23 Jul 2017

लिपस्टिक अंडर माय बुरखा - रिव्ह्यू

बाईच्या 'फँटसी'ची फँटॅस्टिक गोष्ट...
------------------------------------------
फँटसी ही गोष्टच अद्भुत... दुसऱ्या दुनियेत नेणारी... त्यात ती बाईची फँटसी असेल तर... आणि त्यातही ती तिच्या लैंगिकतेची फँटसी असेल तर..? या 'फँटसी'ची आपण कल्पनाही कदाचित करू शकणार नाही. पण जिथं कदाचित कल्पनाही पोचू शकत नाही, अशा अज्ञात जागांची सफर करणं हे तर कलाकारांचं काम असतं. त्यातूनच कलाकृती जन्माला येतात आणि आपल्याला विचार करायला भाग पाडतात... 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' ही अशीच एक कलाकृती आहे. वरकरणी 'ब्लॅक' कॉमेडीचा 'बुरखा' (Pun Intended) पांघरलेली, पण आतून खूप काही तरी निराळं सांगणारी ही एक फँटसीची फँटॅस्टिक गोष्ट आहे. दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तवनं ही आगळीवेगळी 'लिपस्टिक' आपल्यासमोर अशा काही तडफेनं सादर केलीय, की बस्स!
माणसाची लैंगिक प्रेरणा ही आदिम गोष्ट... पण आज २०१७ मध्येही आपण त्याविषयी नीट बोलत नाही. आपल्या दांभिक मानसिकतेचा हा क्लासिक नमुना आहे. आपली लैंगिकता किंवा ती भावना ही आपल्या हगण्या-मुतण्याइतकीच नैसर्गिक गोष्ट; पण वर्षानुवर्षं गोपनीयतेच्या बुरख्यात दडवली गेली. त्यातही बाईच्या लैंगिकतेविषयी बोलायचं तर अब्रह्मण्यम! आणि त्यातही तिनं स्वतःच बोलायचं म्हणजे तर अबबच!

SPOILER AHEAD

अशा वेळी मग अलंकृता आपल्याला भोपाळच्या चार बायकांची गोष्ट सांगते. ही गोष्ट आहे या बायकांच्या लैंगिक प्रेरणांची, त्याच्या दमनाची, उद्वेगाची आणि उद्रेकाचीही! यातल्या दोन जणी मुस्लिम आहेत हा योगायोग. पण गोष्टीसाठी महत्त्वाचा... आणि मुस्लिम म्हणून त्या बायकांच्या होणाऱ्या जास्तीच्या कोंडीचं एक वेगळं परिमाण या गोष्टीला लाभतंच. उषा परमार ऊर्फ बुवाजी ऊर्फ 'रोझी' (रत्ना पाठक-शाह), शिरीन (कोंकणा सेनशर्मा), रेहाना (प्लबिता बोरठाकूर) आणि लीला (आहना कुमरा) या चार वेगळ्या वयोगटातल्या, वेगळ्या परिस्थितीतल्या बायका... त्यांच्यातला समान धागा एकच... सध्या त्या जे जगताहेत त्यात त्यांना समाधान नाही.
बुवाजी ५५ वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी त्या (पती निधन झालेलं असल्यानं) एक देवधर्म करणाऱ्या ज्येष्ठ महिला आहेत. असं असलं, तरी बुवाजींच्या आतली (कदाचित कित्येक वर्षं उपाशी राहिलेली) स्त्री अजून जिवंत आहे. ती आतून वेळी-अवेळी धडका देत असते. मग देवधर्माच्या पुस्तकांच्या मध्ये 'त्या' रंगीत कादंबऱ्या वाचून बुवाजी आपल्या इच्छांची अर्धीमुर्धी पूर्ती करीत असतात. अशाच एका कादंबरीची नायिका असते 'रोझी'. बुवाजी 'रोझी' वाचत जातात आणि ही गोष्टच या सिनेमाचंही निवेदन बनते. एकदा काही कारणाने बुवाजींची गाठ एका स्विमिंग ट्रेनर तरुणाशी पडते. त्या तरुणाचा कमावलेला घाटदार देह बुवाजींच्या मनातल्या दबलेल्या भावनांवर अलगद फुंकर घालतो.
रेहाना टिपिकल मुस्लिम घरातली कॉलेजवयीन मुलगी आहे. तिला इंग्लिश गाणी पाठ आहेत आणि स्पर्धेसाठी ऑडिशन द्यायचीय. एरवी सक्तीनं बुरखा वापरावा लागणारी रेहाना कॉलेजमधील 'जीन्स हटाव'विरोधी मोर्चात उत्साहानं सामील होते. तिला हव्या त्या वस्तू मिळविण्यासाठी मॉलमध्ये चोरी करायची सवय लागते. रेहानाचं एका हिंदू मुलावर प्रेम आहे. हा मुलगा तिच्याच मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे.
लीलाचं अर्शद नावाच्या एका मुस्लिम फोटोग्राफरवर प्रेम आहे. पण तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न एका दुसऱ्या तरुणाबरोबर ठरवत आहेत. लीला ब्यूटिशियन आहे आणि तिला या छोट्या शहराचा कंटाळा आलाय. लीलाची कामभावनाही जरा जोरकस आहे.
शिरीन चोरून सेल्सचं काम करते आहे. तिला तीन मुलं आहेत आणि नवरा सौदीतील नोकरी सोडून परत आलाय. शिरीनच्या नवऱ्याचं दुसऱ्या एका बाईसोबत अफेअर चालू आहे. लैंगिक संबंधांबाबत तो इतर सनातनी भारतीय पुरुषांसारखाच आहे. त्याला काही झालं तरी कंडोम वापरायचा नाहीय आणि बायकोचे तीन गर्भपात झाले तरी त्याला फिकीर नाहीय. लैंगिक संबंध ही दोन व्यक्तींचा सहभाग असलेली क्रिया असते आणि त्यात समोरच्या व्यक्तीलाही काही 'से' असू शकतो, ही गोष्ट त्याच्या आकलनापलीकडची आहे. (त्याचे आणि शिरीनचे संबंध पाहताना प्रेक्षक म्हणून आपल्यालाच शिसारी येते, तर शिरीनचं काय होत असेल?) शिरीनला या सगळ्याचा वीट आलाय आणि तिला सेल्स ट्रेनर म्हणून आलेली ऑफर नवऱ्याची पर्वा न करता स्वीकारायची आहे.
या चारही मुली/बायका बुवाजीच्या हवेलीत राहत असतात. जुन्या आणि नव्या भोपाळच्या नेपथ्यावर ही गोष्ट घडताना पाहणं फारच अर्थपूर्ण आहे. तिथल्या जुन्या गल्ल्यांप्रमाणे आपल्या रुढी-परंपरांची वस्ती या बायकांच्या अवतीभवती एखाद्या नागासारखी वेटोळं घालून आहे. नव्या भोपाळमध्ये मॉल आहेत. चकाचक सौंदर्यप्रसाधनं विकली जातायत. बुवाजीला स्विमिंग शिकायला जाताना नवा स्विम सूट घ्यायचा आहे तर या मॉलमध्येच जावं लागतं. तिथल्या सरकत्या जिन्यावरून वर जाताना ती अडखळते. तेव्हा छोट्या मुस्लिम मुलींचा एक घोळका सराइतपणे त्या सरकत्या जिन्यावरून वर जातो आणि त्यातली शेवटची मुलगी नकळतपणे बुवाजीचा हात धरून तिला वर नेते, हा फार सुंदर शॉट यात आहे. बुवाजी नंतर 'रोझी' बनून स्विमिंग ट्रेनर जसपालशी बोलू लागते. नंतर तर हा फोन हीच तिच्या आयुष्यातली मोठी फँटसी बनून जाते. बुवाजी आणि जसपाल फोनवरून शृंगारिक बोलत असतानाचं एक अप्रतिम दृश्य यात आहे. यात रत्ना पाठक शाहनं केलेला अभिनय जबरदस्त. कित्येक वर्षं लैंगिक भूक न भागलेल्या स्त्रीच्या सर्व भावभावना तिनं केवळ चेहऱ्यावरून व्यक्त केल्या आहेत.
कोंकणा सेनशर्माची शिरीनही अशीच जबरदस्त! लीला तिचं वॅक्सिंग करत असतानाचा शॉट व तेव्हाचे दोघींचे संवाद भारी आहेत. पती जवळपास रोज जबरदस्ती करीत असताना, तीन मुलांना वाढवताना, वेगवेगळ्या घरी घुसून वस्तू विकताना शिरीननं 'सेन्स ऑफ ह्यूमर' जपला आहे आणि तो कोंकणानं फार छान दाखवला आहे. ती अभिनेेत्री म्हणून ग्रेट आहेच. पण शिरीन साकारताना कोंकणानं खूपच मोठी मजल मारली आहे, असं म्हणावंंसं वाटतं. ती पहिल्यांदा ज्या बाईच्या घरी घुसते तेव्हाचा प्रसंग, नंतर नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये पाहते तो प्रसंग आणि नंतर त्या बाईच्या घरी जाऊन 'मेरी मूँह की चीज तुम क्यूं इस्तेमाल करोगी?' म्हणतानाचा तिचा अॅटिट्यूड... इतर सगळं काही खल्लास करून टाकते ती!
लीला झालेल्या आहना कुमरानंही तिची तडफड फार प्रभावीपणे दाखविली आहे. काही स्त्रियांचा 'सेक्स ड्राइव्ह' खूपच जास्त असतो. लीला अशांपैकी एक. तिचं प्रेमप्रकरण कुणी समजून घ्यायला तयार नाही, तर ही भावना समजून घेणं दूरच. एरवी संधी मिळेल तिथं तिला 'घेणारा' तिचा मित्रही शेवटी तिच्या या पवित्र्यापुढं वैतागतो. मग होणाऱ्या नवऱ्यासोबत लीलाला ते हवं असताना तो हनीमूनची वाट पाहायला सांगतो, तेव्हा लीलाला त्याला काय सांगावं, हे उमगत नाही.
रेहाना वयानं अद्याप लहान आहे. पण तिला आपल्याला काय आवडतं, काय हवं हे नक्की माहिती आहे. मॉलमधून लिपस्टिकपासून ते शूजपर्यंत अनेक वस्तू चोरून नेताना तिच्या मनातल्या अभिलाषेनं तिच्या सारासार विवेकबुद्धीवर मात केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. रेहानासारख्या अनेक मुली आज मध्यम आकाराच्या शहरांमध्ये अस्वस्थपणे आपल्याला हवा तो आनंद शोधण्यासाठी तडफड करीत आहेत.
या चारही स्त्रिया शेवटी एका मेळ्याच्या निमित्तानं एकत्र येतात. प्रत्येकीच्या गोष्टीचा (बहुतांश लॉजिकल) शेवट होतो. आपण तो शेवट गृहीतच धरलेला असतो. पण आपल्या अपेक्षेपेक्षा या बायका अधिक समजूतदार निघतात. 'रोझी' शेवटी स्वप्नातच भेटणार, हे प्रत्येकीला उमगतं... पण तरीही आपल्या इच्छा मारायच्या नाहीत, आपण स्वप्नं पाहायचं सोडायचं नाही, असा दिलासा त्या एकमेकींना देतात.
अलंकृता श्रीवास्तव हिचा हा पहिलाच सिनेमा. अनेक अडचणींनंतर तो पडदा पाहतो आहे. सिनेमाचं 'मधलं बोट'रूपी लिपस्टिक दाखवणारं पोस्टरही अर्थपूर्ण आहे. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी आणि मुळातच एक व्यक्ती म्हणून स्त्रीच्या भावभावनांविषयी आपण जरा अधिक संवेदनशील झालो, तर या सिनेमाचं सार्थक होईल.
मग एकदम विचार आला, या सिनेमाविषयी आपण विचार करतोय तोही एका पुरुषाच्या अँगलनं... मुळात तिचं तिला ठरवू देत काय ते... हे चूक हे बरोबर हे सांगणारे आपण कोण?
या भावनांचं दमन होतंय, त्या भावनांचा उद्रेक होतोय, तमक्या भावनांना वाट मिळाली पाहिजे... हे सांगणारा मी कोण?
हा विचार मनात आला आणि मी 'ऑफ'च झालो...
----
दर्जा - साडेतीन स्टार
---

5 comments:

 1. श्रीपाद तू खूप छान लिहितोस.

  ReplyDelete
 2. Replies
  1. धन्यवाद. कृपया आपले नाव लिहा...

   Delete
 3. या चारही स्त्रियांची तगमग, या चारही अभिनेत्री फारच ताकदीने दाखवतात. शेवटच्या प्रसंगानं नकळतच डोळ्यांच्या कडा ओलावल्या. दिग्दर्शकाचं कौतुकच.
  तुम्ही लिहिलेलं समीक्षण समर्पक आहे.

  ReplyDelete