29 Apr 2024

चर्चेतील मोहरे

चर्चेतील मोहरे
------------------


१. कंगना रनौट
-----------------

बेधडक ‘क्वीन’
-----------------

 

आपल्या बेधडक-देधडक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रनौट यांना भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचा कंगना यांचा राजकीय कल पाहिला असता, एक ना एक दिवस सत्ताधारी पक्ष त्यांना याची बक्षिसी देणार, हे दिसतच होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या २००८ पासून सक्रिय आहेत. ‘गँगस्टर’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाने त्यांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहातील प्रमुख अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. ‘क्वीन’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे त्यांनी झाशीचे राणीचे चरित्र रूपेरी पडद्यावर आणले. कंगना रनौट यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील यश सहज नव्हते. चित्रपटाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून त्या आल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत चालत असलेल्या घराणेशाहीवर त्यांनी कायमच टीकेचे आसूड ओढले आणि तेथील बड्या धेंडांशी ‘पंगा’ घेतला. अभिनेता हृतिक रोशन याच्याशीही त्यांचे जाहीर वाद झाले. मात्र, कुठल्याही परिणामांची पर्वा न करता कंगना सतत त्यांना जाणवत असलेल्या अन्यायाविरुद्ध बोलत राहिल्या आहेत. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांवर त्या सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्या. आता त्यांनी थेट राजकारणात प्रवेश केला आहे.
कंगना अमरदीप रनौट यांचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भांबला (आता सूरजपूर) या छोट्या गावी एका राजपूत कुटुंबात झाला. मंडी जिल्ह्यात हे गाव आहे. कंगना यांच्या घरात अभिनयाचा वारसा नसला, तरी राजकारणाचा आहे. त्यांचे पणजोबा सर्जूसिंह हे विधानसभेचे सदस्य होते. त्यांचे आजोबा आयएएस अधिकारी होते. त्यांच्या गावी असलेल्या पिढीजात हवेलीत कंगना यांचे बालपण गेले. नंतर चंडीगड येथील डीएव्ही हायस्कूलमध्ये त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्या दिल्लीत आल्या. काही काळ मॉडेलिंग केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. दिल्लीत एका नाट्य संस्थेचे हौशी नाटक करताना कंगना यांनी ऐन वेळी न आलेल्या पुरुष नटाचीही भूमिका स्वत:च्या भूमिकेसोबत केली. त्यांच्या या क्षमतेमुळे प्रेक्षक अवाक झाले. त्याच क्षणी त्यांना आपल्यातील अभिनय क्षमतेची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आणि त्यांनी याच क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचा काळ संघर्षाचा होता. अनेकदा ब्रेड व लोणचे खाऊन कंगना यांनी दिवस काढले. याच काळात स्वाभिमानी स्वभावामुळे वडिलांची आर्थिक मदत नाकारण्याच्या निर्णयामुळे त्यांचे कुटुंबीयांशीही संबंध दुरावले. अखेर बऱ्याच वर्षांनी कंगना हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिर झाल्यानंतर घरच्यांशी पुन्हा संबंध प्रस्थापित झाले.
कंगना यांची राजकीय मते तीव्र आहेत. त्यांनी कायमच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने आक्रमकपणे खिंड लढविली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना कंगना यांनी सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी त्या सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने पूर्वीची एक नोटीस जारी करून कंगना यांच्या घराचे कथित बेकायदेशीर अतिक्रमण पाडले होते. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेच्या विरोधात निकाल दिला होता आणि कंगना यांना भरपाई देण्याचाही आदेश दिला होता.
कंगना यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही विरोधकांनी ‘मंडी’ या शब्दावरून त्यांच्यावर अश्लील व विखारी टीका केली होती. कंगना यांनी त्यांच्या स्वभावाच्या विपरीत असे संयमित उत्तर विरोधकांना दिले होते. आता त्या ही निवडणूक जिंकतात का आणि जिंकल्यावर लोकसभा कशी गाजवतात याची त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

 ----------

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; १८ एप्रिल २०२४)

-------

२. बांसुरी स्वराज

-----------------------------

नव्या ‘स्वराज’
--------------------------

भारतीय जनता पक्षाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. सध्याच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या जागी त्यांना या मतदारसंघातून भाजपच्या पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर झाली. अत्यंत लोकप्रिय आणि विद्वान अशा आईचा वारसा चालविण्याची मोठी जबाबदारी बांसुरी यांच्यावर आली आहे. सुषमा स्वराज यांचे २०१९ मध्ये अकाली निधन झाले, तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार दुसऱ्यांदा केंद्रात सत्तारूढ झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून धडाकेबाज काम करून दाखवले होते. त्यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदापासून ते केंद्रात आरोग्य, माहिती व प्रसारण अशा विविध खात्यांचा अनुभव त्यांना होता. उत्तम वक्त्या म्हणून त्यांचा नावलौकिक होता. बांसुरी यांची आतापर्यंतची कारकीर्द बघता, त्या आपल्या आईचा हा वारसा निश्चितपणे पुढे नेतील, असे वाटते. बांसुरी आता अवघ्या ४० वर्षांच्या आहेत. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या त्या सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात. कायद्याचे शिक्षण घेण्याआधी त्यांनी ब्रिटनमधील वार्विक विद्यापीठातून इंग्लिश साहित्याचीही पदवी घेतली आहे. हरियाणा सरकारच्या अतिरिक्त महाधिवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सन २००७ पासून त्या वकिलीची खासगी प्रॅक्टिसही करतात. गेल्या वर्षी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपच्या कायदा शाखेच्या सहनिमंत्रक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आपल्यावर आईचा मोठा प्रभाव असल्याचे त्या सांगतात. ‘मी गेल्या जन्मी नक्की काही तरी मोठे पुण्य केले असणार, म्हणून या जन्मी सुषमा स्वराज यांच्यासारख्या आईच्या पोटी जन्माला आले,’ असे त्यांचे उद्गार आहेत. सुषमा स्वराज या श्रीकृष्णाच्या निस्सीम उपासक होत्या. त्यांना आपल्या कन्येचे नाव एखाद्या वाद्यावरून ठेवायचे होते. श्रीकृष्णाची बासरी प्रसिद्ध, म्हणून त्यांनी आपल्या कन्येचे नावही ‘बांसुरी’ असे ठेवले.
बांसुरी यांच्याकडे सुषमा स्वराज यांचा राजकीय वारसा आपोआप आला असला, तरी त्यांना स्वत:ला आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची पहिली परीक्षा म्हणजे ही लोकसभा निवडणूक असेल. सुषमा स्वराज यांची लोकप्रियता बांसुरी सध्या अनुभवत आहेतच. मतदारसंघात त्या ज्या ज्या ठिकाणी जातात, तेथे सर्वसामान्य लोक पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करताना दिसतात. त्यांच्या मतदारसंघातील नागरिक बांसुरी यांच्यात सुषमा स्वराज यांना बघत आहेत, हे निश्चित. बांसुरी यांच्याकडे बघितले तरी अनेकांना सुषमा यांचा भास होतो. सध्या प्रचार सभेत बांसुरी ‘सुषमा स्वराज के संस्कारों के साथ हूँ, आजमाके देखो, करके दिखाऊंगी’ असे आवाहन करताना दिसतात.
नवी दिल्ली मतदारसंघ म्हणजे एकदम हाय-प्रोफाइल मतदारसंघ. सुमारे १५ लाख मतदार येथे आहेत. या मतदारसंघात करोलबाग, पटेलनगर, मोतीनगर, दिल्ली कँटोन्मेंट, राजेंद्रनगर, नवी दिल्ली, कस्तुरबानगर, मालवीयनगर, आर. के. पुरम, ग्रेटर कैलाश या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. हा सगळा दिल्लीचा मध्यवर्ती आणि व्हीआयपी भाग आहे. या मतदारसंघाला बांसुरी स्वराज यांच्यासारखी उच्चशिक्षित लोकप्रतिनिधीच हवी, असे येथील अनेक मतदारांचे म्हणणे दिसले. बांसुरी यांचा सामना आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती यांच्याशी आहे. मात्र, सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेची पुण्याई बांसुरी यांच्या मदतीस धावून येईल, असे सध्याचे चित्र आहे.

-------


(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २९ एप्रिल २०२४)

----

No comments:

Post a Comment