21 Feb 2018

बडोदा डायरी १

वडोदरामां आपनुं स्वागत छे...
------------------------------------------------यंदाचं साहित्य संमेलन बडोद्यात होणार, हे कळल्यावरच तिथं जायचं हे मी मनात ठरवलं होतं. भारतातील ज्या काही मोजक्या शहरांना आपण भेट दिलीच पाहिजे, असं मला वाटतं, त्यात बडोदा हे अग्रगण्य आहे. (कोलकाता हे दुसरं... अजून त्या शहराच्या भेटीचा योग आलेला नाही.) महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याविषयी लहानपणापासूनच माहिती होती. त्यांचं शहर हेही एक ओढीचं कारण होतं. एकूणच भारतातील संस्थानी शहरांविषयी मला एक वेगळं आकर्षण आहे. कोल्हापूर, म्हैसूर, जुनागड, हैदराबाद, मिरज, इंदूर, ग्वाल्हेर या शहरांमध्ये जावं, तिथल्या इतिहासाच्या खुणा पाहाव्यात, आजचं त्या शहराचं रूप पाहावं आणि हे कसं बदलत गेलं असेल याचा मनातल्या मनात एक अंदाज करत राहावा हा माझा आवडता खेळ आहे. बडोद्याला जाताना हा खेळ खेळायला मिळणार याचा आनंद बहुधा सर्वाधिक होता. पूर्वी दिल्लीला जाताना एक-दोनदा हे शहर रेल्वेतून ओझरतं पाहिलं होतं. पुणे-दिल्ली दुरांतो ट्रेन फक्त बडोद्याला थांबते. तेव्हा तिथल्या स्टेशनवर उतरूनही पाहिलं होतं. पण हे म्हणजे गाव पाहणं नव्हेच. त्यामुळं संमेलनाच्या तारखा जाहीर झाल्या आणि मी बडोद्याचं प्रस्थान निश्चित केलं.
घुमानच्या साहित्य संमेलनाला मी, अभिजित पेंढारकर आणि अरविंद तेलकर जाऊन आलो होतो. (घुमानची डायरी या ब्लॉगवर आहे. जिज्ञासूंनी ती वाचावी.) 
यंदाही महाराष्ट्राबाहेर संमेलन आहे म्हटल्यावर आमचा तिय्या पुन्हा जमला. घुमाननंतर तीन वर्षांनी पुन्हा हा योग येत होता. (तुमचा तीन-तिघाडा आणि काम बिघाडा असं कसं होत नाही, असं कुणी विचारल्यावर मी सांगतो, की मी आणि अभ्या दीडशहाणे आहोत. त्यामुळं टोटल चार होते.) नेहमीप्रमाणं प्रवासाचं आरक्षण वगैरे जबाबदारी अभ्यानं घेतली. दोन महिने आधी रेल्वेचं बुकिंग केलं. (तरी काही उपयोग झाला नाही. तो किस्सा पुढे येईलच.) संमेलनाला जाण्याआधी एकदा तिघेही भेटू, असं ठरवलं होतं. पण ते काही जमलं नाही. तिघेही आपापल्या व्यापात... अगदी संमेलन चार दिवसांवर आल्यावर आम्ही ते तीन हजार रुपये प्रतिनिधीशुल्क वगैरे भरलं आणि आमचं हॉटेल व तीन दिवसांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था नक्की केली. चौदा फेब्रुवारीला, म्हणजे व्हॅलेंटाइन डेच्या शुभसायंकाळी मी 'उबर' बुक करून निघालो. जाताना अभिजितला घेतलं आणि सात वाजता स्टेशनवर पोचलो. तेलकरही आले. आमची अहिंसा एक्स्प्रेस दोन नंबरच्या फलाटावर लागणार होती. (मी पुणे स्टेशनला गेलो, की माझी कुठलीही गाडी एक नंबरच्या फलाटावर येत नाही. उद्या मी अगदी 'शताब्दी'चं बुकिंग केलं, तरी त्या दिवशी दौंड पॅसेंजर एक नंबरवरून सोडतील आणि माझी गाडी तीन किंवा चार नंबरवरून... असो.) तर तो फूटओव्हर ब्रिज ओलांडून आम्ही दोन नंबरच्या फलाटावर गेलो. तिथं जयश्री (बोकील), प्रज्ञा (केळकर-सिंग), माझा सहकारी चिंतामणी (पत्की), विद्याधर (कुलकर्णी) ही सगळी गँग दिसली. मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडेही भेटले. आता प्रवास मजेत होणार याची खात्री पटली. एवढे दिवस आधी आरक्षण करूनही आमच्या तिघांपैकी दोनच तिकिटं कन्फर्म झाली होती. त्यामुळं अहिंसा एक्स्प्रेसमध्ये चढताना मनात हिंसक विचार येत होते. अभ्याला बरीच धाकधूक वाटत होती, पण माझा रेल्वेच्या जुगाडावर पूर्ण विश्वास होता. टीसीनं आम्हाला सुरुवातीला काही दाद दिली नाही, पण कर्जतला एक बर्थ मिळाला. त्यामुळं आम्हाला हुश्श झालं. जेवण घरूनच आणलं होतं. साडेनऊला सगळे जेवलो. समोर एक काका होते. ते संमेलनाला एकटेच निघाले होते. त्यांचं नाव दाबके असं होतं. काकांची चांगली ओळख झाली आणि पुढं चार दिवस ते वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला सतत भेटत राहिले. पुण्यातून खास संमेलनासाठी जाणारे बरेच लोक होते. ते सगळे नंतर बडोद्यात भेटणार होते. मला साइडचा आणि वरचा बर्थ मिळाला होता. या बर्थवर मला कायमच अवघडल्यासारखं होतं. तिथं मी पुस्तक काढून वाचण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमेना. शेवटी कशीबशी झोप आली. मध्येच गाडी स्टेशनवर थांबली आणि लोकांची ये-जा सुरू झाली की जाग यायची. मध्येच कुठल्या तरी स्टेशनवर एक गुजराती जोडपं चढलं. त्यातल्या बर्फीभाभी दिसायला बऱ्या होत्या. त्यामुळं उरलेला वेळ सुखाचा गेला. सकाळी साडेपाचचा गजर लावून ठेवला होता. उठलो, तर गाडी वेळेत बडोद्याला पोचत असल्याची शुभवार्ता दाबकेकाकांनी दिली. बरोबर पाच पन्नासला आम्ही सगळे बडोदा स्टेशनावर उतरलो. स्टेशनवरच चहा झाला. स्टेशनबाहेर आल्यावर पहाटेची किंचित थंडी जाणवली. सामान भरपूर असल्यानं रिक्षा करूनच हॉटेलला गेलो. बाकीच्या मंडळींनी पायी यायचं ठरवलं. आमचं सगळ्यांचं तुलसी रिजन्सी हॉटेल नावाचं होतं. पण अशी दोन हॉटेलं आहेत, हे हॉटेलवर गेल्यावरच कळलं. तिथं सकाळी सकाळी व्हायचे ते घोळ झालेच. आमचं बुकिंगच नाही, इथपासून सुरुवात झाली. मग तिथल्या संयोजक मंडळींना झोपेतून उठवून झालं. तिकडे दुसऱ्या हॉटेलमध्येही हाच प्रकार सुरू होता, असं कळलं. अखेर तासाभरानं सगळं निपटलं आणि आम्हाला खोली मिळाली. आधी एकच मिळाली. हॉटेल एकूण 'सो सो'च होतं. बडोद्याविषयी भ्रमनिरास होतो की काय, असं वाटायला लागलं. पण थोडा संयम ठेवला. अजून तर आम्ही शहरात नीट आलोही नव्हतो. इथल्या हवेत नीट श्वास घेतला नव्हता. इथले गल्ली-बोळ, रस्ते, दुकानं, माणसं नीट पाहिली नव्हती....
आवरून आधी नाश्ता करायला बाहेर पडलो. आमच्या हॉटेलच्या शेजारी हिमालया कॅन्सर हॉस्पिटल नावाचं एक रुग्णालय होतं. त्या आवारात कायम पेशंटची गर्दी असायची. समोर एका मावशींचा चहाचा स्टॉल होता. त्यांच्याकडं चहा घेतला. मावशी मराठीच आहेत, असं लक्षात आलं. मग आम्ही मराठीतच बोलू लागलो. तिथून पुढं रोज सकाळी त्यांच्याकडं चहाला जायचं हा रिवाजच झाला. आम्हाला आशिषनं (चांदोरकर) नाश्त्यासाठी महाकाली शेव उसळवाल्याचं नाव सांगितलं होतं. मग रिक्षा करून तिथं गेलो.
हा एक भन्नाट पदार्थ आहे. आपल्या मिसळीसारखाच. पण यात जाडी शेव आणि कांदापात घालतात. त्यानं सोबत पावाची लादीच ठेवली. इथले पावही छोटे, गोल व चवदार होते. मुख्य डिशसोबतच अजून एका डिशमध्ये जादा शेव आणि बारीक कापलेली कांदापात दिली होती. आम्ही गरमागरम शेव-उसळीवर चांगलाच ताव मारला. पोट भरून नाश्ता झाला. पैसे द्यायला गेलो, तर तो माणूस पण मराठीतूनच बोलायला लागला. साने आडनावाचा हा तरुण महाडजवळच्या पोलादपूरचा. त्याचे वडील ३२ वर्षांपूर्वी इथं आले आणि हा व्यवसाय सुरू केला. रस्त्यावरच ही टपरी होती मागे छत्रपती शिवरायांचा फोटो होता. आमचं बिल झालं केवळ १२० रुपये. मग सानेभाऊचे आभार मानून आम्ही समोरच असलेल्या बडोद्याच्या रॉयल पॅलेसकडं चालत गेलो. संमेलनाची ग्रंथदिंडी संध्याकाळी असल्यानं आम्ही लगेच स्थळदर्शन करून टाकायचा निर्णय घेतला. पॅलेसचं जे भव्य प्रवेशद्वार दिसत होतं, तिथून प्रवेश नव्हताच. शेजारीच एक गेट होतं, तिथून आत गेलो. थोडं आत चालत गेल्यावर पॅलेस लागला. या पॅलेसचं नाव लक्ष्मी-विलास पॅलेस. सयाजीरावांचा हा महाल. अजूनही त्यांचे वंशज तिथंच वरच्या मजल्यावर राहतात. पण खालचा भाग आता पर्यटकांसाठी खुला केला आहे.
पॅलेस बाहेरून जबरदस्तच दिसत होता, यात शंका नाही. पण तो पाहायला २२५ रुपये एकाला तिकीट आहे, म्हटल्यावर जरा दचकायला झालं. अर्थात तो पाहायचाच होता, त्यामुळं तिकीट काढलं. आत ऑडिओ गाइडची व्यवस्था होती. तिथली सगळी स्टाफ मंडळी मराठीच होती. आम्ही अर्थात मराठी ऑडिओ घेतला. राहुल सोलापूरकरांच्या आवाजात निवेदन होतं. सव्वा तास लागतो ते निवेदन संपायला. पण एकूण अनुभव छान होता. दरबार हॉल, भव्य चित्रं आणि शिल्पं पाहून छान वाटलं. गादी हॉल नावाच्या हॉलमध्ये रविवर्म्याची मूळ चित्रं होती. एकूणच कलासक्त राजघराण्याची छाया जागोजाग दिसत होती. पॅलेसच्या समोर गोल्फ कोर्ससारखं मोठं मैदान होतं. आता कुणी तिथं गोल्फ खेळत नसावं. पण ती जागा लग्नसमारंभासारख्या इव्हेंटसाठी भाड्यानं दिली जाते असं कळलं. नंतर जाताना बाहेर रॉयल बँक्वेटचीही जाहिरात पाहिली. ८४९ रुपयांत तिथं विशिष्ट दिवशी रॉयल डिनर सर्व्ह केलं जातं असं कळलं. हा प्रकार काय ते कळेना. नंतर स्थानिकांकडून कळालेल्या माहितीनुसार, गायकवाडांचे वंशज बऱ्यापैकी कर्जात आहेत, असं कळलं. त्यामुळं उत्पन्नासाठी हे प्रकार सुरू आहेत, ते लक्षात आलं. एकूणच पॅलेस राजेशाही असला, तरी एकूण अवस्था 'काप गेला नि भोके राहिली' अशी असावी, असं वाटून गेलं. शेजारीच फत्तेसिंह म्युझियम होतं. उन्ह झालं होतं. बरीच तंगडतोड करीत तिथपर्यंत जावं लागलं. इथं प्रत्येकी ८० रुपये तिकीट होतं. ऑडिओ गाइडचे वेगळे ३० रुपये. पण आम्ही ऑडिओ गाइड घेतला नाही. राजा रविवर्मा आणि युरोपातील उत्तमोत्तम चित्रकारांच्या कलाकृती इथं आहेत. त्या बघून भारावून गेलो. शंभर वर्षांहून जुन्या काळात हे काम कसं केलं असेल, असं वाटून गेलं. फेलिची या इटालियन शिल्पकाराचीही बरीच शिल्पं होती. म्युझियममध्ये काही थ्री-डी पेंटिंग्ज होती. आपण इकडून पाहिलं, तर रस्ता आपल्याकडं वळलेला दिसतो, नंतर घोड्याची मान आपल्याकडंच आहे असं दिसतं वगैरे. तिथला स्टाफ प्रत्येकाला आवर्जून आणि कौतुकानं हे थ्री-डी प्रकरण दाखवताना दिसला. आमचे आता पाय दुखायला लागले होते. मग जरा बाहेर येऊन टेकलो. भूक लागली होती. काउंटरवरच्या मावशींनी एक हॉटेल सुचवलं. ते आमच्या हॉटेलच्या एरियातच होतं. म्हणून मग रिक्षा करून तिकडं गेलो. पण त्या रिक्षावाल्यानं आम्हाला चक्क गंडवलं. आम्हाला एका गल्लीत सोडून, 'इथंच पुढं आहे ते हॉटेल' असं सांगून तो निघून गेला. त्याला शाळेतल्या मुलांना आणायला जायचं होतं. आम्ही चालून थोडी शोधाशोध केली, पण ते हॉटेल काही सापडलं नाही. शेवटी दुसरं एक 'आमंत्रण' नावाचं हॉटेल सापडलं. इथं गुजराती थाळी मिळत होती आणि आम्हाला तीच हवी होती. त्या हॉटेलमध्ये आम्ही तिघंच होतो. अडीच-तीन वाजले होते. त्यामुळं सगळे वेटर आमच्यावर तुटून पडले. आम्हीही मनसोक्त पुख्खा झोडला. नंतर बिल आल्यावर कळलं, की एक ताट तीनशे रुपयांना होतं. अर्थात भुकेच्या वेळी चांगलं जेवायला मिळालं, त्यापुढं पैशांचं काय? शांतपणे बिल दिलं आणि बाहेर पडलो. जबरदस्त झोप आली होती. पण हॉटेल जवळच होतं, म्हणून चालत गेलो. रूमवर जाऊन ताणून दिली. थेट पाच वाजता उठलो. मग आवरून ग्रंथदिंडीकडं निघालो... तिथं खरं संमेलन सुरू होणार होतं... खरं बडोदा, तिथली मराठी माणसं तिथंच तर भेटणार होती...

(क्रमश:)

 ---

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

1 comment:

  1. ट्रेनमध्येही अर्धा तास डब्यात धुमाकूळ घालून मीडियाची माणसं असल्याचं सर्वार्थानं सिद्ध केलं, तेही महत्त्वाचं. बाकी झकास.

    ReplyDelete