28 Mar 2024

अक्षरधारा दिवाळी अंक २३ लेख - भाग १

‘‘हास्यजत्रे’नं आम्हाला जगवलं…’


महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला विनोदाची मोठी परंपरा आहे. मौखिक साहित्य, लोकसंस्कृती, लोककला, मुद्रित साहित्य, चित्रपट, नाटक यांतून विनोदनिर्मितीचे काम अव्याहत सुरू आहे. तमाशा असो, गण-गवळण असो, वग असो, भारूड असो की कथा-कीर्तन असो; विनोदाचे अस्तर सर्वत्र दिसते. थोडक्यात, महाराष्ट्राला विनोद नवीन नाही. लेखकांमध्येही चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांच्यापर्यंत विनोदाची मोठी परंपरा दिसते. कलाकारांमध्येही दामूअण्णा मालवणकरांपासून ते दादा कोंडके ते अशोक सराफ अशी मोठी ‘रेंज’ दिसते. विसावे शतक ओलांडताना महाराष्ट्रात मराठी वाहिन्या सुरू झाल्या आणि तिथेही सुरुवातीपासूनच विनोदी कार्यक्रमांचे पेव फुटले. मात्र, फारच थोडे कार्यक्रम रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवू शकले. ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरुवातीपासून सुरू असलेला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अशा मोजक्या कार्यक्रमांपैकी एक. सध्या महाराष्ट्रात हा कार्यक्रम आणि यातील सर्व कलाकार सर्वांना मनमुराद हसवण्याचं काम मोठ्या निष्ठेनं करत आहेत. अश्लीलता किंवा कमरेखालच्या विनोदाचा आसरा न घेता, केवळ प्रसंगनिष्ठ आणि जोडीला शाब्दिक, कायिक विनोदाच्या साह्याने हा कार्यक्रम रंगत जातो. त्यामुळेच तो अतिशय लोकप्रिय आहे. ‘अक्षरधारा’च्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने ‘हास्यजत्रा’चा हा सर्व प्रवास सर्वांगाने जाणून घ्यावा आणि हा विनोदनिर्मितीचा प्रवास कसा होतो, हे आपल्या वाचकांपर्यंत पोचवावं म्हणून या अंकात ‘हास्यजत्रा’चे कर्ते-करविते दिग्दर्शक सचिन गोस्वामी व लेखक सचिन मोटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सोबत ‘सोनी मराठी’ वाहिनीचे प्रमुख अजय भाळवणकर व सीनियर क्रिएटिव्ह डायरेक्टर अमित फाळके यांच्याशीही गप्पा मारल्या. आणि अर्थात, यातील प्रमुख कलाकार समीर चौघुले यांच्याशीही आम्ही संवाद साधला, यासाठी ‘अक्षरधारा’चे रमेश राठिवडेकर, रसिका राठिवडेकर, शिवानी राठिवडेकर, ‘अक्षरधारा’च्या कार्यकारी संपादक स्नेहा अवसरीकर यांच्यासह ‘सोनी मराठी’च्या मीरा रोड (मुंबई) येथील स्टुडिओत पोचलो. तिथं ‘हास्यजत्रा’च्या पुढील भागांचं चित्रीकरण सुरू झालं होतं. ‘सोनी मराठी’च्या जनसंपर्क विभागाच्या सहकाऱ्यांनी आमचं आगत-स्वागत केलं. शूटिंगमधून वेळ मिळेल तसतसं एकेक कलाकार येऊन मुलाखत देऊन जात होता. या सगळ्यांशी बोलताना ‘हास्यजत्रा’ची निर्मिती कथा उलगडत गेली. नंतर आम्ही प्रत्यक्ष चित्रीकरणाचाही अनुभव घेतला. हे सर्वच कसलेले कलाकार असल्यानं अतिशय व्यावसायिक सफाईनं, पण उत्स्फूर्तपणे काम करत होते. आम्ही गेलो, तेव्हा परीक्षक म्हणून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधव होते. प्रसाद ओक यांची भेट काही होऊ शकली नाही. या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी मात्र भेटली. या सर्वांशी साधलेल्या संवादातून ‘हास्यजत्रे’च्या निर्मितीचं काही-एक सूत्र शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. निर्माते, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागचे तंत्रज्ञ हे सर्वच अतिशय मेहनतीने हा खेळ उभा करतात, हे नक्कीच जाणवलं.

----


‘कॉमेडी इज ए सीरियस बिझनेस’

(सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची मी घेतलेली प्रकट मुलाखत...)

नमस्कार,

अक्षरधाराच्या दिवाळी अंक उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा सोनी मराठीवरील कार्यक्रम गेली पाच वर्षे सुरू आहे. अतोनात लोकप्रिय आहे. महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. जिथे जिथे मराठी मंडळी आहेत तिथे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम बघितला जातो. हास्यजत्रा हे काय प्रकरण आहे? हास्यजत्रा या कार्यक्रमाची निर्मिती कशी झाली? त्यामागे काय काय परिश्रम आहेत? त्यांच्या कल्पना काय आहेत? हा कार्यक्रम एवढा लोकप्रिय का आहे? या कार्यक्रमाची निर्मिती कशी होते? त्यामागच्या पडद्याआडच्या काही घडामोडी या सगळ्यांची एक बित्तंबातमी आपल्या वाचकांना द्यावी, असं आम्ही ठरवलं. त्यासाठी ‘हास्यजत्रा’चे सर्वेसर्वा म्हणता येतील असे लेखक, दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी आम्ही संवाद साधला.

श्रीपाद ब्रह्मे : नमस्कार दोन्ही सचिन सर. मी आधी सचिन मोटे यांना विचारतो की, मुळात ‘सोनी मराठी’कडे तुम्ही कसे आलात? संकल्पनेच्या पातळीवर हा प्रवास कसा सुरू झाला?

सचिन मोटे : ‘सोनी मराठी’वर हा कार्यक्रम करण्याआधी आम्ही दोघांनीही गेली २०-२५ वर्षं विनोद या प्रांतामध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटीज एकत्र केलेल्या आहेत. म्हणजे काही नाटकं केली आहेत. काही चित्रपट केले आहेत आणि काही मालिका एकत्र केल्या आहेत. आमच्या दोघांची ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स' नावाची निर्मिती संस्था आहे‌. सोनी मराठीने ‌‘वेटक्लाउड प्रॉडक्शन'ला सांगितलं, की आपल्याला एक मालिका हवी आहे. आम्ही दोघांनीही याआधी असे काही विनोदी कार्यक्रम केले होते. अमित फाळके आणि अजय भाळवलकर यांची एक कल्पना होती, की आपण एकत्र मिळून एक कॉमेडी शो करू या. मराठी वाहिनीवर कॉमेडीला एक मोठं स्थान असतं. या नव्या वाहिनीची ओळख व्हावी, असा कार्यक्रम असावा, अशी मूळ कल्पना होती. आम्ही मग सुरुवातीला भेटलो आणि भेटल्यावर त्या चर्चेतूनच मग आम्ही हास्यजत्रा हे नाव ठरवलं. मग भाळवलकर सरच म्हणाले, की आपण त्याला ‌‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' असं नाव देऊ या. कारण ती एक मोठी ‌‘अम्ब्रेला' असेल. ‌‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’तून आपण संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहोत. सगळ्या महाराष्ट्रातून विनोद, तिथल्या प्रातिनिधिक भाषा या सगळ्यांना एकत्र आणून आपण काही तरी करू या, अशा विचारातून त्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग या कार्यक्रमाची एकूण मांडणी तयार झाली. सुरुवातीला आम्ही एक स्पर्धा स्वरूपात हा कार्यक्रम केला होता. त्या स्पर्धांच्या सीझनमधूनच आम्हाला कलाकारांचा आजचा जो संच आहे तो हळूहळू गवसत गेला. काही कलाकार आधीपासूनच आमच्या बरोबर होते. काही कलाकार स्पर्धेतून आले. काही कलाकार आधी होते, पण त्या स्पर्धेतून त्यांच्यातील टॅलेंट जास्त जाणवलं आणि त्यातून आजचा हा संच तयार होत गेला. 

श्रीपाद ब्रह्मे : सचिन गोस्वामींना पुढचा प्रश्न विचारतो. हा संच तयार झाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून तुमच्याकडे सगळी मोट बांधायची हे काम आलं असेल. तर त्या पातळीवर तुम्ही काय विचार केला? कारण त्या वेळी महाराष्ट्रात इतर वाहिन्या होत्या. त्या वाहिन्यांवर लोकप्रिय असे विनोदी कार्यक्रम सुरू होते. मग ‘सोनी मराठी’वरील आपला कार्यक्रम वेगळा कसा ठरेल, लोकांनी तो का बघावा यासाठी तुम्ही नक्कीच काही विचार केला असेल. तो काय प्रवास होता? त्या संकल्पनेच्या पातळीतून तुम्ही पुढे कसा नेला तो कार्यक्रम?

सचिन गोस्वामी : एखादा कार्यक्रम जेव्हा यशस्वी होतो तेव्हा तो सामूहिक प्रयत्नातून यशस्वी होतो. कुणा एकट्याच्या विचारावर कधी कार्यक्रम चालत नाही. अशा पद्धतीचे अनेक सामूहिक प्रयोग केल्यानंतर मात्र एक अंदाज यायला लागतो. म्हणजे प्रेक्षक कळणं ही एक भ्रामक कल्पना आहे. पण साधारणत: अंदाज येतो, की या या टप्प्यावर असं असं केलं तर साधारणत: अशी प्रतिक्रिया असते. तर तो अनुभव आमच्या दोघांच्या गाठीशी होता. इतर वाहिन्यांवरील अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही केले होते. त्यात काही चुका केलेल्या होत्या. काही बरे झाले होते. त्या प्रतिक्रियांतून तो अंदाज येत होता. हा कार्यक्रम सुरू होण्याच्या एक वर्ष आधी आमच्याच प्रॉडक्शन हाउसचा अशाच प्रकारचा एक विनोदी कार्यक्रम दुसऱ्या वाहिनीवर सुरू होता आणि तोही खूप लोकप्रिय झाला होता. त्याचे जवळ जवळ ४१३ एपिसोड झाले होते. तोसुद्धा त्या वाहिनीचा मुख्य कार्यक्रम म्हणून पाहिला जात होता. तशा प्रकारचाच एक शो आपण इथे परत करायचा म्हटल्यावर, तुम्हाला तुम्हीच केलेला आराखडा पुन्हा पुसून नवीन आराखडा आखायचा असतो. त्याचे स्वरूप तेच असतं. विनोदीच करायचा आहे; या या अभिनेत्यांना घेऊन त्या मर्यादेतच करायचा आहे; पण मागचे आराखडे पुसले आणि यातले हे कोन वापरायचे नाहीत असं ठरलं तर नवीन आकार आपल्याला आखता येतो. तसं काहीसं इथे झालं. मागच्या कार्यक्रमात आम्ही जे ‌‘स्किट्स' करायचो त्या स्किट्सना संख्येची मर्यादा होती. म्हणजे त्या वेळी तीन जणांनी ते करायचं. आता चार जणांत करतो. त्यातले बरेचसे स्किट्स घडून गेलेल्या गोष्टींवर भाष्य करणारे होते, कॉमेंट बेस्ड होते. वर्षभरानंतर त्याच्यावर पुन्हा पुन्हा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं, की जसा काळ बदलतो तसे विनोदाचे प्रमाण बदलतं, पद्धत बदलते. ज्या वेळी आपण या चॅनेलसाठी पुन्हा काम करतो आहोत, त्या वेळी विनोदाचे सोर्सेस पण खूप वाढले आहेत. इंटरनेट आलं म्हणजे आज प्रत्येकाच्या मोबाइलवर आता विनोद येतो. ‘शुभ सकाळ’ आणि ‘विनोद’ अशी परंपराच आहे आपल्याकडे! त्यामुळे रोज इतका विनोद इतक्या सोर्सेसमधून तुमच्यापर्यंत येतो तर त्या विनोदाच्या पलीकडे एक विनोद साधायचा तर काय करता येईल? त्या वेळी आमच्या असं लक्षात आलं की आपण भूतकाळावर खूप कमेंट करणारे स्किट्स जास्त केले आहेत, तर आता ते टाळायचं. या प्रकारामध्ये आम्ही ठरवलं, की जे आपण करू ते तिथे घडणारं असेल! असं ठरवल्यावर मग घटना जास्त महत्त्वाच्या झाल्या. सिच्युएशनल कॉमेडीच्या अंगानं आमचा विचार सुरू झाला. आता साडेसातशे भाग झाले आहेत. त्यातले ९० टक्के भाग आणि स्किट्स असे आहेत, की ते त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना आहेत. मुळात एखाद्या कार्यक्रमाचं आरेखन करणे म्हणजे त्याची फक्त दिशा ठरवावी लागते. मग दर आठवड्याला तो कार्यक्रम तुम्हाला सांगत जातो की तू आतापर्यंत हे केलंस ना, आता हे केलं पाहिजे. हे हे नीट नाही झालं. हे चांगलं झालं. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, नटांनी सादर केलेले स्किट्स, लेखकांनी, सगळ्यांनी मिळून तयार केलेले स्किट्स ते कागदावर कसे होते, ते रंगमंचावर आल्यावर कसे झाले, त्याच्यावरच्या संकलनाच्या सगळ्या संस्कारांनंतर ते कसे झाले आणि ते टीव्हीवर नऊ वाजता ज्या वेळी आपण घरी पाहतो तेव्हा तिथल्या सगळ्या वातावरणातल्या ध्वनींमध्ये कसं पोहोचतं, याचा एकदा अंदाज आला, की मग तुम्हाला कळतं, की तुम्ही तिथे तुमचं शंभर टक्के योगदान दिलं होतं ते नऊ वाजता फोडणीच्या आवाजात, घरातल्या भांड्यांच्या आवाजात, माणसांच्या ये-जा करण्यात, दारावरची वाजणारी बेल या सगळ्या आवाजांत ते फक्त साठ टक्केच पोहोचतं. मग त्याचा व्हॉल्यूम काय असला पाहिजे, बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, त्याच्यावर आम्ही सतत आमच्या टीमबरोबर चर्चा करीत असतो. कदाचित याचं यश काय आहे, तर आम्ही सगळे नेहमी एका मार्गावर राहण्याचा प्रयत्न करतो. दर वेळेला स्किट संपलं, की सगळी टीम मिळून आम्ही पाच मिनिटे बोलतो. तो काही ब्लेम गेम नसतो. तेथे आम्ही ‌‘हे आज फसलंय, हे थोडं लेन्दी झालंय किंवा आज छान झालंय,’ असं कौतुकसुद्धा शेअर करतात हे लोक. ‘हे अचानक केलेलं मस्त झालंय, ते पूर्वनियोजित केलेलं चांगलं नाही झालं,’ असं प्रत्येक स्किटचं मंथन प्रत्येक वेळी घडत जातं. तसं एकूण प्रयोगाचंसुद्धा आम्ही दर वर्षाला एकदा बसून ठरवतो की हे हे आपण केलंय, हे हे नाही करायचं, हे करायचं. याचं दिग्दर्शन, आरेखन असं आहे, की तुम्हाला सतत वास्तवात राहायचंय आणि प्रत्येक वेळी घडलेल्या गोष्टींचं मूल्यांकन करून पुन्हा पुढे जायचंय. अशी साधारणत: ती आखणी असते. 

सचिन मोटे : सचिन जे म्हणाला ना, त्याचं उदाहरण सांगतो. बोलताना आम्ही पटकन बोलतो की आता घडतंय आणि ॲक्च्युअली एखादा परफॉर्मन्स घडत असतो त्या वेळी तो दोन काळांत असतो. इथे वर्तमानकाळात तिथे चाललेलं असतं. वर्तमानकाळातील ती पात्रं आपल्याला दिसत असतात. आधी काय व्हायचं, तिथे वर्तमानकाळ सुरू असायचा आणि ते दोघे जण भूतकाळाबद्दल बोलत असायचे. तुम्ही आबूराव-बाबूराव घ्या, तुम्ही गण-गवळण बघा किंवा जुने आपले शो - स्टँडअप आठवा. तिथे दोघे येतात आणि मग एक लग्नकार्याला आलेला म्हातारा असतो. त्याला लग्न कार्यालयाचा आयोजक तो वेगवगेळ्या कंडिशन्स सांगत जातो आणि त्यातून एक विनोद तयार होतो. आमच्या इथं परवा असं झालं होतं. मागच्या वेळी त्या नवरदेवाने अक्षता फेकल्या, त्याबरोबर नवऱ्या मुलीच्या का कुणाच्या तरी डोळ्यांत गेल्या; भटजींना त्याचा त्रास झाला वगैरे असं सगळं ते फक्त लिहिलेलं असायचं. आता आम्ही तो समारंभ ॲक्च्युअली करतो. आता खरंच समीर चौघुले रांगेत उभा आहे आणि विशाखा सुभेदारनं साकारलेली एक म्हातारी येऊन त्याच्यातलं खातेय असं सगळं! याचा जास्त आनंद सगळ्यांना मिळायला लागला. आता विनोदी फटकारे, ताशेरे आणि विनोद तिथे घडायला लागला. त्यामुळं त्याचं एक वेगळेपण जाणवायला लागलं. 

सचिन गोस्वामी : आम्ही जे टप्प्याटप्प्यानं करत आलो होतो तेव्हा आम्हाला जाणवलं की चुटकुले सांगणे ते नाटुकलं घडवणे यापर्यंत आम्ही आलो. बारा मिनिटांत ते पंधरा मिनिटांत चुटकुले सांगत सांगत लोकांना हसवणं इथून सुरू झालेला, स्टँडअप कॉमेडीपासून सुरू झालेला हा फॉर्म आता पंधरा मिनिटांची तीन नाटुकली म्हणजे एक भाग असं झालं. टी-२० सारखं समजा! 

सचिन मोटे : याची निकड हळूहळू करताना जाणवत जाते. आधीच्या पेक्षा आपल्याला थोडं तरी पुढे जायचं असतं. त्यातून आम्ही इथपर्यंत आलो. 

सचिन गोस्वामी : याचेही तुम्ही सुरुवातीपासूनचे भाग बघाल तर ते दोन किंवा तीन पात्रांचेच आहेत. पण हळूहळू विषयाला मर्यादा यायला लागते. प्रिमाइस तोच असतो. अशा वेळी तुम्हाला स्वरूप बदलायला लागतं. मग ज्या वेळी कॅरेक्टर वाढतील त्या वेळी वेगवेगळी लोकेशन्स घ्यायला लागतात. गणपती दर्शनासाठी आलेली रांग हा तीन जणांमध्ये टाळला गेलेला विषय असतो. किंवा एखादा जोडीसाठी केलेला विषय विचारात घेतला जात नाही. पण नवरा-बायकोची गणपती दर्शनाला जाण्याची चर्चा, या सर्वांचे निमित्त या सगळ्या चौकटीत तो विषय राहतो. ज्या वेळी आपण एखाद्या समूहाला दूर करायचं ठरवतो तेव्हा तेच नवराबायको गणपती दर्शनाच्या रांगेत आहेत हा एक नवा परिसर मिळतो. आता दोन-तीन कॅरेक्टरची स्किट्स आता आठ, दहा, बारा अशा पात्रांमध्ये यायला लागली आहेत. मग हळूहळू सूचक नेपथ्याला जास्तीत जास्त रिॲलिस्टिक करण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी ते त्या मर्यादेतच असतं, भासमानच असतं. पण तो भास तयार होईल आणि ते खरं वाटेल इतपत ते कॅरेक्टर आम्ही रचायला लागलो. 

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून आता जेव्हा एक अशी चौकट ठरली की आता आपल्याला सिच्युएशनल कॉमेडीकडे जास्तीत जास्त जायचं आहे. नंतर नंतर तो प्रवास दोन कॅरेक्टरकडून अधिक कॅरेक्टरकडे जाऊ लागला. तर मग हे सर्व लेखक मंडळींना हे कितपत आव्हानात्मक होतं? कारण तुम्हाला पूर्वी एका पद्धतीने लिहायची सवय असेल किंवा तशा पद्धतीचे विनोद सहज निर्माण केले जात असतील. पण आता मात्र तुम्हाला एका वेगळ्या प्रतलावर खेळायचंय. तर लेखक म्हणून तुम्ही हे कसं जमवलं?

सचिन मोटे : लेखक म्हणून काम करताना तसं एक टीम आमच्या सोबत होतीच. मी आणि सचिन स्वत: दोघंही एकत्र कॉन्सेप्ट डेव्हलप करीत असू. यात आम्हाला समीर चौघुले सोबत होता. तो स्वत: परफॉर्मर पण आहे आणि लेखक पण आहे. प्रसाद खांडेकरही परफॉर्म करतो आणि लेखक पण आहे. त्यानंतर आम्हाला पहिल्या दोन सीझनमध्येच श्रमेश-प्रथमेश अशी एक रत्नागिरीची मस्त जोडी मिळाली. ते स्वत: उत्तम लेखक आहेत आणि अभिनय करणारे आहेत. आता लेखक आणि अभिनय हे दोन करणाऱ्यांना स्वत:चा परफॉर्मन्स बघत बघत लेखन करण्याची सवय असते. परफॉर्मन्स ओरिएंटेड रायटिंग त्यांच्याकडून आपोआप होत असते. समीर त्याची कॅरेक्टर लिहिताना मी कसं करेन असे करून त्याला एक लिहिण्याची सवय असते. असे लेखक होते. त्याचबरोबर आमच्या फळीमध्ये असे काही लेखक आले, की त्यामध्ये विनायक पुरुषोत्तम म्हणून आमच्या शोचा लेखक आहे तो आमच्या इथे सहायक दिग्दर्शक म्हणून होता. ज्याने सचिनला साहाय्य केलं होतं. त्याला लेखक व्हायचं काही डोक्यात नव्हतं. त्याला हळूहळू धरून लेखक म्हणून आणला. त्याला जरा सुचतं. पहिल्या स्किटपासूनच आमच्या दोघांच्या लक्षात यायला लागलं की हा मध्ये मध्ये छोटे काही तरी विनोद पुरवत/सुचवत असतो. शाब्दिक विनोद त्याला सुचतात. मग तो आला. अमोल पाटील आमच्याबरोबर काम करतो. त्यालाही नर्मविनोद लिहिण्याची चांगली शैली आहे. त्याच्यानंतर हृषिकांत राऊत म्हणून एक लेखक आहे. अभिजित पवार हा एक उत्तम अभिनेता असलेला लेखक आम्हाला जॉइन झाला. महाराष्ट्रात विनोदी लेखनाची एक मोठी परंपरा आहे. तिचा नाही म्हटलं तरी सगळ्यांमध्ये खूप परिणाम असतोच. सचिनने पण मराठी विनोद पूर्वीपासून वाचलेला आहे, बघितलेला आहे. आपण सगळेच जण अगदी शंकर पाटील, द. मा. मिरासदार वाचत; (वसंत) सबनीसांची नाटकं, वेगवेगळी विनोदी नाटकं बघत बघत आपण मोठे झालो. या सगळ्या लेखकांमध्ये तो विनोद होताच. त्यातून आजच्या काही स्टँडअप विनोदवीरांकडे एक जो काही थोडा अपमानाकडे जाणारा विनोद आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. कपिल शर्मा शो अशा कार्यक्रमांतून आलेले ते फ्लेवर्स आहेत. तसा तो आपल्या मातीतलाही विनोद आहे. तर वेगवेगळे लोक इथे विनोदाचा फ्लेवर घेऊन एकत्र आले. त्या सगळ्यांत आम्ही दोघं पहिल्यापासूनच सिच्युएशनल कॉमेडी करणारे. म्हणजे आमची सगळी नाटकं तुम्ही बघितली तर ती प्रसंगनिष्ठ आहेत. त्यामुळे आम्ही सिच्युएशन कॉमेडी करणारे आणि त्याच्यातले हे छोटी छोटी वैशिष्ट्यं असलेली लोक हे सगळे एकत्र आल्यामुळे एक वेगवेगळ्या पद्धतीचा विनोदाचा एक छान गुच्छ तयार झाला. जसा तुम्हाला इथे नटांचा एक चांगला गुच्छ दिसतो ना, तसा तो तिकडे लेखकांचा आहे. अर्थात त्यांच्यातील प्रत्येकाचं छोटं छोटं वैशिष्ट्य आहे. कुणी अजून खुलतंय. कुणी पूर्ण एका पद्धतीचे खुललेलं आहे. आम्ही वेगळ्या, नव्या लेखनाच्या कायम शोधातही असतो. या विविध पद्धतीच्या लेखकांमुळे हे झालं. सगळ्या गोष्टी तयार झाल्या आणि आम्ही वेगवेगळ्या गोष्टी रचत गेलो. त्याच्यात आम्हाला वेगवेगळी कॅरेक्टर्स सापडत गेली. सचिन स्वत: कॅरेक्टर्स खूप छान डेव्हलप करतो. म्हणजे आमचं होतं असं, की आम्ही एक प्रसंग करतो. जो लिहिलेला असतो तो प्रसंग इथे डेव्हलप होतो. तो प्रसंग करताना कलाकारांना काही छान लकबी देतो आणि ते तसं परफॉर्म करतात. त्यातून कदाचित आम्हाला मग लेखक आणि प्लस याने परफॉर्म केलेल्या गोष्टी याच्यातून आम्हाला सीरीज मिळत जातात. उदा. ‘लॉली’चं कॅरेक्टर. नम्रता संभेरावचा परफॉर्मन्स, लेखक आणि शिवाय दिग्दर्शन करताना ज्या गोष्टी घडल्या, त्यातून आम्हाला आणखी पुढच्या शक्यता दिसत गेल्या. समीर चौघुलेंची बरीचशी कॅरेक्टर्स असतील. ‘लोचन मजनू’पासून ते अनेक कॅरेक्टर्स बघत असाल. प्रसाद खांडेकरांची स्लो-मॅनपासून अनेक कॅरेक्टर्स बघितली असतील किंवा पृथ्वीक प्रताप वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोय. सगळे जण आम्ही थोडे गोष्ट सांगणारे असल्यामुळे एक गोष्ट सापडली, की त्या गोष्टीला दुसरा डबा आता कसा जोडता येईल, तिसरा कसा जोडता येईल, त्यातून या सातशे भागांची अख्खी रेल्वे तयार झाली. नाही तर ते तिथेच संपून गेलं असतं. आजही असं होतं, की एखादी गोष्ट करून झाली की वाटतं, याची सीरीज होऊ शकेल. ती गोष्ट पहिल्यांदा करताना आम्हाला माहिती नसते की याची सीरीज होणार आहे म्हणून. ‘लोचन मजनू’ ही तर अगदी अलीकडच्या काही काळात सापडलेली सीरीज आहे. सचिन म्हणाला, की आपण समीर चौघुलेला सतत त्रास देतोय. समीर चौघुले इतरांना त्रास देईल असं काही तरी करू या. त्याच्यातून काय करता येईल? मग निवेदक आणू या. मग तो पहिलाच सहज म्हणून पाचशेवा प्रयोग आम्ही केला. मी म्हटलं की अरे, हा पाचशेवा प्रयोग होऊच द्यायला नको आपण! याचा पाचशेवा प्रयोग होतच नाहीये असं त्यांना आपण प्रत्येक वेळी करत जाऊ या आणि मग त्याच्यातील एक एक गोष्टी मिळत जातात. अशीच आम्हाला शंकऱ्याची एक लव्ह स्टोरी मिळाली आहे. ती तर एक गावातील लव्ह स्टोरी. पूर्वी ‌‘गोष्टी गावाकडच्या' नावाची एक मालिका असायची. त्या मालिकेचा एक, दोन, तीन भाग चालायचा आणि आपल्याला कळायचं किंवा नुक्कडमध्ये दर आठवड्याला काय व्हायचं त्या दोघांमध्ये, तेच इथेही होतंय. फक्त आता दहा-दहा, बारा-बारा मिनिटांच्या सीरीजमध्ये कुठे कुठे विनोद चालू आहे, कुठे कॅरेक्टर्सचा विनोद चालू आहे, कुठे कुठे सिच्युएशनल कॉमेडी असे वेगवेगळे प्रकार एकत्र जोडत जोडत तयार झालेले आहेत.

सचिन गोस्वामी : आपण जे म्हणालात ना, की हे तुम्हाला कुठं असं जाणवायला लागलं की अमुक अमुक. तर ते तसं नाहीये. जसं उत्क्रांतीत आपण शेपूट कुठं जोडलीय हे कुणाला माहीत नाही, तसंच हे आहे. या प्रवासात नेमका भाग बदलला, पण कुठे बदलला याचा स्पष्ट टप्पा नाही. म्हणजे तो दिवस नाही तुम्ही सांगू शकत, तो क्षण नाही सांगू शकत; पण ते जाणवायला लागतं. जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन करत गेला किंवा त्याच्यावर चिंतन करत गेलात तर आपल्याला जाणवतं की हे आता चेंज झालंय. हे नाही वापरायचं. याचा पर्याय काय? ‘लोचन मजनू’ची अजून एक गंमत सांगतो. कधी कधी परिस्थिती तुम्हाला काही गोष्टी क्रिएट करायला लावते. अगदी स्पष्टपणे सांगायचं तर विशाखा ज्या वेळी शोमधून जेव्हा बाहेर गेली, त्यानंतर त्यांचा एक फॉरमॅट होता ‘जाऊ या गप्पांच्या गावा’; त्या फॉरमॅटचं काही तरी समांतर एक स्वरूप यायला हवं होतं. काय होतं की एखादा फॉरमॅट, एखादी कलाकृती त्या त्या नटांच्या इतक्या ‘बॉडी’ने आणि त्या ‘सोल’ने फुललेली असते तिथे रिप्लेसमेंट शक्य नसते. विशाखाची रिप्लेसमेंट आम्हाला शक्य नाही. तिने ती अजरामर केलेली कॅरेक्टर आहेत किंवा समीरचीही रिप्लेसमेंट शक्य नाही. आमच्यापैकी कुणाचीच रिप्लेसमेंट शक्य नाही. अशा वेळी तुम्ही वेगळ्या पद्धतीने लोकांची ती भूक भागवू शकता. आमच्या ६० टक्के स्किटमध्ये समीरला कुणी तरी त्रास देतंय, असा एकच फॉरमॅट होता. त्या वेळी ही कल्पना मग जास्त अधोरेखित झाली. असा एक निवेदक आपण आणायचा पण वेगळ्या फॉरमॅटमध्ये. तो आता सेट झालाय. त्याचं अस्तित्व त्यानं तयार केलंय. चुकूनही तुम्हाला ‘जाऊ या गप्पांच्या गावा’ची रिप्लेसमेंट वाटणार नाही इतकं स्वतंत्रपणे. त्याच्या गरजेप्रमाणे पण असतं कधी कधी. एखादी सीरीज काही अडचणींमुळे जर थांबली असेल तर त्या सीरीजची भूक आपण दुसऱ्या माध्यमातून भागवू शकतो का? ती एक गरज असते व त्याचा तो परिणाम असतो.

श्रीपाद ब्रह्मे : ‘हास्यजत्रा’तील अनेक कलाकारांशी आम्ही बोललो. तुमच्या दोघांच्याबद्दल सगळे खूपच भरभरून बोलत होते. तुम्ही त्यांना कसं घडवलं किंवा तुमच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो, असं ते सांगत होते. तुम्ही जेव्हा दिग्दर्शन करता त्या वेळी या सर्व कलाकारांचं कॅरेक्टर डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये एखादी लकब देणं असो; या सर्वांचं श्रेय  दिग्दर्शक म्हणून तुमच्या एकट्याचंच असतं की सामूहिक विचार-विनिमयातून येतं?

सचिन गोस्वामी : नाही नाही. शेवटी एकत्रच सगळ्या गोष्टी होतात. कसं होतं ना की कुठल्या गावाला जायचं हे एकदा ठरवलेलं असलं, की ड्रायव्हर-कंडक्टरच्या हातात बसचा प्रवास असतो. मग त्याने कुठल्या मॉलला किती वेळ थांबायचं हे तो ठरवतो. गाडीचा वेग काय असला पाहिजे, हे तो ठरवतो. मध्ये कुणाला जर स्टेशन नसतानाही उतरायचे असेल तर उतरू द्यायचे का नाही हेही तो ठरवतो. तसं आम्ही ड्रायव्हर-कंडक्टर आहोत. 

सचिन मोटे : सचिनचे कसे आहे, की तो दिग्दर्शन करताना त्या कलाकाराचेच ॲसेट वापरून त्याला कॅरेक्टर देतो. म्हणजे ओंकार भोजने काय करू शकेल तर त्याला तसं पॅकेज देतो. त्यामुळे ओंकार भोजनेचं काय होतं त्याला जे दिलं गेलेलं असेल त्याला ते सूट होतं. म्हणून मग तो त्याच्यात अजून स्वतःच्या चार गोष्टी पण घालू शकतो. त्याला मॅच न होणारं जर काही त्याला आलं ना, तर कदाचित त्याची धांदल उडेल. पद्धतच आमची बऱ्याचदा अशी असते, की त्याच्या त्याच्या शक्यता बघूनच त्यांना काम दिलं जातं. म्हणून मग तेसुद्धा त्याच्यात इम्प्रोवाइज करतात. कधी कधी असं असतं, की याने दिलेली एक गोष्ट असेल मग त्याच्यात कलाकाराला दुसरी, मग त्या दोन्हींत प्रत्यक्ष करताना आणखी दोन नवीन गोष्टी ॲड होतात. मग लेखक लिहिताना स्वतःकडून अजून एक काही तरी टाकतात. 

सचिन गोस्वामी : एक कॅरेक्टर तयार होतं ना, तेव्हाच त्याच्या काही लकबी तयार होतात. तेव्हा त्या लेखकांसाठी एक आउटलाइन तयार होते. पुढच्या वेळी ते पुन्हा ते बघावं लागत नाही. ती पात्रं ती वैशिष्ट्यं घेऊनच लिहिली जातात. मग कलाकाराची ती ‘प्रॉपर्टी’ झाली, की तो ती जीवापाड जपतो. मुळात ही कलाकारांची क्षमता आहे म्हणूनच आपण त्यांना काही तरी सांगू शकतो. ही कोणाकडूनही करून घेण्यासारखी गोष्ट नाही. दिग्दर्शक म्हणून किंवा लेखक म्हणून आम्ही दोघेही या सगळ्या व्यापांच्या बाहेर आहोत म्हणून तटस्थपणे बघू शकतो. नटांचं काय असते की तो ज्या वेळी रंगमंचावर असतो तो जेव्हा त्या संहितेच्या संस्करणासाठी बसतो, तेव्हा तो त्याचं म्हणून एक विश्व असल्यामुळे तो त्या दृष्टीनेच सगळ्या गोष्टींकडे पाहतो. आमचं तिथे काहीच नसल्यामुळे आम्ही तटस्थपणे त्या सगळ्यांकडे पाहतो. त्यामुळे दिग्दर्शक मग तो मी असो की कोणी असो; त्याला त्याचं सगळे चित्र स्पष्ट दिसत असतं. तो जास्त स्वच्छपणे काम करतो. नट स्वतः दिग्दर्शक असेल तर त्याला तेवढं जमत नाही. कारण तो रंगमंचावर असतो आणि तो त्याच्या पंचेसच्या पलीकडे उरलेलं वाटत असतो. त्याच्या वाटण्याला मर्यादा आहेत. आमच्या वाटण्याला काही मर्यादाच नाहीत; कारण आम्हाला हे सगळं तुमच्यात वाटायचं आहे, हे ठरलेलं असतं. त्यामुळे हे जेवढं आमचं क्रेडिट आहे ना तेवढं नटांचंही आहे. नटांमध्ये ती क्षमता आहे, कमी वेळात दिलेल्या गोष्टी करण्याची, म्हणून तर त्याला ते दिलं जातं. नाही तर ते शक्य नाही.

श्रीपाद ब्रह्मे : लेखक म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की आत्ताचा काळ आज जो आपण बघतो आहोत तो अतिशय संवेदनशील आहे. समाजात थोडीशी असहिष्णुता पण वाढली आहे. थोड्याशा कारणाने अमुक एक नाराज होतात. तमुकांना असं वाटते की हा आमचा अपमान झालाय. अमुक एका समाजघटकाला वाटते की हे आमच्यावर का लिहिले आहे? थोडक्यात म्हणजे वेगळ्या प्रकारची अप्रत्यक्ष दबाव खूप निर्माण होतो. यापूर्वीही टीव्हीवर सादर झालेल्या कार्यक्रमांना अनेकदा रोषाला सामोरे जावे लागले आहे. ते चांगले का वाईट यामध्ये जायला नको, पण आत्ताची परिस्थिती अशी दिसते. त्यामुळे मग लेखक म्हणून तुमच्यावर खूप मर्यादा येतात असे तुम्हाला वाटते का? काही गोष्टी आता आपण करू शकत नाही म्हणून? हे जे कथित दबाव गट आहेत, कदाचित बेकायदा, पण ते प्रभावी आहेत आणि ते तुमच्यावर दबाव आणतात. त्यांना हाताळताना लेखक म्हणून खूप त्रास होतो किंवा मर्यादा येतात असं वाटतं का? कारण विनोदनिर्मितीत असं म्हटलं जातं की कॉमेडी इज अ सीरियस बिझनेस… पण तो करताना आपल्याला एवढ्या साऱ्या गोष्टींना झुंजायला लागतंय असा काही अनुभव तुम्हाला येतोय का?

सचिन मोटे : हे खरंच आहे. केवळ विनोदच नाही, तर सगळ्याच पद्धतीची कला किंवा जनतेशी संबंधित जे प्लॅटफॉर्म आहेत तिथे सगळीकडेच आज हे भान ठेवूनच काम करायला लागतं, की या गोष्टीमुळे कुणी दुखावू नये. या सगळ्याचा परिणाम विनोदावर झालाच आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांमधला बदलत गेलेला विनोद बघताना हे जाणवतं, की यातल्या बऱ्याचशा गोष्टींवर – पूर्वी जे काही समाजातले जे घटक होते ते – मग तो इतिहास असेल, पुराण असेल किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वं असतील किंव सरकारी कामकाज असेल - या सगळ्या गोष्टींवर पूर्वीचे कलाकार जितक्या निर्भीडपणे आणि खेळकरपणे व्यक्त होऊ शकायचे तेवढे आता आम्ही व्यक्त नाही होऊ शकत. आम्हाला खेळकरपणे काही व्यक्तींची नावं घेऊन तर सोडाच; पण सूचकसुद्धा व्यक्त होण्याला मर्यादा येऊ लागल्या आहेत. आम्हाला विनोदी कलाकार, लेखक म्हणून निश्चितच सतत जाणवणारा हा त्रास आहे. दुसरीकडे समाजही भित्रा होत चालला आहे आणि खूप दु:ख नको, असा समाज वाढायला लागला आहे. पूर्वी लोकांना विनोदातून दु:ख चालायचं. विनोदाने एक प्रकारची टोचणी दिलीय, बोचरा विनोद असायचा, विनोद तुम्हाला तसं काही सुनावून गेला, की लोक अंतर्मुख होऊन टाळ्या वाजवायचे, दाद द्यायचे.

श्रीपाद ब्रह्मे : तो विनोद चांगला मानला जायचा…

सचिन मोटे : चांगला मानला जायचा आणि तो चांगला असतोच. आजही चांगलाच आहे. मात्र, लोक आजकाल खूप हळवे व्हायला लागले आहेत. कोव्हिड काळात तर असं झालं, की आता याला चांगलं-वाईट नाही म्हणू शकत आपण; पण कोव्हिड काळातली परिस्थिती अशी होती की, माणसं खूप घाबरली होती. त्यांना असं वाटायचं, की तुम्ही आम्हाला काही वैचारिकही सांगू नका आणि त्रास होईल असंही काही सांगू नका. आता आम्हाला आजूबाजूनेच एवढं घाबरवलं जातं, आजूबाजूनेच एवढा त्रास आहे, की आम्हाला दोन घटका काही तरी हसवा. आम्हाला निखळ करमणूक द्या. ‘हास्यजत्रे’कडून ही डिमांड खूप वाढली. ‘हास्यजत्रे’चं नाव आज आपण पाच वर्षे घेतो, त्याच्यातील कोव्हिडची दोन वर्षे खूप मोठी आहेत. या काळात ‘हास्यजत्रे’नं अनेकांना जगवलं असं लोक आम्हाला सांगतात. याला कारणही हेच आहे की आम्ही निर्विष विनोद देण्याचा प्रयत्न केला. आमचा विनोदही असा असायचा, की तो कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्रासदायक वाटायचा नाही. कुठल्याच धर्माच्या माणसाला असं वाटायचं नाही, की यातून माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. म्हणजे नकळत आम्हाला या कार्यक्रमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही गोष्ट पोषक ठरली; अन्यथा आम्ही जर एका वर्गाला किंवा एका गोष्टीवर जास्त बोलत राहिलो असतो तर आता जितक्या निखळ पद्धतीने आम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता म्हणतो, की आम्हाला तुमचा कार्यक्रम आवडतो. आम्ही तो आवडीने बघतो, तर तसं तो म्हणू शकला नसता, आता कुठल्याही वर्गातला सामान्य माणूस म्हणतो, मग तो गरीब असो, श्रीमंत असो; गुजराती असो बंगाली असो; अशी सगळी माणसं जे म्हणतात ना, याला कारण कदाचित या सगळ्यापासून आम्ही लांब राहिल्याचा परिणाम असेल; पण तरीसुद्धा हे लांब राहणं आम्हाला खूप त्रासदायक वाटतं. कारण त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विनोदी कलाकाराला राजकीय भाष्य करता येणं, विनोदी कलाकाराला सामाजिक भाष्य करता येणं, त्याला एखाद्या व्यक्तिरेखेचं, त्यावरचं काही कॉमिक अर्कचित्र रेखाटता येणं आणि एका वेळी कुठल्याही पातळीवरच्या नेत्यांच्या आपण तशी व्यक्तिरेखा रेखाटू शकायचो. त्याचा मोठा फटका आहे तो आम्हीच नाही तर समाजही भोगतोय. आपण सगळेच भोगतोय. आपण फक्त पुढे पुढे जात असतो म्हणून आपल्याला ते कळत नाही. आपण मागच्या कोणत्या चांगल्या गोष्टी गमावत चाललोय. त्यामुळे तुम्ही जे बोललात ते खरंच आहे. 

सचिन गोस्वामी : हे जे तुम्ही म्हणताय तसं व्यापक दृष्टीनं पाहिलं तर तसं नाहीये. म्हणजे हे जे भावना दुखावताहेत म्हणतोय त्या सरसकट सगळ्या समाजाच्या नाही दुखत. समाजाचे जे ‌‘सो कॉल्ड’ प्रतिनिधी म्हणून जे छोटे छोटे गट तयार झाले त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी त्या भावना दुखावल्या जातात हे लक्षात घेतलं पाहिजे. की एखादा विषय जर एखाद्या वर्गाला तो विनोद त्या वर्गावर टीका करणारा आहे असं कुठला एक गट सांगत असेल तर तो गट फक्त त्याच्या अस्तित्वासाठी त्याचा ‘इश्यू’ करतो. त्या वर्गाला त्या विनोदातून फक्त आनंदच मिळतो, असं मी पाहिलंय. आता सोशल नेटवर्किंगमुळे काय झालंय की सगळे ॲक्सेसेबल आहेत. म्हणजे गोस्वामी जर काही बोलला तर गोस्वामीपर्यंत पोचताच येतंय. सामान्य माणसाला या सगळ्याशी काही देणं-घेणं नाही. विनोदाने इतकं पोषण झालंय महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं किंवा संपूर्ण सामाजाचं, की तो विनोदाला कधीच दूर करीत नाही. विनोद आणि राजकीय भान हा तर त्याच्या जगण्याचा अर्कच आहे. पण काही जे विशिष्ट गट तयार झालेत ते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, अस्तित्वासाठी त्याचा इश्यू करतात. कारण सरसकट समाज रस्त्यावर आलेला तुम्ही कधी पाहिलाय का एका विनोदासाठी? विशिष्ट पाच-पंचवीस लोकच झेंडे घेऊन तुमच्यापर्यंत येतात आणि ते त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी भांडत बसतात. त्यातले काही मग प्रतिक्रिया म्हणून ‘आमचा निषेध’ एवढंच म्हणतात. तर मी असं पाहिलंय की अशा प्रकरणांमध्ये त्याच वर्गातले अनेक जण ‌‘अरे हा साधा विनोद होता रे! याच्यात काही नव्हतं,’ असं म्हणणारे, भांडणारेही मी खूप पाहिलेत या अशा प्रकारच्या वादामुळे! पण यामुळे सरसकट समाजाला आपण दोष नाही देऊ शकत. सरसकट समाजच आता दूषित झालाय असं नाहीये. एका विशिष्ट वर्गाने, समाजाने त्याचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत वाईट रूप आपल्यापुढे मांडलंय. खरं म्हणजे मला वातावरण खूप स्वच्छच दिसतंय.

सचिन मोटे : तू म्हणतोस ते बरोबर आहे. या मुद्द्याशी मी सहमत आहे. त्यांच्या समाजाचे जे नेते आहेत त्यांना हे हवंच आहे, की मी याच्यामुळे दुखावला गेलोय म्हणून. पण दुसरीकडे मला असं वाटतं, आता आपण बघू शकतो, की आता तुम्ही संतासिंग, बंतासिंग असं म्हणू शकत नाही. अख्खा समाज प्रभावित होतो. आता ब्रिटनमध्ये रॉयल डायल नावाचा जो लहान मुलांचा प्रचंड गाजलेला साहित्यिक आहे, त्याच्या पुस्तकांमध्ये आता फेरसंपादन चाललं आहे. त्यातील टक्कल, जाडेपणावरील विनोद आता काढून टाकत आहेत. आज समाज खूप संवेदनशील, भित्रा आणि हळवा व्हायला लागला आहे. का असा व्हायला लागला आहे, कळत नाही. मृत्यूवरचे विनोद म्हटल्यावर माणसं आता रडायला लागतात. त्यांना वाटतं आपलंच कुणी जाणार आहे म्हणून! विनोदात जो एक हेल्दीनेस होता तो कमी कमी होत चाललाय.

श्रीपाद ब्रह्मे : त्याच मुद्द्यावर मी येणार होतो. जो निरोगी समाज आपण म्हणतो की जो विनोद सहज पचवू शकतो, सहन करू शकतो आणि ऐकू शकतो आणि त्याच्यात स्वत: हसणारा समाज हा प्रगल्भ किंवा मोकळा मानला जातो. जसं एके काळी ब्रिटिश समाजाबद्दल बोललं जायचं. आता तिथली परिस्थिती आपल्याला माहीत आहे. त्याला जोडून मला तुम्हाला एक विचारायचंय. एकूण जेव्हा आपण टीव्हीसाठी काही करतो तेव्हा अर्थातच आपल्याला एवढ्या व्यापक प्रेक्षकाच्या बौद्धिक क्षमतेचा एक लसावि काढून विनोद करावा लागतो. आपण एवढ्या मोठ्या टेलिव्हिजनच्या ऑडियन्ससाठी विनोद करतोय तर त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचा विनोद आपण देऊ शकतो लोकांना, असं तुम्हाला कधी वाटतं का?

सचिन गोस्वामी : दोन नाही तर बारा-पंधरा पायऱ्या खाली येऊन विनोद करावा लागतो. हे बघा, कसं आहे की हा इतका मोहक व्यापार आहे की याच्यातली खंत आणि याच्यातून मिळणारा प्रतिसाद याच्यात खंत बाजूला ठेवावी लागते. गणेशोत्सवातील कलावंत घडण्याची जी परंपरा होती आपल्याकडे ती नाटकातनं यायची. गणेशोत्सवात पूर्वी नाटकं सादर व्हायची. राज्य नाट्य, एकांकिका स्पर्धा या त्या पायऱ्या आहेत. त्यतून नाटकाद्वारे सामान्य माणसातल्या कलावंताला जागं करण्याची एक क्षमता होती ती गणेशोत्सवात होती. अनेक कलावंत गणेशोत्सवातून तयार झाले आहेत. आता ते संपलंय. कारण आमच्यासारखे ‘ट्वेंटी-२०’चे उपक्रम करणारी जी मंडळी आहेत त्यांनी ते नासवून टाकलंय. आता नाटकांना कोणी निमंत्रितच करीत नाहीत. आमच्याच चार जोड्या बोलावतात. ते दहा-दहा, पंधरा-पंधरा मिनिटं दोन सोफे टाकून विनोद करतात. असं दीड दोन तास केलं तरी संपून जातं. दोन तास एक पात्र जगणं, एक परिसर दोन तास उभा करणं, एक भासमान दृश्य, त्याचा परिसर आणि त्या घटनाक्रमातून असंख्य प्रेक्षकांना आपल्या बरोबरीने प्रवास करायला लावणं ही जी सगळी प्रक्रिया होती ती सगळी संपली! दहा-पंधरा मिनिटांच्या विनोदात ते सगळं संपवून टाकलंय आपण. आम्ही गंभीर स्किट्स, तर कधी हृदयद्रावक स्किट्सही करतो; पण त्याला कोणी बोलवत नाही. हे सगळं उथळ उथळ होत चाललंय. त्याला कारणीभूत आम्हीसुद्धा आहोत. मान्य केलंच पाहिजे ते, कारण आमचीच वाढ मुळात अशा अत्यंत सुदृढ अशा सांस्कृतिक परंपरेतून झाली. पण दुर्दैवाने आता ती परंपरा खंडित होतेय, त्याला आम्हीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहोत. तुम्ही म्हणाल ‘हास्यजत्रा’तल्या विनोदांचं काय? तर आम्ही सतत म्हणत असतो, की माणसाची भूक मोठी की आपलं देणं मोठं आहे? हे नेमकं उन्हातान्हात, दुर्गम ठिकाणी मोर्चाला वडापावची गाडी मिळण्यासारखा प्रकार आहे. आणि मग दोन वाजता भूक लागली आहे तुम्ही कमी मिठाचा वडापाव दिला तर तो चविष्ट म्हणून खाल्लाच जातो. तशी काहीशी टेलिव्हिजनमधली आमची अवस्था आहे. हा भाग वेगळा आहे, की आम्ही जास्तीत जास्त दर्जा ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात कन्टेंट चांगला असावा याचा प्रयत्न आम्ही करतो. पण एकूण म्हणाल, तर प्रेक्षक वाढणं आणि प्रगल्भ प्रेक्षक निर्माण होणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रगल्भ प्रेक्षक निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रेक्षक संख्या कमी असते आणि प्रेक्षकसंख्या जर मोठ्या प्रमाणात वाढवायची असेल तर तेथे प्रगल्भता ही दुय्यम आहे. सध्या आम्ही त्या फेजमध्ये आहोत. कारण आम्ही मोठा प्रेक्षक तयार करतो ही त्यात जमेची बाजू आणि आनंदाची गोष्ट आहे. पण त्यात प्रगल्भता आहे का? दर्जा आहे का? तर त्याला तुम्हाला दुय्यम ठेवायला लागतं. आणि हे दुष्टचक्र आहेच. हे सगळ्याच कला, साहित्याच्या बाबतीत आहे. तुम्हाला व्यापक वाचक असेल तर लिखाणातील खोली थोडी कमी असते. तुम्हाला कल्पना आहे, की खूप जीवनविषयक गंभीर तत्त्वज्ञान सांगणारी पुस्तकं थोडी जाड असतात, वजनदार असतात आणि कमी विकली जातात, कमी वाचली जातात. जीवनाचं रंजक चित्रण करणारी छोटेखानी पुस्तकं जास्त विकली जातात. हा सगळा परिस्थितीचा भाग आहे. त्याचे त्या रहाटगाड्यातले आम्हीसुद्धा वाटेकरी आहोत.

श्रीपाद ब्रह्मे : हा ॲकॅडमिक प्रश्न होता पण व्यावहारिक यश म्हणाल तर या कार्यक्रमाचं भरपूरच महत्त्व आहे की ते दिसतंय आपल्याला.

सचिन गोस्वामी : मात्र आम्ही मुळीच भ्रमात नाही. आम्ही आता काही तरी दर्जेदार दिलं आहे, अशा भ्रमात आम्ही कधीच राहू शकत नाही. ते ते त्या त्या काळाशी संबंधित ते ते यश आणि ती ती गोष्ट आहे. दहा वर्षांनी अजून बघाल, कदाचित मीच माझे कार्यक्रम बघेन तर मला ते उथळ वाटतील. कारण यापूर्वी मी केलेले कार्यक्रम मला उथळ वाटत होते. कारण आपण पण परिस्थितीनुसार प्रगल्भ होत असू, स्वत:ची वाढ होत असेल तर आपणच केलेलं थोडं थोडं उथळ वाटणं स्वाभाविक आहे. पुढच्या प्रेक्षकांनाही वाटेल. पण आज असं आहे, की उपलब्ध रंजनामध्ये त्यातल्या त्यात बरं रंजन आम्ही देतो.

श्रीपाद ब्रह्मे : कमिटेड किंवा जास्त प्रामाणिक राहून किंवा त्या कलाकारांमधले सगळं चांगलं काढून घेणे, त्यासाठी भरपूर मेहनत घेणं, कमिटेड राहणं हे सगळे चांगले गुण दिसलेच. खरं तर आम्ही जेव्हा कलाकारांशी बोलतो त्या वेळी आम्ही जर एक लसावि काढला असेल तर तो हाच होता की तुम्ही दोघंही इथं आहात म्हणून हे सगळं चाललंय. 

सचिन गोस्वामी : यातला विनोद निर्विष आहे. द्यायचं ते बेस्ट द्यायचं आहे. रथाला कोणी तरी सारथी लागतो. आणि सारथी जागा लागतो. तो झोपायला नको.

श्रीपाद ब्रह्मे : ज्याला ‘कॅप्टन ऑफ द शिप’ म्हणतात. आम्ही प्रत्येकाची वेगवेगळी मुलाखत घेतली आहे. एकत्र नव्हती. प्रत्येकाच्या बोलण्यात हे आलं की हे दोघं आहेत म्हणून आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला त्यांनी चांगली दिशा दिली. आमचं पात्र त्यांनीच विकसित केलं. आमच्यातलं जे काही चांगलं आहे ते त्यांनी काढून घेतलं. मी काय करू शकतो हे त्यांना बरोबर माहिती आहे. मला एक वेळ माहिती नाही; पण त्यांना माहिती आहे इतकं लोकांनी सांगितले ते मला वाटतं तुमच्या दोघांचं निखालस यश आहे आणि त्या कार्यक्रमाचंही तेच यश आहे, असं वाटतं.

सचिन गोस्वामी : या कार्यक्रमाचे मूळ यश जे आहे ते नटांचे आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचा कच्चा माल म्हणजे त्याची गोष्ट आहे. कन्सेप्ट्‌‍स, विविध परिसर सतत मिळणं कारण रचणं हे तर माझ्यासारख्या अजून अनेक लोक आहेत जे करू शकतील; पण सचिन आणि आमची लेखकांची टीम जे काम करते, ते मी आज ठामपणे सांगू शकतो, की असं करणारी टीम माझ्या पाहण्यात नाही आणि कदाचित महाराष्ट्रात पण नाही. इतक्या समर्पित वृत्तीने ही सगळी मंडळी काम करतात. मीसुद्धा त्या ग्रुपमध्ये असतो म्हणजे मी टीमचाच भाग आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, की मी बाजूला असतो म्हणजे मी ‘अप्रूव्हल’ या पातळीवरच काम करतो. एखादा विषय झाला म्हणजे ‌‘याच्यात मजा नाही' एवढंच मला म्हणायचं असतं किंवा हा विषय वर्क होईल किंवा नाही हे सांगायचं असतं. माझं फार मोठं काँट्रिब्यूशन नाही; पण ही लेखक मंडळी काम करतात, त्यांच्यात सचिनचा सगळ्यात मोठा वाटा आहे. हे मला यासाठी सांगावंसं वाटतं, कारण तो एक विशिष्ट पद्धतीचा स्टोरीटेलर आहे. विषय येतात तेव्हा त्याची जी गोष्ट तयार करणे आहे ही फार गमतीची प्रक्रिया आहे. हा एक गोष्ट रेकॉर्ड करून प्रत्येक लेखकाला देतो. त्यातून जे मुद्दे निघतात त्याचं एका संपूर्ण गोष्टीत सचिन रूपांतर करतो. लेखक व कलाकारांमध्ये ही प्रचंड मोठी क्षमता आहे आणि ती क्षमता आमच्याकडं आहे म्हणून आम्हाला कच्चा माल मिळतो आहे. म्हणून आम्ही त्याचे प्रॉडक्ट करू शकतो. नाही तर हे अशक्य आहे. आमची लेखक मंडळी आहेत म्हणून मी निश्चिंत असतो, की उद्या हे काही तरी आणून देतीलच. कच्चं-पक्कं असेल तर ठीक आहे. तिथे आमचं काही रिपीटेटिव्ह होत असेल. आम्हालाही जाणवतं ते! कारण शेवटी मेंदू आहे, परिसर तोच आहे, संचित तेवढंच आहे. मध्ये दीड-दोन महिने चॅनेल आम्हाला सोडतं म्हणून फिरतो आम्ही. चार नवीन माणसं पाहायला मिळतात, पण हे वैशिष्ट्य आहे की या सगळ्या कार्यक्रमाचे सगळ्यांत मोठे यश हे आमच्या लेखकांच्या दीड दिवसाच्या मेहनतीचं आहे. बाकी नटमंडळी, सगळी मंडळी नंतर मेहनत करतोच; पण सगळ्यात मूळ तेच आहे की बीज शुद्ध आहे म्हणून ही फळे रसाळ तयार होतात.

श्रीपाद ब्रह्मे : इथे लेखकांचा अगदीच महत्त्वाचा भाग सांगितलात. कारण लेखक शेवटी शब्दांचे धनी! मीसुद्धा थोडा लेखक असल्यामुळे अगदी सांगूच शकतो, की त्यांच्या यातना काय प्रकारच्या असतात! या लेखक व्यवसायाशी निगडित असं अक्षरधारा हे पुस्तकांचं एक दुकान आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ग्रंथ आणि त्याची विक्री यांचा ते प्रसार करत असतात. त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचंय की विशेषत: सर्व जडणघडणीमध्ये आपले ग्रंथ, वाचनसंस्कृती याविषयी तुमचं म्हणणं काय आहे? या ‘अक्षरधारा’सारख्या संस्थांना हे फार गरजेचे वाटतं, की लोकांपर्यंत पुस्तक पोहोचली पाहिजेत, वाचली पाहिजेत; पण एके काळी माध्यमात तुम्ही पण आत्ता काम करत आहात, त्याचीच खूप मोठी आव्हाने आहेत. त्याच्यापुढे इंटरनेट आहे, मोबाइल आहेत, की जे लोकांना एका शरीराच्या अवयवासारखे चिकटलेले आहेत. मग या परिस्थितीत मग जर मुळात ते वाचलं गेलं नाही तर तुमच्यासारखे लेखक कसे तयार होणार? असे कार्यक्रम तरी पुन्हा कसे येणार? मुळातच ऑडिओ-व्हिडिओ मीडियमलाच शत्रू मानलं जातं तर त्याच्यात लेखक कसे येणार, ही चिंतेची गोष्ट आहे असं तुम्हाला वाटते का? 

सचिन मोटे : चिंतेची गोष्ट आहे, पण काळ जसजसा बदलतो आहे तसं तसं साहित्यसुद्धा त्याचा मार्ग शोधत चाललंय असं मी सध्या बघतोय. आता सध्या ऑडिओ बुक्स पण लोक खूप ऐकायला लागले आहेत. मराठीतल्या खूप चांगल्या चांगल्या कादंबऱ्या लोक बारा बारा तास ऐकायला लागले आहेत. माध्यम बदलत चाललंय.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे ते कन्झ्युम करणं आहे. 

सचिन मोटे : हो ते कन्झ्युम करणं आहेच. मला तर असं वाटतं, की खूप वेगवेगळ्या पद्धतीने पुस्तक पोहोचवण्याचे प्रयत्न तुम्ही करताच आहात, ते जर या माध्यमाला अनुकूल होत चालले तर अधिक उपयुक्त होईल. जर आपण असं केलं की चांगल्या चांगल्या नटांनी आपल्याला आवडलेले उतारे जरी रीलमध्ये ५०-५० सेकंदांचे वाचून दाखवले, या पुस्तकातली ही दहा वाक्यं, तरीही ते चांगलं होईल. शेवटी जिकडे प्रेक्षक जातात तिकडेच कलाकार जातात आणि तिकडेच आपल्यालाही जावं लागणार. आपलं साहित्य असलं तरी त्यांच्या इथं जाऊन ते पोचवणं आपलं काम आहे. जे वृत्तपत्र आपण पूर्वी वाचत होतो त्यातले पत्रकार आता रीलवर दिसायला लागले आहे. ते आता ४० सेकंदांचा रील बनवून आपले विचार पोचवण्याचा प्रयत्न करतात.

श्रीपाद ब्रह्मे : यू-ट्यूबचे चॅनेल काढतात. लेख लिहिण्याऐवजी ते बोलून दाखवतात.

सचिन मोटे : आता वाचनाचे पेशन्स कमी होत चालले आहेत. आज ‘हास्यजत्रा’सुद्धा बारा मिनिटांचे आहे म्हणून बघतात. ४५ मिनिटांचे स्किट केले तर कदाचित विसाव्या मिनिटाला बंद होईल. लोकांचे ‘अटेन्शन स्पॅन’ कमी होत चालला आहे. त्यातूनही एक प्रेक्षकवर्ग आहे, जो आजही वाचक आहे. आज कुठल्याही ग्रंथ प्रदर्शनाला गेलो तर पुस्तक विकत घेणारे खूप लोक असतात. आता काही विशिष्ट पुस्तकं जास्त खपतात, काही खपत नाहीत; पण या ज्या पूर्वीपासूनच्या समस्या आहेत त्या आहेतच. पण आव्हानेही खूप मोठी आहेत. पण मराठी साहित्य यातून कायम पुढे पुढे जात राहिलं आहे. आपल्याला तयारी ठेवायला लागेल. भाषा बदलेल; एक वेगळीच भाषा तयार होईल. या पिढीची भाषा त्यात येईल, पण हे सगळं पुढे जाईल. 

सचिन गोस्वामी : गंमत म्हणजे, मुळातच आपली भारतीय मानसिकता वाचनाची नाहीच आहे. आपण श्रवणाने ज्ञान संपादन करणारे आहोत. कीर्तनातून शिकणारे, ओव्यांतून शिकणारे. वाचनपरंपरा ही पाश्चात्त्यांनी आणलेली आहे. लेखन ही संकल्पना त्यांच्याकडूनच आली. आपल्या रक्तातच आहे की कोणी तरी येऊन मला गोष्ट सांगा. मला वाचायला लावू नका. मला तू सांग ना गोष्ट. म्हणूनच या ऑडिओ बुक्सकडे मुले का वळायला लागली आहेत, कारण त्यांना अक्षराच्या मागे धावायचंच नाही. पूर्वीही आपला समाज कीर्तनाने समृद्ध होतच होता. बहुश्रुत असायचे लोक.

सचिन मोटे : आणि तिथून तो पुन्हा वाचनाकडे जाईल. अर्धा तास ऐकलेलं पुस्तक मी वाचायला घेईन, आता हे मी वाचून बघतो म्हणून. 

श्रीपाद ब्रह्मे : तुम्ही म्हणालात तो मुद्दा अगदी बरोबर आहे. हा फार कमी वेळा मांडला जातो. खरोखर आपला समाज हा जास्त ऐकणारा आहे आणि वाचण्याकडे जायचं म्हणजे तुम्हाला अनेक स्किल्सची गरज असते. सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही साक्षर असला पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि ऐकायला काही बंधन नाही ते तुम्ही तसे कन्झ्युम करू शकता. 

सचिन गोस्वामी : आजी आपल्याला अशी गोष्ट सांगत नाही ना की हा होता श्रावणबाळ. आजी मांडीवर झोपवते आणि ती तिच्या भाषेत श्रावणबाळ सांगते. आमच्यावर संस्कारच ते आहेत.

श्रीपाद ब्रह्मे : म्हणजे आता आपण असे म्हणू शकतो, की वाचनाची संस्कृती वाढण्यासाठी ऐकण्याची संस्कृती वाढली पाहिजे. तिच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आधी तुम्ही हे त्यांना ऐकवा आणि मग ते पुन्हा वाचनाकडे जातील.

सचिन गोस्वामी : अजूनही गाडीने जाताना मी गाणी ऐकण्याऐवजी श्रुतिका ऐकतो ती काही मिनिटं असतील, एक-दीड मिनिटाच्या लव्ह स्टोरीपासून ती काहीही असेल, बडबड चाललेली बरं वाटत असतं ऐकायला ही आपली मानसिकता आहे. 

श्रीपाद ब्रह्मे : वा खूप चांगला संवाद झाला आहे. मला असं वाटतं, की खूप वेळ आपण या दोघांबरोबर बोलू शकतो. पण वेळेची मर्यादा आहे. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांनाही मी धन्यवाद देतो. त्यांनी ‘अक्षरधारा’साठी ‘हास्यजत्रा’च्या निर्मितीची चांगली माहिती आम्हाला दिली... सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

धन्यवाद !

----

भाग २ मध्ये समीर चौघुलेची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

---------------


No comments:

Post a Comment