31 Jul 2019

मन-मितवा - भाग ४ ते ६

मन-मितवा

--------------------

माझ्या स्नेही प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांच्या विनंतीवरून ‘मनशक्ती’ मासिकात मी फेब्रुवारीपासून ‘मन-मितवा’ या नावाचं एक सदर लिहितो आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या हलक्याफुलक्या लेखनापेक्षा हे लेखन जरा वेगळं आहे. मनाशी साधलेला संवाद असं त्याचं स्वरूप आहे. यातही गणू गणपुले आहेच. पण लेखनाचा बाज किंचित वेगळा आहे. त्या मासिकात प्रसिद्ध झालेले पहिले तीन भाग पूर्वी ब्लॉगवर प्रसिद्ध केले आहेत. आता भाग ४ ते ६ देत आहे. आपल्याला हे लेखन आवडेल, असा मला विश्वास आहे.

-----

४. सहेला रे...
--------------------

मनाच्या ‘सीसीटीव्ही’ची गंमत कळताच गणूला मजा वाटली. आता मनाच्या सीसीटीव्हीत अधूनमधून पाहायचं त्यानं ठरवून टाकलं. आपल्या मनाच्या गमतीशीर लीला पाहताना त्याला आता नव्यानं काही काही गोष्टी कळू लागल्या. एक तर या सीसीटीव्हीतून काहीच सुटत नाही, हे एक! त्यामुळं आता मनाशी लपाछपी खेळण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळं आपल्याला जे जे वाटतं, ते मनाला सांगावं आणि त्याच्या मनात काय आहे, त्याला काय वाटतं, हे त्याच्याकडून ऐकावं हेच योग्य, असं गणूनं ठरवून टाकलं. ‘मन क्यूं बहका रे बहका...’ हे गाणं त्यानं आपल्या मेमरीकडून कायमचं डिलीट करून टाकलं. आयुष्यात पुन्हा एकदा शहाण्या, सरळ, पापभीरू माणसासारखं वागायचं, असंही त्यानं पक्कं ठरवलं. काही दिवस आनंदात गेले. मनही खूश होतं. ते स्वत:हून कधी गणूशी बोलत नसे; पण गणूला त्याच्या मूडचा अंदाज येत असे. ‘सीसीटीव्ही’च्या परिणामामुळं आपल्यात हा बदल झालाय, हे गणोबाला कळत होतं. त्यामुळंच त्याच्या मनाचंही बरं चाललं होतं. अधूनमधून फिरकी घेणारं त्याचं मनही अगदी शहाण्या मनासारखं वागू लागलं होतं. विमान एका विशिष्ट उंचीवर गेल्यावर ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकतात आणि मग वैमानिक अगदी झोपूही शकतो, तसं गणूनं स्वत:ला व स्वत:च्या मनाला ‘ऑटो-पायलट’ मोडवर टाकून दिलं. पण गंमत अशी, की एखाद्या हायवेवरून कार चालवताना अगदी सरळसोट रस्ता असेल, तर ड्रायव्हरला झोप लागू शकते. कंटाळा येऊ शकतो. त्यामुळं रस्ता कसा ‘वळणदार’ हवा! गणूला ‘ऑटो-पायलट’ मोडवाला सरळसोट रस्ता कालांतरानं बोअर व्हायला लागला होता. आपल्या मनाला हे असलं मिळमिळीत जगणं कंटाळवाणं वाटत नाही का, असा प्रश्न गणूला पडला. फार दिवस मनाशी गप्पा झाल्या नव्हत्या. मग एके दिवशी गणोबांनी बाइक काढली आणि शहराच्या बाहेर हायवेलगत असलेल्या त्या तळ्यापाशी येऊन ते बसले. इथं थोडीफार बाग केली होती; बाक टाकले होते. इथं पर्यटकांची लगबग असतेच. पण तुलनेनं हा भाग जरा शांत होता. त्यात दुपारची वेळ होती. गणूनं आपला नेहमीचा कोपऱ्यातला बाक पकडला आणि तो ‘चिंतन मोड’मध्ये गेला. अशा वेळी त्याला आधी हेडफोनवर किशोरी किंवा कुमार गंधर्व ऐकायची सवय होती. किशोरीताईंचा एखादा राग किंवा कुमारांचं एखादं निर्गुणी भजन ऐकलं, की त्याला शांत शांत वाटत असे. तसं आत्ताही त्यानं मोबाइलमधून कुमारांचं ‘शून्य गढ शहर’ लावलं आणि तो डोळे मिटून ते ऐकायला लागला. कुमारांच्या त्या आवाजातून योग्य तो परिणाम साधला जाऊ लागला. त्याला एकदम शांत शांत वाटू लागलं. आपलं शरीर एकदम हलकं झालं असून, आपण ढगांवरून तरंगत चाललो आहोत, असाही भास त्याला झाला. अशी ‘झीरो ग्रॅव्हिटी’ची अवस्था कायम लाभायला हवी, असं त्याला वाटू लागलं...
मनाशी गप्पा मारायला हीच योग्य वेळ होती. गणूनं डोळे न उघडता, ढगांवरून उडत असल्याचा फील कायम ठेवून मनाला विचारलं, ‘काय मनोबा, बरंय का?’
गणूचं मन गाणं ऐकण्यात गुंगलं होतं. ते जरा दचकलं. म्हणालं, ‘श्शू... शांत बस... ऐकू दे हे...’ 
मग गणू एकदम शांत बसला. पण गाणं संपल्यावर त्याला राहवेना.
‘ऐक ना, ए मन्या,’ गणू मनाला हाक मारत म्हणाला.
‘हं, बोल आता... तुला आली म्हणायची माझी आठवण...’ गणूचं मन उत्तरलं.
‘घ्या... तुमचं हे असं आहे. बोललो तरी तुला प्रॉब्लेम, नाही बोललो तरी प्रॉब्लेम... माझ्यासारख्या गरीब माणसानं करावं तरी काय?’ गणू चिडचिडला.
‘हा हा हा... गणोबा, गंमत केली. एवढं कळतं ना...’ मन खदखदा हसत म्हणालं. गणू आणखी चिडचिडा झाला.
आता संध्याकाळचं ऊन थेट तोंडावर यायला लागलं. त्यामुळं त्याच्या त्रासात भरच पडली. तो एक हात डोळ्यांवर ठेवून म्हणाला, ‘कळते हो, सगळी गंमत कळते. गेली काही वर्षं तुम्ही आमची जी गंमत चालविली आहे ना, ती केवळ थोर आहे हो!’
यावर गणूचं मन म्हणालं, ‘मी कुणाचीही गंमत करायला जात नाही. पण माझ्यापासून लपवून गोष्टी करणाऱ्यांची गंमत मात्र मी बघत बसतो हे नक्की.’
गणू म्हणाला, ‘माहिती आहे. गेले काही दिवस आपण त्यावरच बोलतोय आणि आता माझ्या मते, तो प्रश्न मिटला आहे. आता आपली गाडी फारच सरळ निघाली आहे. मी इकडं-तिकडं कुठंही पाहत नाहीये... मी आणि तू... आपण दोघे एकमेकांना बरे... एवढाच विचार मी केलाय. पण खरं सांग मनोबा, कंटाळा आला की नाही?’
‘सरळसोट जगणं कंटाळवाणं वाटतं, हाच तुमच्या जगण्याचा पेच आहे,’ गणूचं मन गंभीर होत म्हणालं. ‘तुम्हाला सदैव थ्रिल पाहिजे. साध्या गोष्टींना तुम्ही भुलत नाही, तुमचं पोट भरत नाही. तुम्हाला सदैव काही तरी वेगळं पाहिजे. सतत नवं पाहिजे. तुमच्या या घाटदार जगण्याच्या अपेक्षांनी मी केवळ स्तिमित झालो आहे...’ मन चिंतनशील होऊन बोलत राहिलं...
गणू ऐकत राहिला. सरळ जगणं हा पेच वाटतोय का आपल्याला? काय घडलं म्हणजे आपल्याला ‘मज्जा’ येईल? 
गणूला ठरवता येईना. अशा वेळी मनाला शरण जाणं हाच एक उपाय असतो. गणूनं तेच केलं.
‘मग काय करायचं म्हणता महाराजा? हा सरळ जगण्याचा आडवळणी पेच सुटायचा कसा?’
मन म्हणालं, ’सोपं आहे. साधं-सरळ जगून पाहणं हेच एक थ्रिल आहे, असं समजायचं...’
गणू काय ते समजला. त्यानं शांतपणे डोळे मिटले. ‘सहेला रे...’ सुरू झालं... तो आणि त्याचं मन किशोरीच्या स्वरात डुंबून गेलं... समोर सूर्य अस्ताला निघाला होता आणि आसमंत शांत शांत होत होता....

(क्रमश:)

----

५. पर्जन्यसूक्त
-------------------

गणूला पाऊस आवडतो. धुवाँधार कोसळणारा पाऊस सुरू झाला, की हातातली सगळी कामं बाजूला ठेवून त्या अविरत कोसळणाऱ्या जलधारांकडं पाहत बसायला त्याला आवडतं. उन्हाळा हा त्याचा अत्यंत नावडता ऋतू होता. तेव्हा कधी एकदा उन्हाळा संपतो आणि पाऊस येतो असं त्याला होऊन जातं. माणसं शब्दाला जागत नाहीत, वचनं विसरतात, शपथा मोडतात; पण निसर्ग असं कधीही करत नाही. तो त्याच्या ठरलेल्या वेळेला येतोच. कधी तरी प्रतीक्षा करायला लावतो हेही खरं. पण अजिबातच यायचं नाही, असं तो कधीही करत नाही. त्यामुळं मे महिना संपला आणि जून उजाडला, की गणूला पर्जन्यऋतूचे वेध लागतात. अशा धुवाँधार पावसात बाइक काढायची आणि डोंगर-दऱ्यांत हिंडायला जायचं ही गणूची आवडती सवय. हल्ली पावसाळ्यात त्याच्या शहराजवळचं एकही ठिकाण निर्मनुष्य उरत नाही. निसर्गाला कडकडून भेटायला सगळेच आतुर! पण मग शांतता नसेल, तर संवाद व्हायचा कसा? मग गणूनं शोधून शोधून काही ठिकाणं वेचून काढली होती. ती अजून तरी फार कुणाला माहिती नव्हती. आषाढातल्या संततधारेची छान अशी झड लागली, की गणू बाहेर पडायचाच. सचैल भिजत तो गाडीवरून दूर दूर जात राहायचा. मग त्याचं आवडतं ठिकाण आलं, की गाडी उभी करून, तिथल्या एका आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर तो बसायचा. समोर भाताची शेतं आणि त्यापलीकडं डोंगर... त्यावरून येणारे शुभ्रफेसाळ धबधबे. गणूला समाधी अवस्था प्राप्त व्हायची अशा वेळी! 
....आणि, ‘हीच ती वेळ गणूशी बोलायची,’ असं म्हणून गणूचं मन त्याच्याशी संवाद साधू लागायचं. त्या दिवशीही असंच झालं...
‘काय गणोबा, बरं वाटतंय का?’ मनानं विचारलं.
‘हं...’ गणू उत्तरला. 
‘लागली का समाधी?’
‘हं...’ गणू अशा वेळी एकाक्षरी उत्तरं द्यायचा.
‘का आवडतं रे तुला इथं यायला?’ मन प्रश्न विचारायचं सोडत नव्हतं.
‘हे बघ, मला जरा शांत बसू दे आणि तूही शांत हो बरं...’ गणू वैतागून मनावर ओरडला.
‘हो रे बाबा, बसतो बापडा शांत... पण कधी तरी मला हे सांग. मला तुझ्याकडून ऐकायचंच आहे...’ मनानं आपला हट्ट चालू ठेवला.
‘बरं ऐक...’ गणू शेवटी कंटाळून म्हणाला, ‘मला ना निसर्ग आवडतो. याचं कारण म्हणजे तो आपल्याला देण्यात कधीच कुचराई करत नाही. तो कधीही आपल्याला फसवत नाही. आपल्याला काही मागत नाही. सदैव दात्याच्या भूमिकेत असतो. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निसर्ग म्हणजे या पृथ्वीतलावरची प्युअरेस्ट, सर्वांत शुद्ध गोष्ट आहे. आता हे पावसाचं पाणीच बघ. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे, की जमिनीवर पडण्यापूर्वीचं पावसाचं पाणी हे पाण्याचं सर्वांत शुद्ध रूप असतं. माहितीय का? तर मला हे निसर्गाचं प्युअर असणं, शुद्ध असणं फार आवडतं.’
‘व्वा...’ मन कौतुकानं म्हणालं, ‘म्हणजे जे आपल्याला होता येत नाही, ते आपल्याला आवडतं तसंच ना रे हे!’
गणू एक मिनिट विचारात पडला. त्यानं मनाला विचारलं, ‘म्हणजे काय म्हणायचंय तुला?’
‘अरे, साधी गोष्ट आहे. निसर्ग शुद्ध आहे आणि आपण तितके शुद्ध, तितके प्युअर कधीच नसतो. हां, फार तर जन्मल्या जन्मल्या पहिली तीन-चार वर्षं आपण तसे असू. पण नंतर आपण नाना विकारांनी ग्रस्त होतो. आपल्यातली शुद्धता लोप पावते आणि आपण हळूहळू सर्व बाबतींत करप्ट व्हायला लागतो.’
‘हं... खरंय तुझं. म्हणूनच या शुद्धतेची ओढ लागत असावी,’ गणू म्हणाला.  
गणूचं मन म्हणालं, ‘पण आपण लबाड असतो रे. आपल्याला ही शुद्धता आपल्या अंगी बाणवायला नकोच असते. फक्त मनातला अपराधभाव फार वाढला, की असे पावसाचे चार थेंब अंगावर घेतल्यासारखी ती आपल्याला थोडा वेळ हवी असते. मग आपण आपलं समाधान झालं, की अंग खसखसा पुसून कोरडं करतो, तशीही ही शुद्धताही पुन्हा झटकून टाकतो आणि आपल्या मूळच्या मलीन जगण्याकडं वळतो.’
‘पण याला कुणीच अपवाद नाहीय. मीही इतरांसारखाच माणूस आहे. मग माझंही तसंच झालं तर त्यात वेगळं काय घडलं?’ गणू मनाला विचारता झाला.
‘वेगळं काहीच घडत नाही, हेच तर दुखणं आहे ना माझं,’ मन वैतागून म्हणालं. 
‘काय म्हणायचंय काय तुला?’ गणूनं शंकेनं विचारलं.
‘अरे, सगळे जण असाच विचार करतात ना, त्याची गंमत वाटली. मी सर्वसामान्य आहे, इतरांसारखाच आहे असाच विचार सगळ्यांनी केला, तर त्यातून वेगळा विचार करणारा कुणी निपजणारच नाही,’ मन आपला मुद्दा स्पष्ट करीत म्हणालं.
‘अरे, एवढा सुंदर निसर्ग आहे... सुंदर धबधबा कोसळतोय समोर आणि तू हे काय तत्त्वज्ञानाचं व्याख्यान लावलं आहेस?’ गणू त्रस्त होऊन विचारता झाला.
त्यावर मन शांतपणे म्हणालं, ‘नाही, नाही... तू आनंद लूट... तुला ही संधी फार कमी वेळा मिळते, हे मी अनेकदा पाहिलंय. माझं मात्र तसं नाही. तुझ्या भल्यासाठी मला सतत काही तरी विचार करणं भागच आहे.’
गणू थोडासा विचारात पडला अन् म्हणाला, ‘एवढा माझा विचार करतोस? मी मात्र तुझा विचार करत नाही....’
‘असं नाहीय. तू इथं आलास हेही खूप आहे माझ्यासाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तू स्वत:साठी म्हणून जो खास वेळ काढतोस ना, तो माझ्यासाठीही असतोच. तेव्हा मी सदैव तुझ्याच सोबत असतो,’ मन हसत बोललं...
‘हं...’ गणू शांतावत उत्तरला.
‘आता एकच गोष्ट कर,’ मन म्हणालं.
‘काय करू सांग,’ गणू म्हणाला.
‘या पावसानं ही जमीन कशी स्वच्छ धुतली गेलीय ना, तसा तूही आतून-बाहेरून शुद्ध हो, निर्मळ हो... बघ जमतंय का?’ मनानं गणूला सुचवलं.
गणू समजून शांतपणे हसला. समाधानानं हसला.
आता समोर पाऊस आणखीन आवेगानं कोसळत होता. धबधबा बेफामपणे खाली झेपावत होता... 
...आणि गणू व त्याचं मन एकाच वेळी समाधी अवस्थेत पोचले होते!

(क्रमश:)

---

६. स्वातंत्र्य *
----------------


ऑगस्ट महिना उजाडला, की गणूला स्वातंत्र्यदिनाचे, तर त्याच्या मनाला श्रावणाचे वेध लागतात. स्वातंत्र्यदिनाचं आणि अर्थातच स्वातंत्र्याचं महत्त्व गणू जाणतो. त्याच्या जन्माच्या वेळी देश स्वतंत्रच होता. त्यामुळं पारतंत्र्य म्हणजे काय, हे त्याला खरं तर माहिती नाही. पण आपल्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तरी तालावर आपल्याला नाचावं लागेल ही कल्पनाच गणूला सहन होत नव्हती. यथावकाश गणूचं लग्न झालं आणि... मग सगळंच बदललं! गणूला स्वातंत्र्य, पारतंत्र्य आदी सगळ्या संकल्पनांचे अर्थ नीटच समजू लागले. गणूला विवाहोत्तर आयुष्यात जे काही कथित स्वातंत्र्य मिळालं होतं, ते म्हणजे एखाद्या वाघाला प्राणिसंग्रहालयातील मोठ्या पिंजऱ्यात फिरण्याचं स्वातंत्र्य होतं, हे त्याला खूप उशिरा कळलं. गणूचं मन त्याला याबाबतीत नेहमी हसत असे. गणूला त्याच्या विवाहपूर्व काळाची आठवण करून देत चिडवणं हा गणूच्या मनाचा आवडता छंद होता. 
नागपंचमीच्या दिवशी अर्धांगानं केलेली पुरणाची दिंडं रेटून गणू एखाद्या अजगरासारखा दुपारी लोळत होता. बाहेर पावसाची संथ, बारीक धार आणि पुरण खाऊन डोळ्यांवर आलेली सुस्ती अशा वातावरणात गणूचं मन नेहमीच त्याला बेसावध गाठत असे. 
आताही तेच झालं. मन म्हणालं, ‘झालं का मनसोक्त गोडधोडाचं जेवण? माझाही जरा विचार करा...’
गणू म्हणाला, ‘पूर्वी मी तुझाच विचार करून खायचो. तुला जे आवडेल ते आणि तेवढं. मला आता मला दुसरं कुणी तरी सांगतं, की हे खाऊ नका, ते खाऊ नका. गोड कमी खा, वजन कमी करा इत्यादी इत्यादी...’
मन म्हणालं, ‘अरेरे, हे तर पारतंत्र्य झालं. आणि गणोबा, तुमचं पारतंत्र्य म्हणजे आमचं मरणच की!’
गणू उत्तरला, ‘आधी मी मनसोक्त जगलो. त्यामुळं आता निर्बंध सोसावे लागताहेत... आधी तुझा विचार केला, आता मला माझ्या शरीराचा विचार करू दे.’
मन खट्टू होत म्हणालं, ‘तेव्हाही मी तुला म्हटलं नव्हतं, की शरीराला अपाय होईल, असं वाग म्हणून... आता उगाच माझं नाव का घेतोस?‘
गणू म्हणाला, ‘असंच असतं. स्वातंत्र्याची किंमत म्हण हवं तर... वाल्या कोळ्याच्या पापात सहभागी व्हायला त्याचं कुटुंबही तयार झालं नाही. इथंही तसंच आहे. तुला खूश ठेवून मला तोटा होणार असेल, तर तुला खूश ठेवणं अवघड आहे.’
मन विचारात पडलं आणि बोललं, ‘पण मला खूश ठेवून तुला तुझ्या शरीरालाही खूश ठेवता येईलच की.’
गणू म्हणाला, ‘ते कसं काय?’
मन उत्तरलं, ‘तू स्पायडरमॅन सिनेमा पाहिलायेस का? त्यात एक वाक्य आहे बघ. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी!’
गणू वैतागला, ‘हो माहितीय की! त्याचं काय इथं?’
गणूचं मन हसत म्हणालं, ‘अरे? संबंध नाही कसा? स्वातंत्र्य म्हणजे एक प्रकारची सत्ताच असते की नाही, तुमच्या हाती आलेली? मग स्वातंत्र्य मिळालं, की ते नीट उपभोगण्याची जबाबदारीही येतेच ना... त्यामुळं तुला शरीरासोबत मनालाही खूश ठेवावंच लागणार... आम्ही दोघंही तुझाच भाग आहोत ना!’
गणू हताश होत म्हणाला, ‘हे कुणाला जमेल असं वाटत नाही. शरीराला खूश केलं, की मन नाराज आणि मनाला खूश केलं, की शरीर कुरकुर करणार... अवघड आहे.’
मन म्हणालं, ‘अवघड आहेच. जगात काहीच सोपं नाही. स्वातंत्र्य मिळवणं सोपं नाही आणि मिळवलेलं टिकवणं तर त्याहून नाही.’
गणू म्हणाला, ‘मग यावर उपाय काय? तूच सांग बाबा. पुनश्च शरण येतो.’
मन हसून म्हणालं, ‘मी म्हणजे तूच आहेस. मला शरण येऊ नकोस. स्वत: विचार कर. तुला मिळालेलं स्वातंत्र्य नीट वापरतो आहेस ना? स्वातंत्र्यासोबत येणारी जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो आहेस ना?’
गणू म्हणाला, ‘खरंय तुझं. आम्हाला स्वातंत्र्य हवं असतं आणि ते कसं वापरायचं याचंही परत स्वातंत्र्य हवं असतं. स्वातंत्र्याच्याही ‘अटी व शर्ती’ असतात हे आम्हाला माहितीच नाही.’
मन सांगू लागलं, ‘अटी व शर्ती असतात, हे बरोबर. पण त्या तुझ्याच चांगल्यासाठी असतात, हे लक्षात ठेव.’
गणू म्हणाला, ‘शब्दांचे फुलोरे खूप छान फुलवता येतात तुला. प्रत्यक्ष जगणं तुझ्या आदर्शवादी शब्दांपेक्षा खूप अवघड आहे, एवढंच लक्षात ठेव. तिथं मला लढावं लागतं.’
मन म्हणालं, ‘तुझ्या प्रत्येक लढाईत मी तुझ्या सोबत आहे, हे कायम लक्षात असू दे. फक्त माझ्यापासून लपवून काही करू नकोस. तुझं स्वातंत्र्य हे माझंही स्वातंत्र्य आहे. त्यामुळं तुझ्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मलाच आहे.’
गणू म्हणाला, ‘हं, आलं लक्षात. स्वातंत्र्य मला मिळालं असलं, तरी मी त्याचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे. माझ्या स्वातंत्र्यामुळं दुसऱ्याचं स्वातंत्र्य, उदा. तुझंच - धोक्यात येत नाहीये हेही मी पाहायला पाहिजे.’
मन म्हणालं, ‘बरोब्बर. गणू, तुझं कसं आहे, माहितीय का! तुला सगळं कळतं... पण वळत नाही काहीच.’
गणू हसत म्हणाला, ‘मग तू कशाला आहेस?’
मन म्हणालं, ‘मी आहेच कायम. आत्ताही सांगितलंच की तुला. तुला स्वातंत्र्यदिन आवडतो ना, तसा मला श्रावण आवडतो. हा श्रावण म्हणजे निसर्गाचा फार सुंदर आविष्कार आहे. मस्त पाऊस पडत असतो, सगळी सृष्टी हिरवीगार झालेली असते, आपल्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित झालेल्या असतात. सगळीकडं सर्जनाचं मोहक वातावरण असतं. मला असं आवडतं. हे सगळं खूप नैसर्गिक आणि म्हणूनच खूप खरं आहे. इथं माणसाच्या जगातल्या फसवणुकीला, दांभिकतेला, छक्क्या-पंजांना जागा नाही.’
गणू वैषम्यानं म्हणाला, ‘माणसाचं आयुष्यही एवढं निर्मळ असतं, तर अजून काय हवं होतं?’
मन हसत म्हणालं, ‘पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आपल्याला थेट त्या निर्झराच्या पाण्यासारखं व्हायचंय, नितळ अन् पारदर्शक!’
गणू म्हणाला, ‘माझं स्वातंत्र्य आणि तुझा नैसर्गिक सच्चेपणा एकत्र आला तर काय बहार येईल!’
मन म्हणालं, ‘अगदी... कसं बोललास! चल, आता स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थानं साजरा करू. बोला, भारतमाता की जय...’

(क्रमश:)

---

(सहावा भाग काही कारणाने अंकात प्रसिद्ध झालेला नाही. तो इथेच वाचायला मिळेल.)

---

No comments:

Post a Comment