंग अतिशय परफेक्ट आहे. सुमीतमधली सहजता, त्याच्यात असलेलं एक मिश्कील मूल आणि त्याच वेळी प्रगल्भही वाटणारं व्यक्तिमत्त्व यामुळं तो या भूमिकेत अगदी फिट आहे. त्यानं अगदी नैसर्गिक सहजतेनं नायिकेच्या ‘सहेला’ची ही भूमिका साकारली आहे. सुबोधनं शमाच्या पतीची - विक्रमची - भूमिकाही उत्तम केली आहे. विक्रमचं कामात सतत व्यग्र असणं, शमाला सतत गृहीत धरणं, त्याच वेळी मनातून तिच्यावर प्रेम असणं या सगळ्या भावना सुबोध पुरेशा प्रगल्भतेनं आपल्यापर्यंत पोचवतो. तुलनेनं या भूमिकेची लांबी कमी असली तरी तो लक्षात राहतो.
चित्रपटाचं छायांकन आणि संगीत उच्च दर्जाचं आहे. सोपान पुरंदरे यांनी गरुडमाचीचा सगळा देखणा, हिरवागार परिसर सुंदर टिपला आहे. चित्रपटातला शमा आणि निरंजन यांच्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग इथंच चित्रित झाला आहे. सह्याद्रीच्या कुशीत ट्रेक करताना, निसरड्या पायवाटांवरून जाताना, एकमेकांना नव्यानं ओळखताना, हात धरताना-सोडताना, जवळ येताना-दूर जाताना, पडक्या वास्तूच्या साक्षीनं जुन्या आठवणींना जागवताना... निसर्ग सतत या दोघांच्या सोबत असतो. हे किती सूचक आहे! निसर्गातल्या पावसाच्या थेंबाइतक्या किंवा त्या हिरव्या तृणपात्याइतक्या त्या भावना सच्च्या असतात, निखळ असतात! ट्रेक संपताना नायिकेचं भानावर असणं आणि विचारांवर ठाम असणं हेही सहज-स्वाभाविकपणे पटून जातं. यात उत्कृष्ट छायांकनाचा नक्कीच वाटा आहे. तीच गोष्ट संगीताची. ‘सई बाई गं...’ ही अरुणा ढेरे यांची कविता सिनेमाभर ‘थीम साँग’सारखी येते. सलीलनं अतिशय सुरेल असं हे गाणं केलं आहे. मधुरा दातार आणि आर्या आंबेकरनं ते उत्तम गायलं आहे. दुसरं गाणं आहे ते ‘रे मनाला घे विचारून एकदा...’! वैभव जोशीचे अप्रतिम शब्द आणि आदर्श शिंदेचा आवाज यामुळं हे गाणंही श्रवणीय झालं आहे.
सुबोध, सुमीत आणि मृणाल यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात अन्य पात्रांच्या फार मोठ्या भूमिका नाहीत. तरी शमाच्या सासूच्या भूमिकेत सुहिता थत्तेंचा ठसका मजा आणतो. गजानन परांजपेही छोट्या भूमिकेत दिसतात. याशिवाय सुरुवातीच्या पार्टीच्या दृश्यात मृणालचे पती ॲड. रुचिर कुलकर्णीही दिसतात. सिनेमात काही त्रुटी नक्कीच आहेत. मात्र, सिनेमाच्या मूळ गाभ्याशी आपण एकरूप झालो, तर त्या सहज लक्षात येणार नाहीत, एवढ्याच आहेत.
थोडक्यात, प्रगल्भ विचारांच्या कलावंतांनी आपल्या पिढीची म्हणून सांगितलेली ही गोष्ट पुढच्या पिढ्यांनाही आवडेल, अशीच आहे. आपल्या जगण्यात आपल्याला असा ‘सहेला’ गवसणं आणि त्यातून आपल्या जगण्यात आशयपूर्ण अर्थ भरणं हाच या निर्मळ सिनेमाचा साधा-सोपा संदेश आहे.


---

प्लॅटफॉर्म : प्लॅनेट मराठी

---6 comments:

 1. धन्यवाद श्रीपाद. फारच सुंदर परिक्षण केलं आहेस. मी जरी काम केलं असलं तरी अजून चित्रपट बघितला नाहीये. पण आता तुझा ब्लॉग वाचून माझी एक प्रेक्षक म्हणून उत्कंठा वाढली आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार मित्रा.

  ReplyDelete
  Replies
  1. बघ लवकर... 🙂 आज भेट होईल असं वाटलं होतं... पण योग नव्हता...

   Delete
 2. छानच विश्लेषण...Will see movie soon !

  ReplyDelete
 3. खूप सुंदर पद्धतीने लिहिलय परीक्षण ...वाचकांची चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवणार व चित्रपट पाहण्याची इच्छा निर्माण करणार ...नक्की पाहणार हा चित्रपट ..खूप धन्यवाद !,,,🙏🙏👍

  ReplyDelete
  Replies
  1. मन:पूर्वक धन्यवाद, वीणाजी!

   Delete