11 Feb 2018

मटामधील लेख - द्रविड व पृथ्वी शॉ

वीस अधिक एकवीस...
--------------------------- 
भारतानं नुकताच न्यूझीलंडमध्ये झालेला ‘अंडर १९’ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. या विजयाबद्दल सर्वत्र या मुलांचं रास्तपणे कोडकौतुक होतं आहे. मी या मुलांचे बहुतेक सर्व सामने पाहिले. त्यांच्यातला आत्मविश्वास थक्क करणारा होता. त्यांना कुठलीही भीती वाटत नव्हती. अत्यंत व्यावसायिक सफाईनं ते वावरत होते. इंग्रजीत ज्याला ‘क्लिनिकल परफॉर्मन्स’ म्हणतात, तसा पराक्रम या मुलांनी गाजवला. सहज विचार केल्यावर लक्षात आलं, की ही सगळी एकविसाव्या शतकात जन्माला आलेली मुलं. सन २००० किंवा त्यानंतर जन्माला आलेली. (एखादा अपवाद असेल...) पण खऱ्या अर्थानं ही या शतकाची पिढी. अतिशय भाग्यवान पिढी. याचं कारण या पिढीनं जन्माबरोबरच सुबत्ता, समृद्धीच पाहिली आहे. ही मुलं जन्मली तेव्हा भारतात आर्थिक खुलेपणाचं वारं सुरू होऊन दहा वर्षं झाली होती आणि देशानं या बदलाचा एक टप्पा पूर्ण केला होता. महानगरं बदलत चालली होती; मनी-मॉल-मल्टिप्लेक्स-मोबाइल अन् ‘मारुती’ (कार) या ‘म’कारांनी मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात अढळ स्थान मिळवायला सुरुवात केली होती. या काळात जन्मलेल्या मुलांनी लहानपणापासूनच या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. किंबहुना या गोष्टी नसतानाचं जग कसं होतं, हे त्यांना माहिती नाही. राजीव गांधी किंवा इंदिरा गांधी किंवा नरसिंह राव हे त्यांच्या लेखी इतिहासातले नेते आहेत. सुनील गावसकर किंवा कपिल देव हे त्यांच्या दृष्टीनं ‘ज्येष्ठ समालोचक’ आहेत. बाबरी मशिदीचं पतन किंवा मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोट म्हणजे त्यांच्या दृष्टीनं भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी आहेत. भारताने २०११ चा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ही मुलं दहा-अकरा वर्षांची असणार. म्हणजे कपिलच्या संघाने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा सचिन तेंडुलकर होता, त्याच वयाची! सचिननं तेव्हा डोळ्यांत भरून घेतलेलं हे वर्ल्ड कपचं स्वप्न पूर्ण व्हायला पुढे २८ वर्षं जावी लागली. त्या तुलनेत पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मनज्योत कालरा, अनुकूल रॉय वगैरे या मुलांचा आत्मविश्वास पाहिल्यावर वाटतं, आता भारताला यापुढं एवढा दीर्घकाळ प्रतीक्षा कधीच करावी लागणार नाही.
या मुलांच्या यशामागे भिंतीसारखा भक्कम उभा होता तो आपला ‘द वॉल’ - अर्थात - राहुल शरद द्रविड. या मुलांची आक्रमकता, नव्या युगातला वावर, सकारात्मक दृष्टिकोन, विजिगिषु वृत्ती या सगळ्याला जोड मिळाली, ती राहुलसारख्या आधीच्या पिढीतल्या संयमी, अभ्यासू आणि शांत डोक्याच्या खेळाडूची. यातून जे अभेद्य असे मिश्रण तयार झाले, ते फारच सुंदर आणि अजिंक्य असे होते. राहुलची, सचिनची, म्हणजे एका अर्थाने आमची पिढी अत्यंत ‘युनिक’ म्हणता येईल. सत्तर ते ऐंशी या दशकात जन्मलेली ही पिढी विसाव्या शतकाचा शेवट जाणतेपणाने पाहणारी आणि वयाच्या पंचविशीत-तिशीत एकविसाव्या शतकात पदार्पण करणारी अशी होती. या पिढीला अगदी लहानपणी फार काही सुखसुविधा मिळाल्या, अशातला भाग नाही. खाऊन-पिऊन सुखी इतपतच महानगरांमधल्या मुलांची स्थिती होती. मध्यमवर्गीय मुलांच्या आयुष्यात अगदी अभावग्रस्तता नसली, तरी आजूबाजूला ती असल्याचे त्यांना दिसत होते. समाजातल्या सर्व वर्गांविषयी किमान सहानुभूती बाळगण्याचे शिक्षण त्यांना घरातूनच मिळत होते. नेहमी खरे बोलावे, प्रामाणिकपणे कष्ट करावेत, दुसऱ्याचे पैसे-धन-संपत्ती लुटू नये, गरिबांना फसवू नये असे बाळबोध, पण महत्त्वाचे संस्कार सर्वच घरांतून मुलांच्या अंगी झिरपत असत. समाजातील विषमता कायम असली, तरी विखाराचा लवलेश नव्हता. गुण्या-गोविंदाने, सगळ्यांनी एकत्र नांदण्याची पद्धत होती. महानगरांमधल्या चाळ संस्कृतीतून किंवा खेड्यांतील बारा बलुतेदार पद्धतीतून यांचं दर्शन घडत असे. मराठी साहित्य, नाटके, सिनेमे यांतूनही पुढची पुष्कळ वर्षं या संस्कृतीचं उदात्तीकरण केलं गेलं. (या संस्कृतीत असलेले दोषही नंतरच्या पिढीला जाणवले; पण तो वेगळ्या लेखाचा विषय होईल.) मुद्दा असा, की सचिन रमेश तेंडुलकर हा एका मराठीच्या प्राध्यापकाचा-कवीचा मुलगा आणि राहुल शरद द्रविड हा एका वास्तुविशारद प्राध्यापिकेचा आणि जॅम कंपनीत काम करणाऱ्या पित्याचा मुलगा होता. ही पार्श्वभूमी पाहिली, की या दोघांनी मिळविलेले उत्तुंग यश आणि त्यानंतरही त्यांचे जमिनीवर असलेले पाय यामागे असलेली त्यांची मध्यमवर्गीय संस्कारांची जाणीवही लक्षात येते. ‘धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती’ यासारख्या भंपक शिकवणुकीतून मध्यमवर्ग बाहेर येत असल्याचाही हाच काळ होता. कष्टाने पैसे मिळवून भौतिक सुखांनी समृद्ध जीवन जगण्यात पाप नाही, ही जाणीव भारतातल्या मध्यमवर्गाला १९९१ नंतर प्रकर्षाने झाली. आजूबाजूची परिस्थिती अनुकूल होत गेली आणि मध्यमवर्गीयांनी त्याचा रास्तपणे फायदा उठविला. राहुल द्रविडचा भारतीय संघातील प्रवेश १९९६ चा. त्यानंतर त्याची संपूर्ण कारकीर्द आणि देशाची व इथल्या मध्यमवर्गीयांची प्रगती यांचा आलेख एकावर एक ठेवला तर त्या रेषांमध्ये फार फरक येणार नाही.
कितीही भौतिक यश मिळवलं, तरी सचिन वा द्रविड यांचे मध्यमवर्गीय संस्कार चांगल्या अर्थानं कायम राहिले. संपत्तीचा उपभोग अधाशासारखा न घेण्याची ही शिकवण होती. त्यामुळेच या काळात बहुतांश मध्यमवर्गीयांना भरपूर पैसे मिळाले तरी सुखाची वखवख नव्हती. त्यात नारायण मूर्ती किंवा सुधा मूर्ती यांच्यासारख्या आकांक्षी मध्यमवर्गीयांच्या ‘आयकॉन्स’नी तर ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी’ या तुकोबांच्या शिकवणीचा आदर्श पाठच घालून दिला. यश पचविण्याची ताकद या मुलांच्या अंगी आली ती त्यांचे आई-वडील त्यांच्यामागे भक्कमपणे मध्यमवर्गीय बाळबोध संस्कारांची शिदोरी घेऊन उभे राहिल्यानेच! राहुल द्रविड वेगळा ठरतो तो इथे. गेल्या वर्षीही आयती पीएचडी नाकारून, आपण ही पीएचडी अभ्यास करून मिळविण्याला प्राधान्य देऊ, असं राहुल म्हणाला होता. इतर क्रिकेटपटूंसारखा समालोचक होण्याचा किंवा मुख्य क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा हट्ट न धरता, त्यानं हेतुतः १९ वर्षांखालील मुलांचं प्रशिक्षकपद मागून घेतलं. दोन वर्षांपूर्वी बांगलादेशात त्याची मुलं फायनलपर्यंत गेली, पण तिथं हरली. द्रविडनं त्यानंतर दोन वर्षं मान खाली घालून फक्त कठोर मेहनत केली. या मुलांना तयार केलं आणि न्यूझीलंडमध्ये सर्व स्पर्धा होऊनही आपल्या मुलांनी अत्यंत सहजरीत्या ती जिंकून दाखविली. त्यानंतरही राहुल शांत होता. या मुलांना अजून बरीच मजल मारायची आहे, असं तो सांगत होता. द्रविडची ही विरक्त वृत्ती फार महत्त्वाची आहे. तो फार कशात गुंतत नाही. आपलं काम करतो आणि नामानिराळा राहतो.
राहुलची, पर्यायाने ४० ते ५० वयाची आमची पिढी आज देशाच्या कारभारात सर्वत्र महत्त्वाच्या ठिकाणी बसली आहे. जवळपास सगळा देश चालवत आहे. अशा वेळी देशभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तमाम ‘राहुल’नी आज पुढच्या पिढीतल्या तमाम ‘पृथ्वीं’चा हात हातात घेतला पाहिजे. त्यांना जवळ बसवून अगदी लेक्चर नाही, पण अनुभवाचे चार बोल ऐकवले पाहिजेत. बॉलिवूडमध्ये हे थोडं फार होताना दिसतं. करण जोहर, अनुराग कश्यपसारखे दिग्गज आता नव्या दिग्दर्शकांवर, नव्या टॅलेंटवर विश्वास ठेवताना दिसताहेत. बाकी विज्ञान, शिक्षण, शेती ते राजकारण या सर्वच क्षेत्रांत असं घडायला हवं. ‘पिता’ पिढीचा संयम-शहाणपण आणि ‘पुत्र’ पिढीचा आक्रमक आवेश यांच्या संयोगातून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सहज शक्य करून दाखवू शकू.
राहुल आणि पृथ्वी शॉचं अभिनंदन करताना हा आशावाद सगळ्यांनीच मनात बाळगायला काय हरकत आहे?
---
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ फेब्रुवारी २०१८) 
----

No comments:

Post a Comment