24 Jun 2019

क्रिकेट - मटा लेख


क्रिकेटचा आस्वाद : रेडिओ ते ॲप
-----------------------------------------

सध्या वर्ल्ड कप क्रिकेटचं वारं वाहतंय. भारतातलं क्रिकेटचं वेड काही नव्यानं सांगायला नको. भारतच काय, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि आता अफगाणिस्तान धरला तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये हे क्रिकेटचं वेड आहे. वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांपैकी निम्मे, म्हणजे पाच संघ दक्षिण आशियाई आहेत, यावरून या ठिकाणी असलेलं क्रिकेटचं वेड लक्षात येईल. भारतभूमीवर इंग्रजांनी पाऊल ठेवल्यापासून या देशाला क्रिकेटचा जो ‘चस्का’ लागलाय, तो अद्याप कमी व्हायला तयार नाही. यापुढेही तो कमी होण्याची मुळीच शक्यता नाही. क्रिकेटचा आस्वाद घेण्याच्या प्रकारांत आणि पद्धतींत मात्र प्रचंड बदल झालाय. क्रिकेटचं वेड कायम असलं, तरी क्रिकेट अनुभवण्याचे छंद मात्र बदलले आहेत.
भारत कसोटी क्रिकेट खेळायला लागला ते १९३२ पासून. तेव्हा या देशातील लोकांना क्रिकेट सामना पाहण्यासाठी दोनच पर्याय होते. एक म्हणजे थेट मैदानात जाऊन सामना पाहणे किंवा दुसरा म्हणजे आकाशवाणीवर क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन ऐकणे. मैदानात जाण्याची क्षमता फारच मर्यादित लोकांची होती. देशभरातील तमाम जनतेला आकाशवाणीवर सामन्याचं समालोचन ऐकणं हाच एक पर्याय होता. आकाशवाणीवर नामवंत क्रीडातज्ज्ञ बहारदार वर्णन करीत. सामना लोकांना दिसत नसल्याने मैदानावर घडणारी प्रत्येक घटना समालोचकांना सांगावी लागे. मैदानावरचं वातावरण, हवामान, खेळपट्टीची स्थिती या सगळ्यांचं वर्णन करून सांगावं लागे. पाच दिवस (विश्रांतीचा एक दिवस धरून सहा) चालणाऱ्या कसोटी सामन्यांत रोमांच किंवा काही तरी थरार उत्पन्न करण्याचं कामही समालोचकांना करावं लागत असे. बॉबी तल्यारखान हे एक महान समालोचक होते. विजय मर्चंटही समालोचन करायचे. ‘क्रिकेट विथ विजय मर्चंट्स’ हा त्यांचा कार्यक्रम रविवारी दुपारी ‘विविध भारती’वरून प्रसारित व्हायचा. मात्र, आमच्या पिढीनं त्यांचं समालोचन ऐकलं नाही.
आम्ही रेडिओ ऐकायला लागलो, तेव्हा मराठीत बाळ ज. पंडित आणि वि. वि. करमरकर हे प्रसिद्ध समालोचक होते. दोघांचीही शैली वेगळी. मात्र, क्रिकेटचं ज्ञान व खेळावरचं प्रेम सारखंच! मराठीतील धावतं समालोचन ऐकणं ही गोष्ट या दोघांमुळं मेजवानी वाटायची. दोघेही शब्दप्रभू. पंडित यांचं खेळाचं तांत्रिक ज्ञान अचाट होतं, तर करमरकर यांना आकड्यांविषयी प्रेम होतं. त्यांच्या बोलण्यात सतत आकडेवारी यायची. त्यांच्या जोडीला सुरेशचंद्र नाडकर्णी, चंद्रशेखर संत, प्रकाश पायगुडे ही मंडळीही आकाशवाणीवर धावतं वर्णन ऐकवायची. घरोघरी रेडिओ संचाभोवती जमून हे धावतं वर्णन ऐकणारे क्रिकेटप्रेमी हे महाराष्ट्रातील घराघरांमधील कॉमन दृश्य होतं. मराठीत ही मंडळी होती, तर दिल्लीवरून सुरेश सरैय्या, सुशील दोशी, नरोत्तम पुरी आदी मंडळी इंग्रजी-हिंदीतून उत्तम समालोचन करीत असत. विशेषत: सरैया यांचं इंग्रजी ऐकण्यासारखं असे. दोशी व पुरी यांची स्वत:ची अशी एक शैली होती आणि त्यांच्या त्या ‘शुध घी’वाल्या हिंदीतून क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकणं हा एक वेगळाच आनंद होता.
क्रिकेटचा आस्वाद घेण्याच्या या दोन सर्वमान्य पद्धती १९८३ पर्यंत व्यवस्थित सुरू होत्या. त्यात खऱ्या अर्थानं बदल झाला तो कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतानं अनपेक्षितपणे १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर! भारतात ‘दूरदर्शन’चं आगमन १९५९ मध्ये झालं असलं, तरी त्याचा प्रसार फारच मर्यादित होता. मुंबई दूरदर्शन १९७२ मध्ये सुरू झालं. मात्र, अनेक वर्षे ‘दूरदर्शन’चं प्रक्षेपण कृष्णधवल आणि ठरावीक काळच असायचं. भारतात १९८२ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि तेव्हाच ‘दूरदर्शन’चं प्रक्षेपण रंगीत झालं. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच वर्षी भारतानं थेट विश्वचषकच जिंकला. दोनच वर्षांत आपल्या संघानं १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली ‘बेन्सन अँड हेजेस ट्रॉफी’ (जिचं वर्णन मिनी वर्ल्ड कप असं केलं गेलं होतं) पाकिस्तानला अंतिम सामन्यात हरवून जिंकली. त्यानंतर खऱ्या अर्थानं भारतात क्रिकेटचा प्रसार झपाट्यानं झाला. भारतातील व एकूणच उपखंडातील प्रचंड लोकसंख्या, क्रिकेटला मिळणारा पाठिंबा व त्यातून मिळणारा महसूल याचं महत्त्व बीसीसीआय, आयसीसी यांना एकदमच लक्षात आलं. दोनच वर्षांत वर्ल्ड कपचं यजमानपद भारत आणि पाकिस्तानला संयुक्तरीत्या बहाल करण्यात आलं. तेव्हा १९८७ मध्ये भरलेला रिलायन्स वर्ल्ड कप हा आज चाळिशीत असलेल्या पिढीतील अनेकांनी टीव्हीवर पाहिलेला पहिला वर्ल्ड कप होता. या वर्ल्ड कपमध्ये भारताने उपांत्य फेरीपर्यंतच मजल मारली असली, तरी इडन गार्डनवर रंगलेला ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड हा अंतिम सामना भारतातील लक्षावधी लोकांनी टीव्हीवर पाहिला.
पुढच्या चार वर्षांतच भारतात ऐतिहासिक आर्थिक, सामाजिक व राजकीय बदल घडले. राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिंह रावांनी जागतिकीकरणाद्वारे भारतीय बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात भरलेला वर्ल्ड कप भारतात प्रथमच ‘स्टार’ या खासगी उपग्रह वाहिनीद्वारे पाहायला मिळाला. तोवर ‘दूरदर्शन’च्या कॅमेऱ्यांनी सामना पाहायची सवय असलेल्या भारतीय नजरांना हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रक्षेपण फारच भावलं. त्यानंतर पुन्हा पुढचा वर्ल्ड कप भारतासह पाकिस्तान व श्रीलंकेत भरला. तोवर भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर सचिन तेंडुलकर नावाचा तारा उदयास येऊन चांगलाच तळपू लागला होता. आशियाई देशांचा क्रिकेट जगतावरील वरचष्मा या स्पर्धेनं अधोरेखित केला. ही स्पर्धा प्रथमच श्रीलंकेनं जिंकली. उपखंडातला क्रिकेटज्वर यानंतर केवळ वाढणारच होता. दर स्पर्धेगणिक बीसीसीआय ही आपली क्रिकेटची सर्वोच्च संस्था अधिकाधिक श्रीमंत, व्यावसायिक आणि तगडी होत चालली होती. टीव्हीच्या तंत्रज्ञानातही बदल होत चालले होते. स्टंपमध्ये कॅमेरा बसविणे ही प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट होती. याच काळात धावचीतसारख्या निर्णयांवरचे वाद टाळण्यासाठी ‘थर्ड अंपायर’ या संकल्पनेचा जन्म झाला. आता टीव्हीवर स्लो मोशन रिप्ले पाहून मैदानाबाहेर बसलेला अंपायर धावचीतचे किंवा अन्य काही निर्णय देऊ लागला. क्रिकेटमध्ये आलेला पैसा, खेळाडूंची श्रीमंती आणि तंत्रज्ञानाच्या डोळे दिपवणाऱ्या प्रगतीकडे सामान्य प्रेक्षक विस्फारलेल्या नजरेनं पाहत होता. क्रिकेटमध्ये नैसर्गिक शैलीपेक्षा तंत्र किंवा कौशल्य सरस ठरण्याचेही हे दिवस होते. गावसकरचा स्ट्रेट ड्राइव्ह, गुंडाप्पा विश्वनाथचा स्क्वेअर कट, दिलीप वेंगसरकरचा कव्हर ड्राइव्ह किंवा अजहरुद्दीनचा फ्लिक यांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रेक्षकांना १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये मार्क ग्रेटबॅचनं पहिल्या पंधरा षटकांत धुलाई करण्याचा जो ट्रेंड सुरू केला, तो पचवणं जड जात होतं. नंतर, म्हणजे १९९६ च्या वर्ल्ड कपमध्ये तर कालुवितरणा-जयसूर्या या जोडीनं धुमाकूळ घातला. गोलंदाजांची क्रूर कत्तल दिसू लागली. त्यासाठी एकदिवशीय क्रिकेटचे सगळे नियम हे फलंदाजांना अनुकूल असे तयार करण्यात आले किंवा बदलण्यात आले.
एकविसावं शतक उजाडलं, तेव्हा दालमिया व नंतर श्रीनिवासन, ललित मोदी आदींमुळं भारतीय क्रिकेट संघटना जगातील अनभिषिक्त एक क्रमांकाची क्रिकेट संस्था झाली होती. बीसीसीआय पैशांच्या जोरावर आयसीसीलाही धाकात ठेवते, असं उघड बोललं जाऊ लागलं. काळ बदलत चालला होता. लोकांकडे आता मोबाइल आले होते. सचिनमुळे एरवी क्रिकेट पाहत नसलेला महिला वर्गासारखा किती तरी मोठा प्रेक्षकवर्ग क्रिकेटला लाभला होता. ऑस्ट्रेलियात याच काळात लोकप्रिय झालेल्या ‘टी-२०’सारख्या वेगवान स्पर्धेची भुरळ बीसीसीआयला या काळात पडली नसती तरच नवल! ललित मोदींनी २००८ मध्ये भारतात पहिली आयपीएल स्पर्धा भरविली. सामान्य क्रिकेटप्रेमींना खेळाडूंचा लिलाव वगैरे गोष्टी झेपण्यापलीकडच्या होत्या. मैदानात नाचणाऱ्या चीअरगर्ल्सबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र, आयपीएल तुफान हिट ठरली. मधल्या काळात महेंद्रसिंह धोनीसारख्या रांचीसारख्या तुलनेनं मध्यम शहरातून आलेल्या क्रिकेटपटूचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आयपीएलद्वारे भारतातल्या हजारो होतकरू क्रिकेटपटूंच्या स्वप्नांना नवे पंख लाभले. देशभरात क्रिकेटचं एक वेगळंच युग सुरू झालं. त्यानंतर गेल्या दहा वर्षांत झालेले सगळे बदल आपल्या डोळ्यांसमोर आहेत. स्मार्टफोनच्या रूपानं झालेली दळणवळणातील अद्भुत क्रांती क्रिकेटच्या आस्वादातही मोठा बदल घेऊन आली.
आता लोक ‘ॲप’वर मॅच पाहू लागले. जिथे जाऊ तिथे आपल्यासोबत मॅच नेण्याची ही युक्ती लोकांना फारच आवडली. आता तर एकीकडं ॲपवर मॅच पाहायची आणि दुसरीकडं ‘क्रिकइन्फो’सारख्या साइटवर पडणाऱ्या क्रिकेट रसिकांच्या एक से एक माहितीपूर्ण, गमतीशीर कमेंट पाहायच्या, असंही अनेक जण करू लागले. ‘ॲप’वर मॅच पाहता पाहता आता वेगवेगळे गेमही खेळता यायला लागले. मैदानांवर ‘ड्रोन’सारखे तरंगते कॅमेरे आले. एकही हालचाल कॅमेऱ्याच्या नजरेतून निसटू शकत नाही. खेळातील रंगत वाढविण्यास हे सगळे घटक कारणीभूत ठरले आहेत.
पण एक मात्र खरं. क्रिकेटच्या आस्वादाचा रंग बदलला असेल, पोतही बदलला असेल; पण आपल्या संघाचा खेळ सुरू असताना होणारी धडधड, तो रोमांच, तो थरार अजूनही तसाच आहे. एका सच्च्या क्रिकेटप्रेमी माणसाला अजून काय हवं?

---

(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती; २३ जून २०१९)

---

No comments:

Post a Comment