3 Dec 2017

देव आनंद व त्याच्या नायिका - मोहनगरी लेख


देवच्या 'देवियाँ'
--------------

देव आनंद हा भारतीय चित्रपटसृष्टीतला एक उमदा, देखणा नायक. कृष्णधवल सिनेमाच्या जमान्यात या पंजाबी युवकाच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वावर अनेक तरुणी मोहित झाल्या होत्या. दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद या तिघांनीही पन्नास-साठच्या दशकात चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. तिघांच्याही तीन तऱ्हा होत्या. मात्र, दिसण्यात देव इतर दोघांपेक्षा सरस होता. त्याचा तो केसांचा कोंबडा, गालावर पडणारी खळी, स्मितहास्य केल्यावर दिसणारा तो एक तुटका दात आणि तिरकं तिरकं वाकत, घाईघाईत बोलण्याची स्टाइल हे सगळं त्याला नायक म्हणून प्रस्थापित करणारं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीत पंजाबी रांगड्या नायकांनी कायमच राज्य केलं. देव पंजाबी होता, पावणेसहा फूट उंच होता, पण धिप्पाड वगैरे नव्हता. उलट त्याच्या रूपात काहीसा नाजूकपणाचा अंश होता. बायकांना तो नक्कीच अपील होणारा होता. 
अशा या देखण्या पुरुषाच्या आयुष्यात रूपेरी पडद्यावर आणि प्रत्यक्ष जीवनातही अनेक स्त्रिया याव्यात, यात नवल नव्हतं. गंधर्वलोकीचे यक्ष चिरतारुण्याचं वरदान लेऊन असतात. देव हा भूलोकीच्या गंधर्वनगरीचा यक्षच होता. वयानं वाढला तरी तो मनानं कधी पंचविशीच्या पुढं गेलाच नाही. कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यानं काढलेल्या सिनेमांचं, त्याच्या दिग्दर्शनाचं, नव्या तरुणींसोबत नायिका म्हणून काम करण्याच्या वेडाचं भरपूर हसं झालं. अनेकदा त्याची खिल्ली उडविण्यात आली. मात्र, देव आनंद या माणसानं आयुष्यभर सभ्य पुरुषाची 'डिग्निटी' सांभाळली. तो जंटलमन होता. वाह्यात गोष्टी त्यानं आयुष्यात फार केल्या नाहीत. जे काही केलं, ते मनस्वीपणे केलं. त्याला आवडलं, पटलं, म्हणून केलं. ब्रिटिशकालीन जमान्यात इंग्रजी साहित्य घेऊन लाहोरमध्ये बी. ए. पदवी मिळविणारा देव आनंद आलतूफालतू माणूस कधीच नव्हता. स्वतःला पेश करण्याची त्याची अशी खास आदब होती, विशिष्ट मर्यादेच्या खाली त्यानं स्वतःला कधी येऊ दिलं नाही. उतारवयातही स्वतःला उत्तमरीत्या तो प्रेझेंट करीत असे. बहुसंख्य बायकांना आवडणारेच हे सगळे गुण होते. त्यामुळं बायका त्याच्या रूपावर, त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कायम फिदा असत.

सुरैया नावाचं अधुरं स्वप्न...

देवच्या आयुष्यात आलेली पहिली गाजलेली, मोठी स्त्री म्हणजे अभिनेत्री सुरैया. 'मलिका-ए-तरन्नुम' (मेलडी क्वीन) म्हणून ओळखली जाणारी सुरैया जमाल शेख ही तेव्हाची बडी आणि प्रस्थापित अभिनेत्री होती. देव नवखा होता. त्यामुळं तिच्यासोबत नायक म्हणून काम करायला त्यानं आनंदानं होकार दिला. विद्या (१९४८), जीत (१९४९), शायर (१९४९), अफसर (१९५०), निली (१९५०), सनम (१९५१) आणि दो सितारे (१९५१) या चित्रपटांत या जोडीनं सोबत काम केलं. हे सर्व चित्रपट तेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. सुरैया बडी अभिनेत्री असल्यानं या सर्व सिनेमांत तिचं नाव श्रेयनामावलीत आधी झळकत असे. या जोडीची प्रेमकथाही तशी फिल्मी ढंगातच सुरू झाली. विद्या चित्रपटातील 'किनारे किनारे तले जाएंगे' या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी हे दोघे ज्या बोटीत बसले होते, ती बोट पाण्यात उलटली. तेव्हा देवनं सुरैयाला पाण्याबाहेर काढलं. या प्रसंगानंतर ती स्वाभाविकच देवच्या प्रेमात पडली. (तेव्हा ती २० वर्षांची, तर देव २६ वर्षांचा होता.) या प्रसंगापूर्वी देव आनंद सुरैयाच्या घरी रीतसर जात-येत असे. मात्र, ते दोघे प्रेमात पडले आहेत आणि लग्नही करायचा त्यांचा विचार आहे, हे कळल्यावर सुरैयाच्या घरच्यांनी, विशेषतः तिच्या आजीनं (आईची आई) देववर लक्ष ठेवायला सुरुवात केली. देव आणि सुरैयाची प्रेमकहाणी दृष्ट लागावी अशीच सुरू होती. ते दोघं एकमेकांना पत्रं लिहीत. प्रेमसंदेश पाठवीत. त्याच्या सहकलाकारांनाही हे माहिती होतं. दुर्गा खोटे, कामिनी कौशल या दोघी तर त्यांची पत्रंही एकमेकांना पोचवत असत म्हणे. 'जीत' चित्रपटाच्या सेटवर अखेर देवनं सुरैयाला प्रपोज केलं आणि तेव्हाच्या तीन हजार रुपयांची हिऱ्याची अंगठी तिला भेट म्हणून दिली. या घटनेनंतर मात्र सुरैयाच्या आजीनं या लग्नाला कडाडून विरोध केला आणि हे लग्न होणार नाही, असं सांगितलं. कारण सुरैया होती मुस्लिम आणि देव हिंदू... प्रेमात पडलेल्या या दोन जीवांना आपल्या वेगळ्या धर्मांची जाणीवच नव्हती. आपलं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे, एवढंच त्यांना ठाऊक होतं. मात्र, देवची पहिलीवहिली प्रेमकहाणी अशा रीतीनं दुर्दैवानं संपुष्टात आली. एकदाच भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून देव रडला आणि नंतर त्यानं सुरैयाबरोबरचं नातं भूतकाळाच्या पेटीत बंद करून टाकलं. सुरैया मात्र मरपर्यंत (२००४) अविवाहित राहिली. लग्न मोडल्यानंतर सुरैयाच्या घरच्यांनी तिला देवसोबत काम करण्यासही मनाई केली आणि 'दो सितारे' हा या जोडीचा शेवटचा चित्रपट ठरला.

सहधर्मचारिणी : कल्पना कार्तिक

कल्पना कार्तिक म्हणजेच पूर्वाश्रमीची मोनासिंग. तिला रूपेरी पडद्यावर आणताना कल्पना कार्तिक हे नाव देवनंच दिलं. सुरैयाबरोबरचं प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यानंतर देवनं काही काळानंतर सावरून स्वतःच्या करिअरकडं लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरैयासोबतचे चित्रपट यशस्वी झाले असले, तरी त्याचं श्रेय सुरैयालाच मिळालं होतं. देवला नायक म्हणून चांगला मोठा रोल अजूनही मिळत नव्हता. अशोककुमार यांनी मग 'जिद्दी'मध्ये (१९४८) देवला चांगला ब्रेक दिला. यात त्याची नायिका होती कामिनी कौशल. (याच चित्रपटापासून देव आणि किशोरकुमारची मैत्री सुरू झाली.) 'जिद्दी'च्या यशानंतर देवनं स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू करायचं ठरवलं आणि 'नवकेतन'चा जन्म झाला. देवचा मित्र गुरुदत्त याला ठरल्याप्रमाणे त्यानं दिग्दर्शनाची संधी दिली आणि 'बाजी'चं काम सुरू झालं. यात गीताबालीसोबत आणखी एक नायिका हवी होती आणि कल्पना कार्तिकला ती संधी मिळाली. हा क्राइम थ्रिलर हिट झाल्यामुळं देव आणि कल्पना कार्तिकच्या जोडीला मागणी वाढली. त्यांनी बहुतेक चित्रपट स्वीकारले. हे सगळे चित्रपट, म्हणजे आंधियाँ (१९५२), टॅक्सी ड्रायव्हर (१९५४), हाउस नं. ४४ (१९५५) आणि नौ दो ग्यारह (१९५७) बॉक्स ऑफिसवरही चांगलेच चालले. यातल्या 'टॅक्सी ड्रायव्हर'च्या सेटवर देव कल्पना कार्तिकच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. 'टॅक्सी ड्रायव्हर' यशस्वी होताच दोघांनीही साध्या समारंभात लग्न केलं. लग्नानंतर दोन वर्षांनी (१९५६) देवच्या मुलाचा, सुनील आनंदचा जन्म झाला. नंतर या जोडप्याला देविना ही आणखी एक मुलगी झाली. 'नौ दो ग्यारह'नंतर कल्पना कार्तिकनं चित्रपट संन्यास घेतला आणि पुन्हा कधीही काम केलं नाही.  फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेली मोनासिंग ही तशी सामान्य वकुबाची अभिनेत्री होती. खरं तर तिचे वडील गेल्यामुळं तिला सिनेमात काम करावं लागलं. त्यात तिला अजिबातच आनंद नव्हता. त्यामुळं देवशी लग्न होताच तिनं आनंदानं काम करणं सोडलं आणि त्याचा संसार सांभाळण्यातच धन्यता मानली. 

वहिदा... तेरे मेरे सपने अब एक रंग है!

देव आनंद आणि वहिदा रेहमान यांची जोडी चांगलीच जमली आणि गाजलीही. वास्तविक वहिदा ही गुरुदत्तची 'फाइंड' आणि त्याच्या कॅम्पमधली. तिचं आणि गुरूचं प्रेमप्रकरण तेव्हा फार गाजलं आणि अयशस्वीही ठरलं. मात्र, गुरुदत्त आणि देव एकमेकांचे चांगले मित्र होते. त्यामुळं वहिदानं देवसोबत काम करायला गुरूची कधीच हरकत नसायची. खरं तर वहिदाचा पहिला चित्रपट सीआयडी (१९५६) यात देवच तिचा नायक होता. या दोघांनी पुढं सोलहवाँ साल (१९५८), काला बाजार (१९६०), बात एक रात की (१९६२) आदी चित्रपटांत काम केलं आणि हे सर्व चित्रपट यशस्वी ठरले. मात्र, दोघांच्याही करिअरमधला अत्यंत महत्त्वपूर्ण चित्रपट होता - गाइड (१९६५). 'गाइड' चित्रपटात देव आणि वहिदाची जुळलेली केमिस्ट्री अद्भुत अशीच आहे. या चित्रपटांतील गाणी तर प्रचंड हिट झाली. या चित्रपटात काम करायला वहिदा आधी तयार नव्हती. याचं कारण 'गाइड'चं दिग्दर्शन राज खोसला करणार होता. वहिदाचं आणि राज खोसलाचं गुरुदत्त कॅम्पमध्ये भांडण झालेलं असल्यामुळं ती राजच्या दिग्दर्शनाखाली काम करण्यास मुळीच तयार नव्हती. देव आनंद वहिदाला या सिनेमात काम करण्यासाठी खूप आग्रह करीत होता. तेव्हा वहिदानं राजऐवजी चेतन आनंद दिग्दर्शन करणार असेल, तर मी काम करीन, अशी अट घातली. गंमत म्हणजे चेतन आनंद दिग्दर्शन करायला तयार झाला, पण त्यानं वहिदाच्या नावावर फुली मारली. त्याला प्रिया राजवंशला घ्यायचं होतं. (त्या दोघांचं प्रेमप्रकरण तेव्हा जोरात चालू होतं.) देवला अर्थातच प्रिया राजवंशचं नाव मंजूर नव्हतं, कारण या भूमिकेसाठी चांगलं नृत्य करता येणं ही पूर्वअट होती आणि प्रियाला नाचता येत नव्हतं. अखेर विजय आनंदकडं दिग्दर्शनाची सूत्रं गेली आणि वहिदा अखेर या चित्रपटात आली. पुढं 'गाइड'नं काय इतिहास घडवला, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पुढं 'नवकेतन'च्या 'रूप की रानी चोरों का राजा' (१९६१) आणि 'प्रेमपुजारी' (१९७०) या चित्रपटांतूनही वहिदा झळकली. मात्र, गुरुदत्तबरोबर झालेल्या प्रेमभंगानंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर वहिदा शशी रेखीसोबत लग्न करून बंगळूरला गेली आणि तिचा व देवचा संपर्क तुटलाच. अगदी अलीकडं २०११ मध्ये 'हम दोनो'च्या रंगीत प्रिंटच्या प्रकाशनाच्या वेळी देवनं आवर्जून फोन करून वहिदाला मुंबईला बोलावलं होतं. मात्र, तिला यायला जमलं नाही. नंतर काहीच महिन्यांत देव देवाघरी निघून गेला. ते काही असलं, तरी कृष्णधवल हिंदी सिनेमाच्या जमान्यातली देव-वहिदा ही सर्वोत्कृष्ट जोड्यांपैकी एक जोडी होती, हे कुणीच अमान्य करणार नाही. 'काला बाजार'मधल्या 'अपनी तो हर आह इक तुफान है' या गाण्यातले वहिदाचे अल्लड विभ्रम आणि देवचा रोमँटिक मूड कसा विसरता येईल?

स्वर्गीय जोडी : देव-मधुबाला

देव आनंद आणि मधुबाला म्हणजे स्वर्गीय जोडीच. भारतीय जनमानसात रोमँटिक हिरो व नायिका म्हणून या दोघांनाही फार वरचं स्थान! टेनिससारखं नायक-नायिकांच्या जोडीला रँकिंग देण्याची पद्धत असती, तर ही जोडी कैक वर्षे अव्वल स्थानावरच राहिली असती, यात शंका नाही. या जोडीनं सुमारे आठ सिनेमांत एकत्र काम केलं. निराला (१९५०) हा या जोडीचा नायक-नायिका म्हणून पहिला चित्रपट. त्यानंतर मधुबाला (१९५०), नादान (१९५१), आराम (१९५१), अरमान (१९५३), काला पानी (१९५८), जाली नोट (१९६०) आणि शराबी (१९६४) या चित्रपटांत देव-मधुबाला एकत्र दिसले. यातला 'काला पानी' सर्वांत गाजलेला. त्यातलं 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' हे गाणं म्हणजे तर रोमँटिक गाण्यांमधलं एक सर्वांत अप्रतिम गाणं. या गाण्यात दोघंही फार सुंदर दिसले आहेत आणि राज खोसलानं या गाण्याचं चित्रीकरणही मस्त केलंय. 'काला पानी' आणि नंतर आलेल्या 'जाली नोट' या दोन्हींत मधुबाला पत्रकार असते, हे विशेष. 

तेरा मेरा प्यार अमर...

देव आनंद आणि साधना या जोडीचे 'हम दोनो' (१९६१) आणि 'असली नकली' (१९६२) हे दोन चित्रपट सुपरहिट ठरले. 'हम दोनो'मध्ये देवचा डबल रोल होता. त्यामुळं त्याला या सिनेमात दोन नायिका होत्या. एक साधना आणि दुसरी नंदा. साधनासोबतचं त्याचं 'अभी ना जाओ छोडकर' हे गाणं आजही हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट रोमँटिक गाण्यांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. 'साधना कट'मुळं तेव्हाची फॅशन आयकॉन म्हणून साधना ओळखली जायची. या सिनेमात मात्र तिनं साध्या मुलीची भूमिका केली होती. हा सिनेमा ५० वर्षांनंतर रंगीत होऊन पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. साधनाची जादू काय होती, ते आत्ताच्या पिढीलाही त्यामुळं पाहता आलं. या चित्रपटाच्या यशानंतर हृषीकेश मुखर्जींच्या 'असली नकली'मध्ये देव आणि साधना पुन्हा एकदा नायक-नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आले. 'फुल फॅमिली एंटरटेन्मेंट'चा मंत्र हृषीकेश मुखर्जींना या सिनेमापासून गवसला होता, असं म्हणायला हरकत नाही. श्रीमंत घरातला पळून गेलेला तरुण आणि गरीब वस्तीतील सुशिक्षित, देखणी नायिका असं यातलं रसायन प्रेक्षकांना बेहद्द पसंत पडलं आणि सिनेमा हिट झाला. यातली सगळीच गाणी गाजली. पण 'एक पुत बनाउंगा' आणि 'तेरा मेरा प्यार अमर' या अजरामर गाण्यात देव आणि साधनाची केमिस्ट्री खासच जमून आली होती. या दोन सिनेमांव्यतिरिक्त साधना आणि देवची जोडी पुढं एकत्र दिसली नाही. 

नूतन... सोज्वळ सौंदर्य

नूतन म्हणजे अस्सल भारतीय सौंदर्याचा पुतळाच. देवसारख्या देखण्या नायकासोबत तिची जोडी जमली नसती, तरच नवल. या दोघांनी पेइंग गेस्ट (१९५७), बारिश (१९५७), मंझिल (१९६०) आणि तेरे घर के सामने (१९६३) या चार सिनेमांत काम केलं. त्यातही पेइंग गेस्ट आणि तेरे घर के सामने हे सिनेमे अधिक गाजले. 'पेइंग गेस्ट'मधलं 'छोड दो आँचल जमाना क्या कहेगा' हे आशा आणि किशोरकुमारचं गाणं आजही तेवढंच लोकप्रिय आहे. शशधर मुखर्जी निर्मित आणि सुबोध मुखर्जी दिग्दर्शित हा एक मर्डर ड्रामा होता. शुभा खोटे आणि याकूब यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. 'पेइंग गेस्ट'नंतर ही जोडी प्रेक्षकांना पसंत पडली ती थेट सात वर्षांनी आलेल्या 'तेरे घर के सामने'मध्ये. वास्तविक या वेळी देव ४० वर्षांचा झाला होता आणि नूतन तिच्या मुलाच्या (मोहनीश) जन्मानंतर हा सिनेमा करीत होती. मात्र, दोघेही या सिनेमात अत्यंत रोमँटिक आणि चिरतरुण दिसतात. या सिनेमाची निर्मिती 'नवकेतन'ची म्हणजे घरचीच होती. दिग्दर्शन गोल्डी म्हणजे विजय आनंदचं होतं. एक जानेवारी १९६३ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला. दिल्लीत याची कथा घडते. दोन भांडणाऱ्या उद्योगपतींची मुलं (देव आणि नूतन) एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांच्याही वडिलांचा एकाच प्लॉटवर डोळा असतो आणि तिथं घर बांधण्याचं काम आर्किटेक्ट असलेल्या आपल्या नायकाला मिळतं. या सिनेमातली सगळीच गाणी गोल्डीनं बहारदार चित्रित केली आहेत. 'दिल का भँवर करे पुकार' हे कुतुबमिनारमधलं गाणं तर हिंदीमधल्या सर्वोत्कृष्ट चित्रित गीतांपैकी एक आहे. याशिवाय 'तेरे घर के सामने इक घर बनाउंगा' या गाण्यात व्हिस्कीच्या ग्लासात देवला नूतन दिसते, हे चित्रिकरण मस्तच जमून आलं आहे. या वेळचा दोघांचाही अभिनय पाहण्याजोगा आहे. 


झीनतच्या प्रेमात...

देव आनंदनं त्याच्या 'हरे रामा हरे कृष्णा' या गाजलेल्या चित्रपटात झीनत अमानला प्रथम संधी दिली. काठमांडूला पाहिलेल्या एका हिप्पी पार्टीवरून देवला या चित्रपटाचा विषय सुचला. या चित्रपटाची नायिका जिच्यावरून बेतली होती, ती जेनिस ऊर्फ जसबीर देवला त्याच पार्टीत भेटली. मुंबईत परत आल्यानंतर त्यानं 'हरे रामा हरे कृष्णा'ची घोषणा केली. अमरजितनं आयोजित केलेल्या एका पार्टीत तेव्हा त्याला झीनत अमान दिसली. ती तेव्हाची 'मिस एशिया' होती. झीनतला पाहून देवनं तिलाच आपल्या नव्या सिनेमाची नायिका करायचं ठरवून टाकलं. या सिनेमाच्या यशानंतर देवला आपण झीनतच्या प्रेमात पडलो असल्याची जाणीव प्रथम झाली. त्या काळात सिनेमाविषयक नियतकालिकांमध्ये देव-झीनतच्या रोमान्सची गरमागरम चर्चा रंगायची. या बातम्या आपण मनापासून एंजॉय करायचो, असं देवनं नंतर त्याच्या आत्मचरित्रात नमूद केलंय. आपण मनापासून तिच्याकडं ओढले गेलोय याची जाणीव झाल्यावर या प्रेमाचा जाहीर उच्चार करायचा निर्णय देवनं घेतला होता. ताजमहाल हॉटेलमध्ये एखाद्या संध्याकाळी झीनतला घेऊन जायचं, असं त्यानं ठरवलंही होतं. मात्र, त्याच वेळी झीनत राज कपूरच्या नव्या सिनेमात (सत्यम् शिवम् सुंदरम्) काम करणार असल्याची बातमी त्याला कळली. त्यापूर्वीच एका पार्टीत त्यानं राजला झीनतच्या गळ्यात गळा घालताना आणि तीही त्याला प्रतिसाद देत असताना पाहिलं होतं. हळूहळू सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. देवचा दारूण प्रेमभंग झाला होता. त्याची झीनत त्याला सोडून गेली होती. देवनं त्याच्या आत्मचरित्रात हे सगळं लिहिलंय. झीनतच्या प्रेमात तो किती बुडाला होता आणि तिच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानं पन्नाशीचा देव कसा हतबल झाला होता, हे त्यातून लक्षात येतं.
'ड्रीमगर्ल'चा 'ड्रीमहिरो'

हेमामालिनी आणि देवआनंद यांचीही जोडी काही सिनेमांतून गाजली. हेमा अर्थातच देवपेक्षा वयानं खूपच लहान. तिची आई देवआनंदची मोठी चाहती होती. त्यामुळं देवचे सिनेमे पाहतच हेमा मोठी झाली होती. या हिरोबरोबर आपल्याला कधी काम करायला मिळेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हेमा नशीबवान होती. तिला राज कपूरनं 'सपनों का सौदागर'मधून रूपेरी पडद्यावर आणलं आणि देवसोबत लगेचच तिला 'जॉनी मेरा नाम'सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात नायिका म्हणून काम करायला मिळालं. या सिनेमाच्या आठवणी सांगताना हेमा देवआनंदच्या चांगल्या स्वभावाची भरभरून तारीफ करते. यातली 'वादा तो निभाया' आणि 'पल भर के लिए' ही दोन्ही गाणी खूप गाजली. 'वादा तो निभाया' या गाण्याच्या बिहारमध्ये राजगीर येथील चित्रिकरणाच्या वेळी जमाव देवआनंदसाठी बेफाम झाला होता. त्या वेळी देवनं हेमाची विशेष काळजी घेतली. देवआनंदचा मिश्कील स्वभाव, त्याचं उत्कृष्ट इंग्रजी संभाषण, त्याचं अधूनमधून विक्षिप्तासारखं वागणं या सगळ्याचं हेमाला खूप अप्रूप वाटे. या जोडीनं 'जॉनी मेरा नाम', 'जोशिला', 'शरीफ बदमाश', 'अमीर गरीब', 'जानेमन', 'तेरे मेरे सपने' अशा एकूण नऊ सिनेमांत काम केलं. दोघांची जोडी हिट होती.


मुमताज आणि देव

देवआनंद आणि मुमताज यांनी 'हरे रामा हरे कृष्णा' आणि 'तेरे मेरे सपने' अशा दोन चित्रपटांत सोबत काम केलं. मुमताज ही सत्तरच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. देवनं तिला 'हरे रामा हरे कृष्णा'साठी करारबद्ध केलं, तेव्हाही ती मोठी स्टार होती. तेव्हा प्रत्येक कलाकाराला सात सिनेमांचं बंधन असायचं. म्हणजे सातव्या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं, तरच आठवा सिनेमा साइन करता यायचा. देव मुमताजला 'हरे रामा...'साठी विचारायला गेला, तेव्हा हा नियम आडवा येत होता. मात्र, देवनं कुणाचीही पर्वा न करता, पोलिस संरक्षणात मुमताजला काठमांडूला नेलं आणि चाळीस दिवसांचं चित्रिकरण पूर्ण केलं. देव मुमताजला 'मुमझी' या नावानं हाक मारत असे. हेमामालिनीप्रमाणेच मुमताजही देवच्या स्वभावावर फिदा होती. देव आणि सुनील दत्त आपल्या नायिकांची खूप काळजी घेत, असं तिचं निरीक्षण आहे.


अन्य नायिका...
या नायिकांव्यतिरिक्त देवनं नर्गिस, मीनाकुमारी, गीताबाली, वैजयंतीमाला, कामिनी कौशल, नंदा, उषाकिरण, नलिनी जयवंत, तनुजा, माला सिन्हा, सुचित्रा सेन, आशा पारेख, सायराबानू, मुमताज, झहिदा, शर्मिला टागोर, राखी, परवीन बाबी, प्रिया राजवंश या सर्व लोकप्रिय नायिकांसोबत किमान एक तरी सिनेमा नायक म्हणून केला. यापैकी 'पतिता'तलं 'याद किया दिलने कहाँ हो तुम' हे देव आणि उषाकिरणचं गाणं चांगलंच गाजलं. वैजयंतीमाला आणि तनुजासोबतचा 'ज्वेल थीफ' (१९६७) हाही सुपरहिट सिनेमा ठरला. सुचित्रा सेनसोबत देवनं केलेल्या 'बंबई का बाबू'मधली गाणीही गाजली. या लोकप्रिय नायिकांव्यतिरिक्त रेहाना, हेमावती, खुर्शीद, चंद, रमोलादेवी, सुनलिनीदेवी, कुकू, निम्मी, शीला रामाणी, शकिला, तरला मेहता या नायिका म्हणून अल्पजीवी ठरलेल्या अभिनेत्रींसोबतही देवनं सिनेमे केले.
याशिवाय टीना मुनीम (देस-परदेस), तब्बू (हम नौजवान) अशा कित्येक नायिकांना सर्वप्रथम 'ब्रेक' दिला तो देवनं. 
उतारवयात देवनं सोनिका गिल (सौ करोड, १९९१), ममता कुलकर्णी (गँगस्टर, १९९४), हिनी कौशिक (लव्ह @ टाइम्स स्क्वेअर, २००३) या नाती शोभतील अशा मुलींसोबतही नायक म्हणून काम केलं. अर्थात १९८० नंतरच्या देवची आणि त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीची दखल घेण्याचं कारण नाही. कारण तो सगळा देव नावाच्या सिनेमावेड्या माणसाचा वेडा कारभार होता.
देव आणि त्याच्या नायिका म्हटलं, की अजूनही डोळ्यांसमोर येतात त्या साधना, नूतन, मधुबाला आणि वहिदाच. त्यांच्यासोबतची कित्येक चिरतरुण गाणी आपण आजही पाहतो आणि यक्षांच्या दुनियेत सफर करून आल्याचा आनंद मिळतो. देव आणि त्याच्या नायिकांचं हे देणं कधीही न फिटणारं असंच आहे.
----
(पूर्वप्रसिद्धी - मोहनगरी दिवाळी अंक २०१७)
----

No comments:

Post a Comment