मन-मितवा
--------------
माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग इथं देत आहे... आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे....
---------
१. मन क्यूं बहका रे बहका...
--------------
माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग इथं देत आहे... आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे....
---------
१. मन क्यूं बहका रे बहका...
---------------------------------
गणू गणपुले हा सामान्य, मध्यमवयीन, मध्यमवर्गीय इसम असला, तरी त्याचं मन सामान्य, मध्यमवयीन व मध्यमवर्गीय नव्हतं. त्यामुळं त्याच्या मनाला असामान्य गोष्टींची स्वप्नं पडत. त्याच्या मनाला वयाचंही बंधन नसल्यानं ते सदैव सोळा ते अठरा याच वयोगटात बागडे. गणू मध्यमवर्गीय असला, तरी त्याचं मन उच्चवर्गीय होतं. थोडक्यात, श्रीमंतच होतं म्हणा ना! अर्थात मनाची ही स्थिती सर्व काळ अशीच राहत नसे. त्यामुळं कधी कधी ते अगदी दरिद्री असल्यासारखं वागे आणि गणूला त्याची भयंकर लाज वाटे.
आपलं स्वत:चं मन आपल्या ताब्यात असू नये, या गोष्टीची गणूला आत्यंतिक खंत वाटत असे. पण त्यानं आजूबाजूला पाहिलं असता, कुणाचंच मन त्यांचं ऐकत नसल्याचं त्याला आढळून आलं. बहुतेकांना त्यांच्या मनासारखं शिकता आलं नव्हतं. मनासारखी नोकरी मिळाली नव्हती. नंतर मनासारखी छोकरीही लाभली नव्हती. त्यामुळं त्या सर्वांना म्हणे, मन मारूनच जगावं लागत होतं. त्यामुळं या मारून टाकलेल्या मनानं आता त्यांच्याविरुद्ध बंड पुकारलं होतं. अशा या बंड पुकारलेल्या मनाला उद्देशूनच समर्थांनी ‘अचपळ मन माझे नावरे आवरिता’ असं म्हटलं होतं की काय, असं गणूला वाटून गेलं.
साध्या रोजच्या जगण्यात गणूचं मन त्याचं ऐकेनासं झालं, की गणूला त्रास होतो. उदाहरणार्थ, दर वर्षीप्रमाणे यंदाही एक जानेवारीला त्यानं चालायला जायचा संकल्प केला. पण दोन दिवसांतच त्याच्या मनानं गणूच्या इच्छेप्रमाणं चालायला नकार दिला आणि गणूचा संकल्प तिसऱ्या दिवशी मोडला. एवढ्या थंडीचं पहाटे उठू नये, असं गणूचं मन सतत आक्रंदत होतं. मग गणूला त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. गणूला फार गोड खाऊ नये, असं त्याला डॉक्टरनी सांगितलं होतं. नसत्या व्याधी मागं लागण्यापेक्षा आत्ताच आहार नियंत्रित करावा, असा सल्ला त्याला मिळाला होता. पण कुठल्याही लग्नात, पार्टीत किंवा कुठल्याही सणाच्या दिवशी गणूचं मन थाऱ्यावर राहत नसे. जिलेबी, श्रीखंड, पुरणपोळी किंवा गुळपोळीचे ‘मोह मोह के धागे’ त्याच्या मनात अडकून बसत असत. मग त्याचं मन डॉक्टरी सल्ला धुडकावून सरळ समोर येईल तो पदार्थ खाण्याच्या मागं लागे.
गणूच्या आयुष्यात तसे फार मोह नव्हते. अर्थात गेल्या पाच-सात वर्षांत स्मार्टफोन नावाची वस्तू हातात आल्यापासून त्याच्याही आयुष्यात बदल झालेच होते. आपल्यासमोर मोहाची गुहाच उघडली आहे, असे भास त्याला वेळोवेळी होत होते. गणूनं स्मार्टफोन घेतला, तेव्हा त्याचं मन दात विचकत भयाण हसलं होतं. गणूला आपल्या मनाचं तसं ते भयंकर हसणं अजिबात आवडलं नव्हतं. पण हळूहळू त्याला आपल्या मनाचे इरादे समजत गेले. गणू पूर्वी निदान मनाशी किमान काही तह करण्याच्या स्थितीत तरी असायचा. आता मनानं त्याच्यावर जो काही ‘स्मार्ट सर्जिकल स्ट्राइक’ केला होता, त्यानंतर गणू पुरता कोलमडला होता. हात मागे बांधून तो मनाला शरण गेला होता. पण गणूचं मन एवढं उदार नव्हतं. त्यानं गणूची शरणागती स्वीकारली नाही. मनाचे नवे डावपेच पाहून गणू भयंकर खचला. आता आपलं काही खरं नाही, याची त्याला खात्री पटली. पण आपल्या मनाशी हे बोलण्यास तो घाबरू लागला. आपण घाबरलोय हे मनाला कळलं, तर मन आणखीनच चेकाळेल, हे त्याला माहिती होतं. मग गणूनं हळू हळू मनाशी असलेला संवाद बंद करून टाकला. आता कित्येक दिवस झाले, तो आपल्या मनाशी बोललेलाच नाही. मनाचं काय चाललेलं असतं, हे गणूला कळत नाही. पण गणूचं काय चाललंय याची त्याच्या मनाला सगळी खबरबात असते. त्यामुळं गणूची अवस्था फार बिकट झालीय.
गणूचं मन वेगळ्या दुनियेत वावरतंय आणि खुद्द गणू वेगळ्या दुनियेत. पूर्वी असं नव्हतं. दोघेही चांगले मित्र होते. हातात हात घालून सगळीकडं फिरायचे. गणूला काही दुखलं, तर मनाला कळायचं. मनाला बरं नसलं, तरी गणूला समजायचं. दोघं एकमेकांना सांभाळून असायचे. पण गणूच्या साध्यासुध्या आयुष्यात आभासी विश्वानं प्रवेश केला आणि सगळं बिनसलं. गणूचं आता वेगळं विश्व आहे. ते खरं आहे की खोटं आहे, याची गणूला फिकीर नाही. पण तिथं गणूला तरंगल्यासारखं वाटतं. कुठलीही नशा न करता, त्याला तिथं ‘हाय’ होता येतं. आधी गणूला याची मजा वाटली. पण नंतर त्याच्या लक्षात आलं, की आपल्याला या आभासी जगाचीच नशा चढलीय. आभासी जगात वावरायला आधी गणूचं मन तयार नव्हतं. पण गणू त्याचं बोट मागं सोडून केव्हा पुढं आला, त्याचं त्यालाही कळलं नाही. आता मनाचा पत्ता सापडत नाही, पण मनाला गणूची सगळी खबर असल्यानं ते मात्र गणूला सोडत नाहीय. आता त्याचं मन त्याच्यावरच सूड उगवतंय. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी गणू धडपडतोय... अनेक डॉक्टर केले, हकीम केले, वैद्य केले. पण उतारा नाही. अखेर गणू पुन्हा मनाला शरण गेला आणि विचारता झाला, बाबा रे, मी काय करू, म्हणजे तू माझं ऐकशील?
मन म्हणालं, सोपं आहे. तू माझं ऐक. मग मी तुझं ऐकीन...
आणि गणू त्याच्या मनाचं ऐकू लागला...
हीच ती कहाणी...
(क्रमश:)
(फेब्रुवारी २०१९)
---
२. मनाचं मन...
-----------------------
गणू आपलं ऐकायला तयार झाला, हे कळल्यावर मनाला पुष्कळ बरं वाटलं. तसं ते गणूला चांगलं ओळखत होतंच. गणू आपल्याला शरण का आलाय, हेही त्याला नीट कळलं होतं. गणू गणपुलेसारख्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय इसमाला मनाचं हे असलं बंड परवडणारं नव्हतं, हेही त्याच्या मनाला व्यवस्थित माहिती होतं. गणूची ती रडकुंडीला आलेली मुद्रा पाहून मनाला खदखदून हसू आलं.
ते म्हणालं, ‘अरे मित्रा, असा चेहरा पाडून का बसला आहेस? काय होतंय?’
गणू उत्तरला, ‘तू माझ्याशी बोलत नाहीस. तुझे काही तरी निराळेच उद्योग चाललेले असतात. त्यामुळं मला अस्वस्थ व्हायला होतं. तू पूर्वीसारखा का वागत नाहीस?’
मन म्हणालं, ‘याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! जे प्रश्न मी तुला विचारायला हवेत, ते तूच मला विचारतोयस? धन्य आहेस. अरे, तुला ठाऊक आहे का तू माझ्याशी शेवटचं कधी बोललास? माझी विचारपूस केलीस? आठव जरा...’
गणोबा सांगते झाले, ‘तू माझ्यातच आहेस. मी जे काही करतो ते सगळं तुला माहिती असतं. मग तुझी कशाला विचारपूस करायची? तुला परत तुला वेगळं रिपोर्टिंग कशाला करायचं रे?’
मन म्हणालं, ‘वा रे वा! मी तुझ्यात असलो, तरी तू अनेकदा मला अंधारात ठेवून, चुकवून गोष्टी करीत असतोस. तेव्हा तुला वाटत असतं, की मला काही कळत नाही. पण माझा प्रॉब्लेम हा आहे, की मला तू करत असलेली प्रत्येक गोष्ट समजते, दिसते. तुझे विचार कळतात. तुला आता नेमकं काय सुचतंय, तेही कळतं.’
गणू म्हणाला, ‘अच्च्छा? मग प्रॉब्लेम काय आहे? सगळं तर तुला ठाऊक असतंच ना...’
मन म्हणालं, ‘अरे माझ्या मित्रा, मला चुकवून तू ज्या काही गोष्टी करतोस ना, त्या मला माहिती नाहीत असं तुला वाटत असतं; पण प्रत्यक्षात त्या मला कळत असतात. पण ते तुला कळत नाही, या गोष्टीचा मला त्रास होतोय.’
गण गणपुले आता सर्द झाला. त्याला मन काय बोलतंय तेच कळेना. तो म्हणाला, ‘एक मिनिट, एक मिनिट! तू काय बोलतोयस? मी तुला लपवून काय करतो? तुला माहिती नाही, असं मला का वाटेल? आणि तुला हे माहिती नाही असंही मला का वाटेल? आणि उगाच असं वाटून तू त्रास का करवून घेतोयस?’
मन म्हणालं, ‘गणोबा, शब्दांचे खेळ करायला तुम्हाला छान जमतं हो. पण त्यानं माझा प्रॉब्लेम सुटणार नाहीय. तू अजूनही हे मान्य करत नाहीयेस, की मला माहिती नाही असं समजून अनेक गोष्टी तू करत असतोस... त्या करणं बंद केलंस ना, की मग माझं काही म्हणणं नाही.’
गणोबा म्हणाले, ‘माझं असं म्हणणं आहे, की तूच मला हे करायला भाग पाडतोस. तुला एकाही गोष्टीचा मोह सोडवत नाही. तुला जगातल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तू त्याचे खेळ सुरू करतोस आणि त्रास मला होतो... मला एखादी गोष्ट करू नये, असं वाटत असतं आणि तू नेमका तिकडंच धाव घेतोस. मी प्रयत्नपूर्वक एखाद्या गोष्टीपासून स्वत:ला लांब ठेवायचा प्रयत्न करतो आणि तू अगदी मोका साधल्यासारखा तिथंच तडमडतोस. म्हणजे आज एखादा सिनेमा न पाहता, त्या वेळेत जरा कामाच्या चार गोष्टी करू, तर तू हट्टानं तिकडंच धाव घेणार. मग माझी कामं बोंबलणार... अस्सा राग येतो तुझा अशा वेळी...’
मन म्हणालं, ‘हे पाहा गणूभाऊ, मला मन मारून जगायला आवडत नाही. मला हव्या त्या गोष्टी मला करू द्या की!’
मनाचं हे उत्तर ऐकून गणोबा थक्क झाले. मनाला मन असतं? काहीही! हे आपलं मन आता काहीही बडबडतंय.
गणू म्हणाला, ‘अरे, तू माझं मन आहेस. तुला परत वेगळं कसलं आलंय मन? काहीही बोलतोस आपलं!’
मन म्हणालं, ‘मला वाटलंच होतं, तू हे बोलणार. कारण तू माझ्या मनाचा कधीच विचार केलेला नाहीस. तुझ्या मनालाही एक मन आहे, हे तुला कधीच कळलेलं नाही. तू माझं मन दुखावलं नसतंस तर आज ही वेळ आली नसती...’
गणू म्हणाला, ‘बरं बाबा, काय म्हणतंय तुझं मन? सांग एकदा घडाघडा...’
मन म्हणालं, ‘माझं मन म्हणतंय, की गणू बिघडला. आपल्याशी बोलत नाही. मग आपणही त्याच्याशी कट्टी करून टाकू. उगाच स्वत:ला त्रास करून घेण्यापेक्षा न बोललेलंच बरं. काय चुकलं आमचं यात?’
गणू म्हणाला, ‘आमचं?’
मन उत्तरलं, ‘अरे, मी आणि माझं मन रे. आम्ही बोलत असतो बाबा एकमेकांशी. तुझ्यासारखं नाही...’
गणू वैतागून बोलला, ‘परत परत आपण तिथंच येतोय. तुला माझ्याशी अशी कट्टी करता येणार नाही. उगाच काही तरी काढू नकोस...’
मन म्हणालं, ‘तेच म्हणतोय. चल बट्टी कर परत. मग माझंही मन खूश होईल. तुझ्याशी परत बोलायला मिळेल... कसलं भारी ना!’
मनाच्या या बोलण्यापुढं गणू निरुत्तर झाला... पण मनातल्या मनात खूशही झाला...
आणि या वेळी त्याच्या मनाला आणि मनाच्या मनालाही ते कळलंच... मग तिघेही खूश झाले...!!!
(क्रमश:)
(मार्च २०१९)
----
३. सीसीटीव्ही...
-----------------------
आपल्या मनालाही मन आहे, या बातमीनं गणू गणपुले आधी आश्चर्यचकित व नंतर आनंदित झाला. आता गणू, त्याचं मन व त्याच्या मनाचं मन तिघंही एकमेकांशी नीट बोलू लागले. गणूचं मन आणि त्याच्या मनाचं मन यांची चांगलीच दोस्ती होती. अगदी घट्ट मित्र होते ते दोघं... गणूला ते जाणवलंच त्यांच्या बोलण्यातून! त्या तुलनेत आपण आणि आपलं मन एकमेकांपासून लांब गेलो आहोत, हेही त्याला नीटच जाणवलं.
(इथं गणू आता फ्लॅशबॅकमध्ये...) वास्तविक गणूचं मन व त्याची एके काळी छान मैत्री होती. किंबहुना, गणू आपल्या मनाचंच फक्त ऐकत असे. मनाला आवडेल तेच करीत असे. गणूचं मन तसं उत्साही होतं. त्याच्यामुळं गणूलाही वेगवेगळ्या गोष्टी करायला मजा यायची. आयुष्यात अगदी सुरुवातीला आई-वडिलांच्या, नंतर शिक्षकांच्या, नंतर मित्रांच्या सांगण्यावरून गणू तसं वागायचा प्रयत्न करायचा. पण त्यात त्याला फारशी गंमत वाटत नसे. नंतर कधी तरी त्याला त्याच्या मनाची ओळख पटली. गणूचं मन म्हणजे उत्साहाचा धबधबाच. त्या मनाच्या ठायी नीरसता अशी नव्हतीच. एखाद्या कोकरासारखं ते सतत उड्या मारीत राहायचं. एखाद्या भुंग्याच्या आविर्भावात ते सतत या गोष्टीवरून त्या गोष्टीवर उडू पाहायचं. एखाद्या जादूगारासारखं ते आपल्या पोतडीतून काही ना काही तरी गमतीच्या गोष्टी बाहेर काढायचं. मनानं सांगायचं, की आज आपल्याला सिनेमा पाहायचाय, गाणं ऐकायचंय, भटकायला जायचंय, क्रिकेट मॅच पाहायचीय, पुस्तक वाचायचंय, आवडता पदार्थ करून पाहायचाय... आणि गणूनं ते लगेच अमलात आणलंच म्हणून समजा. मनानं सांगितलेलं ऐकलं, की आपलं सगळं छान छान होतं, यावर गणूचा पूर्ण विश्वास होता. कधी कधी गणूच्या मनासारखं व्हायचं नाही. तेव्हा जरा त्याचं मन खट्टू व्हायचं. आपल्या मनाला आवडत नसलेल्या गोष्टी कराव्या लागल्या, की गणूचीही स्वाभाविक चीडचीड व्हायची. त्यातून गणू व त्याच्या मनाचं नातं मस्त घट्ट झालं होतं. पुढं पुढं काही तरी बिनसलं आणि गणू मनाला टाळू लागला. काही गोष्टी मनाला सांगेनासा झाला. मनानं आधी वाट पाहिली. पण तरीही गणूनं बोलणं जवळपास टाकलंच म्हटल्यावर मनही निराश झालं. त्याला गणूचं हे वागणं सहन झालं नाही. गणूच्या मनानं स्वत:लाच शिक्षा द्यायचं ठरवलं. त्यानं गणूशी संवाद पूर्णपणे थांबविला. ही गणूच्या मनानं स्वत:ला केलेली शिक्षा असली, तरी गणूला किती तरी त्याचा पत्ताच नव्हता. गणूचं मन फक्त आपल्या मनाशी बोलत राहिलं. दोघेही गणूच्या वागण्यानं अगदी हिरमुसून गेले. त्यांची रयाच गेली. गणोबांना मात्र याचा काही पत्ताच नव्हता. ते आपल्या मनाला काही कळत नाही, अशा समजुतीतून मनाला फसवीत गोष्टी करीत राहिले. त्यांचं मन दु:खी-कष्टी झालं. गणूला ताळ्यावर आणण्यासाठी काय करावं, हे त्याला कळेना.
मग एके दिवशी गणूसोबत जात असताना मनाला समोर ‘सीसीटीव्ही’ दिसला. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मनानं गणूला हाक मारली. बरेच दिवस बोलणं नसल्यानं गणूला आधी ऐकूच आलं नाही. मग कुणी तरी खूप लांबून हाक मारतंय, असा भास गणूला झाला. आपण एखाद्या विहिरीच्या तळाशी असताना वरून कुणी हाक मारली, तर ती कशी ऐकू येईल, तसा तो आवाज लांबून आल्यासारखा वाटला. आजूबाजूला कुणीही नव्हतं. बऱ्याच वेळानं मग गणूच्या लक्षात आलं, की आपलं मन आपल्याला हाक मारतंय! गणू मग निवांत तिथल्या बाकावर बसला. समोर जिकडं-तिकडं सीसीटीव्हीचे कॅमेरे रोखलेले होते. त्या कॅमेऱ्यांच्या कैदेत असताना कुठलीही वावगी हालचाल करणं गणूला शक्य नव्हतं. त्यामुळं त्रासिक मुद्रा करून त्यानं अखेर मनाला विचारलं, ‘काय हवंय?’
‘सीसीटीव्ही...’ मन उत्तरलं.
‘क्काय?’ गणोबा अजूनच वैतागून विचारते झाले.
‘हो... मी बरोबर बोलतोय. मला सीसीटीव्ही हवाय... ’ गणूचं मन म्हणालं.
‘कशाला?’ गणू त्रासून म्हणाला.
‘तुझ्यावर लक्ष ठेवायला...’ मन उत्तरलं.
‘मी काय केलंय?’ गणूनं उलटा प्रश्न केला. पण त्याच्या विचारण्यात जोर नव्हता. आपण काय केलंय हे त्याला माहिती होतंच.
’तुला माहितीय तू चोरी केलीयस...’ मन शांतपणे, पण ठाम स्वरात म्हणालं.
‘क... कसली चोरी?’ आता गणूचा स्वर भयकंपित झाला.
‘विश्वासाची चोरी...’ मन पुन्हा एकदा शांतपणे म्हणालं - ‘तू माझा विश्वास चोरला आहेस...’
‘छे... छे... काहीही काय...’ गणू आता जवळपास रडकुंडीस आला.
‘हे बघ, मला कुठल्याही सीसीटीव्हीची गरज नाही. मी तुला केवळ माझी आठवण करून देण्यासाठी मगाशी सीसीटीव्हीचा विषय काढला. तुला माहिती असेलच, की मीच तुझा सीसीटीव्ही आहे. मला तू काय करतोस, ते सगळं कळतं, दिसतं, समजतं... मी दर वेळी बोलत नाही याचा अर्थ मला ते जाणवतच नाही असा घेऊ नकोस...’ गणूचं मन आता आपलं मन मोकळं करू लागलं.... ‘तुझा आविर्भाव, आवेश, आवेग हे सगळं मला माहितीय. वास्तविक तू मला अंधारात ठेवून काहीही करू शकत नाहीस. पण तुला वाटतं, की तू तसं करू शकतोस. पण ते किती चुकीचं आहे, हे आता तुझ्या लक्षात आलं असेल...’
‘हो, मला मान्य आहे... मी आता तुला न विचारता काहीही करणार नाही,’ गणोबा उत्तरले.
‘ठीक आहे. माझा अजूनही तुझ्यावर विश्वास आहे...’ मन म्हणालं....
‘धन्यवाद मित्रा,’ गणूच्या आवाजात कृतज्ञता होती.
‘आता रडका चेहरा करू नकोस. समोर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याच्याकडे बघून जरा हस...’ मन म्हणालं...
मनाच्या या वाक्यावर गणू मनमुराद हसला... तेव्हा गणूचं मन आणि मनाचं मन तिघंही छान हसले!
(क्रमश:)
(एप्रिल २०१९)
----