हॅट... सॉरी...
---------------
‘एक उगीचच सूडकथा’ असं ‘हेट स्टोरी २’ या नव्या हिंदी चित्रपटाचं एका वाक्यात वर्णन करता येईल. मुंबई आणि गोवा या दोन स्थळांत प्रेक्षकांना अक्षरशः नाचवून त्यांच्यावर उगीचच सूड उगवणारा दिग्दर्शक विशाल पंड्या कथेतही अशा अनेक गोष्टी उगीचच करतो. शेवटी प्रेक्षकांना स्वतःला ‘उगी उगी...’ म्हणत आणि दिग्दर्शकाला ‘हॅट... सॉरी...’ असं म्हणत बाहेर पडावं लागतं. एक मात्र आहे. पहिल्या ‘हेट स्टोरी’पेक्षा हा वाईट होता, की तो याच्यापेक्षा यावर मात्र क्विझ कन्टेस्टच घ्यावी लागेल.
खरं तर पहिल्या ‘हेट स्टोरी’ला काही तरी स्टोरी
तरी होती. या ‘हेट स्टोरी’ला काहीच स्टोरी नाही. त्यामुळं यात सगळं उगीचच
आहे. उदा. या सिनेमाचा खलनायक मंदार म्हात्रे (सुशांतसिंग) हा एक टिपिकल
राजकारणी आहे. सोनिका प्रसाद (सुरवीन चावला) ही त्याची ‘कीप’ असते. ती तशी
का असते, याला काही उत्तर नाही. असते आपली उगीचच! हा मंदार म्हात्रे
मुंबईतला बडा राजकारणी दाखवला आहे. मात्र, तो बहुतेक वेळा गोव्यातच असतो.
सोनिका गोव्याची असते. मंदारची तिच्यावर विलक्षण दहशत असते. पण तरी ती
फोटोग्राफीचा कोर्स करायला मुंबईला जाते. का? उगीचच! तिथंच तिला नायक अक्षय
बेदी (जय भानुशाली) भेटतो. का? आता विचारायचं नाही. तर बिचारी नायिका
नायकाला ओरडून सांगते, की मी अशी अशी आहे म्हणून. तर महात्माच जणू असलेला
नायक खांदे झटकत म्हणतो, बस एवढीशी गोष्ट. रखेलच आहेस ना तू कुणाची तरी!
मला वाटलं, की काही तरी सीरियस सांगतेयस म्हणून... धन्य तो नायक, धन्य ती
नायिका आणि अतिधन्य तो दिग्दर्शक... मग पुढं काय होणार हे सांगायची गरज आहे
का? नायक महाराज हकनाक मरतात आणि गाडीसह धरणाच्या तळाशी जातात. नायिकेला
मंदार शवपेटीत बांधून ग्रेव्हयार्डमध्ये पुरून टाकतो. संपला खेळ. पण छे!
आत्ता कुठं खेळ सुरू झालेला असतो... उत्तरार्धात नायिकेची सूडकथा सुरू
झाल्यावर खेळ थोडा रंजक बनतोही. नक्कीच! पण मंदारच्या एकेका साथीदाराला
यमसदनी पाठवताना नायिका वापरत असलेल्या युक्त्यांमध्येही फार काही नावीन्य
नसल्यानं शेवट काय होणार हे कळून चुकतं. नाही म्हणायला मंदारच्या काकाला
मारायच्या वेळी एक ट्विस्ट येतो आणि तो नायिकेवरच उलटतो हेही चांगलं जमलंय.
मात्र, नंतर मंदार नायिकेला किती घाबरतो हे दाखवण्यात दहा मिनिटं गेल्यानं
आणि नायिकेचा प्रियकर सारखा (पांढुरक्या पार्श्वभूमीतून) प्रकट होऊन
नायिकेसोबत गाणं वगैरे म्हणत बसल्यानं शेवटाबद्दलची उत्सुकता पार नाहीशी
होते. शेवटी एकदाची नायिका मंदारला मारते आणि खेळ संपतो...
‘हेट स्टोरी’सारख्या सिनेमाला चांगल्या मजबूत
कथेची आणि पटकथेची गरज होती. इथं कथेनंच मार खाल्ला आहे. पटकथाही
संकलनाच्या वेड्यावाकड्या प्रयोगांत पार भरकटत गेली आहे. गोष्ट मुंबईत
घडतेय की गोव्यात या कोड्यानं प्रेक्षक इतका गोंधळून जातो, की नंतर नंतर
त्याचा विचारच करायचं सोडतो. अख्ख्या सिनेमात एकदा फक्त गोवा अशी पाटी
येते. बाकी सर्व मामला दिग्दर्शकानं आणि संकलकानं आपल्या सोयीनुसार घेतला
आहे. गोष्ट इतक्या वेळा फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि परत आत्ताच्या काळात येते,
की त्याचं व्यवधान सांभाळण्यातच प्रेक्षक बेजार होऊन जातो. नायिकेसोबत
आपणही (दिग्दर्शकाबाबत) सूडाच्या विचारानं पेटून उठतो, हे या चित्रपटाच्या
संकलनाचं मोठंच यश मानलं पाहिजे. माधुरी बॅनर्जी यांच्या पटकथेतही अनेक
कच्चे दुवे राहिले आहेत. सोनिकाची आजी गोव्यात असते की मुंबईत? ती एकाच
प्रसंगात दर्शन देऊन जाते. सगळं काही उगाचच आहे. अतुल म्हात्रे या
खलनायकाच्या भावाचा किंचित ट्विस्ट सोडला, तर बाकी कशाचीच तर्कसंगती लागत
नाही. गोव्यातल्या इन्स्पेक्टर वर्गीसचं पात्रही असंच सोयिस्कर वापरलं आहे.
तोही घटकेत गोव्यात, तर घटकेत मुंबईत हजेरी लावून जातो. सिनेमाच्या
सुरुवातीलाच येणारा ग्रेव्हयार्डचा आणि नंतर हॉस्पिटलमधून नायिका पळून जाते
तो, हे दोन्ही प्रसंग इतके अतर्क्य झाले आहेत, की त्यावरच आधारित पुढचा
सगळा डोलारा अविश्वसनीय वाटू लागतो. नायिकेच्या सूडाबद्दल प्रेक्षकाला
सहानुभूती वाटायला हवी. इथं नायिकेपेक्षा मंदार म्हात्रेच्या बायकोबद्दल
जास्त सहानुभूती वाटते, याला काय म्हणावं?
सिनेमातले संवाद मात्र खटकेबाज आहेत. विशेषतः
खलनायकाच्या तोंडी असलेले ‘बाबा कहते थे...’ या प्रस्तावनेनं सुरू होणारे
काही वनलायनर भारी आहेत. (ते अॅडल्ट असल्यानं इथं सांगता येत नाहीत...)
अभिनयात सर्वांत भाव खाऊन जातो तो खलनायक मंदार म्हात्रे साकारणारा
सुशांतसिंग. बऱ्याच दिवसांनी त्याला तोलामोलाची भूमिका मिळाली आहे आणि
त्यानं ती झकास केली आहे. नायिका सुरवीन चावला हिनंही चांगलं काम केलं आहे.
मात्र, तिची संवादफेक आणि बहुतांश वेळा झोपाळलेला दिसणारा चेहरा या
नकारात्मक बाजू आहेत. (बाकी या सिनेमात तिला मुख्य काम जे करायचं होतं, ते
तिनं व्यवस्थितच केलं आहे.) तरी पहिल्या ‘हेट स्टोरी’च्या तुलनेत यात ‘तशी’
दृश्यं कमीच आहेत. (की आता आपली नजर सरावलीय, कोण जाणे.) जय भानुशालीनंही
चांगलं काम केलंय. पण त्याला फार वाव नाही. आपला शशांक शेंडे काकाच्या
भूमिकेत दमदार हजेरी लावून जातो. सिनेमाचं संगीत चांगलंय. विशेषतः ‘आज फिर
तुम पे प्यार आया है’ हे ‘दयावान’मधलं गाणं रिमेक म्हणून वापरलं आहे आणि
त्यानं चांगलीच हवा केलीय. (त्याचं पिक्चरायझेशनही गरजूंची अपेक्षापूर्ती
करणारं असंच आहे.) सनीताई लिऑन यांचं ‘पिंक लिप्स’ हे आयटेम साँग म्हणजे
आइसिंग ऑन द केक! तेव्हा एकदा पाहायला हरकत नाही. अगदी नंतर हॅट आणि सॉरी
म्हणायचं असलं तरी!
--
निर्माते : भूषणकुमार, विक्रम भट्ट
दिग्दर्शक : विशाल पंड्या
पटकथा : माधुरी बॅनर्जी
प्रमुख भूमिका : सुरवीन चावला, जय भानुशाली, सुशांतसिंग, शशांक शेंडे इ.
कालावधी : दोन तास नऊ मिनिटे
दर्जा : ** १/२
---
-----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment