1 Feb 2018

मेरिल स्ट्रीपवरचा लेख

आयर्न लेडी
---------------

 

परवा स्टीव्हन स्पिलबर्गचा ‘द पोस्ट’ हा सध्या गाजत असलेला सिनेमा पाहताना, विशेषत: त्यातली मेरिल स्ट्रीपनं रंगवलेली कॅथरिन ग्रॅहम पाहताना मन सारखं सांगत होतं, की यंदा या भूमिकेसाठी हिच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होणार! आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिला या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या वर्गवारीत नामांकन मिळाल्याचं जाहीर झालं. हे मेरिलचं विक्रमी एकविसावं नामांकन. तिनं स्वत:चाच विक्रम मोडला. तिच्यामागे दुसऱ्या क्रमांकावर कॅथरिन हेपबर्न आणि जॅक निकोल्सन आहेत. त्यांना बारा नामांकनं आहेत. मेरिल त्यांच्यापेक्षा तब्बल नऊ नामांकनांनी आघाडीवर आहे. या एकवीसपैकी तीन वेळा तिला ऑस्कर मिळालं आहे. क्रेमर व्हर्सेस क्रेमर (१९७९) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं, तर सोफीज चॉइस (१९८२) आणि आयर्न लेडी (२०११) या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं ऑस्कर तिनं पटकावलं आहे. तिच्यापेक्षा अधिक म्हणजे चार ऑस्कर फक्त ‘द’ ऑड्री हेपबर्ननं जिंकली आहेत.
यंदा कॅथरिनच्या भूमिकेसाठी नामांकन मिळताच मेरिलला विशेष आनंद झाला. ‘या चित्रपटासाठी नामांकन मिळाल्याचा आपल्याला विशेष आनंद होत आहे, याचं कारण हा चित्रपट मला आवडतो. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याची बाजू हा चित्रपट घेतो. इतिहासात महिलांचा आवाज उंचावण्याचं काम हा चित्रपट करतो. या चित्रपटाचा अभिमान वाटतो आणि हा चित्रपट तयार करणाऱ्या सर्वांचाही,’ अशी प्रतिक्रिया तिनं व्यक्त केली. मेरिलची ही प्रतिक्रिया खूप काही सांगणारी आहे. यंदा हा चित्रपट अनेक महत्त्वपूर्ण योग घेऊन आला आहे. एक तर मेरिलनं पहिल्यांदाच स्टीव्हन स्पिलबर्गसोबत काम केलंय. टॉम हँक्सबाबतही तेच. या तिन्ही गुणवान माणसांना एकत्र आणणारा चित्रपट म्हणून ‘द पोस्ट’चं एक महत्त्व आहेच. पण ते तेवढंच नाही. अमेरिका व व्हिएतनाम यांच्यातील युद्धाची सत्य बाजू जनतेसमोर आणणारे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ आपल्या वृत्तपत्रात, म्हणजेच ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रसिद्ध करताना कॅथरिन आणि संपादक बेन ब्रॅडली (टॉम हँक्स) यांना काय काय दिव्यातून जावं लागतं, याची कथा म्हणजे हा चित्रपट. या चित्रपटातील काळ १९७१ चा आहे. अमेरिका-रशिया शीतयुद्धाचा तो काळ होता. अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि हेन्री किसिंजर यांच्या दबावाला न झुकता, न जुमानता कॅथरिननं हे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. पतीच्या निधनानंतर पंचेचाळिसाव्या वर्षी कॅथरिन ग्रॅहमवर या वृत्तपत्राची जबाबदारी येते. तिला या कामाचा कसलाच पूर्वानुभव नसतो. भागधारकांचा दबाव असतो. व्यवसायाची म्हणून एक जबाबदारी असते. त्यातच हे ‘पेंटॅगॉन पेपर्स’ प्रथम प्रतिस्पर्धी वृत्तपत्रात, म्हणजे ‘द न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये आधी प्रसिद्ध होतात. मात्र, त्या वृत्तपत्राला सरकारच्या दडपशाहीला सामोरं जावं लागतं. अशा स्थितीत आपल्या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध करू नये, यासाठी कॅथरिनवर प्रचंड दबाव असतो. मात्र, संपादक ब्रॅडलीच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय कॅथरिन घेते आणि पुढे इतिहास घडतो. चित्रपटाच्या शेवटी ती तिच्या पतीचं एक वाक्य - न्यूज इज ए रफ ड्राफ्ट ऑफ हिस्टरी - उद्धृत करते, तेव्हा ते अगदी पटतं.
कॅथरिनची ही भूमिका मेरिलनं अगदी समरसून केलीय. वास्तविक ही भूमिका करणं मेरिलला फार अवघड गेलं नसणार, याचं कारण ती स्वत: अशीच एक वेगळ्या मुशीतून घडलेली स्त्री आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना ‘आयर्न लेडी’ म्हणत. मेरिलनं सहा वर्षांपूर्वी त्यांची भूमिका तंतोतंत साकारली. खरं तर मेरिललाही ‘आयर्न लेडी’ म्हणावं असं तिचं कर्तृत्व आहे.
मेरिल आज ६८ वर्षांची आहे. तिचा जन्म २२ जून १९४९ चा. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ती चित्रपट व्यवसायात आहे. तिच्या कुटुंबाची मुळं जर्मन आहेत. तिची विचारसरणी अमेरिकी डावी आहे. सडेतोड बोलण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी सात जानेवारीला गोल्डन ग्लोब सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना तिनं केलेलं भाषण गाजलं होतं. अमेरिकेचे होऊ घातलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तिनं केलेल्या थेट टीकेमुळं हे भाषण गाजलं होतं. ट्रम्प यांनी एका पत्रकाराच्या व्यंगाची नक्कल केली होती. त्याबद्दल स्ट्रीपनं त्यांची चांगलीच जाहीर खरडपट्टी काढली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी ‘मेरिल स्ट्रीप ही एक ओव्हररेटेड अभिनेत्री आहे,’ अशा शब्दांत तिच्यावर टीका केली होती. मात्र, खमकी मेरिल बधली नाही. त्यानंतर तिनं हा ‘द पोस्ट’ चित्रपट केला. आपल्या चित्रपटांतून नेमकं राजकीय भाष्य करण्यासाठी स्पिलबर्ग प्रसिद्ध आहे. या काळात ‘द पोस्ट’सारखा चित्रपट येणं हे बरंच सूचक आहे. स्पिलबर्गच्या या चित्रपटात अनेक ‘बिटवीन द लाइन्स’ बाबी आहेत. सिनेमा पाहताना त्या जाणवतात. मेरिल आणि टॉम हँक्स यांनीही हा अंत:प्रवाह ओळखून आपापल्या भूमिका केल्यानं हा सिनेमा पाहणं ही एक ‘ट्रीट’ झाली आहे.
मेरिलनं अशी भूमिका प्रथमच घेतलेली नाही. ज्या ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता, त्या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबतही तिची परखड मतं होती. यातली नायिकेची व्यक्तिरेखा फारच खल स्वरूपाची दाखविली आहे आणि प्रत्यक्षात घटस्फोट घेताना व मुलांचा ताबा मिळविताना स्त्रीलाही अनेक वेदना भोगाव्या लागतात, असे तिचे मत होते. पटकथा वाचल्यानंतर तिनं हे आपलं मत दिग्दर्शक रॉबर्ट बेंटनला सांगितलं. त्यानंतर पटकथेत तसे बदल करण्यात आले. तिच्याबरोबर डस्टिन हॉफमन होता. दोन महत्त्वाच्या प्रसंगांत दिग्दर्शकानं मेरिलला तिचे संवाद तिलाच लिहायला सांगितल्यावर हॉफमनला त्याचा राग आला. मात्र, नंतर त्यानंही तिच्या मेहनतीची आणि अभिनयक्षमतेची स्तुतीच केली.
त्यानंतर आलेल्या ‘सोफीज चॉइस’ या चित्रपटातही तिनं जर्मन छळछावणीतून वाचलेल्या पोलिश तरुणीची भूमिका प्रभावीपणे साकारली होती. यातला ‘चॉइस’चा प्रसंग - ज्यात तिला जर्मन अधिकारी तिच्या कुठल्या मुलाला गॅस चेंबरमध्ये पाठवायचं आणि कुठल्या मुलाला निर्वासितांच्या छावणीत पाठवायचं असा प्रश्न विचारतात - साकारताना मेरिलच्या अभिनयाची कसोटी लागली. हा प्रसंग तिने एकाच ‘टेक’मध्ये पूर्ण केला आणि ‘रिटेक’ करण्यास सपशेल नकार दिला होता. या भूमिकेसाठीही तिला ऑस्करनं सन्मानित करण्यात आलं होतं.
ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची ‘आयर्न लेडी’ साकारताना मेरिलनं केलेला परकाया प्रवेश बघण्यासारखा आहे. या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र, मेरिलच्या अभिनयक्षमतेवर कुणीच शंका घेतली नाही. म्हणूनच या भूमिकेसाठी तिला तिसरं ऑस्कर मिळालं. ‘ज्यूली आणि ज्युलिया’मधलं तिचं कामही उल्लेखनीय. खरं तर मेरिलनं अनेक उत्तमोत्तम भूमिका केल्या. त्या सर्वांचाच उल्लेख इथं करणं शक्य नाही. पण या अभिनेत्रीच्या वेगळ्या मुशीचा अंदाज त्यातून नक्कीच येऊ शकतो.
आज ६८ व्या वर्षी सर्वार्थानं परिपक्व झालेल्या, आत्मविश्वासानं झळकत असलेल्या या अभिनेत्रीकडं पाहिलं, की सकारात्मक ऊर्जा मिळते. अमेरिकेतील खऱ्या अर्थानं लोकशाही मूल्यं जपणारा, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारा, विरोधी मतांनाही स्थान देणारा असा समाज आपल्या भारतीय लोकांना सदैव आकर्षित करीत असतो. मेरिल स्ट्रीप ही या समाजाची मूर्तिमंत प्रतीक आहे, असं वाटतं. शिवाय तिच्या कणखर भूमिकांतून तिनं साकारलेली स्त्रीची मोहक रूपं तर जगभरातील स्त्रियांना आकर्षित करणारी अशीच आहेत. त्याही अर्थानं ती गेल्या दोन पिढ्यांची ‘आयर्न लेडी’च आहे.
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ फेब्रुवारी २०१८)
---

1 comment: