29 Jun 2019

जगणं मस्त मजेचं... जून २०१९

जगणं मस्त मजेचं...
---------------------


रसिकहो नमस्कार,
‘जगणं मस्त मजेचं’ ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दर शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता (आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ‘विविधभारती’वर) प्रसारित होणारी लोकप्रिय कौटुंबिक श्रुतिका मालिका..! या मालिकेसाठी लिखाण करण्याची संधी मला गौरी लागू आणि आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक गोपाळ औटी यांनी दिली. मी यानिमित्ताने श्रुतिका प्रथमच लिहिली. पुण्यात राहणाऱ्या, कुणाल व रेणू या आधुनिक, आजच्या काळात जगणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर ही काल्पनिक श्रुतिका लिहायची होती. हे काम मला आवडलं... कुणाल इंजिनीअर, तर रेणू मराठीची प्राध्यापिका असते...
मी या मालिकेसाठी गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने लेखन केलं. आता या वर्षी मे व जून हे दोन महिने मी या मालिकेसाठी स्क्रिप्ट लिहीत आहे. या मालिकेसाठी मे महिन्यासाठी लिहिलेले स्क्रिप्ट आधीच ब्लॉगवर शेअर केले आहेत. आता जून महिन्यासाठी लिहिलेले पाच भाग इथं शेअर करतो आहे. अर्थात या स्क्रिप्टचं वाचन करणारे अमित वझे (कुणाल), रूपाली भावे-वैद्य (रेणू), आरती पाठक (सई), दीप्ती भोगले (दिघेकाकू), गोंधळेकरकाका (बाळाजी देशपांडे), देशमुख सर (संजय डोळे), पूर्वा बाम (सायली), प्रतुल पवार (प्रकाश), प्रांजली बर्वे (वर्षा) यांच्यामुळं ही श्रुतिका खऱ्या अर्थानं श्रवणीय झाली. नुकताच १२ मे रोजी या श्रुतिकेचा पन्नासावा भाग ‘आकाशवाणी’त रेकॉर्ड झाला आणि तेव्हा रेकॉर्डिंगला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. 
आकाशवाणीसाठी लिहावं ही माझी खूप जुनी इच्छा होती. गेल्या दोन-तीन वर्षांत तशा काही संधी मिळाल्या, तरी श्रुतिका हा प्रकार लिहायला मिळेल, असं वाटलं नव्हतं. ‘जगणं मस्त मजेचं’ या मालिकेच्या निमित्तानं माझी ही इच्छाही पूर्ण झाली, याचा मनापासून आनंद आहे. 

(* हे स्क्रिप्ट आणि प्रत्यक्षात सादर झालेले भाग यात थोडेफार बदल आहेत. कधी कलाकारांनी इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, तर कधी काही भाग एडिट झाला आहे. पण एकूण इफेक्ट अर्थातच खूप चांगला आला आहे.)

-----

जगणं मस्त मजेचं... १ जून २०१९
-------------------------------

कुणाल (गुणगुणतोय) - बार बार दिन ये आए, बार बार हम ये गाए, तुम जियो हजारो साल, ये मेरी है आरजू... हॅपी बर्थ डे टु यू... हॅपी बर्थ डे टु यू... हॅपी बर्थ डे टु यू सुनीता, हॅपी बर्थ डे टु यू....
रेणू (हसते) - आता ही कोण सुनीता नवीन काढलीयेस बाबा?
कुणाल - अगं कुणी नाही गं... ती सिनेमातलीच. पण आज सकाळपासून वेगवेगळ्या ग्रुपवर एवढे बर्थ डे विशेसचे मेसेजेस पडताहेत ना, की बस्स! आणि त्यात हे गाणं... 
रेणू - अरे, आजच्या दिवसाचा महिमाच आहे तसा... आज एक जून! हा आपल्याकडचा राष्ट्रीय वाढ-दिवस म्हणायला हवा. कित्येक लोकांचे वाढदिवस असतात आज...
कुणाल - हो. पूर्वी लोकांना जन्मतारीख माहितीच नसायची. मग शाळेत दाखल करताना बहुतेकांच्या जन्मतारखा एक जून, १५ जून अशा नोंदविल्या जायच्या. खूप लोकांचे वाढदिवस त्यामुळं या दिवशी असतात. ते खरे असताच असं नाही.
रेणू - माहितीय अरे! म्हणूनच मी राष्ट्रीय वाढ-दिवस असं म्हटलं. आमच्या कॉलेजमध्ये अजूनही किती तरी मुलांचे वाढदिवस याच दिवशी असतात. 
कुणाल - म्हणजे अजूनही कित्येक मुलांना त्यांचे वाढदिवस माहिती नसतात? विश्वास बसत नाही बरं का...
रेणू - अरे, ग्रामीण भागात अजून फार परिस्थिती बदलली नाहीय बाबा... विश्वास बसणार नाहीच तुझा...
कुणाल - बरं, ते जाऊ दे. मला आज ब्लॅक फॉरेस्टचाच केक हवा.
रेणू - आँ? आज काय मधेच कुणालमहाराज? केक कशामुळं खावासा वाटतोय तुम्हाला?
कुणाल - अगं का म्हणून काय विचारतेयस रेणू... हा राष्ट्रीय वाढ-दिवस आहे ना, मग आपण नको का तो साजरा करायला?
रेणू - कर बाबा कर... तुमचा पगारही झाला असेल आज... आमच्या कॉलेजला तशी घाई नसते. निवांत होतो कधी तरी पाच, सहा तारखेला...
कुणाल - अहो मॅडम, पण आम्ही तेवढं राबतो पण बरं का!
रेणू - वा रे वा... आणि आम्ही बायका काय ऑफिसात मंगळागौरीचे खेळ खेळायला जातो काय रे? वा?
कुणाल - पण काहीही म्हण हं रेणू... आमची कंपनीच चांगली आहे तुमच्या कॉलेजपेक्षा...
रेणू - राहू द्या, राहू द्या... हा वाद काही संपायचा नाही. आणि तू ब्रेकफास्टचं काय ठरवलंयस? काही करणार आहेस घरी, की मागवणार आहेस बाहेरून? कारण मला दिघेकाकूंकडं जायचं आहे. साराचं पाळणाघर सुरू होईल ना परवापासून... त्याबद्दल जरा बोलायचंय...
कुणाल - मी एक काम करतो. मी इडली-मेदूवडा सांबार पार्सल घेऊन येतो आणि आपण दोघंही दिघेकाकूंकडं जाऊ. मीही बरेच दिवसांत गेलेलो नाहीय त्यांच्याकडं. त्यांनाही सांग.
रेणू - अरे, मग त्यांचंही पार्सल घेऊन चल ना. 
कुणाल - तेच सांगतोय रेणू. तिकडंच जाऊ...
रेणू - ओके, चल...

(दिघेकाकूंचं दार वाजवतात...)

रेणू - काकू, आहात का घरात?
दिघेकाकू - अगं रेणू, ये ये. तुझीच वाट बघत होते. काल फोन केला होतास ना... कुणाल पण आलाय का? ये ये... बसा रे दोघं... पाणी आणते.
कुणाल - काकू, राहू द्या. आणि आम्ही इडली-सांबार मागवलंय. येईल तो माणूस इतक्यात... आज ब्रेकफास्ट आमच्यातर्फे...
दिघेकाकू - अरे, मला मेलीला कशाला रे ब्रेकफास्ट आणि हे सगळं? मी दोन वेळ जेवते बघ. त्यातही रात्री तर फार कमी. शक्यतो फलाहार...
कुणाल - अहो काकू, तुमचा डाएट प्लॅन काय आहे ते तरी सांगा. मला पण फॉलो करायचा आहे हो. माझं वजन बघा, दिवसेंदिवस वाढतच चाललंय.
रेणू - काकू, छान आहे हे... कमीत कमी जेवण... आणि भुकेवर नियंत्रण... 
दिघेकाकू - अगं, आता माझं वय झालं. अन्नाची, ऊर्जेची गरज आहे ती तुम्हा तरुण लोकांना. तुम्ही व्यवस्थितच खाल्लं पाहिजे. 
कुणाल - काकू, ते सगळं बरोबर आहे. पण अहो, जिभेवर ताबाच राहत नाही अनेकदा. हे खाऊ की ते खाऊ असं होतं. मग मी दोन्ही खातो. (हसतो)
रेणू - आणि व्यायामालाही दांडी मारतो. 
कुणाल - रेणू, आत्ता इथं या दुखऱ्या जखमेवर डागण्या देण्याची खरंच गरज आहे का?
रेणू - हे बघ, तुझी तब्येत चांगली ठेवणं हे तुझ्याच हातात आहे. मी ओरडून काही उपयोग आहे का?
दिघेकाकू - अगं, त्याचं त्याला समजत असेल की... हे बघ कुणाल, आपल्या शरीराला बरोबर समजतं, की आपल्याला काय हवंय आणि काय नकोय! आपल्यासाठी काय चांगलंय आणि काय नाही... तेव्हा आपण आपल्या शरीराचं ऐकायचं. शरीर आपल्याला वेळोवेळी सिग्नल देत असतं. पण आपण त्याकडं दुर्लक्ष करतो.
कुणाल - बरोबर आहे काकू तुमचं...
रेणू - काकू, अगदी हेच मी सांगत असते याला. आपलं शरीर होता होईल तोवर आपल्याला साथ देत असतं. तुम्ही त्याच्याकडं दुर्लक्ष केलंत तरी ते बिचारं त्याची कामं करीत राहतं. पण मग कधी तरी कुरकुर करतं. मग आपलं डोकं दुखायला लागतं, पोट बिघडतं... आजारी पडायला होतं.
कुणाल - आणि हीच ती वेळ असते. आपण आपल्या शरीराचे सिग्नल ऐकण्याची!
रेणू - अरे, खरंच फार वेळ द्यावा लागत नाही. रोज किमान अर्धा ते पाऊण तास द्यायला काय हरकत आहे स्वतःच्या शरीरासाठी...
दिघेकाकू - मधे चालायला जात होतास ना रे? हल्ली दिसत नाहीस खाली....
कुणाल - अहो काकू, तेच ना! खंड पडलाय. पण आता पुन्हा सुरू करायला हवं. जिम पण लावली आहे. पण अनेकदा बुडतेच.
रेणू - कुणाल, याला काहीही अर्थ नाहीय. आपण शरीराचं ऐकलं नाही ना, की मग ते आपल्याला साथ देत नाही. मग त्याचे परिणाम फार वाईट असतात. 
दिघेकाकू - खरंय रेणू तुझं... आमच्या वेळी बायकांना एवढे शारीरिक कष्ट होते की, काही विचारू नकोस. मी तर जात्यावर दळण केलेलं आहे. दळण, कांडण, पाणी भरणं, २५ माणसांचा साग्रसंगीत स्वयंपाक करणं... आमच्या कमरेचा काटा अक्षरशः ढिला होऊन जायचा. पण तेव्हा पर्यायच नव्हता. काही सोयी नव्हत्याच गं...
रेणू - आणि आता अति सोयी आहेत, त्याचेही दुष्परिणाम आम्हालाच भोगावे लागताहेत. आता शरीराला काही हालचालच नाही.
कुणाल - ए रेणू, मला कडाडून भूक लागलीय आणि मी ते पार्सल अजून का आलं नाही, ते बघून येतो. आता मला काहीही बोलण्याची ताकद उरलेली नाही.
रेणू - जा, जा. तोवर मी काकूंशी गप्पा मारते.
दिघेकाकू - अरे, राहू दे. कुठं जातोस? थांब. येईल तो माणूस... तोवर तुला मी माझ्या घरातले पौष्टिक लाडू देते थांब. मुलांसाठी मी करूनच ठेवलेले असतात.
कुणाल - व्वा व्वा... काकू, कसं बोललात? द्या लाडू... आता काही मी इथून हलत नाही.
रेणू - छान. हे याचं असं आहे.
दिघेकाकू - असू दे गं. सध्या नाही तरी मुलं नाहीतच. ते लाडू पडूनच आहेत. कोण खाणार?
रेणू - काकू, सध्या मुलांच्या सुट्टीमुळं तुम्हाला सुनं सुनं वाटत असेल नाही?
दिघेकाकू - अगं, हो... एवढी सवय झालीय ना चिवचिवाटाची. पण सध्या कुणीच नाही. आता सोमवारपासून येतील माझी पाखरं सगळी परत घरट्यात.
कुणाल - व्वा... खरंच... ही तुमची पाखरंच आहेत सगळी. या मुलांच्या सहवासात तुमचं मन फार आनंदी राहत असेल नाही का काकू?
रेणू - अरे, पण एवढ्या मुलांचं करायचं, त्यांना हवं-नको ते पाहायचं हे तसं त्रासाचंच काम आहे रे कुणाल...
दिघेकाकू - खरं सांगू का, तुम्हाला मुळात त्या कामाची आवड पाहिजे बघ. मग काही वाटत नाही. आता मला मुलांची आवड आहे. मी आपलं-परकं असं काही मानतच नाही. ही सगळी माझीच नातवंडं आहेत, असं समजून वागते. अगदी त्यांची शी काढण्यापासून ते कित्येकांना घास भरवण्यापर्यंत सगळं करते. माझा म्हातारीचा वेळही बरा जातो आणि चार पैसे मिळतात ते महत्त्वाचं.
कुणाल - काकू, ते जरी खरं असलं, तरी तुमचा उत्साह सगळ्यांकडं असतोच असं नाही. आता किती वर्षं झाली तुम्ही हे पाळणाघर चालवता आहात?
दिघेकाकू - अरे, आता पंधरा वर्षं होऊन गेली बघ. सुरुवातीला जरा जड गेलं मला. नाही असं नाही. पण आता अगदी सवयच झालीय. आमच्या वेळी अशी पाळणाघरं असती ना, तर मी पण या रेणूसारखी नोकरी केली असती बघ.
रेणू - काकू, खरंच. तुम्ही शिकलेल्या आहात. पदवीधर आहात. त्या काळात तुम्हाला सहज नोकरी मिळाली असती, नाही का?
दिघेकाकू - अगं हो, पण तेव्हा फार पद्धत नव्हतीच गं बायकांनी नोकरी करायची. हे गेल्या वीस-तीस वर्षांत जास्त वाढलं. पण मला स्वतःला आवडलं असतं नोकरी करायला. शिक्षणाचा उपयोग झाला असता.
कुणाल - नक्कीच झाला असता. आपल्याकडं तर अजूनही कित्येक मुली शिकतात खूप, पण नोकरी करतील किंवा काही तरी करिअर करतील असं होत नाही. विशेषतः लग्न झालं, की संपलंच. मोठी शहरं सोडली, तर अजूनही हेच चित्र बघायला मिळतं काकू सगळीकडं.
दिघेकाकू - खरंय बाबा. त्या मानानं रेणू नशीबवानच म्हणायला हवी.
रेणू - काकू, माझ्या बाबतीत काही प्रश्नच नव्हता. अहो, माझी आईसुद्धा नोकरी करत होती. त्यामुळं तिची मुलगी घरात बसून राहील, हे शक्यच नव्हतं.
कुणाल - आणि मलाही नोकरी करणारीच बायको हवी होती. घरात बसणारी नको होती. पण काकू, तुमचं हे पाळणाघर आहे म्हणून आम्ही दोघंही बाहेर नोकरीला जाऊ शकतो, हे मात्र शंभर टक्के खरं.
दिघेकाकू - अरे, माझं नसतं तर अजून कुणाचं तरी असतं. हल्ली आता काय आहे, ही एक प्रकारे काळाची गरज झाल्यासारखीच आहे. अनेक घरांत नवरा-बायको आणि त्यांचं एकुलतं एक मूल... एवढेच! आजी-आजोबासुद्धा नसतात सोबत. मला या मुलांची खरं तर दया येते. ही मुलं मोठी होऊन भावनाशून्य तर होणार नाहीत ना, अशी भीती वाटते. ती एवढी स्वतःमध्येच रमलेली असतात, की थक्क होते मी ते बघून...
रेणू - काकू, तुम्ही म्हणता, त्या मुद्द्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. हल्ली मानसशास्त्राच्या अंगानंही याचा खूप विचार होतोय. म्हणून आम्ही साराला भरपूर मित्र-मैत्रिणी असतील यावर लक्ष देतो. मागच्याच आठवड्यात ती मैत्रिणीकडं नाइट आउटला गेली होती. शिवाय आत्ये-मामे भावंडांमध्येही ती रमते. आम्ही आमच्या सगळ्या नातेवाइकांकडं जातो आणि त्यांनाही कायम आमच्या घरी बोलावतो. शिवाय आमचे मित्र-मैत्रिणीही आहेत आणि त्यांची सगळ्यांची मुलंही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. 
दिघेकाकू - व्वा... अगं, असं असेल तर किती छान आहे हे! पण सगळेच पालक तुझ्यासारखे जागरूक नसतात आणि एवढा विचारही करत नाहीत.
कुणाल - हल्ली तर मुलांच्या हातात मोबाइल देऊन पालक स्वतःची सुटका करून घेतात. हे तर भयंकर आहे.
दिघेकाकू - अगदी. त्यामुळं आमच्या इथं मुलांकडं मोबाइल तर सोडच, पण बाकी कसलंही इलेक्ट्रॉनिक, ते काय तुम्ही म्हणता त्याला, ते काहीही द्यायला मी पूर्ण बंदी केलीय आहे.  
रेणू - गॅजेट...
दिघेकाकू - हां, तेच तेच... मी ते मुलांना इथं अजिबात खेळू देत नाही. इथं मुलं बैठे खेळ खेळतात. 
कुणाल - हे बाकी फार चांगलं करता काकू तुम्ही. आम्ही सगळ्यांना सांगतो नेहमी तुमच्या पाळणाघरातच आम्ही साराला का ठेवतो ते...
रेणू - मुलांना लहान वयात एवढा उत्साह असतो, एवढं काय काय करावंसं वाटत असतं, एवढं बागडावंसं वाटत असतं... पण आपण त्यांना हाताता मोबाइल देऊन एका जागी स्थानबद्ध करून टाकतो अगदी.
कुणाल - भयंकर किस्से ऐकतोय मी सध्या याबाबत. आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये तर नेहमीच चर्चा चालते यावर... म्हणजे हे कसं चुकीचं आहे यावर सगळ्यांचं एकमत आहे. पण याला पर्याय काय हे फार कमी लोक सुचवतात.
दिघेकाकू - आपल्याकडं हेच फार आहे. चर्चा खूप. प्रत्यक्ष कृती कमी... सगळ्यांच बाबतीत हे दिसतं.
रेणू - काकू, तुमचं मात्र तसं नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम असता. आणि तसं सगळ्यांना वागायला सांगता, हे महत्त्वाचं.
कुणाल - खरंय रेणू. काकू, बाकी लाडू फार मस्त झाला होता हं... अगदी घरच्यासारखा...
दिघेकाकू - अरे, म्हणजे काय? मी घरीच केलेयत ते लाडू... तुला एवढे आवडलेयत तर डब्यात घालून देते आणखी चार लाडू. रोज खा घरी...
रेणू - झालं. आता कुणाल मला पाळणाघरातच ठेवून घ्या, असं नाही म्हटला म्हणजे मिळविली.
दिघेकाकू (हसतात) - अगं, काय गं हे? किती चेष्टा करतेस त्याची...
कुणाल - बघा तुम्हीच काकू. बाकी मला तुमच्याकडून एक गोष्ट नीटच समजली आहे आणि ती मी नक्की फॉलो करीन.
दिघेकाकू - कोणती रे बाबा?
कुणाल - अहो, मॅनेजमेंट! तुमचं व्यवस्थापनाचं कौशल्य घेण्यासारखं आहे. स्वतःच्या आहार-विहाराचं आणि त्याचबरोबर या पाळणाघराचं व्यवस्थापन तुम्ही किती उत्तम पद्धतीनं केलेलं आहे. व्वा व्वा...
दिघेकाकू - मला कसलं डोंबलं येतंय रे मॅनेजमेंट? काही नाही. मी आपलं मला जे सुचेल ते करते.
रेणू - काकू, यालाच आम्ही वयानं आलेलं समजूतदार शहाणपण असं म्हणतो. कितीही शिकलेला माणूस असला, तरी त्याच्याकडे हे असेलच असं नाही. त्याच्याकडं थिअरीज असतील, मोठमोठे सिद्धान्त असतील, पण जगणं सोपं करणाऱ्या चार साध्या युक्त्या असतीलच असं नाही. त्या सापडतात तुमच्यासारख्या साध्या, पण हुशार गृहिणींकडेच...
दिघेकाकू - बाई, बाई... पुरे झालं हं मेलं ते कौतुक... आधी तुमचा तो ब्रेकफास्टवाला कधी येतो ते बघा बरं. आता मलाही भूक लागलीय खरी.

(दार वाजल्याचा आवाज येतो.)

कुणाल - हे बघा. आलाच ब्रेकफास्ट... चला आता गप्पा कमी... आधी खाऊन घेऊ... मग पुन्हा पोटभर गप्पा मारू...
दिघेकाकू - अजून पोट भरलं नाही का रे तुझं?
कुणाल - तसं नाही. पण तो एक पौष्टिक लाडू जरा मिळाला असता अजून एक तर....
रेणू - कुणाल ऽऽऽऽ

(सगळे हसतात.)

---

जगणं मस्त मजेचं... ८ जून २०१९
-------------------------------------

रेणू (गुणगुणते) - पाऊस पहिला जणू कान्हुला, बरसून गेला, बरसून गेला... पाऊस पहिला...
कुणाल - व्वा रेणू व्वा... छान गातेयस... किती दिवसांनी हे गाणं ऐकलं... पूर्वी रेडिओवर लागायचं... 
रेणू - अरे, अजूनही लागतं. मला आवडतं. हे गाणं म्हटलं ना, तरी मला पाऊस आल्याचा फील येतो. आतल्या आत गार वाटायला लागतं.
कुणाल - खरंय. पावसाचा नुसता वास आला, तरी पावसाची गाणी, कविता आठवतात. अगदी राज कपूरच्या 'बरसात में हम से मिले तुम सजन तुम से मिले हम... बरसात में'पासून ते आमीरच्या 'टिप टिप टिप टिप बारीश शुरू हो गई'पासून सगळी पाऊस गाणी आठवतात.
रेणू - मला 'पाऊस कधीचा पडतो' किंवा 'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' ही ग्रेसची गाणी आठवतात. शहाराच येतो अंगावर...
कुणाल - निसर्गाची पण काय कमाल असते ना रेणू खरंच. कसं कळतं त्याला की, जून उजाडलाय. वातावरण लगेच बदलतं. हवेत गारवा येतो. 'गारवा'वरून आठवलं, आम्ही कॉलेजला असताना ती 'गारवा'ची गाणी काय गाजली होती... गारवा... (गुणगुणतो) अहाहा...
रेणू - बास, बास, बास... आता पावसाच्या कवितांची आणि गाण्यांचा विषय काढलास तर पुढची कामं अवघड होऊन जातील. आपण दिवसभर इथंच गप्पा मारत बसू शकतो या विषयावर...
कुणाल - क्या बात है रेणू... रोमँटिक मूड? आँ? 
रेणू - हा पाऊस मूड आहे. छान असतो तो... मला ना तुझ्यासारखं असं ट्वेंटीफोर बाय सेव्हन रोमँटिक मूडमध्ये नाही राहता येत रे... बघ. मला ब्रेकफास्टची आठवण झाली. काय करतोयस बोल...
कुणाल - किती अरसिक आहे गं तू रेणू... इथं मी एवढी प्रेमाची ओलीचिंब गाणी म्हणतोय आणि तू ब्रेकफास्टचं काय काढतेस? छ्या! 
रेणू - तो ओलाचिंब टॉवेल पडलाय ना केव्हापासून सोफ्यावर... तो उचलून आधी वाळत घाल. आणि सांग ना, ब्रेकफास्टचं काय करतोयस ते...
कुणाल - मी भजी करू का? आपोआप पाऊस पडल्याचा फील येईल.
रेणू - कर. जे काही करायचं ते लवकर कर. मला कॉलेजात जायचंय. मीटिंग आहे.
कुणाल - अरे हो, तुमचं रुटीन सुरू झालं नाही का? मला मात्र अजूनही ती मे महिन्याची सुट्टी सुरूच आहे तुझी, असंच वाटतंय. 
रेणू - काही नाही. झालं आता. सुट्टी संपली. इलेक्शन पण संपली. नवं सरकार - म्हणजे तेच सरकार, पण नव्यानं - आलं. कामालाही लागलं. आम्हीही कॉलेजात जायला लागलो. पण तुझा वीकएंड मूड मात्र अमर आहे.
कुणाल - म्हणजे काय रेणू? आम्ही पाच दिवस मरमर करतोच की. मग दोन दिवस जरा आराम करू दे की. आणि हो, उद्या आपली मॅच आहे ऑस्ट्रेलियाबरोबर. मी नील्याला बोलावणार आहे. बाकीची गँग पण येईल. आम्ही इकडं नुसता कल्ला करणार आहोत. 
रेणू - ए, आम्ही म्हणजे काय? मलाही बघायचीय मॅच. सईला पण बोलावते. सगळे मिळून बघू. आणि हो, आम्ही तुमची सरबराई करत बसणार नाही घरात. कळलं ना? उगाच बसल्या जागी हे आण, ते आण, हे खायला कर अशा ऑर्डर सोडायच्या नाहीत.
कुणाल - अगं बाई, अजिबात काळजी करू नकोस. नील्या सगळी व्यवस्था करणार आहे. पार्सल आणणार आहे. आणि मुळात मॅच दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. त्यामुळं जेवणं झालेलीच असतील.
रेणू - आणि रात्रीच्या जेवणाचं काय? तुम्ही सगळे काय ते ठरवा हं...
कुणाल - अगं, ऑर्डर करणार आहे. सगळं घरी येईल. डोण्ट वरी... फक्त आपण मॅच जिंकायला पाहिजे राव. या ऑस्ट्रेलियाला हरवायला पाहिजे. मागच्या वेळी त्यांनी सेमीत आपल्याला हरवलं होतं. त्याचा बदला घ्यायला पाहिजे.

(गोंधळेकरकाका दार वाजवतात. रेणू दार उघडते.)

रेणू - या काका, या...
गोंधळेकरकाका - कसला बदला घेणारेस? बाहेरपर्यंत आवाज ऐकू येत होता कुणाल तुझा.... कशामुळं एवढा एक्साइट झालायस बाबा?
कुणाल - अहो काका, मॅच आहे ना आपली उद्या... त्याचं बोलत होतो आम्ही. ऑस्ट्रेलियाला हरवून मागच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी आपल्याला सेमीफायनलला हरवलं होतं ना, त्याचा बदला घ्यायला पाहिजे असं म्हणत होतो. तुम्हाला काय वाटलं?
गोंधळेकरकाका - मलाही तेच वाटलं. तुला मी हेच सांगायला आलो होतो, की उद्या मॅच पाहायला मी तुमच्याकडे येऊ का?
कुणाल - या की काका. माझे मित्र-मैत्रिणी आणि बरीच गँग पण येणार आहे. पण तुम्हाला बोअर नाही ना होणार?
गोंधळेकरकाका - अरे नाही नाही. तुम्ही मित्र मित्र आहात ना... मला माझी लुडबूड कशाला? मी आपलं सहज म्हटलं. मी शिंदेंना घेऊन जोशींकडं जाईन. आमचं त्रिकूट आहेच की.
रेणू - काका, तसं काही नाही. तुम्हाला इकडं यायचं असलं, तरी येऊ शकता. मी आहे की... 
गोंधळेकरकाका - अगं, नको. आणि नंतर आपल्या मॅचेस आहेतच की. नंतर येईन कधी तरी... एवढं काही नाही. 
कुणाल - पण एक गोष्ट मात्र नक्की काका. मॅच सगळ्यांनी मिळून एकत्र बघण्यात गंमत आहे. त्यात वर्ल्ड कपची मॅच म्हणजे खास असते. 
गोंधळेकरकाका - अगदी अगदी. मला अगदी पहिल्या वर्ल्ड कपची पण आठवण आहे. तेव्हा आम्ही रेडिओवर मॅच ऐकायचो. बाळ पंडित, वि. वि. करमरकर मराठीतून कॉमेंटरी करायचे. काय सुंदर भाषा होती त्यांची... अहाहा! आणि अस्खलित मराठी शब्द... आणि भाषेवर एवढं प्रभुत्व की काही विचारू नकोस. डोळ्यांसमोर सगळं दृश्य उभं करायचे. यष्टीरक्षक, क्षेत्ररक्षण, चौकार, षटकार असे किती तरी सुंदर शब्द ते वापरायचे. 'गोलंदाज पंच आणि यष्टी यांच्या मधून जातात, उजव्या यष्टीवर मारा करतात,' असं काही तरी फार भारी बोलायचे. आणि सगळ्या खेळाडूंचा उल्लेख आदरार्थी करायचे. बाळ पंडितांचं क्रिकेटचं ज्ञान अफलातून होतं. करमरकर आकडेवारीत तरबेज होते. उत्तम स्मरणशक्ती. मागे कुठल्या सामन्यात कुणी काय केलं होतं, हे सगळे संदर्भ डोक्यात फिट्ट... पण पहिल्या दोन वर्ल्ड कपमध्ये तर आपण अगदीच लिंबू-टिंबू होतो.
कुणाल - पहिल्या वर्ल्ड कपमध्येच गावसकरनं शेवटपर्यंत नाबाद राहून ३६ धावा काढल्या होत्या ना... अगदी मंदगतीनं...
गोंधळेकरकाका - हो रे. तेव्हा आपल्याला वन-डे क्रिकेटचा काही अंदाजच नव्हता. साठ षटकं हा पठ्ठ्या टिच्चून उभा राहिला. पण उपयोग काय? इंग्लंडनं आपल्याला सपशेल हरवलं.
रेणू - पण याच गावसकरनं १९८७ च्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ९० की ९२ चेंडूंत शतक ठोकलं होतं. तेव्हाच्या मानानं ती फारच वेगवान खेळी होती. मला आठवतेय ती मॅच. मी अगदी लहान होते पण...
कुणाल - मला पण तोच वर्ल्ड कप आठवतो. १९८३ चा वर्ल्ड कप जो आपण जिंकला होता, तो अजिबात आठवत नाही.
गोंधळेकरकाका - अरे, काय धमाल आली होती. पुण्यात टिळक रोडवर हत्तीवरून साखर वाटली होती तेव्हा. आत्तासारखी न्यूज चॅनेल किंवा व्हॉट्सअप वगैरे नव्हतं तेव्हा. पण आपल्या संघाचं खूप कौतुक झालं होतं तेव्हा.
कुणाल - होय. नंतर मी ते सगळे सामने टीव्हीवर पाहिले. पण कपिलची ती १७५ धावांची अजरामर खेळी रेकॉर्डच झाली नाही. ती मात्र कायमची मिस झाली.
गोंधळेकरकाका - एक तर ती मॅच झिंबाब्वेसारख्या टीमविरुद्ध होती. आणि तेव्हा बीबीसीच्या लोकांनी संप केला होता म्हणे. त्यामुळं त्या मॅचचं चित्रीकरणच झालं नाही. पण तो सामना पाहायला गेलेले लोक भाग्यवान. त्यांना ती जबरदस्त इनिंग 'याचि देही याचि डोळा' बघायला मिळाली.
रेणू - आता सगळं किती सोपं झालंय. मोठमोठे स्क्रीन्स, एचडी क्वालिटीचं ४ के प्रक्षेपण, मोबाइलमध्ये अॅप... सगळं सगळं अगदी हाताशी...
गोंधळेकरकाका - खरंय रेणू... तंत्रज्ञानाची प्रगती खूप झाली. पण माणसं दूर गेली बघ. आता या मॅचच्या निमित्तानं लोक एकमेकांकडं जाऊन एकत्र मजा लुटत असतील तर छानच आहे.
कुणाल - अगदी बरोबर बोललात काका. मला तर ही सगळ्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र येण्यासाठीची पर्वणी वाटते. आणि आपल्याकडं क्रिकेट बहुतेक सगळ्यांनाच आवडतं. आणि सगळेच त्यातले तज्ज्ञ असतात. त्यामुळं मज्जाच.
रेणू - मी तर सचिन तेंडुलकरमुळं क्रिकेट पाहायला लागले. मीच काय, भारतात जास्तीत जास्त मुली क्रिकेट पाहायला लागल्या त्या सचिनमुळंच. मला द्रविड पण आवडतो. इन फॅक्ट, खूप मुलींना द्रविड आवडतो. तो आमचा क्रश होता एके काळी... अगदी जंटलमन माणूस...
कुणाल - अगदी अगदी. सचिन, सौरभ, द्रविड या त्रिमूर्तीनं खऱ्या अर्थानं आपल्या संघात प्राण फुंकले... आता धोनी, विराट, रोहित त्यांचीच गादी चालवतायत.
गोंधळेकरकाका - मला हल्लीचं क्रिकेट तंत्राच्या फार आहारी गेलंय असं वाटतं. नैसर्गिक शैलीची गंमत वेगळी असते. जन्मजात गुणवत्तेचा प्रभावही वेगळाच असतो. हल्ली सगळं घोटवून घोटवून तयार करतात. पण चालायचंय. जमाना बदलला, की खेळही बदलणारच.
रेणू - काका, हे जगण्यातल्या सगळ्याच क्षेत्राला लागू आहे ना? 
गोंधळेकरकाका - बरोबर. मला एवढंच वाटतं, की तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली, तरी मानवी मेंदूला, त्याच्या बुद्धिमत्तेला जे एक नैसर्गिकपणाचं वलय आहे ना, त्याची बरोबरी तंत्रज्ञान कधीच करू शकणार नाही. बॉयकॉट कितीही तंत्रशुद्ध असला, तरी आपल्याला रिचर्डस किंवा ब्रायन लाराचा खेळ पाहायला जास्त आवडतो की नाही? तसंच आहे हे! 
कुणाल - व्वा काका... अगदी परफेक्ट उदाहरण दिलंत. पण आता माझीही नैसर्गिक प्रेरणा मला साद देते आहे, की मला भूक लागलीय. ब्रेकफास्ट हवा ब्रेकफास्ट...
रेणू - काय रे कुणाल? तू बाहेरून आणणार होतास ना काही तरी? मग आता काय झालं? जाऊ दे. मीच करते आता काही तरी. दडपे पोहे करते. चालेल का?
कुणाल - चालेल? अगं, पळेल, धावेल. काका, तुम्ही आता आमच्या हिच्या हातचे दडपे पोहे खाऊनच जा... म्हणजे ही आमची दडपशाहीच आहे असं समजा.
रेणू - काय रे कुणाल! काहीही बोलतोस. पण काका, खरंच थांबा आता.
गोंधळेकरकाका - अगं, काकू रागवेल मला. तिनं घरी काही तरी करून ठेवलेलं असेल. मला जायला पाहिजे.
कुणाल - अहो, मग काकूंनाही बोलवा ना इकडं. 
गोंधळेकरकाका - अरे, नको, नको. असू दे. मी थोडे खाईन पोहे आणि मग जाईन. सध्या पाण्याचं पण पाहावं लागतं रे.
रेणू - हो ना काका. खाली सोसायटीचा बोर्ड रोज पाहावा लागतो हल्ली. अजून महिनाभर तरी पाणीटंचाई सहन करावी लागणार आहे म्हणे.
गोंधळेकरकाका - अरे, त्यात काकूला सकाळी पूजेला ताजं पाणी लागतं. मग मी ते खालून नळावरून घेऊन येतो.
कुणाल - काका, मी काकूंना सांगतो. पाणी असं शिळं, ताजं वगैरे काही नसतं बरं का... तुम्ही उगाच खेटे मारत जाऊ नका. आणि घरात नळाला येत नाही का पाणी?
गोंधळेकरकाका - येतं की. पण तुझी काकू भल्या पहाटे उठते आणि देवपूजा करते. पण पाण्याचं नियोजन काटेकोरपणे करायला पाहिजे, यात काही शंकाच नाही. मी स्वतः अनेकदा घरातलं पाणी टाकून न देता, खालच्या झाडांना घालतो. शिवाय टेरेसमध्ये पक्ष्यांसाठीही पाणी ठेवतो. आता जरा वातावरण बदललंय. निदान उकाडा तरी कमी झालाय. पण गेल्या महिन्यात पक्ष्यांना फार उपयोग झाला बघ त्या पाण्याचा...
रेणू - काका, हे फार उत्तम केलंत. आम्ही पण टेरेसमध्ये पाणी ठेवायचो. पण हल्ली पक्षी कमीच झालेयत की काय, असं वाटतं मला....
गोंधळेकरकाका - निसर्गाचा समतोल ढासळतोय हेही दिसतंच आहे. पक्षी त्याचेच बळी. काय बोलायचं?
रेणू - अगदी खरंय काका. ऋतुचक्र बदललं की, त्याचा पहिला फटका या प्राण्यांना आणि पक्ष्यांना बसतो. 
कुणाल - अरे, क्रिकेटवरून सुरू झालेली गप्पा एकदमच गंभीर वळणावर गेली की. आणि हो काका, आता पक्ष्यांवर एक वेळ बोला, पण राजकीय पक्षांवर बोलायलाच नको अजिबात. फार पकलो गेल्या दोन महिन्यांत त्या चर्चांनी... 
गोंधळेकरकाका - काही नाही. अजून तीन-चार महिन्यांनी आपल्या राज्याची निवडणूक येतेय बघ. तेव्हा आपण परत त्याच उत्साहानं राजकीय चर्चा करायला लागू, यात मला तरी अजिबात शंका नाही.
रेणू - बरं, आता सगळ्या गप्पा दडपे पोहे खाताना मारा. मी आलेच. 
कुणाल - हो, आणि 'आले'वरून आठवलं, मी नंतर चहा करतो छान आलं घालून...
रेणू - कसले पीजे करतोस रे... 
कुणाल - तू जा ना.... बघ ना ते दडपे पोह्यांचं...
गोंधळेकरकाका - आणि कुणाल, तू पण चहाचं बघ हो. तोवर मी हे पेपर वाचतो.
कुणाल - काका, बाकी सगळं सोडा. पण एक गोष्ट नक्की ना? 
गोंधळेकरकाका - कोणती रे?
कुणाल - उद्या मॅच आपणच जिंकणार ना?
गोंधळेकरकाका - अरे, तसंच होवो. तथास्तु. तसं झालं तर मी तुला आमच्या घरी बोलवून स्वतः चहा करून देईन.
कुणाल - डन काका...
रेणू - मी पण येईन हं काका...
गोंधळेकरकाका - अगं, म्हणजे काय? आमंत्रण कायमच तुम्हा दोघांनाही असतं... नक्की या...
कुणाल - येस्स... थ्री चीअर्स फॉर टीम इंडिया...

(सगळे हसतात...)

----

जगणं मस्त मजेचं १५ जून २०१९
-----------------------------------

कुणाल - रेणू, ढँणटॅडँग... ये लो जी.... ब्रेकफास्ट तय्यार... हे बघ, गरमागरम कांदाभजी... अहाहा, काय सुवास दरवळतोय...
रेणू - व्वा, व्वा, व्वा... शाब्बास रे मेरे पठ्ठे... आज किती तरी दिवसांनी तू ब्रेकफास्ट केलायस... कित्ती बरं वाटतंय मला...
कुणाल - आज तुला कॉलेजला जायची गडबड आहे म्हणून केलंय मी... आता उद्या मी मित्रांकडं जाणार आहे मॅच पाहायला... आमचा फुल्ल दंगा असेल तिकडं... तू पण चल... 
रेणू - बघू रे... मला साराला पण सांभाळायचंय. तुला काय, मनात आलं की निघाली तुमची स्वारी... 
कुणाल - अगं उलट, मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचच्या वेळी ते सगळे आपल्या घरी आले होते ना, म्हणून नील्यानं मुद्दाम या रविवारी त्याच्याकडं बोलावलंय. आणि सिस्टीम सगळी तीच. बाहेरून ऑर्डर करणार आहोत सगळं...
रेणू - काय गोंधळ घालायचा ते घाला. मला नाही रे जमणार उद्या. हा वर्ल्ड कप संपेपर्यंत हे असंच चालू राहणार आहे ना तुमचं?
कुणाल - अगं हो रेणू, म्हणजे काय आहे ना, मॅच ही अशी एकत्र, दंगा करतच पाहिली पाहिजे. मी हे मागंही बोललो ना... तुला माहितीय... ते काय म्हणतात ना हल्ली, शास्त्र असतं ते...! त्यात उद्या भारत विरुद्ध पाकिस्तान... मग काय बोलायलाच नको. तू पण खरंच चल रेणू... साराला पण घेऊन जाऊ... सई पण असेल तिकडं...
रेणू - बघू या. उद्या सकाळी ठरवते काय ते... तुला खरं सांगू का कुणाल, मला ना, रविवार संध्याकाळ एंजॉयच करता येत नाही बघ. लगेच सोमवारचे वेध लागतात. सकाळी लवकर उठायचंय, साराचं आवरायचंय, तुझा डबा, माझा डबा, ब्रेकफास्ट, मग कॉलेज... हे सगळं नाचायला लागतं बघ डोळ्यांसमोर. मग कसं एंजॉय करायचं सांग.
कुणाल - तू एक काम करतेस का? सोमवारी सरळ सुट्टी घेतेस का? नाही तर हाफ डे जा...
रेणू - कुणाल, बरा आहेस ना तू जरा? आणि कारण काय सांगू? मॅच बघत बसले रात्री म्हणून सकाळी उशीर झाला?
कुणाल - सांग की. तुला काय तुमचे प्रिन्सिपल अंगठे धरून उभं करणार आहेत का त्यांच्या ऑफिसच्या दारात? ते तरी वेळेत येतात का बघ... आपल्या देशात भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असल्यावर सगळी कारणं खपून जातात गं...
रेणू - काही नाही हं... आमचं कॉलेज सुरू होतंय आता... आणि सगळी अॅडमिशनची वगैरे गडबड असते रे... खूप कामं असतात. मला खरंच सोमवारी सुट्टी घेणं जमत नाही कधीच... आमच्याकडं सोमवारी सुट्टी घेणं म्हणजे महापाप समजलं जातं, कळलं का?
कुणाल - कमाल आहे. तू ना, वर्कोहोलिक आहेस. तुला 'मंडे ब्लूज' वगैरे येत नाहीत का गं? मला तर मंगळवारपासूनच सुट्टीचे वेध लागतात.
रेणू - हो, हो. येतात ना. मंडे ब्लूज येतात; पण कामांचा ढीग बघितला ना, की डोळे व्हाइट व्हायची वेळ येते बाबा.
कुणाल - काही नाही. तू वर्कोहोलिक झालीयस आणि तुलाच सकाळी उठून लवकर कॉलेजला पोचल्याशिवाय बरं वाटत नाही, हेच खरं. आणि काय गं, ते अॅडमिशन वगैरे सगळी प्रशासकीय कामं असतात ना? तुझं काय त्यात काम?
रेणू - अरे, तेवढंच नसतं काही. बाकी शंभर भानगडी असतात. जाऊ दे. तुला कुठं आता सगळं सांगत बसू? अरे हो, अॅडमिशनवरून आठवलं. ती वर्षा येणार आहे रे घरी... तिला मला भेटायचं होतं. काल संध्याकाळी खाली भेटली. तेव्हा मीच तिला म्हटलं होतं, की सकाळी ये म्हणून...
कुणाल - कोण गं वर्षा?
रेणू - अरे, असं काय करतोस? त्या काणे काकांच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली ती मुलगी... डिसेंबरमध्ये आली होती बघ. सहज ओळख करून घ्यायला...
कुणाल - अच्छा अच्छा... वर्षा, नववर्षा... (हसतो) ती होय! मग आता काय मिड-इयर रिव्ह्यू घ्यायला येतेय की काय ती?
रेणू - नाही रे... बघू तरी तिचं काय काम आहे ते... ती आल्यावरच कळेल.
कुणाल - अगं, तुझी गडबड आहे ना आत्ता कॉलेजला जायची? मग आत्ता कशाला बोलावलंस?
रेणू - अरे, तिला तिच्या गावी जायचंय आज दुपारी. म्हणून मीच म्हटलं, सकाळी दहा मिनिटं येऊन जा... ब्रेकफास्ट करता करता बोलू... कुणाल, ऐक ना, एक घाणा काढ ना अजून भज्यांचा...
कुणाल - अरे व्वा... हे बरंय. तू त्या वर्षाबरोबर गप्पा मारणार आणि माझा भजीवाला करणार काय!
रेणू - नाही रे. तू पण ये की गप्पा मारायला... 

(बेल वाजते. वर्षा येते.)

रेणू - ये गं वर्षा, ये. तुझीच वाट पाहत होते.
वर्षा - उशीर नाही ना झाला मला रेणूताई?
कुणाल - रेणूताई? अरे व्वा... संस्कारी बालिका दिसतेयस गं तू... (हसतो)
रेणू (हसते) - ए अगं ताई वगैरे नको. नुसतं रेणू म्हण. चालेल...
कुणाल - चला, मी गरमागरम भजी घेऊन येतो.
रेणू - येस... ये लवकर. बोल गं, काय म्हणत होतीस? तुझ्या जॉबचं काय झालं?
वर्षा - एक छोटा जॉब मिळाला होता मला इथं आल्या आल्या. पण गेल्या महिन्यातच तो सुटला. म्हणजे मीच सोडली ती नोकरी. अगदीच किरकोळ होती ती... माझा इथला खर्च जेमतेम भागत होता. शिवाय खूप काम करावं लागायचं...
रेणू - अगं, सुरुवातीला असं व्हायचंच. पण ठीक आहे. तू आता दुसरी नोकरी शोधतेयस का?
वर्षा - हो, तो शोध तर चालूच आहे. दर आठवड्याला पेपरात येणाऱ्या नोकरीविषयक जाहिराती पाहणे, वेगवेगळ्या जॉब पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे हे सगळं सुरूच आहे. एक-दोन ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन पण आले. बघू या...
रेणू - होईल गं... थोडा वेळ लागेल. पण चांगली नोकरी मिळेल तुला...
वर्षा - हो, पण मागच्या महिन्याचा सगळा पगार यातच संपला. आता घरून पैसे मागायला नको वाटतात. या फ्लॅटचं भाडंही खूप आहे. मी काणेकाकांना विचारलंय, इथं अजून दोघी मैत्रिणी आल्या तर चालतील का, म्हणून. मला कंपनी पण होईल आणि रेंट पण शेअर होईल. बघू या...
रेणू - घरी कोण असतं गं तुझ्या?
वर्षा - आई-बाबा सांगलीला असतात. एक मोठा भाऊ आहे. तो चेन्नईला जॉब करतोय. 
रेणू - अरे व्वा. छानच की. अगं, पण तू आज काय विचारायला आली होतीस? ते सांगितलंच नाहीस...
वर्षा - हो, ते विसरलेच. मला खरं ना, काही तरी आणखी स्पेशलाइज्ड शिक्षण घ्यायचंय... कुठला तरी कोर्स करायचाय....

(कुणाल भजी घेऊन येतो.)

कुणाल - गरमागरम भजी तय्यार... हे घ्या मॅडम... हे घ्या वर्षा मॅडम...
वर्षा (लाजते) - कुणालदादा, मॅडम काय हो?
कुणाल (हसतो) - मग हे कुणालदादा काय हो...? 
रेणू - अरे, ऐक. ती काय म्हणतीये, तिला कुठल्या तरी स्पेशलाइज्ड कोर्सला अॅडमिशन घ्यायचीय. तू सांगू शकतोस का काही कुणाल तिला?
कुणाल - घ्या. तू साक्षात मराठीची प्राध्यापिका, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, करिअर कौन्सेलर इथं बसलेली असताना मी बोलायचं म्हणजे सातवीच्या भूगोलात पहिला नंबर आलेल्या मुलानं थेट डॉ. जयंत नारळीकरांना अॅस्ट्रोफिजिक्सचे धडे देण्यासारखं आहे (हसतो)...
रेणू - कुणाल, काहीही हं तुझं... सांग की जरा तिला...
कुणाल - हे बघ... मी किचनमधून बाहेर येताना अर्धवट काही तरी ऐकलंय हिचं... तू परत सांग गं वर्षा...
वर्षा - काही नाही, मी सध्या जॉब शोधतेय. पण माझा सीव्ही जरा हेवी करण्याच्या दृष्टीनं मला एखादा स्पेशलाइज्ड कोर्स करायचा आहे. काय करू सांगा... एमबीए करू का?
कुणाल - एमबीए? अगं, आपल्याकडं अक्षरशः खंडीभर झालेयत एमबीए पदवीधर... शिवाय त्या कोर्सची फी किती आहे माहितीय का तुला? खासगी संस्थांमध्ये तर 'लाखों की बात' असते.
वर्षा - कल्पना आहे दादा. पण माझे बाबा मला शिक्षणासाठी पैसे कमी पडू देणार नाहीत. मी पण गेले वर्षभर नोकरी करत होते. थोडे फार साठवलेयत पैसे...
रेणू - ग्रेट. पण वर्षा, मला काय वाटतं, माहितीय का! कुणाल म्हणतोय ना, त्यात थोडं फार तथ्य आहे. आपल्याकडं पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे खूप आहेत. स्वाभाविकच इंजिनीअर किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट किंवा पीजीमध्ये एमबीएसारखे पदवीधर खरंच ढिगानं आहेत. त्यामुळं तेच कोर्स आपण निवडण्यात काही शहाणपण नाही गं...
कुणाल - मला तर आपली शिक्षण पद्धतीच पटत नाही. एखाद्याला नक्की कोणत्या क्षेत्रात गती आहे, हे कळेपर्यंत त्या माणसाची साठी आलेली असते. मग नंतर एकदमच माणसं सध्या करीत असलेलं काम सोडून अचानक भलतंच काही तरी करायला लागतात. म्हणजे डॉक्टर माणूस अचानक गायकच होतो, किंवा सीए असलेला माणूस हॉटेलच टाकतो, किंवा हॉटेल मॅनेजमेंटवाला एकदम ट्रॅव्हल कंपनीच काढतो...
वर्षा - वॉव... ट्रॅव्हल कंपनी... कसलं भारी ना... मला ना फिरायला खूप आवडतं. मग मी माझ्या या छंदाचं रूपांतर करिअरमध्ये करू शकेन असं वाटतंय.
रेणू - अगं, टूर आणि ट्रॅव्हल्स मॅनेजमेंटचे कोर्स असतात की...
वर्षा - एमबीएमध्ये असतात का?
कुणाल - नाही नाही. एमबीए म्हणजे बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन. पण त्यात शिकलेलं तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये वापरू शकताच. ते वाया जात नाही. पण तुला ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट असेल, तर थेट टूर अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंटचा कोर्स का करत नाहीस?
वर्षा - नक्कीच करीन. रेणूताई, तुझ्या कॉलेजात आहे का गं असा कोर्स?
कुणाल - यांची संस्था खूप मोठी आहे आणि तिथं अक्षरशः ढिगानं वेगवेगळे कोर्स चालतात. तिथं नक्कीच असेल...
रेणू - कुणाल, टूर अँड ट्रॅव्हल्सचा आहे की नाही, ते मी बघते. मला नक्की आठवत नाहीय असा कोर्स आहे की नाही ते...
कुणाल - ठीक आहे. नसला तरी 'गुगल'वरून माहिती काढू आपण. आपल्या इथं असा कोर्स असणारी एखादी तरी संस्था असेलच.
रेणू - हा कसा जरा वेगळा, 'हट के' कोर्स वाटतोय मला. अर्थात तिथंही कष्ट आहेतच.
कुणाल - हे बघ. कष्ट कुठं नाहीत? पण किमान हिच्या आवडीचा विषय असेल तर ती ते शिकेल ते आनंदानं... होय की नाही गं वर्षा?
वर्षा - अगदी शिकेन मी दादा. आय अॅम एक्सायटेड. मला एखाद्या ट्रॅव्हल्स कंपनीत जॉब मिळाला तर कसली मज्जा येईल! सगळं जग फिरता येईल.
रेणू - तू आज कोर्स केलास आणि तुला उद्या जॉब मिळाला, असं होणार नाही बरं का गं... आणि मिळालाच तर लगेच तुला परदेशात पाठवतील असंही नाही. आधी खालपासून शिकावं लागेल सगळं.... एखादी छोटी टूर यशस्वी करून दाखवावी लागेल. मग मोठी संधी मिळेल.
कुणाल - अर्थात. कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी हे आहेच. संधी मिळविण्यासाठी आधी स्मार्टनेस अंगी असावा लागतो. आणि संधी मिळाली, की तिचं रूपांतर यशात करून दाखवावं लागतं. तेव्हा आपण एकेक पायरी चढत करिअरमध्ये पुढं जाऊ शकतो. 
वर्षा - मान्यच आहे. माझी तयारी आहे खूप कष्ट करायची. माझ्या आई-बाबांना, दादाला माझा अभिमान वाटेल असं काही तरी छान करून दाखवायचं आहे मला...
रेणू - सो नाइस....
कुणाल - करशील गं तू... मला ना तुमच्या पिढीचं कौतुक वाटतं खरंच. आता ती सायली तुझ्यापेक्षा लहान आहे पुष्कळ. पण ती कसली फोकस्ड आहे, नाही गं रेणू...
रेणू - हो ना... ही वर्षा पण तिच्या आधीची पिढी... पण तिला आपल्याला काय करायचंय हे नक्की माहिती आहे. आम्ही त्या मानानं फारच धडपडलो, नाही का रे? 
वर्षा - आम्ही पण धडपडतोय की गं ताई... आमचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. 
कुणाल - तुमच्या प्रॉब्लेम्सना 'प्रॉब्लेम्स ऑफ प्लेंटी' म्हणतात. तुमच्या पिढीकडं सगळं काही खूप प्रमाणात आहे. तुम्हाला सगळं खूप काही मिळतंय. आणि म्हणून तुम्ही कधी कधी कन्फ्जुज्ड होता... पण तरी मी तुमची पिढी खूप जास्त फोकस्ड आहे, असंच म्हणीन.
रेणू - हो, म्हणजे यांचे फंडे क्लिअर असतात. सगळं सॉर्टेड असतं. 
वर्षा - असं काही नाही गं ताई. माझंच बघ ना. अजूनही कळत नाहीय. पण आता लवकरच मला काही तरी ठरवलं पाहिजे. नाही तर आई-बाबांची लग्नाची भुणभुण सुरू होईल अजून एक-दोन वर्षांनी...
कुणाल - पण हल्ली पालक पुष्कळच समजून घेतात बरं का तुम्हाला... तुमचं मत महत्त्वाचं होतं. आमच्या आई-वडिलांना तर काही कळायच्या आत त्यांचं लग्न झालंही होतं. त्या मानानं आम्ही जरा वेळ घेऊन वगैरे लग्न केलं.
वर्षा - दादा, लग्न ही एक गोष्ट झाली. बाकी पिअर प्रेशर पण किती असतं अरे...
रेणू - खरंय तुझं वर्षा... पण तुमच्या सुदैवानं तुमच्या पिढीला कशाचा अभाव माहिती नाही. तुम्ही मागता ते सगळं हजर होतं तुमच्यासमोर. किमान बेसिक जगण्याचा लढा तरी करावा लागत नाहीय तुम्हाला... आमच्या वेळीही नव्हता. पण आमच्या आधीच्या पिढ्यांना तो लढा लढून मग स्वतःला सिद्ध करावं लागलंय...
वर्षा - खरंय ताई. मला याची जाणीव नक्कीच आहे. म्हणूनच मी आज तुमच्याकडं आले सल्ला मागायला. आता मी नक्की काही तरी असं करून दाखवीन की, तुम्हालाही माझा अभिमान वाटेल.
कुणाल - ए रेणू, ही असं बोलून आपल्याला एकदम मागच्या पिढीत वगैरे ढकलून टाकतेय बघ....
वर्षा - ए, असं नाहीय हं काही.
रेणू (हसत) - अगं, तुझ्या दादाला म्हातारं वगैरे करू नकोस बाई इतक्यात. आत्ता कुठं त्याला विसावं वर्षं लागलंय... 
कुणाल - रेणू, चेष्टा बास हं... पण वर्षा खरं सांग. तुला मी वाटतो मोठा?
वर्षा (हसत) - हो, म्हणजे तू दादाच आहेस की रे...
कुणाल (लटके रागावून) - हे बरंय. आमची भजी खाऊन, आमचे फुकटचे सल्ले घेऊन वर आमचीच बदनामी...
वर्षा (हसते) - सॉरी सॉरी हं दादा...
कुणाल - अरेच्चा, परत दादा... आता हिला कुठल्या तरी टूरवर पाठवून दिलं पाहिजे...
रेणू - तू स्वतःची ट्रॅव्हल कंपनी काढ गं वर्षा. आणि तुझ्या पहिल्या ट्रिपला आम्ही तुझ्याकडं बुकिंग करू...
वर्षा - वॉव... कसलं भारी बोललीस ताई. मला 'आज मैं उपर, आसमाँ नीचे' असं वाटायला लागलेलं आहे...
कुणाल (चेष्टेत हसत) - हो, पण आमच्या सोफ्यावर नाचू नकोस हं वर्षा... 
रेणू - कुणाल, अरे...
वर्षा (हसते) - नाही नाही. निघते मी आता... थँक्स फॉर द भजी...
रेणू - हो. नीट जा... यू विल रॉक बेबी...

(सगळे हसतात.) 

---

जगणं मस्त मजेचं २२ जून १९ 
----------------------------

(पार्श्वभूमीवर हॉटेलमधील लोकांचे आवाज...)

कुणाल - अहाहा, किती बरं वाटतंय... खूप दिवसांनी 'खादाडेश्वर'ला आलो. किती दिवसांनी आज आयता ब्रेकफास्ट मिळणार आहे... वा... वा... वा...
रेणू - खरंय. असा कधी तरी ब्रेक बरा वाटतो रे... पण मला इथली गर्दी बघून असं वाटतं, की हल्ली लोक घरी ब्रेकफास्ट करतच नसावेत.
कुणाल - अगं, सगळे घरी ब्रेकफास्ट करायला लागले तर 'खादाडेश्वर'वाल्याचं पोट कसं भरेल? तेव्हा चाललंय ते छान आहे...
रेणू - हं, आणि या अशा पावसाळी हवेत गरमागरम डोसे, उत्तप्पे, भजी, मिसळी असं रिचवायला जाम मजा येते...
कुणाल - चला, एवढ्या एका गोष्टीत तरी एकमत झालं आपलं... चला, ऑर्डर देऊ या... तिथं मात्र आपलं एकमत होईलसं वाटत नाही. मला आप्पे हवेत.
रेणू - आणि मला मसाला डोसा...
कुणाल - वाटलंच. सांगून टाक.
रेणू (वेटरला) काका, एक मिनिट. आमची ऑर्डर घेणार? एक आप्पे द्या आणि एक मला मसाला डोसा... चटणी दोन वाट्या द्या हं...
कुणाल - आणि नंतर आपली फेवरिट फिल्टर कॉफी...
रेणू - अरे व्वा... आज मस्त मूड दिसतोय एका माणसाचा...
कुणाल - आता मी 'हहह' असं हसू का? 
रेणू - कुणाल, गप रे... कुठंही सुरू होतोस तू... 
कुणाल (हसत) - कुठेही विनोद करणे आणि वटवट करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो बजावणारच.
रेणू - बजाव, बजाव... 
कुणाल - बजावतोच आहे. भितो की काय कुणाला? बाय द वे, 'वटवट'वरून आठवलं, मागच्या रविवारी वटपौर्णिमा होती ना गं? आपल्या आणि पाकिस्तानच्या मॅचच्या नादात मी विसरूनच गेलो. तू केलीस ना पूजा वडाची? जन्मोजन्मी हाच पती मिळू दे म्हणून? (हसतो...)
रेणू - हा हा हा... मी आणि वटपौर्णिमेची पूजा? बरा आहेस ना? या जन्माचा नीट पत्ता नाही आणि सात जन्मांचं कुणी बघितलंय?
कुणाल - अगं ए, सीरियस काय होतेयस एकदम? वटवट या शब्दावरून उगाच कोटी करायचा प्रयत्न होता तो... मला माहिती आहेत तुझी या विषयावरची मतं... 
रेणू - हे बघ. मी कुणाच्या श्रद्धेचा अनादर करत नाही. तसंच माझे म्हणून जे विचार आहेत, त्याचाही कुणी अनादर करू नये एवढंच माझं म्हणणं.
कुणाल - अगं हो हो हो, मी काही म्हटलंय का तुला? बाकी तुम्ही बायका लग्न झाल्या झाल्या आम्हाला रिळाला सूत गुंडाळावं तसं दोन मिनिटांत गुंडाळून ठेवत आलेला आहात. तुम्हाला वेगळं सूत गुंडाळायची गरजच काय?
रेणू - आणि मुळात दोन माणसांत प्रेम असलं म्हणजे झालं. त्याचं अशी प्रदर्शन करायची काहीही आवश्यकता नाही, असं माझं मत आहे.
कुणाल - अगदी खरंय. मान्यच आहे. जाऊ दे. 
रेणू - नाही नाही. असं कसं? थांब ना. होऊनच जाऊ दे. मला सांग, आम्ही बायकांनी नवऱ्याचं प्रतीक म्हणून गळ्यात मंगळसूत्र घालायचं, वडाची पूजा करायची... पुरुष काय करतात रे? सांग ना...
कुणाल - आम्ही आपलं ते हे...
रेणू - काहीही करत नाही तुम्ही. मला याचाच राग येतो.
कुणाल - रेणू, रेणू, बास. विषय वटवटीकडून कटकटीकडं जायला लागला आहे. आधीच अलर्ट देतो. 
रेणू (हसते) - आता का? तुम्हाला इथं काही डिफेन्सच नाहीये लक्षात ठेव. 
कुणाल - बरं बाई. मी उद्यापासून मंगळसूत्र घालत जाईन तुझ्या नावाचं. आणि सूत गुंडाळायला कुठलं झाड बरं पडेल? वड नको. त्यापेक्षा बकुळ बरी नाही ना...
रेणू - छान. त्यातल्या त्यात स्त्रीलिंगी झाड शोधलंस ना... तुम्हा पुरुषांचं हे असंच आहे.
कुणाल - अरे देवा, अगं माझ्या डोक्यातही हे आलं नाही. झाडात कसला जेंडर बायस आणतेयस?
रेणू (लटक्या फणकाऱ्यानं) - तूच बघ. तुला पिंपळ, बाभूळ, कडुलिंब, जांभूळ, आंबा असं कुठलंही झाड आठवलं नाही. बकुळ म्हणे. माहितीये तरी का बकुळीचं झाड कसं दिसतं ते? 
कुणाल - ती एक कविता होती बघ लहानपणी. 'बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचू या...' 
रेणू - सोड रे. तुम्ही भुंगेच आहात सगळे पुरुष. या फुलावरून त्या फुलावर...
कुणाल - अरे देवा. अगं, का सटकलीयेस अशी आज? (वेटर डोसा आणून ठेवतो) हे बघ, तुझा डोसा आला. आता गरमागरम डोसा खा आणि गार हो...
रेणू - आहा, बरं झालं. वेळेत आला डोसा. वाचलास तू...

(तेवढ्यात प्रकाश येतो.)

प्रकाश - नमस्कार कुणालभाऊ. ओळखलं का? मी प्रकाश. महिन्या-दीड महिन्यापूर्वी तुमच्या घरी आलो होतो बघा.
कुणाल - अरे हो हो. आहे की लक्षात. इकडं कुणीकडं? बस ना...
रेणू - अरे प्रकाश, ये. बस. काय म्हणतोयस?
प्रकाश - नमस्कार वहिनी. नाही, बसत नाही. माझा एक मित्र यायचाय भेटायला. त्याची वाट बघतोय. तुमचं चालू द्या. 
कुणाल - अरे, मग मित्र येईपर्यंत बस की आमच्यासोबत. गप्पा मार. काय म्हणतोयस? तुझ्या जॉबचं काय झालं? मागे मी तुला एक-दोन काँटॅक्ट दिले होते, तिकडं जाऊन आलास का?
प्रकाश - हो कुणालभाऊ. पण जॉबचं काही जमलं नाही. त्याचं कसं झालंय, जिथं काम आवडतं, तिथं पगार आवडत नाही आणि जिथं पगार बरा आहे तिथं काम आवडत नाही.
कुणाल - ही गोची आहे खरी. अरे पण, तुला गरज आहे तर स्वीकारायचा ना जॉब तात्पुरता. 
प्रकाश - तसं मी आत्ता बी करतोय की एक जॉब... पण त्यात काही मजा नाही. खरं सांगू का? मी निर्णय घेतलाय भाऊ. मी गावाकडं परत जाणार.
कुणाल - अरे व्वा... हे फारच बेश्ट आहे मग... 
रेणू - तिकडं काही इमर्जन्सी आली का?
प्रकाश - नाही वहिनी, तसं नाही. मी स्वतःच ठरवलंय. आमचं गाव म्हणजे एकदम खेडं आहे. तिथं नोकरी-बिकरी मिळणं शक्यच नाही. पण मी बिझनेस करणार आहे. बी-बियाण्यांची एजन्सी मिळतेय मला. बार्शीला मेन डीलर आहे. त्याचा सब-डीलर म्हणून काम करायचं. आजूबाजूची चार-पाच गावं बी मिळालीत मला. 
कुणाल - अरे व्वा. एकदम आनंदाची बातमी दिलीस प्रकाश तू... खरं तर तुझ्याकडून पार्टीच घ्यायला पाहिजे आता...
प्रकाश - पार्टी नक्की देणार भाऊ. आता गावाकडं जातो. जरा धंदा सेट करतो. मग तुमीच या गावाकडं आमच्या. मागल्या टायमाला बी मी तुम्हाला हुरड्याला बोलावलं होतं. स्टँडिंग इन्व्हिटेशन आहे बघा. कधीही या डिसेंबर-जानेवारीत. पार्टी करूच...
रेणू - प्रकाश, मग सगळ्यांत काय आवडलंय माहितीय का? जॉब मिळत नाही म्हटल्यावर तू खचून न जाता, वेगळा मार्ग शोधायचा प्रयत्न केलास. 
प्रकाश - खरंय वहिनी. नीलेशभाऊनं बी खूप मदत केली. अहो, सोपं नाहीये खेड्यात हे असं बिझनेस करणं. शहरात एक बरंय. कुणी कुणाच्या अध्यात नसतं की मध्यात नसतं. गावात तसं नाही. माणसं कमी. सगळेच एकमेकांना ओळखणारे. त्यात रोजगाराच्या किंवा पैसे कमावायच्या संधी बी कमी. त्यात राजकारण लई असतंय. तंगड्यात तंगड्या.
रेणू - काय सांगतोस? कहर आहे हं...
कुणाल - खरंय रेणू प्रकाश म्हणतोय ते. मी नील्याकडून ऐकलंय एक-दोनदा हे...
प्रकाश - मग काय हो? डीलरशिप भेटण्यासाठी बराच जुगाड करावा लागला. पण काही का असेना, आता ते सगळं मार्गी लागलंय. मी ठरवलंय. आता मागं हटायचं नाय. माझा धंदा बी व्हईल आणि गोरगरीब शेतकऱ्याची सेवा बी हुईल.
कुणाल - सेवा कशी काय?
प्रकाश - म्हंजे असं आहे कुणालभाऊ, माझ्या दुकानातून गरजू शेतकरी रिकाम्या हातानं परत जानार न्हाय. लगीच पैसा नसला, तरी त्याला बी-बियाणं दिल्याबिगर मी जाऊ देणार न्हाय.
रेणू - पण काय रे, मी ऐकलंय, की शेतकऱ्यांना सरकारच फुकट बी-बियाणं देतं म्हणून. मग त्यांना विकत कशाला घ्यावं लागेल तुझ्याकडून?
प्रकाश - अहो वहिनी, सगळ्यांना नाही भेटत. त्याच्या लई अटी-शर्ती असत्यात. शिवाय ते वेळेत भेटणं महत्त्वाचं असतं. एक मात्र आहे, की आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी भरपूर काय काय योजना आणल्यात. लोकांनी नीट माहिती करून घ्यायला पाहिजे. 
कुणाल - अरे, टीव्ही किंवा आकाशवाणीसारख्या प्रसारमाध्यमांतून ही माहिती वारंवार दिली जात असते. हल्ली तर शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आणि त्यावर हवामानाचे अंदाज दिले जातात असं मी ऐकलंय.
प्रकाश - मी तेच म्हटलं. गरज आहे ती फक्त थोडं जागरूक राहण्याची. कसंय कुणालभाऊ, मी दोन महिने इथं शहरात राहिलो. सगळी परिस्थिती बघितली. इथलं वातावरण बघितलं. खूप गर्दी झालीय हो आपल्या शहरांत. सगळे शहरांत येऊन राहिले तर कसं व्हायचं? म्हणून मी मुद्दाम गावी परत जायचं ठरवलंय. तिथंच राहायचं, जम बसवायचा, टिकून राहायचं.
रेणू - अगदी योग्य बोललास. आता आपल्याकडं खरंच रिव्हर्स मायग्रेशनची गरज आहे.
प्रकाश - म्हणजे?
रेणू - म्हणजे हेच. तू जे करतोयस ते. आतापर्यंत खेड्यांतून शहरांकडं लोंढे येत होते. आता शहरांकडून खेड्यांकडे जायला पाहिजे.
कुणाल - हे तसं आदर्शवादीच बोलणं झालं रेणू. पूर्वी असं म्हणायचे, एकदा मुंबईत आलेला माणूस कधीही ते शहर सोडून परत जात नाही. आता पुण्याविषयीही तेच म्हणायची वेळ आलीय. कोणी शहर सोडून जात नाही बघ. आता हा प्रकाश म्हणजे अपवाद. शिवाय तो मुळातच इथं कायमचा राह्यला आला नव्हता.
प्रकाश - कायमचा आलो नव्हतो हे खरंय. कसंय बरं का, माझ्यासारखे अनेक तरुण येताना 'तात्पुरते' म्हणूनच येतात आणि कायमचे शहरातलेच होऊन जातात. त्यांना इथल्या लाइफस्टाइलची सवय होऊन जाते. चटकच म्हणा ना!
कुणाल - खरंय. पण इथली गर्दी आत्ताच नियंत्रणाच्या बाहेर चाललीय बघ. कधी तरी याचा कडेलोट होईलच. त्यापेक्षा प्रकाश करतोय ते किती योग्य आहे!
रेणू - अगदी बरोबर. पण त्याला रोजगाराची किंवा बिझनेसची संधी मिळाली म्हणून. तशी संधी खेड्यातून शहरात येणाऱ्या प्रत्येक तरुणाला मिळायला पाहिजे. तरच हे 'रिव्हर्स मायग्रेशन' शक्य होईल.
कुणाल - बरं, गंभीर चर्चा खूप झाली. प्रकाश, तू काय खाणार सांग. मी आप्पे सांगितले आहेत.
प्रकाश - नको भाऊ. मित्र येईल एवढ्यात. मग आमचं काही तरी खाणं होईलच.
कुणाल - अरे घे रे. आपली भेट आज अचानकच झाली. आता परत कधी भेटशील कुणाला माहिती!
प्रकाश - असं कसं? तुम्ही येणार आहात ना आमच्या रानात हुरडा खायला? नीलेशभाऊ येत असतो. त्याच्याबरोबर या.
रेणू - हो, आम्ही आज भेटणारच आहोत. तो येतोय दुपारी आमच्याकडं. नेहमीप्रमाणे यांची गँग मॅच पाहायला एकत्र जमणार आहे.
प्रकाश - अरे वा. हे भारीच झालं. मग आजच ठरवून टाका. 
कुणाल (हसतो) - अरे, आमचं काय दोन मिनिटांत ठरेल. सध्या वर्ल्ड कप सुरू आहे ना, त्यामुळं वारंवार भेटताहेत सगळे मित्र. 
प्रकाश - खरंय. तो एक खेळ असा आहे, की सगळा देश एकत्र येतो जयघोष करायला.
रेणू (हसते) - आजही आपण जिंकणार. धावांचा पाऊस पडणार...
प्रकाश - पडू पडू द्या. आणि आपल्याकडं पण खराखुरा पाऊस पडू द्या. मिरगा गेल्या, आता आदरा (आर्द्रा) पडू द्या हत्तीवाणी... मग पेरण्यांना जोर येईल. शेतकऱ्यासाठी दर वर्षीच ह्यो पेरणीचा वर्ल्ड कप असतोय बघा.
कुणाल - पडणार पडणार. पाऊस धावांचाही पडणार आणि खराखुराही पडणार... आप्प्यांची शपथ! अहाहा...
रेणू - कुणाल, काय रे? अप्प्यांची शपथ काय?
प्रकाश (हसतो) - वा, कुणालभाऊ व्वा... तुमच्या तोंडी आप्पेच आप्पे पडोत...

(सगळे हसतात...) 

---

जगणं मस्त मजेचं २९ जून २०१९
-------------------------------

रेणू - बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव...
कुणाल - अहाहा रेणू, सकाळी सकाळी अगदी देव आठवलेच बघ... आणि केवळ विठ्ठलच बोलतोय असं नाही, तर माझे पायही आता 'विठ्ठल विठ्ठल' असं बोलतायत...
रेणू (हसून) - बरं झालं. त्यानिमित्ताने तुझ्याकडून निदान देवाचं नाव घेणं झालं. पण त्यानिमित्तानं तू वारीत चाललास हे काय कमी आहे?
कुणाल - अगं, म्हणजे काय? माझी किती तरी दिवसांची इच्छा होती. अखेर आमच्या गँगनं मनावर घेतलं म्हणून सगळ्यांसोबत जाता आलं. पण ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती बरं का... यापूर्वी मी कॉलेजात असताना गेलोय वारीसोबत...
रेणू - हो, माहितीय. खडकी ते सीओईपी... (हसते)
कुणाल - असू दे, असू दे. तेवढं का होईना, पण चाललो ना. आमच्या कॉलेजतर्फे खूप काय काय उपक्रम राबवले जायचे तेव्हा वारकऱ्यांसाठी! म्हणजे अजूनही राबविले जातात. पण मी कॉलेजात असताना त्यात भाग घेत होतो, इतकंच सांगायचं आहे बरं का मला...
रेणू - माहितीय रे. मी पण केलीय वारी. आळंदी ते पुण्यापर्यंत का होईना, पण मी चार पावलं चालले आहे वारीत...
कुणाल - काय गंमत आहे ना रेणू, आपल्या शहरातलं सगळं वातावरणच बदलून जातं या वेळी. एक तर मस्त पाऊस पडून गेलेला असतो. सगळीकडं हिरवंगार व्हायला सुरुवात झालेली असते. त्यात ही वारी येते आणि वातावरणात एकदम ते अष्टसात्त्विक का काय म्हणतात, तसले भाव जागे होतात.
रेणू - अगदी अगदी. तुझ्यासारख्या एरवी फार देव देव न करणाऱ्या माणसालाही वारीत चालावंसं वाटतं, तो भक्तीचा फील घ्यावासा वाटतो ना, हे फार महत्त्वाचं आहे.
कुणाल - तुला खरं सांगू का रेणू... माझं देव नावाच्या संकल्पनेशी भांडण नाहीच आहे मुळी. माझं भांडण आहे ते बिनडोक कर्मकांडांशी. त्यामुळं मला ना, कर्मकांडापेक्षा आपल्या या सगळ्या लोकपरंपरा जास्त आवडतात. नव्या कोऱ्या पांघरूणाला एक प्रकारचा परकेपणा असतो. ते पांघरूण टोचतं. त्याउलट आजीच्या किंवा आईच्या साडीपासून केलेल्या रजईची मऊसूत ऊब कशी हवीशी वाटते ना, तशा मला आपल्या या लोकपरंपरा वाटतात.
रेणू - अहाहा, काय आठवण काढलीस रे... रजई किंवा गोधडीच खरं तर ती... सिल्कच्या हजारो रुपयांच्या पांघरूणाला सर नाही बघ या घरगुती रजईची...
कुणाल - माणसाच्या जगण्यात हे असे मऊ, हळवे कोपरे हवेतच. नाही तर आयुष्य फारच वैराण होऊन जाईल. प्रत्येक माणूस आपला असा कम्फर्ट शोधत असतो. महाराष्ट्रातल्या हजारो, लाखो लोकांना या वारीतून त्यांच्या जगण्यातला हा कम्फर्ट मिळत असावा.
रेणू - मिळत असावा काय, मिळतोच. मला तर वारीतल्या बायका पाहून असलं भारी वाटतं ना. साध्यासुध्या, पण कणखर हाडाच्या या सगळ्या बायका. हजारो संसार आपल्या दणकट खांद्यावर पेलणाऱ्या... एके दिवशी संसाराची आसक्ती काही काळ का होईना, सोडून एकदम घराबाहेर पडतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा मुक्तीचा आनंद दिसतो मला!
कुणाल - अगं, असतोच तो. संसाराच्या रामरगाड्यात वर्षभर अडकलेल्या या बायकांना कुठं साधं घराबाहेर पडणं अवघड, तर गावाबाहेर अशक्यच. आता जरा चित्र बदललंय. पण फार नाही. हजारो बायका अजूनही खेड्या-पाड्यांत या संसाराच्या चक्रात अडकून पडल्या आहेत.
रेणू - त्यात चुकीचं काहीच नाही. पण माणसाला बदल हवाच असतो रे. यानिमित्ताने त्यांची रोजच्या धबडग्यातून सुटका होत असेल बघ. या बायकांना त्यांच्या हक्काची सुट्टी आणि सहलीचा आनंद अशा दोन्ही गोष्टी मिळवून देते ही वारी! का नाही आवडणार त्यांना मग?
कुणाल - एकदम खरंय. मुळात मला वारीत स्त्री आणि पुरुष यांच्यात काही भेदच जाणवत नाही. एकदा 'माउली'ची लेकरं म्हटली, की कोण स्त्री आणि कोण पुरुष... दोघांमध्येही मुक्तीचाच आनंद दिसतो मला. लोक म्हणतात, देव कुठं आहे? कुठं भेटतो? मी तर म्हणतो, अरे, यातल्या प्रत्येक माणसाचा आनंदानं उजळलेला चेहरा बघा. माउलींच्या चरणांवर डोकं ठेवायला मिळाल्यानंतर त्यांचे डोळे पाहा. देव अजून कुठं कशाला शोधायला पाहिजे?
रेणू - अगदी खरं... या वारीचं वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांनी विश्लेषण करायचा प्रयत्न केलाय. लाखो लोक एकाच ठिकाणाहून, एकाच हेतूनं, एकाच दिशेनं प्रवास करताहेत, तेही पाचशे वर्षांहून अधिक काळ - हे जगात कुठंच नाही. यामागं मला तरी सगळ्यांत महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मुक्तीची भावना.
कुणाल - बरोबर. संसारात असूनही नसल्यासारखी ही अवस्था. अल्पकाळाची विरक्ती... भावविरहित अवस्था... ही सगळ्यांना हवीच असते. आपण सगळेच काही संत होऊ शकत नाही. आपण साधीसुधी माणसं. आपल्या पाप-पुण्याच्या हिशेबात सतत दोलायमान होणारी. पण कुठं तरी ही अशी संधी मिळते आणि माणसं ती घेतात. 
रेणू - वारीच्या निमित्तानं सगळा समाज एकत्र येतो, ही घटना मला फार महत्त्वाची वाटते बघ. पुण्यात किती तरी ठिकाणी या वारकऱ्यांसाठी सर्वधर्मीय लोक मदत करतात. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात. कुणी चपलांची व्यवस्था करतात, तर कुणी छत्र्यांची. सामाजिक बांधिलकी, सलोखा वगैरे शब्द आजकाल फार कृत्रिम वाटू लागलेयत. पण हे शब्दही अस्तित्वात नव्हते, तेव्हापासून आपल्याकडं कृती होत होती तशी. 
कुणाल - अगदी. म्हणूनच मी आता ठरवलंय. दर वर्षी थोडी थोडी पायी वारी करायची. अजून पाच-सहा वर्षांनी कदाचित मी पूर्ण वारी पण करीन.
रेणू - व्वा, कुणालमहाराज. मग तर आपल्या पायाचं तीर्थच घेतलं पाहिजे.

(दिघेकाकू आत येतात.)

दिघेकाकू - रेणू, येऊ का गं? कसलं तीर्थ वाटतीयेस?
रेणू - काकू, या, या. अहो, काही नाही. कुणाल वारीत चालून आला ना. आता त्याला खूप उत्साह आलाय. म्हणतोय, की कधी तरी पूर्ण वारी करीन. मग मी म्हटलं, की तू अशी वारी पूर्ण केलीस तर तुझ्या पायाचं तीर्थ घेतलं पाहिजे. (हसते)
दिघेकाकू - वा, वा. कुणाल, खरंच जाऊन आलास काय रे... नमस्कार करते बघ मी आत्ताच तुला.
कुणाल - अहो अहो काकू, काय करताय. मला कशाला नमस्कार.
दिघेकाकू - अरे, हा तुला नाही काही नमस्कार. वारीला जाऊन आलास ना. पालखीचं दर्शन घेतलंस ना, म्हणून...
कुणाल - काकू, खरं सांगू का, मला आवडतात आपल्या या परंपरा. एवढा मोठा लोकसमूह एखादी गोष्ट इतक्या फ्रिक्वेंटली, एवढी वर्षं करत असेल, तर आपल्याला त्याविषयी किमान कुतूहल वाटलं पाहिजे ना...
दिघेकाकू - खरंय बाबा तुझं. मी फार पूर्वी गेले होते वारीला. आता वयोमानानुसार, इथल्या इथं पालखीच्या दर्शनालाही जाणं होत नाही. पाय भयंकर दुखतात माझे. हल्ली गर्दी किती असते आणि... त्यापेक्षा ते टीव्हीवर दाखवतात तेव्हा मी आपली तिथंच दर्शन घेते झालं.
रेणू - काकू, योग्यच आहे. तुम्ही नाहीच करायची ही दगदग. आणि खरं सांगू का, ज्यानं त्यानं आपापल्या कामात आपला 'विठ्ठल' शोधावा.
कुणाल - व्वा रेणू व्वा... क्या बात है... कोट ऑफ द डे हं... कोट ऑफ द डे... भिंतीवर कोरून ठेवू का हे मी? कसलं भारी वाक्य टाकलंस. ज्यानं त्यानं आपल्या कामात आपला 'विठ्ठल' शोधावा... व्वा... ग्रेट...
रेणू - थट्टा करतोयस की खरंय म्हणतोस रे? काही कळत नाही तुझं...
कुणाल - नाही, नाही. आत्ता थट्टा मुळीच नव्हतो करत. खरंच आवडलं अगं... कधी कधी तू बोलतेस की बरं... (हसतो)
दिघेकाकू - तुझं खरंय रेणू. पण कधी कधी आपण असहाय झालोय की काय, अशी भावना येतेच गं मनात...
रेणू - अजिबात असं काही मनात येऊ देऊ नका. आता तुम्ही ही एवढी छोटी मुलं सांभाळताय पाळणाघरात. किती छान गोष्ट आहे ही. आणि मुलांमध्ये देवतत्त्व असतं, असं आपणच म्हणतो की! तुमच्या अवतीभवती हे छोटे छोटे देवच बागडत असतात दिवसभर... तुमच्याएवढं देवाचं सान्निध्य कुणाला लाभतं सांगा.
कुणाल - व्वा. रेणू, आज म्हणजे तू सिक्सरमागं सिक्सर मारतीयेस. पण अगदी खरंय तुझं... आपल्या कामात आनंद शोधावा. आपल्याला रोजीरोटी देणारं आपलं काम हाच आपला देव असं मानलं की गोष्टी फार सोप्या होतात.
दिघेकाकू - हे मला अगदी पटलंय बघ रेणू... माझ्याकडं ही सगळी मुलं आहेत, त्यांना सांभाळण्यात माझा वेळ छान जातो आणि नामस्मरण सतत सुरूच असतं महाराजांचं... त्यामुळं मला वेगळी पूजाअर्चा असलं काही करावं लागत नाही बघ.
रेणू - किती छान आहे हे... बरं, काकू, तुम्ही आत्ता सहजच आला होतात ना? की काही काम होतं?
दिघेकाकू - हो अगं, फार काही मोठं काम नाही. पाळणाघर सुरू होऊन आता महिना होत आला. त्या गडबडीत तुझ्याकडं यायचं राहून गेलं होतं. आणि आज सकाळी हे दडपे पोहे केले होते, म्हटलं, थोडा नमुना देऊन यावं तुझ्याकडून...
कुणाल - व्वा, व्वा काकू... अन्नदानानंसुद्धा 'विठ्ठल' भेटतो बरं का आपल्याला. तुम्हाला तो आत्ता ऑलरेडी भेटलेला आहे. बघू ते दडपे पोहे...
रेणू - कुणाल, अरे काय हे? सारासुद्धा एवढा हट्ट करत नाही. थांब जरा. नीट बशीत घालून देते. मग खा.
कुणाल - दे लवकर. आणि काकू, तुमचे ते पौष्टिक लाडू आहेत का हो?
दिघेकाकू - लाडू आता मुलं फस्त करतात बाबा. तुझ्यासाठी वेगळे करते आता...
कुणाल - करा, करा... काकू, तुम्हाला आत्ता माझ्यात देव दिसला होता ना. पाया पडत होतात माझ्या. मग आता नैवेद्य नको का या देवाला?
दिघेकाकू - देणार आहे. आणि देव नैवेद्य खात नाही बरं का. त्याला नैवेद्य दाखवून आम्हीच खात असतो तो. तेव्हा बघ. तुला देव व्हायचंय की आपला कुणालच बरंय ते?
रेणू (हसत) - काकू, खरंच काही दिवसांनी यालाच तुमच्या पाळणाघरात ठेवायची वेळ येणार आहे. आत्ता अगदी वारीवर फार आध्यात्मिक वगैरे चर्चा करत होता. आणि भूक लागली, की संपलं सगळं अध्यात्म. कुणालमहाराज, संयम ही अध्यात्माकडं जाण्याची पहिली पायरी आहे, हे लक्षात ठेवा.
कुणाल - कुणी काढलाय हा नियम? आम्हाला नको तो. आम्ही भरपूर खाऊ-पिऊ आणि मग ती आध्यात्मिक चर्चा... नाही तरी 'आधी पोटोबा आणि मग विठोबा' असं म्हटलंच आहे.
दिघेकाकू - म्हणूनच अध्यात्म सोपं नसतं. आपल्याकडं लोक अध्यात्माविषयी बोलतात भरपूर; पण ते आचरणात कुणी आणत नाही. कारण बोलणं नेहमीच सोपं. सगळ्यात असूनही नसल्याचा भाव मनात आणता येणं खूप अवघड आहे कुणाल. समाधानी विरक्तीचा हा टप्पा गाठता यायला हवा बघ.
रेणू - काकू, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. आम्ही अजून लहानच आहोत त्या टप्प्यापर्यंत यायला. पण डोळ्यांसमोर ते उद्दिष्ट आत्तापासून असायला पाहिजे हे नक्की. 
कुणाल - रेणू, आता माझे पाय खरंच 'विठ्ठलनामाचा टाहो' फोडताहेत. 
रेणू - थांब, तुला बादलीत गरम पाणी आणून देते. त्यात पाय ठेवून बस थोडा वेळ...
दिघेकाकू - वारी काय किंवा रोजच्या जगण्यातलं अध्यात्म काय, पायाला त्रास आहेच. एकदा तो पाय किंवा पाया भक्कम झाला की मग पुढचं सगळं सोपं. आणि हा पाया आहे विरक्तीचा... सगळ्या मोहपाशातून दूर जाण्याचा... देव आपोआप भेटतो मग...
कुणाल - काकू, तुमचं अगदी खरंय. पण सध्या तरी आम्ही ऐहिकातच रमलो आहोत. कदाचित सगळे भोग भोगून व्हायचे असतील. तो टप्पा आला की आपोआप विरक्ती येत असेल. भरपूर जेवल्यानंतर जसं काही खाण्याची इच्छा उरत नाही, तसंच या विरक्तीचं असावं.
दिघेकाकू - तसंच आहे. पण प्रश्न एवढाच आहे, की किती जेवलं म्हणजे आपलं पोट भरलं, हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळं आपण खात सुटतो सतत.
रेणू - अगदी बरोबर. फार सूचक आहे हं काकू हे वाक्य...
दिघेकाकू - काय करणार? अनुभव बोलतो बाई... असो. चला, निघते, आमच्या छोट्या देवांचा नैवेद्य करायचा आहे अजून... येते... 
कुणाल - बोला, पुंडलिक वरदा हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय...

(सगळे हसतात...)

(शेवटी हरिनामाचा गजर...)

---

No comments:

Post a Comment