20 Jul 2019

बाकीबाब आणि मी - रसग्रहण

सुखानेही असा जीव कासावीस
-----------------------------



बा. भ. बोरकर म्हणजे कोकणी व मराठीतले एक महत्त्वाचे कवी. बोरकरांच्या कविता नादमय, गेय आणि रसरशीत असतात. त्या वाचताना वाचकाला जगण्यावर भरभरून प्रेम करावंसं वाटतं. बोरकरांना शब्द प्रसन्न होते. त्यांची शब्दकळा सुरेख आणि सुरेल होती. स्वत:ला ‘पोएट बोरकर’ म्हणवून घेणारे हे देखणे, रसिले व्यक्तिमत्त्व १९८४ मध्ये काळाच्या पडद्याआड गेले. तेव्हा मी फारच लहान, म्हणजे केवळ ८-९ वर्षांचा होतो. त्यांच्या निधनाची बातमी पेपरमध्ये वाचल्याचं मला आठवतंय. पण बाकी या व्यक्तिमत्त्वाचा खरा परिचय व्हायचा होता. तो खूप नंतर झाला. पु. ल. आणि सुनीताबाईंनी बोरकरांच्या कवितेचा जो कार्यक्रम केला होता, त्याची ऑडिओ क्लिप मी मोबाइलवर ऐकली आणि त्या वेळी खऱ्या अर्थानं या कवीची नीट ओळख झाली, असं म्हणता येईल. 
त्याआधी सलील कुलकर्णीच्या ‘संधीप्रकाशात’ व नंतर ‘क्षण अमृताचे’ या अल्बममध्ये बोरकरांच्या कविता गाणी म्हणून समोर आल्या आणि बोरकर तर आवडू लागलेच; पण सलीलच्या चाली आणि त्यानं केलेली गाणीही खूप भावली. कवितेवर मन:पूत प्रेम करणारा माणूसच अशी गाणी देऊ शकतो. सलील केवळ संगीतकार नाही, तर मुळात तो आधी एक चांगला वाचक, आस्वादक आहे. कवितांचा तर त्याचा व्यासंगच आहे. त्याला अनेक कवींच्या अक्षरश: शेकडो रचना मुखोद्गत आहेत. शब्दांवर विलक्षण प्रेम असल्याशिवाय हे घडू शकत नाही. सलीलची आणि माझी ओळख वीस वर्षांहून अधिक काळ आहे. आता चांगली मैत्रीच आहे. त्याचं कवितेवरचं, शब्दांवरचं प्रेम अतिशय आनंददायक आहे. त्यात मंचीय कार्यक्रम रंगवण्यात सलीलचा हातखंडा आहे. सलीलमध्ये एक खोडकर, मिश्कील मूल दडलंय असं मला नेहमी जाणवतं. त्याच्या डोळ्यांतून ते अनेकदा दिसतं. बोरकरांच्या कवितांना सलीलने लावलेल्या चाली ऐकल्यावर खास बोरकरांवर सलीलनं कार्यक्रम करावा, असं फार वाटायचं. मी त्याला हे बोलूनही दाखवलं होतं. आपण एखादी इच्छा धरावी आणि ती तत्काळ फलद्रूप व्हावी, असं फार क्वचित घडतं. पण बोरकरांच्या कविता आवडणाऱ्या सगळ्या चाहत्यांचं एकत्रित पुण्य फळाला आलं असावं. कारण १९ जुलैला ‘बाकीबाब आणि मी’ असा कार्यक्रम करीत असल्याचं सलीलनं या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलं आणि मला तर अचानक लॉटरी लागल्यासारखा आनंद झाला.
‘देखणी ती पाऊले’ या बोरकरांच्या प्रसिद्ध कवितेच्या वाचनाने कार्यक्रम सुरू झाला. आमचे अण्णा - किरण यज्ञोपवित - यांनी त्यांच्या खर्जातील आवाजात ही कविता सादर केली आणि मैफलीची सुंदर नांदीच झाली. त्यानंतर बोरकरांची आणि आपली पहिली भेट कशी झाली, याचा किस्सा सलीलनं सांगितला आणि त्यांची ‘कशी तुज समजावू’ ही अत्यंत गोड रचनाही ऐकविली. नंतर ‘डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्यासवे झुलू’ या आनंद मोडकांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मुकुंद फणसळकर व श्रीकांत पारगावकरांनी गायिलेल्या गाण्याचा (मूळ निर्मिती चंद्रकांत काळे व ‘शब्दवेध’) उल्लेख झाला. ‘नको घुसळू पाण्यात खडीसाखरेचे पाय’ या ओळी तर खल्लासच! नंतर मग सलीलनं पहिल्यांदा बोरकरांची जी कविता स्वरबद्ध केली, त्या ‘तव नयनांचे दल हलले गं’ या अत्यंत गाजलेल्या कवितेची आठवण निघाली. सलीलनं त्याच्या नेहमीच्या ढंगदार शैलीत हे गाणं सादर केलं आणि मैफलीला रंग चढू लागला. 
बोरकरांच्या मधुराभक्तीच्या कवितांचा खास उल्लेख झाला. त्यात सलीलची (आणि माझीही) अत्यंत आवडती अशी ‘माझ्या कानी बाई बाई वाजे अलगूज’ ही कविता आली. ‘सुखानेही असा जीव कासावीस’ ही ओळ याच कवितेतील. ही मैफल जसजशी रंगत गेली तशी रसिकांची अवस्था जवळपास अशीच झाली.
या कार्यक्रमात नेहमीच्या लोकप्रिय रचनांसोबत सलीलनं काही नव्या रचनाही ऐकवल्या. तिकीट काढून येणाऱ्या रसिकांना आपण काही तरी नवंही दिलं पाहिजे, अशा रास्त आग्रहास्तव सलीलनं या तीन रचना अगदी नुकत्याच कंपोझ केल्या. ‘अशी मारशील कुणाला गं’ आणि ‘हरिणी’ या दोन रचनांना आणि वाद्यवृंदाला खास दाद मिळाली. पण मला सगळ्यांत अधिक आवडली ती सलीलनं म्हणून दाखवलेली ‘खेड्यातच त्याची सारी हयात केली’ ही अप्रतिम कविता. कॉलेजच्या काळात पाठ असलेली कविता सलीलनं एवढ्या वर्षांनंतरही जशीच्या तशी म्हणून दाखविली. ही कविता मी पूर्वी वाचली नव्हती किंवा ऐकली नव्हती. नेहमीच्या कविताही सलीलनं त्याच्या खास शैलीत ऐकविल्या. श्रोत्यांशी संवाद साधत, हास्यविनोद करीत मैफल रंगवण्याचं एक तंत्र आहे. सलील त्यात वाकबगार आहे. या वेळी जोडीला किरणच्या खर्जातल्या आवाजात बोरकरांच्या ‘इंटेन्स’ कविता ऐकणं हा एक अनुभव होता. ‘दिसली नसतीस तर...’ ही सुनीताबाईंनी अजरामर केलेली कविता त्यांचा प्रभाव पुसून सादर करणं कठीण काम. पण किरणनं ते केलं. सई टेंभेकर आणि मेघना सरदार या दोघींनीही काही रचना अतिशय समजून गायल्या. आदित्य आठल्ये, डॉ. राजेंद्र दूरकर व रितेश ओहळ या तिघांनीही अत्यंत नेमकी साथसंगत केली. दूरकर तर किती विविध प्रकारची वाद्यं वाजवतात! रितेश यांची गिटारही जबरदस्त!

या कार्यक्रमाचं नेपथ्य उत्तम होतं. दोन्ही बाजूंनी बोरकरांच्या कविता लिहिलेले फलक उभारण्यात आले होते. मागे डिजिटल पडदा होता आणि त्यावर कवितेनुसार प्रतिमा उमटत होत्या. म्हणजे ‘सरीवर सरी आल्या गं’ हे गाणं चालू असताना मागे पावसाच्या सरी व टपोरे थेंब पडताना दिसत होते. वास्तविक हा प्रकार गाण्याच्या आस्वादात अडथळा आणणारा ठरू शकला असता. पण त्या स्क्रीनवरील रंगांचा वापर आणि प्रकाशयोजना एवढी उत्तम होती, की या नेपथ्याने मूळ गाण्यांच्या आस्वादाला अडथळा न आणता, मखराची भूमिका बजावली. एकूण नक्षी सगळीच जमून आली. 
अशा कार्यक्रमाला प्रेक्षकही सुजाण लागतो. सलीलच्या प्रेमापोटी तिथे जमलेले बहुतेक सगळेच खऱ्या अर्थानं रसिक होते. चांगलं वाचणारे, चांगली दाद देणारे होते. त्यामुळं हा केवळ मंचीय आविष्कार न राहता, त्याला मैफलीचं स्वरूप आलं. सलीलनंही निवेदनात हे बोलून दाखवलं. 
खरं तर अशा प्रकारच्या मैफली वारंवार व्हाव्यात. बोरकरांसारखे आनंददायक कवी सर्व मराठी जनांपर्यंत पोचावेत. सलील हे काम करू शकतो. तसं झाल्यास मराठी भाषेची ती फार मोठी सेवा ठरेल. तूर्त बोरकरांच्या सुरेख शब्दकळा आठवत आनंद लुटत राहायचं. 
बोरकरांची मला अतिशय आवडणारी कविता शेवटी शेअर करावीशी वाटते. 

बोरकर लिहितात -

स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ति नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा
शोक हवा परि वाल्मिकिच्या परि सद्रव अन् सश्लोक हवा
हर्ष हवा परि स्पर्शमण्यापरि त्यांत नवा आलोक हवा
शंतनुचा मज मोह हवा अन ययातिचा मज देह हवा
पार्थाचा परि स्नेहविकंपित स्वार्थ सदा संदेह हवा
इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा हृद्रोग हवा
योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा
आयु हवे आरोग्य हवे यशभाग्य तसा प्रासाद हवा
श्लाघ्य हवे वैराग्य तयास्तव त्यांत विरोध विषाद हवा
तापासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा
शिळांत पिचतां जळांतुनी मज निळा निळा उःशाप हवा
मार्क्साचा मज अर्थ हवा अन् फ्रॉइडाचा मज काम हवा
या असुरां परि राबविण्या घरिं गांधींचा मज राम हवा
लोभ हवा मज गाधिजमुनिचा अखंड आंतर क्षोभ हवा
पराभवांतहि अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा
पार्थिव्यांतच वास हवा परि दिव्याचा हव्यास हवा
शास्त्रांचा अभ्यास हवा परि मानव्याचा ध्यास हवा
विश्व हवे सर्वस्व हवे अन् मृत्यू समोर सयंत्र हवा
शरांत परि ही विव्हळतां तनु उरांत अमृतमंत्र हवा
हविभुक सुरमुख मी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा
हे सुख दुर्लभ वाढविण्या मज चौर्‍यांशीत प्रवास हवा

----


No comments:

Post a Comment