11 Jun 2019

मुंबई ट्रॅव्हलॉग - ६ ते ८ जून १९

मुंबईची सहल...
-------------------



मुंबई शहर मला आवडतं. खरं तर आयुष्यात काही काळ नोकरी किंवा ज्याला आपण नशीब काढण्यासाठी वगैरे म्हणतो, तसा मुंबईत काढावा, अशी माझी फार इच्छा होती. पण तो योग काही आला नाही. मात्र, अधूनमधून मुंबईत जाऊन फिरायला आवडतं. या वेळी मुलाची शाळा सुरू होण्याआधी कुठं तरी दोन दिवस जायचं होतं. म्हणून आम्ही मुंबईलाच जायचं ठरवलं. यंदा एप्रिलमध्ये तिथं सुरू झालेलं ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’ पाहणं हे एक मोठं आकर्षण होतं. (कुठंही काहीही नवं झालं, की ते पाहायला जायला मला आवडतं. अर्थात, सहज शक्य असेल तरच... मुंबईला २००९ मध्ये जून महिन्यात वांद्रे-वरळी सेतू तयार झाला आणि आम्ही लगेच जुलैत केवळ तो पूल पाहायला फक्त घरातले पाच जण गेलो होतो. ‘स्टॅच्यू ऑ‌फ युनिटी’ पुतळा मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये खुला झाला आणि आम्ही लगेच डिसेंबरमध्ये तो पाहून आलो. तर ते असो.) शिवाय मुंबईत आमच्या ‘टाइम्स ग्रुप’ची दोन चांगली गेस्ट हाउसेस आहेत. एक बाबूलनाथला आहे, तर दुसरं प्रभादेवीला. मागच्या वर्षी मी बाबूलनाथला राहिलो होतो, म्हणून या वेळी प्रभादेवीचं गेस्ट हाउस बुक केलं. गुरुवारी (६ जून) सकाळी ‘प्रगती एक्स्प्रेस’नं निघालो. या वेळी प्रथमच एसी डब्यात बुकिंग केलं होतं. बाहेरचा एकूण उकाडा बघता हा निर्णय अगदी योग्य होता, हे जाणवलंच. योगायोगानं अभिजितपण (पेंढारकर) याच गाडीनं मुंबईला निघाला होता. मग लोणावळ्याला तो आमच्या डब्यात येऊन भेटला. फोटो वगैरे झाले. खंडाळ्याला तो परत त्याच्या डब्यात गेला. गाडी सव्वाअकराला दादर स्टेशनला पोचली. इथं आम्ही बाहेर पडून अभिजितबरोबर चहा, कॉफी घेतली. नंतर तो गोरेगावला त्याच्या कामाला गेला आणि आम्ही पश्चिमेला येऊन टॅक्सी पकडली. ही शेअर टॅक्सी होती. मी प्रभादेवीच्या गेस्ट हाउसला आधी गेलो नव्हतो. मात्र, मागे एकदा पु. ल. देशपांडे अकादमीत गेलो असल्यानं सयानी रोड मला माहिती होता. आमच्या गेस्ट हाउसच्या पत्त्यात ‘होंडा शोरूमसमोर’ असं लिहिलं होतं. मग शेअर टॅक्सीवाल्याला तोच पत्ता सांगितला. त्यानं माणशी बारा रुपये घेऊन तिथं सोडलं. ‘पर्ल रेसिडेन्सी’ या बहुमजली इमारतीत पंधराव्या मजल्यावर आमचं गेस्ट हाउस आहे. चौदावा आणि पंधरावा असे दोन मजले आमच्याकडं आहेत. पंधराव्या मजल्यावर जाऊन रूम ताब्यात घेतली. तिथला एसी सुरू करताच जिवाला गार वाटलं. कारण दादरवरून इथं येईपर्यंत पंधरा मिनिटांतच आमचा घाम निघाला होता. (आता पुढचे दोन दिवस हेच होणार होतं.) गेस्ट हाउसला ब्रेकफास्ट, लंच, डिनरचीही सोय आहे. तिथल्या माणसानं आम्ही लंच करणार आहोत का, ते विचारलं. आम्ही जेवणार होतोच. मग त्याची तयारी होईपर्यंत जरा फ्रेश झालो. आज जेवायला आम्ही तिघंच होतो. पण तिथल्या माणसानं आम्हाला साग्रसंगीत सगळं करून वाढलं. एसीमध्ये बसून, समोर सागरी सेतू पाहत गरम फुलके खाण्याचा आनंद काही औरच! व्यवस्थित जेवण झालं. पण आमचे पुढचे कार्यक्रम ठरले होते. मग लगेच बाहेर पडलो...
इमारतीतून बाहेर पडून खाली उतरल्यावर लगेच घामाच्या धारा सुरू झाल्या. आता ‘उबर’शिवाय पर्याय नव्हता. मग लगेच तिथून ‘उबर’मध्ये बसून आम्ही चर्चगेटला डॉ. मृदुला दाढे जोशींना भेटायला निघालो. आधी बोलणं झालं होतंच. चर्चगेटला सिडनेहॅम कॉलेजशेजारीच व्ही. व्ही. भवन (विद्यापीठ विद्यार्थी भवन) आहे. तिथंच पहिल्या मजल्यावर मुंबई विद्यापीठाचा संगीत विभाग आहे. तिथं चौकशी केली. मृदुला दाढेंची खोली लगेच सापडली. पण त्या तिथं नव्हत्या. मग फोन केला. शेजारीच कुणाकडं तरी त्या बसल्या होत्या. मग आल्या. त्यांच्या खोलीत तंबोरे उभे  करून ठेवले होते. कोपऱ्यात त्यांचं टेबल व खुर्ची होती. समोर चक्क एक गादी घातली होती. मग आम्ही तिथंच मांडी ठोकून बसलो खालीच. आम्ही प्रत्यक्ष पहिल्यांदाच भेटत होतो. त्यांना फार आनंद झाला. मलाही त्यांना भेटून आनंद झाला. खूप लहानपणापासून मी टीव्हीवर त्यांचं नाव पाहिलं होतं व आवाजही ऐकला होता. आता त्या आपल्या चांगल्या स्नेही झाल्या आहेत, याचा आनंद वेगळाच होता. ‘रहें ना रहें हम’सारखं संगीतावरचं अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन असलेलं त्यांचं पुस्तक मी सोबत आणलं होतं. त्यावर मला त्यांची सही घ्यायची होती. त्यांनी मोठ्या आनंदानं सही करून मला पुस्तक दिलं. मी माझं ‘यक्षनगरी’ पुस्तक त्यांना भेट द्यायला आणलं होतं. ते दिलं. सोबत खाऊ नेला होता. तो दिला. गप्पा मारल्या भरपूर. फोटोसेशन झालंच. त्यांनी मग त्यांच्या एचओडींची ओळख करून दिली. नंतर आम्हाला शेजारी असलेल्या ‘नॅचरल्स’मध्ये आइस्क्रीम खायला घेऊन गेल्या. ते दुकान एसी होतं. त्यामुळं तिथं बसायला फारच बरं वाटत होतं. पण एकेक आइस्क्रीम घेऊन बसणार तरी किती वेळ? शेवटी निघालो. त्यांचा निरोप घेतला. परत ‘उबर’ बुक केली. आता आम्हाला ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’कडं जायचं होतं. पेडर रोडवर गुलशन महल इथं हे संग्रहालय आहे. अर्थात हे मला पत्ता वाचूनच माहिती होतं. जाताना पेडर रोडला लागल्याबरोबरच खूप ट्रॅफिक जॅम लागलं. आज ईदचा दुसरा दिवस होता आणि सर्व मुस्लिम लोक आज सुट्टी काढून हाजी अलीला फिरायला जातात आणि त्यामुळं हा जॅम आहे, ही माहिती टॅक्सीवाल्या काकांनी दिली. आम्ही सकाळी इकडं येतानाही हाजी अलीपाशी गर्दी दिसली होतीच. पण तेव्हा हे लक्षात आलं नव्हतं. अखेर टॅक्सीवाले काका वैतागले. ‘इथून जवळच आहे, तुम्ही चालत जाऊ शकता,’ वगैरे भाषा त्यांनी सुरू केली. तिथून ते संग्रहालय जवळ होतं, हे खरं; पण इतकंही जवळ नव्हतं आणि एवढ्या उन्हाचं चालत कोण जाणार? मग आम्ही तसेच बसून राहिलो. हळूहळू अर्ध्या तासानं आमची टॅक्सी त्या ‘फिल्म डिव्हिजन’च्या दारात थांबली. तिथं अजून एक धक्का आमची वाट पाहत होता. दारातच तिथल्या सिक्युरिटीवाल्यानं आज म्युझियम बंद असल्याचं सांगितलं. हे म्युझियम फक्त सोमवारी आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असतं, हे मला माहिती होतं. मग आज का बंद आहे, असं विचारलं, तर ‘मंत्री आनावाला है’ असं उत्तर मिळालं. आपल्याकडची ही राष्ट्रीय समस्या आहे. मंत्री एखाद्या ठिकाणी जाणार, म्हटल्यावर ते ठिकाण सर्वसामान्य लोकांना बंद कशासाठी? फार वैताग आला. (हे मंत्री म्हणजे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, हे दुसऱ्या दिवशी कळलं. ते तिथं झाडं लावायला गेले होते. असो.)
आमच्या आधीच्या प्लॅननुसार आम्ही हे संग्रहालय पाहिल्यानंतर भुलेश्वर मार्केटला जाणार होतो. मग आम्ही लगेच तिकडं जाण्याचा निर्णय घेतला. ही मुख्य रस्त्यांपासून आतली मुंबई मला पाहायची होती. टॅक्सीनं आम्हाला भुलेश्वर मार्केटच्या मुख्य चौकात सोडलं. आम्ही थोडा वेळ ते मार्केट फिरलो. पण उन्हानं अगदी असह्य झालं. त्यात मनाजोगतं खरेदीसारखं काही मिळेना. शेवटी परत गेस्ट हाउसवर जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळच्या ट्रॅफिक जॅममधून वाट काढत आम्ही ‘उबर’नं पुन्हा प्रभादेवीला आलो. थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी सिद्धिविनायकाला जायचं ठरवलं. हे मंदिर तिथून अगदीच चालत पाच मिनिटांच्या अंतरावर होतं. मग तिथं गेलो. मी या मंदिरात आत्तापर्यंत गर्दीमुळं कधीच गेलो नव्हतो. कायम बाहेरूनच नमस्कार. आताही तुलनेनं कमी गर्दी म्हणावी, तरी ती लाइन एवढी मोठी होती, की किमान तास-दीड तास सहज लागला असता. सुदैवानं तिथं मुखदर्शनाची सोय होती. आम्ही तिथं गेलो. तिथूनही गणपतीची मूर्ती व्यवस्थित दिसत होती. खाली जी रांग होती, त्यांनाही अगदी गणपतीच्या थेट जवळ जाता येतच नव्हतं. मग पाच फुटांऐवजी पंधरा फुटांवरून दर्शन घेण्याचा हा पर्याय मला पुष्कळ बरा वाटला. हा नवसाला पावणारा गणपती. पण तिथं गेलं, की मी काही मागायचं विसरूनच जातो. आणि तेच बरं, असं नंतर वाटतं. सिद्धिविनायकाकडून आम्ही आता दादरच्या मार्केटला (रानडे रोड) जायचं ठरवलं. ते तिथून जवळ असल्यानं टॅक्सीवाले लवकर येईनात. मग चक्क ‘बेस्ट’ची बस पकडून रानडे रोडला गेलो. तिथं त्या कंडक्टरनं बहुतेक आम्हाला एक स्टॉप अलीकडंच उतरवलं. कारण गोखले रोड व रानडे रोड जिथं क्रॉस होतात, तिथं अंडरग्राउंड मेट्रोचं मोठं काम सुरू आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा थोडं चालत जावं लागलं. इथंही आम्ही नुसतंच फिरलो. काही घेतलं नाही. मग जरा वेळानं कंटाळा आला. परत ‘उबर’ बुक केली. केळकर रोडवरून आम्ही रवींद्र नाट्य मंदिरला आलो. तिथं खाली ‘उत्सव’ नावाचं एक हॉटेल आहे. मागं मी तिथं जेवलो होतो. मग तिथंच जेवलो आणि चालत गेस्ट हाउसला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गेस्ट हाउसवरच उत्तम ब्रेकफास्ट करून बाहेर पडलो. आज सकाळी आधी ज्योत्स्ना केतकरांना भेटायला जायचं होतं. ‘आकाशवाणी आमदार निवास’ हा पत्ता सांगून ‘उबर’मध्ये बसलो. सकाळच्या वेळी साउथला जायला किती वेळ लागतो, याचा अनुभव घेत होतो. या वेळचे टॅक्सीवाले काका मराठी होते. त्यामुळं गिरणी कामगार संपापासून भरपूर विषय निघाले. गप्पा झाल्या. परळच्या टोलेजंग इमारती पाहून काकांना जुन्या चाळींचं परळ आठवत होतं. वास्तविक ते पार्ल्याला राहणारे होते. पण जन्मानं मुंबईकर असल्यानं सगळ्या शहराची माहिती होती. मी माझी ऐकीव माहिती सांगून काकांचा कढ वाढवीत होतो. जे. जे. फ्लायओव्हरवरून जाताना मग काकांना अरुण गवळीची आठवण झाली. महंमद अली रोडवरून जाताना कसा ट्रॅफिक जॅम व्हायचा आणि आता पुलामुळं काम कसं सोपं झालंय हे सांगून झालं. पूल उतरल्यावर गाडी आमच्या ऑफिसवरून गेली. तिथंच तो पडलेला हिमालय पूल (म्हणजे त्याचे अवशेष) पाहिला. आम्ही ज्योत्स्ना केतकरांना अकरा वाजता येतो असं सांगितलं होतं. दहा मिनिटं उशिरा, म्हणजे ११.१० ला आम्ही ‘आकाशवाणी’त पोचलो. ज्योत्स्ना केतकरांची केबिन शोधून काढली. आम्ही बऱ्याच काळानं भेटत होतो. त्यांनाही आम्हा तिघांना भेटून फार आनंद झाला. ‘यक्षनगरी’ची एक प्रत त्यांना दिली. पुष्कळ गप्पा झाल्या. चंद्रशेखर नगरकर व प्रभा जोशी हेही आता मुंबई आकाशवाणीतच असतात, हे कळलं. पण त्यांची भेट झाली नाही. थोड्या वेळानं मग ज्योत्स्ना केतकरांचा निरोप घेऊन निघालो. ‘आकाशवाणी’त एसीमुळं बरं वाटत होतं. बाहेर पडल्यावर पुन्हा शिजून निघायला लागलो. सुदैवानं समोरच आमदार निवासाचं उपाहारगृह होतं. तिथल्या एसी कँटीनमध्ये शिरलो. जेवण ठीकठाकच होतं. पण एसीमुळं निदान दोन घास गेले तरी!

‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’

आता आम्हाला काल राहिलेलं ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’ बघायचंच होतं. मग टॅक्सी करून तिथं गेलो. आज कुणी मंत्री येणार नाहीय ना, असं त्या सिक्युरिटीवाल्याला विचारलं. त्याला अर्थातच काही कळलं नाही. मग आत जाऊन तिकीट काढलं. विद्यार्थ्यांना आयकार्ड दाखवलं, तर ५० टक्के की १०० टक्के सवलत आहे. पण नीलचं आयकार्ड सोबत नव्हतं. अर्थात केवळ २० रुपये प्रतिमाणशी तिकीट असल्यानं आम्ही सरळ तीन तिकिटं काढली. हे संग्रहालय दोन भागांत, म्हणजे दोन इमारतींत विभागलं आहे. त्यापैकी जी जुनी बैठी इमारत आहे, ती ‘गुलशन महल’ नावाची जुनी वास्तू आहे. अर्थात आता तिचंही नूतनीकरण झालेलं आहे. या वास्तूत असलेलं संग्रहालय म्हणजे थोडक्यात सर्व संग्रहालयाची ‘समरी’ किंवा ‘इंट्रो’ असल्यासारखं आहे. अर्थात तेही बरंच मोठं आहे आणि पाहायला किमान अर्धा तास लागतो. त्या शेजारी असलेल्या नव्या काचेच्या अत्याधुनिक इमारतीत चार मजल्यांवर हे संग्रहालय विखुरलेलं आहे. संग्रहालय नक्कीच चांगलं आहे. भारतीय सिनेमासंबंधी अशी विस्तृत व तपशीलवार माहिती सांगणारं संग्रहालय आपल्याकडं नव्हतंच. त्यामुळं हे संग्रहालय त्या दृष्टीनं उपयुक्त आणि उत्कृष्ट झालं आहे. त्यातही भारतीय चित्रपटसृष्टीचं माहेर असलेल्या मुंबईत ते असावं, हेही योग्यच! या संग्रहालयात केवळ भारतीय चित्रपटसृष्टीची माहिती नाही, तर एकूणच चित्रपटसृष्टीची सुरुवात, कॅमेऱ्याचा शोध, पहिला चित्रपट अशी सगळी माहिती आहे. निरनिराळे पुतळे, पोस्टर, चित्रपटाशी संबंधित कॅमेरा, लाइट्स, ट्रॉली आदी यंत्रसामग्री आदी गोष्टींनी हे संग्रहालय सजलेलं आहे. सर्व प्रमुख व्यक्तिरेखांचा भिंतीवर कोलाज आहे. त्यांच्या चित्रपटांची माहिती आहे. सुरुवातीच्या काळात वापरले जाणारे ‘बायोस्कोप’ किंवा ‘शांबरिक खरोलिका’सारख्या चित्रांच्या खेळांची माहिती आहे. दादासाहेब फाळकेंचा पूर्णाकृती पुतळा आहे. ‘राजा हरिश्चंद्र’चा एक सेट आहे, मूकपटांच्या काळातील निर्माते-दिग्दर्शकांचा एक विभाग आहे, बाहेरील बाजूस गेल्या शंभर वर्षांतील निवडक गाजलेल्या चित्रपटांची पोस्टर आहेत.
या विभागातून आपण दुसऱ्या इमारतीत जातो तेव्हा चौथ्या मजल्यापासून सुरुवात करून एकेक मजला खाली यायचं अशी रचना आहे. हा विभाग जास्त आधुनिक व इंटरॲक्टिव्ह आहे. इथं प्रत्यक्ष स्क्रीन आहेत. छोट्या टीव्हीपासून ते मोठ्या भिंतीवर दिसणाऱ्या भव्य पडद्यावर सतत काही ना काही सुरू असतं. चित्रपट तयार कसा होतो, याची ‘अथ’पासून ‘इति’पर्यंत सगळी माहिती आहे. अनेक ठिकाणी संगणकीकृत माहिती इयरफोन लावून, हवी ती गोष्ट सिलेक्ट करून ऐकायची सोय आहे. या विभागात राज कपूरचा ‘आवारा’तील ऐतिहासिक अवतारातला पुतळा आहे. खरं तर इथं काय बघू आणि काय नाही, असं होऊन जातं. निवांत बघायचं असेल, तर भरपूर वेळ घेऊनच इथं यायला हवं. तिसऱ्या मजल्यावर ध्वनीपासून ते एडिटिंगपर्यंत आणि कॅमेरामनपासून ते कोरिओग्राफीपर्यंत सगळ्या तांत्रिक किंवा सहायक अंगांची माहिती आहे. हा विभाग खरं तर सर्वाधिक माहितीपूर्ण आहे. विशेषत: जुन्या काळातील एडिटिंगची यंत्रसामग्री आणि रिळांच्या जमान्यातील सिनेमॅटोग्राफीची मोठमोठी यंत्रं, लाइट्स असं सगळं इथं बघायला मिळतं. तंबूतला सिनेमा पाहण्यासाठी खरंच एक छोटेखानी तंबू केला आहे. सिनेमाच्या तांत्रिक बाजूंमध्ये रस असलेल्यांना इथं भरपूर वेळ काढता येईल. यानंतर तिसरा मजला आहे तो खास लहान मुलांसाठी. मला हा विभाग विशेष आवडला. यात आधुनिक गॅजेट्सचा वापर करून मुलांना खेळता येण्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इथं मुलांना शूटिंग करता येतं, छोटी ॲनिमेशन फिल्म तयार करता येते, डबिंग व्हॉइस देता येतो, इतकंच नव्हे, तर व्हीएफएक्सचाही वापर करून फोटो काढता येतो. शिवाय एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, मेकअप हे सगळं आहे. एक क्विझ पण खेळता येते. इथं किती वेळ जातो ते खरंच कळत नाही. शेवटच्या म्हणजे पहिल्या मजल्यावर ‘गांधीजी आणि सिनेमा’ असा इंटरेस्टिंग विभाग आहे. महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हा खास विभाग तात्पुरता केला आहे, की तो कायम राहणार आहे हे कळलं नाही. मात्र, गांधीजींवर किती विपुल प्रमाणात सिनेमे तयार झाले आहेत आणि जगभरातल्या चित्रकर्मींवर त्यांचा किती प्रभाव आहे, हे इथं कळतं. गांधीजींचा आपण पाहतो त्यापेक्षा एक वेगळाच पुतळा इथं उभारलाय. तो छान आहे.
चार मजल्यांच्या या संग्रहालयात प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्याची व वॉशरूमची चांगली व्यवस्था आहे. लिफ्ट आणि एस्कलेटरही अर्थातच आहेत. तळमजल्यावर एक ऑडिटोरियम आहे. तिथं रोज सायंकाळी ४ ते ५ किंवा ५ ते ६ या वेळात दोन छोट्या फिल्म (‘फिल्म डिव्हिजन’च्या संग्रहातल्या ) दाखविल्या जातात. आम्ही गेलो, तेव्हाच्या फिल्म काही विशेष वाटल्या नाहीत आणि आम्हाला वेळही नव्हता, त्यामुळं ते ऑडिटोरियम तेवढं पाहायचं राहिलं. पण संग्रहालय छानच आहे. अर्थात त्यात अजून सुधारणा करता येऊच शकतील. सिनेमा माध्यमात प्रत्यक्ष काम करणाऱ्या माणसांनी हे पाहिलं, तर त्यांना त्या अधिक सुचू शकतील. मला मुळात आधी असं संग्रहालय नव्हतं आणि आता ते किमान झालंय, याचा आनंद आहे. प्रत्येक सिनेमाप्रेमीनं आपल्या पुढच्या मुंबई वारीत आवर्जून जावं असं हे ठिकाण आहे, एवढं नक्की!
संग्रहालयातून बाहेर पडल्यावर मग चौपाटीला जाणं आलंच. पेडर रोडला एवढ्या जवळ जायला टॅक्सी मिळेना. मग पुन्हा बसनं गेलो. ‘सुखसागर’च्या स्टॉपला उतरून चालत चौपाटीवर गेलो. आधी ‘कॅफे आयडियल’मध्ये जाऊन थोडं फार खाल्लं. (याही हॉटेलात मी मागच्या ट्रिपच्या वेळी आलो होतो.) मुळात एसीत बसता यावं, हा मुख्य हेतू होता, हे सांगणे न लगे. इथं ती ‘ज्यूक बॉक्स’ची सोय आहे. याचा मालक बहुदा इराणीच असावा. (तिथं कार्ड चालत नाही. कॅश द्यावी लागते.) आजूबाजूला लोक मस्तपैकी बिअरचा आस्वाद घेत होते. मी एकदा अर्धांगाकडं दृष्टिक्षेप टाकला. पुढच्याच क्षणाला चहाची ऑर्डर दिली, हेही सांगणे न लगे. इथं समोर एक तरुण बसला होता. आम्ही उठून जाताना तो आम्हाला ‘तुम्ही आत्ता एनएमआयसीत होता ना,’ असं म्हणाला. आम्ही अर्थातच ‘हो’ म्हणालो. बाहेर पडलो आणि समोर चालत चौपाटीवर गेलो. इथं तुफान गर्दी होती. जरा वेळ टाइमपास केला. मग भेळ, पाणीपुरी, गोळा असं सगळं खाऊन झालं. धनश्री व नीलचं पोट भरलं. तिथून पुन्हा ‘उबर’ करून गेस्ट हाउसला परतलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता चेक-आउट होतं. चेक-आउट करूनच खाली ब्रेकफास्ट करायला गेलो. तिथून टॅक्सीनं थेट दादर शिवनेरी स्टँडला आलो. साडेदहाची स्वारगेटला जाणारी ‘अश्वमेध’ मिळाली. एक्स्प्रेस-वेवर एका ट्रकवाल्यानं आमच्या गाडीला कट मारला. त्यामुळं आमच्या ड्रायव्हरनं एवढ्या जोरात ब्रेक मारला, की सगळे आदळले. पुढं आमच्या ड्रायव्हरनं त्याला गाठला आणि गाडी आडवी घातली. गाडीत फार प्रवासी नव्हतेच. आम्ही तीन-चार पुरुष मंडळी ड्रायव्हरसंगे भांडायला उतरलो. जी व्हायची ती जोरदार ‘तू तू मैं मैं’ झाली. आमचा ड्रायव्हर बारकुडा होता. पण त्याच्या अंगात फार जोर होता. त्याला येत होत्या त्या सगळ्या जोरदार शिव्या देत, तो ट्रकवर चढून त्या ड्रायव्हरला मारत होता. त्या ड्रायव्हरची चूक होतीच. म्हणून तो डिफेन्सिव्ह मोडवर होता. पण शेवटी त्यानंही त्याच्या ट्रकवरचं दांडकं काढलं. आमच्या आगे-मागे गाड्या थांबल्या. अखेर आवराआवरी होऊन, ‘चल पोलिस चौकीवर’ वगैरे होऊन दोन्ही गाड्या मार्गस्थ झाल्या. थोडा वेळ गेल्यानंतर एका ठिकाणी यू - टर्न घेऊन त्या ट्रकवाल्यानं पोबारा केला. ते अपेक्षितच होतं. पुढं तळेगाव टोलला पोलिसांना आम्ही सगळा किस्सा सांगितला. त्यांनी तक्रार नोंदवून घेतली. कुणी तरी व्हिडिओ केला होता. ट्रकचा नंबरही होता. अखेर तिथून निघालो व अडीचच्या सुमारास चांदणी चौकात उतरलो. ‘उबर’ (शेवटची) करून एकदाचे तीन वाजता घरी येऊन पोचलो.
(घामाघूम) जिवाची मुंबई संपली होती; पण ‘घामाघूम पुण्या’चा अध्याय लगेचच सुरू झाला होता...

----

आधीच्या मुंबई ट्रिपविषयी वाचा...

----




No comments:

Post a Comment