1 Aug 2019

मटा लेख - १ ऑगस्ट १९

धोक्याची घंटा
-----------------

आपण छान मूडमध्ये नाटक बघायला आलेले असतो. बाकी सर्व चिंता, विवंचना बाजूला ठेवून आता दोन-अडीच तास समोर घडणाऱ्या नाट्यात हरवून जायचं अशी खूणगाठ आपण मनाशी बांधलेली असते. पहिली घंटा होते, मग आपण जरा सावरून बसतो. दुसरी घंटा होते. आता आपलं मन पूर्णत: त्या नाट्यगृहाच्या आत निर्माण झालेल्या वातावरणाशी एकरूप झालेलं असतं. अधीरता अगदी शिगेला पोचलेली असते. आणि मग, तिसरी घंटा होते आणि नाटक सुरू होतं... या प्रक्रियेतसुद्धा किती नाट्य आहे! पण हल्ली तेवढं बहुदा पुरत नसावं. म्हणून तिसरी घंटा होऊन नाटक सुरू झालं, तरी नाट्यगृहात वेगवेगळ्या घंटा वाजू लागतात. या घंटा असतात मोबाइलच्या... काही किणकिणत्या, काही गुणगुणत्या; पण बहुसंख्य ठणठणत्या अशा अनेकविध घंटा... त्या कधी वाजतात, तर कधी बंद होतात. आपल्या डोक्यात मात्र एक धोक्याची घंटा लगेच सुरू होते - आणि ती असते, नाटकाचा बेरंग होण्याची घंटा!
हल्ली हा अनुभव वारंवार यायला लागला आहे. केवळ नाट्यगृहांतच नव्हे, तर चित्रपटगृहांत, शास्त्रीय संगीताच्या मैफलीत किंवा अगदी चित्रप्रदर्शनांतही. आपल्याला एकाग्रपणे कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताच येणार नाही, याबद्दल प्रेक्षकांची आता खात्री पटत चालली आहे. याचं कारण आपल्या हातात आलेला मोबाइल नावाचा उपद्रव. वेळी-अवेळी वाजणाऱ्या मोबाइलच्या रिंगमुळे या सर्व ठिकाणी आपल्याला त्रास होऊ लागला आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी मोबाइल ‘सायलेंट मोड’वर टाकण्याची सूचना दिली जाते. मात्र, ती काही जणांना समजत तरी नाही किंवा ते दुर्लक्ष तरी करतात. असे लोक थोडेच असतात हे खरंय; पण त्यांच्यामुळं होणारा उपद्रव मात्र सगळ्यांना सहन करावा लागतो. हल्ली सुमीत राघवन आणि सुबोध भावे यांच्यासारख्या स्टार कलाकारांनी या मोबाइल उपद्रवाबद्दल सोशल मीडियातून आवाज उठवल्यामुळं तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. त्यांच्या या भूमिकेवर समर्थनार्थ आणि विरोधात अशा दोन्ही बाजूंनी फैरी झडत आहेत. नाटक किंवा कुठलीही कलाकृती सादर होत असताना, प्रेक्षक म्हणून आपण काही मूलभूत नियम पाळले पाहिजेत, याबाबत काही दुमत नसावे. आम्ही तिकीट काढून नाटक बघतो, त्यामुळे आम्ही वाट्टेल तसे वागू, या सबबीला तर अर्थच नाही.  आपण अनेक सेवांसाठी पैसे मोजतो. ते पैसे त्या सेवांसाठी असतात; त्या बदल्यात आपण केवळ ती विशिष्ट सेवा विकत घेतलेली असते. सेवा देणारे लोक आपले नोकर होत नाहीत, ही गोष्ट अशा सबबी सांगणाऱ्यांनी ध्यानात ठेवायला हवी. ‘विमानाचं तिकीट काढलंय, पैसे मोजलेत म्हणून आता जरा पाच मिनिटं खिडकी उघडू द्या,’ असं म्हणून चालेल काय? किंवा हॉटेलमध्ये पैसे मोजले, म्हणून आपण तिथल्या प्लेट उचलून घरी आणत नाही. नाटकाचं तिकीट काढलंय, याचा अर्थ ती कलाकृती बघण्यासाठी मोजलेले ते दाम आहेत. त्या बदल्यात एक चोख कलाकृती सादर करण्याचं काम कलाकारांचं आहे. त्यामुळं कलाकारानं त्याच्या इतर वैयक्तिक अडचणी काहीही असल्या, तरी रंगमंचावर पाऊल ठेवल्यापासून ते पडदा पडेपर्यंत आपल्या भूमिकेत शिरून काम केलंच पाहिजे, ही अपेक्षा जेवढी रास्त, तेवढीच प्रेक्षकांनी त्या कलाकृतीचा सामुदायिक आस्वाद घेता येण्यासाठी केलेल्या नियमांचं पालन करण्याची अपेक्षाही योग्यच! 
जेव्हा या अपेक्षांना काही कारणांनी तडे जायला सुरुवात होते, तेव्हा खरी अडचण येते. जेव्हा या अपेक्षा उभयपक्षी मान्य असतात आणि दोघांकडूनही त्या व्यवस्थित पाळल्या जातात, तोवर सगळं छानच चाललेलं असतं. मात्र, हल्ली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळं या अपेक्षा पूर्ण होणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. मोबाइल वापरणाऱ्या अनेक लोकांना तो वापरण्याच्या सभ्य पद्धती अजिबात माहिती नसतात. मुळात एखादी व्यक्ती नियम पाळते म्हटलं, की सगळेच नियम पाळते आणि नियम तोडणारे सगळीकडेच नियम तोडतात. समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसणे किंवा मागून लाथा मारणे इथपासून ते मध्यंतरात चहा-वड्याच्या स्टॉलवर ढकलाढकली करणे, अगदी स्वच्छतागृहातही किळस येईल अशा पद्धतीने वागणे अशा गोष्टी करणारे लोकच मोबाइल वाजविणाऱ्यांमध्ये आघाडीवर दिसतात. याशिवाय नाटकाला येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त असते. त्यांना मोबाइल नीट ‘सायलेंट मोड’वर टाकता येत नाही. फोन वाजला, की तो घेतलाच पाहिजे अशा मानसिकतेची ही पिढी आहे. नाटक सुरू असताना अचानक फोन वाजला, की त्यांची होणारी धांदल बघायची. वास्तविक, मोबाइल स्विच ऑफ करणे किंवा सायलेंट मोडवर टाकणे हे फारच सोपे काम आहे. ही पिढी आपल्या नातवांकडूनही ते सहज शिकू शकते. या लोकांकडून मुद्दाम हे घडत नाही, हे जेवढं खरं, तेवढंच हे घडू नये यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत, हेही तितकंच खरं!
काही नाटकं अगदी टाइमपास स्वरूपाची, विनोदी असतात; तर काही गंभीर, रहस्यमय, गूढ अशी असतात. पहिल्या प्रकारच्या नाटकांच्या वेळी एखादा मोबाइल वाजला, तर कलाकारही फारशी हरकत घेत नाहीत. (खरं तर कुठल्याही वेळी मोबाइल वाजणं हे चुकीचंच...) मात्र, दुसऱ्या प्रकारची नाटकं सुरू असताना कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एकतानता निर्माण व्हावी लागते. प्रेक्षक कलाकारांच्या जोडीनं त्या कथाभागामध्ये स्वत:ला गुंतवून घेत असतात. रंगमंचावर एक वातावरण तयार होत असतं. अशा वेळी नाटककारानं (‘ब्लॅक-आउट’व्यतिरिक्त) काही शांततेचे क्षण, काही विराम पेरलेले असतात. ती शांतता, ते विराम हे त्या नाटकाचेच, त्या कथानकाचेच भाग असतात. प्रेक्षकांनी त्या शांततेचा, त्या विरामांचाही आस्वाद घ्यायचा असतो. त्या क्षणापूर्वी घडलेलं नाट्य मेंदूत मुरवून घ्यायला जी थोडी उसंत हवी असते, ती मिळवून देण्याचं अतिरिक्त कामही हे विराम करीत असतात. अशा वेळी त्या शांततेचा गळा घोटत, कर्कशपणे मोबाइलची रिंग वाजते, तेव्हा काय उच्च प्रतीचा रसभंग होत असेल, याची कल्पना खरा नाटकवेडा करू शकतो.
असे रसभंगाचे प्रकार वारंवार का होत असावेत? जरा विचार करता, असं लक्षात येतं, की अलीकडे मोबाइलच्या अतिवापरामुळं आपल्या सगळ्यांचीच लक्ष एकाग्र करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे आपण सलग एका जागी बसून, एकच एक गोष्ट करत बसण्याचे प्रसंग कमी झाले आहेत. मोबाइलवर आपल्याला हवा तसा, हवा त्या वेळी सिनेमा पाहण्याची सोय झाल्याने आपण थिएटरमध्येही तसाच सिनेमा बघण्याचा प्रयत्न करतो. ते शक्य न झाल्यास अस्वस्थ होऊन मोबाइल बाहेर काढतो. अनेकांना सतत आपल्याला कुणाचा फोन तर नाही ना आला, मेसेज तर नाही ना आला, हे अधूनमधून तपासण्याची सवय असते. नाटक सुरू असतानाही मग ही सवय अचानक सुटत नाही. केवळ फोनच्या आवाजानेच नाही, तर फोन बाहेर काढल्यावर त्याच्या स्क्रीनचा जो लाइट येतो, त्यानेही अनेकांना डिस्टर्ब होतं. पण काही काही निरागस जनांच्या हे अजिबातच लक्षात येत नाही. आता नाट्यगृहाच्या परिसरात जॅमर बसवा किंवा नाट्यगृहाबाहेर मोबाइलसाठी लॉकर सुरू करा, असे अनेक उपाय सुचविले जात आहेत. ते व्यवहार्य नाहीत. सुबोध आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नाट्यगृहाच्या दरवाजावर उभं राहून सगळ्यांचे फोन तपासण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आता या सगळ्यांचीच तळमळ समजण्यासारखी असली, तरी हे तात्कालिक उपाय झाले. यामुळे तेवढ्यापुरता परिणाम होईल. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! हे दुर्दैवी असलं, तरी हेच खरं आहे. यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहे. आपल्याला नाटकाचा आस्वाद सगळ्यांसोबत घ्यायचा असेल, तर मोबाइल पूर्णपणे स्विच ऑफ करून ठेवणे हा आणि हाच यावरचा एकमेव उपाय आहे. तसं झालं नाही, तर कलाकार असाच उद्वेग व्यक्त करत राहतील आणि आपण पुन्हा मोबाइलचे आवाज करीत नाटक पाहत बसू. खरी धोक्याची घंटा आहे ती हीच!

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, १ ऑगस्ट २०१९)

---

No comments:

Post a Comment