22 Feb 2018

बडोदा डायरी २

देखणं, टुमदार शहर
------------------------


ग्रंथदिंडी राजमहालाच्या प्रवेशद्वारावर सुरू होणार असं लिहिलं होतं. हे ठिकाण संमेलनस्थळीच, म्हणजे महाराजा सयाजीराव विद्यापीठाजवळ असेल, अशा समजुतीतून आम्ही रिक्षा करून तिथं गेलो. मात्र, हे ठिकाण म्हणजे महाराजांच्या पॅलेसचं प्रवेशद्वार असं कळल्यावर त्याच रिक्षावाल्याला तिकडं घेऊन जायला सांगितलं. ते प्रवेशद्वार येण्याआधीच उजव्या बाजूला एका मोकळ्या मैदानात गर्दी दिसली. मग तिथंच रिक्षा थांबविली. रस्ता ओलांडून पलीकडं गेलो. पाच वाजून गेले होते. उन्हं उतरत होती. त्या मैदानावर ग्रंथदिंडीसाठी सज्ज अशी अनेक पथकं दिसली. बडोदेकरांचा अफाट उत्साह त्यातून दिसत होता. उंटाच्या गाड्या होत्या, लेझीम पथकं होती, रस्त्याच्या कडेला एक ढोलपथक प्रॅक्टिस करत होतं. 'सयाजीगर्जना' असं त्या पथकाचं नाव होतं. महाराणी चिमणाबाई हायस्कूल ही बडोद्यातील सध्या सुरू असलेली (बहुदा) एकमेव मराठी माध्यमाची शाळा. या शाळेचेच सगळे विद्यार्थी दिंडीत सामील झाले होते. त्यांच्या हाती मराठी भाषेविषयी लिहिलेली वेगवेगळी वचनं होती. वेगवेगळ्या मराठी संस्थांचे फलक घेऊन मंडळी उभी होती. मैदानात तीन-चार टेम्पो उभे होते. त्यात लहान मुलं निरनिराळ्या राष्ट्रपुरुषांचे पोशाख घालून, मस्त सजून बसली होती. मी तेलकरांना त्यांचे फोटो घ्यायला सांगितले. एका मुलाला विचारलं, 'कोण आहेस रे तू?' तर 'संभाजी' असं ऐटीत उत्तर त्यानं दिलं. मग 'अहल्याबाई', 'झाशीची राणी' पण भेटल्या. सगळ्यांचं कौतुक करून मागं फिरलो, तर माझे ('नगर लोकसत्ता'तले) आद्य गुरुजी सतीश कुलकर्णी दिसले. त्यांना बघून फार आनंद झाला. आम्ही खूपच दिवसांनी भेटत होतो. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं संमेलन पाहिलं ते नगरला - १९९७ मध्ये - ते सतीश कुलकर्णींच्या बरोबरच! मग त्यांच्यासोबत गप्पा मारत निघालो. थोड्याच वेळात दिंडी निघाली. ती मैदानातून मुख्य रस्त्यावर येताच मागून येणारी वाहने थांबली. मोठा ट्रॅफिक जॅम झाला. दिंडीचे संयोजक, शहर वाहतूक पोलिस आणि महापालिका यांच्यात शून्य समन्वय असावा, असं वाटून गेलं. स्थानिक नागरिकांना हे काय अचानक रस्त्यावर सुरू झालं, असं वाटत होतं, हे स्पष्ट दिसत होतं. अनेक लोक उलट्या बाजूनं घुसले. दुभाजकाच्या पलीकडच्या बाजूला अशक्य गोंधळ सुरू झाला.
इकडं या बाजूनं दिंडी मात्र आपल्याच मस्तीत छानपैकी निघाली होती. आम्हीही त्या ट्रॅफिकचा विचार न करता, दिंडीसोबत निघालो. ही दिंडी दांडियाबाजार या भागातून जाणार होती. हा सगळा मराठी वस्तीचा भाग, असं नंतर कळलं. दिंडीत अनेक महिला नटून-थटून, भरजरी साड्या, पैठण्या नेसून, नथ वगैरे घालून सहभागी झाल्या होत्या. (किरकोळ अपवाद सोडले, तर बऱ्याच जणी छान दिसत होत्या.) कीर्तन मंडळ होतं, भजनी मंडळे होती. सुमारे ८०-९० वर्षांनी या शहरात मराठीचा उत्सव होत होता. त्यामुळं स्थानिक मराठी नागरिक अत्यंत आनंदात होते. त्यांच्यासाठी जणू दिवाळी अवतरली होती. रस्त्यावर दुतर्फा रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीला हार घातले जात होते. बायका फुगड्या घालत होत्या. मी कुठल्याही साहित्य संमेलनाला गेलो, की सहसा ही दिंडी चुकवत नाही. या दिंडीतच त्या शहराचा, संयोजकांचा आणि एकूणच संमेलनाचा अंदाज येतो. इथला उत्साह अपेक्षेप्रमाणे भरपूर होता. सुमारे १८ लाख वस्तीच्या या शहरात जवळपास पाच लाख मराठी नागरिक राहतात, असं कळलं. हे प्रमाण भरपूरच आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली आठ-दहा शहरं सोडली तर त्यापेक्षा जास्त मराठी लोक बडोद्यात राहतात, हे स्पष्ट आहे. शिवाय बेळगावात मराठी-कन्नड यांत जो कडवटपणा आहे, त्याचा इथं लवलेशही नव्हता. म्हणजे गुजराती मंडळींना मराठीविषयी फार प्रेम नसलं, तरी भांडणही नाही. दोघंही मिळून गुण्या-गोविंदानं राहतात. मुळात बिझनेस करणाऱ्या, तशीच मानसिकता असलेल्या या मंडळींना भाषिक अस्मिता वगैरे प्रकाराशी मुळीच देणं-घेणं नाही. धंदा नीट होतोय की नाही, याकडंच त्यांचं लक्ष असतं. तर ते असो.
ही दिंडी दांडियाबाजार भागात आल्यावर त्या भागाचं मराठीपण लख्ख दिसून आलं. एका ठिकाणी सिद्धिविनायक गणपती मंदिर होतं. अनेक ठिकाणी पाट्या मराठीत होत्या. कुणी एकबोटे ज्वेलर्स म्हणून होते, त्यांची मोठ्ठी शो-रूम होती. शेजारी एक वाडा होता. त्यावर 'भास्कर विठ्ठल यांचा वाडा' असं थेट सदाशिव पेठेतल्या पद्धतीप्रमाणं लिहिलं होतं. पुढं एका कापडाच्या दुकानावर 'श्री आणि मंडळी' असं लिहिलेलं पाहून मला हसू आलं. लगेच फोटो काढून घेतला. सोमवारी शिवजयंती असल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आणि सजावटही बऱ्याच ठिकाणी दिसली. दांडियाबाजारातून ही दिंडी पुढं वडोदरा महापालिकेच्या इमारतीसमोरून गेली. दिंडी उजवीकडं वळताच ही भव्य (बहुतेक ब्रिटिशकालीन) इमारत डोळ्यांत भरली. ती महापालिका असावी, असं माझ्या मनात आलं. पुढं जाऊन पाहताच अंदाज बरोबर आल्याचं कळलंच. मग तिथं फोटो काढले. आता पाय दुखायला लागले होते. दिंडीला मी आणि तेलकर दोघंच आलो होतो. अभिजितला रिक्षानं तिथं यायला सांगितलं होतं. मग तिथंच जरा टेकून बसलो. मागून सतीश कुलकर्णीही आलेच. तेही आमच्याजवळ बसले. दाबकेकाकाही दिसले. सगळी दिंडी पुढं गेल्यावर मग आम्ही सावकाश मागून निघालो. राजमहालाच्या प्रवेशद्वारापाशीच दिंडी संपली होती. पण 'सयाजीगर्जना'वाल्यांनी त्या भव्य प्रवेशद्वारासमोर ढोल-ताशांचा मस्त डाव सुरू केला होता. सोडियम व्हेपरच्या दिव्यांचा पिवळाजर्द लखलखीत प्रकाश, भगवे फेटे आणि पिवळेच कुडते घातलेली मुलं-मुली यामुळं त्या पथकाचं रिंगण असं एकदम पेटलेल्या ज्वाळांसारखं उजळून निघालं होतं. आजूबाजूला गोल गर्दी करून बरेच प्रेक्षक हा डाव पाहत होते. त्यामुळं त्यांनाही जोर येत होता. त्यांचं कडक वादन ऐकून झाल्यावर मग आम्ही निघालो. साडेसात-आठच वाजत होते. म्हणून आम्ही संमेलनस्थळी जाऊन जरा तिथल्या परिस्थितीचा, वातावरणाचा अंदाज घ्यायचं ठरवलं. रिक्षा केली. एक मध्यमवयीन बाई अनेक रिक्षांना हात करत होत्या. पण कुठलीच रिक्षा थांबत नव्हती. आम्ही त्यांच्याजवळ गेलो. त्या विरारहून आल्या होत्या. त्यांची चप्पल तुटली होती, म्हणून दांडियाबाजारात जायला त्यांना रिक्षा हवी होती. पण बहुतेक त्या उलट्या दिशेला जायला कुणी रिक्षावाला तयार नव्हता. शेवटी आम्ही त्यांना आमच्या रिक्षात घेतलं. रिक्षावाल्यानं त्यांना त्यातल्या त्यात जवळच्या एका चौकात सोडलं आणि तिथून जायला सांगितलं. पैसेही घेतले नाहीत. (नंतर या काकू दुसऱ्या दिवशी भोजन मंडपात भेटल्या. तेव्हा कळलं, की त्यांना त्या चौकातून शेवटी चालतच जावं लागलं...) आम्ही पाच मिनिटांत विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात पोचलो. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार' अशी कमान दिसली. संमेलनाची ती एकमेव खूण होती. आम्ही आत चालत गेलो. काहीसा अंधार होता. पण विद्यापीठ परिसरात बरीच चहल-पहल होती. मुलं-मुली इकडं-तिकडं फिरत होते. तेव्हा कळलं, की इथं सध्या 'यूथ फेस्टिव्हल' सुरू आहे. शेजारी एका छोट्या मैदानात लाउडस्पीकर ऐकू येत होता आणि बरीच गर्दी दिसली. म्हणून तिकडं गेलो, तर तिथं गरबा सुरू असलेला दिसला. इथं प्रत्येक समारंभात, सेलिब्रेशन म्हणजे गरबा हवाच! हा 'यूथ फेस्टिव्हल'मधला गरबा आम्ही थोडा वेळ पाहिला आणि निघालो. संमेलनस्थळ चटकन सापडेना. समोरच्या इमारतींच्या मधून एक रस्ता जात होता. तिथून मागे गेलो. मग एक नाल्यावरचा छोटा पूल लागला. तो ओलांडल्यावर पलीकडं कनातींसारखं काही दिसलं. काही लोकांची लगबग दिसू लागली. मग तिथं गेल्यावर संमेलनाचा स्वागत कक्षच दिसला एकदम! शेजारी ते चं. चि. मेहता सभागृहही दिसलं. विद्यापीठाचं जे मोठं मैदान होतं, त्यावरच संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. आम्ही आत गेलो. तेव्हा ही वेगळी रचना लक्षात आली. इथं मुख्य मंडप वगैरे असा काही घातलाच नव्हता. सुंदर हिरवळ होती. त्याच्या टोकाला समोर भव्य व्यासपीठ उभारलं होतं. संगीत रजनी वगैरे कार्यक्रमासाठी असतं, तसं ते फिरत्या लाइट्सचं लोखंडी चौकट असलेलं स्टेज होतं. ते भव्य होतं, यात शंका नाही. समोर मैदानात खुर्च्या मांडल्या होत्या. मैदानाच्या बाजूनं गोलाकार ग्रंथप्रदर्शनाचे गाळे होते. मध्यभागी एक प्रकाशन कम् कविकट्टा होता. याशिवाय एकमेव चहा-कॉफीचा स्टॉलही तिथंच मैदानात मधोमध, पण गेटच्या बाजूला असा होता. प्रकाशक मंडळींची स्टॉल लावण्याची गडबड सुरू होती. आम्हाला तिथं रमेश राठिवडेकर भेटले. नंतर आम्ही चालत त्या मैदानात जिथं खुर्च्या ठेवल्या होत्या, तिथं गेलो. समोर स्टेजच्या सजावटीचं काम चालू होतं. पावणेनऊ-नऊचा सुमार होता. थंडगार वारं सुटलं होतं. अगदी बाजूलाच रेल्वे स्टेशन होतं. त्यामुळं मधेच गाड्यांच्या शिट्ट्या ऐकू येत होत्या.
तिथली हिरवळ एकदम खास होती. मग मी खुर्चीवर सॅक टाकली आणि चपला काढून त्या हिरवळीवर शतपावली करीत फिरू लागलो. आकाशात चांदणं दिसत होतं. एका क्षणी सगळे आवाज बंद झाले... पुण्यातल्या गर्दी-गोंगाटाची सवय झालेल्या मला ती थोडीशी शांतताही भरभरून भोगावीशी वाटली. काही क्षण एकदम ट्रान्समध्ये गेलो. शांतपणे फिरत राहिलो... बडोद्याचा श्वास आत्ता कुठं माझ्या आत आत सामावू लागला होता. आत्ता कुठं या शहराची ओळख झाल्यासारखी वाटू लागली... अचानक नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. मग एकदम वाटलं, वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचं आपलं पुणं असंच होतं. अगदी असंच! वीस लाख लोकसंख्येचं... हिरवळीचं, टुमदार बंगल्यांचं, चिमुकल्या पण स्वच्छ रस्त्यांचं... युनिव्हर्सिटी रोडला दाट झाडी असलेलं आणि विद्यापीठ चौकात कारंजं असलेलं... उशिरापर्यंत सवाई महोत्सव रंगवणारं... रामनवमीला बाळासाहेबांचं गाणं कोतवाल चावडीला पहाटे चारपर्यंत ऐकणारं...
मग वाटलं, आत्ताचं बडोदा तसं आहे. इथले स्वच्छ रस्ते, पण तुलनेनं कमी ट्रॅफिक असलेलं... पण मॉलपासून ते एअरपोर्टपर्यंत सर्व सुविधा असणारं... रात्री उशिरापर्यंत मुलं-मुली गप्पा मारत 'टी-पोस्ट'सारख्या चहाच्या आधुनिक दुकानात बसू शकतील असं वातावरण असलेलं...
हे लक्षात आलं आणि मनाला एकदम 'सुकून' मिळाला... वाटलं, आता बडोद्याचं आणि आपलं नातं जुळलं... उद्यापासून सुरू होणाऱ्या संमेलनासाठी आता मी एकदम सज्ज होऊन बसलो होतो... मैदानावरची ती मंद झुळूक तेच सांगत होती...

(क्रमश:)

---
पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

No comments:

Post a Comment